Thursday 14 January 2010

हरिश्चंद्रगड आणि विहंगम कोकणकडा ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...


सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर आमच्यापैकीच काही जणांची 'किलबिल' सुरू होती. आळस देत-देत बाहेर आलो आणि समोर बघतो तर काय... सुंदर दृश्य होते समोर... एक सुंदर पुष्करणी आणि त्याच्या बाजुलाच असलेले एक अतिशय महादेवाचे सुरेख मंदिर. काल रात्री अंधारात हे सौंदर्य बघायचे हुकले होते. थोड़े पुढे जाउन बाहेर पाहिले आणि परत मागे आलो. ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा सुद्धा अप्रतिम होती. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि राहण्याजोग्या असलेल्या दुसऱ्या लेण्यात आम्ही राहिलो होतो. शेजारच्या म्हणजे तिसऱ्या लेण्यात प्रवेश करतानाच चांगली २ मीटर उंचीची एक कोरीव गणेशमूर्ती आहे. त्यामुळे त्याला 'गणेशगुहा' असे ही म्हणतात. कालच्या 'लंबी रेस की दौड़' नंतर सर्वच थकलेले जाणवत होते. पण बसून चालणार नव्हते कारण आज ट्रेकचा शेवटचा दिवस होता. सकाळी गड़ बघून दुपारपर्यंत गड़ सोडून संध्याकाळपर्यंत 'तोलारखिंड - खिरेश्वर मार्गे खूबीफाटा' गाठायचा होता. तिथून पुढे मग माळशेज मार्गे मुरबाड. तेंव्हा आम्ही आवरायला घेतले. चहा बनत आला होता आणि नाश्त्याला काकाने पोहे बनवले होते. इतके मस्त झाले होते की चव अजून सुद्धा जिभेवर आहे. भूक लागली बघा मला लिहितानाच. ते आम्ही सर्वांनी खाल्ले. खाता-खाता काल रात्रीच्या मी हुकवलेल्या काही गोष्टींवर गप्पा सुरू झाल्या. काल रात्री गड़ चढताना कविता इतकी थकली होती की अखेर संतोषने तिची सॅक घेतली होती. पण त्यामुळे संतोषची पाठ दुखून आली होती. शिवाय मी झोपेत असताना कवीशने माझ्या तोंडाला टूथपेस्ट लावल्याचे समजले. (त्याचा बदला राहुलने नंतर घेतलाच... कसा ते पुढे येईलच.)

८ वाजत आले तसे काकाने आम्हा सर्वाना गड़ बघायला हाकलले. गड़ बघून १२:०० वाजता परत गुहेकडे यायचे होते. आम्ही आधी थेट समोर मंदिर आणि पुष्करणी पहायला गेलो. या पुष्करणीचे नाव 'सप्ततीर्थ' असे आहे. त्यात १४ कोनाडे असून आधी त्यात विष्णुमुर्त्या होत्या. खुप वर्षापूर्वी कोणा चोराने त्या पळवून नेल्या. आता असतील कुठल्या तरी श्रीमंत दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात. शेजारीच महादेवाचे प्रशत्र मंदिर आहे. आत प्रवेश केला की मोकळी जागा आहे. आतमध्ये शुद्ध, स्वच्छ आणि अतिशय थंड अश्या पाण्याच्या टाक्या आहेत. एक गणेशमूर्ती देखील आहे. देवळाशेजारून मंगळगंगेचा उगम होतो. अजून थोड़े पुढे 'केदारेश्वर' नावाचे अजून एक लेणं आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यामध्ये बरोबर मध्यभागी असलेला चौथरा आणि त्यावर असलेले भव्य शिवलिंग. हे लेणं ३-४ फुट खोल असून बर्फासारख्या थंड पाण्याने कायम भरलेले असते. आम्ही ते सर्व बघून पुन्हा वरती गुहेबाजुला आलो. इतके बाळूचे घर सुद्धा आहे. तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर त्याला सांगायचे. फ़टाफ़ट पीठल - भाकरी आणि सोबत कांदा-ठेचा लगेच तयार.(काय? भूक लागली ना वाचून? मग इकडे लिहिताना माझे काय होत असेल ते विचारूच नका.. :D)




आम्ही तिथून थेट कोकणकडयाकडे गेलो. गडाच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकणाकडे तोंड करून उभा असलेला हा कडा म्हणून त्याचे नाव 'कोकणकडा'. आता असा कोणी ट्रेकर नसेल ज्याने कोकणकडा पाहिला नसेल किंवा किमान त्या विषयी ऐकले नसेल. ह्याची महती काय वर्णावी... सह्यादी मधला सर्वात रौद्र आणि भीषण, बघता क्षणीच काळजात थरकाप उडवणारा असा हा अंतर्वक्र आकारात ६००-७०० मीटर लांबीचा आणि ४००० फुटपेक्षा अधिक उंचीचा हा कडा म्हणजे एक विचित्र विलक्षण प्रकार आहे. हिम्मत असेल तर ह्याच्या टोकावर उभे राहून दाखवा. हवेने उडून एक चक्कर नक्की खाल आणि मग पुन्हा येउन जमिनीवर आपटाल इतकी जोरात हवा असते. हेहे.. गंमत करतोय पण फेकलेले दगड सुद्धा बऱ्याचदा हवेने उडून वर येतात इतकी हवा असतेच. अर्थात तसे कृपया कोणी करू नका कारण न जाणे एखादा दगड खाली गेलाच आणि खालून कडयाला भिड़त एखादा प्रस्तरारोहक वर येत असेल तर??? होय .. १९८६ मध्ये हा कडा एका बह्हादराने (मिलिंद पाठक बहुदा) सर केला त्यानंतर अनेक सह्यवेडया प्रस्तरारोहकांनी ह्याची माती भाळी लावली आहे. येथे आता १२०० फुटांचे रेपेल्लिंग अणि व्हयाली क्रोसिंग सुद्धा होते. इथून सूर्यास्त पाहणे सुद्धा एक भन्नाट अनुभव आहे. सूर्यास्त होतो तो आपल्या डोळ्याखाली. म्हणजे 'eye लेवल' खाली. कधी गेलात तर हा अनुभव चुकू नका. पावसाळ्यात गेलात तर फ़क्त इंद्रधनुष्य नव्हे तर इंद्रवज्र सुद्धा दिसू शकते. सूर्य आपल्यावर आणि ढग आपल्याखाली असल्याने आपण बरोबर मध्ये येतो आणि हे असे घडते. मी कुठल्या गडावर नाही मात्र महिन्याभरापूर्वी कामावर जाताना विमानातून पाहिले. सुंदर आणि अवर्णनीय असे. आम्ही गेलो तेंव्हा दुपार झालेली होती तेंव्हा पहिल्यांदा आम्ही हा अनुभव चुकवला हे सांगायला नकोच. पण त्यानंतर मी अजून २ वेळा जाउन आलोय हरिश्चंद्रगड़ला फ़क्त इथून सूर्यास्त पाहण्यासाठी. कोकणकडयाचे दर्शन घेउन तृप्त झालेले आम्ही तसेच उजव्या हाताला सरकत 'तारामती' आणि 'रोहिदास' ह्या गडाच्या २ शिखरांवर गेलो. वर तसे फार काही नाही पण वरुन मंदिर आणि आसपासचा परिसर सुंदर दिसतो. गड़ दर्शन करून परत गुहेकडे जात असताना लक्ष्यात आले की १२ वाजून गेलेले आहेत. तेंव्हा आता आम्ही पुन्हा काकाच्या शिव्या खायला तयार झालो होतो.


पोचल्या पोचल्या काकाने फर्मावले,"सर्वानी समोर फॉल इन करा. एकतर लेट आलाच आहात. पण मला सांगा सकाळी पोहे खायचे सोडून टाकुन कोणी दिले? मला बाजुच्या गुहेत कोपऱ्यात सापडले आहेत." आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो. पोहे खरे तर इतके मस्त झाले होते की कोणी टाकेल असे वाटत नव्हते. मला तर अजून हवे होते. आणि हा कोण आहे चायला टाकुन देणारा. "इकडे लोकांना खायला मिळत नाही आणि तुम्ही वाया घालवता? हवे तितकेच घ्याना." काका थांबत नव्हता. "जोपर्यंत मला कळत नाही तो/ती कोण आहे तोपर्यंत आपण इकडून हलणार नाही आहोत." आयला.. हलणार नाही म्हणजे? आज तर कुठल्याही परिस्थितिमध्ये घरी पोचायला हवे होते कारण दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट होती. झाले असे की काकाला गुहेबाहेर अचानक एक धामण दिसली. तिला पकडायला तिच्या मागे-मागे तो त्या गुहेमध्ये शिरला तिकडे त्याला कोपऱ्यात हे पोहे टाकलेले दिसले. बराच वेळ गेला तरी कोणी हात वर करेना आणि काका सुद्धा काही बोलेना. शेवटी काकाने ट्रेकमधला अजून एक बोंम्ब फोडला. "आज आपण घरी जाणार नाही आहोत. इकडेच राहणार आहोत. आणि आता जेवण झाल्यावर आपण आपली राहती केव्ह साफ़ करणार आणि धुणार आहोत." आता आम्हाला काय बोलावे कळत नव्हते. माझ्या डोळ्यात नकळत पाणीच आले होते. मी काकाला जाउन बोललो,"हे बघ. ते पोहे मी टाकले होते. तू काय ती शिक्षा दे. पण आपण आज घरी जाउया. उदया दिवाळीचा दिवस आहे." तो बोलला,"रोहन. मला माहीत आहे पोहे कोणी टाकले आहेत. तेंव्हा तू स्वतःवर ते घेऊ नकोस. आणि आपण आत्ता निघालो तरी संध्याकाळ होईपर्यंत रस्त्यावर पोहचू शकत नाही तेंव्हा आज आपल्याला इकडेच राहणे आहे. कारण मधला रस्ता सेफ नाही. उदया सकाळी-सकाळी आपण इकडून निघू."



आम्ही खिन्न मनाने जेवून घेतले. कोणाचाच मुड नव्हता. कोणीच काही बोलत नव्हते. जेवणानंतर काकाने ती पकड्लेली धामण बाहेर काढली. आम्हा सर्वांना दाखवून मग तिला आम्ही सोडून दिले. दुपारी ३ वाजता मग सुरू झाला धूवाधूवीचा प्रोग्राम. आम्ही ती पूर्ण जागा साफ़ केली. आपण आपले घर साफ़ करतो ना. मग आपले गड़-किल्ले?? ते आपण साफ़ नाही करायचे मग कोणी करायचे? शिक्षा नव्हतीच ती... डोंगरातल्या शाळेचा अजून एक वर्ग होता तो. जवळ-जवळ २ तास ही साफ़ सफाई सुरू होती. मग आम्ही निवांत झालो. हळू-हळू सर्वांचा मुड सुद्धा परत येत होता. संध्याकाळी आम्ही काहीजण गुहेच्यावरती जाउन बसलो. राजेश आम्हाला एक-एक किल्ले आणि डोंगर दाखवत होता. डोंगरांच्या एकामागे एक अश्या ४-५ रांगा दिसत होत्या. त्यात दुरवर कळसुबाई सुद्धा दिसत होते. "इतके दूर आलो आपण चालत? किमान ८०-९० किमी. नक्कीच असेल ना रे." मी राजेशला विचारले. "हो सहज असेल" तो उत्तरला. इतक्यात राहुल चढून वर आला आणि बोलला,"ऐ. कवीश बघ कसा पाय खाजवतोय. हाहा.. खाजखुजली लावून आलो त्याच्या पायाला." काल रात्रीचा बदला अखेर राहुलने घेतला होताच. त्यानंतर बराच वेळ तो खाजवत बसला होता हे सांगायला नकोच. अंधार पडत आला तसे आम्ही अजून सरण आणले. आणि जेवणाची आणि शेकोटीची तयारी केली.

रात्री जेवायला काकाने आणि शेफालीने 'दाल ढोकळी' केली होती. सोबत 'गुलाबजाम' होते. 'दाल ढोकळी'ची वाट लागली होती तर गुलाबजाम मात्र जबरी झाले होते. आता घेतलेले टाकू तर शकत नाही मग त्यासाठी डीलिंग सुरू झाले. "अरे. थोड़ी दाल ढोकळी घे. हवतर २ गुलाबजाम घेतो" इथपर्यंत. मी मात्र गुलाबजाम सोडले नाहीत अजिबात. दिवाळीच्या दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबरला प्रशांतचा वाढदिवस होता. तेंव्हा रात्री न झोपता गप्पा टाकत बसायचे आणि तो सेलेब्रेट करायचा असा प्लान ठरलेला होताच. चांदण्या रात्रीच्या त्या गप्पा काय होत्या हे काही आता आठवत नाही पण ट्रेक संपता-संपता आमचा एकजीव ग्रुप मात्र बनला होता. ४-५ दिवसांपूर्वी आम्ही सर्व एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो हे कोणाला सांगितले असते तर खरे वाटले नसते. हिच तर किमया आहे निसर्गाची... सह्याद्रीची... त्याच्या मदतीने अजून काही सह्यवेडे तयार करण्यात काका सपशेल जिंकला होता आणि आमच्या नकळत त्याने आम्हाला सुद्धा जिंकवले होते. रात्री बऱ्याच उशिराने आम्ही सर्व झोपी गेलो. प्रशांतला वाढदिवसाच्या आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आम्ही निवांतपणे झोपी गेलो. पण... तिकडे आमच्या सर्वांच्याच घरी काय घडत होते ह्याबाबत आम्ही पूर्णपणे गाफिल होतो. आज रात्रीपर्यंत घरी पोचायचे होते ना आम्हाला.. :) बघुच पुढच्या भागात काय होतय ते. परतीचा प्रवास सुरू झालाय...
.
.
पुढील भाग - परतीचा प्रवास 'तोलरखिंड' मार्गे ... !
.
.

8 comments:

  1. हरिश्चंद्रगड: माझ्या आठवणी फारच सुंदर आहेत. मी हेडशेफ झालेला दुसरा ट्रेक. मधमाशा मागे लागल्या होत्या. अर्धा तास तापलेल्या खडकावर वरुन जॅकेट घेउन झोपलो होतो. पण रात्री अशी काही खिचडी बनवली ना मी... सगळे एकदम खुश. आणि मग ती चुलीवर ठेवून चांदण्या रात्री मित्र-मैत्रिणींच्या बाजारगप्पांचा फड जमवला होता. समोर चांदण्यात न्हालेले मंदिर. अहाहा... परत आठवणी जाग्या केल्यास रे...

    ReplyDelete
  2. मस्तच रे..........
    पण तो पोहे न खाणारा कोण ते समजले का?

    ReplyDelete
  3. नाही ते शेवटपर्यंत समजले नाही... :(

    वा रे पंकज ... सह्याद्रित असे अनेक प्रसंग येतात.. अशी अनेक दृश्य घडतात जेंव्हा आपला कण अन कण शहारतो. सर्सरत एक काटा अंगावरून निघून जातो... त्यातून तर आपण अधिक भटके होतो... :)

    ReplyDelete
  4. सहीच रे रोहन...
    हो ना मलाही तन्वी सारखाच तो पोहे खाणारा कोण हा प्रश्न सतावतो आहे.हाहा.... आता तू पटकन परतीच्या प्रवासाची पोस्ट टाक रे... वाट पाहतेय.:)

    ReplyDelete
  5. चला की आता परत... किती दिवस इथेच राहायचे? उद्या दिवाळी आहे ना?

    ReplyDelete
  6. थोड़ी मुदत दया साहेब .... :)

    ReplyDelete
  7. काकाच्या रागाचा धनी व्हायची आज माझी वेळ होती. त्याचे झाले असे... की गुहेबाहेरच्या दगडावर मी आमच्या कॉलेज ची नावे मार्कर ने लिहिली. काकाने ते पहिले. गडाचे सौंदर्य बिघडवले म्हणून माझी शाळा घेतली. आणि मग फर्मान काढले की "जो पर्यंत मी ते लिखाण धुवून साफ करत नाही तो पर्यंत मला गड फेरीला जाता येणार नाही" झाले...! मी लागलो कामाला, स्टीलवूल घेऊन. घासत बसलो एकटाच. बाकी सगळे गेले. प्रवीण आणि आशिष मात्र थांबले माझ्यासाठी. पर्मनॅंट मार्कर असल्यामुळे बराच वेळ गेला. नखातून रक्ता येऊ लागले. पण कोकण कडा बोलावत होता. झाले एकदाचे साफ. काकाचे अप्रूवल घेतले. आणि धाव मारली तिघानी कोकणकड्याकडे.
    'अप्रतिम' असेच वर्णन करता येईल इतका सुंदर आहे हा कडा. रोहन्या डोळ्यासमोर उभा केलास अगदी तुझ्या ब्लॉगमधून. आणि हा ग्रूप फोटो... माझ्या आयुष्यातील "वन ऑफ दि बेस्ट मोमेन्ट" आहे.
    परत आल्यानंतर सगळ्यात जास्त वैताग मला आला होता काकाचा नवीन निर्णय ऐकून. एकतर प्रथमच दिवाळीचा पहिला दिवस घरी नसणार होतो. त्यात ती पूर्ण केव धुवून काढायची म्हणजे काय??? पण म्हटले... आलिया भोगासी... पण रागाच्या भरात सामान शिफ्ट करताना ३ वेळा माझे डोके गुहेच्या दारावर आपटले. अजुनच वैतगलो. निषेध करायचा म्हणून गुलाबजामचा त्याग केला. डाळ ढोकली पण पाण्या बरोबर कशी बशि ढकलली.
    भयानक दिवस गेला. रात्री मात्र मस्त गप्पा रंगल्या. दिवसभरचा गोंधळ विसरून छान मजा केली.

    ReplyDelete
  8. हो रे तुझा हा आयटम मी लिहायचा विसरलो होतो ... आणि होय इट्स "वन ऑफ दि बेस्ट मोमेन्ट" ... !!!

    ReplyDelete