Wednesday 1 June 2011

सर्प ...


पावसाळा सुरू झाला की अनेकदा जमिनीत कुठे-कुठे दडून बसलेले हे सरपटणारे प्राणी वर येतात आणि मानवी सहवासात येऊन अडचणीतही सापडतात. अशा वेळी अनेकजण त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी मारायचे ठरवतात. पण खरेतर ते पकडून सहज इतरस्त हलवता येतात. गेली काहीवर्षे सर्पमित्रांनी ही मोहीम जोरात राबबलेली आहे. असे सर्प कुठे दिसले आहेत अशी हाक ऐकू आली की धाव मारायची आणि त्यांना सुखरूप जंगलाच्या भागात नेऊन सोडायचे. मागे एकदा असेच मानवी वस्तीत सापडलेले साप सर्पमित्रांनी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात सोडले. तेंव्हा घेतेलेली काही प्रकाशचित्रे...


१. सकाळी सकाळी पाटोणपाडा येथे जमून जंगलाच्या आतील भागाकडे कूच...





 २. चेना नाल्याच्या सुकलेल्या पात्रापाशी साप सोडायचे ठरले होते.



३. धामण (Indian Rat Snake) हाताळताना

रच्याकने ...तो मागे पिवळा टी-शर्ट घालून मुलगा उभा आहे  त्याच्याकडे बघा. आणि पुढच्या फोटोत त्याचे हावभाव पण बघा... :)


 
४. ह्या सापाचे नाव कोणी सांगेल का?




५. विषारी दात नसल्याने धामण आपले भक्ष्य गुदमरून मारते. बचाव ही तसाच.




६. मग काही जणांना ती धामण हाताळायला दिली.




७. घोणस (Indian Viper) जातीचे विषारी दात.




 ८. हा आपल्या सर्वांचा लाडका.. नाग (Indian spectacle cobra)



9. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!



 १०. फणा काढलेला नाग कित्ती सुंदर दिसतो नाही!!!



११. पिवळा नाग... 



१२. मण्यार (Indian Commom cret) - 




१३. पिवळी धामण - बिन विषारी.




रच्याकने ... तुम्हाला कधी साप आडवा आला तर तुम्ही काय कराल??

Friday 27 May 2011

ऐतिहासिक भटकंती ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२२ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदाच्या फाल्गुन अमावास्येला वढू - तुळापुर येथे जाणे झाले. शिवाय तिथूनच जवळच असलेल्या इंदोरी येथील खंडेराव दाभाडे यांनी बांधलेल्या किल्ल्याची आणि वडगाव येथील दुसऱ्या मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक असलेल्या ठिकाणी घेतलेली काही क्षणचित्रे...


तुळापुरचा इतिहास - तुळापुरचे मूळनाव नागरगाव असे होते. १६३३ मध्ये शहाजी राजांनी या ठिकाणी हत्तीचा वापर करून तुळा केल्यानंतर ह्या जागेचे नाव तुळापुर करण्यात आले. ह्या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशावरून मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी येथील संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. नदीकाठी सुंदर घाट बांधला ज्याचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाले. ह्यावेळी शिवाजी राजे अवघ्या ३ वर्षांचे होते.

पुढे १६८९ मध्ये ह्याच ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निघृण हत्या करून, त्यांच्या देहाची विटंबना करून, शरीराचे तुकडे नदीपलीकडे फेकून दिले. नदीच्या पलीकडे वढू नावाचे गाव आहे तेथील काही लोकांनी त्यांच्या शरीराचे उरले-सुरलेले अवयव एकत्र शिवून त्यांना भडाग्नी दिला. ज्या लोकांनी हे काम केले त्यांचे आडनाव आता 'शिवले' असे आहे. आजही गावात मोठ्या प्रामाणावर शिवले आडनावाच्या लोकांची वस्ती आहे. तुळापुर बरोबर वढू येथे देखील संभाजी राजांचे एक स्मारक उभारलेले आहे.



१. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा - तुळापुर.



 २. कवी कलश यांची समाधी - तुळापुर.



 ३. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - तुळापुर



४. समाधी समोरील संगमेश्वर मंदिर.



 ५. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम.

 


 ६. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी - वढू
 


 ७. वढू येथे काढलेली रांगोळी -



 आम्ही मग तिथून निघालो आणि देहू मार्गे इंदोरी येथे गेलो.

८. देहू येथील तुकाराम महाराजांचे गाथा मंदिर -



९. इंदोरी किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार.. दरवाज्यासमोरच आता अतिक्रमण झाले आहे. हा किला अजूनही दाभाडे यांच्या मालकीचा आहे.



 १०. किल्ल्यामागून वाहणारी इंद्रायणी नदी -
 


 ११. किल्ल्याच्या दरवाजा २ माजली असून आतील बांधकाम विटांचे आहे.



 इंदोरी वरून २० एक मिनिटात जुन्या मुंबई-पुणे हायवेवर बाहेर पडता येते. तिथून वडगाव येथे रस्त्याच्या बाजूलाच हे छोटेसे पण सुंदर स्मारक बांधलेले आहे.
 

१२. वडगाव येथील मराठा - इंग्रज युद्धाचे स्मारक. ब्रिटीश अधिकारी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करताना.



 १३. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - मराठीत.



 १४. युद्धाचा संक्षिप्त इतिहास - इंग्रजीत.
 


 १५. महादजी शिंदे यांचा वीरासनातील पुतळा -



 १६. पुतळा आणि विजयस्तंभ
 


१७. महादजी शिंदे यांचा विरासानातील पुतळा - सूर्यास्त होता होता.
 


समाप्त...

Monday 16 May 2011

बुद्ध पौर्णिमा, मचाण आणि सेन्सस ...

आजच्यासारखाच तो बुद्धपौर्णिमेचा दिवस होता. असेच संध्याकाळचे ५ वाजत आले होते. रात्रीची सर्व तयारी करून मी येऊर फाट्यावर असणाऱ्या उपवनच्या त्या वनखात्याच्या ऑफिसमध्ये नुकताच पोचलो होतो. माझ्यासारखे अजून २-४ उत्साही तरुण तिथे बाजूला उभे होते. आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. काही वेळात ऑफिसच्या आतून उप वनअधीक्षक मुंडे साहेब आणि २ गार्ड बाहेर आले. गार्डसकडे बघत ते म्हणाले,"पवार. तुम्ही या दोघांना घेऊन फणसाच्या पाण्यावर जा. पाटील, तुम्ही ह्या तिघांना घेऊन आंब्याच्या पाण्यावर जा. आणि हो सकाळी ७च्या आत परत या. जास्त उशीर नको. सर्व सामान घेतलाय नं" दोघांनी फक्त मान डोलावली. मी आणि अजून एकजण माझ्या बाईकवरून येऊरच्या दिशेने निघालो. फोरेस्ट गार्ड पवार त्यांच्या सायकलवरून आमच्या मागून निघाले. दुसरे फोरेस्ट गार्ड पाटील देखील बाकीच्या तिघांबरोबर निघाले.


येउरचा परिसर मला नेहमीच आवडत आला आहे. ठाण्याच्या कोलाहलात, गर्दीमध्ये हा एक असा भाग आहे जिथे निवांतपणा अनुभवता येतो. पहाटे किंवा संध्याकाळी इथले वातावरण रम्य असते. अर्थात जे येऊरला गेलेले आहेत त्यांना सांगायला नकोच. १० मिनिटात तो चढता वळणा-वळणाचा रस्ता पार करून आम्ही एअरफोर्सच्या गेटवरून पुढे गेलो आणि डाव्यादिशेने जो रस्ता जंगलाकडे जातो त्या दिशेने निघालो. शेवटच्या टोकाला डांबरी रस्ता संपला की समोर उतरत जंगलात जाणारी वाट दिसते. हीच वाट चेना नाल्यापर्यंत आणि पुढे धबधब्यापर्यंत जाते. आम्हाला मात्र इथून उजवीकडे वळणाऱ्या वाटेने पुढे जायचे होते. टोकाला असणाऱ्या बंगल्याच्या उघड्या आवारात आम्ही बाईक लावली आणि फोरेस्ट गार्ड पवार यांची वाट बघू लागलो. ५-१० मिनिटात ते मागून येऊन पोचले. मग आम्ही निघालो फणसाच्या पाण्यावर.


आंब्याचे पाणी, फणसाचे पाणी हे नेमके काय आहे ते मला समजत नव्हते म्हणून चालता चालता मी पवारांना माहिती विचारू लागलो. तेंव्हा समजले की मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आंब्याचे पाणी, फणसाचे पाणी, उंबराचे पाणी अश्या नावाचे एकूण १८ नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यांची नावे पाणवठ्याच्या बाजूला असणाऱ्या झाडावरून दिलेली आहेत. पावसाळ्यानंतर जंगलात सर्वत्र मुबलक पाणी उपलब्ध होत असले तरी फेब्रुवारीनंतर ते वेगाने आटू लागते. एप्रिल - मे महिन्यात तर फक्त ह्या १८ ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक पाणवठयांवरच पाणी उरलेले असते. तेंव्हा जंगलातले प्राणी तेथे हमखास येतातच. तेंव्हा त्यांना बघायची, मोजायची ही सर्वात योग्य वेळ असते. सूर्यास्त ते सूर्योदय ह्या वेळात पाणवठ्यावर यायची प्रत्येक प्राण्याची वेळ देखील वेगळी असते. आपल्या येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमा आणि बुद्द पौर्णिमा अश्या २ वेळी प्राण्यांची गणना केली जाते. २ वेळा अश्यासाठी की एका वेळेस कदाचित काही प्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी नाही आला तर... शिवाय पौर्णिमेच्या रात्री प्रकाश सर्वाधिक असल्याने प्राणी मानवी डोळ्याना सर्वाधिक स्पष्ट दिसतात.


जंगलात किती आत गेलो ते मला लक्ष्यात नाही पण बरेच चालून गेल्यावर एका झाडापाशी आम्ही थांबलो. बघतो तर आंब्याचे झाड होते.


मी पवारांना म्हटले,"आपण फणसाच्या पाण्यावर जाणार होतो ना?"


"होय. पण ते बघ ते समोर आहे. आपण इथे आंब्याच्या झाडावरून त्या समोरच्या झाडाखालच्या हालचालीकडे नजर ठेवायची." पवार पाण्यावर नजर ठेवत म्हणाले.


समोरच ५०-६० फुटांवर एक फणसाचे मोठे झाड आणि त्याच्या खाली एक पाणवठा होता. आम्ही पाण्यावर गेलो. पाणवठा फारतर ३ स्क्वेअर मीटर असावा. पवारांनी त्यांच्या सामानातून एक पिशवी काढली आणि 'ही इथली माती भरा' असे आम्हाला सांगितले. फिक्कट तांबड्या भुसभुशीत मातीने ती पिशवी आम्ही ५ मिनिटात भरली आणि परतून आंब्याच्या झाडापाशी आलो. पवारांनी ज्यावाटेने आम्ही गावातून इथपर्यंत आलो होतो त्यावाटेच्या एका भागावर ती माती ओतली आणि नीट पसरवली.


चला, आता वर जाऊन बसुया असे म्हणून ते पुन्हा झाडाकडे निघाले. आंब्याच्या झाडावर एक १०-१२ फुट उंचीवर ३-४ लोकांना बसता येईल असे बांबूचे मचाण बांधलेले होते. मूळ खोड आणि एक मोठी फांदी याच्यामध्ये काथ्याने बांबूचा तराफा सारखा बांधून त्याला अजून २ बाजूंनी टेकू देऊन भक्कम केले होते. उजव्या बाजूला झाडाचा आधार, डावीकडे मोठ्या फांदीचा पसारा, मागे-पुढे वरच्या फांदीचा उतरून आलेल्या फांद्यांचा काही भाग अशाने ते मचाण झाकलेले होते. समोर पानांमधून फणसाचे पाणी दिसायला साधारण २-३ फुटाची जागा होती. सर्वात पहिले पवार वर चढले आणि त्यांनी 'वर या' अशी आम्हा दोघांना खूण केली. सोबत काही विशेष सामान नव्हतेच. जरा गार लागलेच तर अंगावर घ्यायला मी एक जाड फुल टी-शर्ट नेला होता. बांबूवर रात्रभर बसून आपले चांगलेच शेकणार हा विचार मनात येऊन मी तो टी-शर्ट अंथरला आणि त्यावर बसलो. पवारांनी त्यांच्या सामानातून एक छोटा गोणपाट काढला. तो अंथरून त्यावर कागद-पॅड, पेन आणि एक विजेरी ठेवली. त्यांनी आम्हाला काही आवश्यक सूचना दिल्या.


अंधार पडू लागला होता. पुढे काय काय दिसणार ह्याचा अंदाज घेत घेत मी बसलो होतो. अचानक ५-६ माकडांचे टोळके आले आणि मिनिटाभरात पाणी पिऊन निघून गेले. सूर्यास्त होता होता माकडे पाणी पिऊन जातात ती पुन्हा सकाळी येतात हे मला पाहिल्या-वाचल्याचे लगेच आठवले. खरेतर येऊर बाजूस मी आत्तापर्यंत माकडे कधीच पाहिली नव्हती. अगदी चेनापर्यंत जाऊन सुद्धा. मला आता पाण्यावर हरणे येतील असे वाटत होते पण ती काही आली नाहीत. त्यांचा पाणवठा बहुदा हा नसावा. मिट्ट अंधार झाला. डोळे मोठे केले तरी काहीच दिसेना. म्हणून लहान करून पहिले तरी काहीच दिसेना. काही वेळाने झाडाचे आकार, जमिनीचा उतार कळू लागले. थोडे नीट दिसू लागले. बाजूला २ माणसे बसलेली मात्र बोलायची चोरी. मनात बोललो तरी बाहेर आवाज ऐकू जाईल की काय इतकी शांतता. तिथे इतकी शांतता होती की आपण काहीही बोललो तरी आवाज सहज काही अंतरापर्यंत जाईल. अचानक मधूनच सुक्या पानांच्या सळसळण्याचा आवाज येई. बाकी एकदम शांतता.


बाकी पवार एकदम जबरी माणूस होता. गेली ९ वर्ष तो येऊर भागात फोरेस्ट गार्ड म्हणून काम करत होता आणि त्याला त्याच्या गार्ड ऐरियाचा कोपरा अन कोपरा ठावूक होता. तसा तो संपूर्ण उद्यानात बरंच फिरलेला होता आणि त्याच्या भागात वावरणाऱ्या दोन्ही बिबट्यांना ओळखत होता. संध्याकाळी बोलताना त्याने मला सांगितले होते की, जसा प्रत्येक फुलाला गंध असतो तसा प्रत्येक प्राण्याला सुद्धा गंध असतो. माणसाला देखील तो गंध असतोच. प्राणी ज्याप्रकारे एखादा अनोळखी गंध ओळखू शकतात तसाच आपणही प्राणांचा गंध ओळखू शकतो. त्यांचा गंध ओळखायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांची विष्ठा. त्यावरून तो नर आहे की मादी हे देखील आपण सांगू शकतो. मी हे असले ह्याआधी डिस्कव्हरी, एन.जी.सी. वरतीच पहिले होते. मी तुम्हाला खूण करीन तेंव्हा बिबट्या पाण्याच्या आसपास आलेला असेल, असे त्याने आम्हाला सांगितले होते.


बराच वेळ आम्ही बसून होतो. नेमके वाजले किती ते मला समजत नव्हते. हालचाल करायची नाही त्यामुळे घड्याळ बघणे शक्य नव्हते. पण मला भूक लागायला लागली होती त्यावरून मी ताडले की बहुदा १० वाजून गेले आहेत. समोर कसलीच हालचाल नव्हती आणि बसून मी कंटाळलो होतो. रात्री अचानक कसलासा आवाज आला आणि एक रानडुक्कर नजरेस पडले. काहीतरी दिसल्याने उत्सुकता पुन्हा चाळवली गेली आणि डोळे सजग झाले. पुन्हा बराच वेळ कसलीच हालचाल नाही. मला तर पवार आणि बाजूचा तो मुलगा झोपले वगैरे नाहीत ना अशी शंका यायला लागली. उगाच आपण वळावे आणि आपली हालचाल न जाणो नेमकी त्या बिबट्यास दिसली तर सर्वच वाया म्हणून डोके न हलवता मी नुसतेच डोळे फिरवून त्यांच्याकडे बघायचा प्रयत्न करत होतो. पण कसले काय!!!! पुन्हा बराच वेळ गेला. किती वाजले असतील ह्याची काहीही कल्पना मला येत नव्हती.


इतक्यात पवारांनी हलकासा हम्म असा हमिंग आवाज काढला. बिबट्या आसपास असल्याची ती खूण होती. आता काही क्षणात आपल्याला बिबट्या दिसणार ह्या कल्पनेने मी आनंदलो होतो. डोळे पाण्याच्या दोन्ही बाजूस फिरत होते मात्र काहीच दिसले नाही. इतकासाही कसला आवाज नाही. बिबट्या काही पाण्यावर आलाच नाही. त्याला बहुदा आमचा गंध जाणवला असावा. 'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला' हे पवारांनी गेल्या ६-७ तासात उच्चारलेले एकमेव वाक्य. पुढचे २-३ तास तसेच गेले. ज्याची वाट पाहिली तो आला आणि हूल देऊन गुल झाला. पवारांच्या मते त्याला बघण्याची एकमेव संधी आता होती ती म्हणजे पहाटे ४-५ च्या दरम्यान. त्यावेळेची वाट बघत मी पुन्हा ताटकळत बसलो.


पहाटेच्या सुमारास डाव्या बाजूला झाडीत थोडे दूर कसलीशी हालचाल जाणवली. दिसले मात्र काहीच नाही. पाण्यावर तर काही म्हणजे काहीच आले नाही. अखेर उजाडायला सुरवात झाली आणि आम्ही निघायची तयारी देखील केली.


'काही फार दिसले नाही पण चांगले बसला होतात. चला जरा जंगलात एक फेरी मारून येउया. काही खाणा-खुणा दिसतात का बघुया' - पवारांनी उगाच आमचे मन राखायचा प्रयत्न केला. आम्ही गुमान त्यांच्या मागून चालू लागलो. पाण्यावर गेलो आणि थोडे आसपास भटकून आलो. मला आता 'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला' हे वाक्य म्हणजे पवारांनी मारलेली मोठीच थाप वाटत होती. नव्हे मला तशी खात्रीच झाली होती.


आम्ही पुन्हा पाटोणपाड्याच्या दिशेने निघालो. जिथे पवारांनी माती पसरविली होती तिथे येऊन बघतो तर काय!! पायाचे ठसे त्यात स्पष्टपणे उमटलेले होते. ते बिबट्याचे होते हे मी नि:संशयपणे सांगू शकत होतो. त्या वाटेवरून तो जवळ-जवळ ८ पावले चालून आमच्या दिशेने आला आणि मग बहुदा चाहूल लागल्यामुळे दुसरीकडे निघून गेला असावा. पहाटेच्या सुमारास डाव्या बाजूला झाडीत थोडे दूर कसलीशी हालचाल जाणवली ती ह्याचीच असावी बहुदा. जंगलातून चालत बाहेर गावाकडे आलो. बाईक काढल्या आणि नाश्ता करायला येऊर गावात पोचलो. पहाटे गावात बिबट्या येऊन १ कूत्र खाऊन गेल्याची बातमी आम्हाला तिथेच मिळाली. आम्ही पवारांकडे पहिले. रात्रभर जाऊन, वाट बघून बिबट्याने दर्शन दिलेले नसले तरी त्याच्या पायाचे ठसे आम्हाला बघायला मिळाले होते. तरी सुद्धा  'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला' हे वाक्य म्हणजे १०० टक्के थाप होती हे मला कळून चुकले होते.


काही वेळात आम्ही येऊर वरून उपवन आणि मग मी तिथून घरी पोचलो. रात्रभर झोप झाली नव्हती त्यामुळे सरळ ताणून दिली. संध्याकाळी मला अजून एक बातमी पाटलीपाड्याच्या मित्राकडून कळली. तिथे सुद्धा बिबट्याने कूत्र उचलून नेले होते. मला चटकन पवारांचे वाक्य आठवले.


'उजव्या बाजूने तो पाटलीपाड्याच्या बाजूला निघून गेला'


याही पेक्षा मला पुढचा विचार आला तो म्हणजे त्या रात्रीत थोड्याच वेळेच्या अंतरावर आम्हाला दोन्ही बिबट्यांनी एकामागून एक हूल दिली होती. एक रात्री उजव्या बाजूने पाटलीपाड्याला तर दुसरा डाव्या बाजूने पहाटे गावातून जंगलात सटकला होता.


एक आठवण म्हणून ती रात्र माझ्या थरारक अनुभवांमध्ये जोडली गेली होती...

Monday 9 May 2011

मुंबई राष्ट्रीय उद्यानातले ५ दिवस ...


कृष्णगिरी उर्फ कान्हेरी... बोरीवली. मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग. म्हणतात की लोकल रेल-वे म्हणजे मुंबईची जीवनरेखा.. पण खरेतर हे राष्ट्रीय उद्यानच मुंबईची जीवनरेखा आहे. हे जंगल नसते तर मुंबई-ठाणे आणि आसपासच्या परिसराची प्रदूषणाची पातळी कित्ती वाढली असती ह्याचा अंदाज देखील येणार नाही. ह्या उद्यानात प्राण्यांच्या आणि माणसांच्या दृष्टीनेही उजाडायच्या आधी आणि मावळल्यानंतर प्रवेश बंद असतो. आत मध्ये राहायचा तर प्रश्नच नाही. असे असतानाही जर मी ह्या ब्लॉगपोस्टला हे नाव दिलेले पाहून तुम्हाला जरा आश्चर्याच वाटले असेल नाही???

आमचा आख्खा ग्रुप.. डाव्या कोपऱ्यात खाली बसलेले आमचे ट्रेकचे सर.. काका उर्फ विध्याधर जोशी.

पण ते खरे आहे. २००२ साली २७ ते ३१ डिसेंबर असे तब्बल ५ दिवस आम्ही ३८ जण ह्या उद्यानात रितसर परवानगी वगैरे घेऊन तळ ठोकून होतो... मुंबई युनिव्हरसिटीच्या हायकिंग आणि ट्रेकिंग क्लबचा ५ दिवसाचा एक कोर्स होता. ह्यात प्रस्तरारोहण, अवरोहण आणि इतर अनेक प्रकार शिकवले जाणार होते. शिवाय रोप वर्क म्हणजे चढाईला लागणारे रोप कसे वापरायचे, त्यांची काळजी कशी घ्यायची, ते ठेवायचे कसे ह्याबद्दल अधिक माहिती मिळणार होतीच. कान्हेरी केव्ह्जच्या खाली पायऱ्या जिथून सुरू होतात त्याच्या डाव्याबाजूला एक पडका बंगला दिसतो. हा आहे बंगला नंबर ८. आमचा ५ दिवसांचा मुक्काम इथेच होता.

 स्लॅबवर मी बोल्डरींगचा सराव करताना.

पायऱ्यांच्या उजव्या बाजूला झाडीत जरा आत गेलो की एक नर्सरी लागते. नर्सरी म्हणजे बोल्डरींगचा सराव करता येईल अशी जागा. इथे चिमणी आणि काही सोप्या प्रकारची चढाई दोर न वापरता करता येते. अर्थात इथल्या दगडांची उंची ८ फुट पेक्षा अधिक नाही. इथून पुढे कान्हेरी केव्ह्जच्या टेकडीला वळसा मारून तुळसी लेकपर्यंत जाता येते. अर्थात तशी वनखात्याची वेगळी परवानगी तुमच्याकडे असावी लागते नाहीतर पकडले गेलात की भरा दंड. आम्हाला काही तिथे जाण्याची आवशक्यता नव्हती. कारण आमचा मुख्य मोर्चा असणार होता तो केव्हच्या पुढे. सर्व गुफा पार करून पलीकडच्या टोकाला पोचले की तुटलेले बांधकाम लागते. इथे आधी काही अनधिकृत आश्रम सदृश्य बांधकाम होते. ते आता वनखात्याने मोडून टाकले आहे. इथून जरासे पुढे जाऊन डावीकडे वळले की एक वाट वर चढू लागते जी आपल्याला एका मोठ्या प्रस्तरभिंतीकडे घेऊन जाते. ह्या भागाला ट्रेकर्सच्या भाषेत स्लॅब म्हणतात. दररोजचा आमचा बहुतेक वेळ इथेच जाणार होता. इथे बोल्डरींग, ७५ ते ८० अंश कोनात प्रस्तरारोहण, अवरोहण (रॅपेलिंग), क्रॅक ट्रॅवर्स (प्रस्तरातील आडवी भेग पकडून चालत जाणे) असे सर्व प्रकार एकाबाजूला एक असे करता येतात.

 स्लॅबवर शोल्डर बिले देताना मी. मागे नीट बघा शमिका क्रॅक ट्रॅवर्स करतेय... :)

दिवसभर स्लॅबवर घाम गाळायचा, मग संध्याकाळी गप्पा मारत गुहेसमोर बसायचे आणि रात्री राहायचे ८ नंबर मध्ये. आम्ही स्लॅबवर असताना आमच्या सामानाची, जेवणाच्या भांडी-गॅसची काळजी घ्यायला एक मोरे नावाचे काका नेमले होते कारण इथे माकडांचा प्रचंड उच्छाद आहे. कोणी चोरून नेणार नाही पण माकडे उचलून नेतील अशी परिस्थिती. याशिवाय रात्री उशिराने एकट्या-दुकट्याने बंगल्याबाहेर बसायचे नाही हा स्पष्ट नियम होता. आणि तो सर्वांनी गुपचूप पळाला होता. गरज नसताना बिबट्याच्या दर्शनाची कोणालाही आवशक्यता वाटली नव्हती... आम्हाला ४ ग्रुप्समध्ये विभागून दररोजची कामे वाटून दिलेली होती. अगदी जेवण बनवण्यापासून ते भांडी घासेपर्यंत आणि भाज्या आणण्यापासून ते पाणी भरेपर्यंत सर्व काही करावे लागे. प्रत्येक ग्रुपमधली २-३ जण भाज्या आणि दुध आणायला बोरीवली मार्केटला जायची तर बाकी पाणी भरून ठेव, सामान आवरून ठेव अशी कामे करायची. त्या दिवशी त्या-त्या ग्रुपला बाकी काहीच करता येत नसे. जेवण बनवा, वाढा, भांडी घासा, पिण्याचे पाणी भरून ठेवा हेच उद्योग दिवसभर सुरू असायचे. संपूर्ण ग्रुपला कान्हेरी केव्ह्जमधून जाण्या-येण्यासाठी खास परवाने दिलेले होते. म्हणजे कोणी दररोज तिकीट विचारणार नाही.

ह्या दिवसात काही मजेशीर घटना ही घडल्या. एकदा तर संध्याकाळी उशिराने पिण्याचे पाणी कमी असल्याचे लक्ष्यात आले. मग आम्ही ६-८ जण टोर्च वगैरे घेऊन कान्हेरी गुहा क्र. ३४ पर्यंत पोचलो. ही गुहा बऱ्यापैकी आत आहे पण इथल्या टाक्यामध्ये शुद्ध पाणी असते. दूरवर शहरातले लाईट्स दिसत होतेच. पण आत, जंगलात किर्रर्र अंधार. हिवाळ्यात उब हवी म्हणून बिबट्या अनेकदा रात्रीच्या वेळी गुहेत येऊन झोपतात असे मी ऐकले होते. आत्ता राहून राहून उगाच आम्हाला तो ३४ किंवा आसपास तर नाही ना.. असे वाटत होते. गुहेबाहेरच्या टाक्यामधून भरभर पाणी भरून घेत होतो. अचानक कसलासा आवाज आला. कोणी काढला की बिबट्यानेच काढला काय माहीत पण तिथून पाणी घेऊन जे सुटलो ते थेट बंगल्यात येऊन थांबलो. हुश्श्श...


स्लॅबवरची मुख्य प्रस्तर चढाई. वरती सिटींग बीले द्यायला अभिजित, प्रवीण आणि काका.

४ रात्री तिथे राहून, अनेक उद्योग करत, अनुभव घेत आम्ही ३१ डिसेंबरच्या दुपारी जेवून तिथून निघालो आणि ठाणा-मुलुंडकडे येणारे मोजकेच लोक वनखात्याच्या आतल्या रस्त्याने थेट भांडूपकडे बाहेर पडलो. हा रस्ता एकदम जबरी आहे. इथून सार्वजनिक वाहतुकीला परवानगी नाही. दोन्ही बाजूला घनदाट अरण्य आहे आणि असे वाटत देखील नाही की आपण मुंबईसारख्या शहराच्या बऱ्यापैकी मध्ये आहोत. ट्या रस्त्याने प्रवास करणे हा एक छान अनुभव होता. राष्ट्रीय उद्यानात १ दिवस जाण्याने किती आल्हाददायक वाटते ते तुमच्यापैकी तिथे गेलेल्यांना सांगायची गरज नाही. आम्ही तर तिथे तब्बल ५ दिवस मुक्काम ठोकून होतो. विविध प्रकारची झाडे आणि इतके पक्षी पहिले की विचारूच नका. सुदैवाने की दुर्दैवाने ते माहीत नाही पण बिबट्याचे दर्शन त्यावेळी झाले नाही. आता मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानात जावेसे वाटते आहे...

Wednesday 5 January 2011

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग ३

मंडणच्या गुहेत झोपलेलो असताना पहाटे कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. टोर्च मारून आसपास पहिले तर काहीच दिसले नाही. अजून उजाडले नव्हते म्हणून दरवाज्यावर बनवून ठेवलेल्या काठ्यांच्या जाळीकडे बघत तसाच पडून राहिलो.



पहाटे-पहाटे अलंगच्या मागून सूर्यनारायणाचे दर्शन होवू लागले. उजाडू लागले तसे उठलो आणि आवरून घेतले. चहा टाकला आणि चक्क नाश्त्याचा प्लान रद्द केला. जे तयार खायचे पदार्थ सोबत होते ते खाल्ले. आज लंबी दौड होती. मंडण बघून, उतरून, त्याला पूर्ण वळसा मारून मग कुलंग गाठायचा होता. किमान ८-९ तास हातात हवे असा आमचा अंदाज होता.







लिंगी बघायला गेलो. गुहेच्या उजव्या बाजूने वरती गेले की लगेचच आहे. मोजून ५ मिनिटे लागतात. इथे काही मस्त फोटो काढले. आकाशातली नक्षी एकदम मस्त. समोरच कुलंग आणि मंडण-कुलंग मध्ये असलेली भिंत दिसत होती. पुन्हा काही टायमर लावून फोटो वगैरे काढणे झाले.


मंडण वरून दिसणारा कुलंग ...


 ऐश्वर्या अजय देवगण पोजमध्ये... :)





 
८ वाजत आले होते. पुन्हा गुहेकडे आलो आणि सॅक पॅक करून पाठीवर मारल्या. ठरल्याप्रमाणे अभि थेट खाली उतरत रोप सेटअप करायला गेला तर मला माझी सॅक नीट पॅक करायची होती. टाक्यावरून पाणी देखील भरून घ्यायचे होतेच. ऐश्वर्या माझ्याबरोबरच होती. माझे काम होत आले तसे मी वाटेकडे बोट दाखवून ऐश्वर्याला हो पुढे. मी आलोच मागून. असे म्हणालो. मिनिटाभरात मी देखील निघालो. बघतो तर ऐश्वर्या काही दिसेना. मनात म्हटले ही पोरगी इतक्या पटकन उतरून गेली सुद्धा? असेल. असेल. मी पायऱ्या आणि दरवाजा पार करून खाली आलो. तरी ऐश्वर्या दिसेना.

इतक्या लवकर ही खाली कशी उतरू शकेल? मी तिच्यामागून निघायला नेमका किती वेळ घेतला? अंदाज लावत विचार केला. विचार करता करता मी माझा उतरायचा वेग वाढवला. वरच्या टप्यामधल्या सर्व पायऱ्या उतरून खाली आलो तरी ही पोरगी दिसेना. हाक दिली तरी प्रत्युत्तर येईना. मी माझा वेग अजून वाढवत पुढे निघालो. धावतच.. अजून जोरात धावत. पण ऐश्वर्या कुठेच दिसेना. ऐश्वर्या इतक्या लवकर हा संपूर्ण टप्पा पार करून जाईल हे माझ्या मनाला पटत नव्हते.


कुठे गेली मग ही? इतक्या लवकर पोचली? शक्य नाही.. मध्ये कुठे वाट चुकणे तर अजिबात शक्य नाही. मग कुठे गेली? पडली? नाही.. नाही.. पडेल कशी? असे कसे शक्य आहे.... का शक्य नाही? मी हाका मारायला सुरवात केली. पण काही प्रत्युत्तर येत नव्हते. आता मला जरा विचित्र विचार यायला सुरवात झालेली. अभिपर्यंत पोचलो.


मी : ऐश्वर्या कुठाय? इथे पोचली का?

अभि : नाही रे. तुझ्या बरोबर तर होती. तू धावत आलास काय? काय झाले ?
मी : काय झाले ते माहित नाही पण ऐश्वर्या हरवली आहे. मला भीती आहे की ती कुठे पडली आहे की काय.
अभि : तू तिला एकटीला कशाला सोडलेस?
मी : अरे. अवघे मिनिट देखील आधी निघाली नाही ती. असो. मी पुन्हा मागे जाऊन बघतो.

मी ज्यावेगाने अभिपर्यंत पोचलो होतो त्याच्या दुप्पट वेगाने परत फिरलो. पाठीवर आता सॅक नव्हती. पुन्हा एकदा पायऱ्या ... दरवाजा ... हाका..  ऐश्वर्या... एओ... ओये... पण काहीच उत्तर नाही. दरवाजाचढून पुन्हा वरपर्यंत पोचलो. बघतो तर ही महामाया गुहेवरच्या भागातून वाट शोधत खाली येत होती.

मी डाफरलो. कुठे गायब झालीस तू? आणि परत वर कशी आलीस?

ऐश्वर्या : तू कुठे गायब झालास? मी पुढे निघाले. कड्यापर्यंत गेले. पुढे वाटच दिसेना म्हणून जरा डावीकडे वर गेले. तिथेही वाट नाही म्हणून परत आले तर तू गायब. किती हाका मारतेय.
मी : तुला ही समोरची वाट, पायऱ्या दिसल्या नाहीत? २ फुट समोरच्या पायऱ्या. धन्य आहेस तू. सकाळी सकाळी माझा घाम काढलास. ओरडून ओरडून मेलोय.
ऐश्वर्या : हो. मी पण ओरडून ओरडून घसा सुकवून घेतलाय. शेवटी अजून वाट शोधायचा निर्णय घेतला. नाहीच सापडला तर पुन्हा टाक्याजवळ येऊन बसायचे ठरवले होते. मला माहित होते तुम्ही मला शोधत इथेच येणार... आलास की नाही!!!
मी : (कपाळावर हात मारत) धन्य आहेस. चल आता. चांगला अर्धा तास वाया गेलाय.

आम्ही खाली उतरत असताना अभि सुद्धा रोप घेऊन परत येताना दिसला. आम्ही दोघे येताना बघून तो पुन्हा परत फिरला. ९:३० वाजता रॅपलिंग करून ऐश्वर्या खाली उतरून गेली.


त्या मागून मी. सर्वात शेवटी अभि उतरला. अलंग आणि मंडण या दोन्ही ठिकाणाचे रोप आवश्यक असणारे टप्पे पूर्ण झाले होते. आता होता तो फक्त कुलंग ट्रेक. उरलेल्या पायरया उतरून आम्ही खाली आलो. मध्ये तो छोटासा धोकादायक टप्पा मात्र रोप न लावता पार केला. ते सुद्धा सॅक घेऊन.





१०:१५ च्या आसपास. मंडण वरून कुलंगच्या वाटेने निघालो. पण इथेच पाहिली गडबड झाली. वाट सापडेना. सांगातीच्या माहितीप्रमाणे मंडणच्या पायऱ्या सुरू होतात तिथे आसपास कुलंगवरून येणारी वाट आहे. मी जे फोटो पहिले होते त्यात मात्र अलंग-मंडण यांच्यामध्ये जी घळ आहे त्यातून वाट खाली उतरून मंडणला फेरा मारत कुलंगकडे जाते अशी माहिती  होती. आसपासच्या कारवीमुळे वाट सापडेना. रान माजले असेल तरी वाकून किंवा खाली बसून पहिले तरी वाटेचा अंदाज घेता येतो. कारण मळलेली वाट एकदा तयार झाली की तिकडे गवत, झाडे उगवत नाहीत. फारतर वाटेवर झाडे वाकून वाट बंद झाल्यासारखी वाटते. इथे मात्र अर्धातास अथक प्रयत्न करून शोधाशोध करून देखील वाट काही मिलेला. अखेर आम्ही घळीमधून खाली उतरायचे ठरवले. पहिला टप्पा संपला की बाहेर पडायला कुठेतरी वाट असेल असा आमचा अंदाज होता.





अलंग-मंडणच्या मध्ये असलेल्या खिंडीमधून उतरायला सुरवात केली तेंव्हा ११ वाजले होते. इथून कुलंग म्हणजे संध्याकाळ होणार हे नक्की होते. शक्य तितक्या वेगाने आम्ही उतरायला लागलो. मध्ये -मध्ये घसारा होताच. अशाच एका ठिकाणी मी दणदणीत आपटलो. डावीबाजू सणकून दुखायला लागली. मग जरा वेळ तिथेच बसलो. पुन्हा मार्गक्रमण सुरू. संपूर्ण लक्ष्य डाव्याबाजूला काही क्लू मिळतो का ते बघण्यात. आता पाहिला टप्पा संपला होता पण वाट काही सापडेना. ती घळ आम्हाला कुलंग पासून लांब लांब नेत होती. १२:३० झाले तरी डावीकडे सरकायला जागा मिळेना. लंच रद्द. पुन्हा तयार खादाडी फस्त. थोडी चर्चा. दुपारी ३ पर्यंत वाट नाही मिळाली तर आपण कुलंग गाठायच्या ऐवजी गाव गाठायचे.


पुढे निघालो. आता तर मंडण देखील वरच्या बाजूला दिसणार नाही इतक्या खाली येऊन पोचलो. वाट पूर्णपणे चुकलो आहे ह्याची मला खात्री झालेली. कुलंग तर दिसतच नव्हता. पण डावीकडे सरकायला जागा तर मिळायला हवी... :( उजव्या बाजूला दूरवर मात्र अलंग आणि कळसुबाईला जोडणारे डोंगर दिसत होते. एके ठिकाणी छान ओहोळ लागला. उशीर होत असूनही तिथे बसलो. फ्रेश झालो. इतक्यात अभिला डावीकडे जाणारी मळलेली वाट मिळाली. चला... काहीतरी मिळाले.. बघुया..




त्यावाटेने चालत पश्चिमेच्या दिशेने निघालो. घळीत उतरल्यापासून आम्हाला एकही मानवी अस्तित्वाच्या खुणा दिसल्या नव्हत्या. ना कुठे चिकलेट-चॉकलेटचे व्र्यापर, ना गोवा गुटखा ना काही. ह्या घळीतून कोणी गेलेले नाहीच आहे की काय असे वाटावे इतके. २० एक मिनिटे त्या वाटेने पुढे गेल्यावार लाल मातीची वाट मिळाली. ही वाट नक्की कुलंगवाडीला जाणार याची मला खात्री पटली. ह्या वाटेवर लवकरच पुन्हा डावीकडे जाणारी वाट मिळणे गरजेचे होते. आता कुलंग समोर दिसू लागला होता. मंडणला खालून का होईना वळसा पूर्ण झाला होता. दुपारचे ३ वाजत आले होते. पण अजूनही हवीतशी वाट मिळेना.. :(





अखेर आम्ही ठरवले. ह्यावाटेवर जात राहायचे. योग्य वाट मिळाली तर ठीक नाहीतर कुलंग रद्द करून कुलंगवाडीकडे मोर्चा वळवायचा. कारण कुलंगवाडीवरून कुलंग माथा गाठायला तब्बल ५-६ तास लागतात. इथून सुद्धा आम्हाला ४ एक तास सहज लागले असते. आणि तितका वेळ आमच्याकडे नव्हता. अखेर ४ च्या सुमारास आम्ही अगदीच खाली उतरून आलो. रानात एक माणूस भेटला. त्याच्याकडून नीट वाट विचारून घेतली. इथून किमान ४ तास लागतील हे समजल्यावर कुलंगवाडी- आंबेवाडी रस्ता कसा गाठायचा? हा प्रश्न निमुटपणे विचारला.






अर्ध्यातासात डांबरी रस्ता गाठला. गेल्या २ दिवसात अलंग - मंडण फत्ते झाले पण कुलंग राहून गेला. उद्या करणे तो शक्य असले तरी आम्ही काही कारणाने आजच परत जायचा निर्णय घेतला...


कुलंगवाडीला परत येण्याचे सबळ कारण मात्र मिळाले होते.. राहिलेला कुलंग लवकरच फत्ते करायचा होता की...


********************************* समाप्त ************************************

Monday 3 January 2011

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग २

निसर्गाच्या सानिध्यात, गावाकडे मोकळ्या हवेत सकाळी लवकर जाग येते आणि उठल्या-उठल्या एकदम फ्रेश वाटते. शहरात तसे नाही. उठल्यावर पुन्हा झोपावेसे वाटते. एक कंटाळा अंगावर चढलेला असतो. आदल्या दिवशी चांगला ६-७ तास ट्रेक झाल्यानंतरही आज सकाळी लवकरच जाग आली. उठून बसलो तर समोच 'लिंगी' म्हणजे मंडण दिसत होता. पूर्वेकडून सूर्यकिरणांनी हळूहळू त्याला कवेत घ्यायला सुरवात केली होती. सूर्य त्याच्या डोक्यावर चढेपर्यंत आम्हाला त्याच्या पायथ्याशी पोचायचे होते. आम्ही तयारीला लागलो. चहा टाकला, आवरून घेतले आणि निघताना काही फोटो घेतले.








पाण्याच्या टाक्यावर थांबून मी आणि ऐश्वर्याने पाणी भरून घेतले. अभि पुढे रोप सेटअप करायला गेला. आज आम्ही रॅपलिंग करून उतरून जाणार होतो. रॅपलिंगचे तंत्र आता सर्वच जाणतात. ते सांगायची इथे गरज वाटत नाही.





सर्वात आधी मी, मग ऐश्वर्या आणि मग शेवटी अभि असे तिघे जण खाली उतरून आलो. शेवटचा माणूस खाली उतरताना रोप सुद्धा काढून आणायचा असतो तेंव्हा तशी सोय आधीच करणे गरजेचे असते. एकूण चढाईच्या दुप्पट रोप असेल तर 'U' टाकून शेवटच्या व्यक्तीला सहज उतरता येते. आमच्याकडे मात्र तितक्या लांबीचा रोप नसल्याने अभिने आधी U टाकून रॅपलिंग केले आणि मग उरलेला टप्पा एक टेप आणि स्लिंग वापरून वेगळ्या तंत्राने उतरून आला. तीघेपण खाली आल्यावर पुन्हा तो खालचा टप्पा पार केला आणि आम्ही मंडणच्या दिशेने चाल मारली.१० वाजत आले होते.


अलंगवरून मंडणला जाण्यासाठी स्पष्ट वाट आहे. पहिल्या प्रस्तर टप्प्याखाली जे मोठे झाड आहे त्याच्या बाजूने मंडणकडे वाट जाते. उतरताना डावीकडे ही वाट लागते. ह्यावातेवर लागले की वाट चुकायचा प्रशाच येत नाही. कारण आपल्या डावीकडे अलंगाचा अंगावर येणारा सरळसोट कडा असतो आणि उजवीकडे असते दरी. त्यामधून जाणारी वितभर रुंदीची वाट.






संपूर्ण उतारावर कारवीचे साम्राज्य. ७-८ फुट तर कुठे १० फुट उंच वाढलेली.वाटेवर पसरलेली कारवी दूर सारताना पुन्हा अभि आणि ऐश्वर्याला गांधीलमाश्या चावल्या. पुन्हा ते आ.. ओ.. सुरू झाले. मी अजून कसा बचावलोय तेच समजेना. माझ्या टी-शर्टवर असलेले मोठे डोळे बघून गांधीलमाश्या जवळ येत नव्हत्या की काय.. ते नाही का फुलपाखरांच्या पंखांवर मोठे डोळे असतात... तसे..  :D



 तासभर कड्याखालुन चालल्यानंतर खिंडीमध्ये पोचलो. आता मंडण समोर उभा ठाकला होता. उजव्या बाजूनी एक वाट खाली उतरत होती. तर डाव्या बाजूला अलंगच्या बेचक्याकडे जाणारी वाट लागते. आम्ही समोरची वाट घेत मंडणला जवळ केले आणि आता त्याच्या कड्याखालुन चाल सुरू ठेवली. १० मिनिटात मंडणच्या कातळकोरीव पायरया लागल्या.

७० एक पायऱ्या चढलो की वाट डावीकडे वळण घेत अजून वर चढते. पायऱ्या सुरूच. अजून ५० एक पायरया चढलो की हुश्श्श... आपण आता एक टप्पा वरती आलेलो असतो. आता पुन्हा वाट उजवीकडून. इथे आहे मंडणचा पहिला छोटासा प्रस्तर टप्पा. नवखे असाल तर रोप नक्की लावा. अनुभवी असाल तर गरज नाही. तरी रोप लावल्यास हरकत नाही. अगदीच ६-८ फुटाचा ट्रावर्स आहे पण पाय ठेवायला फार जागा नाही. सरकलात तर नक्की खाली जाणार.. :)

आम्ही रोप लावून तो पार करायचे ठरवले. क्रम ठरलेला.. अभि - ऐश्वर्या आणि शेवटी मी. हा टप्पा पार केला की जरासा वळसा मारत अजून पायऱ्या चढत जायचे आणि मग डावीकडे वर बघायचे. इथे अलंग सारखाच पण थोडासा लहान आणि तिरपा प्रस्तर टप्पा चढून जावे लागते. खाली सोपा वाटला तरी मध्ये तो नक्कीच कठीण आहे. विशेष करून आपल्याला प्रस्तरारोहणाची सवय नसेल तर.







शिवाय ह्या  ठिकाणी सुद्धा पाणी ओघळत होतेच. मागे आहे ८००-१००० फुट खोल दरी. अभिने पुन्हा लीड घेतली आणि बेस स्टेशनला सॅक टाकली आणि खालच्या बोल्टवर कॅराबिनर क्लिप करत चढाईला सुरवात केली. उजवीकडे सरकत त्याने दुसरा बोल्ट गाठला आणि रोप बोल्ट थ्रू नेला. आता सरळ चढणे होते. एका मागे एक बोल्ट क्लीप करत ७-८ मिनिटात अभि वर पोचला आणि त्याने रोप खाली टाकला. त्यावरून मग आधी ऐश्वर्या मग सर्वांच्या सॅक वर गेल्या. माझी सॅक वर पाठवताना पाण्याची बाटली फुटली आणि १ लिटर पाणी त्या कड्यावरून ओघळत माझे प्रस्तरारोहण अधिक कठीण करून टाकले. नशीब ती बाटली खाली येता-येता माझ्या हातात गावली. नाहीतर थेट खाली दरीतच गेली असती. अखेर मी वर चढून गेलो.



आता पुढची वाट सोपी आहे.कड्याखालून परत अलंगच्या दिशेने जात वाट वर चढते. इथे अतिशय सुंदर अश्या तिरप्या रेषेत पायऱ्या खोदलेल्या आहेत.



मग पुन्हा उजवीकडे वळून पायऱ्याचा शेवटचा टप्पा. इंग्रजी 'Z' आकाराच्यामार्गाने आपण चढत राहिले की गडाचा उध्वस्त दरवाजा लागतो. त्यापार पुन्हा काही पायरया पार केल्या की आपण गडाच्या माथ्यावर असतो.










ह्या भागातून मागे अलंग अतिशय सुंदर दिसतो. एकदम काजूच्या आकाराचा.. :D काल जिथे राहिलो त्या गुहा देखील एकदम स्पष्ट दिसतात. सर्वात मागे आहे तो संपूर्ण भाग सुद्धा अलंगचाच आहे. म्हणूनच गावातले लोक त्याला 'मोठा' म्हणत असणार.





वर पोचलो की समोरच पाण्याचे टाके आहे. त्या थोडेसे वर राहायला व्यवस्थित गुहा आहे. अलंगप्रमाणेच इथे सुद्धा गुहेत खूप माती आहे. पण राहायला योग्य आहेत. अनेकांनी मला मंडणला राहायची व्यवस्था नीट नाही असे सांगितले होते. पण ते खरे नाही. मोठी प्रशस्त गुहा आहे. राहायची जागा नीट साफ करून घेतली. आम्ही आमचे जेवण बाहेरच बनवायचे ठरवले.






मंडणवर तसे बघायला काही नाही. गडाची लिंगी आम्ही सकाळी बघणार होतो. आत्ता अंधार पडायच्या आधी हातात तास होता मग टाक्यामधल्या गार पाण्याने मस्तपैकी शंभो केली. अंधारू लागले तसे रात्रीच्या जेवणासाठी लागणारे सामान तितके बाहेर ठेवले बाकी सर्व आत.

मी आणि ऐश्वर्या जेवण बनवतोय आणि अभि आमचे फोटो घेतोय..


जरा स्टेडी बसा रे.. हलू नका अजिबात.


शेवटी एक चांगला फोटो मिळाला तेंव्हा आमची सुटका झाली.... :D






ती टोपी मी डोक्याला हेडटोर्चचा पट्टा चावू नये म्हणून घातली होती. थंडी काहीच नव्हती आणि महत्वाचे म्हणजे इतक्या उंचावर असूनही अजिबात वारा देखील नव्हता. जेवायला मसालेभाताबरोबर पापड - लोणचे होते पण त्यानंतर गोड म्हणून डब्बा भरून रसगुल्ले नेले होते.. :D

काल अलंगवरून मंडण दिसत होता तर आज मंडण वरून अलंग... रात्री पुन्हा एकदा त्या अब्ज ताऱ्यांच्या सहवासात बसलो. थोडे स्टार गेझिंग केले. थोडा गारवा जाणवू लागला होता.. अगदी हवाहवासा.. विविध विषयांवर खूप गप्पा मारल्या. नेमकी २७ नोव्हेंबर होती. अधून मधून २६-२७ नोव्हेंबर २००८ च्या आठवणी जाग्या होत होत्या..


सकाळी लवकर निघायचे होते. गड भटकून कुलंगच्या वाटेला लागायचे होते. हा दुसरा दिवशी झोपायला जायच्या आधीचा फोटो.. :)






प्रस्तरचढाई असलेले अलंग - मंडण फत्ते.. आता फक्त कुलंग बाकी राहिला होता... सह्याद्रीमधली सर्वात मोठी चढाई असे ज्याचे वर्णन करतात तो कुलंग उद्या फत्ते करायचा होता...
 

क्रमश: .....