Saturday 16 January 2010

परतीचा प्रवास 'तोलारखिंड' मार्गे ... !

पहाटे पहाटे सर्व उठले आणि परत निघायच्या तयारीला लागले. आज ट्रेकचा नक्की शेवटचा दिवस होता. वाढीव असला तरी... चहा नाश्ता झाला. ४ दिवस 'शंभो' झालेले नव्हते तेंव्हा फ़क्त घासून-पुसून स्वच्छ झालो आणि आम्ही तोलारखिंडीकडे निघालो. गुहेमधून बाहेर पडलात की उजव्या हाताची वाट तोलार खिंडीकडे जाते. गेल्या ३-४ दिवसाच्या ट्रेकवर गप्पा टाकत आम्ही चालत होतो. तशी घाई नव्हतीच कारण पुढे अख्खा दिवस पडला होता खिरेश्वरला पोचायला. दिवाळी पहाट तर हुकली होतीच मग आता उगाच धावाधाव करून काय उपयोग होता? हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून तोलारखिंड चांगली ५-६ किमी. लांब आहे. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात. त्या पार करत मुख्य वाट न सोडता खिंड गाठायची होती. मध्ये अनेक छोट्या-छोट्या टेकड्या लागतात. वाट संपता संपत नाही. अक्षरश: अंत पाहते. तुम्ही कधी गेलात तर ह्या वाटेवर दुपार टाळा. घसा सुकून जीव जाईल पण वाट संपणार नाही. आम्ही मात्र सकाळी सकाळी निघालो असल्याने तितका त्रास जाणवत नव्हता. शिवाय खायचे सर्व सामान देखील संपले होते. जे उरले होते ते गडावर बाळूला देऊन आलो. आश्चर्य वाटेल पण त्याने ते फुकट घेतले नाही. योग्य ते पैसे आम्हाला देऊ केले.आम्ही त्याच्याकडून मात्र थोड़े कमी पैसे घेतले. उरलेले पार्ले-जी मात्र मी जवळच ठेवले. ते आजच्या दिवसात संपवायचे होते ना मला... ;)

आम्ही निवांत असलो तरी तिकडे आमच्या घरी मात्र पालकांची धावाधाव सुरू होती. का विचारताय? काल संध्याकाळी घरी आम्ही जे घरी पोचायला हवे होतो ते अजून सुद्धा पोचलेले नव्हतो. शिवाय कोणीच घरी संपर्क करू शकले नव्हते. आमच्यापैकी सर्वचजण पहिल्यांदाच असे ट्रेकला सह्याद्रीत आले होते तेंव्हा घरी काळजी वाटणे साहजिक होतेच. सत्याच्या आईने आमचे ट्रेकचे दुसरे सर म्हणजे 'चारूहास जोशी' यांना गाठून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी "अजून काहीही माहिती आलेली नाही. आपण १ दिवस थांबूया. नाहीच काही कळले तर ट्रेकरूटवर उलट्या बाजूने आपण सर्च टीम पाठवू" असे सांगितले. थोडक्यात काय हाच नियम आहे सह्याद्रीमधला. सह्याद्री मध्ये आपण कुठेही अडकले असू तरी १-२ दिवसात कुठल्या ना कुठल्या संपर्क साधनांपर्यंत जाउन पोचतोच. तेंव्हा तितकी वाट बघावीच लागते. मात्र सत्याच्या आईचे काही त्याने समाधान झाले नाही. त्यांनी इतर पालकांना संपर्क साधला. त्यांना माझ्या वडिलांकडून समजले की त्यांनी ह्या संदर्भात आधीच पोलिस कंप्लेंट केलेली आहे. झाले असे की आमच्या पिताश्रींनी कालचा दिवस आणि मग पूर्ण रात्र आमची वाट पाहिल्यावर सकाळी तड़क उठून ठाणे कोपरी पोलिस स्टेशनला जाउन ह्या संदर्भात माहिती पोलिसांना दिली. तिकडून मग सर्व चक्र फिरली आणि पोलिस वेगवेगळ्या कंट्रोल रूमवरुन माहिती मिळवण्याचे काम करू लागले. इगतपुरी, कसारा, कल्याण इकडून काहीच माहिती येत नव्हती. कुठे कुठल्या ट्रेकर ग्रुपला अपघात वगैरे अशी सुद्धा माहिती नव्हती. पोलिसांनी सुद्धा "थोड़े थांबूया. आजच्या दिवसात काही माहिती आली नाही तर सर्च टीम पाठवू" असेच सांगितले.

ह्या सर्व प्रकाराची काहीही माहिती नसलेले आम्ही २१ उड़ाणटप्पू तोलारखिंडीच्या मार्गाने आगेकूच करतच होतो. २ तासात खिंडित पोचलो. तशी छोटीशी आहे खिंड. उतरायला फारतर ५-७ मिनिट लागतात. पण मध्ये-मध्ये खोबण्या धरत-धरत खाली उतरावे लागते. फारसा त्रास जाणवला नाही आम्हाला. खिंड उतरून गेल्यावर पायथ्याला वाटेला २ फाटे फुटतात. डावीकड्ची वाट जाते 'कोथळे'मार्गे 'कोतूळ'कडे. तर उजव्या हाताची वाट खिरेश्वरमार्गे खूबीकडे जाते. ह्याच वाटेने आम्ही पुढे जाणार होतो. या ठिकाणी वाघजाईचे एक छोटेसे मंदिर देखील आहे. इकडून फारतर तासभर उतरून गेले की खिरेश्वर गाव आहे. तेंव्हा एक छोटासा ब्रेक झाला. त्या ट्रेकच्या दुर्मिळ असलेल्या फोटोंपैकी हा एक. बघा मी सापडतो का... :)तिकडून निघालो आणि वेळेत खिरेश्वरला पोचलो. डाव्या बाजूला खाली गाव आणि उजव्या हाताला वरच्या बाजुला हरिश्चंद्रगडाचे नेढ दिसत होतं. नेढ म्हणजे आरपार असणारे भोक. सुईमध्ये असते ना तसेच पण हे डोंगरामधले. त्या पलीकडून गडावर जायला अजून एक मार्ग आहे. पण सध्या त्या वाटेने फारसे कोणी जात नाही. पूर्वी मात्र तो राजमार्ग होता असे म्हणतात. आम्ही गाव डाव्या हाताला ठेवत रस्त्याला असणाऱ्या एका विहिरीपाशी निवांत पहुडलो. ११ वाजून गेले होते आणि भूका लागायला लागल्या होत्या. तांदुळ - डाळ वगैरे सामान तर आता काही सोबत नव्हते पण 'रेडी टू इट' जे काही होते ते सर्वांनी बाहेर काढले. अक्षरश: खजाना निघाला. चिवडा, चकल्या, शेव, लिमलेटच्या गोळ्या, पॉपिंस, पार्ले-जी आणि मारी बिस्किटे, फरसाण, गाठे असे जे काही म्हणून असेल ते सर्व एका पेपरवर एकत्र केले. मग ते 'स्पेशल मिक्स्चर' विहिरीच्या थंड पाण्यासोबत खाल्ले. सर्व टेस्ट मिक्स झाल्या होत्या. पण एक वेगळीच टेस्ट तयार झाली होती. वा. मज्जा आली ते खायला. पुन्हा कधी तरी असे बनवून खायला हवे. खिरेश्वर वरुन निघालो आणि पुढच्या रस्त्याला लागलो. इकडे आता एक छोटेसे धरण झाले आहे. भिंत मात्र चांगली १०-१५ मीटर रुंद आहे. आम्ही मात्र त्या भिंतीवरुन 'खूबी'कडे न जाता आधी गावाबाहेर उजव्या हाताला नागेश्वर मंदिराकडे वळलो. तेथील कोरीवकाम बघून थक्कच झालो. हे मंदिर यादवकालीन असून सध्या पूर्णपणे दुरावस्थेत आहे. तिकडून थोडेच पुढे एक लेणं आणि बांधीव टाके सुद्धा आहे. हे सर्व बांधकाम पाहून आम्ही पुन्हा धरणाच्या भिंतीवर येउन पोचलो.

आता ऊन डोक्यावर आले होते आणि समोर धरणावरची नागमोडी वाट संपता संपत नव्हती. मी आणि शेफाली गप्पा मारत चाललो होतो.पाहिल्या दिवसापासून अतिउत्साही असणारी कार्टी अजून सुद्धा पुढेच पळत होती. तर आता 'ही चाल कधी संपणार' म्हणत रेंगाळलेली काही पावले मागे राहिली होती. आम्ही दोघ मात्र गप्पा मारत मारत कधी पलिकडे पोचलो कळले सुद्धा नाही. अखेर ५ दिवसांनी आम्ही डांबरी रास्ता बघत होतो. गाड्या दिसत होत्या. आता मात्र घरी जायची ओढ़ एकदम वाढली. आपल्या आई-बापाला काळजीमध्ये टाकुन आपण मात्र इकडे मस्त मज्जा करतोय हे मनाला सारखे लागून राहत होते. एका चहाच्या टापरी शेजारी आम्ही बस्तान मांडले आणि येणाऱ्या S.T. ची वाट बघू लागलो. तेवढ्या वेळात बाजुच्या दुसऱ्या एका टपरीमध्ये वडयाची ऑर्डर दिली. मुरबाडला पोचेपर्यंत काही पोटात नको का. गावातल्या एका पोराकडून विल्याने एक फटाका घेतला आणि स्वतःची दिवाळी मधला फटाका फोड़ण्याची हौस भागवून घेतली. ३ च्या आसपास बऱ्यापैकी रिकामी एक गाडी मिळाली. त्यात घुसलो सर्व आणि मग अखेर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. उजव्या हाताला दुरवर हरिश्चंद्रगड़ आणि विहंगम कोकणकडा दिसत होता. पुढे पुढे जात होतो तसे काका आणि राजेश आम्हाला अजून काही गड़ किल्ले दाखवत होते. "तो बघा तो भैरवगड. हा जीवधन - नाणेघाट. तिकडे दूर दिसतोय ना तो गोरखगड आणि सिद्धगड़." जसजसे एक एक नवीन गड़-किल्ले बघत होतो तशी तिकडे जायची इच्छा अधिक तीव्र होत होती. २ तासाच्या प्रवासानंतर आम्ही मुरबाडला येउन पोचलो. ती गाडी आम्ही तिकडे सोडली आणि सर्वजण 'फोनबूथ'कडे धावले. काही क्षणात सर्व फोनबूथ आम्ही ताब्यात घेतले होते. घरी कळवा-कळवी झाली तसे आम्ही सुद्धा निवांत झालो. थोड्याच वेळात तिकडून निघालो आणि कल्याणमार्गे आपापल्या घरांकडे कूच झालो. आमचा सह्याद्रीमधला ५ दिवसाचा पहिलच ट्रेक सफळ संपूर्ण यशस्वी झाल्याने आम्ही भलतेच खुश होतो... ट्रेक संपला असला तरी एक कधीही न संपणारी 'सह्यभ्रमंती' नुकतीच सुरू झाली होती...
.
.
पुढील भाग - कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !
.
.

9 comments:

 1. त्या मिसळ भेल ची चव अजुन तोंडावर आहे हा माझ्या आयुषातला अविसमरनीय ट्रेक आहे आता १० वर्षानी आठवणी ताज्या केल्या बदल आभार

  ReplyDelete
 2. होय रे सुरेश .. मला सुद्धा लिहिताना जाम मज्जा आली... :)

  ReplyDelete
 3. छान झालंय रोहन..ढोरवाटा शब्द किती दिवसांनी ऐकला यार.....:)

  ReplyDelete
 4. :) लहानपणापासून ऐकलेला आणि डोक्यात बसलेला हा एक मस्त शब्द आहे.

  ReplyDelete
 5. hai rohan im also want to this but i dont have any company can i joint your group for track. pls tell me..sanket

  ReplyDelete
 6. अभ्यन्ग स्नान राहीले बाजूल, इथे तर आंघोळ करायचे वांदे होते. सर्वात आधी मी उठलो होतो. काकाने कालच दही भात लावून ठेवला होता सकाळच्या न्याहारी साठी. अणि मलाच दिला चवीसाठी. तो पण अगदी मूठभर. त्याला कोण सांगणार की मला दही मुळीच आवडत नाही. पण पुन्हा... आलिया भोगासी म्हणून खाल्ला. वर सांगून टाकले, छान झालाय. हा हा... बाकीच्यानी मात्र खरेच मेजवानी हाणली.
  पर्तीचा प्रवास. थोडी हूरहुर लागली होती. पण आनंद देखील होत होता. ५ दिवसांच्या सवयी मुळे कोणालाच काही त्रास जाणवत नव्हता. आणि सॅक पण बर्या,च हलक्या झाल्या होत्या. विहिरी जवळची पॉट पौरी म्हणजे या सगळ्याचा कळस. डोंगरात कसल्या सीमा नसतात. मनाला येईल तो वेडेपणा करण्याची मुभा असते.
  तिथून निघालो. मनालीशी चांगली मैत्री झाली होती. दोघेच निघालो गप्पा मारत. बराच वेळ बोललो. लंच ते खुबी फाटा. ऑलमोस्ट एक ते दीड तास. खुबी फाट्याला माझा चष्मा गायब. बसमधे कळले, तो मनालीनेच लंपास केला होता. काका एकदम अचंब्यात. त्यात एस. टी. मधे त्याच्या डोक्यावर ठेवलेला स्टोव पडला. तो गार. हा हा... मुरबाड आणि मग कल्याण ला पोहचलो. ट्रेन मधे बसल्यानंतर एकदम खिन्न वाटले. ही भ्रमंती संपणार असे वाटले. इथून पुढे काय???

  ReplyDelete
 7. अभ्या... इथून पुढे तर सुरू झाली एक कधीही न संपणारी सह्ययात्रा.... :)

  ReplyDelete
 8. रोहन : नुसती सह्ययात्रा नव्हे, अभीची आणि माझी जीवन यात्रा देखील इथूनच सुरू झाली.

  ReplyDelete
 9. खरच...! बरोबर सात वर्षानी, २६ ऑक्टोबर २००७ ला आम्ही एकमेकांच्या बंधनात अडकलो. आयुष्याला अजुन एक डाइमेन्षन मिळाले. आणि मला डोंगरात भटकायला हक्काचा सवंगडी मिळाला.

  ReplyDelete