Tuesday, 31 March 2009

भाग २ - रतनगड़ ... !

रात्री १२ नंतर तो ११ वा जण हालचाल करू लागला. दूडूदूडू त्या गुहेमध्ये धावायला लागला. दिसत मात्र नव्हता. अखेर काही वेळानी खिर ठेवलेल्या टोपाचा आवाज आला. राजेशने त्या दिशेने टॉर्च मारला. मस्तपैकी टोपाच्या काठावर बसून खिर खाणारा तो उंदीर आता आम्हाला दिसला. अंगावर प्रकाश पडल्यामुळे उंदीर आता पळापळ करू लागला होता. तिकडून तो जो पळाला तो थेट मयूरच्या अंगावरून विदुलाच्या अंगावर. आता विदुला अशी काही ओरडली की आख्खा गड जागा झाला असता. तिने उंदराला जो उडवला तो थेट माझ्या उजव्या पायावर येऊन पडला. मी काही करायच्या आत तो पसार झाला. नंतर काही तो आम्हाला दिसला नाही. आता निवांतपणे झोपायला काही हरकत नव्हती. आम्ही सकाळी उठलो तेंव्हा ७ वाजत आले होते. पाउस बाहेर कोसळतच होता. गडावर सगळीकड़े धुके पसरले होते. समोर ५ फूटांवरचे सुद्धा काही दिसत नव्हते. आम्ही अखेर परत निघायचे ठरवले. आवराआवरी केली, चहा बनवला आणि पुन्हा परतीच्या मार्गावर निघालो. पुन्हा एकदा गडाचा दरवाजा आणि त्या खालचा निमूळता भाग सावकाश उतरून फाटक्या शिडीकडे पोचलो. पुन्हा तीच कसरत. ह्यावेळी जास्त काळजी कारण आता उतरत होतो. एक-एक करून आम्ही दोन्ही शिड्या उतरून खाली आलो आणि डोंगर उतरायला लागलो. आता रस्ता चुकायचा प्रश्न नव्हता. उतरायचा वेग सुद्धा चांगला होता. पण आता काळजी होती ती प्रवरा नदीच्या प्रवाहाची.
अर्ध्याअधिक अंतर पार करून आम्ही खालपर्यंत येउन पोचलो होतो. प्रवरानदीचा घोंघावणारा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. गेल्या २ दिवसात झालेल्या पावसाने नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते. मात्र प्रवाह जेंव्हा समोर येउन उभा ठाकला, तेंव्हा मात्र आम्ही थक्कच झालो. कारण प्रथमदर्शनी तो पार करून जाणे अशक्य वाटत होते. मागे फिरने सुद्धा शक्य नव्हते. अखेर थोड़े पुढे सरकून प्रवाह पार करायला योग्य जागा शोधली. पात्र तसे जास्त मोठे नव्हते पण पाण्याला प्रचंड वेग होता. कारण पाण्यात पाय टाकल्या-टाकल्या मला ते जाणवले. ह्या आधी सुद्धा आम्ही उधाणलेली उल्हासनदी २-३ वेळा पार केली आहे पण हे प्रकरण सोपे असणार नाही ह्याची जाणीव आम्हाला आली होती. १५ मीटर रुंद पात्राच्या बरोबर मध्ये एक झाड़ आणि त्याखाली थोडी उथळ जमीन होती. आधी तिथपर्यंत जायचे असे मी ठरवले होते. माझ्या मागे राजेश होताच. आमच्या जड सॅक्स घेउन आम्ही त्या प्रवाहात शिरलो खरे पण त्या फोर्सने वाहुन जायला लागलो. कसेबसे स्वतःला सावरले आणि थोड़े बाहेर आलो. ह्यावेळी अधिक जोमाने आत शिरलो आणि जोर लावून पुढे सरकायचा पर्यंत करू लागलो. एक-एक पाउल टाकायला खुप वेळ लागत होता. पण विनाकारण घाई करायची नाही असे आम्ही ठरवले होते. इतका वेळ मागे उभे राहून बाकी सगळे आमची प्रत्येक हालचाल बघत होते. विदुलाच्या डोळ्यात तर आता आपण इकडेच अडकलो असे भाव होते. शेवटी अथक प्रयत्न करून काही मिनिटांनी मी आणि राजेश त्या उथळ जागेमध्ये पोचलो. आता हातांची साखळी करून एकेकाला ह्या साइडला आणणे गरजेचे होते. ह्या सगळ्या मध्ये बराच वेळ गेला. अखेर एक-एक करून सर्वजण मध्ये येउन उभे राहिलो. काही फोटो टिपावेत असे वाटत होते, पण प्रसंग बघता तिकडून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे होते. पुढचा ७-८ मीटरचा प्रवाह भलताच वेगात होता. पाय टाकल्या-टाकल्या मी सरकून पुढे जात होतो. मागून राजेशचा आधार घेत-घेत मी पुढे सरकत होतो. अचानक राजेशचा तोल गेला. प्रवाह बरोबर तो वाहून जायला लागला. मी फार काही करू शकत नव्हतो. मी आधार घेत असलेल्या हातानेच त्याला थोडा आधार दिला. हुश्श्श्श्श ... दोघे पण स्थिर झालो.वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे पाय चांगलेच भरून आले होते. ह्या ठिकाणी अजून काही वेळात मी टिकणार नाही हे समजायला लागले होते. आता उरलेला टप्पा लवकर पार करणे गरजेचे होते. पुढच्या ७-८ मीटरच्या टप्यात बरोबर मधोमध एक पक्की जागा मिळवून तिकडे काही वेळ ठाण मांडून बसायचे (म्हणजे उभे राहायचे) असे मी ठरवले होते. त्याशिवाय सगळ्यांना ह्या बाजूला आणणे शक्य झाले नसते. पुन्हा राजेशचा आधार घेत पायाखाली दगड चाचपडत हळूहळू मी पुढे सरकलो. पाणी सारखे मागे लोटत होते. एके ठिकाणी मला हवी तशी जागा सापडली. तिकडेच पाय घट्ट रोवून उभा राहिलो. आता वेळ दवडून उपयोग नव्हता. मी राजेशला पुढे सरकायला सांगितले आणि अभि आता राजेशच्या जागी येउन उभा राहिला. आता राहिलेला प्रत्येक जण आधी अभि, मग मी आणि शेवटी राजेश अश्या साखळीमधून पार जाणार होता. एक-एक जण आता मानवीसाखळी करत प्रवाह पार करू लागले. पहिली विदूला आली पण ती थोडी घाबरलेली वाटत होती. मी तिला मजेत म्हटल "काळजी करू नकोस.. आम्ही तूला सोडून जाणार नाही. जाऊ तर घेउनच ... " तिने पहिला पाय पाण्यात टाकला आणि ती पाण्यामध्ये वाहुन जायला लागली. तिला उभे सुद्धा राहता येइना. शेवटी मला माझी जागा सोडून मागे सरकावे लागले आणि तिला थोडा आधार द्यावा लागला. अखेर ती हळूहळू सरकत सरकत राजेशपर्यंत पोचली. आता त्या मागुन मग दिपाली, अमृता, मयूर, कविता, अमेय, मनाली असे एका मागुन एक जण पार करून राजेशकड़े पोचले. अभि सुद्धा पुढे सरकला. आता मीच तेवढा पाण्यात होतो. राजेश पुन्हा थोडा मागे आला आणि मला हात देऊन बाहेर काढला.अखेर अजून एक दिव्य पार करून आम्ही सर्वजण सहीसलामत पलिकडे आलो होतो. आता पुन्हा रस्त्याला लागणे गरजेचे होते. २-५ मिं. मध्ये तो सापडला. नुकताच पार पडलेला प्रसंग सारखा आठवत होता. खरच... मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे. माणसाकडे आत्मविश्वास असावा. साहसीपणा असावा. पण आततायीपणा नको. निसर्गात भ्रमंती करताना हे भान नेहमीच राहिले पाहिजे. नाहीतर आपली काही धडगत नाही. काही वेळातच आम्ही रतनवाडीच्या अगदी जवळ येऊन पोचलो. पाउस सुद्धा कमी होत होता. जणू काही २ दिवस आमची परीक्षा पाहण्यासाठीच तो कोसळत होता. वाडी जवळ पोचलो तेंव्हा पाउस पुर्णपणे थांबला होता. ऊन-पावसात मंदिर आणि परिसराचे रूप खुलून आले होते. काल न घेता आलेले काही फोटो आम्ही घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. आल्या मार्गाने शेंडीला पोचलो आणि तिकडून S.T. ने कसाऱ्याला. एक थरारक ट्रेकची सांगता करत आम्ही कसाऱ्यावरुन घरी जायला निघालो होतो. अर्थात पुढच्या ट्रेकची प्लानिंग करताच...प्रचंड पावसामुळे रतनगड़ किंवा वाटेवरचे फोटो काढता आले नाहीत पण रतनवाडी येथील 'अमृतेश्वर मंदिर' परिसर आणि पुष्कर्णीचे काही फोटो घेता आले.


मंदिर परिसरातील काही शिल्पे. --->>>

अमृतेश्वर मंदिराचे कोरीव खांब.--->>>

रतनवाडी येथील सुंदर पुष्कर्णी. --->>>

भाग १ - रतनगड़ ... !


२-३ ऑगस्ट'०८ ला मी, अभिजित, मनाली, दिपाली, मयूर, विदुला, राजेश, अमेय, अमृता आणि कविता असे १० जण रतनगड़ला गेलो होतो. रतनगड़ माहीत नसेल अस कोणी डोंगरवेडा असेल अस नाही मला वाटत. १ तारखेला रात्री शेवटच्या म्हणजे खरतर २ तारखेला पहाटे पहिल्या कसारा गाडीने आम्ही कल्याणहुन निघालो. प्रचंड पाउस पडत होता. इतका की इगतपुरीला पोहचेपर्यंत आम्ही जवळ-जवळ पूर्ण भिजलो होतो. पहाटे ३ च्या आसपास तिकडे पोचलो आणि स्टेशनवर बसून होतो. उजाडल की शेंडी गावची बस पकडून आम्हाला रतनगडाकड़े सरकायचे होते. २ आठवडे आधीच आम्ही काही जण पावनखिंडीमध्ये जाउन आलो होतो. साधना अजून त्या डॉक्युमेंटरीवर काम करत होती. आदल्या दिवशी तिची नाइटशिफ्ट होती. मला वाटले आज पण असेल, म्हणुन मी तिला पहाटे ४ ला कॉल केला... आणि शिव्या खाल्या... हाहा... झोपली होती ना ती घरी मस्त पैकी.

पहाट व्हायला लागली तशी स्टेशनवर वर्दळ वाढायला लागली. आम्ही मस्तपैकी कटिंग चहा मारला आणि बसस्टैंडकड़े निघालो. पाउस काही थांबायचे नाव घेत नव्हता. तो आपला पडतच होता. पहाटेच्या पहिल्या गाडीने आम्ही शेंडी गावात पोचलो. ह्या ठिकाणी मी ८ वर्षांनंतर येत होतो. २००१ साली कळसुबाई ते हरिश्चंद्रगड़ ट्रेक करताना आम्ही शेंडी गावात आलो होतो. अजुन सुद्धा सगळे तितकेच आठवत होते. गावात असलेली शाळा आणि सरळ जाणारा बाजारचा रस्ता. आता अधिक दुकाने आणि हॉटेल्स झाली आहेत म्हणा. भर पावसात एका छोट्या हॉटेलमध्ये शिरलो आणि नाश्त्याची ऑर्डर दिली. मिसळपाव, कांदेपोहे आणि गरमागरम चहा. पेटपूजा केल्यावर आता रतनवाडीकडे निघायचे होते. १० जण असल्याने एक जीप घेतली. त्या जीपमध्ये एकदम कोंबून बसलो. पुढे मी आणि राजेश, मध्ये अभि, मनाली, कविता आणि अमेय तर मागे अमृता, विदुला, दीपाली आणि मयूर बसले होते. शेंडी गाव भंडारदरा धरणाच्या काठावर वसलेले आहे. रस्ता पुढे धरणाच्या काठाकाठाने रतनवाडी पर्यंत पोचतो. तसे शेंडीहून बोटीतुन सुद्धा रतनवाडीला जाता येते पण ऐन पावसाळ्यात ही सेवा बंद असते.


आम्ही जीपने रतनवाडीकड़े निघालो. रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या डोंगरांमधून पांढरेशुभ्र धबधबे फेसाळत खाली कोसळत होते. उजव्या बाजूला धरणाचे पात्र आमची साथ करत होते. पाउस इतका पडत होता की कॅमेरा बाहेर काढायची सोय नव्हती. काढला तरी कॅमेरालेन्स २-३ सें. मध्ये भिजून जायची. कसेबसे काही फोटो घेता आले. अखेर तासाभराने रतनवाडीला पोचलो. डाव्याबाजूला डोंगराच्या कुशीत रतनवाडी वसलेली आहे. काही घरे नदी पात्राच्या बाजूला सुद्धा आहेत. उजव्या बाजूला थोडेच पुढे आहे रतनवाडीचे हेमाडपंथी 'अम्रुतेश्वर मंदिर'. त्या रस्त्याला प्रवेश करताच डाव्याबाजूला एक सुंदर पुष्करणी आपले लक्ष्य वेधून घेते. मंदिराचे मुख्यद्वार मागील बाजूने आहे. प्रवेश करताच एक देवडी आहे आणि अजून पुढे आत गेले की आहे मुख्य गाभारा. जास्त पाउस पडला की हा गाभाऱ्यामधली पिंड पाण्याखाली जाते. आत्ता सुद्धा तेच झाले होते. मंदिराचे खांब कोरीव आहेत आणि त्यावर विविध प्रकारच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. गळक्या छपराची आता डागडूजी झाली आहे पण त्यावर मारलेला पांधरा रंग मात्र विचित्र वाटतो. मंदिराच्या परिसरात बरीच शिल्पे विखुरलेली आहेत. त्यात काही वीरगळ सुद्धा आहेत. पुष्कर्णीच्या समोर गणेश, विष्णु यांच्या मुर्त्या आणि शंकरपिंड आहे. शिवाय काही युद्धप्रसंग देखील कोरलेले आहेत. मंदिर आणि परिसराचे फोटो आम्ही छत्री घेउन काढले कारण पाउस काही थांबायचे नाव घेत नव्हता. रात्रीचे जेवण आणि सकाळचा चहा-नाश्ता होइल इतकी लाकडे एका घरातून नीट बांधून घेतली. मंदिराच्या बाजूला असलेल्या घरात थोडासा चहा-नाश्ता घेउन आम्ही अखेर रतनगडाकडे कूच केले.
**************************************************************************************

**************************************************************************************

आता इथून पुढच्या गावांपर्यंत कच्चा गाडी रस्ता झाला आहे. नदीच्या पात्रावर देखील पूल झाला आहे. पुलानंतर लगेचच डावीकडे वळलो की शेतां-शेतांमधून गडाकडे जायचा मार्ग आहे. इकडे काही ठिकाणी २-२ फुट पाणी भरले होते. शेती सगळी पाण्याखाली गेली होती. त्या पाण्यामधून वाट काढत आम्ही डोंगर चढणीला लागलो. पाउस असाच सुरु राहिला तर उदया परत येताना नक्कीच जास्त त्रास होइल ह्याची कल्पना येत होती. पहिल्या टप्याची चढण पार करून वर गेलो तेंव्हा कळले की आम्ही चुकीच्या वाटेवर आलो आहोत. पुढे उतार आणि खुपच झाडी होती म्हणून मग पुन्हा मागे वळलो आणि योग्य रस्ता शोधायला लागलो. १२ वाजून गेले होते. पुन्हा भूक लागायला सुरवात झाली होती. एक छोटासा ब्रेक घेतला आणि पुढच्या वाटेला लागलो. आता आम्ही अचूक दिशेने जात होतो. गर्द झाडीमधून वर चढ़णारा रस्ता आम्हाला रतनगडाच्या तुटलेल्या पायर्‍यांपाशी असणाऱ्या शिडीपाशी नेउन सोडणार होता. मंदिरापासून ट्रेक सुरु केल्यापासून जसजसे आम्ही जास्त भिजत होतो तसतसे हळू-हळू सामानाचे वजन वाढत जात होते. आम्हीच नाही तर संपूर्ण सामान भिजले होते. सामान प्लास्टिकमध्ये बांधून सुद्धा काही ठिकाणी तरी पाणी नक्की शिरले होते कारण घेतलेल्या बैगचे वजन दुपटीने वाढले होते. मला वाडीनंतर ट्रेकमध्ये पावसामुळे फोटो घेता येत नव्हता. अमृताने मात्र काही फोटो टिपले होते. संपूर्ण ट्रेकभर गप्पा मारत-मारत आम्ही अखेर त्या शिडीपाशी पोचलो.खालची शिडी काही फार चांगल्या स्थितीमध्ये राहिलेली नाही. एका वेळेला फार तर २ जणांनी चढावे. शिवाय पावसामुळे कोपरे निसरडे झाले होते आणि हाताने आधार घ्यायच्या शिडीच्या रेलिंगचा भरोसा राहिलेला नाही. १० जणांमध्ये कोण कितवा चढणार हे ठरवले आणि राजेश सर्वात पुढे निघाला. मी सर्वात मागे होतो पण फोटो मात्र काढता येत नव्हते ह्याचे दुःख: होते. पहिल्या शिडीनंतर थोड़ासा टप्पा पार करावा लागतो. तिकडे अभिजित थांबला होता. त्यानंतर डावीकड़े वळलो की लागते दूसरी शिडी. पुढचे भिडू जसे दुसऱ्या शिडीकड़े पोचले तसे आम्ही मागचे पहिल्या शिडीवर सरकू लागलो. दूसरी शिडी अजून भन्नाट स्थिती मध्ये होती. वर पोचल्यानंतर उभी रहायची जागाच मोडून गेली होती आणि वरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने पत्रा वाकून बाहेर आला होता. पत्रा टिकून रहावा म्हणुन खाली घातलेल्या मेटल फ्रेम वर वजन टाकुन स्वतःला उजवीकड़े सरकवल्याशिवाय वर जाणे अशक्य होते. आता एक-एक करून ते दिव्य काळजी घेत आम्ही करू लागलो कारण डाव्या बाजूला तोल गेला तर कपाळमोक्ष नक्की होता. एकतर पावसाने सगळ निसरडे झाले होते. त्यात वर अजून पाउस पडताच होता. दुसऱ्या शिडीच्या वरच्या टोकाला पोचलो की गडाचा दरवाजा दिसू लागतो. हा टप्पा अतिशय निमूळता आहे आणि सवय नसेल तर मोठी सॅक घेउन चढणे अशक्य. एक-एक करून आम्ही वर सरकू लागलो. डाव्या-उजव्या बाजूला दगडांमध्ये खोबण्या केलेल्या आहेत. त्या धरून-धरून सगळे वर पोचलो. दरवाजावरुन सरळ पुढे गेलो तर गडाच्या माथ्यावर जाता येते. पण आम्ही आधी उजवीकड़े मागे वळून गुहेकडे निघालो. राहायची सोय करणे महत्त्वाचे होते नाही का... गुहेकड़े पोचलो तर तिकडे आधीच काही ग्रुप्सनी कब्जा केलेला होता आणि सगळी गुहा ओली कडून टाकली होती. आता राहायचे कुठे असा प्रश्न पडला. बाहेर राहावे तर पाउस जोरदार सुरूच. बाजूला असलेल्या गणेशगुहेमध्ये आम्ही मुक्काम टाकायचे ठरवले. ह्या गुहेमध्ये ७-८ जण सहज राहू शकतात. आम्ही १० जण त्यात घुसणार होतो. सामान टाकून स्थिरस्थावर व्हायच्या आधी ती साफ करणे गरजेचे होते. अभिने आख्खी गुहा साफ केली आणि आम्ही त्या गुहेमध्ये राहते झालो.

दिवसभर पावसात भिजून जबरदस्त भूक लागली होती. नशीब आमचं की आणलेली लाकडे सुकी राहिली होती. गुहेमध्येच एका कोपऱ्यात चूल बनवली आणि त्यावर गरमागरम चहा बनवला. रात्र झाली तसे गप्पा मारत बसलो. इतक्या पावसामुळे उदया तरी गड बघायला मिळणार का? असा विचार आमच्या मनात होता. पावसामुळे लाकडे भिजली नव्हती पण दमट मात्र नक्की झाली होती. नुसता धुर करत होती पण जळत मात्र नव्हती. आम्ही कसाबसा त्यावर चहा बनवला, पण रात्रीचे जेवण कसे बनवणार हा प्रश्न होताच. अखेर रात्रीच्या खिचडीभातचा प्लान कैन्सल करून आम्ही फ़क्त म्यागी बनवायचे ठरवले. शिवाय सोबत नेलेली खिर बनवून खावी असे देखील मनात होते. म्यागी होईपर्यंत सटर-फटर खाउन आधीच सगळ्यांची पोट भरली होती. त्यामुळे शेवटी बनवलेली टोपभर खिर तशीच राहिली. कोणीच ती संपवेना. इतके मला ऐश्वर्याची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. ती असती तर खिर अशी उरली नसती. असो... उरलेली खिर झाकून ठेवून देउन आम्ही सगळे झोपेपर्यंत गप्पा मारत बसलो. बाहेर पाउस जोरात सुरूच होता. पावसाची झड़ आत येऊ नये किंवा इतर कुणीहि आत येऊ नये म्हणुन आम्ही दारावर अडसर लावून झोपायची तयारी केली. वरच्या रांगेत ७ जण तर मध्ये मूर्तिसमोर मी, राजेश आणि अमेय असे ३ जण दाटीवाटीने झोपलो. पण लवकरच लक्ष्यात आले की आमच्या १० जणांशीवाय एक ११ वा कोणीतरी तिकडे होता जो आम्हाला रात्री अधून मधून जागा करणार होता.
क्रमशः ...

Sunday, 8 March 2009

भाग ३ - पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड ... !

आज होता दिवस तिसरा आणि सर्वात महत्वाचा. आज आम्ही पावनखिंड आणि पुढे जाउन विशाळगड पाहणार होतो. गेल्या दोन दिवसात पन्हाळगडापासून निघून ५५ किलोमीटर अंतर पार करून वाटेमधला क्षण अन् क्षण अनुभवत पांढरपाणीपर्यंत पोचलो होतो. आम्ही न्याहारी आटोपली आणि कुच करायला तयार झालो. पावनखिंड आता अवघी ६ किलोमीटर पुढे होती. आम्ही आता अवघे आतुर होतो. गेल्या दोन दिवसात पावसाने आम्हाला हुलकावणी दिली होती. काल संध्याकाळी तो भेटून गेला होता तसा थोड़ासा पण आज सकाळी मात्र तो आलाच. अगदी जोरात नाही पण बर्‍यापैकी होता. पांढरपाणी ते पावनखिंड मध्ये बराचसा रस्ता आता डांबरी झाला आहे. मुख्य रस्त्यावरुन उजवीकडे वळलो की लगेच सुरू होतो पावन परिसर पावनखिंडीचा. मळलेल्या पायवाटेने आत वळलो. नुकताच पाउस पडून गेला होता त्यामुळे लालमातीची वाट निसरडी झाली होती. आम्ही एक रांग धरून खाली उतरू लागलो. खिंडीकडे जायचा हा एकमेव मार्ग. ह्या अवघड उतारावरती सुद्धा उमेश आणि साधना स्वतःला सांभाळत सगळ शूट करत होते. तो उतार पार करून आम्ही पुढे गेलो. कासारी नदीवरचा ओढा ओलांडला आणि पुन्हा चढायला लागलो. ह्याच ओढ़यावरती पुढे धबधबा आहे. आणि अखेर तो क्षण आला. पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. आम्ही आता पावनखिंडी मध्ये पोचलो होतो. त्या ठिकाणी सर्वजण स्तब्ध उभे होते. कोणीच काही बोलत नव्हते. शरीर वर्तमानकाळात मन इतिहासात अशी सर्वांची अवस्था झाली होती. त्या ३०० वीरांना मानवंदना म्हणून आम्ही काही वेळ मौन पाळले. आप्पा आता आम्हाला ३४८ वर्षांपूर्वीच्या त्या युद्धभूमीवरती घेउन गेले. जणू काही ते सर्व आमच्या डोळ्यासमोर घडते आहे असेच जाणवत होते.
२५ मावळे पांढरपाणीला ठेवून राजे घोडखिंडीत येउन पोचले होते. मागुन हेरांनी बातमी आणली की सिद्दी मसूद आणि फाझल खान हे पांढरपाण्यावर येऊन पोचले आहेत. आता निर्णायक वेळ आली होती. ह्या ठिकाणी शत्रुला थोपवणे भाग होते. राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामीभक्ती येथे दिसून येते. आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. थोड्यावेळात शत्रु नजरेत येऊ लागला पण शत्रुच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्दीमसूदचे घोडेस्वार उतरु लागले. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण ४ वाजत आले होते. थोड़े मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ आता खिंडीकड़े येउन पोचले. ते अधिक वेगाने ओढ़यापलिकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले.
आता आजूबाजुच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्राची लढाई सुरु झाली. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजीप्रभुंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजींनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले. ते म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला." फुलाजीप्रभुंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल - एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकड़े लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले " तोफे आधी न मरे बाजी. " बाजींच्या मनाची घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरु होते.


सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ


दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १


होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... !पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३

तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती. रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते. पण त्यांना पुढे सरकणे भाग होते. विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोड़खिंडीमध्ये ऐकू गेले. त्यानंतरच समाधानाने बाजींनी आपला देह सोडला.
शिवरायांच्या आणि बाजीप्रभूंच्या जयजयकाराच्या ललकारीने आम्ही सगळे भानावर आलो. याठिकाणी आता स्मारक उभे केले गेले आहे. आम्ही सर्वजण स्मारकासमोर नतमस्तक झालो. त्यापुढे खाली उतरल की ओढ़यावरचा धबधबा लागतो. इतका वेळ उमेश हे सगळ शूट करत होताच. मी सुद्धा थोड़े छायाचित्रण केले. आम्ही पुन्हा मागे येउन घोडेमाळाकड़े सरकलो. तिथून थोड पुढे पुन्हा डांबरी रस्ता लागला. कासारी नदीवरच्या धरणासाठी बसवलेल गाव सुद्धा लागले. आता आम्ही इथून थेट वाट पकडली गजापुर गावची. आम्हाला आता सर्वात पुढे पळायचे होते. बाकी सर्व ट्रेकर्स गजापुरला पोहचायच्या आधी आम्हाला आमचे जेवण उरकून विशाळगड गाठायचा होता. कारण सर्व ट्रेकर्स विशाळगडाला पोचले की आम्हाला शूटिंग साठी वेळ मिळणार नव्हता. आम्ही जेवण उरकून आप्पांबरोबर भराभर पुढे निघालो.


विशाळगड वसला आहे कोकण आणि घाट यांच्या बरोबर मध्ये. आम्ही पोचलो तेंव्हा विशाळगडाच्या माथ्यावर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. कोकणात पाउस तर घाटावर ऊन. विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत आता गाड़ी रस्ता झाला आहे. शिवाय वरती दर्गा असल्याने येथे मुस्लिम धर्मियांची जास्त प्रमाणात वर्दळ असते. आम्ही फटाफट वरती चढून गेलो. गडाची अवस्था वाइट झाली आहे शिवाय वरती राहणार्‍या लोकांचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. गडावरील गणेश आणि मारुती मंदिर दुर्लक्षित अवस्थेत आहे. एक ब्राह्मण कुटुंब शंकर मंदिराची देखरेख करते. आम्ही त्या ठिकाणी थोड़े विसावलो. संध्याकाळ होत आली होती. आम्हाला आता परतायला हवे होते. गडाच्या पडलेल्या दरवाजावरती साधनाने डॉक्युमेंटरीचा क्लोसिंग शॉट दिला. इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो. पावनखिंडित पावन होवून, आयुष्यातला असाच एक अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही मुंबईकडे परतू लागलो.

Friday, 6 March 2009

भाग २ - पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड ... !


दुसर्‍या दिवशी सकाळी लवकरच उठलो. करपेवाडी काल रात्रीच्या अंधारात नीट पहिलीच नव्हती. छोटी-छोटी कौलारू घरे, आवारात दाणे टिपत फिरणाऱ्या कोंबडया, सगळच कस एकदम मस्त वाटत होत. आम्ही सर्वात महत्त्वाचा असा नाश्ता आटोपला आणि फटाफट सामान आवरले. एकडे आम्ही काही वह्या आणि कपडे वाटप केले. ऐतिहासिक मोहिमेसोबत भरारी संस्था याठिकाणी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपते. आम्ही आता कूच करण्यास तयार झालो होतो. काल खुपच मागे पडल्याने आम्हाला आता सर्वात पुढे राहा असे सांगितले होते. शिवाय साधनाला त्यामुळे इतर काही ट्रेकर्सचे बाइट्स पण घेता येणार होते. आमचा आजचा मार्ग होत करपेवाडी ते पांढरपाणी. एकुण अंतर होते २७ किलोमीटर. करपेवाडी सोडल्यानंतर बराच वेळ ट्रेक रूट जंगलातून जात होता. मध्येच एखादी लागवडी खालची जमिन लागायची. आसपासचे शॉट्स घेण्यात आम्ही पुन्हा मागे पडलो होतो. बाकी सगळे बरेच पुढे निघून गेले होते. रस्ता एकदम मस्त होता. कधी शेतातून, तर कधी जंगलातून, कधी दगडांमधून, तर कधी एकदम मोकळे मैदान. आम्ही वाट चालतच होतो. मध्ये मध्ये छोट्या-छोट्या वाडया आणि पाडे लागत होते. ह्या भागात पाउस अजून म्हणावा तितका झालेला नव्हता. असलेले पाणी अडवून छोट्या-छोट्या खाचरांमध्ये भात शेती सुरु होती. काही ठिकाणी पिक पाण्याअभावी करपले होते तर काही ठिकाणी जमिन सुकून काळीठिक्कर पडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा इथल्या लोकांना लांब जावे लागायचे.

त्यावेळेला महाराजांनी मात्र म्हसाईंपठार ते पांढरपाणी ह्या मार्गात लागणारी गावे आणि वाडया सोडून रस्ता पकडला होता. जेणेकरून त्यांचा माग कमीतकमी लोकांना लागो, शिवाय मागून येणाऱ्या सिद्दीमसूदच्या फौजेकरून त्यांना उपद्रव नको म्हणून सुद्धा. त्यावेळेला इतक्या वाडया आणि गावे नव्हती म्हणा. आसपासची झाडी आणि जंगलसुद्धा निश्चितच दाट असेल. सिद्दीमसूदचे सैन्य घोड्यावरुन राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग घेतला होता. अर्थात घोड़खिंडीच्या अलिकड़े राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले असेल. त्यांच्या थोड़े मागून आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ येत होते. राजांचे पहिले लक्ष्य होते पांढरपाणी. एकदा तिकडे पोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी रात्री १० वाजता पन्हाळगड सोडल्या पासून १२ तासात कोणी थोडया विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते. एका ध्येयाने भारावल्यागत ते ६०० वीर विशाळगडाकड़े पळत सुटले होते.

आम्ही आता रिंगवाडीच्या अलिकड़े पोचलो होतो. साधारण ११ वाजत आले होते. वाडीच्या बाहेर एका खाचरात मस्त छोटीशी झोपडी उभी केली होती. उन्हाचे बसायला आणि पाखर उडवायला त्याचा उपयोग करत असावेत. एकडे साधनाचा उत्साह उतू जात होता. त्या खाचरात पाय टाकायला ती जरा आधी कचरत होती. पण मग शेवटी उतरली. अनवाणी पायाने त्या बांधा पलीकड़े गेली. सोबत प्रमोद होता. उमेश एकडून ते सगळ शूट करत होताच. आणि मग ती मस्त पैकी तिच्या त्या छोट्याश्या झोपडी वजा फार्महाउस मध्ये पहूडली. शेताच्या ह्या टोकाला आम्ही तिची वाट बघत खात बसलो होतो. आम्हाला दुसरे काय काम. तिकडून तिने एक टेक दयायला १२ रिटेक घेतले. असली धमाल आली म्हणून सांगू. रिंगवाडीच कधी रिंगणवाडी तर कधी कळपवाडी म्हणुन भलतच नाव घ्यायची. ह्या सगळ्या गडबडीत आम्ही चांगलेच मागे पडलो होतो. पुढे गेलेल्या आमच्या पैकी बाकीच्या ट्रेकर्सनी आम्ही रूट चुकू नये म्हणून थोड्या-थोड्या अंतरावर झाडांवर लाल रिबिनी बांधल्या होत्या. त्यामुळे मार्ग काढत काढत आम्ही पुढे जात होतो. पण अखेर एके ठिकाणी चकलोच. लाल रिबिन सुद्धा कुठे दिसेना. आता समोर जायचे की उजवीकड़े खालच्या बाजूला वळायचे ते कळेना. इतक्यात डाव्याबाजुच्या डोंगरावरुन एक हाक आली. 'तुमची माणस उजव्या हाताला गेली हो.' दुरवर डोंगरात एका दगडावर बसुन हाक देणाऱ्या त्या माणसाची फ्रेम घ्यायला उमेश पुढे धावला. कैमरा पूर्ण झूम करून तो टप्यात आला खरा, पण हवी तशी स्टेबल फ्रेम उमेशला मिळत नव्हती. उजव्या बाजूला वाट शोधत पुढे गेलेल्या मंदार कड़े कैमरास्टैंड होता. त्याला मागे बोलवे पर्यंत उशीर झाला असता. म्हणून आता साधना गुढगे टेकून जमिनीवर बसली आणि उमेशने तिच्या डोक्यावर कैमरा धरुन ती फ्रेम स्टेबल केली. तो सिन जबरी होता. मी तो माझ्या 'मेकिंग ऑफ़ डॉक्युमेंटरी' मध्ये कधीच पकडला होता. आता आम्हाला वाट मिळाली होती. पाटेवाडीच्या रस्त्याला लागलो. रस्त्यामध्ये एके ठीकाणी मस्त विहीर लागली. बाजूला छान पैकी सावली. त्यात दुपार होत आलीच होती. थोडावेळ थांबून पेटपूजा करायचे ठरले. विहिरी वरती पंप होता. त्यातून पडणाऱ्या पाण्यात मनसोक्त भिजलो. एकतर २ दिवस पाउस पडला नव्हता. एकदम फ्रेश होउन आम्ही पुन्हा पाटेवाडीच्या मार्गाला लागलो.
हर्षद, अनुजा, मंदार, प्रमोद, मी, उमेश, आणि साधना ...पाटेवाडी मागे टाकत आता आम्ही सुकामाळकड़े निघालो. मध्ये धनगरवाडीच्या आधी शेतात लावणीपूर्वी जो चिखल तूडवला जातो त्याचे काम सुरु होते. साधना पुन्हा एकदा अनवाणी पायाने त्या चिखलात उतरली. आणि चक्क नांगर धरून बैल हाकायला लागली. कधीकाळची तिची हौस बहुदा तिने भागवून घेतली असावी. त्या चिखलाचा मनसोक्त आनंद तिने घेतला हे मात्र नक्की. मला एकदम जवळ आलेल बघून मात्र ते बैल आपल्या मालकाला सुद्धा न जुमानता धूम पळत लांब गेले. तेंव्हापासून बाकीच्यांनी मला वळू बोलायला सुरवात केली. हा.. हा.. धनगरवाडी पार करून पुढे सरकलो आणि एक मस्त ओहोळ लागला. इतका मस्त की राहून राहून त्यात दुबकी मारायच मन करत होत. शेवटी बैग खाली ठेवली, बूट काढले आणि मनसोक्त डुंबलो. ह्या ठिकाणी बराच वेळ धमाल केली. आता सॉलिड भूक लागली होती. एखादी छानशी जागा बघून पथारी पसरायचे ठरवले. एक मस्त मोकळे मैदान लागले. तिकडे बॅग्स टाकल्या आणि खायला सुरुवात केली. आजुबाजुच्या झाडी मध्ये चरत असलेल्या बकऱ्या आमच्या भोवती जमा व्हायला सुरवात झाली. त्या इतक्या जवळ आल्या होत्या की आमच्या डब्यांमध्ये तोंड घालायच्या बाकी होत्या. आम्हा ७ जणांच्या डाव्या उजव्या बाजूने आत घुसायचा प्रयत्न त्या करत होत्या. आम्ही त्यांना हुसकावत होतो, मी तर अगदी कोपराने धक्का मारत होतो तरी पण काही केल्या त्या जात नव्हत्या. शेवटी आमच्या कडचा एक डबा त्यांना दिला. तेंव्हा कुठे त्या मानल्या. मग निवांतपणे आम्ही आमचा डबा संपवला. आम्हाला अजून बरेच लांब जायचे होते. त्यामुळे मासवडे गावच्या वाटेला लागलो. मासवडे पासून पांढरपाणी तसे जवळ आहे. नंतर रस्ता मोठा होत गेला. बाकीचे ट्रेकर्स सुद्धा भेटले. तिकडे पोचता-पोचता आम्हाला पावसाने गाठलेच. थोड़े भिजत-भिजत आम्ही पांढरपाणीला मुक्कामाला पोचलो. वरच्या बाजूने वाहत येणाऱ्या पांढऱ्या फेसाळ पाण्यामुळे ह्या जागेला अस नाव पडले आहे. पांढरपाणी पर्यंत आता गाड़ी रस्ता झाला आहे.


पन्हाळगड ते पावनखिंड एकुण अंतर आहे ६१ किलोमीटर. तर पन्हाळगड पासून ५५ किलोमीटर अंतरावर आणि पावनखिंडिच्या ६ किलोमीटर अलिकड़े पांढरपाणी आहे. पांढरपाणीच ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण आहे. महाराज पांढरपाणीला येउन पोचलो होते त्यावेळेला घोड्यावरुन राजांचा पाठलाग करणारे सिद्दीमसूदचे सैन्य अगदी जवळ येउन ठेपले होते. धोका वाढत जात होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले. शत्रुला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि ते घोड़खिंडीकड़े निघाले. अवघे २५ जण आता त्या २००० घोडेस्वारांशी लढायला तयार झाले होते. जास्तीत जास्त वेळ शत्रुला रोखून धरायचे काम त्यांना बजावावे लागणार होते. तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकड़े सरकायला मिळणार होता. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरले. त्यात त्या सगळ्या २५ जणांना मृत्यू आला. पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते. पांढरपाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती. राजे घोडखिंडीकड़े जाउन पोचले होते.
आज आम्ही पावनखिंडित जाणार नव्हतो. आम्ही आमचे सामान लावले. मस्त पैकी जेवलो. ह्या जागेचे वातावरण एकदम भारावलेले होते. आम्हाला कधी एकदा खिंडीमध्ये जातोय असे झाले होते. रात्रीच तिकडे जावे असाही मनात विचार येत होता. साधना आणि अनुजा गुडुप झाल्या होत्या पण मला आणि उमेशला काही झोप येत नव्हती, म्हणून मग आम्ही बाहेर येउन पहाटे १ पर्यंत गप्पा मारत बसलो. हर्षद, मंदार आणि प्रमोद सुद्धा येउन बसले. पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र लख्ख चंद्रप्रकाश पसरला होता. ह्याच ठिकाणी ३४८ वर्षांपूर्वी इतिहास घडला होता. आम्ही सगळे जण सकाळची वाट बघत होतो. उदया सकाळी अखेर आम्ही त्या पावनखिंडित पाउल ठेवणार होतो आणि पाहणार होतो बाजीप्रभुंच्या रक्ताने पावन बनलेली गजापुरची घोडखिंड ...


क्रमशः ...

भाग १ - पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड ... !

१९ जुलै २००८ ला म्हणजेच गेल्या वर्षी गुरूपौर्णिमेला मी, साधना, अनुजा, प्रमोद, हर्षद, मंदार आणि उमेश असे ७ जण 'पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड' मोहीमेवर गेलो होतो. मुंबई मधील 'भरारी' ही संस्था दरवर्षी गुरूपौर्णिमेला हि मोहिम आयोजित करते. गुरूपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिवरायांनी पन्हाळ्यावरुन अद्भुतरित्या स्वतःची सुटका करून घेतली होती. तर गुरूपौर्णिमेच्या दिवशी घोड़खिंड बाजीप्रभुंच्या रक्ताने पावनखिंड बनली. अवघ्या २१ तासात ६४ किलोमीटर अंतर त्यांनी पार पाडले होते. आम्ही हे अंतर पार करायला ३ दिवस घेणार होतो. ह्या मोहिमेत प्रत्येक ठिकाणी थांबत-थांबत आप्पा परब यांच्यासारख्या अनुभवी व जाणकार इतिहासतज्ञांसोबत त्या जागेचा शिवस्पर्श आम्ही ३ दिवस अनुभवणार होतो.
जूनच्या महिन्यात एक दिवस मी आणि साधना बोलत होतो. साधना 'IBN - लोकमत' मध्ये रिपोर्टर आहे. तर उमेश कैमरामैन. साधनाला एखादया 'ट्रेक रूट' वर डॉक्युमेंटरी बनवायची होती. माझ्या डोक्यात त्याच वेळेला पावनखिंडित जायचे सुरु होते. मी म्हटल का नाही त्यावरच डॉक्युमेंटरी बनवावी. साधनाला सुद्धा कल्पना आवडली. नुसता ट्रेक रूट नाही तर एक जाज्वल्य इतिहास आता पुन्हा उभा करायचा होता. तिने आवश्यक हालचाल सुरु केली आणि भरारी ट्रेकर्सना जाउन भेटली. ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावी म्हणून अगदी आप्पांना सुद्धा जाउन भेटली. सगळी तयारी झाली. अखेर तो दिवस आला. आम्ही सगळे मुंबईहून पन्हाळ्याला पोचलो.पन्हाळगड़ .......... काय वर्णावे ... दिंडी दरवाजे .. महाकाय प्रवेशद्वारे .. अवाढव्य तोफा .. इथल्या मातीच्या कणाकणात शौर्याच्या इतिहासाची गाथा. शुरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड़. रयतेच्या राजासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या नरविरांचा गड़. आमची मोहिम पन्हाळ्यावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून सुरू झाली. दोन हातात दोन समशेरी घेतलेल्या ह्या पुतळ्याकडे बघून अभिमानाने उर भरून येतो. तेथून आम्ही निघालो ते राजदिंडीमार्गे म्हसाईँ पठाराच्या दिशेने पन्हाळा उतरु लागलो. ज्यावाटेने राजांची पावले धावली, ज्यावाटेने त्यांची पालखी गेली त्या मार्गावरुनच आम्ही जात होतो. आम्ही एकुण १४० जण ह्या मोहिमेवर निघालो होतो. असंख्य प्रश्न मनात होते आणि आप्पा त्या सर्वांची उत्तरे देत होते. आम्हाला भुतकाळात घेउन जात होते.

१० नोवेंबर १६५९ रोजी अफझलखानाचा वध करून शिवरायांनी कोल्हापुर पर्यंत धडक मारली आणि २८ नोवेंबर रोजी पन्हाळा काबीज केला. आदिलशाही हादरली. आदिलशाहाने रुस्तम-इ-झमान च्या हाताखाली ताज्या दमाची फौज पाठवली. त्याच्यासोबत अफझलखानाचा मुलगा फाझल खान आणि इतर सरदार होते. ह्या लढाईमध्ये आदिलशाहीचा पुन्हा धूव्वा उडाला. मराठ्यांनी अथणी-बेळगाव पर्यंत धाडी घालून पुढे मीरझेच्या किल्ल्याला वेढा घातला. आता मात्र आदिलशाहीने सिद्दी जोहरला १५०००-२०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ देऊन शिवरायांच्या मागावर पाठवले. आपल्या लढण्याच्या पध्द्ती प्रमाणे महाराज स्वराज्याच्या सीमेवर म्हणजेच पन्हाळ्यावर येउन थांबले. सिद्दी जोहरने मार्च मध्ये पन्हाळ्याला वेढा घातला. जो ६ महीने सुरु होता. शिवराय आत अडकून पडले होते. तिकडे शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात येउन बसला होता. स्वराज्य दुहेरी संकटात होते. अखेर राजांनी वेढ्यातून निसटायचा निर्णय घेतला. हिरडस मावळातल्या बांदलांचा जमाव ह्यासाठी राजांनी निवडला. गरज पडल्यास निकराची झुंज देउ शकतील असे ६०० जण निवडले गेले. शिवाय पालखीसाठी भोई सुद्धा खासे निवडले गेले. दूसरीकड़े सिद्दी जोहरला शरणागतीचा खलिता पाठवून आम्ही तह करायला गडाखाली येत आहोत असे राजांनी भासवले. २ पालख्या तयार झाल्या. एकात राजे बसले तर एका पालखीमध्ये राजांसारखा हुबेहुब दिसणारा शिवा काशिद बसला. आता राजांची पालखी राजदिंडीमार्गे म्हसाईं पठाराच्या दिशेने तर शिवा काशिदची पालखी मलकापूरच्या दिशेने पळवली गेली.पौर्णिमेची रात्र. चंद्रप्रकाश असूनसुद्धा पावसाळी ढगांमुळे फारसे काही दिसत नव्हते. प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरुन निसटले. सिद्दीजोहरला त्याचा पत्ता लागला. पालखी पकडली गेली. 'शिवाजी आपल्या ताब्यात आला आहे' अश्या खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला. त्याला कळून चुकले की हे राजे नसून शिवा काशिद नावाचा दुसराच कोणी तरी आहे. राजे आपल्या हातून निसटले आहेत. त्याने सिद्दी मसूद आणि फाझल खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरु झाला ... शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. 'चला गनीम पाठीवर आहे.' दर काही मिनिटांना पालखीचे भोई बदलत, वारा - पावसाची तमा न बाळगता, काटेरी रान आणि दगड - चिखल - माती तुडवत ते ६०० वीर विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उदिष्ट एकच होत - विशाळगड़. हातात नंग्या तलवारी घेउन बाजी - फुलाजी पालखीच्या बाजूने धावत होते. मागचे आणि पुढचे हेर बित्तंबातमी राजांकड़े पोचवत होते. प्रचंड वेगाने पालखी घोड़खिंडीकड़े पळवली जात होती. क्षण अन क्षण आता महत्त्वाचा होता.शिवराय पन्हाळ्यावरुन निघाले तेंव्हा रात्रीचे १० वाजले होते. आम्ही मात्र सकाळच्या उजेडात म्हसाईं पठाराच्या दिशेने निघालो होतो. पहिल्या दिवशी आमचा टप्पा होता पन्हाळगड़ - म्हसाईं पठार ते करपेवाडी. एकुण अंतर २८ किलोमीटर. सपाट रस्ता असल्याने इतका काही जाणवल नाही. शिवाय जुलै महिना असल्याने पठारावर सर्वत्र लूसलूशित गवत आणि पावसाळी वातावरण होते. उमेश आणि साधना पाउस पडू नये म्हणून प्रार्थना करत होते, नाहीतर उमेशला कैमरा आत ठेवावा लागणार होता. तस मंदार उमेश बरोबर छत्री घेउन सोबत होताच. प्रमोद कधी साधना बरोबर तर कधी उमेश बरोबर कैमराटेप्स आणि ब्याटरिस घेउन पळापळ करत होता. मी आणि अनुजा मात्र हे सगळ निवांतपणे बघत होतो आणि माझ्या कैमरा मध्ये पकडत होतो. मध्येच जोराचा वारा असा सुटायचा की उडून जाऊ की काय असे वाटायचे. साधना आणि उमेशची जास्तीत जास्त आणि परफेक्ट फ्रेम्स घ्यायची कवायत सुरु होती. एक तर स्क्रिप्ट तयार नव्हती. आम्ही सगळे डायलोंग तिथल्यातिथे बनवून तयार करत होतो. त्यामुळे साधना एका टेक साठी सारखे रिटेक्स घेत होती. त्यात मंदार तिला खुपच ऐतिहासिक भाषेत जड़ वाक्य सांगत होता; तर मी आणि हर्षद ती सोपी करायचा पर्यंत करत होतो. सवय नसल्याने ती चूकायची आणि उमेश तिला अजून एकदा टेक .. अजून एकदा टेक .. अस सारख सांगायचा. हे सगळे टेक सुरु असताना अखेर आम्ही जामिनीवर टेका - टेकी करायचो. हा.. हा.. आणि खायला सुरु करायचो. कारण परफेक्ट टेक दिल्याशिवाय साधना काही अखेर पर्यंत हटायची नाही. पण त्यामुळे आम्हाला पुढे जायला मात्र उशीर व्हायचा. शेवटी भरारीचे २ जण आमच्या सोबत मागे थांबले. आम्ही कुठे रास्ता चुकू नये म्हणुन. खर तर आम्हाला लवकरात लवकर पुढे आणन्यासाठी त्यांना नेमल गेल होत. पण कसल काय .. आम्हीच त्यांना मागे थांबवले. ते पण हे सगळ एन्जॉय करत होते. साधना आणि उमेश ह्या सगळया गडबडीत बऱ्याच वेळा मागे रहायचे पण मग फटाफट पुढे पळायचे. उमेशने तर कमालच केली. पाठीवर स्वतःची बैग, पुढे कैमरा बैग आणि हातात कैमरा घेउन हा पठया सर्वात पुढे पळायचा आणि मग ट्रेकर्सचे व आजू बाजूचे शॉट्स घेत मागे मागे यायचा. हे सगळा करताना धाप लागली तरी त्याची कैमराफ्रेम काही हलायची नाही.


म्हसाईं पठार हे ७ पठारांची मालिका आहे. त्यातल्या सहाव्या पठारावर म्हसाईं आईचे मंदिर आहे. आम्ही ९ किलोमीटर अंतर पार करुन मंदिरापाशी पोचलो. आम्हाला पोचायला बराच उशीर झाला होता. म्हसाईं आईचे दर्शन घेतले. थोडी पेटपूजा आटोपली आणि थोड पुढे जाउन ६व्या पठारावरुन खाली उतरायला सूरवात केली. पठार उतरून खाली आलो. तिकडे एक मस्त विहिर लागली. त्याठिकाणी निवांतपणे आमचा लेट लंच उरकला. अंधार पड़ायच्या आत आम्हाला करपेवाडीला पोचायचे होते. मध्ये रस्त्यात खोतवाड़ी लागली. गावाच्या बाहेर शेतीची बारीक-सारिक कामे सुरु होती. अजून पाउस पडला नसल्याने पेरणीची कामे खोळंबली होती. गावामधली शाळा नुकतीच सुटली होती. ती लहान मुले आम्हाला बघून आश्चर्य चकित होत होती. आधी थोड बुजलेल्या मुलांनी नंतर मात्र आम्हाला घोळका घातला. त्यातल्या काही मुलांनी आम्हाला 'पंख मला जर असते तर' ही कविता म्हणून दाखवली. ती ऐकून आम्हाला असे वाटले की इतक्या कठिण परिस्थितीमध्ये राहून सुद्धा लहान लहान गोष्टिंचा आनंद ती कशी बरोबर घेत असतात. आपण खरच त्यांना पंख देऊ शकतो का ??? अस प्रश्न सुद्धा आम्हाला पडला नसता तर नवल. तिकडे काही वेळ आम्ही थांबलो. ग्रामजीवनाचे फोटो काढले. उमेश आणि साधना ला तर मस्तच शॉट्स मिळाले. ते दोघे डॉक्युमेंटरी बनवत होते तर मी 'मेकिंग ऑफ़ डॉक्युमेंटरी' बनवत होतो. अर्थात मी त्या दोघांचे शूटिंग करत होतो आणि फोटो काढत होतो. अखेर संध्याकाळी ६ च्या आसपास आम्ही आमच्या पहिल्या दिवसाच्या मुक्कामाला म्हणजेच करपेवाडीला येउन पोचलो. चालून जाम दमलो होतो. साधनाने हातात जरीपटक्याचा झेंडा घेतला आणि दिवसाचा क्लोसिंग शोंट दिला. त्यानंतर आम्हाला कळले की ती करपेवाडी नव्हतीच. करपेवाडी अजून १ तास पुढे होती. मग आम्ही पुन्हा आपले चालायला सुरवात केली. आता पूर्ण अंधार पडला होता. भरारीचे काहीजण आम्हाला शोधत मागे आले होते. अखेर करपेवाडीला पोचलो. बाकी सगळे कधीच पोचून सामान लावन निवांत बसले होते. आम्ही सुद्धा गावातल्या एका घरात सामान टाकले आणि मस्त गप्पा टाकत बसलो. आप्पांसोबत काही वेळ संवाद साधला. रात्री ८ च्या सुमारास जेवलो आणि घराबाहेर परत गप्पा मारत बसलो. थोडयावेळाने दुसऱ्या दिवशीच्या ट्रेकबद्दल विचार करत झोपी गेलो .. आम्ही आता पावनखिंड कधी बघतोय असे झाले होते ...क्रमशः ...