Wednesday 29 April 2009

भाग ३ - दुर्गराज रायगड ... प्रदक्षिणा ... !

आम्ही सगळे पहाटे पहाटे उठलो आणि निघायच्या तयारीला लागलो. ऊन चढायच्या आत जास्तीत जास्त अंतर पार करायचे असा प्लान होता त्यामुळे लवकर निघालो. श्वेताची तब्येत थोडी ख़राब होती त्यामुळे हर्षद आणि ती पाचाडलाच थांबले. सकाळी देशमुखांकड़े नाश्ता उरकला आणि थोड़े दुपारसाठी खायचे बांधून घेतले. पुन्हा चित्तदरवाजापाशी जमलो आणि शिवछत्रपतींच्या जयजयकाराने प्रदक्षिणेला सुरवात केली. चित्तदरवाजापासून रायगडवाडीकड़े जाणाऱ्या डांबरी रस्त्याला लागलो. रायगड प्रदक्षिणेला एकुण ८ तास लागतात. काही जण मात्र अगदी ६ तासात सुद्धा सहज पूर्ण करतात. प्रदक्षिणेचे एकुण अंतर १६ किलोमीटर इतके आहे. एका वळणानंतर झाडीमध्ये शिरणारी वाट दिसते. तिकडे आत शिरलो आणि त्या मळलेल्या वाटेवरुन चालू लागलो. उजवीकड़े वरच्या बाजूला टकमकटोक दिसत होते. खालच्या बाजूने त्याची उंची अधिकच जाणवत होती. काही वेळानी झाडीचा मार्ग संपला आणि शेतांमधून मार्ग क्रमत आम्ही रायनाक स्मारकापाशी पोचलो. किरणने रायनाक स्मारकाबद्दल छोटीशी माहिती सांगीतली आणि तिकडे काही वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. ऊन अंगावर यायच्या आधी आम्हाला खिंडी खालच्या जंगलात घुसायचे होते. मध्येच विविध प्रकारची झाडे आणि त्यावरील पक्षी लक्ष्य वेधून घेत होते. थोड्याथोड्या वेळानी आमच्यामध्ये इतिहासावर चर्चा सुरूच होत्या. रायगडाचा सुरक्षा घेरा असो नाहीतर १६८९ चा रायगडाचा वेढा असो. इतिहासात रायगडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रायगड आधी बरेचवेळा केलेला असला तरी प्रदक्षिणा मी पहिल्यांदाच करत होतो. त्यामुळे बाहेरील बाजूने रायगड चांगला न्याहाळता येत होता. जमेल तसे आणि जमेल तितके फोटो सुद्धा घेत होतो. पण मुळात प्रदक्षिणा का करावी किंवा कोणी व कशासाठी सुरु केली हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. रायगडाचे आधीचे नाव रायरी. हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. (सन १६५६) २ महिन्यांनंतर अखेर मोरेला मारून राजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पहिल्यांदा ते गडावर आले आणि राजधानीसाठी रायरीची निवड पक्की केली. त्याचे रायगड असे नामकरण केले. त्यावेळी राजांनी म्हटले आहे की, 'गड गाव-दिडगाव उंच असून गडाचा दगड ताशीव आहे. इतका पाउस पडून सुद्धा एक काडी गवत उगवत नाही.' राजांनी स्वतः चारही बाजूने फिरून हा किल्ला पहिला असावा अश्या कल्पनेमधून स्वातंत्राची मंदिरे असलेल्या ह्या किल्ल्यांच्या प्रदक्षिणेची कल्पना पुढे आली असावी. आता रायगड, राजगड आणि अशा अनेक गडांना दुर्गप्रेमी प्रदक्षिणा मारत असतात.












इतिहासावर चर्चा करत करत आम्ही बरेच पुढे पोचलो होतो. इकडे मध्ये धनगरपाडा लागतो. खालच्या बाजूला छोटी गावे दिसत होती. या ठिकाणी थोडावेळ विश्रांती घेतली. उजव्या बाजूला टकमकटोक आता मागे पडले होते आणि डाव्या बाजूला आता कावळ्या-बावळ्याची खिंड दिसु लागली होती. रायगडाच्या घेऱ्यामधले हे उत्तरेकडचे २ किल्ले. ते पार केल्याशिवाय रायगडाजवळ येता येत नाही. १६८९ मध्ये त्याबाजूने येणाऱ्या शत्रुसैन्याला अवघ्या १० मावळ्यांनी ह्या खिंडीमध्ये झुंज दिली होती. अर्थात ते १० ही वीर वीरगतीस प्राप्त झाले. त्या अज्ञात विरांच्या समाध्या खालच्या गावामध्ये आजही पहायला मिळतात. त्या अज्ञात विरांना मनातल्या मनात मुजरा करत आम्ही वाघोली खिंडीकड़े निघालो. आता उजवीकड़े वरती भवानी कडा दिसू लागला होता. अजिंक्य देवचा 'सर्जा' नावाचा मराठी चित्रपट लक्ष्यात आहे का? त्यात तो भवानी कडा चढून जातो आणि राजांनी लावलेलं बक्षिस जिंकतो. राजे त्याचा मान करून सरदार बनवतात. ती कथा काल्पनिक असली तरी भवानीकडा पाहताना अंगावर शहारा येतोच. जितका सूंदर तितकाच नैसर्गिक दृष्टया भक्कम सुद्धा. तो पाहता-पाहताच डावीकड़े नजर वळवाल तर तुम्हाला दिसेल अजून एक सुंदर दृश्य. दुरवर दिसतो रायगडाचा पूर्वेकडच्या घेऱ्यामधला किल्ले लिंगाणा. त्यामागे दिसते ते आहे रायलिंगाचे पठार. ह्याच बाजूला मागे राजगड आणि तोरणा हे किल्ले आहेत. येथून बोराटयाच्या नाळेमधून कोकणात उतरायला वाट आहे. मात्र हा मार्ग कठिण आहे. अधिक सोपा मार्ग हवा असेल तर शिंगापुरची नाळ सुद्धा घेता येते. येथून खाली उतरून पाने गावामार्गे रायगडाकड़े येता येते. मागच्या वेळी आम्ही याच रस्त्याने रायगडावर आलो होतो.














आता आम्ही सगळे वाघोली खिंड चढू लागलो होतो. जवळचे पाणी संपत चालले होते आणि ऊन अंगावर येऊ लागले होते. रस्त्यामध्ये कुठेच पाणी नसल्याने पूर्ण १६ किलोमीटरसाठी पाणी सुरवातीपासून घेउनच निघावे लागते. पाण्याअभावी कोणाची तब्येत ढासळली तर गडबड होऊ नये म्हणुन खबरदारी घेतलेली बरी. अगदीच पाणी संपले तर मागे वळून धनगरपाडयाला जाता येईल. आम्ही मात्र हळू-हळू पुढे खिंडीकड़े सरकत होतो. ऊन डोक्यावर तळपत होते. मात्र झाडी मुळे आम्ही वाचत होतो. सुट्या मातीमुळे घसारा झाला होता त्यामुळे आम्ही कधी झाडाला तर कधी जमीनीमधून वर आलेली मुळे पकडून वर सरकत होतो. मध्येच कोणी घसरला की त्याला हात द्यायचा आणि मग परत पुढे सरकायचे असे चालू होते. अखेर आम्ही सगळेजण खिंडीमध्ये पोचलो. आता पुढचा मार्ग बऱ्यापैकी सुकर होता. उतार असल्याने वजन सांभाळत उतरलो. आम्हाला पुढे जाउन अजून जेवायचे होते पण सोबतचे पाणी जास्तीत जास्त वेळ टिकावे म्हणून आम्ही उशिराने जेवणार होतो. वाघोली खिंड उतरून खाली आलो तसा समोर पोटल्याचा डोंगर दिसू लागला. थोड्याच वेळात पाचाडहून वाघोली गावाकड़े जाणारा रस्ता लागला. थोडावेळ त्यावरुन चाललो. आता उजव्या बाजूला अगदी बारिकसा वाघदरवाजा दिसू लागला. जाड्याने सोबत दुर्बिण आणली होती त्यामुळे तो नीट पाहता आला. अर्थात अजून पुढे आल्यावर तो अजून मोठा दिसू लागला होता. प्रदक्षिणा संपत आली होती. जसे जसे अजून पुढे येऊ लागलो तसे रोपवे दिसू लागला. त्यापुढे हिरकणी बूरुज दिसत होता. अखेर चालत-चालत डांबरी रस्त्याला लागलो. या ठिकाणी रायगडाची प्रदक्षिणा संपते. एक अत्यंत आनंददायी आणि पवित्र अनुभूतिने भरलेला प्रवास संपवून आम्ही पाचाडकड़े निघालो.














हर्षद आणि श्वेता आमची वाट बघत होते. काल पहाटे-पहाटे पाचाडला पोचलो तेंव्हा गावाबाहेरचा कोट पाहता आला नव्हता. किरण आणि बाकीच्यांनी आमचा निरोप घेतला आणि आम्ही बाकी सगळे कोट बघायला निघालो. ह्याठिकाणी मासाहेबांचे २ वर्षे वास्तव्य होते. रायगडावरील हवा मानवत नाही म्हणुन राजांनी खास त्यांच्यासाठी याठिकाणी कोट बांधला होता. हा नुसता वाडा नसुन भुईकोट किल्ला आहे. त्याला २ बुरुजी दरवाजा आहे. आम्ही सगळे हा कोट पाहण्यासाठी पोचलो. चौकोनी आकाराच्या ह्या भुईकोट किल्ल्याला चारही बाजूला चांगले १ मजली बुरुज आहेत. प्रवेश केल्या-केल्या डाव्या उजव्या बाजूला देवडया आहेत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला जायला प्रस्तर मार्गिका आहे. समोरचा चौथरा बहुदा मुख्य सुरक्षाचौकी असावी. डाव्या बाजूला राहत्या घरांची बरीच पडकी जोते आहेत. उजव्या बाजूला गेलो की एक एकमेव भिंत उभी आहे. हि मासाहेब जिजामातांच्या राहत्या दालनाची आहे. किल्ल्यामध्ये २ विहिरी असून एक छोटा खोदीव तलावसुद्धा आहे. मागच्या बाजूला काही मोठे कोनाडे आहेत पण त्यांचे प्रयोजन कळले नाही. आम्ही तासभर हा किल्ला पाहिला आणि काही फोटो घेतले. ह्या ठिकाणाहून रायगडाचे सुंदर दर्शन घडते. बाहेर रस्त्याच्या बाजूला काही दगडी शिल्प आहेत. आता सूर्यास्त होत आला होता. आम्हास आता परतायला हवे होते. इच्छा तर नव्हती पण पण निघावे तर लागणारच होते. मावळत्या सूर्याबरोबर रायगडाला पुन्हा एक मुजरा केला आणि आज्ञा घेउन आम्ही परतीच्या मार्गावर निघालो...

भाग २ - दुर्गराज रायगड ... !











मजल-दरमजल करत आम्ही सगळे होळीच्या माळावर पोचलो. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर
तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे. आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??? मनातल्या मनात राजांची क्षमा मागत मुजरा केला आणि मागे वळून चालू लागलो. होळीच्या माळावर उजव्या बाजूला गडाची देवता शिर्काईचे मंदिर आहे. देवीची मूर्ती दशभुजा असून आजही दरवर्षी गडावर देवीचा उत्सव भरतो. अंबारखाना म्हणुन ओळखली जाणारी वास्तु आज पूरातत्वखात्याचे कार्यालय म्हणुन बंद केली गेली आहे.

















पुतळ्या समोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४७ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ' असे म्हटले गेले आहे. त्यात आहेत एकुण ४७ दुकाने. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे. डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र शेषनागाचे दगडी शिल्प आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे. आम्ही मात्र पहिल्याच घरात विसावलो होतो. माहीत नाही ते कोणाचे होते पण सध्या आम्ही कब्जा केला होता. निवांत बसलो आणि नाश्ता उरकला. पहाटेच वर चढून आल्यामुळे नाश्ता करता आला नव्हता. काही वेळाने निघालो आणि नगरपेठ पार करून पुढे गेलो. आता डाव्या बाजूला लागतो गडाचा कडेलोट उर्फ़ टकमक बघायला लावणारा ८०० फुट टकमक कडा. तिकडे जाताना आधी गडावरील 2 दारूकोठारे लागतात. उद्वस्त छप्पर आणि आत माजलेले झाडीचे रान अशी सध्या त्यांची अवस्था आहे. पुढे जाउन थोडसं उतरलं की टकमककड़े जाता येते. सांभाळून जावे आणि कडयावरुन विहंगम दृष्य पाहून परत यावे. आता टकमक वरुन ८०० फुट रॅपेलिंग सुद्धा करता येते. पण आम्ही काही ते आता करणार नव्हतो त्यामुळे पुन्हा मागे येउन नगरपेठेच्या उजव्या बाजूला चालू लागलो. समोर दिसत होता श्री जगादिश्वर मंदिराचा कळस. उजव्या बाजूला खाली दूरवर १२ टाकी आणि वाघ दरवाजाकड़े जायचा मार्ग आहे. वेळ कमी असल्या कारणाने तिकडे जाता येणार नव्हते. पण उदया प्रदक्षिणेमध्ये मात्र वाघदरवाजा खालून दिसणार होता.






श्री जगादिश्वर मंदिराच्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो. या ठिकाणी आहे 'श्री शिवछत्रपतींची समाधी'. मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे?'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.'' ही अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे. १९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले. राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी. त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली. समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो. समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात. बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज (अंदाजे २०००) राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि समाधीवरुन पुन्हा नगरपेठेवरुन होळीच्या माळावर पोचलो.




देशास्तव रायगडी ठेवी देहाला ... देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ... ! बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ... !














आम्ही आता जाणार होतो राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी. पण त्याआधी डावीकडे खालच्या बाजूला उतरुन कृशावर्त तलावाकडे गेलो. त्याच्या डाव्या बाजूला बरीच पडकी घरे आहेत. दररोज राजदरबार किंवा आसपास ज्यांचे काम असायचे त्यांची घरे ह्या भागात असावीत. अशीच घरे गडाच्या खालच्या दक्षिण भागात सुद्धा आहेत. ते पाहून आम्ही पुन्हा वरती आलो आणि राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून पूर्वी ह्यावरती सुद्धा जाता येत असे. आता मात्र ते बंद केले आहे. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. ह्यातून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक. हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'. राजदरबारामधून प्रवेश करते झालो की एक दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे श्री जगदिश्वराचे मंदिर जे वास्तुशात्राला अनुसरून आहे. राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे. मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान. उजव्या बाजुस आहे देवघर आणि त्या पुढे आहे स्वयंपाकघर. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा खलबतखाना किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ अष्टकोनी स्तंभ. आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे गंगासागर तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे पालखीचा दरवाजा आणि डावीकड़े आहे मेणा दरवाजा. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा' असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. आम्ही पुन्हा मागे येउन स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरुन गंगासागर तलावाकडे गेलो आणि तिकडून पुन्हा पालखीचा दरवाजा चढून वर आलो. मार्गिका पार कडून मेणा दरवाजा उतरून पलीकडच्या बाजूला आलो. ह्या ठिकाणी आता महाराष्ट्र पर्यटनाची निवासस्थाने झाली आहेत. शिवाय त्यांचे कैंटीन सुद्धा आहे. आम्ही तिकडेच जेवणाची ऑर्डर दिली आणि आराम करत बसलो. फिरून सगळेच दमले होते पण तेवढ्या वेळात मी पुन्हा राजवाद्यात जाउन काही फोटो काढून आलो. बराच उशीर झाला होता. आता जेवून खाली सरकणे होते. जाताना मात्र आम्ही रायगड रोपवेने खाली जायचे ठरवले. संध्याकाळ झाली की उदयाच्या प्रदक्षिणेसाठी बाकी मंडळी पाचाडला जमणार होती. रोपवेने खाली उतरून आलो आणि पुन्हा पाचाडला परतलो. दिवसभराच्या भटकंतीनंतर दमलो होतो मात्र रायगड पहिल्याने सगळेच आनंदी होते. मला जमेल तशी आणि जमेल तितकी माहिती सुद्धा मी त्यांना दिली होतीच. पाचाडला पोचलो आणि देशमुखांकडे जेवणाची ऑर्डर दिली. तिकडेच एक खोली घेतली आणि बाकीच्यांची वाट बघत बसलो. संध्याकाळी उशिराने हळू-हळू सगळे आले आणि उद्याचा नेमका प्लान आम्ही ठरवला. सकाळी लवकर निघायचे होते त्यामुळे आम्ही जेवल्यानंतर निवांतपणे झोपी गेलो. आता प्रतीक्षा होती उद्याच्या रायगड प्रदक्षिणेची ...





क्रमश: ...

Sunday 26 April 2009

भाग १ - दुर्गराज रायगड ... !


किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ... त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले रायगड ...




मी रायगडावर किती वेळा गेलो आहे आठवत नाही. देवळामध्ये आपण किती वेळा जातो हे थोडीच मोजतो नाही का. पण रायगड प्रदक्षिणा मात्र मी आजपर्यंत एकदाच केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मला माझा मित्र किरण शेलारचा निरोप आला की आम्ही काहीजण रायगड प्रदक्षिणा करणार आहोत. मग मी, शमिका, अमोल, दीपाली, हर्षद, श्वेता, हर्षद(जाड्या) आणि मंदार असे ८ जण पाचाडला पोचलो. आम्ही १ दिवस आधीच निघालो कारण आमच्यापैकी काही जणांनी रायगड ह्याआधी पाहिला नव्हता. शनिवारी दिवसभर रायगड पाहुन रविवारच्या प्रदक्षिणेसाठी खाली पाचाडला येउन राहायचे असे ठरले आणि आम्ही शुक्रवारी रात्री उशिराने मुंबईवरुन निघालो. किरण आणि बाकी सगळे शनिवारी संध्याकाळी पाचाडमध्ये जमणार होते. रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे ५ च्या आसपास पाचाडला पोचलो. इतक्या लवकर पाचाडचा कोट पाहणे शक्य नव्हते त्यामुळे थेट मासाहेब जिजामातांच्या समाधीपाशी पोचलो. उजाड़ता-उजाड़ता दर्शन घेतले आणि रायगडाच्या चित्त दरवाजाकड़े निघालो. पूर्व क्षितिजावर लालसर कडा दिसू लागली तसे टकमक टोक दिसू लागले. ते पहातच चित्तदरवाजा पासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली. रायगडा संबंधित खूप इतिहास जडलेला आहे पण तो सर्व इकडे मांडणे शक्य नाही. मात्र रायगड चढ़ताना भौगोलिक आणि लष्करीदृष्टया त्याचे स्थान लक्ष्यात येते. चित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो खूबलढा बुरुज. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळा पर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात. त्या २ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे."


कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक' अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला महादरवाजा असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच. हूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही.



हे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरशहा: दम निघतो. महत् प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन महादरवाजाचे सुंदर दृश्य दिसते. सर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो हत्ती तलाव आणि त्या मागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते. गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ. ते पाहत पायर्‍यांच्या शेवटाला गेले की लागतो होळीचा माळ आणि त्यावर असलेला छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा.




क्रमशः ...

Thursday 9 April 2009

भाग २ - ढाक-भैरी ते राजमाची ... !

आता लक्ष्य होते कुंढेश्वर. ४ पर्यंत तरी तिकडे पोचणे अपेक्षित होते. तरच कुठे अंधार होईपर्यंत आम्ही राजमाचीला पोचणार होतो. मजल-दरमजल करीत निघालो. वाटेमध्ये सगळीकड़े ओहोळ लागत होते. मध्येच अडसं-दडसं ते ओलांडत आम्ही पुढे जात होतो. आमचा वेग चांगलाच वाढला होता. आता दूरवर कुंढेश्वर देऊळ दिसू लागले होते. एक क्षण मागे वळून ढाककड़े पाहिले तर काय ... जंगलामध्ये लपून बसलेल्या गेंड्यासारखा आकार घेउन तो आमच्याकडेच पाहत होता. ढाक किल्ल्याचा माथा म्हणजे गेंड्याचे डोके तर कळकराय सुळका म्हणजे त्याचे शिंग असा तो स्पष्ट दिसत होता. डोंगराचा तो आकार आम्ही कॅमेरामध्ये टिपला आणि देवळाकडे निघालो. देवळापासून पुढे वाट चुकलो की काय माहीत नाही पण ठळक वाट काही भेटत नव्हती. मध्येच वाट पूर्णपणे चुकलो. पुन्हा मागे आलो आणि वाट शोधायला लागलो. उजव्या हाताला मांजरझुम्याचा डोंगर होता. त्या पलिकडे राजमाचीचे जोड़किल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन दिसत होते. म्हणजे आता डाव्याबाजूला दुरवर वळवंड धरण दिसायला हवे होते. पण अजून सुद्धा काही ते दिसत नव्हते. आता निश्चितपणे राजमाचीच्या पायथ्याला असलेल्या उधेवाडीला जाईपर्यंत मिट्ट अंधार पडणार होता. आता एक स्पष्ट वाट मिळाली पण त्यावर पुढे सरकायचे की राहायला वळवंड गावाकडे जायचे अस प्रश्न मनात होता. कारण ५:३० होत आले होते. आम्ही अखेर पुढे सरकायचे ठरवले. थोडा पुढे जाउन एक चढ दिसला. तो चढून वर गेलो की वाट सापडेल असे वाटत होते. ह्या ठिकाणी आम्हाला कधी नाही इतका सोसाट्याचा वारा अंगावर घ्यावा लागला. इतका की अभिजित आणि आशिष आता हवेत उडतील की काय असे वाटत होते. वारा सारखा मागे ढकलत होता आणि त्या चढावर पुढे सरकणे अशक्य झाले होते. अवघ्या ५-७ मिं. मध्ये आमची पुरती दमछाक झाली होती. कसाबसा तो टप्पा पार करून आम्ही वर चढून गेलो आणि काय... मुळ लालमातीची वाट आमचीच वाट बघत उभी होती की तिकडे...








मळलेली पायवाट आता आम्हाला राजमाची पर्यंत घेउन जाणार होती. त्या वाटेवर भर-भर चालत होतो. पूर्ण अंधार पडायच्या आधी किमान खंडाळ्याहून राजमाचीला जाणाऱ्या रस्त्याला लागणे आवश्यक होते. एकदा का तिकडे पोचलो की पुढचा रस्ता अंधारामध्ये सुद्धा पार करता येणार होता. मध्येच एक पाडा लागला. तिथल्या एका पोराला 'कुठला शॉर्टकट आहे का' असे विचारले. त्याने आम्हाला एक मस्त शॉर्टकट दाखवला. त्या वाटेने आम्ही राजमाचीच्या मुळ रस्त्याला लागलो. आमचा किमान अर्धा तास तरी वाचला होता. आता पूर्ण अंधार पडला होता आणि आमची वाटचाल अजून राजमाचीकड़े सुरूच होती. साधारण ७ च्या सुमारास आम्ही राजमाचीच्या तुटक्या तटबंदी मधून प्रवेश करते झालो. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि सामसूम. अखेर उधेवाडी आली. आशिषच्या ओळखीच्या एका घरामध्ये मुक्काम टाकला. पथारी पसरली, निवांतपणे पहुडलो आणि गप्पा मारत बसलो. दिवसभरात चालून इतकं दमलो होतो की जेवल्यानंतर लगेच गुडुप झालो. दसऱ्या दिवशी सकाळी उठलो तो पर्यंत अख्खी उधेवाडी माणसांनी भरून गेली होती. एक तर रविवार त्यात पावसाळा. राजमाची हा सगळ्या ट्रेकर्सचा एकदम फेवरेट स्पॉट. सगळ आवरून गड़ बघायला निघालो. आज पाउस तितका पडत नव्हता त्यामुळे निश्चिंती होती. राजमाची हा प्रचंड किल्ला आहे. किल्ल्यात आहेत २ बालेकिल्ले. श्रीवर्धन आणि मनोरंजन. त्यामध्ये वसली आहे उधेवाड़ी आणि थोडं वर आहे काळभैरव मंदिर. मंदिराचे पटांगण प्रशस्त्र आहे आणि जवळच आहे पिण्याच्या पाण्याचे टाकं. मंदिरासमोर आहे श्रीवर्धन आणि मागच्या बाजूला आहे मनोरंजन किल्ला. येथुनच थोड्या अंतरावर आहे गडावरील शंभू महादेवाचे मंदिर. मंदिरासमोर पाण्याचा प्रशत्र तलाव आहे. वर्षभर गडाला पुरेल इतके पाणी ह्यात साठवता येईल इतका मोठा. आजूबाजूला परिसर सुद्धा सुंदर आहे. हे मंदिर सुद्धा खूप रेखीव असून हल्लीच जमिनीमध्ये दबलेला ह्याचा खालचा अर्धा भाग खोदून मोकळा केला गेला आहे.







आता आम्ही श्रीवर्धन गडाकड़े निघालो. काही वेळातच उजव्याबाजूला गडाचा दरवाजा लागतो. तिकडून थोडेसे पुढे गडावरील गणेशगुहा आहे. अजून पुढे सरकलो की आपण किल्ल्याच्या वरच्या भागात पोचतो. या ठिकाणाहून समोरच्या व्याघ्रदरी मधल्या धबधब्याचे सुंदर दृश्य पहावयास मिळते. पुढे जाउन व्याघ्रदरी मधल्या पाण्याचा उल्हास नदी सोबत संगम होतो. इकडून आता मागच्या बाजुच्या बुरुजावर गेलो की दुरवर मांजरझुम्याचा डोंगर आणि ढाक किल्ल्याचे दर्शन होते. श्रीवर्धन गडाच्या माथ्यावर दरवर्षी झेंडावंदन होते. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. आम्ही गड़फेरी पूर्ण करून परत खाली मंदिरात आलो. आता लक्ष्य होते मनोरंजन.







मनोरंजन किल्ल्याचा दरवाजा आणि पायऱ्या अधिक बिकट अवस्थेत आहेत. गडावर काही पाण्याच्या टाक्या आणि एक धान्य कोठी आहे. गडावरुन उधेवाड़ी आणि गावाबाहेर असलेल्या शेतीचे सुंदर दृश्य दिसते. श्रीवर्धन गडाची उतरत्या डोंगरावरची वेडीवाकड़ी तटबंदी मनोरंजन वरुन फारच सुंदर दिसते. वेळ कमी असल्याने आम्ही ही गडफेरी आवरती घेतली आणि परतीच्या मार्गाला लागलो.







पुन्हा गावात आलो, दुपारचे जेवण आटोपले आणि साधारण २ च्या सुमारास गड़ सोडला. आता खाली कोकणात उतरून कोंदीवडे गाव गाठायचे होते. खाली उतरताना बराच वेळ मनोरंजन किल्ला आपली साथ करत असतो. एक-एक करून खालच्या टप्यावर उतरु लागलो तसे मस्त धबधबे दिसू लागले. कितीही पुरेसा वेळ असला तरी एका-एका धबधब्यामध्ये डुंबायला वेळ पुरणार नाही इतके मस्त. अश्याच एका धबधब्यापाशी आहेत कोंढाण्याची सुप्रसिद्द लेणी. अप्रतिम अशी हो कोरीव लेणी आजही थोडी दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहेत. निसर्गामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा मानवाने त्यांचे जास्त नुकसान केले आहे. काहीवेळ तिकडे थांबलो आणि मग पुढे निघालो. इतकी काही घाई नव्हती फ़क्त पूर्ण अंधार पडायच्या आधी गावात पोचणे गरजेचे होते नाहीतर लेट झाला की तिकडचे गाड़ीवाले अव्वाच्या-सव्वा भाड़े सांगतात कर्जतला जाण्यासाठी. ५ च्या सुमारास खाली पोचून लालमातीच्या रस्त्याला लागलो. तिकडून लालमातीचा चिखल तुडवत पुन्हा चाल गावापर्यंत. अखेर चाल संपवून गावात पोचलो. कपडे असे माखले आणि भिजले होते की त्या कपड्यात प्रवास करणे शक्य नव्हते. एके ठिकाणी पटकन ते बदलून घेतले आणि गरम-गरम चहा मारला. मस्तपैकी ताजे झालो आणि कर्जतकड़े निघालो. २ दिवसामधल्या भटकंतीने मन प्रसन्न झाले होते. ढाक-भैरीची थरारक गुहा आणि राजमाची दर्शन असा दुहेरी बेत मस्त जमला होता. त्याच मूड मध्ये आम्ही पुढच्या भटकंतीचे प्लानिंग करत घरी निघालो होतो...

Wednesday 8 April 2009

भाग १ - ढाक-भैरी ते राजमाची ... !

२००५ च्या ऑगस्टमधला ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते. त्यात धो-धो पावसाळ्याचे दिवस आणि आम्ही निघालो होतो ढाक-भैरीला. अभिजित आणि आशिष ह्या आधी ढाक-भैरीला जाउन आले होते. गुढ असा ढाक-भैरी ... काय वर्णावे ... कुठल्याही कसलेल्या ट्रेकरला भूरळ पाडणारा असा हा ट्रेक. मुळात कठीण असलेला हा ट्रेक पावसाळ्यात अतिकठीण होऊन बसतो. ह्या ठिकाणी काही अपघात सुद्धा झाले आहेत त्यामुळे नवख्यांनी याठिकाणी अनुभवी मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये. आम्ही सकाळी-सकाळी पहिल्या कर्जत लोकलने कर्जतला पोचलो. नाश्ता आटोपला आणि तिकडून वदपला पोचलो. वदप गावामागूनच ढाक किल्ल्याकडे जायची वाट आहे. गावात पोचलो की खिंड दिसते. थोडसं उजव्या हाताला एक मस्त पिटूकला धबधबा आहे. खिंडीच्या दिशेने चालायला लागलो. पावसाळी वातावरण होते त्यामुळे मस्त वाटत होते. १५ मिं. मध्ये वर चढून खिंडित पोचलो. आता खरी चाल होती म्हणून थोड़ेफार पोटात ढकलले. मजल दरमजल करत तासाभरात वरच्या टप्याला पोचलो. वरच्या पठारावर पोचायच्या आधी एक झाडीची वाट लागते. पायाखाली लालमातीचा चिखल तुडवत ती वाट पार केली. ही वाट पूर्ण झाली की आपण वरच्या पठारावर येतो आणि समोर विस्तीर्ण पठार आणि त्यावर सगळीकडे शेतीच-शेती दिसते.









त्या शेता-शिवारांमधून आणि बांधांवरुन वाट काढत थोड्याच वेळात आम्ही गावात पोचलो आणि तिथून ढाक किल्ल्याकडे निघालो. वाटेवर सगळीकडे धुके होते. दूरचे काही दिसत नव्हते आणि मळलेली वाट नव्हती. त्यामुळे वाट अंदाजानेचं काढत होतो. आम्हाला ढाक किल्ल्यावर जायचे नव्हते तर त्याला वळसा मारून पुढे भैरीच्या गुहेकडे जायचे होते. उजवीकडे वर चढलो तर ढाक किल्ल्याच्या माथ्यावर जायला होते आणि डावीकडे खाली आपण रस्ता चुकतो. अखेर वाट आम्हाला समोरच्या दरीच्या टोकाला घेउन गेली गेली. समोरचे दृष्य फारच सुंदर होते. डोंगर उतारावर पसरलेल्या फुलांच्या चादरी आणि समोरच्या कडयावरुन कोसाळणारे धबधबे. ते दृष्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. पुढे स्पष्ट वाट नव्हती त्यामुळे जंगलामधून अंदाजानेच वाट काढत-काढत कळकराय सुळक्याच्या दिशेने आमची पावले पडत होती. काही वेळानी अखेर धुक्यामधून पुसटसा कळकराय सुळका दिसायला लागला. आता आमच्या पावलांची गती वाढली. काही वेळातच आम्ही मळलेल्या वाटेच्या चौरस्त्यावर येउन पोचलो. येथून समोरचा रस्ता कुंढेश्वरमार्गे राजमाचीला जातो. त्याच रस्त्याने आम्हाला पुढे जायचे होते. पण त्याआधी उजवीकडे खाली घळीमध्ये उतरून भैरीच्या गुहेकडे जायचे होते. चौरस्त्यावरुन डावीकडे वळल्यास भीमाशंकरला जाता येते. आम्ही आता उजवीकडे उतरून त्या छोट्याश्या घळीमध्ये उतरलो. उतार असलेली घळ संपत आली की ढाकच्या पश्चिम कड्याची भिषणता आणि दुर्गमता लक्ष्यात येते. समोरच्या दरीमध्ये धुके भरले होते त्यामुले खोलीचा अंदाज येत नव्हता. घळीमधून खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण घळ संपता-संपताच लगेच उजवीकडे सरकून खाली उतरावे लागते. तिकडे पायाखाली एक मोठा दगड आहे त्यावर पाय टाकुन उजवी कडे सरकावे लागते. पावसामुळे सगळीकडे निसरडे झाले होते त्यामुळे काळजीपूर्वक आम्ही चौघेजण तिकडे उतरलो. आता आम्ही ढाकच्या काळ्याकभिन्न कडयाखाली उभे होतो. मागच्या बाजूला थोड़ वरती कळकराय सुळका दिसत होता.











अंगावर येणारा विस्तीर्ण कडा आणि खालच्या दरीत पसरलेलं धूक असं मस्त वातावरण होतं. त्या कडयाखालून चालत-चालत आम्ही पुढे सरकू लागलो. कडयावरुन अंगावर पाणी ओघळत होते शिवाय पायाखालची वाट निसरडी होती. उजवीकडच्या कडयाचा आधार घेत-घेत, पायाखालच्या ओबड-धोबड दगडांकडे लक्ष्य देत पुढे सरकावे लागत होते. तरीसुद्धा मी आणि हर्षद मजेत गाणी म्हणत, पण लक्ष्य देत पुढे जात होतो. अभि आणि आशीष आम्हाला जरा गप्प बसा सांगत होते. अभि आणि आशीषला मी इतका गंभीर कधी पाहिलं नव्हत. पुढे जात असताना उजव्या बाजूला २-३ खोदलेल्या कपारी दिसतात. गुहा म्हणायला त्या तितक्या मोठ्या सुद्धा नाहीत पण आपले सामान ठेवून किंवा काही वेळ बसायला त्या नक्कीच उपयुक्त आहेत. त्यातल्या एकात आम्ही आमचे सामान ठेवले आणि त्यावर जॅकेट टाकुन झाकून ठेवले. आता खऱ्या चढाईसाठी आम्ही पुढे सरकलो. थोड़ पुढे गेलो की उजव्या बाजूच्या कडयामध्येच वर जाणाऱ्या कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आशीष सर्वात पुढे सरकला. त्या मागे हर्षद. त्या नंतर अभि आणि सर्वात शेवटी मी. एका पायरीवर चढलो की त्यावरच्या पायर्‍या दृष्टीक्षेपात येतात. पायर्‍यांवर पाणी जमले होते त्यामुळे प्रत्येक पायरी वर आधी हात फिरवून मगच घट्ट पकड घ्यावी लागत होती. त्याशिवाय आधीपासून तिकडे काही किडूक-मिडूक प्राणी नाही ह्याची सुद्धा खातरजमा करावी लागत होती. कारण थोडसं दचकून सुद्धा तोल जाण्याची शक्यता असते. मी माझ्या उजव्या हातावर जास्त जोर न टाकता डाव्या बाजूवर जोर टाकून वर चढत होतो. तसा मी डावरा असल्याने मला फार त्रास पडत नव्हता. एक-एक करून त्या १०-१२ पायऱ्या चढून वर गेलो. पायऱ्या संपल्या की उजवीकडे एक मोठी स्टेप घ्यावी लागते. सर्वात वरच्या पायरीवर पाय घट्ट रोवून हाताने अगदी वरती पकड घ्यायची आणि स्वतःला वर खेचून घ्यायचे. दूसरा माणूस उभी रहायची जागा सुद्धा नसल्याने कोणी मदतीला किंवा आधाराला सुद्धा उभे राहणे कठिण होउन बसते. आशीष आणि हर्षद तिकडून पुढे सरकले तसे मी आणि अभि मागून पुढे सरकलो. आमच्या ग्रुप मधला आशिष हा निष्णात प्रस्तरारोहक (Rock Climber). स्वतःचे वजन सांभाळून अतिशय शिफातीने तो पुढे सरकत होता. आम्ही त्याच्या मागून पुढे सरकत होतो. पाउस मध्येच थोडा-थोडा पडत होता. दाट ढूक्यामुळे खाली दरीमधले काही दिसत नव्हते. आता डावीकडे तिरप्या रेषेत वर जाणारी दगडामधली खाच आहे. स्वतःचे वजन पूर्णपणे उजवीकडे ठेवून हळू-हळू वर सरकत आम्ही तो अंदाजे १५ फुटांचा टप्पा पार केला. ह्या ठिकाणी पकडायला कुठेही खाचा नाहीत. आपले हात दगडांवरुन सरकवत-सरकवत पुढे जात रहायचे. वर आलो की मात्र ६-७ जण नीट उभे राहतील इतकी मोकळी जागा आहे. एकडे येउन जरा दोन क्षण निवांत झालो कारण पुढचा टप्पा अजून बिकट होता. आता खाच तिरप्या रेषेत उजवीकडे सरकते. पायाखालची जागा मोजून वितभर आणि धरायला काही नाही अश्या दोलायमान स्थितिमध्ये स्वतःला सरकवत पुढे जायचे. आता स्वतःचे पूर्ण वजन डाव्या बाजूला. कुठेही बसायचे नाही कारण ते शक्यच नसते. ह्या ट्रेकला येणारे भिडू हे पक्के असावे लागतात नाहीतर अश्या मोक्याच्या ठिकाणी कोणी कच खाल्ली तर पुढे सगळेच अवघड होउन बसते. खालच्या खाचेच्या दुप्पट अंतर उजव्या बाजूला पार करून वर सरकून आता आम्ही पोचलो ते गुहेच्या पायथ्याशी. ह्या ठिकाणापासून अंदाजे १५ फुट सरळ वर चढून गेलो की लागते ढाक-भैरीची गुढरम्य गुहा. ह्या ठिकाणी चढायला न आहे शिडी.. न पायऱ्या.. वर चढण्यासाठी एक बदामाच्या झाडाचे खोड जाड दोरखंडाला बांधले आहे. अर्थात तो दोरखंड वरती मोठ्या दगडाला बांधला आहे. सरळ फुटणाऱ्या फांद्यांचा शिडीच्या पायर्‍यांसारखा वापर करून वर चढून जावे लागते. आता ही तर सर्कस होती कारण वरच्या फांद्या पकडून खालच्या एका फांदीवर एक पाय टाकल्या-टाकल्या माझ्या वजनामुळे झाड एका बाजूला स्विंग झाले.






----------------->>>


उजव्याबाजूला वर जाणारी वितभर रुंदीची वाट, दोरखंडाला बांधलेले बदामाच्या झाडाचे खोड आणि सर्वात वरती ढाक-भैरीची गुहा दिसते आहे.











पावसाने फांद्या निसरड्या झाल्या होत्या. एक-एक पाउल काळजीपूर्वक उचलत पुढची काही मिनिट्स अशी कसरत करत आम्ही एक-एक करून अखेर वर पोचलो. एकदम भन्नाट वाटत होते. आपला सह्याद्री जितका रांगडा तितकाच राकट. आपल्या साहसी वृत्तीला प्रेरणा देणारा. गेल्या तासाभरामधल्या ह्या अनुभुतीने मन प्रसन्न झाले होते. इतका वेळ हाताचे दुखणे सुद्धा मी विसरलो होतो. गुहेमध्ये भैरी म्हणजेच भैरवनाथाचे स्थान आहे. बाजुलाच २ पाण्याची टाकं आहेत. त्यातल्या पाण्यामध्ये देवाची भांडी आहेत. आपल्याला जेवण बनवायचे असल्यास ही भांडी घेता येतात पण वापरून झाली की ती स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यात ठेवावी लागतात. इतका वेळ दरीमध्ये पसरलेलं धुकं आता विरु लागलं. खालचे स्पष्ट दिसू लागले. आपण काय दिव्य करून वर आलो आहोत हे समजून आले होते. उतरून जाताना किती काळजी घ्यावी लागणार आहे ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आली होती. अभि आणि आशीषला बहुदा ती आधी पासूनच होती म्हणूनच ते मला आणि हर्षदला 'जरा सिरीअस व्हा' अस सांगत होते. आता आम्हाला उतरायला हवे होते कारण पुढे जाउन कुंढेश्वरमार्गे राजमाचीला पोचायचे होते. आता अभि पुढे सरकला. पुन्हा तीच कसरत; मात्र जास्त काळजी घेउन. स्वतःचा तोल सांभाळत हळू-हळू आम्ही खाली उतरायला लागलो. बदामाच्या झाडावरची सर्कस करून खाली आलो आणि वितभर खाचेवरुन खाली सरकू लागलो. समोर खोल दरी दिसत होती. उजवा हात दगडावर सरकवत-सरकवत आम्ही खाली सरकलो. मोकळ्या जागेमध्ये दम घेतला आणि पुन्हा खाली उतरलो. शेवटच्या पायऱ्या उतरताना फारसे प्रयास पडले नाहीत. पूर्ण खाली उतरून आलो तरी कड्याखालचा पॅच बाकी होताच. पण आधी सामानाकड़े गेलो आणि पेटपूजा आटोपली. दुपारचे २ वाजून गेले होते आणि अजून बरेच अंतर बाकी होतं. भराभर पुढे निघालो. कडयाखालचा उरलेला मार्ग संपवला आणि घळीमधून चढून वर आलो. आता लक्ष्य होते कुंढेश्वर..........




(शेवटची ३ छायाचित्रे आमच्या ट्रेकच्या वेळची नसून माझी मैत्रिण 'कस्तूरी शेवाळे' हिच्या संग्रहातील आहेत.)

क्रमशः ...