Tuesday 14 July 2009

भाग ५ - राजमाची बाइक ट्रिप ... !

राजमाचीचे
अजून काही फोटो तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावे असे वाटले...

भैरवनाथाचे देउळासमोरील काही अवशेष ...

श्रीवर्धन किल्यावरील पाण्याच्या टाक्या ...

बालेकिल्ल्यावरुन दिसणारी व्याघ्रदरी. ह्या ठिकाणी पावसाळ्यात अतिशय सुंदर धबधबा कोसळतो ...

किल्ल्याच्या दक्षिण बुरुजात उतरणाऱ्या पायऱ्या ...
परफेक्ट कॅच ...

आम्ही सर्व ...
फाइनल स्नॅप ऑफ ट्रिप ... परतीच्या वाटेवरती ...

Sunday 12 July 2009

भाग ४ - राजमाची बाइक ट्रिप ... !


ब्लॉगच्या गेल्या भागात म्हटल्याप्रमाणे ह्या भागात फ़क्त राजमाचीचे फोटो टाकत आहे...
<<< --- राजमाचीचा श्रीवर्धन किल्ला आणि दक्षिणेकडचा दुहेरी बुरुज.

<<<--- श्रीवर्धन किल्ल्याचे प्रवेशद्वार. मागे दुरवर दिसतोय तो बालेकिल्ला.


<<<--- आम्ही सर्वजण किल्ल्याच्या दक्षिण बुरुजावर.


<<<--- खिंडीमधले भैरवनाथाचे देउळ.<<<--- भैरवनाथाच्या देउळासमोरील दगडी घोड़ा - भैरवनाथाचे वाहन.

<<<--- उधेवाडी गावाबाहेरील शंभू महादेवाचे मंदिर.


Friday 10 July 2009

भाग ३ - राजमाची बाइक ट्रिप ... !


(खरं तरं इतकी मोठी ट्रिप नव्हती की मी ३ भागात लिहावी. पण परवा काही केल्या भाग २ पूर्णपणे अपलोड होइना मग अर्धा भाग पब्लिश केला. फोटो अपलोड व्हायचे तर दुरच राहिले. :( असो आता ह्या भागात सुद्धा फोटो नाही टाकता आले तर त्यासाठी सेपरेट भाग टाकिन.. कारण फोटो शिवाय ट्रेक ब्लॉगला मज्जा येत नाही ना... )

गिताताईकड़े पोचलो तर वरण-भात, चवळीची भाजी आणि तांदळाची भाकरी, लोणचे-पापड़ असे मस्त जेवण तयार होते. निवांतपणे दुपारचे जेवण आटपून आता परतीच्या मार्गाला लागायचे होते. ३ वाजत आले होते. ३ च्या आसपास आवरून निघालो आणि अवघ्या काही मिं. मध्ये गावापासून १ की.मी. जातो तोच अमोलच्या गाडीचे मागचे चाक पंक्चर झाल्याचा मला कॉल आला. आता आली का परत पंचाइत. एक तर अमेय, संजू पुढे निघून गेले होते. मी हर्षद आणि कविताला पुढे खलीता देउन पुढे धाडले आणि पुन्हा मागे फिरून अमोलकड़े निघालो. अभि सर्वात मागे होता त्यामुळे तो तोपर्यंत चाक काढून स्वतःच्या गाड़ीवर अमोल सोबत खंडाळ्याला जायला निघाला. मागे फ़क्त मनाली आणि दिपाली थांबल्या होत्या त्यामुळे मला आणि ऐश्वर्याला त्यांच्या बरोबर मागे थांबायचे होते. आता अभिला परत यायला किमान २ तास तरी लागणार होते. त्यामुळे मी सरळ दोन्ही स्लीपिंग बॅग्स काढल्या आणि रस्त्याबाजुच्या गवतामध्ये पसरून सरळ लोळण घेतली. पाउस काही पडायचा नव्हता त्यामुळे चिंता नव्हती. पण शांतपणे बसतील त्या ऐश्वर्या - दिपाली कसल्या ना. दोघींना बाजुच्या एका झाडावर करवंदे दिसली. मग काय सुरु ना 'मिशन करवंदे'... हा ... हा ... एक पिशवी घेतली आणि एक झाड़.. मग दुसरे झाड़ .. मग तिसरे असे प्रत्येक झाडाकडून हप्ता वसूली करत - करत १० मिं. मध्ये त्या दूर पोचल्या. नंतर तर दिशेनाश्याच झाल्या. २० मिं. नंतर पिशवी भरून करवंदे घेउन आल्या. बऱ्याच दिवसांनी असा रानमेवा मिळाला होता. मग काय मी आणि मनालीने सुद्धा मांडली ना बैठक आणि मस्तपैकी करवंदे हाणली.

तास कसा निघून गेला काही कळलेच नाही. ५ च्या आसपास अभ्याचा फोन आला की चाक दुरुस्त करून ते निघाले आहेत. तासाच्या आत पोचतील. म्हणजे ६ वाजणारचं होते. तो येईपर्यंत काय करायचे ह्या विचारात होतो तोच पावसाची एक सर आली. सगळे सामान तसेच उचलले आणि बाजुच्या झाडीमध्ये पळालो. तिकडे बघतो तर काय... अजून करवंदाची झाडे. मग काय वेळ सत्कारणी लावायला नको का.. पुन्हा एकदा 'मिशन करवंदे - पार्ट २' सुरु झाले. ६ च्या आसपास अभि आणि अमोल येउन पोचले. पुन्हा गाड़ीला चाक लावले आणि ६ वाजता तिकडून निघालो. अमेय, संजू, आदित्य, पूनम, कविता, हर्षद हे बाकी सगळे कधीच हायवेला जाउन पोचले होते. निघताना त्यांना एक फोन केला आणि निघल्याची वर्दी दिली. आता अंधार पडायच्या आत जास्तीत जास्त अंतर कापून हायवेच्या जवळ जाउन पोचायचे होते. ७ वाजून गेले होते आणि पुन्हा एकदा नाइट रायडिंग सुरु झाले होते. सर्वात पुढे अभि - मनाली, मध्ये अमोल - दिपाली आणि सर्वात मागे मी आणि ऐश्वर्या. अखेर ७:३० च्या आसपास हायवेला पोचलो. सॉलिड भूक लागली होती. त्यामुले खंडाळ्याला काहीतरी खाउन मगच पुढे निघायचे असे ठरले. अमेय, संजू, कविता असे काहीजण पुढे निघून गेले होते कारण त्यांना घरी पोचायला बराचं उशीर झाला असता. खाउन निघालो तेंव्हा ८ वाजून गेले होते. आता मी आणि हर्षद, ऐश्वर्या आणि पूनमला कर्जत मार्गे घरी सोडून घरी जाणार होतो. सोबत आदित्य - श्रीजिश होतेच. तर अभि - मनाली, अमोल -दिपाली थेट पनवेल मार्गे घरी पोचणार होते. खंडाळ्याच्या होटेलमध्ये एकमेकांचा निरोप घेतला आणि ''घरी पोचलात की कळवा रे'' ... असे बोलून बाइकवर टांग मारली आणि घराकड़े निघालो. लडाखला बाइकने जाताना बाइकला काय-काय होऊ शकते. सगळ्या रायडर्समध्ये ताळमेळ किती गरजेचा आहे हे एका ट्रिपमध्ये लक्ष्यात आले होते. अजून १-२ ट्रिप्स होणे गरजेचे आहे हे सुद्धा लक्ष्यात आले होते. त्या ट्रिप्सचे प्लानिंग करत करतच मी १२ च्या आसपास घरी पोचलो ... थोड्या अडचणी आल्या खऱ्या पण लडाखची तयारी खऱ्या अर्थाने सुरु झाली होती... एकदम जबरदस्त ... !!!

Thursday 9 July 2009

भाग २ - राजमाची बाइक ट्रिप ... !

सकाळी उठलो तेंव्हा ७ वाजून गेले होते आणि चहा-नाश्ता तयार होता. नाश्ता म्हणजे गरमा-गरम कांदेपोहे. झट-झट आवरू घेतले आणि श्रीवर्धन किल्ला बघायला निघालो. तिकडे दूसरीकड़े अभि, संजू आणि अमेय काल बिघडलेल्या बुलेटला रिपेअर करायला निघून गेले. त्यांना २-३ तास तरी नक्की लागणार ह्या अंदाजाने आम्ही गडफेरी पूर्ण करायचे ठरवले. देवळासमोर आहे तो श्रीवर्धन किल्ला. तर मागच्या बाजूला आहे तो मनोरंजन किल्ला. निघालो तेंव्हा ८ वाजून गेले होते आणि दोन्ही गड बघून होतील याची शक्यता वाटत नव्हती. मूळात गड बघणे हा ह्या बाइक ट्रिपचा मुख्य उद्देश नसल्याने तशी चिंता नव्हती. शिवाय ह्याआधी सुद्धा राजमाची २-३ वेळा बघून झाला होताच की. तरी पण काही चांगले फोटो काढावे म्हणुन आम्ही पुढे निघालो.


आभाळ थोड़े भरून आले होते आणि पाउस पडेल की काय असे वाटत होते. पण तो काही शेवटपर्यंत पडलाच नाही. आणि पडला असता ना तर आमची पक्की वाट लागली असती हे नक्की कारण त्या लालमातीच्या रस्तावर असा काही चिखल झाला असता की बाइक चालवणे दुराप्रास्त होउन बसले असते. देवळापासून अवघ्या १५ मिं. मध्ये श्रीवर्धन गडाच्या दरवाज्यापाशी पोचता येते. दुरवर डाव्याबाजूला म्हणजेच पश्चिमेकड़े किल्ल्याचा एक बुरुज दिसतो. मध्ये तटबंदी पडली असल्याने इकडूनच थेट तेथे जता येते. आम्ही मात्र प्रवेशद्वाराची रचना आणि दुर्गबांधणी बघण्यासाठी आधी दरवाज्यावर गेलो. 'रामचन्द्रपंत अमात्य' यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे." या शास्त्राप्रमाणेच पुढे बुरुज देउन त्यामागे किल्ल्याचा दरवाजा लपवला आहे. एकुण बांधकाम १ मजली आहे. आतल्या बांधकामाची उंची आणि लाकडाचे वासे घालायच्या जागांवरुन ते लगेच समजुन येते. उजव्या बाजुच्या पडक्या देवडीच्या पहिल्या मजल्यावरुन थेट तटबंदीवर जायला छोटासा दरवाजा आहे. इथून पुढे वरपर्यंत चढते बांधकाम आहे. ठीकठीकाणी तटबंदीमध्ये जंग्या बांधलेल्या आहेतच. इथून वर चढून गेलो की पण पोचतो गुहेसमोर. छोटेसे प्रवेशद्वार असलेली ही गुहा आतून मात्र प्रचंड मोठी आहे. हयात ३ मुख्य भाग आहेत. मध्ये एक आणि उजवीकड़े डावीकड़े अशी एक-एक. किल्ल्यावरील धान्याचा, शस्त्रांचा आणि इतर सामूग्रीचा साठा येथेच साठवला जात असणार. एकडे काहीवेळ थांबुन आम्ही पुढे बालेकिल्ल्याकडे निघालो. एकडेच उजव्या बाजूने दक्षिणेकडच्या दुहेरी बुरुजाकड़े जायचा मार्ग आहे.


आम्ही मात्र आधी बालेकिल्ल्याकडे निघालो. वर पोचलो की या ठिकाणाहून समोरच्या व्याघ्रदरी मधल्या धबधब्याचे सुंदर दृश्य पहावयास मिळते. पुढे जाउन व्याघ्रदरी मधल्या पाण्याचा उल्हास नदी सोबत संगम होतो. इकडून आता मागच्या बाजुच्या बुरुजावर गेलो की पश्चिमेकड़े दुरवर मांजरझुम्याचा डोंगर आणि ढाक किल्ल्याचे दर्शन होते. श्रीवर्धन गडाच्या माथ्यावर दरवर्षी झेंडावंदन होते. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. आम्ही गड़फेरी पूर्ण करून परत खाली उतरताना दक्षिणेकडच्या बुरुजाकड़े वळलो. दक्षिणेकडचा बुरुज हा दुहेरी म्हणजेच एका खाली एक असे २ बुरुज आहेत. खालच्या बुरुजात जायला उजव्या हाताने पायऱ्या आहेत. इथे काही वेळ मस्त फोटो काढले आणि मग परतीच्या मार्गाला लागलो. इथून दरवाज्याकडे परत येताना मार्गात एक खोदीव तळे आहे. ह्या ठिकाणी आलो आणि सगळे एकदम फुरसतमध्ये पाण्यात पाय टाकुन बसले. मनोरंजन किल्ला दुरच राहिला, खाली तरी वेळेवर पोहचू की नाही असे मला वाटत होते. इतक्यात अभिचा फोन आला आणि बुलेट नीट झाल्याचे कळले. ते परत येत होते त्यामुळे आम्ही सगळे उतरायला लागलो. काही वेळात पुन्हा देवळापाशी आणि मग तिकडून खाली उधेवाडीत पोचलो. गीताताईला दुपारचे जेवण सांगून ठेवलेच होते ते तयार होत होते. तो पर्यंत येथुनच थोड्या अंतरावर असलेल्या शंभू महादेवाच्या मंदिरा कड़े गेलो. मंदिरासमोर पाण्याचा प्रशत्र तलाव आहे. वर्षभर गडाला पुरेल इतके पाणी ह्यात साठवता येईल इतका मोठा. आजूबाजूला परिसर सुद्धा सुंदर आहे. हे मंदिर सुद्धा खूप रेखीव असून काही वर्षांपूर्वी जमिनीमध्ये दबलेला ह्याचा खालचा अर्धा भाग खोदून मोकळा केला गेला आहे. इकडून आम्ही परत वळलो ...

क्रमश: ...

Saturday 4 July 2009

भाग १ - राजमाची बाइक ट्रिप ... !

अखेर 'लडाख'ची तयारी खऱ्या अर्थाने सुरु झाली. गेले महीने-दोन महीने २०-२५ मेल्स करून सर्व प्रकारची तयारी करण्यात वेळ जात होता. आता मात्र लडाखला बाइक वरुन जाणाऱ्या सर्वच्या-सर्व १३ जणांनी एकत्र राजमाचीला जायचे असे ठरले. सर्व बाइक रायडर्समध्ये ताळमेळ जमून येण्यासाठी १-२ बाइक ट्रिप्स कराव्यात असे आमचे ठरले होते. त्याची सुरवात आम्ही ६-७ जूनला राजमाची पासून केली. शनिवारी दुपारी मी आणि ऐश्वर्या, अभिजित आणि मनाली, अमेय म्हात्रे आणि पूनम, आदित्य आणि श्रीजिष, अमोल आणि दीपाली, हर्षद आणि कविता, संजू आणि अमेय साळवी असे १४ जण ७ बाइक्सवरुन राजमाचीकड़े कूच झालो. ह्या पैकी अमोल, संजू आणि हर्षद लडाखला येणार नसले तरी जास्त बाइक्स हव्या म्हणुन आमच्या बरोबर आले होते. ह्या बाइक ट्रिपसाठी राजमाचीची निवड अभिने केली होती. ठाण्या-मुंबई पासून खोपोली पर्यंतचा मोठा रस्ता, खोपोली ते खंडाळा असा घाट रस्ता आणि मग शेवटी खंडाळा ते राजमाचीची उधेवाडीपर्यंत मातीचा कच्चा रस्ता अशी सर्व प्रकारची बाइक राइड ह्या २ दिवसात करायला मिळणार होती. अर्थात मध्येच पाउस पडला असता तर सगळचं बोंबलले असते हे नक्की.खरंतरं शनिवारी दुपारी ३ ला निघायचे होते पण मुंबईच्या ट्राफिकने अमेयचा घात केला आणि ४:३० झाले तरी तो काही ठरलेल्या जागी पोहचू शकला नाही. सुरवातच दिडतास लेट. आता मध्ये कुठेही न थांबता थेट खोपोली गाठायचे असे ठरले आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या बाइक्स दामटवल्या. संध्याकाळी ६ ला आम्ही खोपोलीला पोचलो. आता राजमाचीला पोहचेपर्यंत पूर्ण अंधार होणार हे पक्के माहीत होते त्यामुळे व्यवस्थित खाउन घेतले. आता मोर्चा पुढे निघाला खंडाळ्याकड़े. २०-२५ मिं. मध्ये आम्ही खंडाळा उजवीकड़े टाकत राजमाचीच्या रस्त्याला लागलो. लाल मातीच्या कच्च्या आणि थोड्या झाडीच्या रस्त्याला लागायच्या आधी आम्ही एके ठिकाणी थांबलो. कोणीही मागे राहू नये किंवा पुढे जाऊ नये म्हणुन असे ठरले की अभि सर्वात पुढे राहिल तर मी सर्वात मागे. त्या रस्त्यामध्ये आमच्या गाड्यांचे हेड्लैट्स शिवाय बाकी काही दिसत नव्हते. अचानक एका वळणावर माझ्या गाडीच्या पुढच्या चाकाखाली एक मोठा दगड आला आणि काही समजायच्या अगोदर मी ऐश्वर्या आणि बाइकला घेउन उजव्या बाजूला पडलो होतो. जागच्याजागी पडल्यामुळे तिघांनाही काही लागले नाही हे नशीब. तिघे म्हणजे मी, ऐश्वर्या आणि माझी बाइक. हा.. हा.. पौर्णिमेच्या आदला दिवस होता त्यामुळे दूरवर चंद्रप्रकाशात राजमाचीचे जोड़ बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन दिसत होते. इतके अंतर अंधारात पार करून जायचे आहे हे सुद्धा समजुन येत होते. अशात कोणाची बाइक बंद पडली तर ??? विचार करायचा अवकाश होता आणि संजूची बुलेट हाचके घेत बंद पडली. ह्या वेळेला तो नेमका माझ्या मागे राहिला होता आणि सलग चढ असल्याने मी सुद्धा बाइक थांबवली नव्हती. ५-७ मिं झाली तरी तो येत नाही हे कळल्यावर त्याला फोन करायचा प्रयत्न केला पण अध्ये-मध्ये मोबाईल नेटवर्क जात होते. शेवटी फोन लागला आणि त्याच्या गाडीचा क्लच लॉक झाला आहे असे कळले. आता आम्ही उधेवाडी पासून अवघे ३ कि.मी. सुद्धा लांब नव्हतो. सगळ्यांना आधी गावात पोचवायचे आणि मग पुन्हा मागे येउन अमेय आणि संजूला घेउन यायचे असे माझे आणि अभिचे ठरले. जमले तर गाड़ी सुद्धा ठीक करायची होती. गावत पोचलो तेंव्हा १० वाजत आले होते. बराच उशीर झाला होता आणि कोणी जेवण बनवून देइल अशी आशा आम्हाला नव्हती. १-२ जण असते तर ठीक पण इकडे आम्ही १४ जण होतो. गावातल्या गीताताईने मात्र जेवायची सोय केली. मागच्या वेळी ढाक-कुंढेश्वर वरुन आलो होतो तेंव्हा पण उशिरा पोचल्यानंतर गीताताई कडेच राहिलो होतो. हुस्स्स्श.. बाकी सगळे तिकडे आराम करत बसले आणि आता मी आणि अभि पुन्हा बाइक वर टांग मारून ३ की. मी. मागे संजू - अमेय कड़े पोचलो. रस्त्याच्या मधोमध बुलेट उभी करून दोघे जण बाजूला बसले होते. १५-२० मिं. गाड़ी बरोबर मारामारी करून पाहिली पण योग्य स्पॅनर नसल्याने अखेर गाड़ी बाजूला झाडीत टाकली आणि आम्ही पुन्हा उधेवाडीकड़े निघालो.शनिवारची रात्र म्हणजे राजमाचीला बरीच गर्दी असते पण पाउस अजून सुरु न झाल्याने फारसे कोणी नव्हते. आम्ही जेवून घेतले. सकाळचा चहा-नाश्ता ताईला सांगितला आणि खिंडीमधल्या देवळाकड़े निघालो. आजचा मुक्काम तिकडेच होता. खिंडित पोचलो तेंव्हा १२ वाजून गेले होते. आम्ही पथारी पसरल्या आणि गप्पा मारत बसलो. लडाखला जायच्या आधीची तयारी कशी सुरु आहे आणि काय-काय बाकी आहे त्याबाबत अभिने सर्व अपडेट्स दिले. बराच वेळ बोलणे करून मग आम्ही पहाटे ३ च्या आसपास झोपी गेलो. उदया सकाळी उठून श्रीवर्धन आणि मनोरंजन किल्ले बघायला जायचे होते...