सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट. आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक ३ जुलै रोजी नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. जोडीला ह्यावेळी शमिका सुद्धा होती. शिवाय अमृता, तिचा मित्र विकास आणि जाड्या हर्षद सुद्धा सोबतीला होते. ट्रेक झाल्यावर संध्याकाळी माळशेजघाटाच्या खाली असणाऱ्या 'दिघेफळ' या गावी जाऊन राहायचे असे ठरले होते. रविवारी तिकडच्या धबधब्यामध्ये मज्जा करायची होती. त्यासाठी अभी-मनाली, अमेय-शुभांगी आणि इतर काहीजण आम्हाला शनिवारी संध्याकाळी टोकावड्यात भेटणार होते.
गोरखगड आणि मच्छिंद्र सुळका ...
शनिवारी पहाटे-पहाटे माझ्या 'छोट्या भीम' (गल्लत करू नका... छोटा भीम हे आमच्या गाडीचे नाव आहे..) सोबत आम्ही ५ जण मुरबाडमार्गे नाणेघाटाच्या दिशेने निघालो. पहिला थांबा अर्थात मुरबाड मधले रामदेव हॉटेल होते. तिकडे भरगच्च नाश्ता झाला आणि आम्ही पुढे निघालो. सरळगाव वरून जरा पुढे जातो न जातो तोच उजव्या हाताला गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याने आम्हाला धुक्यातून बाहेर येऊन नमस्कार केला. आम्ही सुद्धा थांबून मग तो स्विकारला. समोर आता नाणेघाट दिसत होता. मध्येच धुक्यातून डोके वर काढत नानाचा अंगठा आपले उत्तुंग अस्तित्व दाखवून देत होता. आता जास्त क्षण आम्ही दूर राहणे शक्य नव्हते. फटाफट गाडी मारत पायथ्याला पोचलो आणि जिथे नाणेघाटचा रस्ता सुरु होतो तिकडून गाडी जरा आत टाकली. पार्किंगला एक मस्त जागा मिळाली. लगेच निघालो तिकडून. वर पहिले तर ढग दाटलेले होते. धुके पसरलेले होते पण पावसाचा मागमूस नव्हता. लालमातीच्या मळलेल्या वाटेने आता खरी चाल सुरु झाली होती. आजू बाजूला सर्वत्र सागाची झाडे होती. काही इतर झाडांवर ऑर्किड फुलले होते.
वाईल्ड ऑर्किड...
पहिला काही वेळ अगदीच रमत-गमत गेला. ओढ्याकाठाने गप्पा टाकत टाकत आणि फोटो काढत आम्ही पुढे जातच होतो. माहिती असलेली थोडीफार माहिती जाड्या बरोबर शेअर करत होतो.
अजूनही मला नाणेघाटला आलो की कधीतरी बैलांचे, लमाणांचे मैलभर लांब तांडे दिसतील असे वाटते. दूरदेशीच्या जहाजांमधून कोकणातील बंदरांवर उतरलेल्या विविध वस्तू वरघाटावर घेऊन जाणारे पुरातन काळातील व्यापारी तांडे. कसे असेल ते दृश्य??? किंवा मराठा फौज दौड मारत जुन्नर मारायला वरघाटी कूच करत आहे. फौजेच्या आघाडीला प्रतापराव, येसाजी कंक किंवा आपले थोरले राजे आहेत. हे दृश्य तर त्याहून भन्नाट... टाईम मशीन असे काही असते तर मी नक्कीच १७व्या शतकात गेलो असतो.
पण फार काळ इतिहासात गुंतून न जाता आम्ही २ वेळा ओहोळ पार करत आता पहिल्या टप्याच्या चढणीला लागलो. थोडेसेच पुढे जातो तोच उजव्या बाजूने खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज येऊ लागला. वाट सोडून मी लगेच पाय तिकडे वळवले. मगाशी पार केलेल्या ओढ्यांचाच हा वरचा भाग होता. पाउस काही पडत नव्हता मग ओढ्याच्या पाण्यानेच जरा फ्रेश झालो. इतक्यात पाण्यामध्ये एक सापाचे पिल्लू दिसले. आता हा कुठला साप आहे इतका काही माझा सापांवर बारीक अभ्यास नाही. पण बिन-विषारी होता हे मात्र नक्की. दर काहीवेळाने प्राणवायू घ्यायला तो फक्त आपले तोंड पाण्याबाहेर आणायचा. तेंव्हाच टिपलेला हा फोटो. अर्थात ह्या एका फोटोसाठी पठ्याने बराच वेळ घेतला माझा. त्याला टाटा करून आम्ही सर्व पुन्हा चढाला लागलो.
काय रे.. फोटो काढतो काय???
वाट अजूनही सरपटत चाललेल्या अजगरासारखी रुंद होती. हळू हळू वाट अरुंद होऊ लागली आणि अधिक चढणीला लागली. वाट चढणीला लागली तसे हृदयातील ठोके सुद्धा चढणीला लागले.. म्हणजे वाढायला लागले हो... ३० एक मिनिटात पहिल्या टप्याच्या शेवटाला पोहोचेपर्यंत आश्चर्यकारकरित्या शमिका सर्वात पुढे होती. तर मी शिरस्त्याप्रमाणे सर्वात मागे. अमृता आणि विकास मध्ये होते तर जाड्या फुसफुसत कसाबसा वर चढत होता. पाउस नाही, वारा नाही आणि त्यात ते चंदेरी मच्छर मध्येच येऊन त्रास देत होते. कधी एकदा पहिला टप्पा पार करून वरच्या टापूवर पोचतोय असे वाटत होते. वरती मस्त वारा होता. धुक्याच्या जवळ अधिक गार देखील वाटत होते. तिकडे येऊन पोचतो न पोचतो तोच सर्व धुके गायब झाले आणि नाणेघाट - नानाचा अंगठा यांनी आम्हाला त्यांचे सर्वांग दर्शन घडवले.
नाणेघाट आणि नानाचा अंगठा ...
दुसऱ्या टप्याची चढण सुरु झाली तसा जाड्या अधिकच मागे पडू लागला. त्याला सोबत म्हणून मी जरा मागेच थांबलो होतो. शामिकाला मात्र ट्रेक करताना सारखे मध्ये-मध्ये थांबायला आवडत नाही. मग ती आपली पुढे जायची. तिच्या हि पुढे आता अमृता आणि विकास होते. ते सुद्धा इकडे बस, ते फोटो काढ असेच फुरसत मध्ये जात होते. जस-जसे वर जात होतो तसे धुके दाट होत गेले. आता आम्ही धुक्यात विलीन झालो होतो. इथून ज्या दगडी पारऱ्या सुरु होतात त्या आपल्याला वरपर्यंत घेऊन जातात. आज अजिबात पाउस नव्हता नाहीतर इथे पावसात पायऱ्या चढून जायला अफलातून धमाल येते. २००५ साली मी जेंव्हा नाणेघाट केला होता तेंव्हा अर्धा फुटभर पाणी वेड्यासारखे खाली धावत होते. आत्ता तिकडे धो-शो पाउस पडतोय ना... आत्ता खरेतर नाणेघाटला जायला अजून मज्जा येईल.
अस वाटतंय की हरवून जावे ...
कातळात खोदलेले पाण्याचे टाके ...
दुसऱ्या टप्यात बरोबर मध्ये पाण्याचे एक टाके खोदलेले आहे. किती प्राचीन असावे हे टाके? वरची गुहा जितकी जुनी तितकेच जुने असावे बहुदा.. मार्ग वापरणाऱ्या वाटसरूंना पाण्याची सोय म्हणून बांधले गेले असणार नक्की. अशीच अजून २-३ छोटी टाक उजव्या बाजूला कड्यात आहेत. चटकन लक्ष्यात येत नाहीत. टाक्यापासून निघालो कि अगदी काही वेळात आपण वरती पोचतो. आम्ही इकडे पोचलो तेंव्हा एक ग्रुप मागून येऊन इकडे पोचला. त्यातला एकजण मला विचारतो 'और कितना बाकी है.' त्या मुलाने हाफचड्डी घातलेली होती. त्याच्या बाजूचा तर अजून हाईट. त्याच्या पाठीवर तिरपी अडकवलेली सामानाने भरलेली चक्क लैपटॉप बैग होती. तिसऱ्याच्या हातात फुटबॉल होता. मला कळून चुकले कि कुठल्यातरी कंपनीमधली हौशी कलाकार मंडळी आहेत. त्याला बोललो,'अजून ४५ मिनिटे.' त्यांच्या चेहऱ्यावर 'गार' पडलेले भाव होते. एकजण 'Hmmm.. More 45 minits' असे बोलून खाली दगडावर बसला. त्यांना खरेतर थोडे प्रेमाचे डोंगरी नियम सांगावे असे मनात आले होते पण तितक्यात त्यांचा म्होरक्या मागून काठी टेकत आला आणि त्यांना 'चला..चला.. We are almost there. निकलते है' असे मराठी - इंग्रजी आणि हिंदी असे तिन्ही भाषां एकाच वाक्यात बोलला. त्याचे बोलणे ऐकून ते अजिबात हलले नाहीत. मी मात्र पुढे निघालो. अमृता, विकास आणि शमिका आधीच पुढे गेलेले होते. फक्त मी आणि हर्षद मागे राहिलो होतो.
नाणेघाटाचा अतिप्राचीन व्यापारी मार्ग...
वळणा-वळणाच्या दगडी पायऱ्या चढत चढत अखेर आम्ही गुहेपाशी पोचलो. आता इथून वरच्या पठारावर जाणारा तो ऐतिहासिक मार्ग दिसू लागला होता. आता आम्ही थांबू शकणार नव्हतो. शिवाय गुहेमध्ये जेवणाऱ्या जत्रेचा एकाच गलका होता. तेंव्हा गुहा उतरताना बघू असे ठरले. खूप-खूप गच्च पाउस पडला कि ह्याठिकाणी इतके पाणी वाहते कि पायऱ्या सुद्धा दिसत नाहीत. गुहा धुक्याने भरून जाते आणि खालचा मार्ग तर स्वर्गतीत असतो. आज मात्र ती परिस्थिती नव्हती. थेट वर पोचलो. पाउस अजून हवा तितका झालेला नव्हता. धुके मात्र खूप होते. उजव्या हाताला जीवधन आणि खडापारशी त्यात लपून बसले होते. वर पोचल्यावर बाकीच्यांना डाव्या हाताचा दगडी रांजण दाखवला. जेंव्हा नाणेघाट हा व्यापारी मार्ग म्हणून अस्तित्वात होता तेंव्हा हा मार्ग वापरल्याचा कर ह्या रांजणात टाकावा लागायचा. ज्याची हुकुमत जीवधन किल्ल्यावर त्याची हुकुमत ह्या वाटेवर.
वरच्या पठारावरचे दृश्य .. डाव्याबाजूला तो दगडी रांजण दिसतोय ...
आधी मुघलांच्या ताब्यात असलेला हा मार्ग नंतर छत्रपती शिवरायांनी आपल्या ताब्यात आणला होता. कल्याण बंदरातून आणि उत्तर कोकणातून येणाऱ्या सर्व देशी -परदेशी मालावर मुघलांना मराठ्यांकडे कर भरावा लागायचा. शिवाय प्रत्येक खाजगी व्यापार करणाऱ्याला सुद्धा कर द्यावा लागायचा. एकदा का कर भरला की खालपासून वरपर्यंत संपूर्ण मार्गावर व्यापारी मालाला संरक्षण दिले जायचे. आता आम्ही रांजणासमोरच्या कातळात असलेल्या गणेशगुहेकडे पोचलो. दर्शन घेतले आणि तसेच डाव्याबाजूने नानाच्या अंगठ्याकडे निघालो. भुका लागल्या होत्या तेंव्हा आधी पोटोबा करावा असे मत पडले. पोटोबा म्हटल्यावर थोडीच कोणी विरोधात जाणार होते.नानाच्या अंगठ्याच्या दिशेने थोडे वर चढून जीवधनच्या दिशेच्या एका कड्यापाशी विसावलो. अमृताने आणलेली हल्दीराम भेळ, जाड्याने आणलेले फरसाण आणि असे काही-बाही सटर-फटर पदार्थ खाल्ले. पोट भरले नव्हते पण पर्याय नव्हता.
गुहेमधील गणेशमूर्ती ...
अमृता, विकास आणि हर्षद नानाचा अंगठ्याच्या टोकाला जाऊन आले. धुके इतके होते कि काहीच दिसणे शक्य नव्हते. मी आणि शमिका गणेशमूर्तीपाशी बसून होतो काहीवेळ. ३ वाजत आले होते. आता आम्हाला उतरणे भाग होते. शिवाय हर्षदचा चढतानाचा स्पीड बघता उतरायला अधिक वेळ लागणार हे साहजिक होते. अखेर तिकडून निघताना पुन्हा एकदा जीवधनच्या दिशेनं नजर टाकली. किमान एक झलक तरी दिसते का ते बघायला.. पण आज बहुदा तो काही दिसायचा नव्हताच.
नानाच्या अंगठ्यात असलेली नाणेघाटाची गुहा ...
तिघे आले तसे आम्ही खाली उतरून गुहेकडे पोचलो. ३ वाजून गेल्याने सर्व सामसूम झाले होते. होते-नव्हते तेवढे ग्रुप्स उतरून गेले होते. गावातली २ माणसे तेवढी बसली होती फक्त. आम्ही तिकडे काहीवेळ काढला. गुहेमधल्या भिंतीवरती उरलेल्या उरल्या-सुरल्या ब्राह्मी स्क्रिप्टचा फोटो घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र गुहेमधून बाहेरचे काढलेले Silhoutte फोटो मस्त आले.
धुक्यात ते ...
धुक्यात मी...
धुकेच-धुके सगळीकडे... पण पाउस गेला कुठे??? असे म्हणत ३:३० वाजता खाली उतरायला लागलो. अपेक्षेप्रमाणे पण वेळेत ६:३० वाजता आम्ही खाली पोचलो. 'छोटा भीम' सुखरूप होता. आमचीच वाट बघत होता. एक नजर पुन्हा नाणेघाट पाहून घेतला आणि 'टोकावडे'कडे निघालो. काही वेळात तिकडे अभी-मानली आणि इतर काहीजण येऊन पोचणार होते. मग आम्ही जाणार होतो 'दिघेफळ'ला. धमाल - मज्जा - मस्ती करायला..... त्याचे फोटो आणि त्यावर एक छोटीशी पोस्ट टाकतो नंतर...