Saturday 31 July 2010

किल्ले विसापूर ...

किल्ले विसापूर... मावळ तालुक्यामधला एक भरभक्कम किल्ला. अगदी लोहगडच्या शेजारी वसलेला. लोहगडपेक्षा उंचीला आणि आकाराला सुद्धा तसा मोठा पण तितका प्रसिद्द नसलेला. का माहीत नाही पण जितके लोक लोहगडला जात असतील त्यातले १० टक्के सुद्धा विसापूरला जात नाहीत... अर्थात पक्के भटके ट्रेकर्स सोडून... :) अश्याच काही भटक्या ब्लोगर्सनी लोहगड सोडून किल्ले विसापूरचा ट्रेक ठरवला. म्हणता-म्हणता १७-१८ जण नक्की झाले आणि त्यानंतर काही दिवसात एक-एक करून रद्द सुद्धा झाले. शेवटी मोजून ६ शिलेदार उरले. अनुजा, सुहास, दिपक, सागर आणि मी मुंबईवरुन तर भारत पुण्याहून येणार होता.


लोहगडवाडी मधून दिसणारा विसापूर ...

१७ तारखेला सकाळी मी, अनुजा आणि सुहास ६:३०च्या आसपास ठाण्यावरुन निघालो. गाड़ी केली असल्याने वेळ ज़रा पुढे मागे झाल्याची इतकी चिंता नव्हती. सागरला मुलुंडवरुन उचलले आणि पनवेलच्या दिशेने निघालो. गाड़ीमध्ये गप्पा सुरूच होत्या. तासाभरात पनवेलला पोचलो आणि S.T. स्टैंड वरुन दिपकला उचलले. ८ वाजले होते तेंव्हा अजून पुढे जाण्याआधी गाड़ी 'दत्ता'कडे वळवली आणि एक-एक वडा खाल्ला. तिकडे भारत लोणावळ्याला येउन पोचला देखील होता. आता गाड़ी सुसाट वेगाने खोपोली मार्गे लोणावळ्याच्या दिशेने मारली. वाटेमध्ये डावीकडे माथेरान, इर्षाळगड़, प्रबळगड़- कलावंतीण सूळका तर उजव्या हाताला कर्नाळा आणि माणिकगड़ दिसत होता. पावसाचा कुठे मागमूस देखील नव्हता. धुके किंवा ढग सुद्धा दुरच राहिले. बहुदा ट्रेक सुक्का जाणार अशीच चिन्हे होती. तासाभरात पुरोहित चिक्कीच्या फाट्यावर येउन पोचलो. भारतला उचलले आणि तसेच पुढे निघालो. गाड़ी आता रेल-वे लाइन पार करून लोणावळ्याच्या शिवाजी चौकातून डावी मारत पौंडच्या दिशेने निघाली. लोणावळा मागे पडले तसा लोहगडाचा विंचूकाटा समोर दिसू लागला आणि आपण योग्य मार्गावर आहोत ह्याची खात्री पटली. ह्या रस्त्याने लोहगड़ला मी प्रथमच जात होतो. पुढे छोटासा घाट सारखा लागला. चढण एकदम भारी होती. अरुंद रास्ता आणि एकदम झिप-झाप वळणे. त्यात नेमके एके ठिकाणी कोणीतरी ट्रक उभा करून विटा उतरवायचे काम सुरू केले होते. फुकट १५-२० मिनिटे गेली. शेवटी तो ट्रक निघाला. ट्रकच्या ४०-५० मीटर पुढे जातो तोच डावीकडे लोहगड़वाडीला जाणारी वाट लागली. ज़रा पुढे असता ट्रक तर २० मिनिटे सहज वाचली असती... असो.. तिकडून १५-२० मिनिट्स मध्ये लोहगडवाडीला पोचलो.

१०:३० वाजून गेले होते तेंव्हा अजून १ मिनिट सुद्धा न दवडता विसापूरच्या मार्गाला लागलो. आमच्या सोबत अजून २ जण सोबत आले. २ कुत्रे. प्रत्येक ट्रेकला सोबत एक तरी कुत्रा असतोच. १५-२० मिनिटात मोठ्या लालमातीच्या मळलेल्या वाटेने विसापूरच्या चढणीच्या वाटेला लागलो. आता इथे चहाचे दुकान झाले आहे. शिवाय रस्त्यावर सर्व ठिकाणी दिशादर्शक बाण आहेत.. आधी मात्र असे नव्हते. विसापूरला डाव्या बाजूला ठेवत पुढे-पुढे जात राहिले कि जिथे तटबंदी आत जात-जात जिकडे मिळते त्याठिकाणाहून एक पाण्याचा मार्ग खाली येतो. हाच तो वर जायचा मार्ग. सर्वात वरती मिळालेली तटबंदी तुटलेली आहे. तिच्याकडे लक्ष्य ठेवत चढले म्हणजे रस्ता चुकायचा प्रश्नच नसतो. अर्थात खालच्या टप्यात बरीच झाडी असल्याने आपल्याला आपले डोंगरी कौशल्य वापरावे लागते पण पाण्याच्या वाटेवरून उलट वर जात राहिलो तर फारसा त्रास पडत नाही. आम्ही सुद्धा गप्पा टाकत टाकत वर चढत होतो. झाडीच्या शेवटच्या टप्यामधून वर जाता-जाता जरा वाट चुकलोच. इतक्यात खाली उतरणाऱ्या २ जणांनी डाव्या बाजूने चांगली वाट आहे असे सांगितले. ज्यावाटेने जात होतो तिकडून अजून पुढे गेलो असतो तर नक्कीच 'पोचलो असतो' किंवा किमान 'वाट तरी लागली' असतीच. इकडे अनुजाने एक गोल मारलाच. नशीब फारसे काही लागले नाही. थोडेसे खाली सरकलो आणि डाव्या बाजूने वर जायला लागलो. सागरचा हा पहिलाच ट्रेक होता पण पठ्या सर्वात पुढे होता. कधी एकदा वर पोचतोय असे झाले होते. त्या मागोमाग दीपक आणि अनुजा होते. मी, सुहास आणि भारत सर्वात मागे होतो. झाडी मधून वर पोचल्यावर जरा दम घेतला. मागे पवना धरणाच्या पार्श्वभूमीवर लोहगड साद घालत होता. सर्वत्र हिरवळ होती... पाऊस मात्र आज रुसला होता. एक टिपूर सुद्धा पडले नव्हते. आम्ही पावसाने नाही तर घामाने भिजलो होतो. वर पोचायला माझ्या अपेक्षेपेक्षा कमी वेळ लागला होता. अवघ्या तासाभरात आम्ही माथ्यावर होतो. समोरून झिरपणाऱ्या थंडगार पाण्याने ताजेतवाने झालो आणि ५ मिनिटे निवांत बसून गडफेरीला सज्ज झालो.
 
                                                चढणीच्या मधल्या टप्यामधून दिसणारा लोहगड...
 
तिकडून थेट डावीकडे निघालो आणि तटबंदीच्या फांजी वरून चालत-चालत लोहगडच्या दिशेने टोकाला निघालो. तटबंदी संपली तसे खाली मातीत उतरलो. वाटेत जमीन सर्वत्र मऊ-मऊ झाली होती. मध्येच खेकडे पळायचे तर मध्येच सोबत असलेले कुत्रे. जरा कुठे पाण्याचे डबके दिसले की जाऊन मस्त डुंबायचे. बाहेर येऊन गवताला अंग पुसत लोळायचे. आपल्याला सुद्धा असे करता येईल का असा मनात विचार यायच्या मध्येच. पण नंतर लक्ष्यात यायचे आपण आता तितके फ्लेक्सिबल राहिलेलो नाही... :) विसापूरच्या टोकाला पोचलो. लोहगड आणि त्याचा विंचूकाटा दिसत होता. त्यावरून चालणारी बारीक माणसे देखील दिसत होती. भाजे लेणी आणि त्याबाजूने वर येणारी जत्रा देखील दिसत होती. थोडीशी पेटपूजा केली आणि गडाच्या उत्तर दिशेला निघालो. ह्या ठिकाणी १००-२०० मीटर तटबंदी उत्कृष्ट स्थितीमध्ये आहे. बुरुज, जंग्या आणि फांजी सर्व एकदम अस्सल मराठी बांधकाम. बाकीची पूर्ण तटबंदी इंग्रजांनी १८१८ मध्ये पडून टाकली आहे. विसापूर पडला तसा २ दिवसात लोहगड सुद्धा इंग्रजांना विशेष प्रयास न करता मिळाला. बरोबर मध्यभागी एक मोठा चुन्याचा घाणा आहे. तटबंदी उभी करताना वापरला गेलेला...
 
                                                                   चुन्याचा घाणा  ...
 
तसेच तटबंदी वरून पुढे जात होतो इतक्यात एका माकडाने आम्हाला हूल दिली. हल्ला नव्हता पण नुसतीच हूल दिली. नशीब आमच्या सोबत कुत्रे होते. त्यांनी लगेच माकडावर प्रतिहल्ला करून त्याला तटबंदीवर रोखून धरले. इतक्या वेळात मी तटबंदी वरून खाली उडी मारून सुरक्षित जागी पोचलो होतो. माझ्या हातातले छायाचित्रण करण्याचे यंत्र न जाणो त्याने खाद्ययंत्र समजून खेचले असते तर... तिकडून सरळ तटबंदी सोडून गडाच्या मध्यभागी असलेल्या टेकडीच्या पायथ्याकडे निघालो. या ठिकाणी मिशिवाल्या मारुतीची प्रस्तरामध्ये कोरलेली अखंड मूर्ती आहे. दोन्ही बाजूला पाण्याची टाक आहेत. नेमका शनिवार होता. दर्शन घेतले आणि मनोमन 'जय हनुमान' म्हणत पुढे निघालो.
 
 

मिशिवाल्या मारुतीची प्रस्तरामध्ये कोरलेली अखंड मूर्ती आणि पाण्यामध्ये मूर्तीचे प्रतिबिंब...   

गडाच्या उत्तर दिशेने मुंबई-पुणे हाय-वे दिसत राहतो. पुढे जात राहिलो की वाटेत अनेक पाण्याची टाक लागतात. त्यातले बरेच आता पिण्यायोग्य राहिलेले नाहीत. वाट आपल्याला गडाच्या मुख्य दरवाज्याकडे घेऊन जाते. डाव्या बाजूला पुन्हा जरा खाली उतरलो की प्रस्तरात खोदलेल्या पायऱ्या लागतात. इकडे पोचलो असता थोडा पाउस सुरु झाला आणि नेमक्या पायऱ्या निसरड्या झाल्या. पहिल्याच पायरी वरून माझा पाय सटकला आणि स्वतःला सावरायला वर नेलेला हात जोरात सुहासच्या डोळ्यावर जाऊन बसला. बसला म्हणजे.. बसला म्हणजे.. जोरदार बसला. बिचारा पुढचे १० मिनिटे डोळा चोळत बसला होता. तिकडून पायऱ्या उतरून (की सरकून.. सरकून..) एकदाचे खाली पोचलो. इकडे अजून एक मारुतीची मूर्ती आहे. वरती असणाऱ्या मारुती सारखीच. शिवाय बाजूला २ मोठ्या देवड्या आहेत. इकडे फार वेळ न थांबता पुन्हा वर आलो आणि गडाच्या पूर्व दिशेने निघालो. वाटेत एक तोफ पडलेली दिसली. इकडून पुढे गडाचा निशाण बुरुज आहे. विसापूरचा बहुतेक इतिहास हा लोहगड सोबत गुंफलेला आहे. पुरंदरच्या तहात ह्या किल्ल्याचे नाव 'इसागड' असे दिलेले आहे. विसापूरबद्दल सर्वात महत्वाची नोंद असेल तर ती कान्होजी अंग्रे यांचे पुत्र तुळाजी आंग्रे यांची. पेशव्यांनी १७३३ च्या आसपास 'तुळाजी आंग्रे'ला या किल्ल्यावर नजरकैदेत ठेवले होते.

पूर्व दिशेने पुन्हा दक्षिण दिशेकडे पोचत गड प्रदक्षिणा पूर्ण केली आणि जिकडून वर चढून आलो होतो तिकडे येऊन निवांत बसलो. छान वारा सुटला होता. आसपास गाई-गुरे चरत होती. सोबत आलेली २ कुत्री लोळत बागडत होती. कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते. जे काही भवताली आसमंतात होते ते सर्वकाही डोळ्यात साठवून घेत होते. समोर बुलंद लोहगड उभा होता. पलीकडे मागे पवनाच्या प्राश्वभूमीवर तुंग-तिकोना उभे होते. पुन्हा एकदा एक नजर ते दृश्य डोळ्यात साठवून घेतले. पुन्हा इकडे कधी येईन काय माहित!!!

२ वाजले होते. आल्या वाटेने उतरायला सुरवात केली. अवघ्या २० मिनिटात आम्ही खाली लालमातीच्या वाटेला लागलेलो होतो. आणि तिकडून काही मिनिटात पुन्हा वाडी मध्ये पोचलो. ट्रेकची सांगता झाली होती. एक छोटासा मात्र अतिशय आनंद देणारा ट्रेक पूर्ण करून आम्ही भरून पावलो होतो. असे अजून ट्रेक्स व्हायला हवेत असे सर्वांचेच मत होते. वाडीमध्ये बाळूकडे झुळका-भाकर आणि अंडाकरीची ऑर्डर दिली आणि पुन्हा एकदा गप्पा टाकत बसलो. जेवण झाले तसे परतीच्या वाटेला लागलो. लोणावळ्यामध्ये पुरोहित चिक्कीला थांबलो आणि सर्वांनी चिक्की घेतल्या. दिपकने मात्र घरी कोणीच नाही म्हणून चिक्की घेतली नाही. अनुजाच्या मते मात्र 'घरी नाहीत तरी गाडीत लोक आहेत तेंव्हा दीपकने सुद्धा चिक्की घ्यायला हवी होती' असे होते. त्यावरून त्याला थोडे पिडले. भारत लोणावळ्यावरूनच पुण्याला परत गेला आणि आम्ही मुंबईच्या दिशेने गाडी मारली. मावळातला पवनाकाठचा विसापूर हळूहळू मागे पडत गेला... राहिला आता फक्त आठवणीमध्ये... पुन्हा त्याला भेटायला जाईपर्यंत...