ह्या आधी २-३ वेळा राजगड दर्शन झालेले होते. ह्यावेळी मात्र राजगडाला प्रदक्षिणा मारायची योजना होती. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून २२५ दुर्गप्रेमी राजगडावर हजेरी लावणार होते. मालाड येथील नेचर लवर्स या संस्थेने हा कार्यक्रम ठरवला होता. माहिती द्यायला सोबत असणार होते इतिहासतज्ञ आप्पा परब. पहाटे ५ च्या आसपास पुण्याला पोचलो आणि मी लगेच माझा मोर्चा एस.टी. स्थानकासमोरच्या चहावाल्याकडे वळवला. सोबत एक क्रीम रोल खाल्ला आणि ६ च्या वेल्हे गाडीची वाट बघत बसलो. गाडी आल्यावर माझी सर्वात आवडती जागा पकडली. इथे-तिथे कुठे नाही तर थेट ड्रायव्हरच्या बाजूला, गियर बॉक्सच्या शेजारी. एस.टी. मधून प्रवास करताना मला नेहमीच ही जागा आवडते. २ तासात साखरला पोचलो. एस.टी. ला टाटा केला आणि गुंजवणेची वाट पकडली. आता पुणे-सातारा महामार्ग सोडून गाडी आत वळली आणि काही वेळातच दूरवर राजगड साद घालू लागला होता.
गुंजवणेला नेचर लवर्स संस्थेच्या सदस्यांकडे आल्याची नोंदणी केली. राजगडला आले की बेधुंद व्हायला होते. मनात अनेक विचार दौडत असतात. त्या विचारांवर स्वार होत गड चढणीला लागलो. जरा वरच्या टप्याला गेलो की डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ, झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसते. ते बघत वरच्या चढणीला लागलो. मध्ये लागणाऱ्या सपाटीनंतर वाट निमुळती होत अधिक चढणीला लागते आणि चोरवाट असल्याची साक्ष देत राहते. तासा - दीडतासाने शेवटच्या टप्प्यामध्ये वाट कड्याखालून गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याच वाटेवर सुरु होतो 'राजगड प्रदक्षिणेचा मार्ग'. कारवी जिथे सुरु होते तिथून चोर दरवाज्याकडे येण्याऐवजी जर तिकडून झाडीमध्ये डावी मारली तर एक बारीक पायवाट गुंजवणे दरवाजाच्या दिशेने जाते. ही वाट फारशी मळलेली नाही. मी कड्यावरून चढून चोर दरवाज्यामधून प्रवेश करता झालो आणि पद्मावतीमाची वरच्या आई पद्मावतीच्या देवळाच्या बाजूला एका टेन्टमध्ये विसावलो. अनेक जण येऊन पोचले होते. अनेक गड चढून येत होते. ६ वर्षाच्या चिमुरड्यापासून ते ६६ वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व वयोगटाच्या लोकांचा उत्साह बघण्याजोगा होता. आजच्या दिवसात जमेल तितका राजगड बघणे आणि उद्या गडाची प्रदक्षिणा मारणे असा २ दिवसाचा कार्यक्रम नक्की होता.
पद्मावती तलाव
राजगड - ज्या ठिकाणी राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये. त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटीसारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणून तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे.
आई पद्मावती
दुपारच्या जेवणापर्यंत सर्व दुर्गयात्री गडावर येऊन पोचले होते. संस्थेचे काही मुख्य सदस्य आणि आप्पांची मुलगी शिल्पा हीच्यासोबत सर्वजण गडफेरीला निघाले. मी मात्र देवळात आप्पांबरोबर थांबलो होतो. राजगड तसा २-३ वेळा बघून झाला होता. आज मात्र आप्पांबरोबर अधिक वेळ राहून काही अधिक ऐतिहासिक माहिती घेणे ही इच्छा होती. त्यामुळे पटापट सुवेळा माची आणि आसपासचे फोटो घेऊन पुन्हा देवळाबाहेर येऊन बसलो. त्या १-२ तासात ज्ञानात खूप भर पडली. राजगडाचे मूळ नाव मुरुमदेवाचा डोंगर. राजगड नाव दिले शिवरायांनी. आप्पांच्या मते खरेतर 'मुरूमदेव' हा 'बुहृमदेव' याचा अपभ्रंश असावा. बुहृमदेव म्हणजेच ब्रह्मदेव. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आजही ब्रह्मश्रीचे मंदीर आहे. शिवाय पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिर सुद्धा संयुक्तिक वाटते. खुद्द नावावरूनच राजगडाचे प्राचीनत्व समोर येते. राजगडाच्या बाबतीत आप्पांनी सांगितलेली अजून एक गोष्ट म्हणजे तोरणा प्रमाणे इथे सुद्धा शिवरायांना झालेला धनलाभ. गडाच्या गुंजवणे दरवाज्याची काम सुरु असताना एके ठिकाणी अचानक गुप्त धन सापडल्याची काही माहिती 'सप्त प्रकाराणात्मक' बखरी मध्ये दिलेली आहे. राजगडाच्या दोन्ही माच्या म्हणजे सुवेळा आणि संजीवनी यांच्या नावाबाबत सुद्धा काही माहिती ह्या बखरीमध्ये आढळते.
सुवेळा माचीचा विस्तार!
झुंजार बुरूज
हत्ती प्रस्तर
सूर्य कलायला लागला तसे सर्वजण परतू लागले. संध्याकाळी आप्पांचे छोटेसे व्याख्यान होते. शिवाय त्यांच्या 'राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर' ह्या पुस्तकाचे प्रकाशन देखील होते. वयाची सत्तरी गाठलेल्या आप्पांचा खणखणीत आवाज राजगडाच्या पद्मावती माचीवर निनादत होता. राजगडाचे सखे-शेजारी सिंहगड, तोरणा आणि दुरून रायगड ह्या सर्वांचेच आज राजगडाकडे लक्ष्य लागले होते बहुदा. म्हणता म्हणता आप्पांनी १७व्या शतकातला राबता राजगड आमच्या डोळ्यासमोर उभा केला. ते देऊळ, माची, ते बुरुज, सदरं सारे सारे काही पुन्हा शहारून जागे झाले होते. भारावलेले काही क्षण ते पुन्हा नक्कीच जगले असतील. व्याख्यान संपले तसा गडही शांत झाला. आम्ही जेवून निद्रिस्त व्हायची तयारी केली आणि आपापल्या टेन्टमध्ये जाऊन पहुडलो. मी कपाळावर हेडटोर्च चढवला आणि नुकतेच प्रकाशित झालेले ते छोटेखानी पुस्तक अर्ध्या तासात पूर्ण वाचून काढले. रात्रीच्या ११ नंतर पुन्हा एकदा टेन्ट बाहेर आलो तर सर्वत्र सामसूम होती. वारा मोकाट सुटला होता आणि दूरवर फडकणाऱ्या जरीपटक्याला जोराने फडकावत होता. मी पुन्हा आत येऊन झोपी गेलो. उद्या पहाटे ६ वाजता गड सोडायचा होता. प्रदक्षिणेच्या वाटेवर लागायचे होते.
पहाटे ६ वाजता उठून तयार झालो. बरोबर ७ वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने प्रदक्षिणेसाठी गड सोडला आणि तो छोटासा कडा उतरून कारवीच्या वाटेवर लागलो. पुढे-मागे सोबत प्रदक्षिणार्थी होतेच. कारवी संपली तिथून उजव्या हाताला आत शिरलो आणि प्रदक्षिणा सुरु झाली. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसत होते. अंदाज बांधला. तिथपर्यंत पोचायला किमान २ तास तरी लागणार. आता झाडी कमी झाली होती आणि उंच वृक्षातून डोकावणारे सकाळचे कोवळे उन आल्हाददायक वाटत होते.
मध्येच एके ठिकाणी कड्यावर अनेक मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसली. त्यांच्या वाटेला कोण जाणार! गुपचूप आवाज न करता सर्वजण पुढे सरकलो.अधून मधून हळू आवाजात गप्पा सुरु होत्या. कोण कुठून आलाय. वगैरे वगैरे. बहुतेक लोक पुण्या-मुंबई आणि सातारा-कोल्हापूरचे होते. काही रत्नागिरी-रायगड तर काही नाशिक आणि पार नगर-औरंगाबादहून देखील आलेले होते. मोजके २-३ लोक तर थेट नागपूरवरून आलेले होते. तासभराच्या चाली नंतर मध्ये एके ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. तिकडे कोपऱ्यात एक छोटूसे घरटे दिसले. पण घरात कोणीच नव्हते. सकाळी-सकाळी बहुदा कामावर निघून गेले घरातले लोक!!!
आम्ही पूर्व दिशेने निघालो होतो तेंव्हा आता उन समोरून यायला लागले होते. सुवेळामाचीच्या उतरत जाणाऱ्या डोंगरसरी एक-एक करून पार करत आम्ही त्या टोकाकडे निघालो होतो. माझे लक्ष्य चौफेर होते. एक तर अशी भ्रमंती पुन्हा सहसा होणार नव्हती. तेंव्हा जे दिसेल ते डोळ्याने आणि कॅमेऱ्याने टिपणे हे माझे लक्ष्य होते. दर काही पावलांनी मी वळून मागे बघत असे. अश्याच एका वेळी टिपलेला हा बालेकिल्ल्याच्या महादरवाज्याचा फोटो.
राजगडाचा बालेकिल्ला का अभेद्य आहे त्याचा एक प्रत्यय... आहे कोणाची हिंमत तिथवर पोचायची?
सुवेळा माचीपर्यंत पोचायचे अर्धे लक्ष्य पूर्ण झाले होते. आता वाट अधिक वाट लावत होती. आम्ही आता झुंझार बुरुजाच्या खाली होतो. वाटेत एकेठिकाणी छोटीशी खोदीव गुहा लागली. आत्तापर्यंत राजगड बाबतीत मी ह्या गुहेचा उल्लेख कुठेच वाचलेला नाही. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या बरोबर खाली असलेल्या ह्या गुहेबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती हाती लागली नाही. संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे निश्चित काही महत्व असू शकेल असे वाटते.
हत्तीप्रस्तरच्या खालच्या बाजूने. वाघाचा डोळा म्हणजेच 'नेढं' पण दिसतंय!
वर पहिले तर लक्ष्य थेट 'हत्तीप्रस्तर' आणि 'वाघाचा डोळा' उर्फ नेढ्याकडे गेले. जबरदस्त नजारा होता. आता आम्ही सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्याचे अंतर बाहेरून पूर्ण करत होतो. जेंव्हा मी माचीच्या बाहेरील बाजूस पोचलो तेंव्हा जे पहिले ते थक्क करणारे होते.
सुवेळा माचीची बाहेरील बाजू.. जणू राजगड सांगतोय, 'लढलो जरि, ना पडलो मी!'
जेंव्हा औरंगजेब खुद्द राजगडावर चालून आला तेंव्हा मुघलांनी सुवेळा माचीच्या बाजूने मोर्चे बांधून तोफांचे प्रचंड हल्ले केले होते. खासा बादशाहा जातीने उभा राहून तोफा कुठे डागायच्या ते सांगत होता. त्याच्या खुणा आजही तिथे स्पष्ट दिसतात. ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांनी वीर पराक्रम केला. मराठ्यांनी तोफांचा असा काही प्रतिहल्ला केला कि खुद्द बादशाहा उभा असलेला धमधमा पडला आणि अर्थात औरंगजेब सुद्धा पडला होता. परंतु अखेरीस ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांना वीरमरण आले. तोफेचा गोळा लागून हा वीर मराठा धारातीर्थी पडला. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या जरा पुढे उजव्या हाताला असलेला गणपतीच्या जागी आधी संताजींची वीरगळ होती असे म्हणतात.
इकडे काहीवेळ उसंत घेतली आणि सुवेळा माचीला वळसा घालत. काळकाई बुरुजाच्या दिशेने निघालो. वाट अधिकच घसरत होती. जमेल तिथे हाताला जे सापडते ते पकडून पुढे सरकावे लागत होते. १० वाजून गेले होते आणि उन आता पाठीवर हल्लाबोल करत होते. कधी एकदा काळकाई बुरुजाच्या खालच्या गर्द झाडीत शिरतोय असे झाले होते. तिथे पोचायला तरी तासभर लागलाच. सावली मिळाल्यावर जरा निवांत बसलो. वर बघतो तर संस्थेचे काही कार्यकर्ते काळकाई बुरुजावरून दोराच्या सहाय्याने पाण्याचे ड्रम खाली पोचवत होते. कोणालाही उनाचा त्रास होऊ नये ह्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सुवेळा माचीला देखील त्यांनी असेच केले होते. हवे तितके पाणी प्यायचे आणि बाकी भरून घ्यायचे. आता आम्ही सावलीतून पुढे निघालो. इकडे २ ठिकाणी दोराच्या सह्हायाने खाली उतरायचे होते. खरेतर इतके कठीण नव्हते पण काहीजण नवखे असल्याने जास्त वेळ घेत होते. ज्यांना जमत नव्हते त्यांना धीर देत पुढे न्यावे लागे. पण महत्वाचे म्हणजे कोणी मागे हटत नव्हते. वेळ लागला तरी हे करायचेच आहे हा निर्धार प्रत्येकाने केलेला होता. इतक्या मोठ्या संखेने लोकांबरोबर ट्रेक करायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मी सुद्धा एकटाच ह्या ट्रेकला आलेलो होतो. मला थेट ओळखणारे असे कोणीही ह्या २२५ लोकांमध्ये नव्हते. तरी सुद्धा सर्वजण एकमेकांना सांभाळत, काळजी घेत ट्रेक करत पुढे सरकत होते. आमच्यात असणारा एकमेव समान दुवा म्हणजे शिवरायांवर असणारी निस्सीम भक्ती, आदर आणि देवतुल्य भावना. हा एक दुवा आमच्यात नवे बंध निर्माण करायला पुरेसा होता.
काळकाई बुरुजाच्या खालचा हा छोटासा टप्पा पार करायला चांगले २ तास लागले. वळसा मारून आता आम्ही संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. १२ वाजून गेले होते आणि पोटात भूक जाणवायला सुरवात झाली होती. उजव्या बाजूला वरती अळू दरवाजा आणि तिथून दोराच्या सह्हायाने खाली पाठवले जाणारे साहित्य पाहिले आणि खात्री पटली की चला जेवाय-जेवाय करायचे आहे. बरेच दिवसांनी वनभोजनाचा आनंद लुटला आणि जरा निवांत झालो. आता पुढची वाट बरीच सोपी होती. राजगडवरून तोरणाला ज्या वाटेने जातात तीच वाट आता घ्यायची. उजव्या बाजूला संजीवनी माचीचे दुहेरी संरक्षण बुरुज अगदी जवळ दिसत होते.
दुहेरी बुरूज संरक्षण... अद्वितीय तटबंदी... संजीवनी माची
संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले. ना कोणी करू शकेल. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. आम्ही आता एका बाजूचे ३ दुहेरी बुरुज बघत होतो. आत जाणे आत्ता शक्य नव्हते पण त्यासाठी मी उद्याचा दिवस हातात ठेवला होता. काही मिनिटात संजीवनी माचीला वळसा मारत पुन्हा राजगडाच्या राजमार्ग म्हणजे पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. वाट आता होती आणि इथून संजीवनी माचीचे ३ टप्प्यात केलेले बांधकाम स्पष्ट दिसत होते.
संजीवनी माचीचे तीन टप्प्यांमधले घडीव देखणे बांधकाम!
पाली दरवाजा- दुहेरी रचना!
वाटले नव्हते पण जेवून निघाल्यावर सुद्धा चांगले ३ तास लागले होते पाली दरवाज्यापर्यंत यायला. संजीवनी माचीची लांबी किती आहे ह्याचा प्रत्यय नेमका येत होता. गडाची प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. तब्बल ११ तास लागले होते प्रदक्षिणेला. पण एक इच्छा पूर्ण झाली होती. सूर्य पुन्हा एकदा निरोप द्यायला तयार झाला होता. मी पुन्हा राजमार्गाने गड चढून पद्मावती माचीकडे पोचलो आणि सदरेमागच्या तटबंदीवरून सूर्यास्त बघू लागलो.
दिवसा अखेरीस प्रदक्षिणा संपली असली तरी जेवणाआधी अजून एक कार्यक्रम बाकी होता. शिवरायांची पालखी नाचवायचा. पेटत्या मशाली, फडकणारे जरीपटके आणि मधोमध श्री शिवछत्रपतींची पालखी. वा!!!
ह्यापेक्षा अधिक उल्हासित करणारा सोहळा कुठला? आज संपूर्ण भरून पावलो. शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. गड पुन्हा एकदा जागा झाला होता. बऱ्याच काळाने शहारून उठला होता तो. आपली माणसे भेटली की जसा आपल्याला आनंद होतो तसा आनंद राजगडाला झालेला होता. बऱ्याच काळाने गड शांत झाला. सर्वजण पांगले. जेवणे आटोपली. निवांत पडले. पहाटे उठून पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचे होते ना.
मी सकाळी जरा उशिराने उठलो. सर्वांची आवरा-आवरी सुरु होती. सर्वत्र साफसफाई करून गड सोडायचा होता. आणि मग तिथून आपापल्या घरी. मी मात्र मागे थांबणार होतो. गड जरा उशिराने सोडायचा मी ठरवले होते. स्वतःचे सामान पाठीवर मारले, आप्पांना नमस्कार केला आणि निरोप घेऊन मी बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी बालेकिल्ल्याच्या दरवाजातून मला एक फोटो घ्यायचा होता.
बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आतील बाजूने. समोर दिसतोय सुवेळा माचीचा विस्तार!
संजीवनी माची ... !
बालेकिल्ल्यावर एक धावती चक्कर मारली आणि उतरून संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. जमेल तितके पुढे जाऊन मला काही फोटो घ्यायचे होते.
मोजके फोटो घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. खरेतर दुहेरी बुरुजांपर्यंत जाऊन काही फोटो घ्यायचे होते पण ते शक्य झाले नाही. मी वळून पुन्हा पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. तिथे काही वेळ घालवून मी पुन्हा पद्मावती माचीकडे निघालो. खरेतर तिकडून उतरून वाजेघर मार्गे जाता आले असते पण मी पुन्हा गुंजवणे मार्गेच उतरायचा निर्णय घेतला. पद्मावती आईच्या मंदिरापाशी आलो. सर्वत्र सामसूम होती. सर्व निघून गेले होते. गडावर बहुदा मी एकटाच होतो. नाही म्हणायला एक कुत्रा समोर स्तंभापाशी बसला होता. मंदिरात जाऊन आईला नमस्कार केला. बाहेर येऊन उजव्या बाजूला पहिले तो बालेकिल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जरीपटका अजूनही डौलाने फडकत होता. नकळत एक हात छातीवर गेला. राजांचे स्मरण झाले. मी दोन्ही हाताने सॅक टाईट केली आणि झपाझप पावले टाकत परतीच्या वाटेला लागलो. चोर दरवाजाच्या पायऱ्या उतरायच्या आधी पुन्हा एकदा नजर मागे वळलीच. मनातच म्हणालो,"राजगडा... मी पुन्हा येणार आहे. लवकरच...
हाच लेख यंदाच्या मायबोली हितगुज दिवाळी अंकात देखील प्रसिद्ध झालेला आहे.