Friday, 8 January 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड ...पार्श्वभूमी ... !

दिनांक : २०-८-२००० ... ठिकाण : कोलेजचा कट्टा.

"'आजोबा पर्वत'च्या पहिल्याच ट्रेकला सोलिड मज्जा आली रे. असे अजून काही मस्त ट्रेक्स लवकरच करायला हवेत" मी मित्रांना सांगत होतो. आदल्याच दिवशी केलेल्या आजोबा ट्रेकपासून माझी डोंगरयात्रा नुकतीच सुरू झाली होती. त्या एका दिवसातच सह्याद्रीच्या रांगडया सौंदर्याने इतका भारावलो होतो की आता या सह्ययात्रेमध्ये पुरते विलीन व्हायचे असे मनोमन ठरवले होते. आजोबा ट्रेकवरुन निघतानाच 'पुढचा ट्रेक कधी?' हा प्रश्न विचारून झाला होताच. पुढचा ट्रेक १-२ नाही तर तब्बल ५ दिवसांचा असून दिवाळी दरम्यान आहे असे कळले होते. काही आजोबा ट्रेकमधली टाळकी आणि काही नवीन टाळकी यूनीव्हरसिटीला काका (आमचे ट्रेकिंगचे गुरु) आणि राजेश सोबत भेटून ट्रेकबद्दल पुढे ठरवणार आहेत असे मला अभिजित कडून समजले होते. मी त्यावेळी NCC च्या 1st इयर ला तर अभि 3rd इयर ला म्हणजे माझा सिनिअर होता. पण मी लगेच जायचे ठरवले आणि ट्रेकसाठी नाव नक्की केले.

या ट्रेकसाठी प्लानिंगची जबाबदारी राहुल, शेफाली, सत्यजित आणि हिमांशु यांना दिली गेली होती. ५ दिवसांसाठी लागणाऱ्या जेवणाच्या सामानापासून इतर बारीकसरिक जे काही लागेल त्या सर्व गोष्टींची यादी बनवून ते विकत घेणे, ट्रेक रूट नक्की करणे आणि त्याप्रमाणे वेळेचे गणीत मांडणे अशी बरीच कामे त्यांना करायची होती. ही एक छोटेखानी मोहिमच होती. महत्वाचे म्हणजे ह्यापैकी कोणीही आधी कधीही अशी प्लानिंग केली नव्हती. तेंव्हा राहुल, शेफाली, सत्या आणि हिमांशु यांच्यासाठी ही एक मोठे मिशन होते. कवीश ह्या ट्रेकचा लीडर असणार होता कारण त्याला १-२ ट्रेक्सचा अनुभव होता. पण तो ट्रेकच्या दुसऱ्या दिवसापासून येणार असल्याने पहिला दिवस हिमांशू लीडर असणार होता. मी, अभिजित आणि आशिष पालांडे त्यावेळी अगदीच नवखे होतो. शिवाय आमच्यापैकी बरेच जण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते.

अखेर सर्व नक्की झाले. २१ ते २६ ऑक्टोबर २००० असा दिवाळीच्या तोंडावरचा ट्रेकचा कालावधी ठरला. ठाणे-मुंबई मधल्या कोलेजेस मधील आम्ही एकुण १८ ट्रेकर्स. राहुल, शेफाली, सत्यजित, हिमांशु, अभिजित, मनाली, कविता, दीप्ती बावा, सुमेधा, आशिष पालांडे, कवीश, प्रवीण, सुरेश नागवेकर, प्रशांत आचरेकर, अभिषेक डोळस, संतोष मोरया, विवेक आणि मी. सोबतीला होते ३ अनुभवी मार्गदर्शक ट्रेकर्स ज्यात काका, राजेश आणि विली यांचा समावेश होता. आमच्या १८ जणांमध्ये कोणालाही ट्रेकिंगचा अनुभव नव्हता. तो ही खास करून सह्याद्रित ४-५ दिवस राहण्याचा. ट्रेकचा रूट असणार होता. कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़. ट्रेकनंतर आम्ही थेट माळशेज घाटात उतरणार होतो.

२० ऑक्टोबर पर्यंत सर्व तयारी झाली होती. आम्ही सर्वजण शनिवारी २१ तारखेला दुपारी ४ च्या आसपास ट्रेनने सी.एस.टी. ला पोचलो. आजोबा ट्रेकनंतर राहुल बरोबर ओळख झालेली होती. ट्रेनमध्ये त्याने आमची शेफाली आणि सत्याबरोबर ओळख करून दिली. माझ्यासोबत माझे कोलेज फ्रेंड्स अभिजित,  हर्षद उर्फ़ जाड्या आणि अभिषेक होता. शिवाय NCC सिनिअर्स कवीश आणि प्रवीण दुसऱ्या दिवशी होतेच. सी.एस.टी.ला पोचल्यानंतर इतर सर्वजण भेटले आणि आम्ही इगतपुरीला जायच्या गाडीत बसलो. सोबत प्रचंड सामान होते म्हणुन दादर-ठाणे ऐवजी सर्वांनी सरळ सी.एस.टी.ला बसायचे काकाने ठरवले होते. सर्वांशी तोंडओळख झाली. मनाली, कविता आणि सुमेधा या माझ्या डोंगरातल्या मैत्रिणींना (डोंगरातल्या म्हणजे डोंगरात राहणाऱ्या नव्हे तर डोंगरातल्या भेटलेल्या... हाहा..) आणि प्रशांत, सुरेश, हिमांशू या मित्रांना पहिल्यांदा भेटलो. आशीष, राहुलला तर आजोबाला भेटलो होतोच.

ट्रेनचा प्रवास इगतपुरीच्या दिशेने सुरू झाला आणि आमचा प्रवास महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करण्याकडे... कळसूबाई... आजवर ऐकले होते, वाचले होते; पण आता मी स्वतः त्या शिखरावर पाय रोवायला सज्ज होतो. माझा एक अविस्मरणीय असा सह्यप्रवास सुरू झाला होता ...
.
.
पुढील भाग - कळसूबाईच्या शिखरावरुन ... !
.
.

13 comments:

 1. माझा हा परिसर राहुनच गेला

  ReplyDelete
 2. माझं हरिश्चंद्रगड झालाय. तेव्हाच दमछाक झाली होती पार (अर्थात कोकणकड्यावर आडवा होऊन खाली बघताना सगळं दमणं एका क्षणात विसरून पण गेलो.) पण हे कळसूबाई ते हरिश्चंद्रगड म्हणजे जास्तच होतंय. जाम मजा आली असणार. पुढचा भाग येउदे लवकर.

  ReplyDelete
 3. Rohan, this is the best write up. It brings back so many memories. No words to express

  ReplyDelete
 4. रोहन खूपच मस्त वर्णन केले आहेस.भंडारदरा धरण-रतनगड व हरिश्चंद्रगड झालेय पण कळसुबाई मात्र अजून केलेले नाही. तुम्ही मस्त धमाल केली असणार.

  ReplyDelete
 5. आत्ता सुद्धा करू शकता हरे कृष्णाजी ... :)

  हेरंब ... मी ३ वेळा गेलोय हरिश्चंद्रगडला पण कोकणकडयाची नशा जात नाही बघ ... भन्नाट प्रकार आहे तो .. पुढे लिहेनच.

  ReplyDelete
 6. लवकर आम्हाला कळसूबाईच्या शिखरावर घेउन चल...

  ReplyDelete
 7. होय कविता ... कधी पासून लिहेन-लिहेन म्हणत होतो अखेर मुहूर्त लागलाच .. :)

  भाग्यश्री ताई .. पुढे पुढे धमाल येईलच. तुम्ही रतनगड़ला गेला आहात ??? लिहा की जरा... :)

  ReplyDelete
 8. होय रे देवेन्द्र ... हा बघ टाकतोच पुढचा भाग काही वेळात .... :)

  ReplyDelete
 9. पोहोचलास इगतपुरीत....
  आज एकदम सगळे भाग वाचतेय......
  आता निघालेय पुढील भागाकडे...
  (एकदम तुझी श्टाईल बघ आता ही....तू प्रवासवर्णन कर मी वाचनाच्या प्रवासाचे वर्णन केले...)
  असो आता नो टाईमपास पोस्ट वाचायची उत्सुकता आहे...........

  ReplyDelete
 10. होय वाच पटपट ... २ दिवसात पोचेन सुद्धा मी माळशेजला ... :D

  ReplyDelete
 11. sahi aahe rohan, keep it up.

  ReplyDelete
 12. 18 यात्री... काही अनुभवी तर काही अगदीच नवखे. मी का गेलो? खरच माहीत नाही. पण ट्रेक संपताना मात्र उत्तर सापडले.
  ट्रेनमधील तोबा गर्दी. त्यात काकाची बोंबाबोंब. धावपळ आणि धमाल.
  रोहन : सी. एस. टी. ते इगतपुरि प्रवास डोक्यातून डीलिट झालाय. आठवतच नाही.

  ReplyDelete
 13. हो रे.. उत्तरे नंतर मिळाली की सर्व.. कविताला सर्व लक्ष्यत आहे ट्रेन प्रवास ... ती लिहिणार आहे लवकरच.

  ReplyDelete