'आता ह्यावर्षी तरी ह्यापैकी एक ट्रेक झालाच पाहिजे.' मी अभिला संगत होतो.
आमच्या सह्यभ्रमंतीला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक दणदणीत ट्रेक करावा असे आमचे ठरत होते. अलंग रेंज करायची की नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड ह्यावर नेमके शिक्कामोर्तब होत नव्हते. अखेर आम्ही अलंग - मंडण - कुलंग ट्रेक करायचे नक्की केले. २५ ते २८ नोव्हेंबर असे ४ दिवस हातात होते. मोहिमेची खबर बाकी सर्वांना धाडली. पण अगदीच मोजके भटके तयार झाले. जे तयार झाले त्यातून पण अर्धे २ दिवस आधी गळाले. उरलो फक्त मी, अभिजित आणि ऐश्वर्या. शिवाय अभिला काही काम आल्याने ट्रेक १ दिवस पुढे ढकलला. आता २६ ते २९ अश्या तारखा नक्की केल्या.
मी, अभि आणि ऐश्वर्या अश्या तिघांनी सॅक पॅक करून २६ ला भल्या पहाटे १ वाजता ठाणे सोडले. जिथून ट्रेकला सुरवात करायची तिथेच संपवायचा असल्याने अभिने स्वतः:ची गाडी घेतली. सॅक आणि ऐश्वर्या मागच्या सीटवर टाकून मी आणि अभि नाशिक हायवेच्या दिशेने सुटलो. रात्र असल्याने हवेत छान गारवा होता आणि थंडीची चाहूल लागायला सुरू झाली होती. रस्त्यावर रात्रीच्या मोठ्या गाड्यांचे ट्राफिक होते पण मुंबईवरून बाहेर जाणाऱ्या गाड्या रात्री तश्या कमी असल्याने इतका त्रास जाणवत नव्हता. कल्याण फाटा - शहापूर आणि मग कसारा घाट करत घोटीला पोचलो. एका पंपवर गाडीला खाऊ दिला. आम्हाला मात्र कुठेही पहाटे २-३ ला साधा चहा सुद्धा मिळेना. शेवटी एकेठिकाणी एक ढाबा उघडा दिसला. एक चहा मारला तशी तरतरी आली. अभिसाठी ती 'टी' महत्वाची होती कारण पठ्या जरा पेंगतोय की काय अशी मला शंका यायला लागली होती. घोटीपासून घोटी - नागपूर हा महादरीर्द्री आणि निकृष्ट अवस्थेतला रस्ता लागला. नाही..नाही.. खड्डे लागले. आपण आपले त्याला उगाच रस्ता म्हणायचे. मध्ये एके ठिकाणी पेंग आल्याने गाडीवरचा ताबा सुटतो की काय असे वाटल्याने अभिने काही वेळ गाडी बाजूला घेतली. पाय मोकळे केले आणि मग उरलेला शेवटचा काही अंतराचा टप्पा पूर्ण केला.
पहाटे ४:३० वाजता टाकेदला जाणाऱ्या फाट्यावरून उजवीकडे वळून आंबेवाडीला पोचलो. गावातून कोणीतरी रूटर घ्यायचा असे आमचे आधीच ठरले होते. कारण एक तर ही वाट मी आधी कुठेही वाचलेली नव्हती आणि त्याबद्दल कुठूनही माहिती मिळालेली नव्हती. आंबेवाडीतून अलंगला जायला एक मुलगा आम्हाला हवा होता. अगदीच पहाटे गावात शिरायला नको म्हणून जरावेळ गावाबाहेरच थांबलो.
उजाडताना समोर अलंग - मंडण - कुलंग दिसू लागले आणि ओढ अनिवार झाली. गेली १० वर्षे ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो ते अगदीच जवळ येऊन ठेपला होता. ६ वाजता गावात प्रवेश केला आणि एका मुलाला जुजबी वाट विचारून घेतली. 'देवळापाशी बाळूचे घर आहे तो गडावर येईल' असे त्याने आम्हाला सांगितले. आंबेवाडीमधल्या त्या देवळासमोरच्या प्रशस्त्र अंगणात गाडी टाकल्याबरोबर तिथल्या पोरांनी एकच गलका केला. इतक्या सकाळी-सकाळी काय उत्साह पोराना. २-४ लोक पण त्यांच्या घराबाहेरून आले. देवळातल्या मामाला बाळूचे घर विचारले. त्याच्या घराकडे गेलो तर न्हाणिक उरकून बाळू नुकताच तयार होत असावा असे दिसले.
आम्ही त्याला गडावर येण्याबद्दल विचारल्यावर त्याने आम्हाला तब्बल १५०० रुपये मागितले. मी अवाक... :O
"दादा.. वर जाऊन यायला दिवस जाणार. शिवाय जोखीम कमी नाही. मोठ्या ग्रुपला आम्ही ३-४ हजार रुपये घेतो. लोक पण आनंदाने देतात. तुम्ही तिघेच आहात म्हणून कमी सांगतोय. नाहीतर आम्ही अडून ३-४ हजार घेतोच. बघा काय ते सांगा मला".
मी त्याला म्हणालो,"आम्ही तुला ५०० रुपये देऊ शकतो फारतर. त्यावर नाही. आम्ही इथे वैयक्तिक आलोय. एखादा ग्रुप घेऊन आलो असतो तर तुला ३ काय ५ दिले असते. ५०० जमत असेल तर सांग नाहीतर आम्हाला जुजबी वाट सांग.. आम्ही जाऊ."
बाळू : मोठ्या'वर जायचे म्हणजे दोर हवा. सोपे नाय.
अभि : आमच्याकडे दोर आणि बाकी सर्व सामान आहे.
गावातली लोक अलंगला 'मोठा', मंडणला 'लिंगी' तर कुलंगला 'कुरंग' असे संबोधतात.
बाळू : असे काय. थांबा मी गणपतला बोलावतो. तोपर्यंत चहा घ्या.
आम्ही चहा पियेपर्यंत गावाबाहेरच्या झापावरून तो गणपतला घेऊन आला. ह्या सर्वात सकाळचा बहुमुल्य १ तास वाया गेला होता. अखेर गणपत ६०० मध्ये तयार झाला. गावातल्या पाण्याच्या टाकी बाजूने आम्ही पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो आणि अगदीच २०० मीटर अंतरावर पुन्हा डावीकडे माळरानावर घुसत मळलेल्या वाटेला लागलो. ट्रेक खरया अर्थाने सुरू झाला.
डावीकडे दूरवर कळसुबाई, समोर अवाढव्य पसरलेला अलंग आणि उजव्या बाजूला मंडण - कुलंग असे दृश्य डोळ्यात साठवून आता आम्ही पहिल्या चढणीला लागलो. समोर धुक्याची चादर पसरली होती. सूर्याचे साम्राज्य सुरू व्हायला अजून काही क्षण बाकी होते.
भाताची खाचर संपली होती. त्याच्या कडेकडेने उगवलेल्या झाडांवरचे कोळ्याचे जाळे किती मनोवेधक. निसर्गाचे नक्षीकामच...
चढ सुरू झाला तसा गणपत पण सुरू झाला... म्हणजे तो काही जुन्या गोष्टी सांगू लागला.
"गावात २-४ जणच आहेत जे अलंग दोर न घेता वर जाऊ शकतात. मागे पुण्याहून एक ग्रुप आलेला. आर्मीवाली ४ पोर होती. अतिउत्साह करून गेली वर चढून आन एक पडला ना त्यातला वरून खाली डोक्यावर. नशिबाने वाचला. आम्ही ६ जणांनी आणला त्याला खाली उचलून. तोपर्यंत पुण्याहून आर्मीची गाडी आली. डॉक्टरने एक इंजेक्शन दिला आन त्याला शुद्धीवर आणला कसाबसा. तुमच्या इतकाच होता तो."
शेवटच्या वाक्याने ऐश्वर्या आणि अभि हसायला लागले. मी बिचारा गप्प.
"सदाशिव अमरापूरकरचा भाचा आलेला मागल्या वर्षी. या वर्षी पावसाळ्यानंतर अलंगला येणारे तुम्ही पहिलेच. वाट जरा झाडीत दबलेली असेल पण आपण शोधू."
आम्ही ह्यावर्षी आलेले पहिलेच हे त्याच्याकडून कळले. आता वाट पहिल्या डोंगराला उजवीकडे ठेवत अधिक वर चढू लागली होती. समोर दिसणारे २ सुळके म्हणजे वाटेवरची पाहिली खुण. त्याच्या उजव्या दिशेला तिरपे चढत गर्द झाडी मधली वाट वरच्या टप्याला पोचली की लगेच उजवीकडे सरकत त्या डोंगराच्या माथ्यावर येऊन मग रानातून सरकत सरकत डोंगराच्या उजव्या बाजूने निघायचे. आपण ट्रेकचा पहिला टप्पा पार केलेला असतो. पण अलंग - मंडण फार जवळ आलेले नसतात. दूरवर दोघांमधली खिंड मात्र चटकन नजरेत भरते.
वरच्या टप्यावरून चाल मारली. आता वाट अधिकच चढी. उंच ढांगा टाकायच्या आणि जमेल तिथे झाड पकडत नाहीतर दगडाचा आधार घेत वर जात राहायचे.
पाण्याचे १-२ ओहोळ पार करत 'बिबहोळ' येथे पोचलो. या जागेला बिबहोळ का म्हणतात ते कोणालाच माहित नाही. वीरगळीसारखे काहीसे स्मारक आहे. ही बहुदा गडाखालची मेटेची जागा असू शकते. निघून दीडतास होवून गेला होता. आज नाश्ता झाला नव्हता तेंव्हा भुका लागायला सुरवात झालेली.
मग ऐश्वर्याने तिच्याकडचा खजिना उघडला. लाडू, चकल्या असा दिवाळी फराळ बाहेर पडला. १०-१५ मिनिटात पुढे सुटलो आणि उजवी मारत अलंगच्या कड्याखाली पोचलो. आता ह्या कड्याखालुन मंडणच्या दिशेने चाल करत राहायचे. काही मिनिटात पुन्हा वाट वर चढू लागते आणि ७-८ फुट वाढलेल्या कारवीच्या गच्च झाडीतून ५ एक मिनिटे वर जात आपण थेट अलंगच्या कातळकड्याला भिडतो.
इथपासून कड्यात खोदलेल्या पायऱ्या लागतात. आता अधिक सावधान. उशिरापर्यंत पाउस झाल्याने त्यावरून अजूनही पाणी वाहते आहे. कधी उजवीकडे तोल सांभाळत चढायचे तर कधी वळून डावीकडे.
खाली बघत जरा वाट निरखत चालतोय तर अचानक पुढे झाडीच यावी आणि वाटच बंद.. मग गणपत त्या झाडीत शिरे आणि वाट मोकळी करे. अचानक मागे असलेल्या अभि आणि ऐश्वर्याला गांधीलमाश्या चावू लागल्या. कारवीच्या ८ फुट उंची झाडीमध्ये घुसल्यावर गांधीलमाश्या कुठून येत आहेत आणि कधी चावत आहेत ते कळायला मार्ग नसतो. आपण बस आपलं चावून द्यायचं आणि ओरडायच बास... ऊआ.. आआ.. :D
बराच वेळ पायऱ्या चढून गेलो. खालून बघताना कोणालाही वाटणार नाही अश्या बेमालूमपणे कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या. इथून वर जायचा रस्ता असेल हा विचार स्वप्नात पण येणे शक्य नाही. भन्नाट...
नगरचा एक ग्रुप आलेला.. गणपत पुन्हा सुरू झाला. त्यांनी रोप कसा वापरायचा वगैरे बरच शिकवले. ३ दिवस कॅम्प केल्यानंतर जाताना एक हार्नेस गिफ्ट दिलाय मला. बाळू पण होता बरोबर. हुशार एकदम पण दारूपायी वाया गेलंय ते. सकाळी पहिले दारू पाहिजे. नाहीतर सुतारकामात एकदम तरबेज हा.
बोलता-बोलता अचानक गणपतने सलमानखान पेक्षा पण फास्ट अंगावरचा शर्ट काढून फेकला. म्हटले ह्याला काय झाले. त्याच्या पाठीवरच गांधीलमाशीने हल्ला केल्यावर तो काय करणार बिचारा.. सलमान झाला त्याचा.. :) आता सर्वांमध्ये मीच एकटा बचावलो होतो. पुढचा नंबर माझा ही मला खात्री होती.
कड्यामधल्या पायऱ्यांची वाट संपली आणि झाडीमधली वाट पुन्हा सुरू झाली होती. ५-१० मिनिटात अखेर ती वाट संपली आणि समोर अनेकांच्या फोटोमध्ये पाहिलेला तो प्रस्तर टप्पा दिसला. ह्याच्यार लगेच दुसरा टप्पा आहे ते ठावूक होते. तो दिसत फक्त नव्हता. चढाईच्या टप्प्यावर अजूनही पाण्याचा ओघळ होता. पण गणपत सराईतपणे तो टप्पा पार करून गेला. त्यामागून अभि प्रयासाने टप्पा पार करून गेला. मग ऐश्वर्या महतप्रयासाने तो टप्पा पार करून गेली. शिरस्त्याप्रमाणे सर्वात शेवटी मी. त्याआधी मी तिघांच्या सॅक वर पाठवून दिल्या.
शेवटी मी सुद्धा प्रयास करून तो टप्पा पार केला आणि आम्ही अलंगच्या मुख्य चढाईकडे सरकलो. अलंगचा सर्वात धोकादायक टप्पा. ८० फुट सरळ कडा.
पण आधी हा असा नव्हता. गड राबता होता तेंव्हा इथे सुंदर कोरीव पायरया होत्या. खडकीच्या लढाईमध्ये पेशवा दुसरा बाजीरावाचा पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी सह्याद्रीमध्ये एक मोठी मोहीम आखून अनेक गड किल्ले, त्यांचे मार्ग, पाण्याच्या टाक्या, कोरीव पायऱ्या आणि निवारे सुरुंग लावून उडवून दिले. पुन्हा ह्या किल्याच्या सहाय्याने कोणी आपल्यावर कुरघोडी करू नये म्हणून ते कुचकामी करून टाकायचा कुटील डाव इंग्रज खेळले. ह्या डोंगरी किल्यांचा तसा त्यांना काही उपयोगही नव्हता. गडाच्या अवती-भवती असणारे क्षेत्र त्यांनी संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित केले आणि गड-किल्ल्यांना अगदीच सुने दिवस आले. कोणी तिथे जाईना. फारतर लाकूड-फाटा, दाणा-वैरण जमा करायला गावची लोक कधीतरी जायचे. स्वातंत्र्यानंतर मात्र महाराष्ट्रात गिर्यारोहणाचे वारे वाहू लागले आणि पुन्हा एकदा आपण धाव घेतली ह्या गड-किल्ल्यांवर...
तुटलेल्या पायऱ्यांच्या जागी बसलेल्या सुरुंगाच्या खुणा बघत आम्ही उभे होतो. गणपत एव्हाना कमरेला रोप बांधून तयार झाला होता. पण त्याला थेट वरपर्यंत तसाच चढू द्यायला आम्ही तयार नव्हतो कारण कड्यावरून अजूनही पाणी ओघळत होते. संपूर्ण टप्यावर एकूण ५ बोल्ट मारलेले आहेत. त्यामध्ये कॅराबिनर टाकत आणि त्यातून रोप पास करत वर सरकत जा असे त्याला सांगितले होते.
डावीकडून सुरू करत मग मध्ये आणि मग पुन्हा डावीकडे सरकत, आरोहण करत, कॅराबिनर क्लिप करत गणपतवर पोचला. वरती रोप बांधायला दगडात होल केलेली आहेत. रोप बांधून त्याने खाली फेकला. मग अभि 'झुमारिंग' ह्या तंत्राने ते अंतर पार करून वर पोचला.
एकामागून एक असे अभिजित, ऐश्वर्या आणि शेवटी मी असे तिघेही वर पोचलो.
ह्या तंत्रात थेट प्रस्तरारोहण न करता रोपला अडकवलेले २ झुमार वापरून वर सरकत राहायचे असते. कमरेला बांधलेल्या सेफ्टी हार्नेसमध्ये एक टेप (फोटोमधील लाल रंगाची) अडकवून ती एका झुमारमध्ये बांधायची आणि दुसरी टेप दुसऱ्या झुमारला बांधून खाली पायात अडकवायची. आता आलटून-पालटून कधी पायावर तर कधी हार्नेसवर जोर टाकत, एक मग दुसरा असे झुमार ने वर सरकत राहायचे. चढून दमलात तर हार्नेसमध्ये बसून राहायचे. पडायची कुठलीही भीती नाहीच. दम खायचा, हवंतर फोटो काढून घ्यायचा आणि मग पुन्हा चढणे सुरू... :) वाचताना सोपे वाटते तितके ते सोपे नसते. तुमचे वजन जास्त असेल तर स्वतःला वर नेताना तुम्हाला निश्चित कष्ट पडतात आणि हात भरून येतात. आम्ही वर पोचल्यावर जरा दम घेतला. गणपतने त्याचे काम चोख केले होते. हा तिथे काढलेला त्याचा फोटो.
आता इथून पुढे पुन्हा खोदीव पायऱ्याचा रस्ता आहे. मात्र अगदी सांभाळून चढायचे. २ मिनिटात आपण गडाच्या माथ्यावर असतो. वर पोचलो की समोर दूरवर डोंगराच्या पोटात आपल्याला गुहा दिसतात. उगाच इथे-तिथे भटकत न बसता आधी राहती जागा ताब्यात घ्यायची.
जाताना वाटेवरच पाण्याचे टाके लागते. हे पाणी पिण्यासाठी चांगले आहे. गुहेच्या शेजारी असलेले पाणी पिऊ नये. ते फारतर भांडी धुवायला किंवा 'इतर' कामासाठी वापरावे. गुहेत टेकलो तेंव्हा ४ वाजत आले होते. गणपतला अजून संपूर्ण गड उतरून खाली पोचायचे होते. तेंव्हा त्याला लगेच रवाना करणे गरजेचे होते. तो निघायच्या आधी अभिने पटकन चहा टाकला.
मी : चहा घेऊन जा रे. होईल ५ मिनिटात.
आपण घरी आलेल्या पाहुण्याला पण चहा-कॉफी विचारतोच की. सोबत नेलेल्या एम.एस.आर.(MSR) पोर्टेबल स्टोव्हने चुलीचा त्रास आणि महत्वाचा असा वेळ वाचवला होता. चटकन चहा तयार झाला. सोबत खायला टोस्ट.
चहा पिता पिता गणपत पुन्हा सुरू झाला.
गणपत : गावाबाहेर झापात राहतो. तिथेच शेती आहे. २ मुली आहेत. आता ऑपरेशन करून घेतलंय.
आधी चटकन मला समजलेच नाही. पण मग क्षणात कळले की २ मुली झाल्यानंतर शहाणपण दाखवून त्याने स्वतःचे ऑपरेशन करून घेतलंय. चहा झाला तसा तो निघाला. अभि पुन्हा त्याला सोडायला त्या प्रस्तर टप्यापर्यंत गेला.
गणपत : अरे कशाला मी जाईन की...
अभि : तू काय रोप धरून उतरून जाशील. तसा नको जाऊ. थांब... शिवाय मला रोप काढून आणायचा आहेच. मी येतो चल.
रॅपलिंग करून गणपत खाली उतरून गेला. अभि पुन्हा माघारी परतून गुहेकडे आला.
तोपर्यंत मी आणि ऐश्वर्याने सामान एका कोपऱ्यात लावून गड फिरायला जायची तयारी करून ठेवली होती. हातात फारतर २ तास होते. अंधार पडायच्या आधी गड बघणे आवश्यक होते. गुहेतून बाहेर पडून डाव्याबाजूने जाण्याऱ्या पायऱ्यांच्या वाटेने आम्ही गुहेच्या वरच्या भागाकडे निघालो.
वर जायला पायऱ्या बनवलेला रस्ता आहे. गुहेच्या वरच्या भागात पोचले की दूरवर एक इमारत सदृश्य दिसते. ते आहे गडावरील सर्वात मुख्य सदन. किल्लेदाराचा वाडा असू शकतो. त्या दिशेने चालू लागायचे. मध्ये उध्वस्त वाड्याची अवशेष जागोजागी दिसतात. ह्यावरून इथे पूर्वी मोठ्या प्रमाणावर वस्ती होती हे सहज समजून येते.
अजून थोडे पुढे गेले की अलंगचे वैशिष्ट्य असलेल्या पाण्याच्या टाक्या लागतात. पाणी साठवण्यासाठी उतरत्या क्रमाने १३-१४ टाक बांधलेली आहेत. सर्वात खालच्या लेव्हलला पक्की दगडी भिंत आहे. मला वाटतंय जरी २-३ वर्ष पाउस पडला नाही तरी अख्या गडाला पाणी पुरेल इतका पाणी साठा ह्यात करता येत असेल.
इथून अजून जरासे वर चढत सदनापर्यंत जायचे. आत काहीच नाही. रान माजलंय. सर्व साफ केले तर काय मस्त कॅम्पिंग जागा होईल. करायला हवे एकदा. डोक्यात विचार शिवून गेला. समोर दूरवर अजून गडाचे दक्षिण टोक आणि त्यावरील झेंडा दिसत होता. अजून बरेच अंतर जायचे होते. सूर्य मावळतीला जात होता.
आम्ही आमचा स्पीड अजून वाढविला आणि वेगाने पूर्वेच्या कड्याला लागलो. अप्रतिम नजारा!!! मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे हे निसर्गात गेले की समजते. आपली आत्मप्रौढी वगैरे जर काही असेल तर त्याची परिणीती शून्यात होते. देहभान विसरून आपण त्या दृश्यात विलीन झालेलो असतो. माझ्याकडे ग्लायडर असते तर मी तिथूनच झेप घेतली असती असे वाटून गेले.
चला... अजून स्तंभांपर्यंत जायचंय... अभिच्या आवाजाने मी भानावर आलो.
अजूनही हिरवेगार असलेल्या गवतामधून सप-सप आवाज करत आम्ही सूर्यास्त होता होता स्तंभांजवळ पोचलो. फ्रेम चांगली मिळाली.
इथून अजून वर झेंडा लावलाय तिथे जायला रस्ता होता. तिथे पोचलो आणि टायमरवर फोटो घेणे सुरू केले.
आता अंधारू लागले होते. आम्ही परत फिरलो. नाही म्हटले तरी गुहेपर्यंत जाईस्तोवर मिट्ट अंधार होणार होताच. तशी चिंता नव्हती कारण डोक्यावर हेडटोर्च आधीच लागलेली होती. परतीच्या मार्गात अजूनही न दिसलेले पडके शंकर मंदिर लागले.
नाही म्हणायला कोणीतरी पिंडीवर छत्र उभे केले आहे. शेजारीच एक शिलालेख आहे. तिसऱ्या ओळीत असलेला 'किलेदार' शब्द लक्ष्य वेधून घेतो. त्यासंबंधित हा शिलालेख असणार असा सहज अंदाज बांधता येतो.
समोरच कुलंग आणि मंडण साद घालत होते. इथून पुन्हा सदन आणि पाण्याची टाक पार करून खाली उतरेपर्यंत मिट्ट अंधार पडला. गुहेकडे उतरायचा पायऱ्याचा रस्ता काही सापडेना. मग डावी-उजवीकडे शोधाशोध. समोर मागे बघून अंदाज बांधणे सुरू. अखेर १० मिनिटांनी अभिला त्या पायरया सापडल्या. गुहेत पोचलो तो ७ वाजले. आजचा ट्रेक पूर्ण. धमाल आली. बरेच वर्षे जे बघायचे होते ते मिळवले. हे समाधानच काही निराळे.
जेवणाची तयारी केली. पण त्याआधी पुन्हा एकदा चहा झाला. एम.एस.आर.(MSR) पोर्टेबल स्टोव्हने जेवणाचे सर्व काम फटाफट. इतक्यात लक्ष्यात आले की अरे... आपण काही मसाले आणायला विसरलो... :( मग भातात चव यावी म्हणून थोडी लसून चटणी टाकली. सोबत भाजका पापड आणि लोणचे. अहाहा..!!!
दिवस सार्थकी. ना फोनची रिंग वाजते ना गाड्यांचे आवाज. निरव शांतता. जेवण करून गुहेबाहेर पहुडावे. लुकलुकणाऱ्या अब्ज ताऱ्यांनी भरलेले आकाश डोळे भरून पाहावे. मग डोळे बंद करून ती निरव शांतता अनुभवावी. खरच... असा एक दिवस आपल्याला किती भरभरून देतो नाही!!! ट्रेकचा १ दिवस संपला होता. गुहेतून समोर दिसणाऱ्या मंडणला मनात ठेवत तो दिवस डोळे मिटत संपला...
क्रमश: ....