Tuesday 4 August 2009

भाग ३ - आजा उर्फ़ आजोबा पर्वत ... !

सुळक्यापर्यंत जायला अजून तासा-दिडतासाची चढाई होती म्हणुन आधी जेवून घ्यायचे ठरवले. आम्ही पोचलो तेंव्हा तिकडून यूथ होस्टेलचा (Y.H.A.I) एक ग्रुप निघत होता. त्यांनी आम्हाला गरमागरम टोमॅटो सूप ऑफर केले. मस्तच बनवले होते. पोचल्यापोचल्या असे काही गरम पोटात पडल्याने सगळा थकवा गेला आणि भूक सुद्धा वाढली. हा.. हा.. आम्ही आता जेवून २ वाजता पुढच्या चढाईसाठी तयार झालो. आश्रमाच्या मागुन सुळक्याकड़े जाण्याचा मार्ग सुरु होतो. पाहिले तर अंतर अगदी जवळ वाटते पण वर जायला अजून किती वेळ लागेल ह्याचा अंदाज येत नव्हता. तरीसुद्धा आम्ही जाउन यायचे ठरवले. उशीर झाला तर झाला. दोन डोंगराच्या मधल्या सोंडेवरुन वर जाणाऱ्या वाटेने निघालो. आता वाट दाट झाडीत शिरली आणि वर चढायला लागली. मी आणि ऐश्वर्याने चढण्याचा वेग वाढवला. सचिन सुद्धा सोबत होताच. पण खडा चढ सुरु झाला तशी निता बरीच मागे पडायला लागली. विवेकने आणला मात्र तिला बरोबर गप्पा मारत मारत. तिने सुद्धा हळू-हळू का होइना पण पूर्ण करणारचं असा निर्धार केला होता. भले शाब्बास... मला कधी एकदा वरती पोचतोय असे झाले होते.





आता वरचा भाग टप्यात येऊ लागला होता. वर चढत जात आम्ही डाव्या बाजुच्या डोंगराच्या कड्याला भिडलो आणि उजवीकडे सरकत सरकत पुढे जायला लागलो. मी सर्वात पुढे होतो. अचानक डाव्याबाजूला थोड़े वरुन काहीतरी वेगाने आपल्याकडे सरकते आहे असे जाणवले. झटकन वळून पाहिले तर काळतोंडया माकडांचे एक टोळके वेगाने पुढे सरकत होते. मला क्षणात येणाऱ्या संकटाची जाणीव झाली. पण ती सुदैवाने खोटी ठरली. कारण आमच्या थोड पुढे उजव्या बाजूला असणाऱ्या लालतोंडी माकडांवर हल्ला करण्याच्या बेतात ते पुढे सरकत होते हे मी लगेच कळून चुकलो. हुस्शश... आम्ही तिकडेच थांबलो आणि त्या सर्व वानर सेनेला आमच्या मार्गातून जाऊ दिले. आता अंतिम चढाई सुरु झाली. उजवीकडे जात-जात उजवीकडच्या डोंगराला भिडलो आणि वरच्या वाटेला लागलो. मध्येच थोडा घसारा तर कधी एखादा बोल्डर पार करत आम्ही पुढे सरकत राहिलो. अखेर दुपारी ३:३० च्या आसपास आम्ही सुळक्यापाशी जाउन पोचलो.






सुळक्यावर चढाई करायची म्हणजे त्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. आम्ही काही ते करणार नव्हतो. मात्र उजव्याबाजूला साधारण १०-१२ फुट वर चढून जायला एक शिडी लावली आहे. अवस्था वाइट असल्याने शिडीवर जास्त भरोसा न ठेवता थेट चढाई केली आणि वर पोचलो.
ह्या ठिकाणी उजव्या बाजूला खोल दरी असून चढाई करताना काळजी घ्यावी लागते. नाहीतर पुढे काय ते सांगायला नकोच. २ वर्षांपूर्वी पावसाळ्यात एका मुलीचा ह्याचं ठिकाणी कुठेतरी अपघाती मृत्यू झाला होता. वास्तवाचे भान ठेवून निसर्गात वागावे हेच बेहत्तर. या ठिकाणी मी ९ वर्षांनंतर येत होतो. जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि काही वेळातचं परतीच्या मार्गाला लागलो. पूर्ण अंधार पडायच्या आत किमान डांबरी रस्त्याला लागणे महत्वाचे होते. फटाफट उतरत पुन्हा खाली आश्रमाकडे आलो. ५ वाजत आले होते. विवेक आश्रमासमोरून खालच्या बाजूला जाणाऱ्या वाटेवर एक धबधबा आहे. पावसाळ्यात जोरदार पडतो पण मार्च-एप्रिलमध्ये सुद्धा तिकडे पाण्याची संततधार लागून असते. शिवाय आश्रमातील लोकांसाठी हाच एक पाण्याचा स्त्रोत असल्याने त्यांनी पाणी अडवून साठवले आहे.






परतीच्या मार्गाला लागायच्या आधी आश्रमासमोरच्या जागेमध्ये काही भन्नाट फोटो काढले. असाच ज़रा टाइमपास. मज्जा आली. ५ वाजून गेले होते. सुसाट वेगाने परतीच्या वाटेवर निघालो. तासाभरात आम्ही रस्त्याला लागलेलो होतो. गाड्या काढल्या आणि डेणा गाव ओलांडून हायवेला लागलो. शहापुरमार्गे रात्री ९ वाजता ऐश्वर्याला कल्याण फाटयाला सोडले आणि आम्ही पुढे निघालो. बरेच वर्षांपासून करायचा राहिलेला आजा पर्वतचा ट्रेक करून भरून पावलो होतो. त्याच आनंदात पुढचे प्लान्स करत आम्ही घराकडे निघालो.

Sunday 2 August 2009

भाग २ - आजा उर्फ़ आजोबा पर्वत ... !


पक्क्या ट्रेकर्सना लांबूनसुद्धा डोंगर ओळखता येतात त्यामुळे रस्ता काढत जाणे कठिण जात नाही, मात्र काही शंका असल्यास गावात विचारणे कधीही चांगले. आजोबाच्या पायथ्याला असणाऱ्या वाल्मीकि आश्रमाकड़े जाणारा फाटा उजव्या हाताला लागतो. २००० साली पहिल्यांदा आलो होतो तेंव्हापासून ह्या जागेचा 'स्क्रीनशॉट' माझ्या डोक्यात बसला होता. पुढचे मागचे काही लक्ष्यात नव्हते. फ़क्त हा फाटा तेवढा लक्ष्यात राहिला होता. आम्ही इकडे पोचलो तेंव्हा ११ वाजत आले होते. थोड आतमध्ये बाइक्स लावल्या आणि मग थेट कूच केले आश्रमाकड़े. मार्च महिन्यातली दुपार असल्याने ऊन चांगलेच खात होते. शिवाय पहिला टप्प्यावर फारशी झाडे नाहीत. ह्या कच्च्या रस्त्याने थोड चढून वर गेलं की मोकळे मैदान आहे. इकडे आम्ही चालता-चालता भूक लागली म्हणुन खायला लागलो. मी सोबत कडक बुंदिचे लाडू आणले होते. एक-एक खायचे सोडून विवेकने एक साथ तोंडात कोंबले. मी म्हटले का? खा की.. मग आम्ही त्याचे हात पकडून अजून एक लाडू त्याच्या तोंडात कोंबला आणि ते बाहेर काढता आता चावून-खावुन संपवून दाखव म्हटले. सॉलिड मज्जा आली. तसेच पुढे निघालो. जरा चढ़ लागला की मात्र मस्त जंगल सुरु होते आणि गारवा जाणवू लागतो. आपल्या सोबत असते फ़क्त निरव अशी शांतता. ह्या जागेची निवड आश्रमासाठी का केली असावी हे ध्यानात येते. सपाटीवरची चाल असल्याने फारसा दम सुद्धा लागत नाही. पायथ्यापासून साधारण तासा-दिडतासात आश्रमापर्यंत पोचता येते. आम्ही पोचलो तेंव्हा दुपारचा वाजत आला होता.






'आजोबा'ची उंची ४००० फुटांपेक्षा जास्त असून हा कोकणातील सर्वात उंच पर्व आहे. ह्या ठिकाणाला ह्या जागेला अतिशय प्राचीन अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. किती प्राचीन म्हणता ... तर ऐका. 'थेट रामायण काळापासून.' श्रीरामाच्या आज्ञेने लक्ष्मणाने सीतामाईना ज्याठिकाणी आणून सोडले ती जागा म्हणजे 'आजा पर्वत'. आजही ह्याठिकाणी वाल्मिकी ऋषिंचा आश्रम आहे. आजा पर्वताच्या बाजुच्या सुळक्याला 'सितेचा पाळणा' असे नाव आहे तर तो सुळका ज्या टेकडीवर आहे त्याला 'लव-कुश टेकडी' असे नाव आहे. थोडक्यात काय तर लव - कुश यांचा जन्म ह्याठिकाणी झाला. कौलारु घराप्रमाणे असणाऱ्या आश्रमासमोर सारवलेले अंगण आहे. येथे - जण राहतात. आतमध्ये वाल्मिकी ऋषिंच्या पादुका असून परिसर अतिशय स्वच्छ आणि शांत आहे. आश्रमाच्या उजव्या हाताला जमिनीखाली असलेली एक शिवपिंड आहे. तर समोरचा परिसर मोकळा असून मध्ये-मध्ये थोर वृक्ष आहेत. एक राहण्यायोग्य अशी जागा सुद्धा आता इकडे बांधली आहे.




क्रमश: .....

भाग १ - आजा उर्फ़ आजोबा पर्वत ... !

ऑगस्ट २००० मध्ये मुंब विद्यापिठाच्या 'हायकिंग आणि ट्रेकिंग क्लब'तर्फे 'आजा उर्फ़ आजोबा पर्वत' येथे ट्रेकसाठी गेलो होतो. हा माझा पहिलाच ट्रेक. डोंगरांशी माझी पाहिली भेट. पावसाळ्यामधले ते सह्याद्रीचे नितांत सुदर असे रूप माझ्या मधला 'डोंगरयात्री' जागा करून गेले. त्यानंतर मात्र पुन्हा आजोबा पर्वत येथे जाणे झालेच नाही. अनेक ठिकाणी फिरलो वर्षात पण इतक्या जवळ असून सुद्धा 'आजा' करायचा राहिलाच.








अखेर ह्यावर्षी मार्च महिन्यात जायचेच असे ठरवले. सोबतीला ऐश्वर्या, विवेक, सचिन आणि निता असे भिडू जमवले आणि नेहमीप्रमाणे बाइक्स दामटवल्या. आजा / आजोबाला जायचे तर मुंबईहून थेट नाशिक महामार्ग पकडायचा. शहापुर फाटयाला उजवीकड़े आत शिरले की 'डेणा' गावचा रस्ता पकडायचा. मध्येच उजव्या बाजूने एक रस्ता येउन मिळतो. हा रस्ता पुण्यावरुन येणाऱ्या भटक्यांसाठी उत्तम. पुण्याहून निघाले की खंडाळामार्गे खोपोलीहून चौक फाटयाला उजवीकड़े वळून कर्जत - कल्याण - मुरबाड मार्गे ह्या रस्त्याने डेणा गावापर्यंत पोचता येते. मी, निता, सचिन आणि विवेक ठाण्याहून नाशिक हायवेने निघालो खरे पण रस्ता बदलून कल्याणमध्ये घुसलो, कारण ऐश्वर्याला उचलायचे होते. मग तसेच पुढे मुरबाडकड़े निघालो. हा रस्ता बाइक चालवायला माझा अतिशय आवडता. मुरबाडला पोचलो नाश्ता उरकला आणि पुढे निघालो. साधारण १०:३० च्या आसपास डेणाला पोचलो. गावात दुकाने आहेत आणि होटेल्स सुद्धा. जे काही खादु-पिदू करायचे ते एकडेच. कारण एकदा गाव सोडले की पुढे काही नाही. आम्ही सोबत सगळे आणले असल्याने थांबायचा काही प्रश्न नव्हता. गावामध्ये शिरल्या-शिरल्या लगेच उजवी मारायची आणि मग थोड पुढे जाउन डाव्या हाताला आजोबाला जायचा रस्ता आहे.
क्रमश: .....