Tuesday, 12 January 2010

मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...

आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण' सुळका समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती. रतनगड़ येथील खुट्टा आणि बाण हे सुळके, अग्नीबाण सुळका, आजोबची प्रचंड प्रस्तर भिंत हे सर्व सह्याद्रीमधल्या प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान. आज आमच्यामधले प्रवीण, आशीष, राहुल, सुरेश हे यशस्वी प्रस्तरारोहक आहेत.

चालता चालता आमच्या गप्पा सुरूच होत्या. अग्नीबाण मागे पडला तशी आम्ही डावी मारली आणि अखेरच्या चढाला लागलो. खिंड गाठली आणि पुन्हा डावीकडे उतरु लागलो. खिंडीतून पुढे उतार असल्याने थकवा जाणवत नव्हता तसा. इकडे मध्ये बऱ्याच फसव्या वाटा आहेत. शिवाय लोकवस्ती देखील नाही. एखाद दुसरा लाकुडतोड्या दिसला तरच. तेंव्हा वाटा जपून घ्याव्यात. चुकलात तर अमूल्य असा वेळ वाया जायची १०० टक्के खात्री. सर्वात पुढे राजेश आणि विल्या होतेच. तेंव्हा आम्ही आपले 'जाऊ रे त्यांच्या मागल्या' करत होतो. पण डोंगरातून, जंगलातून ट्रेक करताना वाटेवरच्या खुणा कश्या लक्ष्यात ठेवाव्यात, मार्किंग्स कसे घ्यावेत, थोडक्यात 'रूट'चे नव्हिगेशन कसे करावे याचा अंदाज हळू-हळू येऊ लागला होता. राहत्या जागेपासून निघून ३ तास होत आले होते आणि आम्ही 'वाकडी'च्या पायथ्याला पोचत होतो. मागे दुरवर अजुनही अग्नीबाण दिसत होताच. पण जिकडे जायचे होते तो हरिश्चंद्रगड़ अजून सुद्धा टप्प्यात येत नव्हता. ऊन जसे-जसे वाढायला लागले तशी तहान वाढत गेली. जिकडे राहिलो होतो तिथूनच पाणी भरून घेतले होते ते संपू लागले. वाटेत जिथे कुठे ओहोळ-ओढा लागेल तिथे आम्ही पाणी भरून घ्यायचो आणि पुढे निघायचो. सर्वात पुढे राजेश आणि सर्वात मागे काका असल्याने चुकायची तशी भीती नव्हती. आशिष, संतोष, विवेक, अभिषेक, सुरेश, दीप्ती, प्रवीण ही पहिल्या दिवसापासून पुढे असलेली टोळी पुढेच होती तर मागचे शेफाली, जाड्या, कविता, हिमांशु हे भिडू मागेच होते. मी, अभि, मनाली, सत्या, सुमेधा, प्रशांत, कवीश असे काहीजण आपले मध्य गाठत बरोबर मध्ये होतो.

'वाकडी'हून पुढे मळलेली वाट लागली. उजव्या हाताला कुमशेत दिसू लागले होते. तिकडे पोचायला अजून किमान तास-दिडतास तरी लागणार होताच. एव्हाना ११ वाजून गेले होते. जितका स्पिड असायला हवा होता त्यापेक्षा बऱ्याच कमी स्पिडने आम्ही पुढे सरकत होतो. थकवा जाणवू लागला होता आणि सॅक्स पुन्हा एकदा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. दर काही मिं. नंतर थांबावे लागायचे आणि दम घ्यावा लागायचा. मला तर भूक सुद्धा लागली होती. बहुदा सर्वांनाच. मी माझ्या सॅकमधून पार्ले-जीचे पूड़े काढून कमरेच्या पाउच मध्ये टाकले आणि एक-एक खायला लागलो. शेफाली एव्हाना स्पिड वाढवत आमच्यापर्यंत येउन पोचली आणि आता आम्ही गप्पा मारत पुढे जाऊ लागलो. माझी बिस्किट्स संपली की ती सॅकमधून अजून पार्ले-जीचे पूड़े काढून देई. माझ्या शिवाय मात्र कोणी ती बिस्किट्स खाईना. सर्वांचे मत त्याने तोंड आतून सुकते आणि घसा अजून कोरडा होतो असे होते. तर माझ्या मते त्याने शरीरामधील शुगर आणि ग्लूकोज लेवल नीट राहते आणि थकवा जाणवत नाही असे होते. आजही मी ट्रेकला पार्ले-जी सोबत ठेवतो. आता तर मला आमच्या ग्रुपमध्ये 'पार्ले-जी किंग' हे डोंगरातले नाव देखील मिळाले आहे. नाव ठेवणारा दुसरा तीसरा कोणी नसून माझा सह्यसखा 'अभिजित'च आहे.

आता कुमशेत पर्यंत संपूर्ण उतार होता. डोंगराच्या उजव्याकडेने तर कधी वळसा घालत डाव्याकडेने आम्ही खाली उतरत होतो. लक्ष्य समोर असल्याने वाट चुकायचा प्रश्नच नव्हता. वेळ मात्र चुकली होती. नेहमीप्रमाणे... इतके पोचायला साधारण २ तास उशीर झाला होता. गावात पोचलो. आता इथपर्यंत गाडी रास्ता झाला आहे. 'राजुर'वरुन इथे आणि पाचनईला सुद्धा गाडीने पोचता येते. तेंव्हा रस्ता होता का आठवत नाही पण आम्ही नदीकाठच्या वाटेने पाचनईला पोचणार होतो. कुमशेत गाव थोड़े उजव्या हाताला ठेवत आम्ही नदीकाठाकडे निघालो. नदी पाहिल्यावर वाटले अरे.. 'मंगळगंगा' आली सुद्धा म्हणजे आपण फार दूर नाही आहोत पाचनईहून. पण नंतर कळल की ही आहे 'मुळा नदी'. ( पुण्याजवळची मुळा नदी नव्हे.. ती वेगळी..) अजून पुढे गेलो की मंगळगंगा आणि मुळा एकत्र होतात तिकडून पुढे काही अंतरावर पाचनई आहे. २ वाजत आले होते आणि अजून जेवण बनवायचे होते. काल दुपारी सुद्धा रतनवाडीला पोचायला उशीर झाल्याने दुपारचे जेवण रद्द केले गेले होते. आज मात्र जेवण बनवायचेच होते. पण सर्व इतके दमले होते की आता लाकडे जमवून, चुल पेटवून मग जेवण बनवायचे आणि मग जेवायचे हा प्रकार जीवघेणा वाटत होता. जेवण बनवायची जबाबदारी खुद्द काकाने उचलली होती. सर्वच भिडू चांगलेच दमल्याचे त्याला लक्ष्यात आले होते. राजेश गावातून कुठून तरी कसलीशी गावठी भाजी सुद्धा घेउन आला. मग तो, काका आणि विल्या जेवण बनवायला लागले. अंगात जीव असलेल्या काही जणांनी त्यांना लाकडे जमवून आणि सामान काढून दिले. आम्ही सर्वजण चादरी पसरून निवांत आराम करत होतो. काहीजण नदीमध्ये पोहायला गेले होते. तिकडे जेवण बनत होते पण आम्ही कोणीच काकाला काही मदत करत नव्हतो. तासभर वाट बघून अखेर मी, अभिषेक आणि आशीष दमलो. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. काकाने जेवण तयार झाल्याचे सर्वांना सांगितले. पण ज़रा आधी न राहून मी सॅकमधून तिखट शेवचे एक पाकेट काढले होते आणि खायला लागलो होतो. झाले... काकाने ते पाहिले आणि तो आमच्यावर भलताच डाफरला. "मी इकडे तुमच्यासाठी जेवण बनवतोय आणि तुम्ही काय हे सटर-फटर खाताय. तुम्हाला फुकट बनवून खायला घालायला मी काय आई आहे का तुमची. किमान किम्मत ठेवा ज़रा."

आमचे पुढे काही न ऐकता काकाने कवीशला हाक मारले. "कवीश. यांच्या पाठीवर रात्रीच्या जेवणाचे सुद्धा सामान दे आणि ह्याना पुढे जाऊ दे. नाहीतरी ह्यांना जेवायचे नाही आहे." कवीश सुद्धा काकाची आज्ञा पाळत आमच्या सॅक्स भरताना जास्तीतजास्त सामान कसे भरले जाईल हे बघत होता. त्यात रात्रीच्या जेवणासाठी न लागणारे सामान सुद्धा होतेच. आमच्या तिघांबरोबर म्हणजे मी, आशीष आणि अभिषेक बरोबर विवेक सुद्धा लटकला होता. काकाने आमच्या बरोबर राजेशला पाठवले. लवकर गडावर पोचायचे आणि रात्रीचे जेवण बनवून ठेवायचे अशी आम्हाला शिक्षा होती. माझे टाळके आता पूर्णपणे फिरले होते. सामानाने गच्च भरलेली ती वजनी सॅक उचलताना मी शेवटी न राहून बोलून गेलोच. "हा म्हातारा काय समजतो स्वतःला." काकाने ऐकले की ते माहीत नाही पण ज्यांनी ऐकले ते गार पडले. आता काका तसे म्हातारे नव्हते. ४० च्या आत वय. फ़क्त गिर्यारोहण करून केस जास्त सफ़ेद झाले होते इतकेच. न जेवता भुकेल्या पोटी आम्ही ५ जण सर्वांच्या पुढे निघालो. सर्वांच्या पाठीवर आता अधिक सामान होते. पण आता लवकर पोचायचेच असे आम्ही ठरवले होते.थोड़े पुढे जाउन 'शेव'ची ती पिशवी आशिषने परत बाहेर काढली आणि आमचा छोटासा मिनीलंच चालता-चालता उरकला. राजेश सोबत होता तेंव्हा वाट चुकायचा प्रश्न नव्हताच. शिवाय जेवण बनवायचे सर्व सामान आमच्याकडेच असल्याने ती ही चिंता नव्हती. कुठे आडवाटेवर अडकलो, चुकलो तरी चिंता आता बाकीच्यांना असणार होती.

कुमशेत सोडून पुढे गेलो की उजव्या हाताला अजिबात जायचे नाही. समोरच्या टेकडीला बगल देत डाव्या हाताला वळलो आणि पुढच्या पठारावर पोचलो. आत्ता कुठे तो हरिश्चंद्रगड़ नजरेत येऊ लागला. अंतर बरेच होते. "किमान ५ तास तरी लागतील." - राजेशचा अचूक अंदाज. पुढे पुन्हा एक ओढा लागला. तो पार केला आणि पुढच्या टेकडावर चढलो. वाट मळलेली होती तेंव्हा आम्ही सुद्धा कुरकुर न करता तिच्यासोबत जात होतो. आता वाट नदीच्या काठाकाठानेच पुढे जात राहते. नदी उजवीकडे वळली की वाट सुद्धा उजवीकडे वळते. नदी डावीकडे वळली की वाट सुद्धा डावीकडे वळते. मध्येच कुठेकुठे ओढे लागतात. ते अडसं-दडसं करत पार करायचे. पाठीवरच्या सॅक सांभाळत पाण्यातल्या दगडांवरुन उदया मारत जायला मज्जा येत होती. मध्येच आम्ही थांबायचो, खांदे मोकळे करायचो, काहीतरी खायचो आणि पुढे निघायचो. ३ तास होउन गेले तरी दुरचा तो हरिश्चंद्रगड़ काही जवळ येईना. संध्याकाळ होत आली होती. राजा हरिश्चंद्र म्हणायचे "राज गया... मेरा ताज गया..." त्याप्रमाणे आता आम्हाला बोलावेसे वाटत होते. "पाठ गेली रे माझी.. खांदे पण गेले.. अब बस भूक लगी है." हेहे.. :D जोक्स अपार्ट.. त्या राजाला त्याच्या आयुष्यात बरेच कष्ट पडले होते. तेंव्हा त्याच्या नावावर असलेल्या गडावर जताना आम्हाला सुद्धा काही कष्ट घेणे क्रमप्राप्त होतेच. अंधार पड़ता-पड़ता अखेर 'पायलीची वाडी' आली. इकडून नदी ओलांडून आम्ही पलिकडच्या बाजुला गेलो आणि पाचनईच्या रस्त्याला लागलो. नदी आता डाव्याहाताला मागे मागे राहून गेली. आम्ही एका टेकाडावर चढून पुढे उतरलो तर नदी सुद्धा वळसा मारत तिकडेच आली होती. म्हटले "राजेश काय रे? पुन्हा नदी क्रोंस करायची आहे का?" तो म्हणाला,"नाही. पण एक छोटा ओढा ओलांडायचा आहे. लवकर चला. पूर्ण अंधार झाला तर कुठून पार करायचा ते कळणार नाही आपल्याला." त्यावर आशीष बोलला,"आयला मग ते मागचे सर्व चक्रम कसे पोचणार? आज रात्री काय २१ जणांचे जेवण आपणच बनवून आपणच संपवायचे काय? मी काका आल्याशिवाय जेवण बनवायला सुरवात करणार नाही आहे. बास." आम्ही हसून-हसून आडवे व्हायचे बाकी होतो. खरच इतका वेळ मागचे भिडू कुठे असतील? त्यांना यायला तर पूर्ण अंधार होणार मग ते कसे पोचणार हे प्रश्न आता पडायला लागले होते. "ते लोक दुसरीकडेच राहिले तर त्यांचे जेवणाचे वांदे होतील रे." मी बोललो. त्यावर लगेच अभि उत्तरला. "आपण नेउन देऊ बनवलेले जेवण." पुन्हा एकदा हलके फुल्के जोक्स झाले. गप्पा मारता मारता आम्ही पाचनईच्या दिशेने वाटचाल करताच होतो. ७ वाजून गेले होते. पूर्ण मिट्ट अंधार झाला होता. अचानक बैलाच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आला. गाव एकदम जवळ असल्याची ती पोचपावती होती.

पुढे २ मिं. मध्येच गाव लागले. गावातल्या मारुती मंदिरात आम्ही टेकलो आणि निवांत झालो. सकाळपासून तसे पोटात फारसे काही गेले नव्हते. 'दुपारचा लंच' सुद्धा केलेला नव्हता. मारुतीच्या देवळात बसल्या-बसल्या मला डुलकी लागली. जाग आली तेंव्हा बाहेर गड़बड़ ऐकू येत होती. मागचे सर्व भिडू येउन पोचले होते. राहुल आणि शेफाली हातात कॉफ़ीचा मग घेउन आले. चायला.. जणू काही माझा आमरण उपवास होता आणि मी तो हरिश्चंद्रगड़ला गेल्या शिवाय सोडणार नव्हतो. कॉफी घेतली तशी ज़रा तरतरी आली. माझ्या अंगात ताप भरला होता. सर्वच जण प्रचंड दमलेले दिसत होते शिवाय गडावर चढून जायला खुप उशीर सुद्धा झाला होता  तेंव्हा आज आपण इकडेच राहणार असा आमचा (गैर)समज झाला. काकाने आपल्याला आज रात्री काहीही करून गडावर जायला हवेच असे स्पष्ट केले. आता मात्र थकलेल्या चेहरे पूर्ण पडले होते. मुलीच नाही तर मूले सुद्धा खुपच दमली होती. तरीपण जसे जमेल तसे एकमेकांना मदत करत वरती जायचे नक्की झाले होते. ९ वाजले होते आणि आता आम्ही सर्व गडावर जाणार होतो. गावातून एक वाटाडया सुद्धा घेतला होता. राहुलच्या म्हणण्याप्रमाणे मी माझी सॅक त्याला देऊन वरपर्यंत कमी वजन उचलून जावे असे होते. तर माझे मत स्पष्ट होते. मी ही सॅक घेउन वरपर्यंत जाणार म्हणजे जाणार. रात्रीच्या त्या अंधारात आमची वाटचाल सुरू झाली. पुन्हा एकदा पुढे मी, आशीष, अभिषेक आणि राजेश. अर्थात आमच्याही पुढे तो वाटाडया होताच. मी अर्ध्याअधिक झोपेत चालत होतो. मध्येच धडपडायचो आणि मग त्याला विचारायचो. "अजून किती जायचय रावं?" तो प्रोफेशनल वाटाडया होता बहुतेक. दरवेळी "बास. हे काय हिक्कड़ हाय आता. अजून १० मिंनितं" असे उत्तर देऊन आम्हाला समाधानी करायचा. त्या वाटेवरची एक जागा सुद्धा मला लक्ष्यात नाही आहे. पुन्हा एकदा त्या वाटेवरून ट्रेककरून हरिश्चंद्रगड़ सर करायची खुप इच्छा आहे बरेच वर्ष. बघुया या वर्षी जमते का ते.

गडावर पोचलो तेंव्हा १२ वाजून गेले होते. कुठे काय काही समजत नव्हते. एका देवळाशेजारून पुढे जाउन कुठल्या तरी मोठ्या गुहेत शिरलो इतकेच काय ते समजले. आत जाउन पुन्हा मी आडवा. जेवण कोणी बनवले माहीत नाही. जेवायला राहुलने उठवले तेवढे मात्र कळले. जेवताना तोंडाला टूथपेस्टचा स्मेल येत होता. मी झोपलेलो असताना बहुदा कोणीतरी लावली असावी. जेवलो आणि पुन्हा आडवा झालो. इतका दमलो होतो की बाकी काही करणे शक्य नव्हते. आजवर मी इतका कधीच दमलो नव्हतो. पहाटे ६ ते दुपारी २ आणि परत दुपारी ३ ते रात्री १२ असा जवळ-जवळ १५-१६ तासांचा ट्रेक झाला होता आज एका दिवसात. ट्रेकच्या ३ऱ्या दिवशी अजून अनुभव घेत आम्ही आडवे झालो. सकाळी हरिश्चंद्रगडाचे आणि विहंगम अश्या कोकणकडयाचे दर्शन घेण्यासाठी...
.
.
पुढील भाग - हरिश्चंद्रगड आणि विहंगम असा कोकणकडा ... !
.
.

13 comments:

  1. अच्छा... बंडखोरी फार जुनी आहे म्हणायची. मस्त रे गड्या, सगळे सह्याद्रीचे मावळे असेच कसे... सारखेच उनाड?

    आणि मी पण पारले-जी किंग आहे बरं का. बघ किती गोष्टी जुळतात आपल्या. मग एक-दोन ट्रेकपण जुळू दे आता.

    ReplyDelete
  2. Wahhh..jahapana..I mean King :)

    ReplyDelete
  3. होय रे भैसटलेल्या... :D लवकरच ट्रेक्स मारू आपण एकत्र ... :)

    ReplyDelete
  4. का रे दोघेच निघालात का???????????/आमास्नि बी येउ द्या की राव......

    ReplyDelete
  5. होय गं तन्वी ... आपले बोलणे झाले आहे त्याप्रमाणे एक ट्रेक होउनच जाउ दे ... :D

    ReplyDelete
  6. लिही त्या ट्रेकबद्दलची पोस्ट लवकर......तू आणि पंकज घ्या निर्णय आणि आम्हा लिंबुटिंबूंना न्या सोबत..........पारले-जी की जबाबदारी हमारी....भाग्यश्रीताई को पण लेवो म्हणजे बाकी वो संभालेंगी.....म्हणजे रोहन आपल्याला निषेध नको करायला, उलट आपल्या खादाडपणाचा ईतर लोक निषेध करतील.......हाहाहा............

    ReplyDelete
  7. तन्वी ... हाहा ... तू फुल ऑन सुतली आहेस ... ज़रा दम धर की. ह्या ट्रेकवरचे अजून २ पोस्ट झाले की सुरवात करतो. पंकज आणि दिपकला बोललो आहे ... :) हां तू खादाडीचे बघ ... हेहे ...

    ReplyDelete
  8. हरिश्चंद्र गडावर पोहचायला अजून किती दिस लागतिल...... वाट पाहतोय पुढच्या लिखानाची..

    ReplyDelete
  9. हा बघ टाकला आहे रे ... :)

    ReplyDelete
  10. hay nice, i want to on sinhagade. pls inform me or anybody interested to come with me on the sinhagade.

    ReplyDelete
  11. जाम बोर वाटत होते. दोन दिवस नुसतीच तंगडतोड. त्यात ती कालची रात्र. रोहनचे नॉन स्टॉप पार्ले जी आणि काकाच्या अधून मधून कान पिचक्या. काय करत होतो काय पत्ताच नव्हता. सर्वांशी आता बर्यािपैकी ओळख झाली होती. त्यामुळे बडबडीत वेळ भराभर जात होता. अंतर मात्र काही कमी होत नव्हते. जेवण पुराण तर विचारू नका. रोहन आणि टीमला शिक्षा भारी झाली. पण या ५ बिलांदरनी ती मजे मजेत पूर्ण निभावली.
    मंदिरातल्या चहाची एक गंमत सांगतो. हिमांशू खूप दमला होता. बूट भिजल्यामुळे गार पडला होता. त्याच्यासमोर चहा ठेवला. हातात पार्ले जी दिले. पण त्याला ते खाताच आले नाही. तो चहात बिस्कट बुडवून खाईपर्यंत ते खाली पडायचे. असे तीन वेळा झाले. शेवटी कोणीतरी त्याला अक्षरष: भरवले. हा हा...
    गड चढताना माझ्यापुढे मनाली होती. तर सत्या मागे. पण टॉर्च मात्र एकच. सत्या अर्धवट झोपेत माझ्या पावलावर पाऊल टाकत चालत होता. मी आणि मनाली काही बाही बडबडत स्वतःला जागे ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. गडावर जेव्हा पोचलो तेव्हा काहीच दिसत नव्हते. जेवण केले की नाही ठाऊक नाही. गाढ झोपलो हे मात्र खरे.

    ReplyDelete
  12. तो दिवस सर्वात बैकार (चांगल्या अर्थाने) होता.. खुप शिकलो त्या दिवशी.

    ReplyDelete