Thursday 23 December 2010

हरिश्चंद्रगड आणि ३१ डिसेंबरची 'ती' रात्र ... !

३१ डिसेंबर जवळ यायला लागला की प्रत्येक जण आपले प्लान ठरवायला लागतो. कुठे जायचे, काय करायचे वगैरे. डोंगरी आणि भटके सुद्धा शहरी गजबजाटापासून दूर शांत अश्या निसर्गाच्या सानिध्यात एखादा गड-किल्ला बघून आपले ट्रेक प्लान तयार करतात. पण सध्या इतके ट्रेक ग्रुप झालेत की विचारायला नको. मुळात त्यातील प्रत्येकजण ट्रेकर किंवा हायकर श्रेणीत येतो का हा देखील प्रश्नच असतो... हौशी मौजी कलाकारांची आपल्याकडे काही कमी नाही.. अश्याच काही हौशी लोकांबाबतचा एक डोंगरातला अनुभव मी आज तुमच्या सोबत वाटणार आहे.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट.. वर्ष नक्की लक्ष्यात येत नाहीये. पण बहुदा २००३.. . ३१ डिसेंबरला कुठे जायचे म्हणून आम्ही सर्वजण एखादा गड-किल्ला विचारात घेत होतो. शिवाय आम्ही मोजून ४-५ जण जायला तयार. अखेर हो-नाही करता करता हरिश्चंद्रगड नक्की झाला. ३० तारखेला ठाण्याहून रात्रीच्या शेवटच्या नारायणपूर एस.टी.ने खुबी फाट्याला पहाटे ३ वाजता पोचायचे आणि उजाडता-उजाडता खिरेश्वर गाठत ट्रेक सुरू करायचा. ३१ ची रात्र गडावर. १ तारखेला संध्याकाळपर्यंत घरी परत. असा साधा सोपा प्लान. पण २ दिवस आधी बाकीचे भिडू रद्द झाले आणि उरलो फक्त मी आणि शमिका. जायचे की नाही काहीच ठरत नव्हते. आम्ही दोघेच असे कधी ट्रेकला गेलो नव्हतो. एखाद्या रिसोर्ट किंवा हॉटेलवर जाणे ह्यापेक्षा ट्रेकला जाणे ह्यात खूपच फरक पडतो त्यामुळे काही निर्णय होईना. अखेर हो नाही करत करत 'आपण जाउया ना..' असे शमीने सांगितल्याने मी तयार झालो. थोडे खायचे सामान घेतले आणि दोघांमिळून एकच सॅक पॅक  केली. ३० तारखेला रात्री ठाण्याचा वंदना एस.टी. स्टॅंड गाठला. परेलवरून निघणारी नारायणपूर गाडी रात्री बरोबर ११:३० वाजता इथे पकडता येते. हीच गाडी कल्याणला रात्री १२ वाजता सुद्धा मिळते. आम्हा दोघांनाही बऱ्यापैकी मागे बसायला जागा मिळाली. मुरबाड - माळशेज मार्गे पहाटे २:३० वाजता एस.ते. खुबीला पोचली देखील. रस्त्याला एक रिकामी दुकान होते त्यात जाऊन बसलो. शेवजी एक टपरी सुरू होती. तिथे काही लोक उभे-बसलेले होते. तिथून चहा आणला आणि आम्ही गप्पा मारत बसलो.


मी घरून निघतानाच कमरेच्या पाऊचमध्ये एक सुरा ठेवला होता. शिवाय एक कुकरी सॅकमध्ये वरती होतीच. पहाट होत आली तसे आम्ही खिरेश्वरच्या दिशेने निघालो. धरणाच्या भिंतीवरून तास-दीड तास चाल मारल्यानंतर खिरेश्वर गावात पोचलो. पहिल्यांदा इथे आलो होतो तेंव्हा फार काही नव्हते इथे पण आता १-२ हॉटेल सुरू झाली आहेत. आता तर रस्ता देखील डांबरी झाला आहे. धरणाच्या भिंतीवरून चालायच्या ऐवजी तुम्ही गाडीने येऊ शकता. इथे एक बोर्ड लिहिलेला होता. बिबट्या पासून सावधान.. शक्यतो एकटे जंगलात जाऊ नका. पहाटे लवकर आणि रात्री उशिराने जंगलात जाणे
टाळा. अश्या सूचना वन विभागाने लिहिलेल्या होत्या. माझा एक हात नकळत कमरेवरच्या चाकुवर गेला. हातात अजून काहीतरी असावे म्हणून एक जाडजूड काठी घेतली. शमी पुढे आणि मी मागे असे चालू लागलो. मी शमीला जरी काही बोललो नसलो तरी तिला अंदाज आला होता. मी तिला डोळ्यानेच खूण करून 'चल. काळजी नको करूस' असे सांगितले. आम्ही आता गावाच्या बाहेरूनच हरीश्चंद्रगडकडे जायची वाट पकडली. डावीकडे दिसणारे नेढे आणि समोर दिसणारा डोंगर ह्याच्या बरोबर मधल्या खिंडीमधून वर चढत गेले की तोलारखिंड लागते. साधारण ३०-४० मिनिटात इथे पोचलो. वाट रुंद आणि मोकळी आहे. आजूबाजूला झाडी असली तरी तितकासा धोका वाटत नाही. पाउण तासाने आम्ही खिंडीखाली पोचलो. या ठिकाणी वाघजाईचे एक छोटेसे मंदिर आहे. समोरची वाट जाते 'कोथळे'मार्गे 'कोतूळ'कडे. आपण मात्र डावीकडे वळून वर चढत खिंडीच्या वर पोचायचे. हा प्रस्तर टप्पा तसा फारसा अवघड नाही.५-७ मिनिटात तो पार करून आपण वरच्या धारेवर लागतो.

आता पुढची चाल मात्र बरीच कंटाळवाणी आहे. तोलारखिंडीपासून हरिश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत चांगला ५-६ किमी. रस्ता तुडवावा लागतो. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात. त्या पार करत मुख्य वाट न सोडता छोट्या-छोट्या टेकड्या पार करून मंदिर गाठायचे. वाट संपता संपत नाही. अक्षरश: अंत पाहते. तुम्ही कधी गेलात तर ह्या वाटेवर दुपार टाळा. घसा सुकून जीव जाईल पण वाट संपणार नाही. एकदाचे मंदिरापाशी पोचलो.  देवळासमोर हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. पहिल्यांदा आम्ही सर्वजण आलो होतो तेंव्हा दुसऱ्या लेण्यात राहिलो होतो. त्या शेजारच्या म्हणजे तिसऱ्या लेण्यात प्रवेश करतानाच चांगली २ मीटर उंचीची एक कोरीव गणेशमूर्ती आहे. त्यामुळे त्याला
'गणेशगुहा' असे ही म्हणतात. आम्ही ह्यावेळी इतके राहायचा निर्णय घेतला. गुहा १ आणि २ आधीच भरलेल्या होत्या. आणि तिथून येणारा गोंगाट बघता किती हौशी लोक आत भरलेत ह्याचा मला अंदाज आला. साधारण १० वाजत आले होते. मी गुहा थोडी साफ करून घेतली. बहुदा रात्री इथे एखादे गाय-बैल येत असावे असा मला अंदाज आला होता. नंतर आम्ही सोबत आणलेला नाश्ता करून घेतला आणि गड्फेरीला निघालो. मंदिर, पुष्करणी, केदारेश्वर लेणे आणि आसपासचा परिसर बघून आम्ही बाळूकडे जेवायला गेलो. पिठलं-भाकरी आणि सोबत कांदा-चटणी असा मस्त मेनू होता. त्याच्याकडून कळले की पहिल्या गुहेत कोणी विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत. पण त्यांचे वागणे ठीक नाही. 'तुम्ही एकटे आणि त्यात बाई माणूस आणायला नाही पाहिजे होते' बाळूने त्याचे प्रांजळ मत व्यक्त केले. मी काही बोललो नाही. त्याला रात्रीचे जेवण बनवायला सांगितले आणि आम्ही कोकण कड्याच्या दिशेने निघालो. दुपार टाळून गेली होती. सूर्यास्त बघावा तर तो कड्यावरूनच.. अ..प्र..ती..म.. असे ह्या जगात जे काही आहे त्यात कोकणकड्याच्या सुर्यास्ताचा बराच वरचा क्रमांक लागेल.

अंधार पडता पडता पुन्हा गुहेकडे परतलो. पूर्ण वेळ माझ्याबरोबर कुकरी आणि ती लठ्ठ काठी होतीच. परत आलो तेंव्हा कळले की त्या विहिंपच्या लोकांनी दंगा-मस्ती केली आणि वरती बाळूला मारहाण सुद्धा केली. तो गड सोडून कुठेतरी खाली निघून गेला होता. आम्ही गुहेत येऊन गप्पा मारत बसलो. शेजारच्या गुहेतून दंग-मस्तीचे खूप
आवाज येत होते. आम्ही दोघे ३१ डिसेंबर साजरी करायला आलो होतो पण मनासारख्या गप्पा मारत नव्हतो. एक दडपण सतत मनावर येत होते. मला सारखी शामिकाची चिंता लागून राहिली होती. आणि तिला ही ते समजले होते. रात्रीच्या जेवणाची आधीच वाट लागलेली होती. बाळूच नव्हता तर जेवण कुठले??? आम्ही सोबत असलेले थोडे खाल्ले आणि पुन्हा गप्पा मारत पडलो. रात्री १० च्या सुमारास अचानक मोठ्याने आवाज येऊ लागला. खूप लोक होते वाटते.'काढा रे यांना बाहेर. गडावर येऊन दारू पितात. दंगा करतात. झोडून काढा. ह्या थंडीत चामडी सोलटवून काढा.' मी उठून बाहेर जाऊन बघणार इतक्यात शमिने मला थांबवले. 'जाऊ नकोस जरा थांब. आधी बघुया काय होतंय'. २-३ मिनिटात गुहेच्या बाहेरून आवाज आला. इथे आत कोण आहे. मी आतून ओ दिला. बाहेरचा आवाज मला विचारात होता. 'तुमच्याकडे दारू, मांस-मच्छी असे काही असेल तर बाहेर या.' मी नाही म्हणून बाहेर आलो. तो संघ कार्यकर्ता होता. त्याने आम्हाला सांगितले की "ह्या विहिंपच्या लोकांना आता देवळाच्या इथे सामुहिक शिक्षा करणार आहोत आम्ही तेंव्हा तुम्ही पण बाहेर या. तुमच्या सोबत तुमच्या सौ आहेत हे मला बाळूने सांगितलेले आहे. त्यांना काही भीती ठेवायचे कारण नाही. उलट इथे त्या एकट्या नकोत म्हणून सोबत घ्या" असे बोलून तो निघून गेला. जाणे तर भाग होते. मी पुन्हा कुकरी आणि काठी उचलली आणि शमी बरोबर बाहेर पडलो. तिने माझा हात गच्च पकडला होता आणि मी कुकरीवरचा. पुढच्या क्षणाला काय होईल ह्याबाबत माझ्या मनात विचित्र विचारचक्र सुरू झाल्याने मी काहीही करायच्या तयारीत होतो. देवळासमोर बाळूच्या पदवी शेजारी जाऊन पोचलो. बघतो तर १०० हून अधिक लोकांचा जमाव होता. त्या अख्या लोकांत शमी एकटीच महिला. बाकी सर्व पुरुष. आम्ही एका बाजूला जाऊन बसलो. खूप थंडी होती. बहुदा ९-१० डिग्री असेल. समोर बघतो तर संघाचा कोणी प्रमुख उभा होता आणि त्याने ह्या विहिंपच्या १०-१२  लोकांना त्या थंडीत फक्त अर्ध्या चड्डीवर बसवले होते. आधीच १०-१२ बसलेल्या आहेत असे सर्वांचे चेहरे झालेले होते.

तो संघ कार्यकर्ता त्या १०-१२ लोकांना बोलू लागला. "आम्ही तुम्हाला मारणार नाही आहोत. तुम्हीच प्रत्येकाने तुमच्या बाकी मित्रांना मारायचे आहे. प्रत्येकाने बाकीच्या ११ जणांना मारायचे. पण असे मारायचे की ते तुम्हाला आयुष्भर लक्ष्यात राहील आणि अशी चूक तुम्ही पुन्हा करणार नाही. मारले की त्याचा आवाज घुमला पहिले आणि ज्याला मारले त्याला असे लागले पहिले की त्याचा आवाज पण घुमला पहिले... नाही घुमला तर मग आम्ही मारायला सुरवात करू."


मग सुरू झाला तो मारामारीचा कार्यक्रम. प्रत्येकजण आपल्या बाकीच्या मित्रांना केलेल्या चुकीची शिक्षा देऊ लागला. इतक्या जोरात की त्याचे आवाज गुहेमधून प्रतिध्वनित व्हावेत. मारण्याचे आवाज आणि त्यांच्या विव्हळण्याचे आवाज ह्याने तो गड भरून गेला होता. मला ते असे मारणे थोडे विचित्र वाटत होते. पण बरोबरही वाटत होते. मी मात्र वेगळ्या चिंतेत होतो. अर्ध्यातासाने तो स्व-मारामारीचा कार्यक्रम संपला. आता काय!!! त्या लोकांना गडावर राहायची परवानगी नव्हती. तशाच अर्ध्या चड्डीमध्ये त्या
संघवाल्यांनी त्यांना पाचनईच्या दिशेने पिटाळले. कपडे, सामान सर्व मागे गडावरच.

नमस्कार चौधरी. मी शिशिर जाधव. संघ कार्यकर्ता. इथला विभाग प्रमुख आहे. तुम्ही आता तुमच्या राहत्या गुहेत जाऊ शकता. सहकार्याबदल धन्यवाद. तो आवाज बोलत होता. अंधारात आता थोडे दिसायला लागले होते. मी फार न बोलता त्याचा निरोप घेतला आणि पुन्हा गुहेत येऊन बसलो. सर्व काही सुरळीत पार पडल्याचा निश्वास सोडला. १२ वाजून गेले होते. कसले सेलेब्रेशन.. आम्ही गुपचूप झोपून गेलो. अचानक..........


काही मिनिटातच गुहेच्या तोंडाशी कसलीशी हालचाल जाणवायला लागली. एका हाताने मी उशाशी असलेली टोर्च आणि डाव्या हाताने ती कुकरी पुन्हा हाताशी धरली. आवाजसा येत होता पण काही दिसत नव्हते. मी जरा बाहेर जाऊन बघू लागलो. बघतो तर काय.. एक भली मोठी आकृती माझ्याकडे टक लावून बघतेय. मी मात्र त्याला पाहून पुन्हा निश्चिंत झालो. एक बैल गुहेमध्ये निवा
ऱ्याला आला होता. सकाळीच त्याची गुहा मी स्वच्छ केली होती ना!!! बैल मात्र मूर्ती शेजारी गुहेच्या दाराशीच बसला. आता तो दाराशी असताना अजून कोणी आत शिरणे शक्य नव्हते. मी पण निवांतपणे झोपू शकत होतो आता. इतका वेळ येणारे सर्व विचार झटकून आम्ही दोघेपण गुडूप झालो.

१ जानेवारीला सकाळी पुन्हा बळूकडे नाश्ता केला. रात्री झाल्या प्रकाराबद्दल तो आमची माफी मागत होता. आम्हाला उगाच संकोचल्यासारखे झाले. असू दे रे. होते. मी बोलून गेलो. शमी मात्र काही बोलली नाही. नाश्ता करून आम्ही गड सोडला. तोलारखिंडीमार्गे पुन्हा घरी परतण्यासाठी...

पण ३१ डिसेंबरचा हा अनुभव मी तरी कधी विसरू शकणार नाही... त्यानंतर मी आणि शमिका असे फक्त दोघे कधीच ट्रेकला गेलो नाही. पुन्हा तिला अश्या विचित्र परिस्थिती मध्ये टाकायला मी काय वेडा होतो!!!
.

.
नोंद : गडावर असलेल्या त्या १०-१२ लोकांनी आम्ही विहिंपचे आहोत अशी बतावणी केली होती की ते खरच विहिंपचे होते ते ठावूक नाही. हा फक्त एक अनुभव आहे. ह्यातून कोणाचाही / कुठल्याही संस्थेचा अपमान करण्याचा उद्देश नाही. जे घडले ते मांडलेले आहे...

Monday 8 November 2010

राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर ...

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. डिसेंबरचा महिना होता. रात्रीच्या मुंबई - पंढरपूर गाडीने मी एकटाच पुण्याच्या दिशेने निघालो होतो. पाठीवर असलेल्या मोठ्या सॅकमूळे ठाण्याला जनरल डब्यात कसाबसा घुसलो होतो. रात्रीच्या शांततेत ट्रेनची धड-धड अधिकच जोरात जाणवत होती. तितकीच जोरात होती माझी उत्कंठा. कारण मी जात होतो स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर... राजगडावर... :)


ह्या आधी २-३ वेळा राजगड दर्शन झालेले होते. ह्यावेळी मात्र राजगडाला प्रदक्षिणा मारायची योजना होती. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून २२५ दुर्गप्रेमी राजगडावर हजेरी लावणार होते. मालाड येथील नेचर लवर्स या संस्थेने हा कार्यक्रम ठरवला होता. माहिती द्यायला सोबत असणार होते इतिहासतज्ञ आप्पा परब. पहाटे ५ च्या आसपास पुण्याला पोचलो आणि मी लगेच माझा मोर्चा एस.टी. स्थानकासमोरच्या चहावाल्याकडे वळवला. सोबत एक क्रीम रोल खाल्ला आणि ६ च्या वेल्हे गाडीची वाट बघत बसलो. गाडी आल्यावर माझी सर्वात आवडती जागा पकडली. इथे-तिथे कुठे नाही तर  थेट ड्रायव्हरच्या बाजूला, गियर बॉक्सच्या शेजारी. एस.टी. मधून प्रवास करताना मला नेहमीच ही जागा आवडते. २ तासात साखरला पोचलो. एस.टी. ला टाटा केला आणि गुंजवणेची वाट पकडली. आता पुणे-सातारा महामार्ग सोडून गाडी आत वळली आणि काही वेळातच दूरवर राजगड साद घालू लागला होता.




गुंजवणेला नेचर लवर्स संस्थेच्या सदस्यांकडे आल्याची नोंदणी केली. राजगडला आले की बेधुंद व्हायला होते. मनात अनेक विचार दौडत असतात. त्या विचारांवर स्वार होत गड चढणीला लागलो. जरा वरच्या टप्याला गेलो की डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ, झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसते. ते बघत वरच्या चढणीला लागलो. मध्ये लागणाऱ्या सपाटीनंतर वाट निमुळती होत अधिक चढणीला लागते आणि चोरवाट असल्याची साक्ष देत राहते. तासा - दीडतासाने शेवटच्या टप्प्यामध्ये वाट कड्याखालून गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याच वाटेवर सुरु होतो 'राजगड प्रदक्षिणेचा मार्ग'. कारवी जिथे सुरु होते तिथून चोर दरवाज्याकडे येण्याऐवजी जर तिकडून झाडीमध्ये डावी मारली तर एक बारीक पायवाट गुंजवणे दरवाजाच्या दिशेने जाते. ही वाट फारशी मळलेली नाही. मी कड्यावरून चढून चोर दरवाज्यामधून प्रवेश करता झालो आणि पद्मावतीमाची वरच्या आई पद्मावतीच्या देवळाच्या बाजूला एका टेन्टमध्ये विसावलो. अनेक जण येऊन पोचले होते. अनेक गड चढून येत होते. ६ वर्षाच्या चिमुरड्यापासून ते ६६ वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व वयोगटाच्या लोकांचा उत्साह बघण्याजोगा होता. आजच्या दिवसात जमेल तितका राजगड बघणे आणि उद्या गडाची प्रदक्षिणा मारणे असा २ दिवसाचा कार्यक्रम नक्की होता.


पद्मावती तलाव


राजगड - ज्या ठिकाणी राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये. त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटीसारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणून तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे.


आई पद्मावती


दुपारच्या जेवणापर्यंत सर्व दुर्गयात्री गडावर येऊन पोचले होते. संस्थेचे काही मुख्य सदस्य आणि आप्पांची मुलगी शिल्पा हीच्यासोबत सर्वजण गडफेरीला निघाले. मी मात्र देवळात आप्पांबरोबर थांबलो होतो. राजगड तसा २-३ वेळा बघून झाला होता. आज मात्र आप्पांबरोबर अधिक वेळ राहून काही अधिक ऐतिहासिक माहिती घेणे ही इच्छा होती. त्यामुळे पटापट सुवेळा माची आणि आसपासचे फोटो घेऊन पुन्हा देवळाबाहेर येऊन बसलो. त्या १-२ तासात ज्ञानात खूप भर पडली. राजगडाचे मूळ नाव मुरुमदेवाचा डोंगर. राजगड नाव दिले शिवरायांनी. आप्पांच्या मते खरेतर 'मुरूमदेव' हा 'बुहृमदेव' याचा अपभ्रंश असावा. बुहृमदेव म्हणजेच ब्रह्मदेव. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आजही ब्रह्मश्रीचे मंदीर आहे. शिवाय पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिर सुद्धा संयुक्तिक वाटते. खुद्द नावावरूनच राजगडाचे प्राचीनत्व समोर येते. राजगडाच्या बाबतीत आप्पांनी सांगितलेली अजून एक गोष्ट म्हणजे तोरणा प्रमाणे इथे सुद्धा शिवरायांना झालेला धनलाभ. गडाच्या गुंजवणे दरवाज्याची काम सुरु असताना एके ठिकाणी अचानक गुप्त धन सापडल्याची काही माहिती 'सप्त प्रकाराणात्मक' बखरी मध्ये दिलेली आहे. राजगडाच्या दोन्ही माच्या म्हणजे सुवेळा आणि संजीवनी यांच्या नावाबाबत सुद्धा काही माहिती ह्या बखरीमध्ये आढळते.




 सुवेळा माचीचा विस्तार!


 
 झुंजार बुरूज


 हत्ती प्रस्तर






सूर्य कलायला लागला तसे सर्वजण परतू लागले. संध्याकाळी आप्पांचे छोटेसे व्याख्यान होते. शिवाय त्यांच्या 'राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर' ह्या पुस्तकाचे प्रकाशन देखील होते. वयाची सत्तरी गाठलेल्या आप्पांचा खणखणीत आवाज राजगडाच्या पद्मावती माचीवर निनादत होता. राजगडाचे सखे-शेजारी सिंहगड, तोरणा आणि दुरून रायगड ह्या सर्वांचेच आज राजगडाकडे लक्ष्य लागले होते बहुदा. म्हणता म्हणता आप्पांनी १७व्या शतकातला राबता राजगड आमच्या डोळ्यासमोर उभा केला. ते देऊळ, माची, ते बुरुज, सदरं सारे सारे काही पुन्हा शहारून जागे झाले होते. भारावलेले काही क्षण ते पुन्हा नक्कीच जगले असतील. व्याख्यान संपले तसा गडही शांत झाला. आम्ही जेवून निद्रिस्त व्हायची तयारी केली आणि आपापल्या टेन्टमध्ये जाऊन पहुडलो. मी कपाळावर हेडटोर्च चढवला आणि नुकतेच प्रकाशित झालेले ते छोटेखानी पुस्तक अर्ध्या तासात पूर्ण वाचून काढले. रात्रीच्या ११ नंतर पुन्हा एकदा टेन्ट बाहेर आलो तर सर्वत्र सामसूम होती. वारा मोकाट सुटला होता आणि दूरवर फडकणाऱ्या जरीपटक्याला जोराने फडकावत होता. मी पुन्हा आत येऊन झोपी गेलो. उद्या पहाटे ६ वाजता गड सोडायचा होता. प्रदक्षिणेच्या वाटेवर लागायचे होते.


पहाटे ६ वाजता उठून तयार झालो. बरोबर ७ वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने प्रदक्षिणेसाठी गड सोडला आणि तो छोटासा कडा उतरून कारवीच्या वाटेवर लागलो. पुढे-मागे सोबत प्रदक्षिणार्थी होतेच. कारवी संपली तिथून उजव्या हाताला आत शिरलो आणि प्रदक्षिणा सुरु झाली. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसत होते. अंदाज बांधला. तिथपर्यंत पोचायला किमान २ तास तरी लागणार. आता झाडी कमी झाली होती आणि उंच वृक्षातून डोकावणारे सकाळचे कोवळे उन आल्हाददायक वाटत होते.






मध्येच एके ठिकाणी कड्यावर अनेक मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसली. त्यांच्या वाटेला कोण जाणार! गुपचूप आवाज न करता सर्वजण पुढे सरकलो.अधून मधून हळू आवाजात गप्पा सुरु होत्या. कोण कुठून आलाय. वगैरे वगैरे. बहुतेक लोक पुण्या-मुंबई आणि सातारा-कोल्हापूरचे होते. काही रत्नागिरी-रायगड तर काही नाशिक आणि पार नगर-औरंगाबादहून देखील आलेले होते. मोजके २-३ लोक तर थेट नागपूरवरून आलेले होते. तासभराच्या चाली नंतर मध्ये एके ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. तिकडे कोपऱ्यात एक छोटूसे घरटे दिसले. पण घरात कोणीच नव्हते. सकाळी-सकाळी बहुदा कामावर निघून गेले घरातले लोक!!!




आम्ही पूर्व दिशेने निघालो होतो तेंव्हा आता उन समोरून यायला लागले होते. सुवेळामाचीच्या उतरत जाणाऱ्या डोंगरसरी एक-एक करून पार करत आम्ही त्या टोकाकडे निघालो होतो. माझे लक्ष्य चौफेर होते. एक तर अशी भ्रमंती पुन्हा सहसा होणार नव्हती. तेंव्हा जे दिसेल ते डोळ्याने आणि कॅमेऱ्याने टिपणे हे माझे लक्ष्य होते. दर काही पावलांनी मी वळून मागे बघत असे. अश्याच एका वेळी टिपलेला हा बालेकिल्ल्याच्या महादरवाज्याचा फोटो.


राजगडाचा बालेकिल्ला का अभेद्य आहे त्याचा एक प्रत्यय... आहे कोणाची हिंमत तिथवर पोचायची?


सुवेळा माचीपर्यंत पोचायचे अर्धे लक्ष्य पूर्ण झाले होते. आता वाट अधिक वाट लावत होती. आम्ही आता झुंझार बुरुजाच्या खाली होतो. वाटेत एकेठिकाणी छोटीशी खोदीव गुहा लागली. आत्तापर्यंत राजगड बाबतीत मी ह्या गुहेचा उल्लेख कुठेच वाचलेला नाही. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या बरोबर खाली असलेल्या ह्या गुहेबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती हाती लागली नाही. संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे निश्चित काही महत्व असू शकेल असे वाटते.








हत्तीप्रस्तरच्या खालच्या बाजूने. वाघाचा डोळा म्हणजेच 'नेढं' पण दिसतंय!


वर पहिले तर लक्ष्य थेट 'हत्तीप्रस्तर' आणि 'वाघाचा डोळा' उर्फ नेढ्याकडे गेले. जबरदस्त नजारा होता. आता आम्ही सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्याचे अंतर बाहेरून पूर्ण करत होतो. जेंव्हा मी माचीच्या बाहेरील बाजूस पोचलो तेंव्हा जे पहिले ते थक्क करणारे होते.




सुवेळा माचीची बाहेरील बाजू.. जणू राजगड सांगतोय, 'लढलो जरि, ना पडलो मी!'

जेंव्हा औरंगजेब खुद्द राजगडावर चालून आला तेंव्हा मुघलांनी सुवेळा माचीच्या बाजूने मोर्चे बांधून तोफांचे  प्रचंड हल्ले केले होते. खासा बादशाहा जातीने उभा राहून तोफा कुठे डागायच्या ते सांगत होता. त्याच्या खुणा आजही तिथे स्पष्ट दिसतात. ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांनी वीर पराक्रम केला. मराठ्यांनी तोफांचा असा काही प्रतिहल्ला केला कि खुद्द बादशाहा उभा असलेला धमधमा पडला आणि अर्थात औरंगजेब सुद्धा पडला होता. परंतु अखेरीस ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांना वीरमरण आले. तोफेचा गोळा लागून हा वीर मराठा धारातीर्थी पडला. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या जरा पुढे उजव्या हाताला असलेला गणपतीच्या जागी आधी संताजींची वीरगळ होती असे म्हणतात.


इकडे काहीवेळ उसंत घेतली आणि सुवेळा माचीला वळसा घालत. काळकाई बुरुजाच्या दिशेने निघालो. वाट अधिकच घसरत होती. जमेल तिथे हाताला जे सापडते ते पकडून पुढे सरकावे लागत होते. १० वाजून गेले होते आणि उन आता पाठीवर हल्लाबोल करत होते. कधी एकदा काळकाई बुरुजाच्या खालच्या गर्द झाडीत शिरतोय असे झाले होते. तिथे पोचायला तरी तासभर लागलाच. सावली मिळाल्यावर जरा निवांत बसलो. वर बघतो तर संस्थेचे काही कार्यकर्ते काळकाई बुरुजावरून दोराच्या सहाय्याने पाण्याचे ड्रम खाली पोचवत होते. कोणालाही उनाचा त्रास होऊ नये ह्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सुवेळा माचीला देखील त्यांनी असेच केले होते. हवे तितके पाणी प्यायचे आणि बाकी भरून घ्यायचे. आता आम्ही सावलीतून पुढे निघालो. इकडे २ ठिकाणी दोराच्या सह्हायाने खाली उतरायचे होते. खरेतर इतके कठीण नव्हते पण काहीजण नवखे असल्याने जास्त वेळ घेत होते. ज्यांना जमत नव्हते त्यांना धीर देत पुढे न्यावे लागे. पण महत्वाचे म्हणजे कोणी मागे हटत नव्हते. वेळ लागला तरी हे करायचेच आहे हा निर्धार प्रत्येकाने केलेला होता. इतक्या मोठ्या संखेने लोकांबरोबर ट्रेक करायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मी सुद्धा एकटाच ह्या ट्रेकला आलेलो होतो. मला थेट ओळखणारे असे कोणीही ह्या २२५ लोकांमध्ये नव्हते. तरी सुद्धा सर्वजण एकमेकांना सांभाळत, काळजी घेत ट्रेक करत पुढे सरकत होते. आमच्यात असणारा एकमेव समान दुवा म्हणजे शिवरायांवर असणारी निस्सीम भक्ती, आदर आणि देवतुल्य भावना. हा एक दुवा आमच्यात नवे बंध निर्माण करायला पुरेसा होता.


काळकाई बुरुजाच्या खालचा हा छोटासा टप्पा पार करायला चांगले २ तास लागले. वळसा मारून आता आम्ही संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. १२ वाजून गेले होते आणि पोटात भूक जाणवायला सुरवात झाली होती. उजव्या बाजूला वरती अळू दरवाजा आणि तिथून दोराच्या सह्हायाने खाली पाठवले जाणारे साहित्य पाहिले आणि खात्री पटली की चला जेवाय-जेवाय करायचे आहे. बरेच दिवसांनी वनभोजनाचा आनंद लुटला आणि जरा निवांत झालो. आता पुढची वाट बरीच सोपी होती. राजगडवरून तोरणाला ज्या वाटेने जातात तीच वाट आता घ्यायची. उजव्या बाजूला संजीवनी माचीचे दुहेरी संरक्षण बुरुज अगदी जवळ दिसत होते.




दुहेरी बुरूज संरक्षण... अद्वितीय तटबंदी... संजीवनी माची




संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले. ना कोणी करू शकेल. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. आम्ही आता एका बाजूचे ३ दुहेरी बुरुज बघत होतो. आत जाणे आत्ता शक्य नव्हते पण त्यासाठी मी उद्याचा दिवस हातात ठेवला होता. काही मिनिटात संजीवनी माचीला वळसा मारत पुन्हा राजगडाच्या राजमार्ग म्हणजे पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. वाट आता  होती आणि इथून संजीवनी माचीचे ३ टप्प्यात केलेले बांधकाम स्पष्ट दिसत होते.


संजीवनी माचीचे तीन टप्प्यांमधले घडीव देखणे बांधकाम!




 पाली दरवाजा- दुहेरी रचना!


वाटले नव्हते पण जेवून निघाल्यावर सुद्धा चांगले ३ तास लागले होते पाली दरवाज्यापर्यंत यायला. संजीवनी माचीची लांबी किती आहे ह्याचा प्रत्यय नेमका येत होता. गडाची प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. तब्बल ११ तास लागले होते प्रदक्षिणेला. पण एक इच्छा पूर्ण झाली होती. सूर्य पुन्हा एकदा निरोप द्यायला तयार झाला होता. मी पुन्हा राजमार्गाने गड चढून पद्मावती माचीकडे पोचलो आणि सदरेमागच्या तटबंदीवरून सूर्यास्त बघू लागलो.






दिवसा अखेरीस प्रदक्षिणा संपली असली तरी जेवणाआधी अजून एक कार्यक्रम बाकी होता. शिवरायांची पालखी नाचवायचा. पेटत्या मशाली, फडकणारे जरीपटके आणि मधोमध श्री शिवछत्रपतींची पालखी. वा!!!




ह्यापेक्षा अधिक उल्हासित करणारा सोहळा कुठला? आज संपूर्ण भरून पावलो. शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. गड पुन्हा एकदा जागा झाला होता. बऱ्याच काळाने शहारून उठला होता तो. आपली माणसे भेटली की जसा आपल्याला आनंद होतो तसा आनंद राजगडाला झालेला होता. बऱ्याच काळाने गड शांत झाला. सर्वजण पांगले. जेवणे आटोपली. निवांत पडले. पहाटे उठून पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचे होते ना.


मी सकाळी जरा उशिराने उठलो. सर्वांची आवरा-आवरी सुरु होती. सर्वत्र साफसफाई करून गड सोडायचा होता. आणि मग तिथून आपापल्या घरी. मी मात्र मागे थांबणार होतो. गड जरा उशिराने सोडायचा मी ठरवले होते. स्वतःचे सामान पाठीवर मारले, आप्पांना नमस्कार केला आणि निरोप घेऊन मी बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी बालेकिल्ल्याच्या दरवाजातून मला एक फोटो घ्यायचा होता.


 बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आतील बाजूने. समोर दिसतोय सुवेळा माचीचा विस्तार!



 


संजीवनी माची ... !


बालेकिल्ल्यावर एक धावती चक्कर मारली आणि उतरून संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. जमेल तितके पुढे जाऊन मला काही फोटो घ्यायचे होते.



मोजके फोटो घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. खरेतर दुहेरी बुरुजांपर्यंत जाऊन काही फोटो घ्यायचे होते पण ते शक्य झाले नाही. मी वळून पुन्हा पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. तिथे काही वेळ घालवून मी पुन्हा पद्मावती माचीकडे निघालो. खरेतर तिकडून उतरून वाजेघर मार्गे जाता आले असते पण मी पुन्हा गुंजवणे मार्गेच उतरायचा निर्णय घेतला. पद्मावती आईच्या मंदिरापाशी आलो. सर्वत्र सामसूम होती. सर्व निघून गेले होते. गडावर बहुदा मी एकटाच होतो. नाही म्हणायला एक कुत्रा समोर स्तंभापाशी बसला होता. मंदिरात जाऊन आईला नमस्कार केला. बाहेर येऊन उजव्या बाजूला पहिले तो बालेकिल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जरीपटका अजूनही डौलाने फडकत होता. नकळत एक हात छातीवर गेला. राजांचे स्मरण झाले. मी दोन्ही हाताने सॅक टाईट केली आणि झपाझप पावले टाकत परतीच्या वाटेला लागलो. चोर दरवाजाच्या पायऱ्या उतरायच्या आधी पुन्हा एकदा नजर मागे वळलीच. मनातच म्हणालो,"राजगडा... मी पुन्हा येणार आहे. लवकरच...


 हाच लेख यंदाच्या मायबोली हितगुज दिवाळी अंकात देखील प्रसिद्ध झालेला आहे.

Monday 1 November 2010

भटकंतीची १० वर्षे ...

बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे.' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.




सह्याद्रीत पहिले पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत सह्याद्रीने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः: वर्षाव केलाय. त्याने कधी पावसाळी अनुभवांनी मला चिंब भिजवलंय, कधी गडावर कडाक्याच्या थंडीत गारठवलय तर कधी उन्हातान्हात रानोमाळ फिरवलंय. तुम्ही म्हणाल हे का प्रेम?. तर मी म्हणीन होय. त्याचे प्रेम असेच असते. आपली रांगडी परीक्षा बघत, आपली झोळी अनुभवांनी भरत आपल्यावर तो स्वतःच्या प्रेमाचा वर्षाव कधी करतो हे आपल्याला देखील समजत नाही. कळत तेंव्हा आपण एखाद्या सह्यशिखरावर कुठेतरी हरवून सभोवतालचा नजारा बघत असतो. मग तो नानाचा अंगठा असो नाहीतर नागफणी, कोकणकडा असो नाहीतर टकमक टोक. राजगडावरचा सूर्योदय असो नाहीतर मग सूर्यास्त. त्याच्या रांगड्या सौंदर्याचे वर्णन करताना शब्दच तोकडे पडू लागतात.


जसा पाउस तप्त जमिन थंड करू लागतो तसा सह्याद्रीसुद्धा आपला रौद्रप्रतापी चेहरा लपवित एक नवे रूप घेऊन आपल्या समोर येतो. ह्या हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीची मजा काही औरच. मग आपण सुद्धा मनमुराद भिजण्यासाठी नवे ट्रेक आखत त्याच्या भेटीला निघतो. पण माथ्यावर त्याला गाठायचे तर आधी परीक्षा ही द्यावीच लागते. मग तो एखादा भरून वाहणारा ओढा असो, दुथडी भरून वाहणारी नदी असो नाहीतर एखादी वर चढणारी पाण्याची वाट असो. त्याला भेटायचे म्हणजे ते पार करणे आलेच. आपली मजा बघत असतो तो पण त्यालाही मनातून आपण तिथवर पोचावे हे मनात असतेच. दोघांमधली ही ओढ अनिवार होते आणि मग आपली पावले वेगाने शिखराकडे पडू लागतात. माथा जसा जवळ येतो तसे आपण 'आता माथ्यावर पोचूनच टेकायचे रे' हे उगाच नाही म्हणत. पावसाळी वातावरणात राना-रानातून गार वारे साद घालत फिरत असतात आणि मनावर एक वेगळीच धुंदी निर्माण करितात. वर्षोनुवर्षे ऑफिसच्या वातानुकीत यंत्राचा वारा घेणाऱ्या लोकांनो, हे गार वारे अंगावर घेतले आहेत कधी? ते वातानुकीत यंत्र झक मारेल ह्यापुढे. खळखळत वाहणारे ओढ्याचे पाणी ओंजळीत भरून प्यायला आहात कधी? एकदा हे करून बघाच. आयुष्यभराची तहान भागेल तुमची.




पाउस जरा परतीच्या मार्गाला लागतो तसा एक सुखद गारवा सह्याद्रीमध्ये पसरू लागतो. आता आपण खास रग जिरवणारे आणि उंची गाठणारे प्रचंडगड, रतनगड, अलंग-मंडण-कुलंग असे ट्रेक प्लान करू लागतो. पाऊस थांबलेला असला तरी धुक्याचे खास खेळ आपल्यासाठी सुरू असतात. सूर्यदेवाने आपली द्वाही चहूकडे फिरवण्याआधी पहाटे पहाटे दऱ्याखोऱ्यात पसरलेले हे धुके खूपच आल्हाददायक असते. अश्या धुक्यातून ट्रेक करायला तर काय अजूनच मजा!!! हवे तेंव्हा निघावे, हवे तिथे विश्रांतीसाठी बसावे. तो असतोच कधी झाड बनून तर कधी दगड बनून आपल्याला टेकायला द्यायला. आपल्याला तहान लागली आहे हे कळते त्याला मग मध्येच एखादा ओहोळ देतो सोडून आपल्या वाटेवर. काळजी घ्यावी ती त्यानेच. गडावर चूल बनवून जेवण बनवावे तर हा.... वारा. मग कधी थोड्यावेळासाठी वाऱ्याचा वेग जरा कमी करेल आणि आपल्याला जेवण बनवू देईल. आपण निवांतपणे जेवून गप्पा मारत टेकलो की हा परत आपला वेगाने सुरू... गडावर रात्र जागवून निवांतपणा अनुभवावा. भले १० जण सोबत असतील पण प्रत्येकाने शांत राहून फक्त आकाश बघावे. सर्व काही नि:शब्द. आवाज यावा तो फक्त वाऱ्याचा आणि झाडांच्या सळसळीचा. अजून काय हवे!!!


नवा ऋतू आणि सह्याद्रीचे नवे रूप न दिसले तरच नवल. पुन्हा एकदा तो आपले रौद्र रूप धारण करू लागतो. पुन्हा एकदा आपली रांगडी परीक्षा पाहण्यासाठी डोंगर-कडे तप्त होऊ लागतात. आपण देखील मग काही जिद्दी ट्रेक प्लान करू लागतो. स्वतःच्या अगणित हातांनी तो आपली झोळी भरत असतो आणि आपण अधाशासारखे फक्त घेत असतो. मला नाही वाटत तो कधी थांबेल आपल्यावर प्रेम करणे.. आणि मलाही नाही वाटत की मी कधी थांबीन त्याच्याकडे जाणे. कुठलेही संकट पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास मला दिलाय तो ह्या सह्यकड्यांनी. मला नाही वाटत हे कुठल्या पुस्तकी शिक्षणातून कधी मिळेल. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला डोंगरातच मिळालेत. आज जगण्याचा अर्थ जो मला कळतोय तो ह्या सह्याद्रीने दाखवलाय मला.




आज फक्त १० वर्षे झालीत. अजून खूप हिंडायचे आहे. रानोमाळ भटकायचे आहे. गड-किल्ल्यावर अभिमानाने शिवरायांचे स्मरण करायचे आहे. इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. ह्या सर्वांनी मी पावन झालो हे नक्की. खूप अनुभव मिळालेत पण अजून खूप घ्यायचे आहेत.


हे सह्याद्री... मी येतोय लवकरच पुन्हा एकदा असेच काही नवे अनुभवायला..तुझ्या भेटीला आसुसलेला... डोंगर यात्री... डोंगर वेडा...


... पक्का भटक्या...

Sunday 24 October 2010

पवनाकाठचा तिकोना ...

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल २५ भटक्यानी पवना धरणाच्या समोर असलेला तिकोनागड सर केला. तारीख २५ आणि भटके देखील २५. (नशीब या महिन्याची २५ तारीख यायच्या आधी मी कसाबसा हा पोस्ट करतोय.) जुलै महिन्यात केलेल्या विसापूर ट्रेकनंतर त्या ट्रेकमध्ये यायला न जमलेल्या आणि 'टांग दिलेल्या' अनेकांनी अजून एखादा ट्रेक व्हायला हवा असे म्हटल्यावर एक गूगल बझ सुरू झाला आणि सर्वांच्या तारखा जमवत अखेर २५ सप्टेंबर रोजी 'तिकोना' येथे जायचे ठरले. २४ तारखेपर्यंत हा आकडा २२ होता मात्र २५ तारखेला सकाळी तो एकदम २५ झाल्याचे लक्ष्यात आले. २२ वरून थेट २५...


२४ तारखेला संध्याकाळी भाग्यश्री ताईला जाऊन भेटलो. तिला इकडे येऊन अवघे ४ दिवस झाले होते. मी आणि शमी पहिल्यांदाच ताईला भेटत होतो. ट्रेकसाठी कायकाय खादाडी न्यायची ते ठरवत इतर बऱ्याच गप्पा झाल्या. इतक्यात महेंद्रदादाचा फोन आला. त्याच्याकडून 'गाडीत एक जागा आहे का रे?' अशी विचारणा झाली. मी नकार देऊन मोकळा झालो. त्यानंतर तास उलटून गेला तरी श्रीताई बरोबर गप्पा सुरूच होत्या. आता मला देवेंद्रचा फोन आला. त्याच्याकडून सुद्धा विचारणा 'गाडीत एक जागा आहे का रे?' मी नकार देत म्हटले,"मगाशीच महेंद्रदादाला सुद्धा एक नकार दिला आहे मी. तू आता अजून कोणाला सोबत आणू नकोस. गाडीत जागाच नाही तर बसवणार कुठे" ७ वाजून गेले तसा ताईकडून निघालो आणि थोडे खायचे सामान घेणार तेवढ्यात पुण्याहून अनिकेतचा फोन. 'खायचे काय करताय. मी सर्वांसाठी खायला चपात्या घेऊन येऊ का?' मी त्याला फक्त ३-४ जणांसाठी आणायचा सल्ला दिला. कारण प्रत्येक जण ट्रेकला थोडे अधिकच खायचे सामान आणतो आणि मग ते संपता संपत नाही. ८:३० च्या आसपास घरी पोचलो. काही वेळात अनुजा सुद्धा घरी येऊन पोचली. जेवलो आणि लवकर उठायचे म्हणून गुडूप झालो.


दुसऱ्या दिवशी पहाटे-पहाटे मी, शमी, अनुजा, अनघा आणि श्री ताई ठाण्याहून निघालो. आपला आनंद आणि त्याचे मित्र स्वल्पेश, अमोल, उदंड उत्साही सागर नेरकर, सचिन उथळे पाटील आणि त्याचा मित्र अक्षर देसाई, सौ. अवनी वैद्य असे काहीजण दुसरया गाडीतून निघाले. तिकडे महेंद्रदादा, उधाणलेला सुहास, देवेंद्र (च्यायला ह्याने दिलेला खो अजून पूर्ण करायचे मला), स्नेहल आणि चैतन्य असे बोरीवलीवरून निघाले होते. तीनही गाड्या सानपाड्याला सकाळी ७:३० च्या आसपास भेटल्या आणि तिकडे ज्योती भेटली. काल मला आलेले दोन्ही फोन हे ज्योती ह्या एकाच व्यक्तीसाठी होते मला तिकडे लक्ष्यात आले. मी दोघांना नाही म्हणून देखील तिचा ट्रेकला यायचा उत्साह बघता तिला देवेंद्र आणि दादा घेऊन आले होते पण ह्या बाबतीत मला काहीच माहिती आधी सांगितली गेली नाही. तिकडून मग पुढे जात पनवेलच्या आधी ओरिगामी एक्स्पर्ट भामूला उचलत आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो. पुण्याहून निघालेले श्री. अनिकेत, अभ्यासू सागर, मनमौजी योगेश, विकास आणि अभिजित असे ५ जण सुद्धा २ बाइक्स वर मार्गस्थ होत कामशेतच्या दिशेने निघाले होते. मला मात्र पुण्याहून फक्त ४ जण येणार अशी माहिती होती.


तासाभरात लोणावळ्याला पोचल्यावर आम्ही नाश्ता आटोपून घेतला. इकडे एक छोटीशी गडबड झाली ती म्हणजे टवेराच्या चालकाचे परवाना पत्र (सोप्या मराठीमध्ये लायसन्स.. :D) हवालदार मामाने काढून घेतले. कारण गाडीमध्ये एकूण ९ जण बसलेले होते. ते मिळवून पुन्हा मार्गस्थ व्हायला थोडा वेळ गेला. नाष्ट्यामागोमाग थोडा वेळ सुद्धा खात आम्ही अखेर कामशेतच्या दिशेने निघालो. ठरवलेल्या वेळेच्या किमान १ तास तरी आम्ही मागे होतो. अखेर १० नंतर सर्वच्या सर्व २५ जण कामशेत फाट्याला भेटलो. आता ३ चारचाकी आणि ३ दुचाकी असा लवाजमा तिकोना पेठ गावाच्या दिशेने निघाला. डाव्या बाजूला बेडसे गाव आणि मग पवना कॉलोनी पार करत धरणाच्या काठाला लागल्यावर समोरचे दृश्य पाहून गाडी न थांबवणे म्हणजे अरीसकपणाचा कळस झाला असता. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि तिकडे पुन्हा एकदा सर्वांची फोटोगिरी सुरू झाली. पवना धरणाच्या भिंतीमागून आता तुंग किल्ला डोकावू लागला होता आणि डावीकडे तिकोना आम्हाला खुणावू लागला होता.








आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. शेवटची धाव मारत तिकोना पेठच्या आधीचा खडा चढ पार करत आम्ही पायथ्याला पोचलो. गावातल्या देवळासमोर गाड्या टाकल्या आणि निघण्याआधी एक ओळखसत्र घेतले. मोठा ग्रुप असेल आणि बरेच लोक एकमेकांना ओळखत नसतील तर असे एक छोटेसे सत्र घेणे उत्तम. मी काही मोजक्या सूचना दिल्या.








त्याआधी अनिकेत आणि अवनीचे नेमके कुठ-कुठले सामान सोबत घ्यायचे ह्यावर १-२ मिनिटांचे छोटेसे चर्चासत्र सुद्धा पार पडले... :) मग आम्ही सर्व तो गडाकडे जाणारा लाल मातीचा रस्ता तुडवत निघालो. पाउस तर दूरच पण मळभ सुद्धा नव्हते. उनाचा त्रास होणार म्हणून सर्वांना जास्तीतजास्त पाणी सोबत ठेवायला सांगितले होतेच.




अर्ध्या तासात तो लाल मातीचा धीम्या चालीचा रस्ता संपला आणि आम्ही पहिल्या चढणीला लागलो. चढणीला लागलो तेंव्हा आनंद, त्याचे मित्र, अनघा, अनुजा आणि स्नेहल वगैरे भराभर पुढे जात होते पण श्री ताई, महेंद्रदादा, अनिकेत आणि मी सर्वात शेवटी होतो. कधीही कुठेही मी सर्वात शेवटीच असतो. माझ्याबरोबर ट्रेकला जर अभिजित असेल तरच मी शेवटी नसतो. चढायला सुरवात करताना बरोबर वरचे ढग पसार झाले आणि अगदी प्रखर उन्हात आम्ही वर सरकू लागलो. थोडे वर गेल्यावर मात्र महेंद्रदादाला त्रास व्हायला लागला. इतक्या वर्षांनी ट्रेक म्हणजे त्रास हा अपेक्षित होता पण आधीचे काही दिवस त्याची धावपळ बघता हे प्रकरण अजून कठीण जाणार असे वाटू लागले. आता शमिका, अनुजा आणि श्री ताई सुद्धा पुढे निघून गेल्या. काही मिनिटे आराम करून मी, दादा आणि अनिकेत पुन्हा चढायला लागलो. पण अजून थोडेच वर गेल्यावर दादाला अजून त्रास होऊ लागला. तिथून मग त्याने ट्रेक न करता पुन्हा खाली जायचा निर्णय घेतला. अर्थात त्याचा निर्णय योग्यच होता.


डोंगरात असताना 'मी हे करू शकतो, किंवा जरा स्वतःला खेचले तर होऊन जाईल' असे करण्यापेक्षा सारासार विचार करून निर्णय घ्यायचा असतो आणि तसा योग्य निर्णय त्याने घेतला. पण त्याला एकट्याला खाली जाऊ देणे मला शक्य नव्हते. तेंव्हा मी पुन्हा एकदा खाली उतरून त्याच्यासोबत देवळापर्यंत जायचे ठरवले. माझ्या सोबतीला देवेंद्र आला. मी माझी सॅक अनुजाकडे दिली आणि खालच्या वाटेला लागलो. जसजसे आम्ही खाली उतरत होतो तसे वरवर जाणारे बाकी सर्वजण आम्हाला स्पष्ट दिसत होते. बरोबर २ वाजता दादाला देवळापाशी सोडून मी आणि देवेंद्र पुन्हा एकदा ट्रेक रूटला लागलो. परत येताना आम्ही दादाच्या स्पीडने आलो होतो पण परत जाताना आम्ही आमचा स्पीड डबल केला. ४५ मिनिटात वर पोचायचे असे मी ठरवले होते. एव्हाना सर्वजण वर पोचले असणार ह्याची मला खात्री होती. एक शंका मात्र मनात होती आणि ती माझा न राहून जीव खात होती. ती म्हणजे गडाच्या शेवटच्या टोकाच्या पायऱ्या... पण सर्वांनी खास करून श्री ताईने विनादिक्कत त्या पार केल्या. नशीब पाउस नव्हता नाहीतर कसरतच झाली असती. शिवाय नेमक्या त्यावेळी मी तिकडे नव्हतो. पण आनंद, सुहास आणि अनुजा आहेत हे मला ठावूक होते










पायथ्यापासून वेगाने निघालेलो मी आणि देवेंद्र एकामागून एक टप्पे सर करत अवघ्या ३५ मिनीटामध्ये राम ध्यान मंदिर, मारुतीची मूर्ती आणि गडाचा खालचा दरवाजा पार करत पायऱ्यांना भिडलो. गडाचा दरवाजा शिवकालीन पद्धतीचा असून बुरुज पुढे देऊन मागे लपवलेला आहे. बुरुज साधारण २० मीटर उंचीचा तरी असावा. गडाची उजवी भिंत आणि बांधीव बुरुज ह्या मधून १०० एक खोदीव पायऱ्या आपल्याला गड माथ्यावर घेऊन जातात. पायऱ्यांच्या अर्ध्या वाटेवर उजव्या हाताला एक शुद्ध पाण्याचे टाके आहे. इथून वरच्या काही पायऱ्या थोड्या खराब झालेल्या आहेत. तेंव्हा जरा जपून. पायऱ्या संपल्या की डाव्या हाताला बुरुजावर जाता येते. दरवाज्याच्या बाजूला उजव्या हाताला पाण्याच्या २ टाक्या आहेत. ह्यातले पाणी अतिशय गार आणि शुद्ध असून पिण्यासाठी एकदम योग्य आहे. २००२ साली ह्या टाक्याचे पाणी वापरून शामिकाने अशी काही साबुदाणा खिचडी बनवली होती की ती चव अजून सुद्धा जिभेवर आहे. ते टाके बघताच त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या.




५ एक मिनिटात पायऱ्या पार करून आम्ही दोघांनी सुद्धा गडाचा माथा गाठला. तो पर्यंत बहुदा बाकीच्या सर्वांचा गड बघून झाला होता. माथ्यावर जाऊन झेंडा लावणे, सभोवतालचा नजरा डोळ्यात साठवणे आणि तेथे फोटोगिरी करणे हे सर्व आटोपून सर्वजण खाली येऊन निवांत बसले होते. बहुदा आमची वाट बघत. आम्ही आलो की लगेच जेवण सुरू करायचे असा प्लान असणार नक्कीच. तेंव्हा गेल्यागेल्या आम्ही जेवून घेतले.






बाकी लोक वर येताना काय काय घडले हे सर्व वर गेल्यावर समजले. काल श्रीताईने ट्रेकवर पोस्ट टाकली आहेच. खादाडी तर जमके झाली. भाकर्‍या काय, अळूवड्या काय (बहुदा योगेशने आणलेल्या), भामूने आणलेली लसणाची चटणी (उरलेली चटणी तर शमी घरी घेऊन आली आणि दररोज खाताना 'जियो भामू' म्हणून बोलायची), शमिने घेतलेले मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, आणि श्रीताईने बनवलेले बेसनाचे लाडू (हे मी घरी घेऊन गेलो बरं का) अशी न संपणारी यादी होती. अर्धा तासभर खादाडी महोत्सव साजरा करत मग मी आणि देवेंद्र गड बघायला निघालो. आमच्यासोबत अनुजा, सपा आणि सागर पुन्हा भटकायला आले. एक गडफेरी पूर्ण केली. गडाच्या माथ्यावर शिवशंकराचे मंदिर असून मंदिराच्या खाली पाण्याचे कुंड आहे. २००२ साली मी इकडे आलो होतो तेंव्हा हे पाणी पिण्यायोग्य होते पण आता इकडे बरीच पडझड झाली आहे. मंदिरासमोरचा नंदी बराच झिजला असून एक नवीन छोटा नंदी पिंडी समोर बसवला आहे. आम्ही गड माथ्यावरून सभोवतालचा नजारा बघून तृप्त झालो. पश्चिमेला विस्तीर्ण पवना जलाशय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असणारा तुंग किल्ला एक आगळेच विलोभनीय दृश्य निर्माण करीत होता. हिरवीगार जमीन, निळेशार पाणी आणि पांढरेशुभ्र ढग यांनी एक सुंदर चित्र रेखाटले होते.




हल्लीच जाऊन आलेलो तो विसापूर उत्तरेकडून हाक मारत होता. विचारात होता बहुदा,'काय काही दिवसांपूर्वी इकडे होता विसरला नाही ना?' आणि बाजूचा लोहगड म्हणत होता,'काय राव इकडे कधी येताय? खूप दिस झालं की तुम्हाला भेटून' मनोमन लोहगडाला भेटायचे ठरवून पुन्हा एकदा खाली दरवाज्यापाशी आलो आणि निघायच्या तयारीला लागलो. ४ वाजून गेले होते. आम्ही आता भराभर परतीच्या मार्गाला लागलो. अर्धेजण भराभर उतरत वेगाने खाली निघून गेले मात्र मी-शमिका, अनुजा, सुहास, भामू, सागर असे काही जण निवांतपणे गप्पा-टप्पा करत, मध्येच थांबून खादाडी करत उतरत होतो. श्री ताई, अनिकेत-अवनी आणि बाकी लोक पायथ्याला पोचले तरी आम्ही अर्ध्या वाटेवर देखील उतरलो नव्हतो. मला चढताना काहीच फोटो घेता अले नव्हते तेंव्हा माझी क्लिका-क्लिकी सुरू होती.गड चढताना मारुतीच्या मूर्तीपाशी थांबून फक्त नमस्कार केला होता पण फोटो राहिला होता तो घेतला. खाली २००२ सालचा फोटो दिलाय जेंव्हा मी, शमी आणि अभिजित पहिल्यांदा तिकोनाला आलो होतो.






२००२ साली

आम्ही काहीजण निवांतपणे गप्पा-टप्पा करत, मध्येच थांबून खादाडी करत उतरत होतो. श्रीताई, अनिकेत-अवनी आणि बाकी लोक पायथ्याला पोचले तरी आम्ही अर्ध्या वाटेवर देखील उतरलो नव्हतो. मध्येच एका मोठ्या ढगाने आम्हाला सावलीत घेतले. छान गार वारा सुटला. आम्ही लगेच थांबून बसकण मारली. खाली दूरवर बाकी लोक मातीचा रस्ता तुडवत जाताना दिसत होते पण आम्ही आपले मस्तपैकी खादाडी करत होतो. तिथून चक्क २० एक मिनिटांनी निघालो. पायथ्याला पोचलो तेंव्हा ५ वाजून गेले होते. लाल मातीच्या वाटेवरून वळून पुन्हा एकदा तिकोनाकडे पाहिले. तो म्हणत होता,'सुखरूप जा पोरांनो. आठवणीने आलात बरं वाटले.' गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात असे मला वाटत आले आहे. अर्थात त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी.





देवळापाशी पोचून सर्वजण फोटोसाठी जमलो. एक ग्रुप फोटो घेतला आणि गाड्या काढल्या. बघतो तर काय 'योमू'ची दुचाकी ठुस्सस्सस्स.... चाकात एकदम कमी हवा. मग कसा बसा हळू-हळू तो पवना कॉलनीपर्यंत निघाला. कॉलनीमध्ये एक चहा घेऊ आणि सर्वजण आपापल्या घरी सुटू असे ठरले.





आजचा ट्रेक तिकोना असला तरी संपूर्ण वेळ पवना धरणाने वेढा घातलेला उत्तुंग तुंग आम्हाला खुणावत राहिला. परतीच्या वाटेवर मावळतीच्या सूर्याबरोबर देखील त्याचेच दर्शन झाले... मनात आल्याशिवाय राहिले नाही. मी मनात म्हणालो, 'काळजी करू नकोस. लवकरच येतोय मी तुझ्या भेटीला.'

.......... पक्का भटक्या...  


नोंद : सदर पोस्ट मधील बहुतांशी फोटो शमीने काढलेले आहेत. काही फोटो आनंद आणि श्रीताई कडून साभार...


Saturday 9 October 2010

दुसरे दुर्ग साहित्य संमेलन... राजमाची ... !

चित्रामधील लिखाण वाचायला त्रास होत असल्यास 'झूम इन' चा पर्याय वापरु शकता किंवा लिखाण नवीन खिडकीमध्ये उघडू शकता... :)

Tuesday 3 August 2010

नाणेघाट - नानाचा अंगठा ... !

सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट. आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक ३ जुलै रोजी नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. जोडीला ह्यावेळी शमिका सुद्धा होती. शिवाय अमृता, तिचा मित्र विकास आणि जाड्या हर्षद सुद्धा सोबतीला होते. ट्रेक झाल्यावर संध्याकाळी माळशेजघाटाच्या खाली असणाऱ्या  'दिघेफळ' या गावी जाऊन राहायचे असे ठरले होते. रविवारी तिकडच्या धबधब्यामध्ये मज्जा करायची होती. त्यासाठी अभी-मनाली, अमेय-शुभांगी आणि इतर काहीजण आम्हाला शनिवारी संध्याकाळी टोकावड्यात भेटणार होते.


गोरखगड आणि मच्छिंद्र सुळका ...


शनिवारी पहाटे-पहाटे माझ्या 'छोट्या भीम' (गल्लत करू नका... छोटा भीम हे आमच्या गाडीचे नाव आहे..) सोबत आम्ही ५ जण मुरबाडमार्गे नाणेघाटाच्या दिशेने निघालो. पहिला थांबा अर्थात मुरबाड मधले रामदेव हॉटेल होते. तिकडे भरगच्च नाश्ता झाला आणि आम्ही पुढे निघालो. सरळगाव वरून जरा पुढे जातो न जातो तोच उजव्या हाताला गोरखगड आणि मच्छिंद्र सुळक्याने आम्हाला धुक्यातून बाहेर येऊन नमस्कार केला. आम्ही सुद्धा थांबून मग तो स्विकारला. समोर आता नाणेघाट दिसत होता. मध्येच धुक्यातून डोके वर काढत नानाचा अंगठा आपले उत्तुंग अस्तित्व दाखवून देत होता. आता जास्त क्षण आम्ही दूर राहणे शक्य नव्हते. फटाफट गाडी मारत पायथ्याला पोचलो आणि जिथे नाणेघाटचा रस्ता सुरु होतो तिकडून गाडी जरा आत टाकली. पार्किंगला एक मस्त जागा मिळाली. लगेच निघालो तिकडून. वर पहिले तर ढग दाटलेले होते. धुके पसरलेले होते पण पावसाचा मागमूस नव्हता. लालमातीच्या मळलेल्या वाटेने आता खरी चाल सुरु झाली होती. आजू बाजूला सर्वत्र सागाची झाडे होती. काही इतर झाडांवर ऑर्किड फुलले होते.

वाईल्ड ऑर्किड...


पहिला काही वेळ अगदीच रमत-गमत गेला. ओढ्याकाठाने गप्पा टाकत टाकत आणि फोटो काढत आम्ही पुढे जातच होतो. माहिती असलेली थोडीफार माहिती जाड्या बरोबर शेअर करत होतो.

अजूनही मला नाणेघाटला आलो की कधीतरी बैलांचे, लमाणांचे मैलभर लांब तांडे दिसतील असे वाटते. दूरदेशीच्या जहाजांमधून कोकणातील बंदरांवर उतरलेल्या विविध वस्तू वरघाटावर घेऊन जाणारे पुरातन काळातील व्यापारी तांडे. कसे असेल ते दृश्य??? किंवा मराठा फौज दौड मारत जुन्नर मारायला वरघाटी कूच करत आहे. फौजेच्या आघाडीला प्रतापराव, येसाजी कंक किंवा आपले थोरले राजे आहेत. हे दृश्य तर त्याहून भन्नाट... टाईम मशीन असे काही असते तर मी नक्कीच १७व्या शतकात गेलो असतो.
पण फार काळ इतिहासात गुंतून न जाता आम्ही २ वेळा ओहोळ पार करत आता पहिल्या टप्याच्या चढणीला लागलो. थोडेसेच पुढे जातो तोच उजव्या बाजूने खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज येऊ लागला. वाट सोडून मी लगेच पाय तिकडे वळवले. मगाशी पार केलेल्या ओढ्यांचाच हा वरचा भाग होता. पाउस काही पडत नव्हता मग ओढ्याच्या पाण्यानेच जरा फ्रेश झालो. इतक्यात पाण्यामध्ये एक सापाचे पिल्लू दिसले. आता हा कुठला साप आहे इतका काही माझा सापांवर बारीक अभ्यास नाही. पण बिन-विषारी होता हे मात्र नक्की. दर काहीवेळाने प्राणवायू घ्यायला तो फक्त आपले तोंड पाण्याबाहेर आणायचा. तेंव्हाच टिपलेला हा फोटो. अर्थात ह्या एका फोटोसाठी पठ्याने बराच वेळ घेतला माझा. त्याला टाटा करून आम्ही सर्व पुन्हा चढाला लागलो.


काय रे.. फोटो काढतो काय???


वाट अजूनही सरपटत चाललेल्या अजगरासारखी रुंद होती. हळू हळू वाट अरुंद होऊ लागली आणि अधिक चढणीला लागली. वाट चढणीला लागली तसे हृदयातील ठोके सुद्धा चढणीला लागले.. म्हणजे वाढायला लागले हो... ३० एक मिनिटात पहिल्या टप्याच्या शेवटाला पोहोचेपर्यंत आश्चर्यकारकरित्या शमिका सर्वात पुढे होती. तर मी शिरस्त्याप्रमाणे सर्वात मागे. अमृता आणि विकास मध्ये होते तर जाड्या फुसफुसत कसाबसा वर चढत होता. पाउस नाही, वारा नाही आणि त्यात ते चंदेरी मच्छर मध्येच येऊन त्रास  देत होते. कधी एकदा पहिला टप्पा पार करून वरच्या टापूवर पोचतोय असे वाटत होते. वरती मस्त वारा होता. धुक्याच्या जवळ अधिक गार देखील वाटत होते. तिकडे येऊन पोचतो न पोचतो तोच सर्व धुके गायब झाले आणि नाणेघाट - नानाचा अंगठा यांनी आम्हाला त्यांचे सर्वांग दर्शन घडवले.

नाणेघाट आणि नानाचा अंगठा ...


दुसऱ्या टप्याची चढण सुरु झाली तसा जाड्या अधिकच मागे पडू लागला. त्याला सोबत म्हणून मी जरा मागेच थांबलो होतो. शामिकाला मात्र ट्रेक करताना सारखे मध्ये-मध्ये थांबायला आवडत नाही. मग ती आपली पुढे जायची. तिच्या हि पुढे आता अमृता आणि विकास होते. ते सुद्धा इकडे बस, ते फोटो काढ असेच फुरसत मध्ये जात होते. जस-जसे वर जात होतो तसे धुके दाट होत गेले. आता आम्ही धुक्यात विलीन झालो होतो. इथून ज्या दगडी पारऱ्या सुरु होतात त्या आपल्याला वरपर्यंत घेऊन जातात. आज अजिबात पाउस नव्हता नाहीतर इथे पावसात पायऱ्या चढून जायला अफलातून धमाल येते. २००५ साली मी जेंव्हा नाणेघाट केला होता तेंव्हा अर्धा फुटभर पाणी वेड्यासारखे खाली धावत होते. आत्ता तिकडे धो-शो पाउस पडतोय ना... आत्ता खरेतर नाणेघाटला जायला अजून मज्जा येईल.


अस वाटतंय की हरवून जावे ...


कातळात खोदलेले पाण्याचे टाके ...


दुसऱ्या टप्यात बरोबर मध्ये पाण्याचे एक टाके खोदलेले आहे. किती प्राचीन असावे हे टाके? वरची गुहा जितकी जुनी तितकेच जुने असावे बहुदा.. मार्ग वापरणाऱ्या वाटसरूंना पाण्याची सोय म्हणून बांधले गेले असणार नक्की. अशीच अजून २-३ छोटी टाक उजव्या बाजूला कड्यात आहेत. चटकन लक्ष्यात येत नाहीत. टाक्यापासून निघालो कि अगदी काही वेळात आपण वरती पोचतो. आम्ही इकडे पोचलो तेंव्हा एक ग्रुप मागून येऊन इकडे पोचला. त्यातला एकजण मला विचारतो 'और कितना बाकी है.' त्या मुलाने हाफचड्डी घातलेली होती. त्याच्या बाजूचा तर अजून हाईट. त्याच्या पाठीवर तिरपी अडकवलेली सामानाने भरलेली चक्क लैपटॉप बैग होती. तिसऱ्याच्या हातात फुटबॉल होता. मला कळून चुकले कि कुठल्यातरी कंपनीमधली हौशी कलाकार मंडळी आहेत. त्याला बोललो,'अजून ४५ मिनिटे.' त्यांच्या चेहऱ्यावर 'गार' पडलेले भाव होते. एकजण 'Hmmm.. More 45 minits' असे बोलून खाली दगडावर बसला. त्यांना खरेतर थोडे प्रेमाचे डोंगरी नियम सांगावे असे मनात आले होते पण तितक्यात त्यांचा म्होरक्या मागून काठी टेकत आला आणि त्यांना 'चला..चला.. We are almost there. निकलते है' असे मराठी - इंग्रजी आणि हिंदी असे तिन्ही भाषां एकाच वाक्यात बोलला. त्याचे बोलणे ऐकून ते अजिबात हलले नाहीत. मी मात्र पुढे निघालो. अमृता, विकास आणि शमिका आधीच पुढे गेलेले होते. फक्त मी आणि हर्षद मागे राहिलो होतो. 

नाणेघाटाचा अतिप्राचीन व्यापारी मार्ग...


वळणा-वळणाच्या दगडी पायऱ्या चढत चढत अखेर आम्ही गुहेपाशी पोचलो. आता इथून वरच्या पठारावर जाणारा तो ऐतिहासिक मार्ग दिसू लागला होता. आता आम्ही थांबू शकणार नव्हतो. शिवाय गुहेमध्ये जेवणाऱ्या जत्रेचा एकाच गलका होता. तेंव्हा गुहा उतरताना बघू असे ठरले. खूप-खूप गच्च पाउस पडला कि ह्याठिकाणी इतके पाणी वाहते कि पायऱ्या सुद्धा दिसत नाहीत. गुहा धुक्याने भरून जाते आणि खालचा मार्ग तर स्वर्गतीत असतो. आज मात्र ती परिस्थिती नव्हती. थेट वर पोचलो. पाउस अजून हवा तितका झालेला नव्हता. धुके मात्र खूप होते. उजव्या हाताला जीवधन आणि खडापारशी त्यात लपून बसले होते. वर पोचल्यावर बाकीच्यांना डाव्या हाताचा दगडी रांजण दाखवला. जेंव्हा नाणेघाट हा व्यापारी मार्ग म्हणून अस्तित्वात होता तेंव्हा हा मार्ग वापरल्याचा कर ह्या रांजणात टाकावा लागायचा. ज्याची हुकुमत जीवधन किल्ल्यावर त्याची हुकुमत ह्या वाटेवर.


वरच्या पठारावरचे दृश्य .. डाव्याबाजूला तो दगडी रांजण दिसतोय ...

आधी मुघलांच्या ताब्यात असलेला हा मार्ग नंतर छत्रपती शिवरायांनी आपल्या ताब्यात आणला होता. कल्याण बंदरातून आणि उत्तर कोकणातून येणाऱ्या सर्व देशी -परदेशी मालावर मुघलांना मराठ्यांकडे कर भरावा लागायचा. शिवाय प्रत्येक खाजगी व्यापार करणाऱ्याला सुद्धा कर द्यावा लागायचा. एकदा का कर भरला की खालपासून वरपर्यंत संपूर्ण मार्गावर व्यापारी मालाला संरक्षण दिले जायचे. आता आम्ही रांजणासमोरच्या कातळात असलेल्या गणेशगुहेकडे पोचलो. दर्शन घेतले आणि तसेच डाव्याबाजूने नानाच्या अंगठ्याकडे निघालो. भुका लागल्या होत्या तेंव्हा आधी पोटोबा करावा असे मत पडले. पोटोबा म्हटल्यावर थोडीच कोणी विरोधात जाणार होते.नानाच्या अंगठ्याच्या दिशेने थोडे वर चढून जीवधनच्या दिशेच्या एका कड्यापाशी विसावलो. अमृताने आणलेली हल्दीराम भेळ, जाड्याने आणलेले फरसाण आणि असे काही-बाही सटर-फटर पदार्थ खाल्ले. पोट भरले नव्हते पण पर्याय नव्हता.

गुहेमधील गणेशमूर्ती ...



अमृता, विकास आणि हर्षद नानाचा अंगठ्याच्या टोकाला जाऊन आले. धुके इतके होते कि काहीच दिसणे शक्य नव्हते. मी आणि शमिका गणेशमूर्तीपाशी बसून होतो काहीवेळ. ३ वाजत आले होते. आता आम्हाला उतरणे भाग होते. शिवाय हर्षदचा चढतानाचा स्पीड बघता उतरायला अधिक वेळ लागणार हे साहजिक होते. अखेर तिकडून निघताना पुन्हा एकदा जीवधनच्या दिशेनं नजर टाकली. किमान एक झलक तरी दिसते का ते बघायला.. पण आज बहुदा तो काही दिसायचा नव्हताच.

नानाच्या अंगठ्यात असलेली नाणेघाटाची गुहा ...

तिघे आले तसे आम्ही खाली उतरून गुहेकडे पोचलो. ३ वाजून गेल्याने सर्व सामसूम झाले होते. होते-नव्हते तेवढे ग्रुप्स उतरून गेले होते. गावातली २ माणसे तेवढी बसली होती फक्त. आम्ही तिकडे काहीवेळ काढला. गुहेमधल्या भिंतीवरती उरलेल्या उरल्या-सुरल्या ब्राह्मी स्क्रिप्टचा फोटो घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र गुहेमधून बाहेरचे काढलेले Silhoutte फोटो मस्त आले.

धुक्यात ते ...


धुक्यात मी...

धुकेच-धुके सगळीकडे... पण पाउस गेला कुठे??? असे म्हणत ३:३० वाजता खाली उतरायला लागलो. अपेक्षेप्रमाणे पण वेळेत ६:३० वाजता आम्ही खाली पोचलो. 'छोटा भीम' सुखरूप होता. आमचीच वाट बघत होता. एक नजर पुन्हा नाणेघाट पाहून घेतला आणि 'टोकावडे'कडे निघालो. काही वेळात तिकडे अभी-मानली आणि इतर काहीजण येऊन पोचणार होते. मग आम्ही जाणार होतो 'दिघेफळ'ला. धमाल - मज्जा - मस्ती करायला..... त्याचे फोटो आणि त्यावर एक छोटीशी पोस्ट टाकतो नंतर...