आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड़किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
Saturday 28 February 2009
भाग २ - निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !
पहाटे मला जाग आली ती तिच्या बाहेर जाण्याच्या आवाजानेच. मंदिराच्या दरवाजातून बाहेर पाहिले तर थेट समोर सूर्यनारायण उगवत होता. अमृता जागीच होती. अक्षरशः घोडे विकून झोपलेल्या ऐश्वर्या आणि आदित्यला जागे केले. फटाफट आवरले आणि किल्ला बघायला निघालो. आज आम्हाला हडसर किल्ला पुर्ण बघून १२वा. पर्यंत शिवनेरी गाठायचा होता. गड़ बघताना मध्यभागी असलेल्या उंचवटयाला प्रदक्षिणा मारावी. शिवमंदिराच्या बाजुलाच एक मोठा पाण्याचा तलाव आहे. तिकडून थोड पुढे गेल की उतारावर जमिनीखाली बांधलेल्या कोरीव गुहा लागतात. गुहेचे तोंड चुकू नये म्हणुन शक्यतो कडेच्या जवळून चालावे. गुहेचे मुख वक्राकार असून आत गेल्यावर समोर, डावीकडे आणि उजवीकडे असे ३ भाग आहेत. प्रत्येक भागात आतल्या बाजूला २०-२० फुट लांब-रुंद आणि १०-१५ फुट खोल अशी २-३ कोठारे आहेत. यात बहुदा धान्य, शस्त्र आणि ग़डावर लागणारे सर्व सामान साठवण्याची सोय असावी. सध्या ह्या गुहा वाइट स्थितीत आहेत. तिथून पुढे गेले की गडाच्या उत्तर टोकावर तूटका बुरुज आहे. बाकी गडावर कुठलेच बांधकाम शिल्लक नाही. वाड्यांचे जोते मात्र तेवढे दिसून येतात. एक गड़फेरी पूर्ण करून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.
हडसरच्या बांधीव पायऱ्या उतरताना मध्येच मी आणि आदित्य धावायला लागलो. आम्ही त्या पायऱ्या अक्षरशः १-२मी. च्या आत उतरलो. आणि मग खाली येउन पाय मोकळे करत बसलो. पाय कसले सॉलिड भरून आले होते. आल्या मार्गानेच हडसर गावात आलो आणि पुन्हा आमच्या बाइक्स घेउन शिवनेरीच्या दिशेने सुटलो. आता शहाजीसागर जलाशयाची भिंत दिसू लागली होती. ती पार करून आम्ही जुन्नरचा शिवाजीचौक गाठला. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला त्रिवार मुजरा करत शिवनेरीचा दरवाजा गाठला.
किल्ल्याचा पहिला दरवाजा समोर येताच माझ्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहू लागला. किल्ले शिवनेरी - आपल्या शिवबांचे जन्मस्थान. जेँव्हा राजेशहाजी जिजाऊ मासाहेबांना घेउन येथे आले तेंव्हा निजामशाहीचे सरदार, जिजाऊंचे वडिल लखुजी जाधवराव शहाजीराजांच्या मागावर होते. खरे तर शिवनेरी हा निजामशाहीचा किल्ला. पण किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव हे शहाजीराजांचे व्याही. थोरल्या संभाजी राजांचे सासरे. किल्ला निजामशाहीचा, त्यामुळे जिजाऊ मासाहेबांना येथल्यापेक्षा सुरक्षित जागा नव्हती. अखेर शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांना शिवनेरीच्या हवाली ठेवून गेले आणि फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवरायांचा जन्म झाला. मनातल्या मनात त्यांना वंदन करत आम्ही शिवनेरीच्या पायऱ्या चढायला लागलो. आता सरकारने संवर्धनाच्या नावाखाली इकडे सगळे बांधकाम नवीन केले आहे. शिवाय रविवार असल्याने खुपच गलका होता. त्यामुळे आम्हाला ना हवा तसा गड बघायला मिळाला ना हवे तसे फोटो काढता आले. ग़डावरील गंगा-जमुना टाकी, धान्यकोठार, राजवाडा, शिवजन्मस्थान, त्या पुढे असलेला कड़ेलोटकडा आणि नविन बांधलेले बाल शिवाजी मंदिर बघून आम्ही साखळीच्या वाटेकडे मोर्चा वळवला.
साखळीची वाट म्हणजे शिवनेरीची चोरवाट. उभ्या कडयामधून पायऱ्या खोदून बनवलेला हा छुपा मार्ग. ह्या वाटेने फारसे कोणी येत जात नाही. गावातली माणसे आणि डोंगरवेडे. मुळात ही चोरवाट फार कोणाला माहीत पण नाही. आम्ही ह्या वाटेने उतरायचे ठरवले. पण आमच्या गाड्या रस्त्याला असल्याने आमची नंतर पंचाइत झाली असती. आम्ही त्यावाटेने खाली उतरून पुन्हा चढून वर यायचे ठरवले. साखळीच्या वाटेवर पायर्यांचा पहिला टप्पा सोपा आहे तर दुसरा थोडासा कठीण. पावसाळ्यात ही वाट थोडी निसरडी असते. पण आता उतरून जायला फारसे प्रयास पडले नाहीत. पायर्या संपल्या की डावीकडे कोरीव गुहा आहेत. हे आम्हाला माहीतच नव्हते. दुर्लक्षित स्थितीत असलेल्या ह्या गुहा सुंदर आहेत. जुन्नर शहराचे इकडून छान दर्शन होते. शिवनेरीवरच्या गर्दीत जो निवांतपणा मिळाला नव्हता तो येथे येऊन मिळाला. पुन्हा चढून वर आलो आणि बालेकिल्ला बघायला गेलो. वरती तसे फार काही बांधकाम उरलेले नाही. एक तटबंदी सदृश भिंत उत्तम स्थितीत आहे. येथून भोवतालचा अप्रतिम नजारा दिसतो. ४ वाजत आले होते आणि आता आम्हाला परतायला हवे होते. मुख्य मार्गाने आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. माळशेजघाटमार्गे अंधारपडेपर्यंत आम्हाला किमान मुरबाड गाठायचे होते. गाडी पुन्हा दामटवली. आणि कुठेही न थांबता सुसाट वेगात २ तासात थेट टोकावडेला थांबलो. मस्तपैकी पोटपूजा आटोपली आणि अजुन एका जबरदस्त धमाल ट्रेकची सांगता केली. मी आणि अमृताने ऐश्वर्या - आदित्यला टाटा केला पण त्या आधी पुढच्या ट्रेकचे प्लॅनिंग करायला विसरलो नाही...
भाग १ - निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !
पायऱ्या उतरून पुन्हा खिंडित आलो आणि समोर असलेल्या जोड़किल्ल्यावर गेलो. तेथेसुद्धा पुन्हा कोरीव पायऱ्या आणि शत्रूला चकवा देइल अशी प्रवेश रचना. मी सर्वात पुढे होतो आणि चकणार सुद्धा होतो. पण मला डावीकडे वर जाणाऱ्या पायऱ्या आधी दिसल्या. उजवीकडच्या बाजूने एक थोडी मळलेली वाट पुढे जाते. समोर किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असे वाटते, तसे बुरुजाचे बांधकाम सुद्धा आहे. पण समोर गेलो की काहीच नाही. रस्ता बंद. डावीकडे वर जाणाऱ्या पायर्यांनी वरती गेलो, तिकडून परत खाली उतरून आलो आणि पायथ्याच्या मार्गाला लागलो. किल्ला चढून आणि बघून उतरायला साधारण तीन-साडेतीन तास पुरले.
पायथ्याला पोचलो तेंव्हा दुपारचे ३ वाजून गेले होते. आम्ही पुन्हा आमचा एक छोटासा फ़ूड ब्रेक उरकला आणि हडसरच्या दिशेने निघालो. नागमोडी वळणा-वळणाचा रस्ता आता जलाशयाच्या कड़े-कड़ेने जात होता. मध्येच ख़राब तर मध्येच सुसाट गाड़ी पळेल इतका छान. हडसर गावात पोचलो, एके ठिकाणी गाड्या लावल्या आणि फटाफट निघालो. अंधार पड़ायच्या आत आम्हाला वर जाउन पाणी आणि राहती जागा शोधणे आवश्यक होते. गावाच्या मागून वर निघालो आणि वरच्या पठारावर पोचलो. ५ वाजून गेले होते आणि हातात अजून फार तर दीडतास होता. वरती जायचा २ मार्ग आहेत. एक पाण्याची वाट तर दूसरा बांधीव पायर्यांचा मार्ग. पाण्याच्या वाटेने तासाभरात वर जाता येते पण खडा चढ आणि थोडा घसारा आहे. तर पायर्यांचा रस्ता पाण्याच्या वाटेच्या बरोबर विरूद्ध दिशेने वर जातो. त्यासाठी डावीकडच्या टेकाडाला वळसा मारावा लागतो. आम्ही त्या टेकाडावर तिरप्या रेषेत वर चढत जाउन वळसा मारून पायर्यांकड़े पोचलो.
क्रमशः ...
Sunday 22 February 2009
भाग २ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !
तिथून निघालो ते थेट प्रबळगडाच्या कड्याखालून सरकत सरकत मुळ वाटेवर येउन पोचलो. एकडे मध्ये अमृता धडपडली. जास्त काही झाल नाही. ह्या वाटेने आमचा थोडा वेळ वाचला होता. आता खरी चढाई सुरु होणार होती. किती वाजले, पाणी किती बाकी आहे हे सगळ पाहील आणि फटाफट पल्ला मारायचा अस ठरवून सुटलो. पुढे जाउन पुन्हा एक क्षणभर विश्रांती झाली. माझी तब्येत आता टोटल डाउन होत चालली होती. पण आता थांबायचे नाही असे ठरवून आम्ही निघालो ते थेट प्रबळगड़चा ढासळलेला दरवाजा आणि तटबंदी ओलांडून माथ्यावर पोचलो. आमच्याकडचे पाणी संपले होते. तितक्यात वरती एका दगडावर 'पाणी' अस खडूच निशाण आणि मार्ग दाख़वणारा बाण दिसला. खर तर गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही पण त्या वेळी आम्ही ते पाणी प्यालो.
Friday 20 February 2009
भाग १ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !
Wednesday 18 February 2009
डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !
सह्याद्री नामा नग हा प्रचंड ... हा दक्षिणेचा अभिमान दंड ... !
स्कंधावरी दुर्गम दुर्ग ज्याच्या ... हाती झळाळे परशू तयाच्या ... !
कोकणातील सर्वात उंच पर्वत ... आजा / आजोबा डोंगर ... !!!
मी भ्रमंती का सुरू केली माहीत नाही आणि का ते कधी शोधायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. २००० मध्ये कॉलेजला असताना सुरू झालेल हे वेड आता अगदी टोकाला जाउन पोचल आहे. गिरीभ्रमण आणि गिर्यारोहण हे माझे आवडते छंद. मला माझ्या कामातून सलग खूप सुट्टी मिळते. मग त्या सुट्टीमध्ये भटकणे हा माझा छंद. अर्थात सोबत फोटोग्रॉफी म्हणजेच छायाचित्रण आणि ग्रामजीवन जवळून बघणे हे त्यासोबतचे छंद. अर्थात तेथे सुद्धा मी माझा खाण्याचा छंद सांभाळतो. हा.. हा.. आता माझ्या बरोबर असे अनेक वेडे आहेत हे काही सांगायची गरज नाही. २००० मध्ये सुरू झालेली ही भटकंती आज २००९ मध्ये सुद्धा तितक्याच जोमाने सुरू आहे. कॉलेज संपल्यावर मध्ये थोडा ब्रेक लागला होता. पण आला पुन्हा सूटलोय. 'सूटलोय म्हणजे फुल्ल टू सूटलोय.' घरून शिव्या खातोय सध्या आणि काही मित्रा - मैत्रीनींच्या सुद्धा.
ह्या ९ वर्षात अनेक अनुभव आले. चांगले-वाईट. गावा गावातून विविध स्वभावाची लोक भेटली . खूप काही शिकलो. खूप काही घेतल. काही देता आल आहे का माहीत नाही. म्हणतात ना ' निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे ' पूर्णपणे पटले ह्या ९ वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला. आज हे सगळ तुम्हाला सांगायच आहे. आवडल तर घ्या नाहीतर डोंगरवेडा म्हणून सोडून द्या.
डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला... !
कुणी फिरस्ता हिंडता वनी... वदला ऐसी आर्तवाणी... !
ऐकून त्याची आर्तयाचना... आली येथल्या जडा चेतना... !
मला विचारा मीच सांगतो... आधी या माझ्या कड़े... !
सरसावत एकेक पुढे... हात उभारुनी घुमू लागले... !
डोंगर किल्ले बुरुज कड़े... डोंगर किल्ले बुरुज कड़े... !
लवकरच येतो आहे ... काही मजेशीर आणि जबरदस्त किस्से घेऊन ... !!!
*******************************************************************************