Sunday 17 January 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !

कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़ अश्या एकुण ५ दिवसाच्या माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच मेगा ट्रेकवरची पहिली पोस्ट वाचल्यानंतर पंकजने मला प्रश्न केला. ''बालवाडीमध्ये असतानाच हायस्कूलचा ट्रेक केलास?" ह्याचे उत्तर देखील त्याच्याकडेच होते. आपल्या इतिहासावर - भूगोलावर प्रेम वगैरे सर्व मान्य. पण 'खाज' हे अगदी खरे-खुरे उत्तर. इथला कुठलाही अस्सल ट्रेकर, पक्का भटक्या ह्या सह्याद्रीमध्ये कसा तावून सुलाखून निघलेला असतो. पण त्यासाठी अर्थात तपश्चर्या देखील तितकीच महत्वाची. खाज जितकी जुनी तितका ट्रेक्कर अस्सल, पक्का भटक्या...


गेल्या ५ दिवसात आम्ही तेच काहीसे अनुभवत आलो होतो. एकीकडे सभोवतालचा निसर्ग मुक्तहस्ताने त्याचे ज्ञान वाटत होता. 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या ५ दिवसात. दुसरीकडे काका सलग ५ दिवस नित्यनियमाने आमची 'डोंगरातली शाळा' घेत होता. गरज पडेल तेंव्हा 'बरोबर मारत' सुद्धा होता. त्यात कुठेही खंड पडला नव्हता. ह्या पहिल्याच ट्रेकमध्ये सह्याद्रीच्या आकंठ प्रेमात बुडालोच नाही तर त्याच्या विविध रुपांनी भारावून देखील गेलो. अक्षरश: वेड लागते म्हणतात ना ते काय असते ते ह्या ट्रेकमध्ये अनुभवायला मिळाले. काय काय नाही अनुभवले... 'कळसुबाई' सारख्या शिखरावरची ती वजनी चढ़ाई, रतनवाडीला जाताना केलेला भंडारदरा जलाशयातला प्रवास, कात्राबाईच्या जंगलातली ती रात्र, हरिश्चंद्रगडाची अंधारी चढ़ाई असे एक ना अनेक चाबूक अनुभव ते ही पहिल्याच ट्रेकमध्ये... अर्थात पुढे सुद्धा अनेक भारी अनुभव आले पण ते पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास आला तो ह्या पहिल्या ट्रेकमध्ये. हा ट्रेक काहीतरी नवीनच देऊन गेला मला. मनातली उर्मी जागवून गेला. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला पाडून गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे 'कुठल्याही आव्हानावर मात करण्याची ईर्षा' प्रेरित करून गेला. 'जगण्याचा एक वेगळाच अर्थ' बहुदा मला लक्ष्यात आला. ह्या ट्रेकमध्ये पाहिलेले एक-एक दृश्य, जगलेला एक-एक क्षण अजून सुद्धा ताजा आहे मनात. जणू काही अगदी काल-परवाचीच गोष्ट आहे. १० वर्षे होउन गेली तरी त्या सर्व घटना सर्रकन डोळ्यासमोरून सरकून जातात. इथल्या रौद्रसौंदर्यात रांगडेपणात एक विलक्षण शक्ती आहे. एकदा का तुम्ही यात शिरलात की हे व्यसन सूटणे कठीण किंबहुना अशक्य. आणि सोडावे तरी का? हा नाद खुळा एक नंबरी आहे. खरच...

"मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे. माणसाकडे आत्मविश्वास असावा. साहसीपणा असावा. पण आततायीपणा नको. निसर्गात भ्रमंती करताना हे भान नेहमीच राहिले पाहिजे. नाहीतर आपली काही धडगत नाही."

हे तत्व मी पहिल्याच ट्रेकमध्ये शिकलो. ह्याचे पूर्ण श्रेय 'काका जोशी'ला सुद्धा जातेच. हा एक अवलिया आम्हाला बरोबर भेटला. त्याने आम्हाला 'डोंगरातले तत्वज्ञान' अतिशय कमी वेळात शिकवले. आता असे झाले आहे की सुट्टीवर तिकडे आल्यानंतर कुठे ट्रेकला गेलो नाही की जीव अस्वस्थ होतो. सह्याद्री आपल्याला बोलावतोय आणि आपण जात नाही म्हणजे काय? मी फार काळ सह्याद्रीपासून दूर राहू शकत नाही. तो मला बोलावतो तेंव्हा मी सहज त्याच्याकडे खेचला जातो.

आज मी जो काही आहे तो ह्या 'सह्याद्री'मुळे याचे पूर्ण भान मला आहे. त्यानेच तर घडवला आहे हा ... सह्यभ्रमंतीला आसुसलेला एक डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !
.
.

Saturday 16 January 2010

परतीचा प्रवास 'तोलारखिंड' मार्गे ... !

पहाटे पहाटे सर्व उठले आणि परत निघायच्या तयारीला लागले. आज ट्रेकचा नक्की शेवटचा दिवस होता. वाढीव असला तरी... चहा नाश्ता झाला. ४ दिवस 'शंभो' झालेले नव्हते तेंव्हा फ़क्त घासून-पुसून स्वच्छ झालो आणि आम्ही तोलारखिंडीकडे निघालो. गुहेमधून बाहेर पडलात की उजव्या हाताची वाट तोलार खिंडीकडे जाते. गेल्या ३-४ दिवसाच्या ट्रेकवर गप्पा टाकत आम्ही चालत होतो. तशी घाई नव्हतीच कारण पुढे अख्खा दिवस पडला होता खिरेश्वरला पोचायला. दिवाळी पहाट तर हुकली होतीच मग आता उगाच धावाधाव करून काय उपयोग होता? हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून तोलारखिंड चांगली ५-६ किमी. लांब आहे. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात. त्या पार करत मुख्य वाट न सोडता खिंड गाठायची होती. मध्ये अनेक छोट्या-छोट्या टेकड्या लागतात. वाट संपता संपत नाही. अक्षरश: अंत पाहते. तुम्ही कधी गेलात तर ह्या वाटेवर दुपार टाळा. घसा सुकून जीव जाईल पण वाट संपणार नाही. आम्ही मात्र सकाळी सकाळी निघालो असल्याने तितका त्रास जाणवत नव्हता. शिवाय खायचे सर्व सामान देखील संपले होते. जे उरले होते ते गडावर बाळूला देऊन आलो. आश्चर्य वाटेल पण त्याने ते फुकट घेतले नाही. योग्य ते पैसे आम्हाला देऊ केले.आम्ही त्याच्याकडून मात्र थोड़े कमी पैसे घेतले. उरलेले पार्ले-जी मात्र मी जवळच ठेवले. ते आजच्या दिवसात संपवायचे होते ना मला... ;)

आम्ही निवांत असलो तरी तिकडे आमच्या घरी मात्र पालकांची धावाधाव सुरू होती. का विचारताय? काल संध्याकाळी घरी आम्ही जे घरी पोचायला हवे होतो ते अजून सुद्धा पोचलेले नव्हतो. शिवाय कोणीच घरी संपर्क करू शकले नव्हते. आमच्यापैकी सर्वचजण पहिल्यांदाच असे ट्रेकला सह्याद्रीत आले होते तेंव्हा घरी काळजी वाटणे साहजिक होतेच. सत्याच्या आईने आमचे ट्रेकचे दुसरे सर म्हणजे 'चारूहास जोशी' यांना गाठून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी "अजून काहीही माहिती आलेली नाही. आपण १ दिवस थांबूया. नाहीच काही कळले तर ट्रेकरूटवर उलट्या बाजूने आपण सर्च टीम पाठवू" असे सांगितले. थोडक्यात काय हाच नियम आहे सह्याद्रीमधला. सह्याद्री मध्ये आपण कुठेही अडकले असू तरी १-२ दिवसात कुठल्या ना कुठल्या संपर्क साधनांपर्यंत जाउन पोचतोच. तेंव्हा तितकी वाट बघावीच लागते. मात्र सत्याच्या आईचे काही त्याने समाधान झाले नाही. त्यांनी इतर पालकांना संपर्क साधला. त्यांना माझ्या वडिलांकडून समजले की त्यांनी ह्या संदर्भात आधीच पोलिस कंप्लेंट केलेली आहे. झाले असे की आमच्या पिताश्रींनी कालचा दिवस आणि मग पूर्ण रात्र आमची वाट पाहिल्यावर सकाळी तड़क उठून ठाणे कोपरी पोलिस स्टेशनला जाउन ह्या संदर्भात माहिती पोलिसांना दिली. तिकडून मग सर्व चक्र फिरली आणि पोलिस वेगवेगळ्या कंट्रोल रूमवरुन माहिती मिळवण्याचे काम करू लागले. इगतपुरी, कसारा, कल्याण इकडून काहीच माहिती येत नव्हती. कुठे कुठल्या ट्रेकर ग्रुपला अपघात वगैरे अशी सुद्धा माहिती नव्हती. पोलिसांनी सुद्धा "थोड़े थांबूया. आजच्या दिवसात काही माहिती आली नाही तर सर्च टीम पाठवू" असेच सांगितले.

ह्या सर्व प्रकाराची काहीही माहिती नसलेले आम्ही २१ उड़ाणटप्पू तोलारखिंडीच्या मार्गाने आगेकूच करतच होतो. २ तासात खिंडित पोचलो. तशी छोटीशी आहे खिंड. उतरायला फारतर ५-७ मिनिट लागतात. पण मध्ये-मध्ये खोबण्या धरत-धरत खाली उतरावे लागते. फारसा त्रास जाणवला नाही आम्हाला. खिंड उतरून गेल्यावर पायथ्याला वाटेला २ फाटे फुटतात. डावीकड्ची वाट जाते 'कोथळे'मार्गे 'कोतूळ'कडे. तर उजव्या हाताची वाट खिरेश्वरमार्गे खूबीकडे जाते. ह्याच वाटेने आम्ही पुढे जाणार होतो. या ठिकाणी वाघजाईचे एक छोटेसे मंदिर देखील आहे. इकडून फारतर तासभर उतरून गेले की खिरेश्वर गाव आहे. तेंव्हा एक छोटासा ब्रेक झाला. त्या ट्रेकच्या दुर्मिळ असलेल्या फोटोंपैकी हा एक. बघा मी सापडतो का... :)तिकडून निघालो आणि वेळेत खिरेश्वरला पोचलो. डाव्या बाजूला खाली गाव आणि उजव्या हाताला वरच्या बाजुला हरिश्चंद्रगडाचे नेढ दिसत होतं. नेढ म्हणजे आरपार असणारे भोक. सुईमध्ये असते ना तसेच पण हे डोंगरामधले. त्या पलीकडून गडावर जायला अजून एक मार्ग आहे. पण सध्या त्या वाटेने फारसे कोणी जात नाही. पूर्वी मात्र तो राजमार्ग होता असे म्हणतात. आम्ही गाव डाव्या हाताला ठेवत रस्त्याला असणाऱ्या एका विहिरीपाशी निवांत पहुडलो. ११ वाजून गेले होते आणि भूका लागायला लागल्या होत्या. तांदुळ - डाळ वगैरे सामान तर आता काही सोबत नव्हते पण 'रेडी टू इट' जे काही होते ते सर्वांनी बाहेर काढले. अक्षरश: खजाना निघाला. चिवडा, चकल्या, शेव, लिमलेटच्या गोळ्या, पॉपिंस, पार्ले-जी आणि मारी बिस्किटे, फरसाण, गाठे असे जे काही म्हणून असेल ते सर्व एका पेपरवर एकत्र केले. मग ते 'स्पेशल मिक्स्चर' विहिरीच्या थंड पाण्यासोबत खाल्ले. सर्व टेस्ट मिक्स झाल्या होत्या. पण एक वेगळीच टेस्ट तयार झाली होती. वा. मज्जा आली ते खायला. पुन्हा कधी तरी असे बनवून खायला हवे. खिरेश्वर वरुन निघालो आणि पुढच्या रस्त्याला लागलो. इकडे आता एक छोटेसे धरण झाले आहे. भिंत मात्र चांगली १०-१५ मीटर रुंद आहे. आम्ही मात्र त्या भिंतीवरुन 'खूबी'कडे न जाता आधी गावाबाहेर उजव्या हाताला नागेश्वर मंदिराकडे वळलो. तेथील कोरीवकाम बघून थक्कच झालो. हे मंदिर यादवकालीन असून सध्या पूर्णपणे दुरावस्थेत आहे. तिकडून थोडेच पुढे एक लेणं आणि बांधीव टाके सुद्धा आहे. हे सर्व बांधकाम पाहून आम्ही पुन्हा धरणाच्या भिंतीवर येउन पोचलो.

आता ऊन डोक्यावर आले होते आणि समोर धरणावरची नागमोडी वाट संपता संपत नव्हती. मी आणि शेफाली गप्पा मारत चाललो होतो.पाहिल्या दिवसापासून अतिउत्साही असणारी कार्टी अजून सुद्धा पुढेच पळत होती. तर आता 'ही चाल कधी संपणार' म्हणत रेंगाळलेली काही पावले मागे राहिली होती. आम्ही दोघ मात्र गप्पा मारत मारत कधी पलिकडे पोचलो कळले सुद्धा नाही. अखेर ५ दिवसांनी आम्ही डांबरी रास्ता बघत होतो. गाड्या दिसत होत्या. आता मात्र घरी जायची ओढ़ एकदम वाढली. आपल्या आई-बापाला काळजीमध्ये टाकुन आपण मात्र इकडे मस्त मज्जा करतोय हे मनाला सारखे लागून राहत होते. एका चहाच्या टापरी शेजारी आम्ही बस्तान मांडले आणि येणाऱ्या S.T. ची वाट बघू लागलो. तेवढ्या वेळात बाजुच्या दुसऱ्या एका टपरीमध्ये वडयाची ऑर्डर दिली. मुरबाडला पोचेपर्यंत काही पोटात नको का. गावातल्या एका पोराकडून विल्याने एक फटाका घेतला आणि स्वतःची दिवाळी मधला फटाका फोड़ण्याची हौस भागवून घेतली. ३ च्या आसपास बऱ्यापैकी रिकामी एक गाडी मिळाली. त्यात घुसलो सर्व आणि मग अखेर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. उजव्या हाताला दुरवर हरिश्चंद्रगड़ आणि विहंगम कोकणकडा दिसत होता. पुढे पुढे जात होतो तसे काका आणि राजेश आम्हाला अजून काही गड़ किल्ले दाखवत होते. "तो बघा तो भैरवगड. हा जीवधन - नाणेघाट. तिकडे दूर दिसतोय ना तो गोरखगड आणि सिद्धगड़." जसजसे एक एक नवीन गड़-किल्ले बघत होतो तशी तिकडे जायची इच्छा अधिक तीव्र होत होती. २ तासाच्या प्रवासानंतर आम्ही मुरबाडला येउन पोचलो. ती गाडी आम्ही तिकडे सोडली आणि सर्वजण 'फोनबूथ'कडे धावले. काही क्षणात सर्व फोनबूथ आम्ही ताब्यात घेतले होते. घरी कळवा-कळवी झाली तसे आम्ही सुद्धा निवांत झालो. थोड्याच वेळात तिकडून निघालो आणि कल्याणमार्गे आपापल्या घरांकडे कूच झालो. आमचा सह्याद्रीमधला ५ दिवसाचा पहिलच ट्रेक सफळ संपूर्ण यशस्वी झाल्याने आम्ही भलतेच खुश होतो... ट्रेक संपला असला तरी एक कधीही न संपणारी 'सह्यभ्रमंती' नुकतीच सुरू झाली होती...
.
.
पुढील भाग - कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !
.
.

Thursday 14 January 2010

हरिश्चंद्रगड आणि विहंगम कोकणकडा ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...


सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर आमच्यापैकीच काही जणांची 'किलबिल' सुरू होती. आळस देत-देत बाहेर आलो आणि समोर बघतो तर काय... सुंदर दृश्य होते समोर... एक सुंदर पुष्करणी आणि त्याच्या बाजुलाच असलेले एक अतिशय महादेवाचे सुरेख मंदिर. काल रात्री अंधारात हे सौंदर्य बघायचे हुकले होते. थोड़े पुढे जाउन बाहेर पाहिले आणि परत मागे आलो. ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा सुद्धा अप्रतिम होती. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि राहण्याजोग्या असलेल्या दुसऱ्या लेण्यात आम्ही राहिलो होतो. शेजारच्या म्हणजे तिसऱ्या लेण्यात प्रवेश करतानाच चांगली २ मीटर उंचीची एक कोरीव गणेशमूर्ती आहे. त्यामुळे त्याला 'गणेशगुहा' असे ही म्हणतात. कालच्या 'लंबी रेस की दौड़' नंतर सर्वच थकलेले जाणवत होते. पण बसून चालणार नव्हते कारण आज ट्रेकचा शेवटचा दिवस होता. सकाळी गड़ बघून दुपारपर्यंत गड़ सोडून संध्याकाळपर्यंत 'तोलारखिंड - खिरेश्वर मार्गे खूबीफाटा' गाठायचा होता. तिथून पुढे मग माळशेज मार्गे मुरबाड. तेंव्हा आम्ही आवरायला घेतले. चहा बनत आला होता आणि नाश्त्याला काकाने पोहे बनवले होते. इतके मस्त झाले होते की चव अजून सुद्धा जिभेवर आहे. भूक लागली बघा मला लिहितानाच. ते आम्ही सर्वांनी खाल्ले. खाता-खाता काल रात्रीच्या मी हुकवलेल्या काही गोष्टींवर गप्पा सुरू झाल्या. काल रात्री गड़ चढताना कविता इतकी थकली होती की अखेर संतोषने तिची सॅक घेतली होती. पण त्यामुळे संतोषची पाठ दुखून आली होती. शिवाय मी झोपेत असताना कवीशने माझ्या तोंडाला टूथपेस्ट लावल्याचे समजले. (त्याचा बदला राहुलने नंतर घेतलाच... कसा ते पुढे येईलच.)

८ वाजत आले तसे काकाने आम्हा सर्वाना गड़ बघायला हाकलले. गड़ बघून १२:०० वाजता परत गुहेकडे यायचे होते. आम्ही आधी थेट समोर मंदिर आणि पुष्करणी पहायला गेलो. या पुष्करणीचे नाव 'सप्ततीर्थ' असे आहे. त्यात १४ कोनाडे असून आधी त्यात विष्णुमुर्त्या होत्या. खुप वर्षापूर्वी कोणा चोराने त्या पळवून नेल्या. आता असतील कुठल्या तरी श्रीमंत दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात. शेजारीच महादेवाचे प्रशत्र मंदिर आहे. आत प्रवेश केला की मोकळी जागा आहे. आतमध्ये शुद्ध, स्वच्छ आणि अतिशय थंड अश्या पाण्याच्या टाक्या आहेत. एक गणेशमूर्ती देखील आहे. देवळाशेजारून मंगळगंगेचा उगम होतो. अजून थोड़े पुढे 'केदारेश्वर' नावाचे अजून एक लेणं आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यामध्ये बरोबर मध्यभागी असलेला चौथरा आणि त्यावर असलेले भव्य शिवलिंग. हे लेणं ३-४ फुट खोल असून बर्फासारख्या थंड पाण्याने कायम भरलेले असते. आम्ही ते सर्व बघून पुन्हा वरती गुहेबाजुला आलो. इतके बाळूचे घर सुद्धा आहे. तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर त्याला सांगायचे. फ़टाफ़ट पीठल - भाकरी आणि सोबत कांदा-ठेचा लगेच तयार.(काय? भूक लागली ना वाचून? मग इकडे लिहिताना माझे काय होत असेल ते विचारूच नका.. :D)
आम्ही तिथून थेट कोकणकडयाकडे गेलो. गडाच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकणाकडे तोंड करून उभा असलेला हा कडा म्हणून त्याचे नाव 'कोकणकडा'. आता असा कोणी ट्रेकर नसेल ज्याने कोकणकडा पाहिला नसेल किंवा किमान त्या विषयी ऐकले नसेल. ह्याची महती काय वर्णावी... सह्यादी मधला सर्वात रौद्र आणि भीषण, बघता क्षणीच काळजात थरकाप उडवणारा असा हा अंतर्वक्र आकारात ६००-७०० मीटर लांबीचा आणि ४००० फुटपेक्षा अधिक उंचीचा हा कडा म्हणजे एक विचित्र विलक्षण प्रकार आहे. हिम्मत असेल तर ह्याच्या टोकावर उभे राहून दाखवा. हवेने उडून एक चक्कर नक्की खाल आणि मग पुन्हा येउन जमिनीवर आपटाल इतकी जोरात हवा असते. हेहे.. गंमत करतोय पण फेकलेले दगड सुद्धा बऱ्याचदा हवेने उडून वर येतात इतकी हवा असतेच. अर्थात तसे कृपया कोणी करू नका कारण न जाणे एखादा दगड खाली गेलाच आणि खालून कडयाला भिड़त एखादा प्रस्तरारोहक वर येत असेल तर??? होय .. १९८६ मध्ये हा कडा एका बह्हादराने (मिलिंद पाठक बहुदा) सर केला त्यानंतर अनेक सह्यवेडया प्रस्तरारोहकांनी ह्याची माती भाळी लावली आहे. येथे आता १२०० फुटांचे रेपेल्लिंग अणि व्हयाली क्रोसिंग सुद्धा होते. इथून सूर्यास्त पाहणे सुद्धा एक भन्नाट अनुभव आहे. सूर्यास्त होतो तो आपल्या डोळ्याखाली. म्हणजे 'eye लेवल' खाली. कधी गेलात तर हा अनुभव चुकू नका. पावसाळ्यात गेलात तर फ़क्त इंद्रधनुष्य नव्हे तर इंद्रवज्र सुद्धा दिसू शकते. सूर्य आपल्यावर आणि ढग आपल्याखाली असल्याने आपण बरोबर मध्ये येतो आणि हे असे घडते. मी कुठल्या गडावर नाही मात्र महिन्याभरापूर्वी कामावर जाताना विमानातून पाहिले. सुंदर आणि अवर्णनीय असे. आम्ही गेलो तेंव्हा दुपार झालेली होती तेंव्हा पहिल्यांदा आम्ही हा अनुभव चुकवला हे सांगायला नकोच. पण त्यानंतर मी अजून २ वेळा जाउन आलोय हरिश्चंद्रगड़ला फ़क्त इथून सूर्यास्त पाहण्यासाठी. कोकणकडयाचे दर्शन घेउन तृप्त झालेले आम्ही तसेच उजव्या हाताला सरकत 'तारामती' आणि 'रोहिदास' ह्या गडाच्या २ शिखरांवर गेलो. वर तसे फार काही नाही पण वरुन मंदिर आणि आसपासचा परिसर सुंदर दिसतो. गड़ दर्शन करून परत गुहेकडे जात असताना लक्ष्यात आले की १२ वाजून गेलेले आहेत. तेंव्हा आता आम्ही पुन्हा काकाच्या शिव्या खायला तयार झालो होतो.


पोचल्या पोचल्या काकाने फर्मावले,"सर्वानी समोर फॉल इन करा. एकतर लेट आलाच आहात. पण मला सांगा सकाळी पोहे खायचे सोडून टाकुन कोणी दिले? मला बाजुच्या गुहेत कोपऱ्यात सापडले आहेत." आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो. पोहे खरे तर इतके मस्त झाले होते की कोणी टाकेल असे वाटत नव्हते. मला तर अजून हवे होते. आणि हा कोण आहे चायला टाकुन देणारा. "इकडे लोकांना खायला मिळत नाही आणि तुम्ही वाया घालवता? हवे तितकेच घ्याना." काका थांबत नव्हता. "जोपर्यंत मला कळत नाही तो/ती कोण आहे तोपर्यंत आपण इकडून हलणार नाही आहोत." आयला.. हलणार नाही म्हणजे? आज तर कुठल्याही परिस्थितिमध्ये घरी पोचायला हवे होते कारण दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट होती. झाले असे की काकाला गुहेबाहेर अचानक एक धामण दिसली. तिला पकडायला तिच्या मागे-मागे तो त्या गुहेमध्ये शिरला तिकडे त्याला कोपऱ्यात हे पोहे टाकलेले दिसले. बराच वेळ गेला तरी कोणी हात वर करेना आणि काका सुद्धा काही बोलेना. शेवटी काकाने ट्रेकमधला अजून एक बोंम्ब फोडला. "आज आपण घरी जाणार नाही आहोत. इकडेच राहणार आहोत. आणि आता जेवण झाल्यावर आपण आपली राहती केव्ह साफ़ करणार आणि धुणार आहोत." आता आम्हाला काय बोलावे कळत नव्हते. माझ्या डोळ्यात नकळत पाणीच आले होते. मी काकाला जाउन बोललो,"हे बघ. ते पोहे मी टाकले होते. तू काय ती शिक्षा दे. पण आपण आज घरी जाउया. उदया दिवाळीचा दिवस आहे." तो बोलला,"रोहन. मला माहीत आहे पोहे कोणी टाकले आहेत. तेंव्हा तू स्वतःवर ते घेऊ नकोस. आणि आपण आत्ता निघालो तरी संध्याकाळ होईपर्यंत रस्त्यावर पोहचू शकत नाही तेंव्हा आज आपल्याला इकडेच राहणे आहे. कारण मधला रस्ता सेफ नाही. उदया सकाळी-सकाळी आपण इकडून निघू."आम्ही खिन्न मनाने जेवून घेतले. कोणाचाच मुड नव्हता. कोणीच काही बोलत नव्हते. जेवणानंतर काकाने ती पकड्लेली धामण बाहेर काढली. आम्हा सर्वांना दाखवून मग तिला आम्ही सोडून दिले. दुपारी ३ वाजता मग सुरू झाला धूवाधूवीचा प्रोग्राम. आम्ही ती पूर्ण जागा साफ़ केली. आपण आपले घर साफ़ करतो ना. मग आपले गड़-किल्ले?? ते आपण साफ़ नाही करायचे मग कोणी करायचे? शिक्षा नव्हतीच ती... डोंगरातल्या शाळेचा अजून एक वर्ग होता तो. जवळ-जवळ २ तास ही साफ़ सफाई सुरू होती. मग आम्ही निवांत झालो. हळू-हळू सर्वांचा मुड सुद्धा परत येत होता. संध्याकाळी आम्ही काहीजण गुहेच्यावरती जाउन बसलो. राजेश आम्हाला एक-एक किल्ले आणि डोंगर दाखवत होता. डोंगरांच्या एकामागे एक अश्या ४-५ रांगा दिसत होत्या. त्यात दुरवर कळसुबाई सुद्धा दिसत होते. "इतके दूर आलो आपण चालत? किमान ८०-९० किमी. नक्कीच असेल ना रे." मी राजेशला विचारले. "हो सहज असेल" तो उत्तरला. इतक्यात राहुल चढून वर आला आणि बोलला,"ऐ. कवीश बघ कसा पाय खाजवतोय. हाहा.. खाजखुजली लावून आलो त्याच्या पायाला." काल रात्रीचा बदला अखेर राहुलने घेतला होताच. त्यानंतर बराच वेळ तो खाजवत बसला होता हे सांगायला नकोच. अंधार पडत आला तसे आम्ही अजून सरण आणले. आणि जेवणाची आणि शेकोटीची तयारी केली.

रात्री जेवायला काकाने आणि शेफालीने 'दाल ढोकळी' केली होती. सोबत 'गुलाबजाम' होते. 'दाल ढोकळी'ची वाट लागली होती तर गुलाबजाम मात्र जबरी झाले होते. आता घेतलेले टाकू तर शकत नाही मग त्यासाठी डीलिंग सुरू झाले. "अरे. थोड़ी दाल ढोकळी घे. हवतर २ गुलाबजाम घेतो" इथपर्यंत. मी मात्र गुलाबजाम सोडले नाहीत अजिबात. दिवाळीच्या दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबरला प्रशांतचा वाढदिवस होता. तेंव्हा रात्री न झोपता गप्पा टाकत बसायचे आणि तो सेलेब्रेट करायचा असा प्लान ठरलेला होताच. चांदण्या रात्रीच्या त्या गप्पा काय होत्या हे काही आता आठवत नाही पण ट्रेक संपता-संपता आमचा एकजीव ग्रुप मात्र बनला होता. ४-५ दिवसांपूर्वी आम्ही सर्व एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो हे कोणाला सांगितले असते तर खरे वाटले नसते. हिच तर किमया आहे निसर्गाची... सह्याद्रीची... त्याच्या मदतीने अजून काही सह्यवेडे तयार करण्यात काका सपशेल जिंकला होता आणि आमच्या नकळत त्याने आम्हाला सुद्धा जिंकवले होते. रात्री बऱ्याच उशिराने आम्ही सर्व झोपी गेलो. प्रशांतला वाढदिवसाच्या आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आम्ही निवांतपणे झोपी गेलो. पण... तिकडे आमच्या सर्वांच्याच घरी काय घडत होते ह्याबाबत आम्ही पूर्णपणे गाफिल होतो. आज रात्रीपर्यंत घरी पोचायचे होते ना आम्हाला.. :) बघुच पुढच्या भागात काय होतय ते. परतीचा प्रवास सुरू झालाय...
.
.
पुढील भाग - परतीचा प्रवास 'तोलरखिंड' मार्गे ... !
.
.

Tuesday 12 January 2010

मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...

आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण' सुळका समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती. रतनगड़ येथील खुट्टा आणि बाण हे सुळके, अग्नीबाण सुळका, आजोबची प्रचंड प्रस्तर भिंत हे सर्व सह्याद्रीमधल्या प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान. आज आमच्यामधले प्रवीण, आशीष, राहुल, सुरेश हे यशस्वी प्रस्तरारोहक आहेत.

चालता चालता आमच्या गप्पा सुरूच होत्या. अग्नीबाण मागे पडला तशी आम्ही डावी मारली आणि अखेरच्या चढाला लागलो. खिंड गाठली आणि पुन्हा डावीकडे उतरु लागलो. खिंडीतून पुढे उतार असल्याने थकवा जाणवत नव्हता तसा. इकडे मध्ये बऱ्याच फसव्या वाटा आहेत. शिवाय लोकवस्ती देखील नाही. एखाद दुसरा लाकुडतोड्या दिसला तरच. तेंव्हा वाटा जपून घ्याव्यात. चुकलात तर अमूल्य असा वेळ वाया जायची १०० टक्के खात्री. सर्वात पुढे राजेश आणि विल्या होतेच. तेंव्हा आम्ही आपले 'जाऊ रे त्यांच्या मागल्या' करत होतो. पण डोंगरातून, जंगलातून ट्रेक करताना वाटेवरच्या खुणा कश्या लक्ष्यात ठेवाव्यात, मार्किंग्स कसे घ्यावेत, थोडक्यात 'रूट'चे नव्हिगेशन कसे करावे याचा अंदाज हळू-हळू येऊ लागला होता. राहत्या जागेपासून निघून ३ तास होत आले होते आणि आम्ही 'वाकडी'च्या पायथ्याला पोचत होतो. मागे दुरवर अजुनही अग्नीबाण दिसत होताच. पण जिकडे जायचे होते तो हरिश्चंद्रगड़ अजून सुद्धा टप्प्यात येत नव्हता. ऊन जसे-जसे वाढायला लागले तशी तहान वाढत गेली. जिकडे राहिलो होतो तिथूनच पाणी भरून घेतले होते ते संपू लागले. वाटेत जिथे कुठे ओहोळ-ओढा लागेल तिथे आम्ही पाणी भरून घ्यायचो आणि पुढे निघायचो. सर्वात पुढे राजेश आणि सर्वात मागे काका असल्याने चुकायची तशी भीती नव्हती. आशिष, संतोष, विवेक, अभिषेक, सुरेश, दीप्ती, प्रवीण ही पहिल्या दिवसापासून पुढे असलेली टोळी पुढेच होती तर मागचे शेफाली, जाड्या, कविता, हिमांशु हे भिडू मागेच होते. मी, अभि, मनाली, सत्या, सुमेधा, प्रशांत, कवीश असे काहीजण आपले मध्य गाठत बरोबर मध्ये होतो.

'वाकडी'हून पुढे मळलेली वाट लागली. उजव्या हाताला कुमशेत दिसू लागले होते. तिकडे पोचायला अजून किमान तास-दिडतास तरी लागणार होताच. एव्हाना ११ वाजून गेले होते. जितका स्पिड असायला हवा होता त्यापेक्षा बऱ्याच कमी स्पिडने आम्ही पुढे सरकत होतो. थकवा जाणवू लागला होता आणि सॅक्स पुन्हा एकदा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. दर काही मिं. नंतर थांबावे लागायचे आणि दम घ्यावा लागायचा. मला तर भूक सुद्धा लागली होती. बहुदा सर्वांनाच. मी माझ्या सॅकमधून पार्ले-जीचे पूड़े काढून कमरेच्या पाउच मध्ये टाकले आणि एक-एक खायला लागलो. शेफाली एव्हाना स्पिड वाढवत आमच्यापर्यंत येउन पोचली आणि आता आम्ही गप्पा मारत पुढे जाऊ लागलो. माझी बिस्किट्स संपली की ती सॅकमधून अजून पार्ले-जीचे पूड़े काढून देई. माझ्या शिवाय मात्र कोणी ती बिस्किट्स खाईना. सर्वांचे मत त्याने तोंड आतून सुकते आणि घसा अजून कोरडा होतो असे होते. तर माझ्या मते त्याने शरीरामधील शुगर आणि ग्लूकोज लेवल नीट राहते आणि थकवा जाणवत नाही असे होते. आजही मी ट्रेकला पार्ले-जी सोबत ठेवतो. आता तर मला आमच्या ग्रुपमध्ये 'पार्ले-जी किंग' हे डोंगरातले नाव देखील मिळाले आहे. नाव ठेवणारा दुसरा तीसरा कोणी नसून माझा सह्यसखा 'अभिजित'च आहे.

आता कुमशेत पर्यंत संपूर्ण उतार होता. डोंगराच्या उजव्याकडेने तर कधी वळसा घालत डाव्याकडेने आम्ही खाली उतरत होतो. लक्ष्य समोर असल्याने वाट चुकायचा प्रश्नच नव्हता. वेळ मात्र चुकली होती. नेहमीप्रमाणे... इतके पोचायला साधारण २ तास उशीर झाला होता. गावात पोचलो. आता इथपर्यंत गाडी रास्ता झाला आहे. 'राजुर'वरुन इथे आणि पाचनईला सुद्धा गाडीने पोचता येते. तेंव्हा रस्ता होता का आठवत नाही पण आम्ही नदीकाठच्या वाटेने पाचनईला पोचणार होतो. कुमशेत गाव थोड़े उजव्या हाताला ठेवत आम्ही नदीकाठाकडे निघालो. नदी पाहिल्यावर वाटले अरे.. 'मंगळगंगा' आली सुद्धा म्हणजे आपण फार दूर नाही आहोत पाचनईहून. पण नंतर कळल की ही आहे 'मुळा नदी'. ( पुण्याजवळची मुळा नदी नव्हे.. ती वेगळी..) अजून पुढे गेलो की मंगळगंगा आणि मुळा एकत्र होतात तिकडून पुढे काही अंतरावर पाचनई आहे. २ वाजत आले होते आणि अजून जेवण बनवायचे होते. काल दुपारी सुद्धा रतनवाडीला पोचायला उशीर झाल्याने दुपारचे जेवण रद्द केले गेले होते. आज मात्र जेवण बनवायचेच होते. पण सर्व इतके दमले होते की आता लाकडे जमवून, चुल पेटवून मग जेवण बनवायचे आणि मग जेवायचे हा प्रकार जीवघेणा वाटत होता. जेवण बनवायची जबाबदारी खुद्द काकाने उचलली होती. सर्वच भिडू चांगलेच दमल्याचे त्याला लक्ष्यात आले होते. राजेश गावातून कुठून तरी कसलीशी गावठी भाजी सुद्धा घेउन आला. मग तो, काका आणि विल्या जेवण बनवायला लागले. अंगात जीव असलेल्या काही जणांनी त्यांना लाकडे जमवून आणि सामान काढून दिले. आम्ही सर्वजण चादरी पसरून निवांत आराम करत होतो. काहीजण नदीमध्ये पोहायला गेले होते. तिकडे जेवण बनत होते पण आम्ही कोणीच काकाला काही मदत करत नव्हतो. तासभर वाट बघून अखेर मी, अभिषेक आणि आशीष दमलो. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. काकाने जेवण तयार झाल्याचे सर्वांना सांगितले. पण ज़रा आधी न राहून मी सॅकमधून तिखट शेवचे एक पाकेट काढले होते आणि खायला लागलो होतो. झाले... काकाने ते पाहिले आणि तो आमच्यावर भलताच डाफरला. "मी इकडे तुमच्यासाठी जेवण बनवतोय आणि तुम्ही काय हे सटर-फटर खाताय. तुम्हाला फुकट बनवून खायला घालायला मी काय आई आहे का तुमची. किमान किम्मत ठेवा ज़रा."

आमचे पुढे काही न ऐकता काकाने कवीशला हाक मारले. "कवीश. यांच्या पाठीवर रात्रीच्या जेवणाचे सुद्धा सामान दे आणि ह्याना पुढे जाऊ दे. नाहीतरी ह्यांना जेवायचे नाही आहे." कवीश सुद्धा काकाची आज्ञा पाळत आमच्या सॅक्स भरताना जास्तीतजास्त सामान कसे भरले जाईल हे बघत होता. त्यात रात्रीच्या जेवणासाठी न लागणारे सामान सुद्धा होतेच. आमच्या तिघांबरोबर म्हणजे मी, आशीष आणि अभिषेक बरोबर विवेक सुद्धा लटकला होता. काकाने आमच्या बरोबर राजेशला पाठवले. लवकर गडावर पोचायचे आणि रात्रीचे जेवण बनवून ठेवायचे अशी आम्हाला शिक्षा होती. माझे टाळके आता पूर्णपणे फिरले होते. सामानाने गच्च भरलेली ती वजनी सॅक उचलताना मी शेवटी न राहून बोलून गेलोच. "हा म्हातारा काय समजतो स्वतःला." काकाने ऐकले की ते माहीत नाही पण ज्यांनी ऐकले ते गार पडले. आता काका तसे म्हातारे नव्हते. ४० च्या आत वय. फ़क्त गिर्यारोहण करून केस जास्त सफ़ेद झाले होते इतकेच. न जेवता भुकेल्या पोटी आम्ही ५ जण सर्वांच्या पुढे निघालो. सर्वांच्या पाठीवर आता अधिक सामान होते. पण आता लवकर पोचायचेच असे आम्ही ठरवले होते.थोड़े पुढे जाउन 'शेव'ची ती पिशवी आशिषने परत बाहेर काढली आणि आमचा छोटासा मिनीलंच चालता-चालता उरकला. राजेश सोबत होता तेंव्हा वाट चुकायचा प्रश्न नव्हताच. शिवाय जेवण बनवायचे सर्व सामान आमच्याकडेच असल्याने ती ही चिंता नव्हती. कुठे आडवाटेवर अडकलो, चुकलो तरी चिंता आता बाकीच्यांना असणार होती.

कुमशेत सोडून पुढे गेलो की उजव्या हाताला अजिबात जायचे नाही. समोरच्या टेकडीला बगल देत डाव्या हाताला वळलो आणि पुढच्या पठारावर पोचलो. आत्ता कुठे तो हरिश्चंद्रगड़ नजरेत येऊ लागला. अंतर बरेच होते. "किमान ५ तास तरी लागतील." - राजेशचा अचूक अंदाज. पुढे पुन्हा एक ओढा लागला. तो पार केला आणि पुढच्या टेकडावर चढलो. वाट मळलेली होती तेंव्हा आम्ही सुद्धा कुरकुर न करता तिच्यासोबत जात होतो. आता वाट नदीच्या काठाकाठानेच पुढे जात राहते. नदी उजवीकडे वळली की वाट सुद्धा उजवीकडे वळते. नदी डावीकडे वळली की वाट सुद्धा डावीकडे वळते. मध्येच कुठेकुठे ओढे लागतात. ते अडसं-दडसं करत पार करायचे. पाठीवरच्या सॅक सांभाळत पाण्यातल्या दगडांवरुन उदया मारत जायला मज्जा येत होती. मध्येच आम्ही थांबायचो, खांदे मोकळे करायचो, काहीतरी खायचो आणि पुढे निघायचो. ३ तास होउन गेले तरी दुरचा तो हरिश्चंद्रगड़ काही जवळ येईना. संध्याकाळ होत आली होती. राजा हरिश्चंद्र म्हणायचे "राज गया... मेरा ताज गया..." त्याप्रमाणे आता आम्हाला बोलावेसे वाटत होते. "पाठ गेली रे माझी.. खांदे पण गेले.. अब बस भूक लगी है." हेहे.. :D जोक्स अपार्ट.. त्या राजाला त्याच्या आयुष्यात बरेच कष्ट पडले होते. तेंव्हा त्याच्या नावावर असलेल्या गडावर जताना आम्हाला सुद्धा काही कष्ट घेणे क्रमप्राप्त होतेच. अंधार पड़ता-पड़ता अखेर 'पायलीची वाडी' आली. इकडून नदी ओलांडून आम्ही पलिकडच्या बाजुला गेलो आणि पाचनईच्या रस्त्याला लागलो. नदी आता डाव्याहाताला मागे मागे राहून गेली. आम्ही एका टेकाडावर चढून पुढे उतरलो तर नदी सुद्धा वळसा मारत तिकडेच आली होती. म्हटले "राजेश काय रे? पुन्हा नदी क्रोंस करायची आहे का?" तो म्हणाला,"नाही. पण एक छोटा ओढा ओलांडायचा आहे. लवकर चला. पूर्ण अंधार झाला तर कुठून पार करायचा ते कळणार नाही आपल्याला." त्यावर आशीष बोलला,"आयला मग ते मागचे सर्व चक्रम कसे पोचणार? आज रात्री काय २१ जणांचे जेवण आपणच बनवून आपणच संपवायचे काय? मी काका आल्याशिवाय जेवण बनवायला सुरवात करणार नाही आहे. बास." आम्ही हसून-हसून आडवे व्हायचे बाकी होतो. खरच इतका वेळ मागचे भिडू कुठे असतील? त्यांना यायला तर पूर्ण अंधार होणार मग ते कसे पोचणार हे प्रश्न आता पडायला लागले होते. "ते लोक दुसरीकडेच राहिले तर त्यांचे जेवणाचे वांदे होतील रे." मी बोललो. त्यावर लगेच अभि उत्तरला. "आपण नेउन देऊ बनवलेले जेवण." पुन्हा एकदा हलके फुल्के जोक्स झाले. गप्पा मारता मारता आम्ही पाचनईच्या दिशेने वाटचाल करताच होतो. ७ वाजून गेले होते. पूर्ण मिट्ट अंधार झाला होता. अचानक बैलाच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आला. गाव एकदम जवळ असल्याची ती पोचपावती होती.

पुढे २ मिं. मध्येच गाव लागले. गावातल्या मारुती मंदिरात आम्ही टेकलो आणि निवांत झालो. सकाळपासून तसे पोटात फारसे काही गेले नव्हते. 'दुपारचा लंच' सुद्धा केलेला नव्हता. मारुतीच्या देवळात बसल्या-बसल्या मला डुलकी लागली. जाग आली तेंव्हा बाहेर गड़बड़ ऐकू येत होती. मागचे सर्व भिडू येउन पोचले होते. राहुल आणि शेफाली हातात कॉफ़ीचा मग घेउन आले. चायला.. जणू काही माझा आमरण उपवास होता आणि मी तो हरिश्चंद्रगड़ला गेल्या शिवाय सोडणार नव्हतो. कॉफी घेतली तशी ज़रा तरतरी आली. माझ्या अंगात ताप भरला होता. सर्वच जण प्रचंड दमलेले दिसत होते शिवाय गडावर चढून जायला खुप उशीर सुद्धा झाला होता  तेंव्हा आज आपण इकडेच राहणार असा आमचा (गैर)समज झाला. काकाने आपल्याला आज रात्री काहीही करून गडावर जायला हवेच असे स्पष्ट केले. आता मात्र थकलेल्या चेहरे पूर्ण पडले होते. मुलीच नाही तर मूले सुद्धा खुपच दमली होती. तरीपण जसे जमेल तसे एकमेकांना मदत करत वरती जायचे नक्की झाले होते. ९ वाजले होते आणि आता आम्ही सर्व गडावर जाणार होतो. गावातून एक वाटाडया सुद्धा घेतला होता. राहुलच्या म्हणण्याप्रमाणे मी माझी सॅक त्याला देऊन वरपर्यंत कमी वजन उचलून जावे असे होते. तर माझे मत स्पष्ट होते. मी ही सॅक घेउन वरपर्यंत जाणार म्हणजे जाणार. रात्रीच्या त्या अंधारात आमची वाटचाल सुरू झाली. पुन्हा एकदा पुढे मी, आशीष, अभिषेक आणि राजेश. अर्थात आमच्याही पुढे तो वाटाडया होताच. मी अर्ध्याअधिक झोपेत चालत होतो. मध्येच धडपडायचो आणि मग त्याला विचारायचो. "अजून किती जायचय रावं?" तो प्रोफेशनल वाटाडया होता बहुतेक. दरवेळी "बास. हे काय हिक्कड़ हाय आता. अजून १० मिंनितं" असे उत्तर देऊन आम्हाला समाधानी करायचा. त्या वाटेवरची एक जागा सुद्धा मला लक्ष्यात नाही आहे. पुन्हा एकदा त्या वाटेवरून ट्रेककरून हरिश्चंद्रगड़ सर करायची खुप इच्छा आहे बरेच वर्ष. बघुया या वर्षी जमते का ते.

गडावर पोचलो तेंव्हा १२ वाजून गेले होते. कुठे काय काही समजत नव्हते. एका देवळाशेजारून पुढे जाउन कुठल्या तरी मोठ्या गुहेत शिरलो इतकेच काय ते समजले. आत जाउन पुन्हा मी आडवा. जेवण कोणी बनवले माहीत नाही. जेवायला राहुलने उठवले तेवढे मात्र कळले. जेवताना तोंडाला टूथपेस्टचा स्मेल येत होता. मी झोपलेलो असताना बहुदा कोणीतरी लावली असावी. जेवलो आणि पुन्हा आडवा झालो. इतका दमलो होतो की बाकी काही करणे शक्य नव्हते. आजवर मी इतका कधीच दमलो नव्हतो. पहाटे ६ ते दुपारी २ आणि परत दुपारी ३ ते रात्री १२ असा जवळ-जवळ १५-१६ तासांचा ट्रेक झाला होता आज एका दिवसात. ट्रेकच्या ३ऱ्या दिवशी अजून अनुभव घेत आम्ही आडवे झालो. सकाळी हरिश्चंद्रगडाचे आणि विहंगम अश्या कोकणकडयाचे दर्शन घेण्यासाठी...
.
.
पुढील भाग - हरिश्चंद्रगड आणि विहंगम असा कोकणकडा ... !
.
.

Monday 11 January 2010

कात्राबाईच्या जंगलातली रात्र ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ... 

पहाटे ६ च्या आसपास जाग आली. एक-एक करून सर्व उठले आणि मग निघायची तयारी सुरू झाली. सकाळी करायची सर्व महत्वाची कामे उरकून झाली. जागा आदल्या रात्रीच हेरून ठेवल्या होत्या आम्ही.. ;) आज नाश्त्याला नुडल्स बनवायचे होते. त्याची तयारी सुरू झाली. आम्ही शाळेच्या मागच्या बाजुला 'चुल x २' बनवली. म्हणजे २ चुली बनवल्या हो. एकावर चहा आणि दुसऱ्यावर नुडल्स बनवायला सुरू केले. जसे-जसे नुडल्स बनत गेले तसे-तसे ते अधिक अधिक घट्ट होत गेले. इतके की त्यातून चमचा फिरेना. नंतर समजले की मॅगी ऐवजी कोणीतरी हाक्का नुडल्स विकत आणले होते. काय एक-एक उद्योगी लोक असतात ना. चहा मात्र फक्कड़ बनला होता. सोबत खायला 'पार्ले-जी'ची बिस्किटे होतीच. ५००-५०० ग्रामचे किमान १० पाकेट्स तरी नक्कीच होते आमच्याकडे. म्हणजे ५ किलो फ़क्त पार्ले-जी. त्यातली ५ पाकेट्स माझ्याच सॅकमध्ये होती. चहा सोबत बिस्किट्स फ़टाफ़ट उडाली पण त्या नूडल सदृश्य पदार्थाला मात्र कोणी हात लावायला तयार नव्हते. मोजके ३-४ लढवय्ये होते ते पण लवकरच माघार घेउन परत आले. शेवटी निघताना ते टोप वरुन झाकण घालून तसेच्या तसे बांधून घेतले. ते उचलायचे कोणी ह्यावर अनेक वाद-संवाद-चर्चा घडल्या. अखेर सत्याने सॅक अभिषेककडे सोपवली आणि ते टोप उचलले.

आता आमचा लवाजमा निघाला 'मुरशेत'च्या दिशेने. रतनगडसाठी शेंडीवरुन जसे रस्त्याने रतनवाडीला पोचता येते तसे बोटीमधून पाण्याच्या मार्गाने सुद्धा जाता येते. तेथे जायला बोटी मुरशेत या जागेवरुन सूटतात. येथे पोचायला तासभर लागला. आधीच त्या 'नुडल्स' प्रकरणात वेळ वाया गेल्याने पहिली बोट निघून गेली होती. पुढची बोट पकडली आणि भंडारदरा धरणाच्या त्या विशाल आणि अथांग जलाशयामधून आम्ही रतनवाडीकडे निघालो. असे काही आम्ही सर्वच पहिल्यांदा अनुभवत होतो. लहानपणी तसा गावाला समुद्रात बरेचदा गेलो होतो पण हा अनुभव मस्तच होता. चहूकडे पाणीच पाणी.. कडेकडेला पाण्यात पूर्णपणे बुडालेली पण अजून सुद्धा कशीबशी तग धरून राहिलेल्या झाडांची शेंडे दिसत होती. काकाने आणलेल्या बायनोक्युलर्स मधून सर्व अधिक जवळ दिसत होते. बोटीमध्ये संतोष मात्र त्याची फाटलेली सॅक शिवत बसला होता. तासाभराच्या त्या हटके प्रवासानंतर आम्ही रतनवाडीला पोचलो. १० वाजून गेले होते तेंव्हा प्रत्येकाला थोड्या-थोड्या भूका लागायला लागल्या होत्या. सत्याने लगेच 'नुडल्स' पुढे केले. सर्वांनी अतिशय (अ) प्रामाणिकपणे ते संपवायचा प्रयत्न केला. बनवलेले अन्न वाया जाते आहे ही बघून काका आधीच भडकला होता. त्यात त्याने आणलेल्या २ बायनोक्युलर्स सापडत नाही आहेत असे लक्ष्यात आले. मग काय... जो पर्यंत बायनोक्युलर्स सापडत नाहित तोपर्यंत पुढे जायचे नाही असे त्याने स्पष्ट सांगितले. आता शोधा सर्वांनी सर्व सामान. "लास्ट कधी काढली होती रे? अरे कालच नाही का काढलेली कळसुबाई टॉपला. कोणाकडे होती रे? अरे काल काय.. आत्ता बोटीत नाही का वापरली आपण? कुठे गेली? बोटीत तर नाही राहिली ना?" असे करत करत शेवटी आमचे उत्तर होते... माहीत नाही. शेवटी काकाने कवीशला बायनोक्युलर्स त्याच्या सॅकमधून काढायला सांगितली. आमच्यापैकी कोणीतरी बोटीत विसरून आला होता ती शेवटून येणाऱ्या काकानेच उचलली होती आणि मग कवीशकडे दिली होती. मग एक छोटे लेक्चर ऐकावे लागले. डोंगरात गोष्टी कश्या सांभाळाव्यात यावर. तिकडे प्रवीण पाण्यात उतरून पोहायला लागला होता. ते बघताच काकाने अधिकच रौद्र रूप धारण केले. मग लेक्चर झाले 'डोंगरात वागावे कसे' यावर... कालपासून अनुभवांची काही वानवा नव्हती. काका चांगलीच 'शाळा' घेत होता आमची. त्याशिवाय असे 'पक्के ट्रेकर्स' कसे तयार होणार नाही का??? इतके सर्व नाटक झाल्यावर रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरापर्यंत पोहचेस्तोवर १२ वाजत आले होते.


डाव्याबाजूला डोंगराच्या कुशीत रतनवाडी वसलेली आहे. काही घरे नदी पात्राच्या बाजूला सुद्धा आहेत. उजव्या बाजूला थोडेच पुढे आहे रतनवाडीचे हेमाडपंथी 'अम्रुतेश्वर मंदिर'. त्या रस्त्याला प्रवेश करताच डाव्याबाजूला एक सुंदर पुष्करणी आपले लक्ष्य वेधून घेते. मंदिराचे मुख्यद्वार मागील बाजूने आहे. प्रवेश करताच एक देवडी आहे आणि अजून पुढे आत गेले की आहे मुख्य गाभारा. जास्त पाउस पडला की हा गाभाऱ्यामधली पिंड पाण्याखाली जाते. मंदिराचे खांब कोरीव आहेत आणि त्यावर विविध प्रकारच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. गळक्या छपराची आता डागडूजी झाली आहे पण त्यावर मारलेला पांधरा रंग मात्र विचित्र वाटतो. मंदिराच्या परिसरात बरीच शिल्पे विखुरलेली आहेत. त्यात काही वीरगळ सुद्धा आहेत. पुष्कर्णीच्या समोर गणेश, विष्णु यांच्या मुर्त्या आणि शंकरपिंड आहे. शिवाय काही युद्धप्रसंग देखील कोरलेले आहेत.

मंदिर पाहून होते न होते तोच काकाने त्या ट्रेकचा अजून एक एतिहसिक निर्णय जाहीर केला. "आपण रतनगड़ला जाणार नाही आहोत. इतका उशीर झाला आहे की गेलो तर आपले सर्व वेळापत्रक कोलमडेल."

अरे रतनगडला जायचे नाही म्हणजे काय चायला??? काका आता डोक्यात जायला लागला होता. त्या वेळेला असला वैताग आला होता म्हणुन सांगू. त्या वेळेला सुटलेला 'रतनगड' अखेर सर झाला तो तब्बल ८ वर्षांनी... थेट २००८ मधल्या ऑगस्टमध्ये. त्यावर लिहिलेला हा पोस्ट. आवर्जुन वाचा हा सुद्धा पोस्ट.

आता आम्ही थेट कात्राबाईच्या दिशेने निघालो. भंडारदरा जलाशयाचा मुळ स्त्रोत असलेल्या प्रवरा नदीच्या काठाकाठाने आम्ही पुढे जात होतो. पात्र हळू-हळू निमुळते होत जात होते. थोड़े पुढे गेल्यावर उजव्या हाताला रतनगडकडे जायची वाट दिसली. पण आम्ही मात्र मनातल्या मनात काकाला शिव्या देत डाव्या बाजुच्या वाटेने धिम्या गतीने कात्राबाईच्या खिंडीकडे वाटचाल सुरू केली होती. दुपार होउन गेली होती आणि अजून जेवणाचा पत्ता नव्हता. पोटात भूक पडली होती आणि जंगलात थांबणे तर शक्य नव्हते. काल दुपारनंतर पायाच्या ब्लिस्टर्समुळे हिमांशुचा स्पिड अगदीच कमी झाला होता आणि शेफालीच्या पाठीला खुपच त्रास होऊ लागला होता. तिकडे दुसरीकडे विवेकचे खांदे नम झाले होते. असे एक-एक भिडू कच खाऊ लागले होते. जंगलातल्या तासाभराच्या वाटचालीनंतर दुपारी ३ च्या सुमारास अखेर मध्येच एके ठिकाणी आम्ही थांबलो आणि सोबत असलेले थोडे खाऊन घेतले. ह्या वेगाने आपण पुढच्या ३-४ तासात कुठल्या ही परिस्थितिमध्ये 'पाचनई'ला पोचत नाही ही वैश्विक सत्य होते. अजून कात्राबाईचे संपूर्ण जंगल पार करून खिंड ओलांडून मंगळगंगेच्या काठानी पाचनई म्हणजे किमान ८-९ तासांचा प्रवास होता. वेळेचा पुरता बोजवारा वाजला होता. अखेर काकाने कात्राबाईच्या जंगलामध्ये एक योग्य जागा बघून रहायचा निर्णय घेतला. पुन्हा मागे रतनवाडीला जाणे म्हणजे वेळेचा अजून अपव्यय होता शिवाय उद्याचे चालायचे अंतर वाढले असते ते वेगळेच. फ़टाफ़ट २ टीम बनवल्या गेल्या. एक राजेश बरोबर गेली तर दुसरी विल्याबरोबर. रहायची योग्य जागा शोधणे आणि जवळच वाहते पाणी शोधणे अशी कामे त्यांना दिली होती. २० एक मिं. मध्ये ते सर्व परत आले. पुढे आमच्या जायच्या वाटेवरतीच अशी एक जागा त्यांनी शोधली होती. २० एक जणांचे जेवण बनू शकेल आणि शेजारी झोपायची जागा आहे असे. शिवाय वाहते पाणी सुद्धा बाजुलाच होते. आम्ही ४:३० च्या आसपास त्या जागेवर येउन पोचलो. पूर्ण अंधार पडायला अजून किमान दिड तास होता. आत्ताचा चहा, रात्रीचे जेवण आणि उदया सकाळचा चहा - नाश्ता, या सर्वांसाठी लागणारे सर्व सामान हाताशी सापडेल असे आम्ही काढून घेतले. आज जेवण आमच्या ग्रुपला बनवायचे होते. मेनू होता.. जिरा राईस आणि टोमाटो सूप.


बाकी काहीजण चुलीसाठी आणि रात्रीच्या शेकोटीसाठी लाकडे जमा करत होते. काही झोपायची आणि सामान टाकायची जागा साफ़ करत होते. अखेर अंधार पड़ेपर्यंत आम्ही सर्वांनी आमची 'ओव्हर नाईट स्टे'ची जागा फिट करून घेतली होती. सूर्य पश्चिमेला कलला आणि आम्ही आमच्या आयुष्यातली एक भन्नाट रात्र अनुभवायला तयार झालो होतो. मी, मनाली, आशीष आणि प्रशांत जेवणाच्या तयारीला लागलो. राहुल आणि शेफाली आम्हाला मदत करत होते. पुन्हा एकदा 'चुल' प्रकरण सुरू झाले. ह्यावेळी मात्र ते थोड़े सहजपणे हाताळले गेले. अर्थात पुन्हा राहुल कडूनच. मला त्यावेळी जेवण बनवण्याचा काडीचाही अनुभव नव्हता. तेंव्हा ती काडी टाकुन चुल पेटवायची कशी ह्याचा सुद्धा नव्हता हे ओघाने आलेच. मी आपला हवे ते सामान काढून देणे आणि इतर बारीक सारीक कामे करत होतो. राजेश मध्येच देवासारखा येत होता. काही अडले-नडले बघायचा आणि पुन्हा अंधारात गायब व्हायचा. चुली जवळ गरजेपुरते सोडले तर कुठेही टोर्च वापरायचा नाही असे फर्मान काकाकडून आधीच निघाले होते. ते न पाळणाऱ्या १-२ जणांच्या टोर्चेस जप्त देखील झाल्या होत्या. बरोबरच होते ते म्हणा.. दूरवरुन सुद्धा हा प्रकाश कोणालाही सहज दिसला असता आणि आम्ही न जाणो संकटात देखील सापडलो असतो. तेंव्हा सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यच होते. चुलीजवळ आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. कोणी ऐकले-पाहिले असते तर विश्वास नसता ठेवला की हे सर्वजण २ दिवसांपूर्वीच एकमेकान्ना ओळखत देखील नव्हते. खरच डोंगरात, निसर्गाच्या सानिध्यात मैत्री पटकन होते. फुलून जाते.

गप्पा होता होता एकीकडे भात शिजत होता तर दुसरीकडे सूप बनवायचे होते. मी टोमाटो नाइफ वापरून सर्व सूपची पाकेट्स कापून एका टोपात काढत बसलो होतो. इतक्यात राजेश पुन्हा आला आणि "अरे, ते तुझ्या अंगावर लाल लाल काय आहे रे?" असे बोलला. बाजूला असणाऱ्या सर्वांचेच लक्ष्य माझ्याकडे गेले. मी टोर्च घेतला आणि बघीतले. बघतो तर काय... टोमाटो नाइफमुळे माझ्या उजव्या हाताच्या मधल्या बोट कापले होते आणि त्यातून रक्ताची धार लागली होती. माझ्या हातावर, टी-शर्टवर, टोमाटो सूपच्या पाकेट्सवर आणि त्या भांड्यात सुद्धा २-३ थेंब रक्त... गंमत म्हणजे मला कापलेले न कळले न दुखले होते. राजेशने मग त्यावर मलमपट्टी केली आणि मी पुन्हा कामाला लागलो. पण भांड्यात पडलेले ते रक्त टोमाटो प्यूरीमध्ये मिसळले गेले होते. माझ्या हातावर, टी-शर्टवर पडलेले रक्त सर्वांनी पाहिलेले असले तरी भांड्यात पडलेले ते रक्त सर्वानी पाहिलेले नव्हते. फ़क्त राजेशला कळले होते ते. तेंव्हा ते 'स्पेशिअल टोमाटो सूप' चुलीवर चढवले गेले. ह्या दरम्यान गुलाबजाम बनवण्यासाठी कढईमध्ये तेल काढून थोड़े तापवून ठेवले होते त्यात एका बेडकाने उडी मारून आत्महत्या केल्याचे लक्ष्यात आले. तेंव्हा गुलाबजामचा प्लान कैन्सल करावा लागला. ८ वाजत आले तसा डिनर सेट झाला. थोड्याच वेळात सर्वजण ते सूप प्राशन करून पवित्र होणार होते. दुपारी जेवण झाले नसल्याने सर्वांना भूका लागल्याच होत्या. जिराराईस आणि मग त्यावर ते 'स्पेशिअल टोमाटो सूप' आवडीने आणि चवीने सर्वांनी ग्रहण केले.

जेवणानंतर काका, विल्या गुडुप झाले होते. तब्येत बरी नसल्याने शेफाली सुद्धा झोपून गेली होती. आमची रहायची जागा त्रिकोणी आकाराची होती. शिवाय जागेला पुढच्या बाजूला उतार होता. एका बाजूने खळखळाट करत ओहोळ वाहत होता. आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने तिन्ही टोकाला एक-एक 'फायर प्लेस' बनवली होती. डाव्या हाताला चुल होतीच. समोर एक मोठी शेकोटी केली होती. तर उजव्या हाताला सुद्धा एक छोटी शेकोटी बनवली होती. तिकडे हिमांशु आणि सत्या झोपले होते. काका, विल्या वरच्या बाजूला मध्ये होते तर आम्ही बाकी सर्व खालच्या शेकोटी जवळ गप्पा टाकत बसलो होतो. आज झोपायचे नाही असे ठरले होते. आणि मग खऱ्या अर्थाने सुरू झाली 'ती जंगलातली रात्र'.

रात्र चढू लागली तशी थंडी सुद्धा वाढू लागली. संध्याकाळीच ह्याचा अंदाज आला होता तेंव्हा तशी तयारी सुद्धा करून ठेवली होती. टी-शर्ट वर स्वेटर चढवले आणि आम्ही शेकोटीच्या अजून जवळ जाउन बसलो. अजून थंडी वाजलीच तर अंगावर घ्यायला बाजूला चादर सुद्धा आणून ठेवल्या. कोलेजच्या इकडच्या तिकडच्या गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. १२ च्या आसपास झोपेतून उठून अचानक हिमांशू आला. "अभि..अभि.. त्या तिकडे कसलासा आवाज येतो आहे." त्याला कुठल्याश्या प्राण्याचा आवाज येत होता बाजुच्या झाड़ीमधून. अभि त्याच्या बरोबर गेला. खरच की.. कुठल्या तरी प्राण्याचा आवाज येत होता. घर्रर्र.....घर्रर्र..... काही सेकंद अभि सुद्धा ऐकतच होता. मग त्याला कळले की हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून 'सत्या' नामक आपल्यातलाच एक प्राणी आहे. "अरे हा बघ.. हा मेला सत्या घोरतोय." अभि हिमांशूला म्हणाला. सत्याला शांत करून आणि हिमांशूला झोपवून अभि परत आला.

सकाळी-दुपारी दुरून सुंदर दिसणारे जंगल आता उगाचच भयाण वाटायला लागले होते. अंधारात झाडाच्या आकारांनी लहान मोठ्या प्राण्यांचे आकार घेतले होते तर त्यामधून फिरणारे काजवे प्राण्यांचे डोळे बनवत होते. जंगलात असे उघडयावर रहायचा आमचा सर्वांचाच पहिला प्रसंग होता. चायला, जंगलात रहायचा नाही तर आमचा अश्या ट्रेकचाच हा पहिलाच प्रसंग होता. बाहेरून सर्व धीट दिसत असले तरी आतून प्रत्येकजण कमी-अधिक घाबरलेला होताच. किमान धाकधुक तरी होतीच. तेंव्हाच तर झोपायचे सोडून सर्वजण एकत्र शेकोटी जवळ बसले होते. इतक्यात सुमेधा बोलली,"तुम्हाला कोणाला कुत्रे भुन्कायचे आवाज येत आहेत का?? आम्ही म्हटले आता हे काय नवीन? तिच्या मागोमाग अजून कोणाला तरी तसेच आवाज ऐकू यायला लागले. तर कोणाला थोड़े दूर पाण्यावर त्यांचे डोळे दिसायला लागले. "रात्री इकडे ते पाणी प्यायला येत असतील रे. आपण त्यांच्या जागेवर येउन तर नाही ना राहिलो?" असे एक ना अनेक प्रश्न. पहाटेचे किती वाजले होते कोणास ठावूक. मधोमध झोपलेली कविता आता अंगात थंडी भरल्यासारखी करू लागली होती. तिला काहीतरी गरम द्यावे प्यायला द्यावे म्हणुन राहुलने पुन्हा चुल पेटवली. गरम चहा देऊन सुद्धा तिच्यात फारसा फरक पडला नाही. नंतर तर तिला इतकी थंडी भरली की जागचे हलवेना. संतोषने तिला उब मिळावी म्हणुन उचलून शेकोटी जवळ आणून ठेवले. पण तिला काही फरक पडेना. जमिनीवर झोपल्यामुळे थंडी तिच्या अंगात पुरती शिरली होती. संतोष तर काय एक-सो-एक प्रकार करत होता. शेकोटीमधले निखारे काढून तिच्या एकदम जवळ ठेवत होता. पण तिला थंडी बाहेरून वाजत नव्हती तर तिच्या अंगात आतून शिरली होती. शेवटी आमची गड़बड़ गोंधळ ऐकून काका उठलाच. "अरे एक ग्लास गरम पाण्यात एलेक्ट्रोल दे तिला. १० मिं. मध्ये ठीक होइल ती." इतकेच बोलून तो झोपला. राहुलने मग पाणी गरम करून आणले आणि एलेक्ट्रोल घालून कविताला दिले. खरोखर १०-१५ मिं.मध्ये तीची थंडी उतरली आणि ती ठीक झाली. ह्या सर्व प्रकारामध्ये बराच वेळ निघून गेला होता. रात्र जशी-जशी उतरत गेली तशी झोप अजून-अजून डोळ्यावर चढत गेली. कधी ते लक्ष्यात नाही पण पहाटे बऱ्याच उशिराने आम्ही जिथे जसे होतो त्या तिथेच झोपलो. भल्या पहाटे ४ च्या आसपास सर्वांना उठायला हाकाटी दिली गेली. कोण उठले होते काय माहिती इतक्या लवकर. उठलो, अंग झटकले (आंघोळी करायच्या नव्हत्याच ना मग अंग झटकले फ़क्त) आणि आवरा-आवरी केली. जागा ठिक-ठाक केली आणि कुठे काही कचरा राहिलेला नाही ना ते चेक केले. पहाटेचा चहा झाला, सर्व ठिकाणच्या आगी पूर्णपणे विझवलेल्या असल्याची खात्री केली आणि आम्ही पाचनईसाठी पुढे निघालो. आज कात्राबाई पार करत मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़ गाठायचा होता.


दोन पावले पुढे चालून वळून मागे पाहिले. आठवत होती ती कालची रात्र. कायमची आठवणीत बसलेली...
.
.
पुढील भाग - मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !
.
.

Saturday 9 January 2010

कळसूबाईच्या शिखरावरुन ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ... 

२२ तारखेला पहाटे २ च्या आसपास ट्रेन इगतपुरीला पोचली. आमच्या सकट सर्व सामान धडाधड स्टेशनवर उतरवले गेले. जे सामान झोपेत होते ते सुद्धा... :D अर्धवट झोपेत आम्ही सर्वजण इगतपुरी स्टेशनच्या बाहेर पडलो आणि S.T. स्टैंडच्या दिशेने चालू लागलो. हवेत गारवा चांगलाच जाणवत होता. (१० वर्षे होत आली राव... त्यावेळी मुंबईमध्ये सुद्धा दिवाळीला थंडी जाणवायची. इगतपुरी तर काय गारेगार होते एकदम.) २० मिनिट्स मध्ये स्टैंडला पोचलो. म्हटले आता पहाटेची S.T. असेल तोपर्यंत ज़रा झोप काढुया तर राजेश आणि हिमांशूने सामानाच्या ब्यागा उघडल्या. अंथरायच्या २-३ मोठ्या चादरी पसरून त्यावर हा.... सामानाचा ढीग मांडला त्यांनी. उदया येणाऱ्या कवीश आणि प्रवीण या दोघांना सोडून बाकी १६ जणांना ४ ग्रुप्स मध्ये भागून, प्रत्येक ग्रुपवर एका-एका दिवसाच्या जेवणाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती. त्याप्रमाणे सामान सुद्धा वाटुन घ्यायचे होते. मी, मनाली, आशिष आणि प्रशांत एका ग्रुपमध्ये होतो. आमच्यावर दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची जबाबदारी आली होती. आमच्या वाटचे सामान उचलले आणि आम्ही चौघांनी वाटुन घेतले. प्रत्येक ग्रुपने तेच केले. कोणा-कोणाकडे काय-काय सामान जाते ही त्याचा लेखा-जोखा शेफाली ठेवत होती. हा सर्व प्रकार उरकेपर्यंत पहाटेचे ४ वाजत आले होते. बाजुला काका आणि विली निवांत झोपले होते.

आम्ही पहाटेच्या पहिल्या पुणे S.T.ने 'बारी'ला उतरणार होतो. बारी म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याचे गाव. गावाकडच्या त्या गारठ्यातून पहाटेच्या प्रहरीच आम्ही बारीकडे निघालो. तासाभराच्या प्रवासानंतर अचानक S.T. थांबल्याचा आवाज आला. इतका वेळ मी झोपेतच होतो. 'चला उतरा भरं भरं' काका बोंबा मारत होता. पुन्हा एकदा अर्धवट झोपेमधले सर्व सामान खाली उतरवले गेले. नुकताच सूर्योदय झाला होता. आपल्या आगमनाची द्वाही सुर्याने पसरवली असली तरी 'बारी'वर त्याचे साम्राज्य अजून यायचे होते. दुरवर कळसुबाईच्या शिखरावर पडणारे कोवळे ऊन पाहून मन सुखावून गेले. हिरवागार गालीचा पांघरलेला आई कळसुबाईचा पर्वत दुरूनच मन उल्हासीत करून गेला होता. डोंगराच्या पायथ्यापासून रस्त्याच्या कडेपर्यंत असलेली हिरवीगार भातशेती वाऱ्यावर डुलत होती. उजव्या हाताला बारीमधली जिल्हा परिषदेची शाळा होती. पण आज रविवार असल्याने सर्व शांत-शांत होते तिकडे. नाहीतर गावाकडची शाळा म्हणजे पोरांचा काय तो एकच गलका..

"ते बघा. ते टोक दिसतय एकदम वरचे तिकडे जायचे आहे आपल्याला पुढच्या ५ तासात आणि मग जेवण करून पुढे ते........ तिकडे एकदम डावीकडे 'कुंकवाच्या करंडया'सारखा आकार दिसतोय ना... तिकडे पोचायचे आहे दुपारपर्यंत. आणि मग पलिकडच्या बाजुला उतरायचे शेंडी गावात संध्याकाळपर्यंत. चला आता थोडं दूर मंदीर आहे एक तिकडे जाउन नाश्ता करुया ." काकाने माहिती दिली आणि आम्ही सर्वजण मंदिराच्या दिशेने चालू लागलो. शेताच्या बांधावरुनच वाट पुढे पुढे जात होती. मध्ये एक मोठी विहीर लागली तिकडे सर्वांनी पाणी भरून घेतले. गाव सोडले की कळसुबाईच्या माथ्यावरच्या विहिरीपर्यंत पाणी नाही आहे बरं का. तसा ऑक्टोबरचा महीना सुरू असल्याने डोंगरात अधून-मधून ओहोळ भेटतात पण आपण सुसज्ज असलेलं बरं नाही का. असाच एक मोठा ओहोळ पार करत आम्ही गाव मागे टाकले आणि खऱ्या चढणीला लागलो. पाठीवर असलेल्या सॅक्स आता आपले खरे अस्तित्व जाणवून द्यायला लागल्या होत्या. माझ्या आणि सत्याच्या पाठीवर तर युटेंसिल म्हणजे भांडयानी भरलेल्या सॅक्स  होत्या. किमान १२-१५ किलोचे वजन नक्की होते. शिवाय आमचे स्वतःचे सामान वगैरे होते ते निराळेच. त्या सॅक्स घेउन शेताच्या बांधावरुनच वाट काढताना, अधून-मधून येणारे ओहोळ पार करताना आम्हाला कसरत करावी लागत होती. शहरात रस्त्यावरुन चालणे आणि डोंगरातल्या मळलेल्या वाटेवरुन चालणे यातला फरक नेमका समजत होता. अगदी पहिल्या क्षणापासून नवीन नवीन अनुभव आम्ही घेत होतो. अखेर ४०-४५ मिं. मध्ये थोड़े वर चढत आम्ही त्या मंदिरापाशी पोचलो.

चुलीवर बनवलेला चहा, पार्ले-जी आणि सोबत ब्रेड-बटर-जाम असा नाश्त्याला मेनू होता. आमच्यापैकी कोणीच ह्याआधी 'चुल' ह्या प्रकारासोबत मारामारी केली नव्हती. गावाला संबंध यायचा पण तिकडे सुद्धा आजी, काकी असल्याने तसा त्रास नव्हता. आता मात्र पुढचे ४-५ दिवस चहा काय सर्व जेवण सुद्धा चुलीवर बनवून खायचे म्हटल्यावर शिकणे क्रमप्राप्त होते. त्यात इकडे आजी, काकी नव्हत्या तर काका , विल्या, राजेश होते ज्यांना 'चुल' येत असून सुद्धा आमची मज्जा बघत बाजूला चहासाठी नारे देत बसले होते. शेवटी काका पेटायच्या आधी अखेर महत्प्रयासाने ती चुल पेटली. पण त्याआधी राहुलने मारलेल्या जोरदार फूंकीमुळे डोळ्यात धूळ गेलेले ४ जण पेटले होते. हाहा.. शेवटचा एकदाचा तो चहा झाला आणि नाश्ता करून ४० मिं.च्या ब्रेक ऐवजी दिड तासाचा 'एक्स्टेंडेड ब्रेक' घेत, ट्रेकच्या पहिल्याच दिवशी वेळेचा घोळ घालत आम्ही पुढे निघालो.

कळसुबाईच्या माथ्याला जाणारी वाट ह्या मंदिराच्या मागुन वर चढ़ते. वाट एकदम स्पष्ट आहे. कुठेही चुकायचा प्रश्न नाही. प्रश्न आहे तो फ़क्त थकायचा... :D १५-२० मिं. चढून जातो न जातो ते आम्ही काहीजण त्या जड़ सॅक्स सकट खाली बसलो. इतके वजन घेउन 'अगेन्स्ट ग्राव्हिटी' चढायचे म्हणजे काय सोपे काम आहे का? ('खायचे काम आहे का' असे मी म्हणत नाही कारण खायचे काम सुद्धा काही सोपे नाही असे माझे ठाम मत आहे.. :D) आशिष, अभिषेक, संतोष, सुरेश, प्रशांत आणि त्या सर्वांसोबत 'द दीप्ती बावा' अक्षरश: पळत पुढे गेले होते. अंगात एखादी विरश्री संचारते ना तसे. आम्ही सर्व मध्ये होतो तर सर्वात मागे शेफाली, हर्षद-जाड्या आणि हिमांशु हे काका सोबत होते. थोडा आराम करून पुढे निघालो. आता कुठे थांबायचे नाही, थकलो तर स्पीड स्लो करायचा पण बसायचे नाही असे आम्ही ठरवले होते. ८:३० वाजता मंदिरामधुन निघलेलो आम्ही १०:३० वाजले तरी कळसुबाईच्या लोखंडी शिडया पार करत आगेकूच करतच होतो. ह्या मार्गावर एकुण ३ लोखंडी शिडया आहेत. दुसरी शिडी पार केल्यावर मात्र आम्ही थोड़े थांबायचे ठरवले. सत्या आणि माझे खांदे त्या सॅक्स उचलून भरून आले होते. इतक्यात 'टाण'कन आवाज आला. मी मागे वळून बघतो तरं... सत्याने एका दगडावर बसकण मारली होती. त्याच्या पाठीवरची सॅक बाजूला पडली होती. "काय रे काय झाले? आवाज कसला आला?" मी विचारले. सत्या शांतपणे बोलला,"काय नाय रे. सॅकचा वेस्ट आणि चेस्ट स्ट्रप उघडला तशी वजनाने मागे गेली आणि आपटली दगडावर. आतल्या भांडयाचा आवाज आला असेल." ती सॅक इतक्या जोरात आपटली दगडावर की आतल्या मोठ्या टोपाची कड वाकली होती आणि सॅक खालून थोड़ी फाटली सुद्धा होती. मी म्हटले,"केलास पराक्रम. आता खा शिव्या. इतका दमला असशील तर दे दुसऱ्या कोणाला ती सॅक" पण सत्या काही मानला नाही. वरपर्यंत ही सॅक मीच घेउन जाणार हा त्याचा निर्धार होता. आम्ही पुढे निघालो. तीसरी शिडी पार करून माथ्यावरच्या मोठ्या प्रस्तराखाली पोचलो. समोरच विहीर होती. पोहऱ्याने पाणी काढले आणि फ्रेश झालो. ११ वाजत आले होते. एव्हाना इकडून निघायचे होते. आम्ही तासभर मागे पडलो होतो आमच्या टाइमटेबलच्या.

कळसुबाईच्या माथ्यावरचा मोठा प्रस्तर आधी चढून जायला लागायचा. आता मात्र तिकडे लोखंडी शिडी लावली आहे. अगदीच खाज असेल अंगात तर डाव्या बाजुच्या जुन्या मार्गाने साखळी पकडून वर चढून जाता येते. आम्ही मात्र नवखे ट्रेकर्स असल्याने अजून ती तशी खाज उत्पन्न झालेली नव्हती तेंव्हा आम्ही धोपटमार्गाने देवीच्या दर्शनाला माथ्यावर पोचलो. माथ्यावरील मंदिर एकदम लहान आहे. छपरासकट संपूर्ण बांधकाम दगडी आहे. उंची फार तर ४-५ फुट उंच असेल. तेंव्हा आपण आत नाही जाऊ शकत. देवीचे दर्शन घेतले आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरुन सभोवतालचा तो नयनरम्य परिसर न्याहाळला. अहाहा... काय वर्णावे... समोरच विहंगम भंडारदरा जलाशय पसरला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला रतनगड़ आणि कात्राबाईचे जंगल दिसत होते. अग्निबाण सुळका आणि त्या पुढचा 'आजोबाचा डोंगर' म्हणत होता. "काय विसरला नाही ना आम्हाला? इकडेच होतात २ महिन्यापूर्वी." दुसऱ्या बाजुला सह्याद्रीमधली सर्वात कठीण चढ़ाई समजली जाणारी त्रिकुटे दिसत होती. अलंग-मदन-कुलंग. (इतक्या वर्षाच्या ट्रेकिंगनंतर सुद्धा तिकडे जायचे अजून सुद्धा राहून गेले आहेच.) ज्या बाजूने वर चढून आलो तिकडे छोटूसे बारी गाव दिसत होते. भाताची ती शेतं आता छोटी-छोटी खाचरे भासत होती. ते दृश्य डोळ्यात साठवून घेतले.

"खेच.. खेच.. हां जोरात.. शाब्बास... सही रे. " जोरात आवाज येत होते. बघतो तर काय... अभिषेक आणि संतोष, दोघेही शक्ती प्रदर्शन करत लटकवलेली ती लोखंडी साखळी वर ओढत होते. इतक्यात मागुन काका आला आणि त्याना आर्नोल्ड आणि सिल्वेस्टरचा किताब देत, शिव्या घालत म्हणाला,"चला आता. उशीर झालाय आपल्याला आधीच. जेवण बनवायचे आहे ना?" आम्ही मग पुन्हा ती लोखंडी शिडी उतरत विहिरीपाशी आलो आणि एका बाजूला पुन्हा एकदा 'चुल' प्रकरण सुरू झाले. १२ वाजत आले होते आणि अजून उशीर होऊ नये म्हणुन काकाने राजेशला थोड़े लक्ष्य द्यायला सांगितले होते. सर्वांकडे असलेल पाणी वापरून भात शिजवला आणि फटाफट खिचडी भात तयार. जेवण आटोपले आणि भांडी घासून पुन्हा सर्व पाकिंग केली. जेवण होईस्तोवर विहिरीवर जाउन पुढच्या मार्गासाठी पाणी भरून आणावे म्हटले तर पोहरा गायब. मग मी आणि आशिषने बाजुच्या झाड़ीमधून काही मोठी पाने तोडली आणि दगडांवरुन पडणाऱ्या पाण्याखाली लावून पाण्याच्या बाटल्या भरल्या. डोंगरात कसे रहायचे याचे एक-एक मस्त अनुभव मिळत होते आम्हाला.

सर्वांचे अवरले तसे विल्याने त्याची सॅक पाठीवर परली आणि पहिल्या टिम बरोबर तो पुढे निघाला. विहिरीवरुन आल्यावाटेने थोडेसे खाली उतरले की एक वाट उजव्या हाताला झाडीत शिरते. ह्या वाटेने 'कुंकवाच्या करंडया'कडे आणि तिकडून पुढे पलिकडे जाउन शेंडी गावत उतरता येते. तासाभारत आम्ही करंडयाच्या खाली होतो. इकडून आता फार तर २ तासात आम्ही खाली पोचू असा आमचा समज होता. कारण चढून यायला फार तर ३ तास लागले होते. मोठ्या मोठ्या सॅक घेउन उतरायला सुरवात केली तसे समजुन आले की डोंगर चढण्यापेक्षा उतरणे जास्त अवघड आहे. आमच्या म्हणजे मधल्या टीमचा स्पीड मंदावला होता. मी, सत्या, सुमेधा, मनाली, अभिजित एकत्र पुढे जात होतो. राजेश आमच्या सोबतीने होताच. सर्वात पुढची टीम विलीबरोबर सुसाट पुढे निघून गेली होते. तर काका मागे होता. त्याच्याबरोबर जाड्या, पायाला ब्लिस्टर्स आलेला हिमांशु आणि शेफाली होते. त्यांचा स्पीड हिमांशुमुळे कमालीचा कमी होता. अचानक २-३ तासाच्या अंतराला ५-६ तास लागणार की काय अशी वाट सुरू झाली. मोठे मोठे प्रस्तर आणि त्यात वाट कुठेच नाही. अंदाजाने पुढे जायचे. विल्याने काही ठिकाणी मार्कर्स बनवले होते ते दिसले की आम्हाला समजायचे की हां... अजून योग्य वाटेवर आहोत. एका मागुन एक डोंगर सोंडा पार करत आम्ही शेंडीच्या दिशेने खाली उतरत होतो. सूर्य कलायला लागला होता तरी वाट संपत नव्हती. अचानक समोर २ वाटा दिसल्या. मध्ये डावीकडे वळायचा मार्कर होता. डाव्या वाटेने आम्ही पुढे निघालो. आता अंधार पडत आला होता आणि आम्ही गावाच्या अगदीच जवळ पोचलो होतो. काही मिं. मध्ये टोर्च लागणार म्हणुन सर्वांनी टोर्च बाहेर काढले. काका, जाड्या, हिमांशु अजून किती मागे होते ते कळायला मार्ग नव्हता.


पूर्ण अंधार पडला तसा मागुन टोर्चचा झोत यायला लागला. मागची मंडळी बरीच मागे आहेत अजून ही आम्हाला समजले तर आमच्या टोर्च लाइट वरुन पुढच्या टीमला आम्ही जवळ पोचलो आहोत हे सुद्धा समजुन आले. बघतो तर पुढे फ़क्त प्रशांत आणि सुरेश. राजेशने विचारले,"काय रे, बाकी कुठे आहेत?" "माहीत नाही. आम्ही रस्ता चुकलो होतो. गावातल्या एका मुलाने इथपर्यंत आणून सोडले." - प्रशांत उवाच. आपल्याला वाट सापडली यापेक्षा आपण कोणाला तरी सापडलो ह्याचे त्या दोघांना हायसे वाटत होते. त्यांना घेउन आम्ही सर्व पुढे निघालो. १०-१५ मिं. मध्येच विली अणि बाकी काहिजण रस्तावर उभे असलेले दिसले. बाजूला एक ट्रक सुद्धा होता. गावत जाउन विल्या तो घेउन आला होता. त्यात बसून आता पुढचे २०-३० मिं. चे डांबरी अंतर कापायचे होते. आमच्या तासभर मागाहून काका शेवटच्या ३ जणांना घेउन पोचला तेंव्हा ९ वाजून गेले होते.

चालून दमलेले आणि भूका लागलेले आम्ही सर्वजण त्या ट्रकमध्ये बसलो आणि शेंडी गावाकडे निघालो. अजून सुधा उत्साह गेला नव्हता मग गाणी सुरू झाली. ती म्हणता-म्हणता गावात पोचलो कधी ते कळले सुद्धा नाही. गावातच शाळा होती. गावातील मंदिर, शाळा म्हणजे ट्रेकर्सचे हक्काचे घर. सामान टाकले आणि जेवायला जवळच्या एका होटेलमध्ये गेलो. जेवत असतानाच मस्त गप्पा सुरू होत्या. इतक्यात रात्रीच्या शेवटच्या गाडीने कवीश आणि प्रवीण सुद्धा येउन पोचले. आज पहिल्याच दिवशी काय एक-सो-एक प्रकार घडले होते. कळसुबाईच्या अनुभवाबरोबरच... डोंगरात चुलीवर जेवण बनवणे, रस्ते शोधणे, पानावरुन पाणी ज़मा करणे... आज हे सर्व इतके मजेशीर वाटते आहे.. पण त्या दिवशी ते अनुभवणे हिच एक मजा होती.

११ वाजत आले तसे दुसऱ्या दिवशीच्या अमृतेश्वर - रतनवाडी आणि रतनगड़बद्दल विचार करत आम्ही झोपी गेलो. बघुया उदया आता काय काय नवे अनुभव येतात याचा विचार करत ...
.
.
पुढील भाग - कात्राबाईच्या जंगलातली रात्र ... !
.
.

Friday 8 January 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड ...पार्श्वभूमी ... !

दिनांक : २०-८-२००० ... ठिकाण : कोलेजचा कट्टा.

"'आजोबा पर्वत'च्या पहिल्याच ट्रेकला सोलिड मज्जा आली रे. असे अजून काही मस्त ट्रेक्स लवकरच करायला हवेत" मी मित्रांना सांगत होतो. आदल्याच दिवशी केलेल्या आजोबा ट्रेकपासून माझी डोंगरयात्रा नुकतीच सुरू झाली होती. त्या एका दिवसातच सह्याद्रीच्या रांगडया सौंदर्याने इतका भारावलो होतो की आता या सह्ययात्रेमध्ये पुरते विलीन व्हायचे असे मनोमन ठरवले होते. आजोबा ट्रेकवरुन निघतानाच 'पुढचा ट्रेक कधी?' हा प्रश्न विचारून झाला होताच. पुढचा ट्रेक १-२ नाही तर तब्बल ५ दिवसांचा असून दिवाळी दरम्यान आहे असे कळले होते. काही आजोबा ट्रेकमधली टाळकी आणि काही नवीन टाळकी यूनीव्हरसिटीला काका (आमचे ट्रेकिंगचे गुरु) आणि राजेश सोबत भेटून ट्रेकबद्दल पुढे ठरवणार आहेत असे मला अभिजित कडून समजले होते. मी त्यावेळी NCC च्या 1st इयर ला तर अभि 3rd इयर ला म्हणजे माझा सिनिअर होता. पण मी लगेच जायचे ठरवले आणि ट्रेकसाठी नाव नक्की केले.

या ट्रेकसाठी प्लानिंगची जबाबदारी राहुल, शेफाली, सत्यजित आणि हिमांशु यांना दिली गेली होती. ५ दिवसांसाठी लागणाऱ्या जेवणाच्या सामानापासून इतर बारीकसरिक जे काही लागेल त्या सर्व गोष्टींची यादी बनवून ते विकत घेणे, ट्रेक रूट नक्की करणे आणि त्याप्रमाणे वेळेचे गणीत मांडणे अशी बरीच कामे त्यांना करायची होती. ही एक छोटेखानी मोहिमच होती. महत्वाचे म्हणजे ह्यापैकी कोणीही आधी कधीही अशी प्लानिंग केली नव्हती. तेंव्हा राहुल, शेफाली, सत्या आणि हिमांशु यांच्यासाठी ही एक मोठे मिशन होते. कवीश ह्या ट्रेकचा लीडर असणार होता कारण त्याला १-२ ट्रेक्सचा अनुभव होता. पण तो ट्रेकच्या दुसऱ्या दिवसापासून येणार असल्याने पहिला दिवस हिमांशू लीडर असणार होता. मी, अभिजित आणि आशिष पालांडे त्यावेळी अगदीच नवखे होतो. शिवाय आमच्यापैकी बरेच जण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते.

अखेर सर्व नक्की झाले. २१ ते २६ ऑक्टोबर २००० असा दिवाळीच्या तोंडावरचा ट्रेकचा कालावधी ठरला. ठाणे-मुंबई मधल्या कोलेजेस मधील आम्ही एकुण १८ ट्रेकर्स. राहुल, शेफाली, सत्यजित, हिमांशु, अभिजित, मनाली, कविता, दीप्ती बावा, सुमेधा, आशिष पालांडे, कवीश, प्रवीण, सुरेश नागवेकर, प्रशांत आचरेकर, अभिषेक डोळस, संतोष मोरया, विवेक आणि मी. सोबतीला होते ३ अनुभवी मार्गदर्शक ट्रेकर्स ज्यात काका, राजेश आणि विली यांचा समावेश होता. आमच्या १८ जणांमध्ये कोणालाही ट्रेकिंगचा अनुभव नव्हता. तो ही खास करून सह्याद्रित ४-५ दिवस राहण्याचा. ट्रेकचा रूट असणार होता. कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़. ट्रेकनंतर आम्ही थेट माळशेज घाटात उतरणार होतो.

२० ऑक्टोबर पर्यंत सर्व तयारी झाली होती. आम्ही सर्वजण शनिवारी २१ तारखेला दुपारी ४ च्या आसपास ट्रेनने सी.एस.टी. ला पोचलो. आजोबा ट्रेकनंतर राहुल बरोबर ओळख झालेली होती. ट्रेनमध्ये त्याने आमची शेफाली आणि सत्याबरोबर ओळख करून दिली. माझ्यासोबत माझे कोलेज फ्रेंड्स अभिजित,  हर्षद उर्फ़ जाड्या आणि अभिषेक होता. शिवाय NCC सिनिअर्स कवीश आणि प्रवीण दुसऱ्या दिवशी होतेच. सी.एस.टी.ला पोचल्यानंतर इतर सर्वजण भेटले आणि आम्ही इगतपुरीला जायच्या गाडीत बसलो. सोबत प्रचंड सामान होते म्हणुन दादर-ठाणे ऐवजी सर्वांनी सरळ सी.एस.टी.ला बसायचे काकाने ठरवले होते. सर्वांशी तोंडओळख झाली. मनाली, कविता आणि सुमेधा या माझ्या डोंगरातल्या मैत्रिणींना (डोंगरातल्या म्हणजे डोंगरात राहणाऱ्या नव्हे तर डोंगरातल्या भेटलेल्या... हाहा..) आणि प्रशांत, सुरेश, हिमांशू या मित्रांना पहिल्यांदा भेटलो. आशीष, राहुलला तर आजोबाला भेटलो होतोच.

ट्रेनचा प्रवास इगतपुरीच्या दिशेने सुरू झाला आणि आमचा प्रवास महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करण्याकडे... कळसूबाई... आजवर ऐकले होते, वाचले होते; पण आता मी स्वतः त्या शिखरावर पाय रोवायला सज्ज होतो. माझा एक अविस्मरणीय असा सह्यप्रवास सुरू झाला होता ...
.
.
पुढील भाग - कळसूबाईच्या शिखरावरुन ... !
.
.

Tuesday 5 January 2010

सह्यभ्रमंती ... 'सांगाती सह्याद्रीचा'च्या साथीने ... !

बघता बघता २००९ चे वर्ष सरले. फेब. पासून जोमाने ह्या ब्लॉगवर लिखाण सुरू केल्यानंतर गेल्या ३ महिन्यात काहीच लिखाण केलेले नाही. कामातून वेळ मिळाला की 'लडाख'वर लिखाण करण्यात इतका व्यस्त असायचो की बाकी सर्व लिखाण बाजूला पडले होते. शिवाय ३-४ महिन्यात कुठे ट्रेकला सुद्धा जाणे झालेले नाही. तेंव्हा आता लिहायचे काय असा प्रश्न पडला होता.

पण दिवाळीच्या दरम्यान गौरी - सुमेधा ह्या माझ्या डोंगरातल्या जुन्या मैत्रिणींनी मला भेट म्हणुन 'सांगाती सह्याद्रीचा' हे पूस्तक पाठवले आणि आपल्या अगदी जुन्या भटकंती वर लिही असे सुचवले. दोघींनी माझ्यासाठी एक मस्त मेसेज सुद्धा लिहिला होता त्यात.

एका डोळस आणि सजग अशा सह्याद्रीच्या सांगातीस सप्रेम भेट                                                   ... गौरी - सुमेधा.


खुप मस्त वाटले आणि २००१-०४ मध्ये केलेल्या काही ट्रेक्सवर लिखाण करायचे असे मी ठरवून टाकले. आमचे किस्से आणि सर्व आठवणी तर लक्ष्यात आहेतच पण आता पुस्तकातील लिखाण वाचून रूट सुद्धा बराच लक्ष्यात येत आहे.

तेंव्हा आता पुढचे काही महिने लिखाण कळसूबाई - हरिश्चंद्रगड़, चांदवड-धोडोप, कार्ला - भाजे - लोहगड - विसापूर, औंधा - पट्टा अश्या जुन्या भटकंतीवर करणार आहे. नक्कीच आवडेल तुम्हाला... :)