२-३ ऑगस्ट'०८ ला मी, अभिजित, मनाली, दिपाली, मयूर, विदुला, राजेश, अमेय, अमृता आणि कविता असे १० जण रतनगड़ला गेलो होतो. रतनगड़ माहीत नसेल अस कोणी डोंगरवेडा असेल अस नाही मला वाटत. १ तारखेला रात्री शेवटच्या म्हणजे खरतर २ तारखेला पहाटे पहिल्या कसारा गाडीने आम्ही कल्याणहुन निघालो. प्रचंड पाउस पडत होता. इतका की इगतपुरीला पोहचेपर्यंत आम्ही जवळ-जवळ पूर्ण भिजलो होतो. पहाटे ३ च्या आसपास तिकडे पोचलो आणि स्टेशनवर बसून होतो. उजाडल की शेंडी गावची बस पकडून आम्हाला रतनगडाकड़े सरकायचे होते. २ आठवडे आधीच आम्ही काही जण पावनखिंडीमध्ये जाउन आलो होतो. साधना अजून त्या डॉक्युमेंटरीवर काम करत होती. आदल्या दिवशी तिची नाइटशिफ्ट होती. मला वाटले आज पण असेल, म्हणुन मी तिला पहाटे ४ ला कॉल केला... आणि शिव्या खाल्या... हाहा... झोपली होती ना ती घरी मस्त पैकी.
आम्ही जीपने रतनवाडीकड़े निघालो. रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या डोंगरांमधून पांढरेशुभ्र धबधबे फेसाळत खाली कोसळत होते. उजव्या बाजूला धरणाचे पात्र आमची साथ करत होते. पाउस इतका पडत होता की कॅमेरा बाहेर काढायची सोय नव्हती. काढला तरी कॅमेरालेन्स २-३ सें. मध्ये भिजून जायची. कसेबसे काही फोटो घेता आले. अखेर तासाभराने रतनवाडीला पोचलो. डाव्याबाजूला डोंगराच्या कुशीत रतनवाडी वसलेली आहे. काही घरे नदी पात्राच्या बाजूला सुद्धा आहेत. उजव्या बाजूला थोडेच पुढे आहे रतनवाडीचे हेमाडपंथी 'अम्रुतेश्वर मंदिर'. त्या रस्त्याला प्रवेश करताच डाव्याबाजूला एक सुंदर पुष्करणी आपले लक्ष्य वेधून घेते. मंदिराचे मुख्यद्वार मागील बाजूने आहे. प्रवेश करताच एक देवडी आहे आणि अजून पुढे आत गेले की आहे मुख्य गाभारा. जास्त पाउस पडला की हा गाभाऱ्यामधली पिंड पाण्याखाली जाते. आत्ता सुद्धा तेच झाले होते. मंदिराचे खांब कोरीव आहेत आणि त्यावर विविध प्रकारच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. गळक्या छपराची आता डागडूजी झाली आहे पण त्यावर मारलेला पांधरा रंग मात्र विचित्र वाटतो. मंदिराच्या परिसरात बरीच शिल्पे विखुरलेली आहेत. त्यात काही वीरगळ
सुद्धा आहेत. पुष्कर्णीच्या समोर गणेश, विष्णु यांच्या मुर्त्या आणि शंकरपिंड आहे. शिवाय काही युद्धप्रसंग देखील कोरलेले आहेत. मंदिर आणि परिसराचे फोटो आम्ही छत्री घेउन काढले कारण पाउस काही थांबायचे नाव घेत नव्हता. रात्रीचे जेवण आणि सकाळचा चहा-नाश्ता होइल इतकी लाकडे एका घरातून नीट बांधून घेतली. मंदिराच्या बाजूला असलेल्या घरात थोडासा चहा-नाश्ता घेउन आम्ही अखेर रतनगडाकडे कूच केले.
**************************************************************************************
**************************************************************************************
आता इथून पुढच्या गावांपर्यंत कच्चा गाडी रस्ता झाला आहे. नदीच्या पात्रावर देखील पूल झाला आहे. पुलानंतर लगेचच डावीकडे वळलो की शेतां-शेतांमधून गडाकडे जायचा मार्ग आहे. इकडे काही ठिकाणी २-२ फुट पाणी भरले होते. शेती सगळी पाण्याखाली गेली होती. त्या पाण्यामधून वाट काढत आम्ही डोंगर चढणीला लागलो. पाउस असाच सुरु राहिला तर उदया परत येताना नक्कीच जास्त त्रास होइल ह्याची कल्पना येत होती. पहिल्या टप्याची चढण पार करून वर गेलो तेंव्हा कळले की आम्ही चुकीच्या वाटेवर आलो आहोत. पुढे उतार आणि खुपच झाडी होती म्हणून मग पुन्हा मागे वळलो आणि योग्य रस्ता शोधायला लागलो. १२ वाजून गेले होते. पुन्हा भूक लागायला सुरवात झाली होती. एक छोटासा ब्रेक घेतला आणि पुढच्या वाटेला लागलो. आता आम्ही अचूक दिशेने जात होतो. गर्द झाडीमधून वर चढ़णारा रस्ता आम्हाला रतनगडाच्या तुटलेल्या पायर्यांपाशी असणाऱ्या शिडीपाशी नेउन सोडणार होता. मंदिरापासून ट्रेक सुरु के
ल्यापासून जसजसे आम्ही जास्त भिजत होतो तसतसे हळू-हळू सामानाचे वजन वाढत जात होते. आम्हीच नाही तर संपूर्ण सामान भिजले होते. सामान प्लास्टिकमध्ये बांधून सुद्धा काही ठिकाणी तरी पाणी नक्की शिरले होते कारण घेतलेल्या बैगचे वजन दुपटीने वाढले होते. मला वाडीनंतर ट्रेकमध्ये पावसामुळे फोटो घेता येत नव्हता. अमृताने मात्र काही फोटो टिपले होते. संपूर्ण ट्रेकभर गप्पा मारत-मारत आम्ही अखेर त्या शिडीपाशी पोचलो.
खालची शिडी काही फार चांगल्या स्थितीमध्ये राहिलेली नाही. एका वेळेला फार तर २ जणांनी चढावे. शिवाय पावसामुळे कोपरे निसरडे झाले होते आणि हाताने आधार घ्यायच्या शिडीच्या रेलिंगचा भरोसा राहिलेला नाही. १० जणांमध्ये कोण कितवा चढणार हे ठरवले आणि राजेश सर्वात पुढे निघाला. मी सर्वात मागे होतो पण फोटो मात्र काढता येत नव्हते ह्याचे दुःख: होते. पहिल्या शिडीनंतर थोड़ासा टप्पा पार करावा लागतो. तिकडे अभिजित थांबला होता. त्यानंतर डावीकड़े वळलो की लागते दूसरी शिडी. पुढचे भिडू जसे दुसऱ्या शिडीकड़े पोचले तसे आम्ही मागचे पहिल्या शिडीवर सरकू लागलो. दूसरी शिडी अजून भन्नाट स्थिती मध्ये होती. वर पोचल्यानंतर उभी रहायची जागाच मोडून गेली होती आणि वरुन वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने पत्रा वाकून बाहेर आला होता. पत्रा टिकून रहावा म्हणुन खाली घातलेल्या मेटल फ्रेम वर वजन टाकुन स्वतःला उजवीकड़े सरकवल्याशिवाय वर जाणे अशक्य होते. आता एक-एक करून ते दिव्य काळजी घेत आम्ही करू लागलो कारण डाव्या बाजूला तोल गेला तर कपाळमोक्ष नक्की होता. एकतर पावसाने सगळ निसरडे झाले होते. त्यात वर अजून पाउस पडताच होता. दुसऱ्या शिडीच्या वरच्या टोकाला पोचलो की गडाचा दरवाजा दिसू लागतो. हा टप्पा अतिशय निमूळता आहे आणि सवय नसेल तर मोठी सॅक घेउन चढणे अशक्य. एक-एक करून आम्ही वर सरकू लागलो. डाव्या-उजव्या बाजूला दगडांमध्ये खोबण्या केलेल्या आहेत. त्या धरून-धरून सगळे वर पोचलो. दरवाजावरुन सरळ पुढे गेलो तर गडाच्या माथ्यावर जाता येते. पण आम्ही आधी उजवीकड़े मागे वळून गुहेकडे निघालो. राहायची सोय करणे महत्त्वाचे होते नाही का... गुहेकड़े पोचलो तर तिकडे आधीच काही ग्रुप्सनी कब्जा केलेला होता आणि सगळी गुहा ओली कडून टाकली होती. आता राहायचे कुठे असा प्रश्न पडला. बाहेर राहावे तर पाउस जोरदार सुरूच. बाजूला असलेल्या गणेशगुहेमध्ये आम्ही मुक्काम टाकायचे ठरवले. ह्या गुहेमध्ये ७-८ जण सहज राहू शकतात. आम्ही १० जण त्यात घुसणार होतो. सामान टाकून स्थिरस्थावर व्हायच्या आधी ती साफ करणे गरजेचे होते. अभिने आख्खी गुहा साफ केली आणि आम्ही त्या गुहेमध्ये राहते झालो.
दिवसभर पावसात भिजून जबरदस्त भूक लागली होती. नशीब आमचं की आणलेली लाकडे सुकी राहिली होती. गुहेमध्येच एका कोपऱ्यात चूल बनवली आणि त्यावर गरमागरम चहा बनवला. रात्र झाली तसे गप्पा मारत बसलो. इतक्या पावसामुळे उदया तरी गड बघायला मिळणार का? असा विचार आमच्या मनात होता. पावसामुळे लाकडे भिजली नव्हती पण दमट मात्र नक्की झाली होती. नुसता धुर करत होती पण जळत मात्र नव्हती. आम्ही कसाबसा त्यावर चहा बनवला, पण रात्रीचे जेवण कसे बनवणार हा प्रश्न होताच. अखेर रात्रीच्या खिचडीभातचा प्लान कैन्सल करून आम्ही फ़क्त म्यागी बनवायचे ठरवले. शिवाय सोबत नेलेली खिर बनवून खावी असे देखील मनात होते. म्यागी होईपर्यंत सटर-फटर खाउन आधीच सगळ्यांची पोट भरली होती. त्यामुळे शेवटी बनवलेली टोपभर खिर तशीच राहिली. कोणीच ती संपवेना. इतके मला ऐश्वर्याची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. ती असती तर खिर अशी उरली नसती. असो... उरलेली खिर झाकून ठेवून देउन आम्ही सगळे झोपेपर्यंत गप्पा मारत बसलो. बाहेर पाउस जोरात सुरूच होता. पावसाची झड़ आत येऊ नये किंवा इतर कुणीहि आत येऊ नये म्हणुन आम्ही दारावर अडसर लावून झोपायची तयारी केली. वरच्या रांगेत ७ जण तर मध्ये मूर्तिसमोर मी, राजेश आणि अमेय असे ३ जण दाटीवाटीने झोपलो. पण लवकरच लक्ष्यात आले की आमच्या १० जणांशीवाय एक ११ वा कोणीतरी तिकडे होता जो आम्हाला रात्री अधून मधून जागा करणार होता.
क्रमशः ...
No comments:
Post a Comment