Wednesday 27 May 2009

भाग १० - सप्त शिवपदस्पर्श ... !


सारांश - आमचे अनुभव (शेवटचा भाग) ... !

'सप्त शिवपदस्पर्श' हे नाव खरंतरं ह्या ट्रेकवर ब्लॉगपोस्ट लिहायला घेतली तेंव्हा सुचले. ९ दिवस.. ७ किल्ले.. पुरंदर, वज्रगड, सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड. प्रत्येक किल्ला 'श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला'. म्हणुन नाव ठेवले 'सप्त शिवपदस्पर्श'. गेल्या ४ महिन्यापासून मी वेगवेगळ्या ट्रेकवर ब्लॉगपोस्ट लिहितोय पण आज ह्या ट्रेकनंतर पहिल्यांदाच थोडा सारांश लिहितोय. त्याचे कारण असे की हा ट्रेक माझ्या आत्तापर्यंतच्या डोंगरयात्रेमधला सर्वात आवडता ट्रेक आहे. ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये अनेक अनुभव आले. मी खुप काही शिकलोय ह्या ९ दिवसात. खुप काही अनुभवलय. ह्या ट्रेकनंतर मी स्वतःला अधिक ओळखु लागलो. काय करायला हवे ते उमगले मला. आज ते थोडक्यात इकडे मांडायचा हा अल्पसा प्रयत्न.


ही सह्यभ्रमंती २००२ सालची आहे. तब्बल सात वर्षांपूर्वीची. पण आजही तितकीच ताजी आणि टवटवीत आहे. कारण तो प्रत्येक क्षण आम्ही जगलोय. आज ही तो तितकाच ताजा आहे. ह्या ब्लॉगच्या निमित्ताने ते क्षण पुन्हा जगायचे होते मला. पहिल्या १-२ वर्षात केलेली भ्रमंती हे नुसतेच डोंगर चढणे होते असे मला ह्या ट्रेकनंतर जाणवू लागले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकर म्हणुन गेले ते पूर्णपणे अनुभवलं ह्या ट्रेकमध्ये. "हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवण आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"डोंगरात जाताना, किल्ले बघताना तिकडे नेमके कुठला दृष्टीकोन ठेवायचा हे मला ह्या ट्रेकमध्ये समजले. आप्पा म्हणुन गेलेचं आहेत,"गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! धावता पळता त्याला नुसतं शिउन जाणं म्हणजे त्याचाही अपमान, आपलाही. "९ दिवसात फ़क्त ७ किल्लेच नाही तर त्या आसपासची अनेक गावेसुद्धा पाहिली. निरनिराळ्या स्वभावाची माणसे भेटली, त्यांचे ग्रामजीवन आणि राहणी, त्यांच्या वागा- चालायच्या पद्धती अश्या बऱ्याच गोष्टी कळल्या. आम्हाला ह्या ट्रेकमध्ये प्रत्येक ठिकाणी योग्यवेळी हवी तशी मदत मिळत गेली. मग तो सिंहगडच्या पायथ्याचा मामा असो नाहीतर सिंहगड-राजगड मधल्या धारेवर अचानकपणे हाक देणारा शेतकरी असो. विंझर गावाबाहेरच्या शेतामधला रस्ता दाखवणारा मनुष्य असो नाहीतर तोरण्यावरुन कोलंबीला जाताना बसमध्ये भेटलेला मुलगा असो. जणू काही कोणी तरी अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करत आहे असे आम्हाला सारखे वाटत होते. तसे मी, अभिजित आणि हर्षदने एकमेकांना बोलून सुद्धा दाखवले होते. आम्हाला भेटलेला वाघ्या कुत्रा हा त्यातलाच अजून एक भाग. तिसऱ्या दिवशी राजगडच्या पायथ्याला भेटलेल्या ह्याने आमची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. अखेर आम्हालाच त्याला सोडून परत यावे लागले. तो सल अजून मनात आहे आमच्या. एका प्राण्याच्या बाबतीत इतका हळवं का व्हायच अस म्हणताय. कारण तेच. तो प्रत्येक क्षण आम्ही जगलोय. ह्या ट्रेकनंतर इतिहास मला अधिकच खुणवू लागला. आधी फ़क्त कादंबरी आणि वरचेवर वाचन असणारा मी आता इतिहासाच्या खोलात शिरलो. छत्रपति शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास आता अधिक जोमाने अभ्यासू लागलो. आजच्या आणि येणाऱ्या काळातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शिवचरित्रामध्ये आहे ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्या दृष्टीने माझा शिवचरित्राचा अभ्यास गेली ७ वर्ष सुरु आहे.

इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. त्या सप्तपदांनी मी पावन झालो हे नक्की.

त्या दिवसापासून सुरु झालेली माझी वाटचाल अजून सुरूच आहे. ती कधी संपणार नाही. संपेल तर माझ्या बरोबरच. सह्याद्री हा माझा श्वास आहे अस म्हणा हवतर. मी जेंव्हा-जेंव्हा माझ्या श्वासात मिसळतो तेंव्हा-तेंव्हा हाच प्रश्न असतो माझा ...

डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला... !
कुणी फिरस्ता हिंडता वनी... वदला ऐसी आर्तवाणी... !
ऐकून त्याची आर्तयाचना... आली येथल्या जडा चेतना... !
मला विचारा मीच सांगतो... आधी या माझ्या कड़े... !
सरसावत एकेक पुढे... हात उभारुनी घुमू लागले... !
डोंगर किल्ले बुरुज कड़े... डोंगर किल्ले बुरुज कड़े... !

भेटुयात लवकरच ... आणखी काही रोमांचक किस्से घेऊन ... !

12 comments:

 1. लेख वाचनीय व माहितीपूर्ण आहे.
  शेखर जोशी

  ReplyDelete
 2. रोहन,
  तुझ्या सप्तशिवपदस्पर्शाचं हे भरतवाक्य. खूप आवडलं. प्रेरणादायी आहे. असेच लेख आणि इतिहासावर प्रकाश टाकणारं काम तुझ्या हातून होईल ह्यासाठी खूप शुभेच्छा।।

  ReplyDelete
 3. agdi zakas jamlay shevat :)
  agdi paripurna vatte aata hi series !

  aani ho prabhavi lekhanamule "vaghya" sathichi hurhur mala nusta vachtana pan janavli

  ReplyDelete
 4. ऐकून त्याची आर्तयाचना... आली येथल्या जडा चेतना
  .
  .
  best aahe....

  ReplyDelete
 5. Rohan pothimadhye jasa shevatacha bhag kalasaadhyay aasto tasa ha 10va bhag tujya lekhacha kalas aadhyay aahe aasa mala vatate khup chhan aasach chhan yapudhe hi lihi tujya ya pudhilpravasala maja hardik shubhechha

  ReplyDelete
 6. रोहन, खरंच ही संपुर्ण लेखमालिका माझ्यासारख्या व्यक्तीला बरीच माहिती देऊन गेली आणि तू ते क्षण जगलायस हे कळतं. नाहीतर इतकं छान ते लेखणीतून उतरलं नसतं...खूपच छान. आणि तुझे अनुभव खरंच काही वेगळं सांगुन जातात..
  सकाळी तू सांगितलंस आणि आज पूर्ण दिवसात भारावल्यासारखं मिळेल त्या वेळात सगळं एकाच दिवसात वाचून संपवलं..खरंच धन्यवाद मला हे वाचायची आठवण केल्याबद्द्ल...:)

  ReplyDelete
 7. खरे अपर्णा ... मी स्वतः माझ्या ह्या लिखाणाबाबत आनंदी आहे. ट्रेक करताना आणि त्यावर ७ वर्षांनी लिहिताना सुद्धा सर्व काही भारावल्यासारखं होतं ... :)

  ReplyDelete
 8. rohan, aaj itakya ushira he vaachale ... vaachataanaa pratyaksh phiroon yave itake samarth pane tu dolyapudhe ubhe kele aahes ...

  apratim!!!

  ReplyDelete
 9. सर्व १० भाग वाचलेस??? वा. हे लिखाण जास्तीत जास्त लोकांनी वाचावे अशी माझी मनापासून इच्छा आहे... धन्यवाद.

  ReplyDelete
 10. प्रेरणादायी, भारावून टाकणारे आहे सगळं...

  ReplyDelete
 11. pahila bhaag vaachalyavar sagale vachoon jhaalyaashivaay thaambataach aale naahee :)

  ReplyDelete