Saturday 4 July 2009

भाग १ - राजमाची बाइक ट्रिप ... !

अखेर 'लडाख'ची तयारी खऱ्या अर्थाने सुरु झाली. गेले महीने-दोन महीने २०-२५ मेल्स करून सर्व प्रकारची तयारी करण्यात वेळ जात होता. आता मात्र लडाखला बाइक वरुन जाणाऱ्या सर्वच्या-सर्व १३ जणांनी एकत्र राजमाचीला जायचे असे ठरले. सर्व बाइक रायडर्समध्ये ताळमेळ जमून येण्यासाठी १-२ बाइक ट्रिप्स कराव्यात असे आमचे ठरले होते. त्याची सुरवात आम्ही ६-७ जूनला राजमाची पासून केली. शनिवारी दुपारी मी आणि ऐश्वर्या, अभिजित आणि मनाली, अमेय म्हात्रे आणि पूनम, आदित्य आणि श्रीजिष, अमोल आणि दीपाली, हर्षद आणि कविता, संजू आणि अमेय साळवी असे १४ जण ७ बाइक्सवरुन राजमाचीकड़े कूच झालो. ह्या पैकी अमोल, संजू आणि हर्षद लडाखला येणार नसले तरी जास्त बाइक्स हव्या म्हणुन आमच्या बरोबर आले होते. ह्या बाइक ट्रिपसाठी राजमाचीची निवड अभिने केली होती. ठाण्या-मुंबई पासून खोपोली पर्यंतचा मोठा रस्ता, खोपोली ते खंडाळा असा घाट रस्ता आणि मग शेवटी खंडाळा ते राजमाचीची उधेवाडीपर्यंत मातीचा कच्चा रस्ता अशी सर्व प्रकारची बाइक राइड ह्या २ दिवसात करायला मिळणार होती. अर्थात मध्येच पाउस पडला असता तर सगळचं बोंबलले असते हे नक्की.



खरंतरं शनिवारी दुपारी ३ ला निघायचे होते पण मुंबईच्या ट्राफिकने अमेयचा घात केला आणि ४:३० झाले तरी तो काही ठरलेल्या जागी पोहचू शकला नाही. सुरवातच दिडतास लेट. आता मध्ये कुठेही न थांबता थेट खोपोली गाठायचे असे ठरले आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या बाइक्स दामटवल्या. संध्याकाळी ६ ला आम्ही खोपोलीला पोचलो. आता राजमाचीला पोहचेपर्यंत पूर्ण अंधार होणार हे पक्के माहीत होते त्यामुळे व्यवस्थित खाउन घेतले. आता मोर्चा पुढे निघाला खंडाळ्याकड़े. २०-२५ मिं. मध्ये आम्ही खंडाळा उजवीकड़े टाकत राजमाचीच्या रस्त्याला लागलो. लाल मातीच्या कच्च्या आणि थोड्या झाडीच्या रस्त्याला लागायच्या आधी आम्ही एके ठिकाणी थांबलो. कोणीही मागे राहू नये किंवा पुढे जाऊ नये म्हणुन असे ठरले की अभि सर्वात पुढे राहिल तर मी सर्वात मागे. त्या रस्त्यामध्ये आमच्या गाड्यांचे हेड्लैट्स शिवाय बाकी काही दिसत नव्हते. अचानक एका वळणावर माझ्या गाडीच्या पुढच्या चाकाखाली एक मोठा दगड आला आणि काही समजायच्या अगोदर मी ऐश्वर्या आणि बाइकला घेउन उजव्या बाजूला पडलो होतो. जागच्याजागी पडल्यामुळे तिघांनाही काही लागले नाही हे नशीब. तिघे म्हणजे मी, ऐश्वर्या आणि माझी बाइक. हा.. हा.. पौर्णिमेच्या आदला दिवस होता त्यामुळे दूरवर चंद्रप्रकाशात राजमाचीचे जोड़ बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन दिसत होते. इतके अंतर अंधारात पार करून जायचे आहे हे सुद्धा समजुन येत होते. अशात कोणाची बाइक बंद पडली तर ??? विचार करायचा अवकाश होता आणि संजूची बुलेट हाचके घेत बंद पडली. ह्या वेळेला तो नेमका माझ्या मागे राहिला होता आणि सलग चढ असल्याने मी सुद्धा बाइक थांबवली नव्हती. ५-७ मिं झाली तरी तो येत नाही हे कळल्यावर त्याला फोन करायचा प्रयत्न केला पण अध्ये-मध्ये मोबाईल नेटवर्क जात होते. शेवटी फोन लागला आणि त्याच्या गाडीचा क्लच लॉक झाला आहे असे कळले. आता आम्ही उधेवाडी पासून अवघे ३ कि.मी. सुद्धा लांब नव्हतो. सगळ्यांना आधी गावात पोचवायचे आणि मग पुन्हा मागे येउन अमेय आणि संजूला घेउन यायचे असे माझे आणि अभिचे ठरले. जमले तर गाड़ी सुद्धा ठीक करायची होती. गावत पोचलो तेंव्हा १० वाजत आले होते. बराच उशीर झाला होता आणि कोणी जेवण बनवून देइल अशी आशा आम्हाला नव्हती. १-२ जण असते तर ठीक पण इकडे आम्ही १४ जण होतो. गावातल्या गीताताईने मात्र जेवायची सोय केली. मागच्या वेळी ढाक-कुंढेश्वर वरुन आलो होतो तेंव्हा पण उशिरा पोचल्यानंतर गीताताई कडेच राहिलो होतो. हुस्स्स्श.. बाकी सगळे तिकडे आराम करत बसले आणि आता मी आणि अभि पुन्हा बाइक वर टांग मारून ३ की. मी. मागे संजू - अमेय कड़े पोचलो. रस्त्याच्या मधोमध बुलेट उभी करून दोघे जण बाजूला बसले होते. १५-२० मिं. गाड़ी बरोबर मारामारी करून पाहिली पण योग्य स्पॅनर नसल्याने अखेर गाड़ी बाजूला झाडीत टाकली आणि आम्ही पुन्हा उधेवाडीकड़े निघालो.



शनिवारची रात्र म्हणजे राजमाचीला बरीच गर्दी असते पण पाउस अजून सुरु न झाल्याने फारसे कोणी नव्हते. आम्ही जेवून घेतले. सकाळचा चहा-नाश्ता ताईला सांगितला आणि खिंडीमधल्या देवळाकड़े निघालो. आजचा मुक्काम तिकडेच होता. खिंडित पोचलो तेंव्हा १२ वाजून गेले होते. आम्ही पथारी पसरल्या आणि गप्पा मारत बसलो. लडाखला जायच्या आधीची तयारी कशी सुरु आहे आणि काय-काय बाकी आहे त्याबाबत अभिने सर्व अपडेट्स दिले. बराच वेळ बोलणे करून मग आम्ही पहाटे ३ च्या आसपास झोपी गेलो. उदया सकाळी उठून श्रीवर्धन आणि मनोरंजन किल्ले बघायला जायचे होते...

4 comments:

  1. रोहन, मस्त रे.वाचतेय. नचिकेतने दोन वर्षावूर्वी २,७०० मैलांची जवळ जवळ अर्धी अमेरिका व कॆनडा अशी १४ दिवसांची मोटरबाईक राईड केली. :)

    ReplyDelete
  2. लडाख च्या प्रवाशाबद्दल शुभेच्छा. परवाच N.D.T.V वर काही बायकर्सनी या प्रवासावर केलेला कार्यक्रम पाहिला.

    आणि हो, आपला ग्रुप भन्नाट आहे.

    ReplyDelete
  3. आमचा कार्यक्रम सुद्धा येणार आहे एका चॅनलवर .. कुठे ते नंतर सांगिन ... पहायला मिळाला तर नक्की बघा ... :)

    भन्नाट असणारच ना ... :d भन्नाट लोकांनाच काहीतरी भन्नाट सुचत असते ... ;)

    ReplyDelete
  4. चारचाकी पेक्षा बाइकवरुन फिरण्यात एक वेगळाच आनंद आहे. थ्रिल आहे. मजा आहे. 'नाचिकेत'ला ते माहीत असेलच ... ते फोटो send करा मला जमल तर.. chaudhari.rohan@gmail.com वर...

    मी ३ विक्स मध्ये USA ला येतोय.. नविन प्रोजेक्ट वर.. सध्यासाठी मेक्सिकोला टाटा.. :)

    ReplyDelete