Friday 15 May 2009

भाग २ - सप्त शिवपदस्पर्श ... !


काल पहिल्या दिवशी पुरंदर आणि वज्रगड फत्ते झाला होता. आज सिंहगड सर करून राजगडाच्या जास्तीतजास्त जवळ सरकायचे होते. त्यामुळे पहाटेच उठलो, फटाफाट आवरा-आवरी केली आणि समोरच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून सिंहगड चढायला लागलो. आसपासच्या भागामधले बरेच लोक सकाळी-सकाळी व्यायाम म्हणुन गड चढायला येतात. त्यामुळे वाटेवर वर्दळ होती शिवाय त्यामुळे वाट खुपच रुंद झाली आहे. आधीसारखी छोटी आणि सुंदर राहिलेली नाही. त्या थोड्या-थोडक्या गर्दीमधून वाट काढत वरती डोणजे दरवाज्यापर्यंत पोचलो. वरपर्यंत गाड़ी जात असल्याने आता किल्ल्यावर खुपच गर्दी असते. लोकांसाठी सिंहगड आता ऐतिहासीक कमी आणि पर्यटनस्थळ जास्त आहे. आम्ही चौघे राहिलेल्या पायऱ्या चढून दरवाजे पार करून गडामध्ये प्रवेश करते झालो. याठिकाणी लगेच उजव्या हाताला दारूकोठार आहे तर थोड वर उजव्या हाताला घोड्यांची पागा आहे. त्याच्या थोड पुढे गणेशटाके आहे. डाव्या हाताला आणखी काही पाण्याची टाकं दिसतात. पण सगळ्या टाक्यांमधलं पाणी पिण्यालायक राहिलेला नाही. गडावर आता खुप दुकाने झाली आहेत त्यामुळे खायचा तसा प्रश्न नसतो. सिंहगडची कांदाभजी आणि ताक एकदम मस्त लागते पण आम्ही आधी गडफेरी पूर्ण करणार होतो. ते जास्त महत्त्वाचे होते. दुकानांच्या डाव्याबाजूला थोडी मोकळी जागा आहे तेथून राजगड आणि तोरणा यांचे सुरेख दृश्य दिसते. गडाच्या मध्यभागी एक उंचवटा आहे. त्याच्या आधीच उजव्या हाताने पुढे गेलो की लागतो टिळक बंगला. त्याच वाटेने पुढे जात रहायचे म्हणजे आपण पोचतो छत्रपति राजाराम महाराजांच्या समाधीपाशी. घुमटीच्या आकाराच्या ह्या वास्तुचे प्रवेशद्वार एकदम लहान आहे. अगदी वाकूनच आत जावे लागते. समाधीचे दर्शन घेउन आम्ही चौघे पुढे निघालो आणि तिथून गडाच्या पश्चिम कड्याकड़े गेलो आणि तिकडून तानाजी कड्यापर्यंत पोचलो. दिनांक ५ फेब. १६७०. तानाजी मालुसरे आपल्या सोबत मोजके मावळे घेऊन ह्याच कड्यावरुन चढून गडावर आले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. मात्र त्यांच्यामागुन शेलारमामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता... दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. अत्यंत दुख्खी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या उमरठ (पोलादपुर जवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता मढेघाट या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा विरगळ स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे. स्मारकामध्ये असलेला त्यांचा भरदार मिशांचा अर्धाकृती पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो. 'मुजरा सुभेदार' असे म्हणुन आम्ही पुन्हा मागे यायला निघालो. स्मारकाच्या उजव्याबाजूला गडाचा देव म्हणजेच 'कोंढाणेश्वर मंदिर' आहे तर डाव्या बाजूला 'अमृतेश्वर भैरव' आहे. तिकडे दर्शन घेतले आणि पुन्हा दुकानांच्या दिशेने निघालो.








दुपार होत आली होती आणि आता जेवण बनवायला हवे होते. पहिल्या दिवशी आम्ही बाहेरच खाल्ले होते. आजपासून मात्र आम्ही जेवण बनवून खाणार होतो. झटपट-फटाफट होइल अशी खिचडी बनवली. सोबत पापड़ आणि लोणचे. एका दुकान मधून कांदाभाजी आणि दही घेतले. खाउन तृप्त झालो आणि मग देवटाक्याकड़े निघालो. सिंहगडावरील देवटाके म्हणजे निर्मळ पाण्याचा आस्वाद. अहाहा... गडावर आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी ह्याची चव घेउन पहावी. तिकडून आम्ही पुढे निघालो आणि कल्याण दरवाजा डावी कड़े ठेवून पुढे गडाच्या दक्षिण भागात मध्यभागी असलेल्या टेहाळणी बुरुजाकड़े गेलो. तर एकदम दक्षिण टोकाला आहे तो झुंझार बुरुज. आता इथून राहुल मागे फिरून मुंबईला जाणार होता. तर आम्ही कल्याण दरवजा मधून राजगडाकड़े कुच करणार होतो. कल्याण दरवाजामधून खाली उतरलो आणि राहुलला हात करत कड्याखालून जाणाऱ्या वाटेने झुंझार बुरुजाच्या दिशेने निघालो. कल्याण गावापासून गडावर यायची ही दूसरी वाट. वाट आधी डोंगराच्या एका धारेवरुन सरळ जात रहते. दोन्ही बाजूला काही शे फुट दरी आणि मध्ये दोन्ही बाजूला उतरती अवघी ३-४ मी. ची सपाटी. पूर्ण मार्गावर एक सुद्धा झाड़ नाही. आम्ही सिंहगडावरुन निघालो तेंव्हा दुपारचे २ वाजले होते. त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत होता. एके ठिकाणी जेमतेम डोक्याला सावली मिळेल इतकीच झाडी होती. तिकडे ५-१० मिं. आराम केला आणि पुढे निघालो. आता समोर २ रस्ते लागले. एक समोरच्या टेकाडावर चढत होता तर दूसरा उजव्या बाजूला थोडा खाली उतरत होता. पाहिले तर वर जाणाऱ्या वाटेवर काही दगड टाकले होते. आम्हाला असे वाटले की खरी वाट उजव्या बाजूने आहे त्यामुळे आम्ही उजवीकडच्या वाटेने निघणार तितक्यात दुरून एकदम एक आवाज आला. "तिकड..तिकड.. त्या वाटेला. साखर गावाला जायचय ना" आम्ही ऐकताच बसलो. आधी तो आवाज कूठुन येतोय काही कळेना. अखेर एकदम खालच्या शेतामधुन एक शेतकरी आम्हाला आवाज देत होता तो दिसला. त्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे वरच्या वाटेवर निघालो. थोड चढून गेल्यावर पुन्हा सपाटी लागली. आता पुढे जाउन पुन्हा एक छोटीशी टेकडी लागली. तिच्या उजव्या-डाव्या बाजूला जाणाऱ्या २ वाटा होत्या. ह्यावेळी मात्र उजवीकड़े वळायचे नक्की माहीत होते. अत्यंत दाट अश्या कारवीच्या झाडीमधून वाट काढत पुढे सरकत होतो. एक-एक पाउल उचलायला बराच वेळ जात होता. अखेर त्या टेकडीला वळसा घालून पलीकडे पोचलो. आणि पाहतो तर काय... खाली उतरणाऱ्या २ लांबचलांब डोंगरधारा दिसत होत्या. एक उजवीकड़े तर दूसरी डावीकड़े. त्यांच्यामागे दुरवर समोर राजगड आणि तोरणा उभे होते. दोन्ही डोंगरधारांच्या सुरवातीला एक-एक झाड़ आहे आणि त्यावर अगदी गंजलेल्या अश्या पाट्या आहेत. एकावर राजगड असे लिहून बाण काढला आहे तर दुसऱ्यावर तोरणा असे लिहून बाण काढला आहे. आम्ही राजगड लिहिलेल्या धारेवरुन खाली उतरायला लागलो. उंच वाढलेल्या गवतामधून उतरणारी वाट फारशी दिसतच नव्हती. ५ वाजत आले होते आणि वाट काही उतरायची संपत नव्हती. अंधार पडायच्या आधी आम्हाला साखर गाव गाठायचे होते. एका मागुन एक डोंगर उतरत आम्ही कुठेही न थांबता थोड्या सपाटीला आलो. २-३ घरं दिसली पण ती रिकामी होती. सोबतचे पाणी संपत आले होते आणि अपेक्षेपेक्षा वाट जास्त वेळ घेत होती. पुढे वाट उतरु लागलो. ६ वाजून गेले तेंव्हा एका ठिकाणी दूरवर एक घर दिसले. तिकडे पाणी आणि गाव अजून किती लांब आहे ह्याची माहिती मिळेल म्हणुन हर्षद गेला. मी आणि अभि वाटेवर बसून होतो. त्या घरात सुद्धा कोणीच नव्हते असे कळले. "बघू.. होइल ते होइल" अस म्हणुन जरा निवांतपणे बसलो. जवळचे उरलेले पाणी प्यालो आणि सोबत असलेली पार्ले-जीची बिस्किटे खाल्ली. तितक्यात मागुन एक माणूस आला. त्याला गावाची माहिती विचारली तर तो नेमका साखर गावचा निघाला. बरे झाले. आता आम्ही त्याच्या सोबतच निघालो. काही वेळातच त्याने आम्हाला गावात पोचवले आणि एका देवळामध्ये राहू शकता असे सांगितले. गावात पोहचेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. देवळामध्ये गेलो आणि निवांतपणे पथारी पसरली. काहीवेळाने समोरच्या घरामधून काही पैसे देउन स्टोव्ह आणि रॉकेल घेतले आणि जेवण बनवायला लागलो. रात्री जेवण झाल्यानंतर देवळामागे असलेल्या विहिरीवरती आंघोळ केली आणि मस्त फ्रेश झालो. दिवसभर चांगलाच ट्रेक झाला होता त्यामुळे झोप येत होती. आता 'गडांचा राजा आणि राजांचा गड' अश्या राजगडाचे वेध लागले होते. उदया सकाळी लक्ष्य होते 'स्वराज्याची पाहिली राजधानी - राजगड...'
क्रमश:

3 comments:

  1. ekdam chaan warnan kelay gadacha...kuthun kuthe kasa jasycha..gadawar kuthe kaay aahe ti mahiti khup chaan diliyes..dhanyawaad...

    ReplyDelete
  2. रोहन, हेवा हेवा........! :(
    :)

    ReplyDelete