Sunday 24 May 2009

भाग ८ - सप्त शिवपदस्पर्श ... !

दिवस आठवा ... रायगडावर हर्ष दाटला ...

कालरात्री खरतर रायगड गाठायचा होता. मात्र बोराटयाच्या नाळेबाहेर पडेपर्यंत खुच उशीर झाल्याने पाने गावत मुक्काम करावा लागला होता. आज मात्र सकाळी-सकाळीचं चहा-नाश्ता घेउन आम्ही आमचा मुक्काम हलवला आणि आमच्या मोहिमेचा शेवटचा शिवपदस्पर्श अनुभवण्यासाठी रायगडाकड़े कूच केले. गावामधून बाहेर पडलो. थोडसं मोकळ माळरान आणि डाव्याबाजूला नदीकाठी सगळी शेती होती. काळ नदी पाने गावाला वळसा मारत रायगडाकड़े सरकते. काल गावात यायला जशी नदी पार करावी लागली होती तशी आता पुन्हा पार करून रायगडाजवळ सरकायचे होते. नदीला पाणी तसे कमीच होते. आरामात पार करून गेलो. समोर रायगडाचा अखंड भवानी कडा दिसत होता. उजव्या हाताला दूरवर टकमक टोक दिसू लागले होते. त्यामुळे आता वाट चूकायचा प्रश्न नव्हता. गावापासून निघून तास होउन गेला होता आणि उजव्या बाजूला थोड खाली छत्री निजामपुर गाव दिसू लागले होते. डाव्या बाजूला पूर्ण जंगल होते. त्यात शिरून वाट शोधत-शोधत जाण्यापेक्षा आम्ही थोड लांबून वाट काढत-काढत जात होतो. या ठिकाणी आता एक धरण होत आहे. काळ नदीचे पात्र आता रुंद होइल आणि ह्या मार्गाने रायगड पुन्हा गाठता येइल का प्रश्नच आहे. आसपासच्या भागातल्या लोकांसाठी ही चांगली गोष्ट असली तरी ट्रेकर्सना आता वेगळा मार्ग शोधावा लागेल हे नक्की. मजल-दरमजल करत आम्ही आता रायगडवाडीला पोचलो होतो. मागे दुरवर लिंगाणा आणि रायलिंगाचे पठार अजूनही दिसत होते. रायगडवाडी मध्ये पोचलो तेंव्हा ११ वाजत आले होते. जरा दम घेतला आणि थेट चित्त दरवाजा गाठला. चित्तदरवाजापासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली.किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ... त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले रायगड ...चित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो खूबलढा बुरुज. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. ह्याच्या अगदी बरोबर वरती आहे हिरकणी बुरुज. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळा पर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात. त्या २ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे." कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक' अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला महादरवाजा असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच. हूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही. हे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरशहा: दम निघतो. महत् प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन महादरवाजाचे सुंदर दृश्य दिसते. सर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो हत्ती तलाव आणि त्या मागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते. गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ. ती पाहत आम्ही जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेत पोचलो. आजचा मुक्काम इकडेच होता. सरपण जमा केले आणि जेवणाच्या तयारीला लागलो. तितक्यात कळले की सुरेश वाडकर गडावर आहेत. (गायक नव्हे बर का.. 'रायगड किले अभ्यासक सुरेश वाडकर' ज्यांनी रायगड त्यावेळी ५०० पेक्षा जास्त वेळा पाहिला होता. आता बहुदा १००० पूर्ण केले असतील त्यांनी.) जेवण आवरून गड बघायला निघालो.
आधी आम्ही होळीच्या माळावर पोचलो. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे. आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??? मनातल्या मनात राजांची क्षमा मागत मुजरा केला आणि मागे वळून चालू लागलो. होळीच्या माळावर उजव्या बाजूला गडाची देवता शिर्काईचे मंदिर आहे. देवीची मूर्ती दशभुजा असून आजही दरवर्षी गडावर देवीचा उत्सव भरतो. अंबारखाना म्हणुन ओळखली जाणारी वास्तु आज पूरातत्वखात्याचे कार्यालय म्हणुन बंद केली गेली आहे. पुतळ्या समोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४७ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ'से म्हटले गेले आहे. त्यात आहेत एकुण ४७ दुकाने. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे. डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र शेषनागाचे दगडी शिल्प आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे. आता आम्ही नगरपेठेच्या उजव्या बाजूला चालू लागलो. समोर दिसत होता श्री जगादिश्वर मंदिराचा कळस. उजव्या बाजूला खाली दूरवर १२ टाकी आणि वाघ दरवाजाकड़े जायचा मार्ग आहे. वेळ कमी असल्या कारणाने तिकडे जाता येणार नव्हते.श्री जगादिश्वर मंदिराच्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो. या ठिकाणी आहे 'श्री शिवछत्रपतींची समाधी'. मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे?'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.'' ही अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे. १९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले. राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी. त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली. समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो. समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात. बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज (अंदाजे २०००) राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि सूर्यास्त पाहण्यासाठी गडाचा कडेलोट उर्फ़ टकमक बघायला लावणारा ८०० फुट टकमक कडा बघायला गेलो. तिकडे जाताना आधी गडावरील 2 दारूकोठारे लागतात. उद्वस्त छप्पर आणि आत माजलेले झाडीचे रान अशी सध्या त्यांची अवस्था आहे. पुढे जाउन थोडसं उतरलं की टकमककड़े जाता येते. सांभाळून जावे आणि कडयावरुन विहंगम दृष्य पाहून परत यावे. आता टकमक वरुन ८०० फुट रॅपेलिंग सुद्धा करता येते. पण आम्ही काही ते आता करणार नव्हतो. सूर्यास्त होत आला होता. आणि आज आम्ही अर्धा गड पाहिला होता. 'आता बाकी उदया रे' अस म्हणुन आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. संध्याकाळचे जेवण बनवताना सुरेश वाडकरांबरोबर इतिहासावर गप्पा मारल्या आणि त्यांचे रायगडाचे अतिशय सुंदर असे फोटो पाहिले. सकाळी सूर्योदय बघायला पुन्हा होळीच्या माळावर जायचे होते त्यामुळे लवकरच आडवे झालो. गप्पा मारता-मारता झोप कधी लागली काही कळले नाही...


क्रमश: ...

2 comments:

  1. मी कित्येक वेळा रायगडावर जाऊन आलोय पण ही पोस्ट वाचून असे वाटतंय की मला बोलावतोय तो. आलोच रे मित्रा... तुझ्यावाचून माझे तीन महिने कंठत नाहीत.

    मागल्या वर्षी असाच मार्च मध्ये आलो होतो तारे मोजायला...

    ReplyDelete
  2. पंकज ... माझी पुढची रायगड वारी आता जून-जुलै मध्ये होणार आहे... जमल तर जाउया की एकत्र.

    ReplyDelete