Thursday 21 May 2009

भाग ६ - सप्त शिवपदस्पर्श ... !


६ व्या दिवशी सकाळी तोरण्यावरील गडफेरीला निघालो. तोरण्याला २ माच्या आहेत. झुंझार माची आणि बुधला माची. आम्ही आधी झुंझार माचीकड़े निघालो. मंदिरापासून डाव्याबाजूला काही अंतर गेलो की तटबंदी आणि टोकाला बुरुज लागतो. ह्या बुरुजावरुन खालच्या माचीवर उतरायची वाट मोडली आहे. त्या ऐवजी थोड़े मागे डाव्याहाताला खाली उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी लावली होती. त्यावरून खाली उतरलो आणि माचीकड़े वळालो. माचीची लांबी तशी फार नाही पण तिला भक्कम तटबंदी आहे. टोकाला एक मजबूत असा बुरुज आहे. तिकडून परत आलो आणि शिडी चढून पुन्हा मंदिरात परतलो. आता सामान बांधले आणि बुधला माचीकड़े निघालो. कारण त्याच बाजूने गडाच्या दुसऱ्या दरवाज्याने आम्ही गड सोडणार होतो. मंदिरापासून आता पुढे निघालो आणि उजव्या वाटेने बुधला माचीकड़े कूच केले. झुंझार माचीवर सुद्धा आमच्या बरोबर आलेला वाघ्या ह्यावेळी मात्र आमच्या बरोबर बोलवून सुद्धा आला नाही. वाट आता निमुळती होत गेली आणि मध्ये-मध्ये तर मोठ्या-मोठ्या दगडांवरुन जात होती. गडाचा हा भाग एकदमच निमुळता आहे. थोड पुढे गेल्यावर अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या लागल्या. आता समोर बुधला दिसत होता. पण तिकडे जाण्याआधी डाव्याबाजूला खाली असणाऱ्या बुरुजाकडे सरकलो. राजगडाच्या आळू दरवाजावरुन येणारी वाट इकडून तोरणा गडावर येते. खालच्या गावामधून एक म्हातारी डोक्यावर दही आणि ताकाचा हंडा घेउन गडावर आली होती. सकाळी-सकाळी तिने बहुदा ३०-४० जणांना गडावर येताना पाहिले असावे. आम्हाला पाहताच बोलली,"भवानी कर की रे भाऊ." मी आणि हर्षदने एक-एक ग्लास घेतला. छान होत की ताक. आम्ही तिला बोललो 'मंदिराकडे जा लवकर. तिकडे बरेच जण आहेत पण ते गड सोडणार आहेत आत्ता. लवकर गेलीस तर कमाई होइल तुझी.' आता ती बाई मंदिराकडे निघाली. आम्ही आता उतरून बुरुजाकडे निघालो. मी सर्वात पुढे होतो. अभि मध्ये तर हर्षद मागे होता. वाटेवर बरच गवत होते. तितक्यात त्या बाईचा आवाज आला. "आरं.. आरं.. पोरगा पडला की." मला काही कळेना. मी मागे वळून पाहील तर हर्षद गवतात लोळत बोंब ठोकुन हसत होता. आणि अभि त्याच्याकडे बघत उभा होता. हर्षद आता जरा शांत झाला आणि मला नेमक काय घडल ते सांगितले. त्या गवतावरुन अभि सरकून असा काही पडला की त्याने ह्या ट्रेकमधले सर्वात जास्त रन केले. म्हणजे डायरेक्ट होमरन मारली असच म्हणान. आता मला मागे टाकुन लीड वर अभि होता. हा.. हा.. पण हे इतक्या वेगात घडल की मी मागे वळून बघेपर्यंत तो उठून उभा सुद्धा होता. आम्ही खालच्या बुरुजापर्यंत गेलो आणि काहीवेळात चढून वर आलो. आता मोर्चा वळवला बुधला माचीकडे. ह्या बाजूला अस काही रान माजले होते की नेमकी वाट सापडेना. जसे आणि जितके जमेल तितके पुढे जात होतो. बुधल्यावरती चढता येते का ते माहीत नव्हते त्यामुळे जेंव्हा वाट सापडेनाच तेंव्हा मागे फिरलो आणि दरवाजाकडे निघालो. दरवाज्यामागच्या उंचवटयावरुन खालची बरीच वाट दिसत होती. पण पुढे मातीचा घसारा आणि वाट मोडल्यासारखी वाटत होती. हर्षद खाली जाउन बघून आला आणि बोलला की बहुदा आल्या मार्गाने आपल्याला परत जावे लागणार. आम्ही पुन्हा मंदिराकडे निघालो. आता वेळेचे गणित पूर्णपणे विस्कटणार होते.
आल्या मार्गाने परत फिरलो आणि मंदिरामध्ये पोचलो. 'श्री शिवप्रतिष्टान' च्या लोकांनी गड सोडला होता. ती ताकवाली म्हातारी बाई भेटली मध्ये. आता आम्ही आल्यावाटेने गड उतरु लागलो. बिनीचा दरवाजा उतरून खाली आलो आणि कडयाखालचा टप्पा पार करून डोंगर रांगेवरुन उतरायला लागलो. चढ़ताना जितका दम निघाला होता तितका आता उतरताना पायावर जोर पडत होता. आमचा उतरायचा वेग भलताच वाढला होता. कुठेही न थांबता आम्ही खालच्या टप्यावर येउन पोचलो. दुरवर खाली वेल्हा दिसत होते. झपाझप एकामागुन एक टप्पे पार करत खाली उतरत वेल्हा गाठले. आज काहीही करून बोराटयाच्या नाळेच्या जास्तीत-जास्त जवळ सरकायचे होते. गावात पोचलो तेंव्हा ३ वाजत आले होते. आता इकडून नदीच्या मार्गाने हरपुडला कसे जायचे ते एका माणसाला विचारले. तो बोलला,"आत्ता गेलात तर जाम उशीर होइल. त्यापेक्षा ४ वाजताची कोलंबीला जाणारी S.T. पकडा आणि मग तिकडून पुढे जा." आम्हाला हा पर्याय पटला. आम्ही अजून १-२ लोकांकडून S.T. ची खात्री करून घेतली आणि मग तासभर तिकडेच एका देवळामध्ये थांबलो. ४ वाजताची S.T. आली. ही गाड़ी निवासी S.T. असून पुण्याहून वेल्हामार्गे कोलंबीला जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा वेल्हामार्गे पुण्याला परतते असे कळले. त्या गाडीत आम्हाला एक मुलगा भेटला. नाव आठवत नाही आता त्या पोराचे. तो कोलंबीला म्हणजेच त्याच्या गावाला जात होता. कामाला होता तो नवीमुंबईच्या APMC बाजारात. तास-दिडतासाच्या त्या प्रवासात त्याच्याशी मस्त गप्पा झाल्या. शेतीची महत्त्वाची कामे झाली की आसपासच्या गावामधले लोक अधिक उत्पन्न मिळावे म्हणुन इतर कामासाठी पुणे, सातारा आणि अगदी मुंबई - नवी मुंबईपर्यंत जातात हे त्याच्या कडून कळले. संध्याकाळी ६ च्या आसपास गावात पोचलो.

मागे एकदम दूरवर तोरणा आणि त्याची बुधला माची दिसत होती. मुंबईचा कोणी आपल्या गावात आला आहे म्हणुन तो भलताच खुश होता. कारण ह्या वाकड्या मार्गाने कोणी ट्रेकर जात नाही. 'तुम्ही आज आमच्याघरीच राहायचे, आमच्याकडेच जेवायचे' असे आम्हाला सांगुन तो मोकळा झाला होता. आम्ही म्हटले "बाबा रे, कशाला तुम्हाला त्रास. आमच्याकड़े जेवणाचे सगळे सामान आहे. तू बास आम्हाला गावामधले देउळ दाखव आणि पाणी कुठे मिळेल ते सांग." तरीपण आम्हाला घेउन आधी तो स्वतःच्या घरी गेला. आईशी ओळख करून दिली. मी पहिल्या क्षणामध्येच त्याचे घर न्याहाळले. बाहेर छोटीशी पडवी. आत गेल्या-गेल्या डाव्या बाजूला गुरांचा गोठा होता. त्यात २ बैल, एक गाय आणि तिच्याजवळ तिच वासरू होत. समोर घरामध्ये आई काहीस काम करत बसली होती. योगायोगाने त्याच्या घरासमोर आणि उजव्याबाजूला अशी २ मंदिरे होती. मी लगेच त्याला म्हटले,"हे बघ. आम्ही इकडे समोरच राहतो. अगदी काही लागल तर घेऊ की मागुन." तो ठीक आहे म्हणुन आत घरात गेला आणि आम्ही आमचा मोर्चा मंदिराकड़े वळवला. आमचे सामान टाकुन बसणार तितक्यात तो एक मोठा पाण्याचा हंडा आणि काही सरपण घेउन आला आणि बोलला,"जेवणाचे सामान आहे बोलताय. पण जेवण कशावर बनवणार?? हे घ्या सरपण" आम्ही सगळेच हसलो. काहीवेळाने जरा फ्रेश झालो आणि निवांतपणे बसलो. ७ वाजून गेले तसे मी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागलो तितक्यात तो मुलगा चहा घेउन परत आला आणि आमच्याशी गप्पा मारायला लागला. इकडून उदया आम्ही कुठे जाणार आहोत ते त्याला सांगितले. माझ्या मनात विचार येत होते. 'असेल पैशाची गरीबी थोडी पण मनाची श्रीमंती आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे.' गेल्या इतक्या वर्षात मी गावातल्या लोकांचा पाहूणचार पहिला आहे, अनुभवला आहे आणि भरून पावलो आहे. आम्ही आमचे रात्रीचे जेवण आटोपले आणि इतिहासावर गप्पा मारत बसलो. वेळ कसा गेला कळलेच नाही. बऱ्याच उशिरा झोपी गेलो.
क्रमश:

3 comments:

  1. खूपच छान वाटलं लेख वाचून . गडाचे माच्यांचे वर्णन अन् मनाची श्रीमंती सारं काही भावलं.

    ReplyDelete
  2. रोहन,

    तुझ्या सप्त शिवपदस्पर्श ह्या मालिकेतील सगळे लेख वाचले. खूप अप्रतिम लिहिले आहेस.इतिहासाची माहिती देता देता, सगळ्यांसोबत होणारा प्रवास त्यातील मजा आणि येणारे अनुभल हे सगळे खूप छान गुंफले आहेस. पुढील सगळ्या लेकांसाठी खूप शुभेच्छा.

    ReplyDelete