Showing posts with label rajgad. Show all posts
Showing posts with label rajgad. Show all posts

Monday, 8 November 2010

राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर ...

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. डिसेंबरचा महिना होता. रात्रीच्या मुंबई - पंढरपूर गाडीने मी एकटाच पुण्याच्या दिशेने निघालो होतो. पाठीवर असलेल्या मोठ्या सॅकमूळे ठाण्याला जनरल डब्यात कसाबसा घुसलो होतो. रात्रीच्या शांततेत ट्रेनची धड-धड अधिकच जोरात जाणवत होती. तितकीच जोरात होती माझी उत्कंठा. कारण मी जात होतो स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर... राजगडावर... :)


ह्या आधी २-३ वेळा राजगड दर्शन झालेले होते. ह्यावेळी मात्र राजगडाला प्रदक्षिणा मारायची योजना होती. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून २२५ दुर्गप्रेमी राजगडावर हजेरी लावणार होते. मालाड येथील नेचर लवर्स या संस्थेने हा कार्यक्रम ठरवला होता. माहिती द्यायला सोबत असणार होते इतिहासतज्ञ आप्पा परब. पहाटे ५ च्या आसपास पुण्याला पोचलो आणि मी लगेच माझा मोर्चा एस.टी. स्थानकासमोरच्या चहावाल्याकडे वळवला. सोबत एक क्रीम रोल खाल्ला आणि ६ च्या वेल्हे गाडीची वाट बघत बसलो. गाडी आल्यावर माझी सर्वात आवडती जागा पकडली. इथे-तिथे कुठे नाही तर  थेट ड्रायव्हरच्या बाजूला, गियर बॉक्सच्या शेजारी. एस.टी. मधून प्रवास करताना मला नेहमीच ही जागा आवडते. २ तासात साखरला पोचलो. एस.टी. ला टाटा केला आणि गुंजवणेची वाट पकडली. आता पुणे-सातारा महामार्ग सोडून गाडी आत वळली आणि काही वेळातच दूरवर राजगड साद घालू लागला होता.




गुंजवणेला नेचर लवर्स संस्थेच्या सदस्यांकडे आल्याची नोंदणी केली. राजगडला आले की बेधुंद व्हायला होते. मनात अनेक विचार दौडत असतात. त्या विचारांवर स्वार होत गड चढणीला लागलो. जरा वरच्या टप्याला गेलो की डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ, झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसते. ते बघत वरच्या चढणीला लागलो. मध्ये लागणाऱ्या सपाटीनंतर वाट निमुळती होत अधिक चढणीला लागते आणि चोरवाट असल्याची साक्ष देत राहते. तासा - दीडतासाने शेवटच्या टप्प्यामध्ये वाट कड्याखालून गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याच वाटेवर सुरु होतो 'राजगड प्रदक्षिणेचा मार्ग'. कारवी जिथे सुरु होते तिथून चोर दरवाज्याकडे येण्याऐवजी जर तिकडून झाडीमध्ये डावी मारली तर एक बारीक पायवाट गुंजवणे दरवाजाच्या दिशेने जाते. ही वाट फारशी मळलेली नाही. मी कड्यावरून चढून चोर दरवाज्यामधून प्रवेश करता झालो आणि पद्मावतीमाची वरच्या आई पद्मावतीच्या देवळाच्या बाजूला एका टेन्टमध्ये विसावलो. अनेक जण येऊन पोचले होते. अनेक गड चढून येत होते. ६ वर्षाच्या चिमुरड्यापासून ते ६६ वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व वयोगटाच्या लोकांचा उत्साह बघण्याजोगा होता. आजच्या दिवसात जमेल तितका राजगड बघणे आणि उद्या गडाची प्रदक्षिणा मारणे असा २ दिवसाचा कार्यक्रम नक्की होता.


पद्मावती तलाव


राजगड - ज्या ठिकाणी राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये. त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटीसारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणून तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे.


आई पद्मावती


दुपारच्या जेवणापर्यंत सर्व दुर्गयात्री गडावर येऊन पोचले होते. संस्थेचे काही मुख्य सदस्य आणि आप्पांची मुलगी शिल्पा हीच्यासोबत सर्वजण गडफेरीला निघाले. मी मात्र देवळात आप्पांबरोबर थांबलो होतो. राजगड तसा २-३ वेळा बघून झाला होता. आज मात्र आप्पांबरोबर अधिक वेळ राहून काही अधिक ऐतिहासिक माहिती घेणे ही इच्छा होती. त्यामुळे पटापट सुवेळा माची आणि आसपासचे फोटो घेऊन पुन्हा देवळाबाहेर येऊन बसलो. त्या १-२ तासात ज्ञानात खूप भर पडली. राजगडाचे मूळ नाव मुरुमदेवाचा डोंगर. राजगड नाव दिले शिवरायांनी. आप्पांच्या मते खरेतर 'मुरूमदेव' हा 'बुहृमदेव' याचा अपभ्रंश असावा. बुहृमदेव म्हणजेच ब्रह्मदेव. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आजही ब्रह्मश्रीचे मंदीर आहे. शिवाय पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिर सुद्धा संयुक्तिक वाटते. खुद्द नावावरूनच राजगडाचे प्राचीनत्व समोर येते. राजगडाच्या बाबतीत आप्पांनी सांगितलेली अजून एक गोष्ट म्हणजे तोरणा प्रमाणे इथे सुद्धा शिवरायांना झालेला धनलाभ. गडाच्या गुंजवणे दरवाज्याची काम सुरु असताना एके ठिकाणी अचानक गुप्त धन सापडल्याची काही माहिती 'सप्त प्रकाराणात्मक' बखरी मध्ये दिलेली आहे. राजगडाच्या दोन्ही माच्या म्हणजे सुवेळा आणि संजीवनी यांच्या नावाबाबत सुद्धा काही माहिती ह्या बखरीमध्ये आढळते.




 सुवेळा माचीचा विस्तार!


 
 झुंजार बुरूज


 हत्ती प्रस्तर






सूर्य कलायला लागला तसे सर्वजण परतू लागले. संध्याकाळी आप्पांचे छोटेसे व्याख्यान होते. शिवाय त्यांच्या 'राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर' ह्या पुस्तकाचे प्रकाशन देखील होते. वयाची सत्तरी गाठलेल्या आप्पांचा खणखणीत आवाज राजगडाच्या पद्मावती माचीवर निनादत होता. राजगडाचे सखे-शेजारी सिंहगड, तोरणा आणि दुरून रायगड ह्या सर्वांचेच आज राजगडाकडे लक्ष्य लागले होते बहुदा. म्हणता म्हणता आप्पांनी १७व्या शतकातला राबता राजगड आमच्या डोळ्यासमोर उभा केला. ते देऊळ, माची, ते बुरुज, सदरं सारे सारे काही पुन्हा शहारून जागे झाले होते. भारावलेले काही क्षण ते पुन्हा नक्कीच जगले असतील. व्याख्यान संपले तसा गडही शांत झाला. आम्ही जेवून निद्रिस्त व्हायची तयारी केली आणि आपापल्या टेन्टमध्ये जाऊन पहुडलो. मी कपाळावर हेडटोर्च चढवला आणि नुकतेच प्रकाशित झालेले ते छोटेखानी पुस्तक अर्ध्या तासात पूर्ण वाचून काढले. रात्रीच्या ११ नंतर पुन्हा एकदा टेन्ट बाहेर आलो तर सर्वत्र सामसूम होती. वारा मोकाट सुटला होता आणि दूरवर फडकणाऱ्या जरीपटक्याला जोराने फडकावत होता. मी पुन्हा आत येऊन झोपी गेलो. उद्या पहाटे ६ वाजता गड सोडायचा होता. प्रदक्षिणेच्या वाटेवर लागायचे होते.


पहाटे ६ वाजता उठून तयार झालो. बरोबर ७ वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने प्रदक्षिणेसाठी गड सोडला आणि तो छोटासा कडा उतरून कारवीच्या वाटेवर लागलो. पुढे-मागे सोबत प्रदक्षिणार्थी होतेच. कारवी संपली तिथून उजव्या हाताला आत शिरलो आणि प्रदक्षिणा सुरु झाली. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसत होते. अंदाज बांधला. तिथपर्यंत पोचायला किमान २ तास तरी लागणार. आता झाडी कमी झाली होती आणि उंच वृक्षातून डोकावणारे सकाळचे कोवळे उन आल्हाददायक वाटत होते.






मध्येच एके ठिकाणी कड्यावर अनेक मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसली. त्यांच्या वाटेला कोण जाणार! गुपचूप आवाज न करता सर्वजण पुढे सरकलो.अधून मधून हळू आवाजात गप्पा सुरु होत्या. कोण कुठून आलाय. वगैरे वगैरे. बहुतेक लोक पुण्या-मुंबई आणि सातारा-कोल्हापूरचे होते. काही रत्नागिरी-रायगड तर काही नाशिक आणि पार नगर-औरंगाबादहून देखील आलेले होते. मोजके २-३ लोक तर थेट नागपूरवरून आलेले होते. तासभराच्या चाली नंतर मध्ये एके ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. तिकडे कोपऱ्यात एक छोटूसे घरटे दिसले. पण घरात कोणीच नव्हते. सकाळी-सकाळी बहुदा कामावर निघून गेले घरातले लोक!!!




आम्ही पूर्व दिशेने निघालो होतो तेंव्हा आता उन समोरून यायला लागले होते. सुवेळामाचीच्या उतरत जाणाऱ्या डोंगरसरी एक-एक करून पार करत आम्ही त्या टोकाकडे निघालो होतो. माझे लक्ष्य चौफेर होते. एक तर अशी भ्रमंती पुन्हा सहसा होणार नव्हती. तेंव्हा जे दिसेल ते डोळ्याने आणि कॅमेऱ्याने टिपणे हे माझे लक्ष्य होते. दर काही पावलांनी मी वळून मागे बघत असे. अश्याच एका वेळी टिपलेला हा बालेकिल्ल्याच्या महादरवाज्याचा फोटो.


राजगडाचा बालेकिल्ला का अभेद्य आहे त्याचा एक प्रत्यय... आहे कोणाची हिंमत तिथवर पोचायची?


सुवेळा माचीपर्यंत पोचायचे अर्धे लक्ष्य पूर्ण झाले होते. आता वाट अधिक वाट लावत होती. आम्ही आता झुंझार बुरुजाच्या खाली होतो. वाटेत एकेठिकाणी छोटीशी खोदीव गुहा लागली. आत्तापर्यंत राजगड बाबतीत मी ह्या गुहेचा उल्लेख कुठेच वाचलेला नाही. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या बरोबर खाली असलेल्या ह्या गुहेबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती हाती लागली नाही. संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे निश्चित काही महत्व असू शकेल असे वाटते.








हत्तीप्रस्तरच्या खालच्या बाजूने. वाघाचा डोळा म्हणजेच 'नेढं' पण दिसतंय!


वर पहिले तर लक्ष्य थेट 'हत्तीप्रस्तर' आणि 'वाघाचा डोळा' उर्फ नेढ्याकडे गेले. जबरदस्त नजारा होता. आता आम्ही सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्याचे अंतर बाहेरून पूर्ण करत होतो. जेंव्हा मी माचीच्या बाहेरील बाजूस पोचलो तेंव्हा जे पहिले ते थक्क करणारे होते.




सुवेळा माचीची बाहेरील बाजू.. जणू राजगड सांगतोय, 'लढलो जरि, ना पडलो मी!'

जेंव्हा औरंगजेब खुद्द राजगडावर चालून आला तेंव्हा मुघलांनी सुवेळा माचीच्या बाजूने मोर्चे बांधून तोफांचे  प्रचंड हल्ले केले होते. खासा बादशाहा जातीने उभा राहून तोफा कुठे डागायच्या ते सांगत होता. त्याच्या खुणा आजही तिथे स्पष्ट दिसतात. ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांनी वीर पराक्रम केला. मराठ्यांनी तोफांचा असा काही प्रतिहल्ला केला कि खुद्द बादशाहा उभा असलेला धमधमा पडला आणि अर्थात औरंगजेब सुद्धा पडला होता. परंतु अखेरीस ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांना वीरमरण आले. तोफेचा गोळा लागून हा वीर मराठा धारातीर्थी पडला. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या जरा पुढे उजव्या हाताला असलेला गणपतीच्या जागी आधी संताजींची वीरगळ होती असे म्हणतात.


इकडे काहीवेळ उसंत घेतली आणि सुवेळा माचीला वळसा घालत. काळकाई बुरुजाच्या दिशेने निघालो. वाट अधिकच घसरत होती. जमेल तिथे हाताला जे सापडते ते पकडून पुढे सरकावे लागत होते. १० वाजून गेले होते आणि उन आता पाठीवर हल्लाबोल करत होते. कधी एकदा काळकाई बुरुजाच्या खालच्या गर्द झाडीत शिरतोय असे झाले होते. तिथे पोचायला तरी तासभर लागलाच. सावली मिळाल्यावर जरा निवांत बसलो. वर बघतो तर संस्थेचे काही कार्यकर्ते काळकाई बुरुजावरून दोराच्या सहाय्याने पाण्याचे ड्रम खाली पोचवत होते. कोणालाही उनाचा त्रास होऊ नये ह्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सुवेळा माचीला देखील त्यांनी असेच केले होते. हवे तितके पाणी प्यायचे आणि बाकी भरून घ्यायचे. आता आम्ही सावलीतून पुढे निघालो. इकडे २ ठिकाणी दोराच्या सह्हायाने खाली उतरायचे होते. खरेतर इतके कठीण नव्हते पण काहीजण नवखे असल्याने जास्त वेळ घेत होते. ज्यांना जमत नव्हते त्यांना धीर देत पुढे न्यावे लागे. पण महत्वाचे म्हणजे कोणी मागे हटत नव्हते. वेळ लागला तरी हे करायचेच आहे हा निर्धार प्रत्येकाने केलेला होता. इतक्या मोठ्या संखेने लोकांबरोबर ट्रेक करायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मी सुद्धा एकटाच ह्या ट्रेकला आलेलो होतो. मला थेट ओळखणारे असे कोणीही ह्या २२५ लोकांमध्ये नव्हते. तरी सुद्धा सर्वजण एकमेकांना सांभाळत, काळजी घेत ट्रेक करत पुढे सरकत होते. आमच्यात असणारा एकमेव समान दुवा म्हणजे शिवरायांवर असणारी निस्सीम भक्ती, आदर आणि देवतुल्य भावना. हा एक दुवा आमच्यात नवे बंध निर्माण करायला पुरेसा होता.


काळकाई बुरुजाच्या खालचा हा छोटासा टप्पा पार करायला चांगले २ तास लागले. वळसा मारून आता आम्ही संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. १२ वाजून गेले होते आणि पोटात भूक जाणवायला सुरवात झाली होती. उजव्या बाजूला वरती अळू दरवाजा आणि तिथून दोराच्या सह्हायाने खाली पाठवले जाणारे साहित्य पाहिले आणि खात्री पटली की चला जेवाय-जेवाय करायचे आहे. बरेच दिवसांनी वनभोजनाचा आनंद लुटला आणि जरा निवांत झालो. आता पुढची वाट बरीच सोपी होती. राजगडवरून तोरणाला ज्या वाटेने जातात तीच वाट आता घ्यायची. उजव्या बाजूला संजीवनी माचीचे दुहेरी संरक्षण बुरुज अगदी जवळ दिसत होते.




दुहेरी बुरूज संरक्षण... अद्वितीय तटबंदी... संजीवनी माची




संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले. ना कोणी करू शकेल. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. आम्ही आता एका बाजूचे ३ दुहेरी बुरुज बघत होतो. आत जाणे आत्ता शक्य नव्हते पण त्यासाठी मी उद्याचा दिवस हातात ठेवला होता. काही मिनिटात संजीवनी माचीला वळसा मारत पुन्हा राजगडाच्या राजमार्ग म्हणजे पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. वाट आता  होती आणि इथून संजीवनी माचीचे ३ टप्प्यात केलेले बांधकाम स्पष्ट दिसत होते.


संजीवनी माचीचे तीन टप्प्यांमधले घडीव देखणे बांधकाम!




 पाली दरवाजा- दुहेरी रचना!


वाटले नव्हते पण जेवून निघाल्यावर सुद्धा चांगले ३ तास लागले होते पाली दरवाज्यापर्यंत यायला. संजीवनी माचीची लांबी किती आहे ह्याचा प्रत्यय नेमका येत होता. गडाची प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. तब्बल ११ तास लागले होते प्रदक्षिणेला. पण एक इच्छा पूर्ण झाली होती. सूर्य पुन्हा एकदा निरोप द्यायला तयार झाला होता. मी पुन्हा राजमार्गाने गड चढून पद्मावती माचीकडे पोचलो आणि सदरेमागच्या तटबंदीवरून सूर्यास्त बघू लागलो.






दिवसा अखेरीस प्रदक्षिणा संपली असली तरी जेवणाआधी अजून एक कार्यक्रम बाकी होता. शिवरायांची पालखी नाचवायचा. पेटत्या मशाली, फडकणारे जरीपटके आणि मधोमध श्री शिवछत्रपतींची पालखी. वा!!!




ह्यापेक्षा अधिक उल्हासित करणारा सोहळा कुठला? आज संपूर्ण भरून पावलो. शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. गड पुन्हा एकदा जागा झाला होता. बऱ्याच काळाने शहारून उठला होता तो. आपली माणसे भेटली की जसा आपल्याला आनंद होतो तसा आनंद राजगडाला झालेला होता. बऱ्याच काळाने गड शांत झाला. सर्वजण पांगले. जेवणे आटोपली. निवांत पडले. पहाटे उठून पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचे होते ना.


मी सकाळी जरा उशिराने उठलो. सर्वांची आवरा-आवरी सुरु होती. सर्वत्र साफसफाई करून गड सोडायचा होता. आणि मग तिथून आपापल्या घरी. मी मात्र मागे थांबणार होतो. गड जरा उशिराने सोडायचा मी ठरवले होते. स्वतःचे सामान पाठीवर मारले, आप्पांना नमस्कार केला आणि निरोप घेऊन मी बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी बालेकिल्ल्याच्या दरवाजातून मला एक फोटो घ्यायचा होता.


 बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आतील बाजूने. समोर दिसतोय सुवेळा माचीचा विस्तार!



 


संजीवनी माची ... !


बालेकिल्ल्यावर एक धावती चक्कर मारली आणि उतरून संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. जमेल तितके पुढे जाऊन मला काही फोटो घ्यायचे होते.



मोजके फोटो घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. खरेतर दुहेरी बुरुजांपर्यंत जाऊन काही फोटो घ्यायचे होते पण ते शक्य झाले नाही. मी वळून पुन्हा पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. तिथे काही वेळ घालवून मी पुन्हा पद्मावती माचीकडे निघालो. खरेतर तिकडून उतरून वाजेघर मार्गे जाता आले असते पण मी पुन्हा गुंजवणे मार्गेच उतरायचा निर्णय घेतला. पद्मावती आईच्या मंदिरापाशी आलो. सर्वत्र सामसूम होती. सर्व निघून गेले होते. गडावर बहुदा मी एकटाच होतो. नाही म्हणायला एक कुत्रा समोर स्तंभापाशी बसला होता. मंदिरात जाऊन आईला नमस्कार केला. बाहेर येऊन उजव्या बाजूला पहिले तो बालेकिल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जरीपटका अजूनही डौलाने फडकत होता. नकळत एक हात छातीवर गेला. राजांचे स्मरण झाले. मी दोन्ही हाताने सॅक टाईट केली आणि झपाझप पावले टाकत परतीच्या वाटेला लागलो. चोर दरवाजाच्या पायऱ्या उतरायच्या आधी पुन्हा एकदा नजर मागे वळलीच. मनातच म्हणालो,"राजगडा... मी पुन्हा येणार आहे. लवकरच...


 हाच लेख यंदाच्या मायबोली हितगुज दिवाळी अंकात देखील प्रसिद्ध झालेला आहे.

Wednesday, 20 May 2009

भाग ५ - सप्त शिवपदस्पर्श ... !


किल्ले तोरणा ... एक भन्नाट अनुभव ... !

आज होता ट्रेकचा पाचवा दिवस. गेल्या ४ दिवसात ४ किल्ले सर करत आता आम्ही निघालो होतो 'किल्ले तोरणा' कड़े. सकाळी झटपट आवरून निघालो. संजीवनी माचीवरच्या आळू दरवाजामधून निघून थेट तोरणा गाठता येतो पण आम्हाला राजगडाच्या राजमार्गाने उतरायचे होते. त्यामुळे आम्ही पाली दरवाजा गाठला. शिवराय निर्मित दुर्गरचनेप्रमाणे ह्या महादरवाज्यामध्ये बाहेरच्या बाजूने प्रवेश केल्या-केल्या वाट पूर्ण डावीकड़े वळते. आता आम्ही आतून बाहेर जात होतो त्यामुळे वाट उजवीकड़े वळली. इकडे समोर देवडया आहेत. तर अलिकड़े उजव्या हाताला महादरवाजावर असणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे इकडे खालचा आणि वरचा असे २ मुख्य दरवाजे आहेत. वरच्या दरवाज्याच्या बुरुजावरुन खालचा दरवाजा आणि त्यापुढचा मार्ग पूर्णपणे टप्यात येइल अशी दुर्गरचना येथे आहे. आम्ही वरच्या दरवाजामधून बाहेर पडलो. हा राजमार्ग असल्याने ३ मि. म्हणजेच पालखी येइल इतका रुंद आहे. ५० एक पायऱ्या उतरलो की मार्ग आता उजवीकड़े वळतो आणि पुढे जाउन डावीकड़े वळसा घेउन अजून खाली उतरतो. आता इकडे आहे खालचा दरवाजा. ह्यावरचा बुरुज मात्र ढासळला आहे. ह्या दरवाजामधून बाहेर पडलो की आपण राजगडाच्या तटबंदीच्या बाहेर असतो. आता वाट उजवी-डावी करत-करत खाली उतरु लागते. नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हा पूर्ण मार्ग खालच्या दरवाजाच्यावर असणाऱ्या बुरुजाच्या टप्यात आहे. शिवाय बाले किल्ल्यावर असणाऱ्या उत्तरेकडच्या बुरुजावरुन सुद्धा ह्या मार्गावर थेट मारा करता येइल अशी ही वाट आहे. हा गडावर यायचा सर्वात सोपा मार्ग असल्याने ह्याला दुहेरी संरक्षण दिले गेले आहे. आम्ही तासाभरात खालच्या माळरानावर होतो. इकडे थोडी सपाटी आहे. बहुदा आता इथपर्यंत गाड़ी रस्ता होतो आहे. इकडून आपण थेट खाली उतरलो की 'वाजेघर' गाव आहे. संस्कृतमध्ये वाजिन म्हणजे घोड़ा (याशिवाय 'वाजिन' चे अजून काही समानअर्थी शब्द म्हणजे - शुर, धाडसी, योद्धा) शिवरायांचे घोडदळ ज्याठिकाणी असायचे तो भाग म्हणजे 'वाजिनघर' उर्फ़ 'वाजेघर'. आम्ही गावात न शिरता समोर दिसणाऱ्या ब्राह्मणखिंडीकड़े निघालो. वाटेमध्ये छोटे-छोटे पाडे आणि वाड्या लागत होत्या. त्यांच्याआधी आणि नंतर शेतीच शेती होती. मार्ग सपाट असल्याने भरभर पावले उचलत आम्ही खिंडीकड़े निघालो होतो. त्यात सुद्धा आमच्या गप्पा सुरूच होत्या. खास करून त्यात काल रात्रीचा जेवणाचा किस्सा अजूनसुद्धा चघळला जात होता. १० वाजून गेले होते. मध्येच खिंडी अलीकडे एके ठिकाणी काहीवेळ विश्रांतीकरता थांबलो. मागे वळून राजगडाकडे पाहिले तर डावीकडे पद्मावती माची, मध्ये बालेकिल्ला तर उजवीकड़े संजीवनी माची असे राजगडाचे सुंदर दृश्य दिसत होते. आता लक्ष्य होते तोरणा किल्ल्याचा पायथा, म्हणजेच वेल्हा. निघालो तसे काही वेळातच खिंड लागली. २० मिं. खिंडीमध्ये पोचलो. इकडे परत जरा दम घेतला. वेल्हा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ह्या वाटेवर तशी वर्दळ असते. त्यामुळे वाट चूकायचा सुद्धा काही फारसा प्रश्न नसतो. शिवाय आपण कुठे डोंगराच्या कोपऱ्यात नसून बऱ्यापैकी सपाटीला असतो. थोडावेळ विश्रांती घेउन आम्ही पुढे निघालो आणि खिंड उतरून तासाभरात वेल्ह्याला पोचलो. दुपारचे १ वाजत आले होते आणि गावात बरीच वर्दळ होती. आज लंच बनवायचा नव्हता म्हणुन आम्ही 'होटेल तोरणा विहार' मध्ये गेलो आणि जेवणाची आर्डर दिली. जेवण झाले तेंव्हा दुपारचे २ होउन गेले होते आणि आम्ही आता दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये किल्ले तोरणा चढणार होतो.




हॉटेलच्या समोर आणि उजव्या हाताला मामलेदार कचेरी आणि इतर सरकारी कार्यालये आहेत. तिकडेच उजव्या हाताने गावाबाहेर पडायचे आणि तोरण्याकड़े निघायचे. काहीवेळ वाट सपाटीवरुन जाते आणि मग डोंगर चढणीला लागते. एकामागुन एक टप्याटप्याने चढत जाणाऱ्या डोंगररांगा बघून कळते की ह्याला राजांनी 'प्रचंडगड' नाव का ठेवले असेल ते. खरचं कसला प्रचंड आहे हा किल्ला. आम्ही आता पहिल्या टप्याच्या चढणीला लागलो. ह्या टप्यामध्ये एक अशी सलग वाट नाही कारण एकतर ह्याभागात प्रचंड झाडे तोडली गेली आहेत. दुसरे असे की वरुन वाहून येणाऱ्या पाण्यामुळे नविन मार्ग बनले आहेत. शिवाय गुरांमुळे बनलेल्या वाटा वेगळ्याच. इकडे वाट शोधत वर जाण्यात बराच वेळ लागला. वरच्या सपाटीला पोचलो आणि कारवीच रान सुरु झाल. गावापासून निघून तास होउन गेला होता. आता सपाटी संपली आणि दुसऱ्या टप्याचा चढ सुरु झाला. ह्या चढावर पुरता दम निघाला. ३०-४० मिं. नंतर जेंव्हा चढ संपला तेंव्हा पाय पूर्ण भरून आले होते. घसा सुकला होता आणि ह्रुदयाचे ठोके गळ्याखाली जाणवत होते. खांदयावरची बैग उतरवली आणि तसाच खाली बसलो. अभि आणि हर्षदची काही वेगळी अवस्था नव्हती. आता मी ह्रुदयाचे ठोके मोजले तर ते १०० च्या आसपास भरले. म्हणजे अजून जरा वाढले असते तर तोरण्यावर पोचायच्या ऐवजी डायरेक्ट वरतीच पोचलो असतो. आमच्यापैकी कोणीच काही बोलत नव्हतो. १५ मिं. तिकडेच बसून होतो. पाणी प्यालो आणि ताजे-तवाने झालो. ४:३० होउन गेले होते. अजून दिड-दोन तासामध्ये वर पोचून राहायची जागा, पिण्याचे पाणी आणि सरपण म्हणजे सुकी लाकडे जमवायची होती. आता वेळ दडवण्यात अर्थ नव्हता. झटझट पुढे निघालो. तिसऱ्या टप्याचा चढ सुरु झाला. आता हा पार करेपर्यंत थांबायचे नाही असे ठरवुनच निघालो होतो. ५:३० च्या दरम्यान अगदी वरच्या सपाटीला लागलो. हूश्श्श्श... एक मोठा दम टाकला. आता ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत समोर अखंड तोरणा पसरला होता. पश्चिमेकड़े सूर्य मावळतीला सरकला होता आणि अजून सुद्धा गडाच्या दरवाजाचा पत्ता नव्हता. तोरण्याचा बिनीचा दरवाजा असा बांधला आहे की शेवटपर्यंत काही दिसत नाही. दिसतोय कसला अंदाज सुद्धा करता येत नाही की तो कुठे असेल. २-५ मिं. दम घेतला आणि सुसाट उजव्या बाजूने निघालो. आता वाट कडयाखालून पुढे सरकत होती. उजव्या हाताला खोल दरी तर डाव्या बाजूला उभा प्रस्तर. मध्येच एखादा झाडीचा टप्पा लागायचा. आमच सगळ लक्ष्य कडयाकडे होत. कधी तो दरवाजा दिसतोय अस झाल होत. अखेर काही वेळाने वाट डावीकडे वर सरकली आणि वरच्या टोकाला गडाचा दरवाजा दिसू लागला. ६ वाजून गेले होते आणि आम्ही कसेबसे गडामध्ये प्रवेश करत होतो. उभ्या खोदीव पायर्‍यांचा टप्पा पार केला आणि दरवाजामध्ये पोचलो. मी जाउन सर्वात वरच्या पायरीवर बसलो आणि सूर्यास्त बघायला लागलो. मागून अभी आणि हर्षद आले. काहीवेळाने आमच्या तिघांच्याही लक्ष्यात आल की अंधार पडत आला आहे. सूर्यास्त बघण्यात आम्ही इतके हरवून गेलो की आत जाउन राहायची जागा शोधायची आहे, पाणी शोधायचे आहे हे विसरूनच गेलो. उठलो आणि आतमध्ये शिरलो. आतमध्ये सर्वत्र रान मजले होते. उजव्या-डाव्या बाजूला तटबंदी दिसत होती. थोड पुढे डाव्या हाताला गडाची देवता तोरणजाईचे मंदिर दिसले. मंदिराची अवस्था बिकट होती. ह्याच ठिकाणी राजांना गुप्तधनाचा लाभ झाल्याचे जाणकार मानतात. ह्याच धनामधून राजांनी साकारला राजगड. लगेच पुढे थोडा चढ असून वर गेल्यावर मेंगजाईचे मंदिर आहे. मंदिरामध्ये पोहचेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. राहायची जागा तर लगेच सापडली होती. बघतो तर काय आतमध्ये डाव्याबाजूला खुप सारे सरपण पडले होते. आधी जे कोणी येथे राहून गेले असतील त्यांनी जमवून ठेवले असेल. त्यांना मनातल्या मनात धन्यवाद दिले. आता राहिला प्रश्न पाण्याचा. अभिने जवळचा नकाशा काढला आणि गडावर टाक्या कुठे-कुठे आहेत ते बघायला सुरवात केली. तोपर्यंत मी दोर आणि मोठ्या तोंडाची एक बाटली घेतली. आता आम्ही नकाशावर जवळच्या २ जागा नक्की केल्या आणि पाणी शोढायला निघालो. मंदिरापासून थोड़े पुढे गेलो की एक वाट उजवीकड़े वळते जी पुढे बुधला माचीकड़े जाते. इकडे डाव्या बाजूला पाण्याची २ टाकं आहेत. बघतो तर त्यावर एक झाड़ पूर्ण वाकले होते. टॉर्च मारून पाहिले तर पाणी थोड़े खाली होते. मी बाटली घेउन पूर्ण आत वाकलो आणि पाण्यापर्यंत पोचलो. आता आम्ही सगळ्या बाटल्या भरून घेतल्या. जेवण बनवायला आणि प्यायला पुरेस पाणी मिळाल्याने सकाळपर्यंत काही चिंता नव्हती. आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि जेवणाच्या तयारीला लागलो. कालचा हर्षदचा अनुभव बघता अभि त्याला बोलला,"थांब. आज मी बनवतो जेवण." हा.. हा.. जेवण बनवून खाल्ले आणि आवरून घेतले. राजगडाच्या पायथ्यापासून आमच्या सोबत असणारा वाघ्या कुत्रा फारतर वाजेघरनंतर आम्हाला सोडून परत जाइल असे वाटले होते पण हा पठ्या आमच्यासोबत तोरणापर्यंत सुद्धा आला.




तोरणा किल्ल्याबद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. त्यात सर्वात महत्वाचा म्हणजे 'स्वराज्याचे तोरण हा किल्ला जिंकून लावले म्हणुन याचे नाव तोरणा आहे' हा गैरसमज. शिवाय हा किल्ला लढाई करून जिंकला असाही. पण सध्या जो समज तोरण्याबाबतीत ट्रेकर्समध्ये आहे तो म्हणजे येथे चकवा मारतो किंवा गडावर किल्लेदाराचे भूत दिसते. ह्यामुळे गडावर कोणी फारसे रहत नाही. गडावरील एकमेव राहण्याची जागा असलेल्या मेंगजाईच्या मंदिराचे छप्पर अर्धे उडून गेले आहे.(हल्लीच ते नीट केले आहे असे ऐकले आहे.) देवीच्या मूर्तीवरती छप्पर आहे तर पुढच्या भागावर नाही. त्यामुळे रात्रभर पत्रे वाजत होते. मंदिराला २ दरवाजे असून एक समोर तर एक डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूचा दरवाजा आतून बंद होता तर समोरचा दरवाजा आम्ही आतून बंद करून घेतला होता. वाघ्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यात झोपला होता. त्यारात्री आम्ही झोपी गेलो तेंव्हा आम्हाला सुद्धा एक अनुभव आला.

(पुढे तुम्ही जे वाचणार आहात त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्हीच ठरवावे.) रात्री मध्येच अभिजित आणि हर्षद दोघांना सुद्धा एकसारखे स्वप्न पडले. दोघांनाही स्वप्नामध्ये मंदिरामध्ये आमच्या भोवती सगळीकड़े सापच साप फिरत आहेत असे दिसत होते. आत साप आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा सगळीकड़े सापच साप. छप्पराचे पत्रे प्रचंड जोरात वाजत होते. आता दोघांनाही कोणीतरी दार वाजवतय असे वाटले. त्या आवाजाने दोघांनाही जाग आली. अभि दरवाजा उघडून बघतो तर काय बाहेर कोणीच नाही. किर्र्र्रररर अंधारामध्ये काय दिसणार होते. तितक्यात हर्षदने उजेड पडावा म्हणुन तेलाचा टेंभा मोठा केला होता. दोघांनाही पडलेले स्वप्न एकच होते असे जेंव्हा त्यांना कळले तेंव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. इतका वेळ मी मात्र गाढ झोपेत होतो. दोघांनी मला उठवायचे कष्ट घेतले नाहीत. अभिने पूर्ण देवळामध्ये टॉर्च मारून साप वगैरे नाही ना अशी खात्री करून घेतली. कोपऱ्यात झोपलेला वाघ्या मात्र आता जागेवर नव्हता. नेमका काय सुरु आहे तेच त्या दोघांना कळेना. दोघेपण चुपचाप झोपून गेले. (अर्थात हे सगळ मला सकाळी उठल्यावर कळले.) आता माझी पाळी होती. काही वेळाने मला सुद्धा हेच स्वप्न पडले आणि ह्यापुढे जाउन तर एक सापाने माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दंश केला असे स्वप्नामध्ये दिसले. अंगठ्यावर दंश बसल्याच्या खऱ्याखुऱ्या जाणिवेने मी खाडकन जागा झालो. उशी खालची टॉर्च घेतली आणि पायावर लाइट मारला. सर्पदंशाचे २ दात कुठे दिसतात का ते बघायला लागलो. पूर्ण पाय तपासला. अगदी डावापाय सुद्धा तपासला. कुठेच काही नाही. आता मी मंदिरामध्ये टॉर्च फिरवली. बघतो तर काय माझ्यासमोरच्या भिंतीला एक पांधऱ्या रंगाची एक कुत्री बसली होती आणि ती माझ्याकडेच बघत होती. मी टॉर्च मारल्या-मारल्या तिचे डोळे असे काही चमकले की मी टॉर्च लगेच बंद केली. त्या कुट्ट अंधारामध्ये सुद्धा तिचा पांढरा रंग सपशेल उठून दिसत होता. मी अभि आणि हर्षदला उठवायच्या फंदात पडलो नाही. मी सुद्धा चुपचाप झोपी गेलो. सकाळी जेंव्हा आम्ही उठलो तेंव्हा माझी स्टोरी ऐकून हर्षद आणि अभिजित एकमेकांकड़े तोंड आ वासून बघत होते. आता त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली. आता तोंड आ वासायची वेळ माझी होती. मी सुद्धा त्यांच्याकड़े बघतच बसलो. सूर्योंदय कधीच झाला होता. आम्ही उठून बाहेर आलो आणि बघतो तर काय वाघ्या आणि त्याच्या बाजूला ती पांढरी कुत्री ऊन खात पडले होते. हा वाघ्या रात्रभर कुठे गेला होता काय माहीत. आम्ही आता नाश्त्याच्या तयारीला लागलो. कारण फटाफट किल्ला बघून आम्हाला गड सोडायचा होता. नाश्ता बनवून, खाउन मी भांडी घासायला गेलो तर समोरून ते 'श्री शिवप्रतिष्ठान' वाले येत होते. त्यांना नमस्कार केला आणि काल राहिलात कुठे असे विचारले. कळले की राजगड आणि तोरणाला जोड़णाऱ्या डोंगर रांगेवर एका वाडीत त्यांनी मुक्काम केला होता. जेंव्हा मी त्याला आम्ही इकडेच देवळामध्ये राहिलो असे सांगीतले तेंव्हा तो ओरडलाच. "काय्य्य... इकडे राहिलात??? काही दिसल का तुम्हाला???" मी त्याला आमची रात्रीची स्टोरी सांगीतली. आता आ वासायची पाळी त्यांची होती. आम्हाला आलेला अनुभव हा भन्नाट, विचित्र आणि मती गुंग करणारा होता. (तुम्हाला कोणाला असा काही अनुभव असेल तर तो जरूर कळवावा.) असो... त्यावर जास्त उहापोह करत न बसता आम्ही आवरून गडफेरीला निघालो. आज तोरण्यावरील शिवपदस्पर्श अनुभवायचा होता ...






क्रमश:

Monday, 18 May 2009

भाग ४ - सप्त शिवपदस्पर्श ... !


राजगड - दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ...

आज चौथ्या दिवशी आम्हाला निघायची काही घाई नव्हती. आज दिवसभर राजगड बघायचा होता. पण राजगडावरील सूर्योदय पहायचा होता म्हणुन लवकरच उठलो आणि सदरेवर गेलो. खरंतर बालेकिल्ल्याच्या दरवाजामध्ये जायचे होते पण उशीर झाला. सूर्योदय बघून परत आलो आणि मग सकाळच्या आवरा-आवरीला लागलो. नाश्ता बनवला आणि तयार होउन ८ वाजता बालेकिल्ला बघायला निघालो. राजसदनावरुन पुढे गेलो की वाट जराशी वर चढते. इथे उजव्या हाताला ढालकाठीचे निशाण आहे. अजून पुढे गेलो की २ वाट लागतात. उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघते. तर डावीकडची वाट बालेकिल्ला आणि पुढे जाउन सुवेळा माचीकड़े जाते. सकाळी बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघायचा प्लान असल्याने आम्ही डाव्याबाजूने निघालो. जसे बालेकिल्ल्याच्या कड्याखाली आलो तशी लगेच पद्मावती माची आणि सुवेळा माची यांच्यामध्ये असलेली आडवी तटबंदी लागली. येथील प्रवेशद्वार मात्र पडले आहे. उजव्या हाताला एक झाड़ आहे त्या पासून वर ७०-८० फूट प्रस्तरारोहण करत गेले की एक गुहा आहे. आम्ही मात्र तिकडे काही चढलो नाही. प्रवेशद्वारावरुन पुढे गेलो की परत २ वाटा लागतात. उजवीकडची वाट वर चढत बालेकिल्ल्याकड़े जाते. तर डावीकडची वाट गुंजवणे दरवाज्यावरुन पुढे सुवेळा माचीकड़े जाते. आम्ही आमचा मोर्चा आधी गुंजवणे दरवाज्याकड़े वळवला. येथील बरेच बांधकाम पडले आहे तर काही ढासळत्या अवस्थेत आहे. त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. पायऱ्या उतरुन खाली गेलो की दरवाजा आहे. दरवाजावरच्या बुरुजावर जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. पण शक्यतो जाऊ नये कारण बांधकाम ढासळत्या अवस्थेत आहे. आम्ही दरवाज्या मधून पुढे गेलो. ह्या वाटेने कोणीच खाली उतरत नाही किंवा चढून येत नाही कारण पुढची वाट मोडली आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही वाट वापरत होती हे आप्पा उर्फ़ गो.नी. दांडेकरांच्या 'दुर्ग भ्रमणगाथा' ह्या पुस्तकातून कळते. जमेल तितके पुढे जाउन आम्ही परत आलो. पायऱ्या चढून मागे आलो आणि बालेकिल्ल्याकड़े निघालो. ५ मिं. मध्ये बालेकिल्ल्याच्या पायर्‍यांखाली होतो. इकडे आल्यावर कळले की राजगडचा बालेकिल्ला का अभेद्य आहे ते. आधी पूर्ण उभ्या चढाच्या आणि मग उजवीकड़े वळून वर महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या अप्रतिमरित्या खोद्ल्या आहेत. त्या चढायला सोप्या नाहीत. हाताला आधार म्हणुन काही ठिकाणी लोखंडी शिगा रोवल्या आहेत. अखेर पायऱ्या चढून दरवाज्यापाशी पोचलो. उजव्या-डाव्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत. राजगडचा बालेकिल्ला हा अखंड प्रस्तर असून पूर्व बाजुस योग्य ठिकाणी उतार शोधून मार्ग बनवला गेला आहे. काय म्हणावे ह्या दुर्गबांधणीला... निव्वळ अप्रतिम ... !!! महादरवाजासमोर देवीचे मंदिर असून हल्लीच त्या मंदिराचे नुतनीकरण झाले आहे. असे म्हणतात की महादरवाजाच्या डाव्या बाजुच्या कोनाडयामध्ये अफझलखानाचे डोके पुरले गेले आहे. खरे की खोटे ते नाही माहीत. आता पुढे रस्ता उजवीकड़े वर चढतो आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जातो. इकडे उजव्या हाताने गेलो तर ब्रम्हर्षीचे मंदिर आहे. त्याशेजारी अतिशय स्वच्छ अशी पाण्याची २-३ टाकं आहेत. राजगडाचे मुळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. खरंतर ब्रम्हदेव ... बरुमदेव (गावठी भाषेत) ... आणि मग मुरुमदेव असे नाव अपभ्रंशित होत गेले असावे. राजगड हे नाव ठेवल शिवाजीराजांनी. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीचे मंदिर आणि त्याची पत्नी पद्मावती हिचे खाली माचीवर मंदिर हे संयुक्तिक वाटते. आम्ही आता उजव्या हाताने बालेकिल्ल्याला फेरी मारायला सुरवात केली. ब्रम्हर्षीच्या मंदिरासमोर कड्याला लागून जमीनीखाली एक खोली आहे. टाक आहे की गुहा ते काही आम्हाला कळले नाही. तिकडून दक्षिणेकड़े पुढे गेलो की उतार लागतो आणि मग शेवटी आहे बुरुज. त्यावरुन पद्मावती माचीचे सुंदर दृश्य दिसते. ह्या बुरुजाच्या डाव्या कोपऱ्यातून बाहेर पड़ायला एक चोर दरवाजा आहे. ती वाट बहुदा खालपर्यंत जाते पण तितकी स्पष्ट नसल्याने आम्ही फार पुढे सरकलो नाही. आता आम्ही डावीकड़े सरकलो आणि बालेकिल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोचलो. आता समोर दूरवर पसरली होती संजीवनी माची आणि त्या मागे दिसत होता प्रचंड 'जेसाजी कंक जलाशय'.


ह्या बुरुजापासून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यायला पुन्हा थोड़े वर चढावे लागते. ह्या मार्गावर आपल्याला दारूकोठार आणि अजून काही पाण्याची टाकं लागतात. एकडून वर चढून आलो की वाड्याचे बांधकाम आहे. हा गडाचा सर्वोच्च बिंदू. ह्याठिकाणी सुद्धा राहते वाड्यांचे जोते असून उजव्या कोपऱ्यामध्ये भिंती असलेले बांधकाम शिल्लक आहे. उत्तरेकडच्या भागात तटबंदीच्या काही कमानी शिल्लक असून तेथून सुवेळा माची आणि डूब्याचे सुंदर दृश्य दिसते. एव्हाना १० वाजत आले होते. आल्या वाटेने आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि सुवेळा माचीकड़े निघालो. इकडे मध्ये एक मारुतीची मूर्ति आहे. आता आपण पोचतो सुवेळा माचीच्या सपाटीवर. ह्याठिकाणी सुद्धा काही वाड्यांचे जोते असून ही स्वराज्याच्या लष्करी अधिकार्‍यांची घरे होती. तर प्रशासकीय अधिकार्‍यांची घरे पद्मावती माचीवर होती. पुढे निघालो तशी वाट निमुळती होत गेली आणि मग समोर जी टेकडी उभी असते तिला 'डूबा' म्हणतात. इकडे उजव्या बाजूला खाली 'काळकाईचा बुरुज' आहे. आम्ही त्या बाजुस न जाता पुढे निघालो. डूब्याला वळसा घालून झुंझार बुरुजापाशी पोचलो. अप्रतिम बांधणीचा हा बुरुज सुवेळा माचीला २ भागांमध्ये विभागतो. बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीच्या दुसऱ्या टप्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. म्हणजेच माचीचा टोकाचा भाग पडला तरी हा दरवाजा बंद करून झुंझार बुरुजावरुन शत्रुशी परत २ हात करता येतील अशी दुर्गरचना येथे केली आहे. थोड पुढे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक गणेशमूर्ति आहे. ह्या जागी आधी 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ होता असे म्हणतात. गडाच्या ह्या किल्लेदाराने मुघल फौजेवर असा काही मारा केला होता की मुघल फौजेची दाणादण उडालेली बघून खुद्द औरंगजेब हतबल झाला होता. त्या लढाईमध्ये एक तोफगोळा वर्मी लागुन संताजींचे निधन झाले. ज्या प्रस्तरावर झुंझार बुरुज बांधला आहे त्यास 'हत्ती प्रस्तर' असे म्हटले जाते कारण समोरून पाहिल्यास त्याचा आकार हत्ती सारखा दिसतो. ह्याच ठिकाणी आहे राजगडावरील नैसर्गिक नेढ़ (आरपार दगडामध्ये पडलेले भोक) उर्फ़ 'वाघाचा डोळा'. आम्ही तिकडे चढणार त्याआधी आमच्या सोबत असलेला वाघ्या तिकडे जाउन पोचला सुद्धा. ह्याठिकाणी कड्याच्या बाजूला मधाची पोळी आहेत त्यामुळे जास्त आरडा-ओरडा करू नये. काही वेळ एकडे थांबून आम्ही माचीच्या टोकाला गेलो. माचीचा हा भाग दुहेरी तटबंदी आणि शेवटी चिलखती बुरुज असलेला आहे. भक्कम तटबंदीच्या बुरुजावरुन सभोवताली पाहिले. उजव्या हाताला दुरवर 'बाजी पासलकर जलाशय' दिसतो. आता आम्ही परत फिरलो आणि आमचा मोर्चा काळकाई बुरुजाकड़े वळवला. ह्याठिकाणी उतरताना काही पाण्याची टाक आणि त्या शेजारी मुर्त्या लागतात. अगदी टोकाला बुरुज आहे आणि तिकडून खालचे गर्द रान दिसते. उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. आता आम्ही उजवीकडे सरकत संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण मातीचा आणि गवताचा घसारा इतका होता की प्रयत्न सोडून आम्ही पुन्हा आल्या मार्गी मंदिरामध्ये पोचलो. बघतो तर मंदिरामध्ये बरीच गर्दी होती. कळले की साताऱ्यावरुन 'श्री शिवप्रतिष्टान' चे ३०-४० कार्यकर्ते 'राजगड - तोरणा - रायगड' असा ट्रेक करण्यासाठी जमली होती. त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या. 'भेटूच पुढचे ३ दिवस' असे बोलून आमच्या तयारीला लागलो. जेवण बनवले, खाउन सगळे आवरून घेतले आणि 'संजीवनी माची' बघायला निघालो.



राजसदनावरुन पुढे जाउन उजव्या बाजूच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघलो. सुवेळा माची आणि संजीवनी माचीमधली तटबंदी लागली. त्यातले प्रवेशद्वार पार करून पुढे निघालो. आता वाट एकदम दाट झाडीमधून जाते आणि बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस निघते. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. मध्ये-मध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतारावर अनेक ठिकाणी जसे आणि जितके जमेल तितके पाणी जमवण्यासाठी टाक खोदलेली आढळतात. आता पुढे गेलो की एक बुरुज लागतो आणि त्या पुढे जायला उजव्या कोपऱ्यामधून दरवाजा आहे. गंमत म्हणजे ह्या बुरुजाच्या मागे लागुन एक खोली आहे. म्हणजे वरुन उघडी पण चारही बाजूने बंद अशी. आता नेमक प्रयोजन माहीत नाही पण बहुदा पाण्याचे टाके असावे. तोपची (तोफा डागणारे) तोफा डागल्यानंतर त्यात उड्या घेत असतील म्हणुन बुरुजाच्या इतके जवळ ते बांधले गेले असावे. असो.. आम्ही उजव्या हाताच्या दरवाजाने पुढे निघालो. माचीची पूर्ण उतरती तटबंदी आता आपल्या दोन्ही बाजुस असते. उजवीकडच्या जंग्यामध्ये लक्ष्यपूर्वक बघावे. (जंग्या - शत्रुवर नजर ठेवता यावी, तसेच निशाणा साधता यावा म्हणुन तटबंदीमध्ये असलेली भोके) एका जंग्यामधून खाली थेट दिसतो पुढच्या टप्याचा चोरदरवाजा. म्हणजेच पुढचा भाग जर शत्रुने ताब्यात घेतला तरी बारकूश्या चोरदरवाजा मधून शिरणाऱ्या शत्रुचे जास्तीत-जास्त सैनिक टिपता यावेत अशी दुर्गरचना येथे आहे. आम्ही तिघे आता अजून पुढे निघालो. दोन्ही बाजूला उतरती तटबंदी होती. काही वेळातच दुसऱ्या टप्याच्या बुरुजापाशी पोचलो. ह्याला 'व्याघ्रमुख' म्हणतात. येथे सुद्धा पहिल्या टप्यासारखीच दुर्गरचना. फरक इतकाच की तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्यामध्ये जाणारा दरवाजा हा डाव्या बाजूने आहे. ह्या दरवाजापासून लगेच पुढे डाव्या बाजूला आहे संजीवनी माचीचा 'आळू दरवाजा'. इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार असणाऱ्या तटबंदीमुळे आळू दरवाज्याचा बाहेरचा दरवाजा आतून दिसत नाही तर बाहेरून आतला दरवाजा सुद्धा दिसत नाही. सकाळपासून दुर्गबांधणी मधले एक-एक अविष्कार पाहून आम्ही पुरते भारावलो होतो. आमच्या कडून भन्नाट रे ... सहीच.. मानला रे... अश्या कॉमेंट्स येत होत्या. पण आम्हाला ठाउक कुठे होते की ह्यापुढे अजून जबरदस्त अशी दुर्गरचना आपल्याला बघायला मिळणार आहे. संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल.. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. मूळात गडाचा हा भाग तसा शत्रूला चढून यायला सर्वात सोपा म्हणुनच या ठिकाणची दुर्गबांधणी अतिशय चपखलपणे केली गेली आहे. दुहेरी तटबंदीमधली आतली तटबंदी मीटरभर जाड आहे. मध्ये एक माणूस उभा आत जाइल इतकी किंवा त्यापेक्षा थोडी मोठी जागा सोडली की बाहेरची तटबंदी आहे. बाहेरची तटबंदी सुद्धा मीटरभर जाड आहे. तिसऱ्या टप्यामधली ही दुहेरी तटबंदी शेवटपर्यंत इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार आहे. ह्यात टप्याटप्यावर खाली उतरणारे दुहेरी बुरुज आहेत. म्हणजे दुहेरी तटबंदीवर एक बुरुज आणि त्याखालच्या दरवाजा मधून तीव्र उताराच्या २०-२५ पायऱ्या उतरून गेल की खालचा बुरुज. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायर्‍यांसाठी दरवाजामधून प्रवेश केला की डाव्या-उजव्या बाजूला बघावे. दुहेरी तटबंदी मधल्या वक्राकर मोकळ्या जागेमध्ये येथून प्रवेश करता येतो. इतकी वर्ष साफ-सफाई न झाल्यामुळे आता आतमध्ये रान माजले आहे. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या अक्षरशः सरळसोट खाली उतरतात. आता झाडी वाढल्यामुळे आत अंधार असतो त्यामुळे आत घुसायचे तर टॉर्च घेउन जावे. आम्ही तिघेपण थोडा उजेड बघून अश्याच एका बुरुजामध्ये खालपर्यंत उतरलो. उतरताना लक्ष्यात आले की पायऱ्या सरळ रेषेत नाही आहेत. त्यासुद्धा वक्राकर. जेंव्हा पूर्ण खाली उतरून गेलो तेंव्हा खालच्या बुरुजाकड़े बाहेर निघणारा दरवाजा दिसला. तो जेमतेम फुट-दिडफुट उंचीचा होता. म्हणजे बाहेर निघायचे तर पूर्णपणे झोपून घसपटत-घसपटत जावे लागत होते. हूश्श्श... एकदाचे तिकडून बाहेर पडलो आणि खालच्या बुरुजावर निघालो. आता आम्ही दुहेरी तटबंदीच्या सुद्धा बाहेर होतो. कसली भन्नाट दुर्गरचना आहे ही. शत्रुने जर हल्ला करून खालचा बुरुज जिंकला तरी आत घुसताना शत्रूला झोपून घसपटत-घसपटत आत यावे लागणार. त्यात ते काय शस्त्र चालवणार आणि काय लढणार. अगदी आत आलेच तरी लगेच पुढे वक्राकर आणि सरळसोट वर चढणाऱ्या पायऱ्या. बरे तिकडून सुद्धा शत्रु पुढे आलाच तर दुहेरी तटबंदीमधल्या आतल्या तटबंदीचा दरवाजा बंद करून घेतला की शत्रु सैन्याला पर्याय राहतो तो फ़क्त उजवीकड़े किंवा डावीकड़े जाण्याचा म्हणजेच दुहेरी तटबंदीमधल्या मोकळ्या वक्राकर जागेमध्ये शिरायचा. आता ह्यात शिरणे म्हणजे जिवंत सुटणे नाही. कारण एकतर वर चढून येणे शक्य नाही आणि वरुन आपण गरम तेल, पाणी, बाण, भाले अश्या कशाने सुद्धा शत्रूला लक्ष्य करू शकतो. ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्युच. आम्ही पुन्हा पायऱ्याचढून आतमध्ये आलो आणि शेवटच्या बुरुजाकड़े निघालो. अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत. अखेर पूर्ण माचीबघून आम्ही टोकाला चिलखती बुरुजाकड़े पोचलो. ६ वाजत आले होते. डाव्या बाजूस अथांग येसाजी कंक जलाशय होता. तर उजव्या हाताला दुरवर तोरणा उभा होता. त्यास मनातच म्हटले... 'उदया येतोय रे तुझ्याकड़े'. काहीवेळ तिकडेच बसलो. मागे दूरवर बालेकिल्ला आणि पद्मावती माची दिसत होती. आज राजगड बघून आम्ही भरून पावलो होतो. खरच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी राजगडला यावे आणि असे भरभरून बघावे. सूर्य अस्तात जात होता. आम्ही आमची पावले पुन्हा एकदा देवळाकड़े वळवली. भराभर पावले टाकत आळू दरवाजा पार केला आणि मग वरच्या टप्यावर येत बालेकिल्ल्याला भिडलो. कडयाखाउन येतायेताच पूर्ण अंधार पडला होता. आम्ही देवळाकड़े पोचलो तेंव्हा ७ वाजत आले होते. मंदिराच्या पायरीवर येउन बसलो. आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. मस्तपैकी पुलाव आणि खीर असा बेत केला होता. पण जेवण बनवताना हर्षदकडून पुलावमध्ये चुकून रॉकेल पडले. हा हा ... त्याचे झाले असे की हा आपला बघतोय झाकण उचलून की भात शिजला आहे की नाही ते आणि बघताना उजेड हवा म्हणुन रॉकेलचा दिवा ठेवलाय झाकणावर. मग काय पडला ना तो आतमध्ये. आधी आम्हाला काही बोललाच नाही तो आम्हाला. पण नंतर सांगतो कसा,"जरा गडबड झाली आहे. भात परत बनवावा लागेल." मग आम्हाला सगळी स्टोरी सांगितली. आता भात परत लावला. खीर बनवली आणि मस्तपैकी जेवलो. जेवताना आणि त्यानंतर पण अभि हर्षदला सुनवतच होता की 'बघ तुझ्याकड़े एक रिसोर्स कमी असल्याने हे असे घडले'. हर्षद त्यावर त्याची बाजु मांडत होता आणि मी मध्येच माझी टिप्पणी देत होतो. दूसरीकड़े टाकुन दिलेला भात वाघ्याने कधीच खाल्ला होता. नशीब त्याला काही झाले नाही. चर्चा, वाद-संवाद, भांडण तुम्ही काय म्हणाल ते करत आम्ही चौथ्या दिवशी झोपी गेलो. अत्यंत महत्वाचा असा शिवपदस्पर्श आज अनुभवला होता. आता उदया लक्ष्य होते किल्ले तोरणा उर्फ़ प्रचंडगड ...




क्रमश:
नोंद : काही छायाचित्रे (हिरवीगार) आमच्या वेळच्या ट्रेकची असून काही मात्र माझ्या नंतरच्या ट्रेकच्या वेळची आहेत.

Friday, 15 May 2009

भाग ३ - सप्त शिवपदस्पर्श ... !


आज होता ट्रेकचा तिसरा दिवस... आज अगदी लवकरच उठलो आणि पोहे आणि चहा असा नाश्ता बनवला. खाउन सगळे आटोपले आणि राजगडाकड़े कूच करायला तयार झालो. गावाबाहेर पडलो तशी शेती लागली. सगळीकड़े भात शेती दिसत होती. बांधा-बांधावरुन वाट काढत आम्ही नदीच्या दिशेने सरकत होतो. एके ठिकाणी झाडावर ५०-६० सुगरणीचे खोपे दिसले. अगदी हाताला लागतील इतके खाली. आख्खे झाड़ खोप्यांनी लगडलेले होते. ते बघत-बघत पुढे सरकतोय तोच माझा डावा पाय एका बांधावरुन सरकला आणि मी डाव्या बाजूवर जोरात पडलो. लागले काहीच नाही पण आख्खी डावी बाजू चिखलाने माखून निघाली. ह्या ट्रेकला आम्ही कोण किती सरकते - कोण किती पड़ते ते मोजायचे ठरवले होते त्यामुळे मी आता लीडिंग रन स्कोरर होतो. हा.. हा.. काही वेळातच आम्ही नदीकिनारी येउन पोचलो. नदीला कमरेच्या थोड़े खालपर्यंत पाणी होते. काही मिनिट्स मध्ये आम्ही नदीच्या त्यापार होतो. आता आम्ही विंझर गावामध्ये पोचलो होतो. गावत दुकाने आहेत. कोणाला काही सामान घ्यायचे असल्यास हे ठिकाण उत्तम आहे. तिथून डांबरी रस्त्यावरुन राजगडाच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणे गावाकड़े निघालो. ९ वाजत आले होते. गुंजवणे गावापासून राजगड चढायला सुरवात केली. लक्ष्य होते पद्मावती माचीवर निघणारा चोर दरवाजा. डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ आणि झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसत होते. आम्ही राजगडला पहिल्यांदाच येत होतो त्यामुळे ते दृश्य पाहून मी पुरता भारावलो होतो. आता आम्ही गावापासून चढायला सुरवात केली. काही वेळामध्ये एके ठिकाणी दम घेण्यासाठी बसलो. तितक्यात कुठूनसा एक कुत्रा आला आणि आमच्याभोवती घोटाळायला लागला. जसे आम्ही पुढे निघालो तसा तो पण आमच्यासोबत निघाला. काही वेळामध्ये पहिला चढ चढून गेलो की काहीवेळ सपाटी लागते. ह्या सपाटीवरुन समोरचा पूर्ण चढ आणि वरपर्यंतची वाट दिसते. आता इथून चढ सुरु झाला की वळणा-वळणाची खड्या चढणीची वाट आहे. कुठेही सपाटी नाही. एक लक्ष्यात घ्यायला हवे की हा राजगडचा राजमार्ग नसून चोरवाट आहे त्यामुळे वेळ कमी लागत असेल तरी पुरता दम काढते. अगदी सावकाश गेलो तरी तास- दिड तासामध्ये आपण कड्याखाली असतो. इकडून वाट आता गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याठिकाणी एक छोटेसे पाण्याचे टाक आहे. येथपासून ६० फुट वरती तटबंदीमध्ये चोरदरवाजा बांधला आहे. वर जाईपर्यंत सर्व कोरीव पायऱ्या आहेत. हा टप्पा तसा सोपा आहे त्यामुळे कसलेल्या ट्रेकरला काहीच प्रश्न यायला नको. नवशिके आणि इतर लोकांना चढायला सोपे पडावे म्हणुन उजव्या हाताला रेलिंग बांढलेली आहे. ५ मिं. मध्ये हा टप्पा पार करून ३-४ फुट उंचीच्या आणि तितक्याच रुंद अश्या छोट्याश्या दिंडीमधून गडामध्ये प्रवेश करते झालो. आत गेल्या-गेल्या वाट ९० अंशात डावीकड़े वळते आणि लगेच १०-१५ पायऱ्या चढून वर जाते. आपण वर येतो ते थेट पद्मावती तलावासमोर. तलावाच्या डाव्याबाजूला काही पडके बांधकाम आहे. आधी ही बहूदा राहती घरे असावीत. अजून थोड़े वर चढून गेलो की हल्लीच बांधलेले विश्रामगृह लागते. ह्यामध्ये ३० जण सहज राहू शकतात. आम्ही मात्र पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये राहणार होतो. ह्या देवळामध्ये सुद्धा ५० एकजण सहज राहू शकतात. आम्ही वर पोहचेपर्यंत १२ वाजत आले होते. बॅग्स देवळामध्ये ठेवल्या आणि देवीचे दर्शन घेतले. आता आज आणि उद्यापण निवांतपणा होता. राजगडाच्या तिनही माच्या आणि बालेकिल्ला आरामात बघून मगच आम्ही गड सोडणार होतो. आज फ़क्त पद्मावती माचीचा विस्तार बघायचा होता. त्याआधी मात्र आम्ही देवळाबाहेर चुल मांडली, २ दिवस पुरतील इतकी सुकी लाकडे गोळा केली आणि दुपारचे जेवण बनवायला घेतले. देवळाच्या डाव्या बाजूला २ पाण्याची टाकं आहेत. त्यामधले पाणी पिण्यायोग्य आहे. दुपारी जेवण झाल्यावर मात्र आम्ही पद्मावती माची बघायला निघालो.






राजगड म्हणजे स्वराज्याची पाहिली राजधानी. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे. प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला 'पाली दरवाजा', जो राजगडचा राजमार्ग देखील आहे. संजीवनी माचीला 'अळू दरवाजा' तर सुवेळा माचीला गुंजवणे दरवाजा, जो सध्या बंद स्थितिमध्ये आहे. शिवाय प्रत्येक माचीला स्वतंत्र चोर दरवाजे आहेत. पद्मावती माचीच्या चोर दरवाजामधून तर आम्ही गडावर चढून आलो होतो. संजीवनी माची आणि सुवेळा माचीकड़े आम्ही उदया जाणार होतो. आम्ही आता पद्मावती माची बघायला निघालो. पद्मावती माचीचा विस्तार हा इतर दोन्ही माच्यांच्या मानाने कमी लांबीचा पण जास्त रुंद आहे. माची ३ छोट्या टप्यात उतरत असली तरी गडावरील जास्तीतजास्त सपाटी ह्याच माचीवर आहे. सर्वात खालच्या टप्यामध्ये पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा आहे. मधल्या टप्यामध्ये विश्रामगृह, शंकर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. शिवाय देवळासमोर एक तोफ आणि एक समाधी आहे (ही समाधी राजांची थोरली पत्नी 'महाराणी सईबाई' यांची आहे असे म्हटले जाते. ५ सप्टेंबर १६५९ रोजी त्यांचा राजगडावर किंवा पायथ्याला मृत्यू झाला होता.) देवळासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक स्तंभ आहे. विश्रामगृहापासून डावीकडे म्हणजेच माचीच्या पूर्व भागात गेल्यास अधिक सपाटी आहे. टोकाला तटबंदी असून एक भक्कम बुरुज आहे. येथून पूर्वेला सुवेळामाचीचे तर पश्चिमेला गुंजवणे गावापासून येणाऱ्या वाटेचे सुंदर दर्शन होते. माचीवर सर्वात वरच्या टप्प्यामध्ये राजसदन, राजदरबार, सदर, दारूकोठार, पाण्याचा एक तलाव अशी बांधकामे आहेत. ज्याठिकाणी आता सदर आहे त्याखाली काही वर्षांपूर्वी एक गुप्त खोली सापडली. आधी ते पाण्याचे टाके असावे असे वाटले होते पण तो खलबतखाना निघाला. ७-८ अति महत्वाच्या व्यक्ति आत बसून खलबत करू शकतील इतका तो मोठा आहे. त्या मागे असलेल्या राजसदनामध्ये राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये... त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटी सारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणुन तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे. इतका वेळ इतिहासावर गप्पा मारत आम्ही तिघेजण राजसदनाच्या मागे तटबंदीवर बसलो होतो. सूर्यास्त होत आला होता. आम्ही परत फिरून देवळाकड़े निघालो. जेवणाची तयारी करत-करत परत गप्पा मारू लागलो. पायथ्यापासून आमच्या सोबत आलेला कुत्रा अजून सुद्धा आमच्या सोबत होता. एव्हाना अभिने त्याला 'वाघ्या' असे नाव सुद्धा ठेवले होते. आम्ही जेवण झाल्यावर त्याला सुद्धा थोड़े खायला दिले. रात्री देवळामध्ये झोपायच्या ऐवजी देवळाबाहेर झोपायचे आम्ही ठरवले. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही राजगडावरील निरव रात्र अनुभवणार होतो. दिवसभराच्या भटकंतीनंतर शांत झोप लागली. आता उदया सकाळी लवकर उठून राजगडावरील सूर्योदय पहायचा होता...


क्रमश: