Friday, 10 July 2009

भाग ३ - राजमाची बाइक ट्रिप ... !


(खरं तरं इतकी मोठी ट्रिप नव्हती की मी ३ भागात लिहावी. पण परवा काही केल्या भाग २ पूर्णपणे अपलोड होइना मग अर्धा भाग पब्लिश केला. फोटो अपलोड व्हायचे तर दुरच राहिले. :( असो आता ह्या भागात सुद्धा फोटो नाही टाकता आले तर त्यासाठी सेपरेट भाग टाकिन.. कारण फोटो शिवाय ट्रेक ब्लॉगला मज्जा येत नाही ना... )

गिताताईकड़े पोचलो तर वरण-भात, चवळीची भाजी आणि तांदळाची भाकरी, लोणचे-पापड़ असे मस्त जेवण तयार होते. निवांतपणे दुपारचे जेवण आटपून आता परतीच्या मार्गाला लागायचे होते. ३ वाजत आले होते. ३ च्या आसपास आवरून निघालो आणि अवघ्या काही मिं. मध्ये गावापासून १ की.मी. जातो तोच अमोलच्या गाडीचे मागचे चाक पंक्चर झाल्याचा मला कॉल आला. आता आली का परत पंचाइत. एक तर अमेय, संजू पुढे निघून गेले होते. मी हर्षद आणि कविताला पुढे खलीता देउन पुढे धाडले आणि पुन्हा मागे फिरून अमोलकड़े निघालो. अभि सर्वात मागे होता त्यामुळे तो तोपर्यंत चाक काढून स्वतःच्या गाड़ीवर अमोल सोबत खंडाळ्याला जायला निघाला. मागे फ़क्त मनाली आणि दिपाली थांबल्या होत्या त्यामुळे मला आणि ऐश्वर्याला त्यांच्या बरोबर मागे थांबायचे होते. आता अभिला परत यायला किमान २ तास तरी लागणार होते. त्यामुळे मी सरळ दोन्ही स्लीपिंग बॅग्स काढल्या आणि रस्त्याबाजुच्या गवतामध्ये पसरून सरळ लोळण घेतली. पाउस काही पडायचा नव्हता त्यामुळे चिंता नव्हती. पण शांतपणे बसतील त्या ऐश्वर्या - दिपाली कसल्या ना. दोघींना बाजुच्या एका झाडावर करवंदे दिसली. मग काय सुरु ना 'मिशन करवंदे'... हा ... हा ... एक पिशवी घेतली आणि एक झाड़.. मग दुसरे झाड़ .. मग तिसरे असे प्रत्येक झाडाकडून हप्ता वसूली करत - करत १० मिं. मध्ये त्या दूर पोचल्या. नंतर तर दिशेनाश्याच झाल्या. २० मिं. नंतर पिशवी भरून करवंदे घेउन आल्या. बऱ्याच दिवसांनी असा रानमेवा मिळाला होता. मग काय मी आणि मनालीने सुद्धा मांडली ना बैठक आणि मस्तपैकी करवंदे हाणली.

तास कसा निघून गेला काही कळलेच नाही. ५ च्या आसपास अभ्याचा फोन आला की चाक दुरुस्त करून ते निघाले आहेत. तासाच्या आत पोचतील. म्हणजे ६ वाजणारचं होते. तो येईपर्यंत काय करायचे ह्या विचारात होतो तोच पावसाची एक सर आली. सगळे सामान तसेच उचलले आणि बाजुच्या झाडीमध्ये पळालो. तिकडे बघतो तर काय... अजून करवंदाची झाडे. मग काय वेळ सत्कारणी लावायला नको का.. पुन्हा एकदा 'मिशन करवंदे - पार्ट २' सुरु झाले. ६ च्या आसपास अभि आणि अमोल येउन पोचले. पुन्हा गाड़ीला चाक लावले आणि ६ वाजता तिकडून निघालो. अमेय, संजू, आदित्य, पूनम, कविता, हर्षद हे बाकी सगळे कधीच हायवेला जाउन पोचले होते. निघताना त्यांना एक फोन केला आणि निघल्याची वर्दी दिली. आता अंधार पडायच्या आत जास्तीत जास्त अंतर कापून हायवेच्या जवळ जाउन पोचायचे होते. ७ वाजून गेले होते आणि पुन्हा एकदा नाइट रायडिंग सुरु झाले होते. सर्वात पुढे अभि - मनाली, मध्ये अमोल - दिपाली आणि सर्वात मागे मी आणि ऐश्वर्या. अखेर ७:३० च्या आसपास हायवेला पोचलो. सॉलिड भूक लागली होती. त्यामुले खंडाळ्याला काहीतरी खाउन मगच पुढे निघायचे असे ठरले. अमेय, संजू, कविता असे काहीजण पुढे निघून गेले होते कारण त्यांना घरी पोचायला बराचं उशीर झाला असता. खाउन निघालो तेंव्हा ८ वाजून गेले होते. आता मी आणि हर्षद, ऐश्वर्या आणि पूनमला कर्जत मार्गे घरी सोडून घरी जाणार होतो. सोबत आदित्य - श्रीजिश होतेच. तर अभि - मनाली, अमोल -दिपाली थेट पनवेल मार्गे घरी पोचणार होते. खंडाळ्याच्या होटेलमध्ये एकमेकांचा निरोप घेतला आणि ''घरी पोचलात की कळवा रे'' ... असे बोलून बाइकवर टांग मारली आणि घराकड़े निघालो. लडाखला बाइकने जाताना बाइकला काय-काय होऊ शकते. सगळ्या रायडर्समध्ये ताळमेळ किती गरजेचा आहे हे एका ट्रिपमध्ये लक्ष्यात आले होते. अजून १-२ ट्रिप्स होणे गरजेचे आहे हे सुद्धा लक्ष्यात आले होते. त्या ट्रिप्सचे प्लानिंग करत करतच मी १२ च्या आसपास घरी पोचलो ... थोड्या अडचणी आल्या खऱ्या पण लडाखची तयारी खऱ्या अर्थाने सुरु झाली होती... एकदम जबरदस्त ... !!!

2 comments:

  1. मिशन करवंदे, मस्त. True, लडाखची तयारी करताना फार गोष्टींचा विचार करायला लागणार. I am sure, तुम्हाला खूप मजा येईल.

    ReplyDelete
  2. होय ... आता अवघे २५ दिवस बाकी आहेत. इकडून मुंबईला परत गेलो की निघणार लगेच ... माझी बाकीची टीम इतर तयारी करते आहे सध्या ... मी पुढची बाइक ट्रिप मिस करणार आहे. :(

    ReplyDelete