Tuesday 31 March 2009

भाग २ - रतनगड़ ... !

रात्री १२ नंतर तो ११ वा जण हालचाल करू लागला. दूडूदूडू त्या गुहेमध्ये धावायला लागला. दिसत मात्र नव्हता. अखेर काही वेळानी खिर ठेवलेल्या टोपाचा आवाज आला. राजेशने त्या दिशेने टॉर्च मारला. मस्तपैकी टोपाच्या काठावर बसून खिर खाणारा तो उंदीर आता आम्हाला दिसला. अंगावर प्रकाश पडल्यामुळे उंदीर आता पळापळ करू लागला होता. तिकडून तो जो पळाला तो थेट मयूरच्या अंगावरून विदुलाच्या अंगावर. आता विदुला अशी काही ओरडली की आख्खा गड जागा झाला असता. तिने उंदराला जो उडवला तो थेट माझ्या उजव्या पायावर येऊन पडला. मी काही करायच्या आत तो पसार झाला. नंतर काही तो आम्हाला दिसला नाही. आता निवांतपणे झोपायला काही हरकत नव्हती. आम्ही सकाळी उठलो तेंव्हा ७ वाजत आले होते. पाउस बाहेर कोसळतच होता. गडावर सगळीकड़े धुके पसरले होते. समोर ५ फूटांवरचे सुद्धा काही दिसत नव्हते. आम्ही अखेर परत निघायचे ठरवले. आवराआवरी केली, चहा बनवला आणि पुन्हा परतीच्या मार्गावर निघालो. पुन्हा एकदा गडाचा दरवाजा आणि त्या खालचा निमूळता भाग सावकाश उतरून फाटक्या शिडीकडे पोचलो. पुन्हा तीच कसरत. ह्यावेळी जास्त काळजी कारण आता उतरत होतो. एक-एक करून आम्ही दोन्ही शिड्या उतरून खाली आलो आणि डोंगर उतरायला लागलो. आता रस्ता चुकायचा प्रश्न नव्हता. उतरायचा वेग सुद्धा चांगला होता. पण आता काळजी होती ती प्रवरा नदीच्या प्रवाहाची.




अर्ध्याअधिक अंतर पार करून आम्ही खालपर्यंत येउन पोचलो होतो. प्रवरानदीचा घोंघावणारा आवाज दूरपर्यंत ऐकू येत होता. गेल्या २ दिवसात झालेल्या पावसाने नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते. मात्र प्रवाह जेंव्हा समोर येउन उभा ठाकला, तेंव्हा मात्र आम्ही थक्कच झालो. कारण प्रथमदर्शनी तो पार करून जाणे अशक्य वाटत होते. मागे फिरने सुद्धा शक्य नव्हते. अखेर थोड़े पुढे सरकून प्रवाह पार करायला योग्य जागा शोधली. पात्र तसे जास्त मोठे नव्हते पण पाण्याला प्रचंड वेग होता. कारण पाण्यात पाय टाकल्या-टाकल्या मला ते जाणवले. ह्या आधी सुद्धा आम्ही उधाणलेली उल्हासनदी २-३ वेळा पार केली आहे पण हे प्रकरण सोपे असणार नाही ह्याची जाणीव आम्हाला आली होती. १५ मीटर रुंद पात्राच्या बरोबर मध्ये एक झाड़ आणि त्याखाली थोडी उथळ जमीन होती. आधी तिथपर्यंत जायचे असे मी ठरवले होते. माझ्या मागे राजेश होताच. आमच्या जड सॅक्स घेउन आम्ही त्या प्रवाहात शिरलो खरे पण त्या फोर्सने वाहुन जायला लागलो. कसेबसे स्वतःला सावरले आणि थोड़े बाहेर आलो. ह्यावेळी अधिक जोमाने आत शिरलो आणि जोर लावून पुढे सरकायचा पर्यंत करू लागलो. एक-एक पाउल टाकायला खुप वेळ लागत होता. पण विनाकारण घाई करायची नाही असे आम्ही ठरवले होते. इतका वेळ मागे उभे राहून बाकी सगळे आमची प्रत्येक हालचाल बघत होते. विदुलाच्या डोळ्यात तर आता आपण इकडेच अडकलो असे भाव होते. शेवटी अथक प्रयत्न करून काही मिनिटांनी मी आणि राजेश त्या उथळ जागेमध्ये पोचलो. आता हातांची साखळी करून एकेकाला ह्या साइडला आणणे गरजेचे होते. ह्या सगळ्या मध्ये बराच वेळ गेला. अखेर एक-एक करून सर्वजण मध्ये येउन उभे राहिलो. काही फोटो टिपावेत असे वाटत होते, पण प्रसंग बघता तिकडून लवकरात लवकर बाहेर पडणे गरजेचे होते. पुढचा ७-८ मीटरचा प्रवाह भलताच वेगात होता. पाय टाकल्या-टाकल्या मी सरकून पुढे जात होतो. मागून राजेशचा आधार घेत-घेत मी पुढे सरकत होतो. अचानक राजेशचा तोल गेला. प्रवाह बरोबर तो वाहून जायला लागला. मी फार काही करू शकत नव्हतो. मी आधार घेत असलेल्या हातानेच त्याला थोडा आधार दिला. हुश्श्श्श्श ... दोघे पण स्थिर झालो.



वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे पाय चांगलेच भरून आले होते. ह्या ठिकाणी अजून काही वेळात मी टिकणार नाही हे समजायला लागले होते. आता उरलेला टप्पा लवकर पार करणे गरजेचे होते. पुढच्या ७-८ मीटरच्या टप्यात बरोबर मधोमध एक पक्की जागा मिळवून तिकडे काही वेळ ठाण मांडून बसायचे (म्हणजे उभे राहायचे) असे मी ठरवले होते. त्याशिवाय सगळ्यांना ह्या बाजूला आणणे शक्य झाले नसते. पुन्हा राजेशचा आधार घेत पायाखाली दगड चाचपडत हळूहळू मी पुढे सरकलो. पाणी सारखे मागे लोटत होते. एके ठिकाणी मला हवी तशी जागा सापडली. तिकडेच पाय घट्ट रोवून उभा राहिलो. आता वेळ दवडून उपयोग नव्हता. मी राजेशला पुढे सरकायला सांगितले आणि अभि आता राजेशच्या जागी येउन उभा राहिला. आता राहिलेला प्रत्येक जण आधी अभि, मग मी आणि शेवटी राजेश अश्या साखळीमधून पार जाणार होता. एक-एक जण आता मानवीसाखळी करत प्रवाह पार करू लागले. पहिली विदूला आली पण ती थोडी घाबरलेली वाटत होती. मी तिला मजेत म्हटल "काळजी करू नकोस.. आम्ही तूला सोडून जाणार नाही. जाऊ तर घेउनच ... " तिने पहिला पाय पाण्यात टाकला आणि ती पाण्यामध्ये वाहुन जायला लागली. तिला उभे सुद्धा राहता येइना. शेवटी मला माझी जागा सोडून मागे सरकावे लागले आणि तिला थोडा आधार द्यावा लागला. अखेर ती हळूहळू सरकत सरकत राजेशपर्यंत पोचली. आता त्या मागुन मग दिपाली, अमृता, मयूर, कविता, अमेय, मनाली असे एका मागुन एक जण पार करून राजेशकड़े पोचले. अभि सुद्धा पुढे सरकला. आता मीच तेवढा पाण्यात होतो. राजेश पुन्हा थोडा मागे आला आणि मला हात देऊन बाहेर काढला.



अखेर अजून एक दिव्य पार करून आम्ही सर्वजण सहीसलामत पलिकडे आलो होतो. आता पुन्हा रस्त्याला लागणे गरजेचे होते. २-५ मिं. मध्ये तो सापडला. नुकताच पार पडलेला प्रसंग सारखा आठवत होता. खरच... मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे. माणसाकडे आत्मविश्वास असावा. साहसीपणा असावा. पण आततायीपणा नको. निसर्गात भ्रमंती करताना हे भान नेहमीच राहिले पाहिजे. नाहीतर आपली काही धडगत नाही. काही वेळातच आम्ही रतनवाडीच्या अगदी जवळ येऊन पोचलो. पाउस सुद्धा कमी होत होता. जणू काही २ दिवस आमची परीक्षा पाहण्यासाठीच तो कोसळत होता. वाडी जवळ पोचलो तेंव्हा पाउस पुर्णपणे थांबला होता. ऊन-पावसात मंदिर आणि परिसराचे रूप खुलून आले होते. काल न घेता आलेले काही फोटो आम्ही घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. आल्या मार्गाने शेंडीला पोचलो आणि तिकडून S.T. ने कसाऱ्याला. एक थरारक ट्रेकची सांगता करत आम्ही कसाऱ्यावरुन घरी जायला निघालो होतो. अर्थात पुढच्या ट्रेकची प्लानिंग करताच...



प्रचंड पावसामुळे रतनगड़ किंवा वाटेवरचे फोटो काढता आले नाहीत पण रतनवाडी येथील 'अमृतेश्वर मंदिर' परिसर आणि पुष्कर्णीचे काही फोटो घेता आले.






मंदिर परिसरातील काही शिल्पे. --->>>

















अमृतेश्वर मंदिराचे कोरीव खांब.--->>>









रतनवाडी येथील सुंदर पुष्कर्णी. --->>>

3 comments:

  1. You guys are rocking Boss !

    hats of to all of you!

    Even I am also seeking for this kind of stuff...

    If you could consider me for your next trek then I will be thankful to you.

    Regards
    Deepak Parulekar
    09967367720

    ReplyDelete
  2. Ved prasanga asnaar !
    m just speechless

    ReplyDelete
  3. सही!
    गेल्यावर्षी आमचाही रतनगड ट्रेक झाला! "अमृतेश्वर मंदिर" छानच आहे!
    मात्र पावसामुळे गडावर जास्त पाहता आले नाही... आणि रस्ता चुकल्यामुळे - बराच वेळ त्यातच गेला...

    माझा लेख - येथे आहे!

    ReplyDelete