आज होता दिवस तिसरा आणि सर्वात महत्वाचा. आज आम्ही पावनखिंड आणि पुढे जाउन विशाळगड पाहणार होतो. गेल्या दोन दिवसात पन्हाळगडापासून निघून ५५ किलोमीटर अंतर पार करून वाटेमधला क्षण अन् क्षण अनुभवत पांढरपाणीपर्यंत पोचलो होतो. आम्ही न्याहारी आटोपली आणि कुच करायला तयार झालो. पावनखिंड आता अवघी ६ किलोमीटर पुढे होती. आम्ही आता अवघे आतुर होतो. गेल्या दोन दिवसात पावसाने आम्हाला हुलकावणी दिली होती. काल संध्याकाळी तो भेटून गेला होता तसा थोड़ासा पण आज सकाळी मात्र तो आलाच. अगदी जोरात नाही पण बर्यापैकी होता. पांढरपाणी ते पावनखिंड मध्ये बराचसा रस्ता आता डांबरी झाला आहे. मुख्य रस्त्यावरुन उजवीकडे वळलो की लगेच सुरू होतो पावन परिसर पावनखिंडीचा. मळलेल्या पायवाटेने आत वळलो. नुकताच पाउस पडून गेला होता त्यामुळे लालमातीची वाट निसरडी झाली होती. आम्ही एक रांग धरून खाली उतरू लागलो. खिंडीकडे जायचा हा एकमेव मार्ग. ह्या अवघड उतारावरती सुद्धा उमेश आणि साधना स्वतःला सांभाळत सगळ शूट करत होते. तो उतार पार करून आम्ही पुढे गेलो. कासारी नदीवरचा ओढा ओलांडला आणि पुन्हा चढायला लागलो. ह्याच ओढ़यावरती पुढे धबधबा आहे. आणि अखेर तो क्षण आला. पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. आम्ही आता पावनखिंडी मध्ये पोचलो होतो. त्या ठिकाणी सर्वजण स्तब्ध उभे होते. कोणीच काही बोलत नव्हते. शरीर वर्तमानकाळात मन इतिहासात अशी सर्वांची अवस्था झाली होती. त्या ३०० वीरांना मानवंदना म्हणून आम्ही काही वेळ मौन पाळले. आप्पा आता आम्हाला ३४८ वर्षांपूर्वीच्या त्या युद्धभूमीवरती घेउन गेले. जणू काही ते सर्व आमच्या डोळ्यासमोर घडते आहे असेच जाणवत होते.
२५ मावळे पांढरपाणीला ठेवून राजे घोडखिंडीत येउन पोचले होते. मागुन हेरांनी बातमी आणली की सिद्दी मसूद आणि फाझल खान हे पांढरपाण्यावर येऊन पोचले आहेत. आता निर्णायक वेळ आली होती. ह्या ठिकाणी शत्रुला थोपवणे भाग होते. राजांनी रायाजी बांदलाला ३०० मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखायचे काम दिले. पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी ह्या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी राजांना सुचवले. बाजींची स्वामीभक्ती येथे दिसून येते. आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युव्हरचना केली. चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. थोड्यावेळात शत्रु नजरेत येऊ लागला पण शत्रुच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्दीमसूदचे घोडेस्वार उतरु लागले. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण ४ वाजत आले होते. थोड़े मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ आता खिंडीकड़े येउन पोचले. ते अधिक वेगाने ओढ़यापलिकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले.
आता आजूबाजुच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्राची लढाई सुरु झाली. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू काही त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजीप्रभू सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजीप्रभुंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग गळाले. बाजींनी एक नजर त्यांच्याकड़े पाहिले. ते म्हणाले, "दादा, तुम्ही थोरले. पहिला मान तुम्ही घेतला." फुलाजीप्रभुंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल - एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेतल्या होत्या. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले. पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकड़े लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफांचे बार देत नाहीत तोपर्यंत त्यांनी मृत्युला ठणकावून सांगितले " तोफे आधी न मरे बाजी. " बाजींच्या मनाची घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरु होते.
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ
दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! २
पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३
तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल होत होती. रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते. पण त्यांना पुढे सरकणे भाग होते. विशाळगडाला वेढा घालून बसलेल्या सुर्वे आणि दळवी या आदिलशहाच्या वतनदारांच्या सैन्याला कापत सतत २१ तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोड़खिंडीमध्ये ऐकू गेले. त्यानंतरच समाधानाने बाजींनी आपला देह सोडला.
शिवरायांच्या आणि बाजीप्रभूंच्या जयजयकाराच्या ललकारीने आम्ही सगळे भानावर आलो. याठिकाणी आता स्मारक उभे केले गेले आहे. आम्ही सर्वजण स्मारकासमोर नतमस्तक झालो. त्यापुढे खाली उतरल की ओढ़यावरचा धबधबा लागतो. इतका वेळ उमेश हे सगळ शूट करत होताच. मी सुद्धा थोड़े छायाचित्रण केले. आम्ही पुन्हा मागे येउन घोडेमाळाकड़े सरकलो. तिथून थोड पुढे पुन्हा डांबरी रस्ता लागला. कासारी नदीवरच्या धरणासाठी बसवलेल गाव सुद्धा लागले. आता आम्ही इथून थेट वाट पकडली गजापुर गावची. आम्हाला आता सर्वात पुढे पळायचे होते. बाकी सर्व ट्रेकर्स गजापुरला पोहचायच्या आधी आम्हाला आमचे जेवण उरकून विशाळगड गाठायचा होता. कारण सर्व ट्रेकर्स विशाळगडाला पोचले की आम्हाला शूटिंग साठी वेळ मिळणार नव्हता. आम्ही जेवण उरकून आप्पांबरोबर भराभर पुढे निघालो.
विशाळगड वसला आहे कोकण आणि घाट यांच्या बरोबर मध्ये. आम्ही पोचलो तेंव्हा विशाळगडाच्या माथ्यावर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. कोकणात पाउस तर घाटावर ऊन. विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत आता गाड़ी रस्ता झाला आहे. शिवाय वरती दर्गा असल्याने येथे मुस्लिम धर्मियांची जास्त प्रमाणात वर्दळ असते. आम्ही फटाफट वरती चढून गेलो. गडाची अवस्था वाइट झाली आहे शिवाय वरती राहणार्या लोकांचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. गडावरील गणेश आणि मारुती मंदिर दुर्लक्षित अवस्थेत आहे. एक ब्राह्मण कुटुंब शंकर मंदिराची देखरेख करते. आम्ही त्या ठिकाणी थोड़े विसावलो. संध्याकाळ होत आली होती. आम्हाला आता परतायला हवे होते. गडाच्या पडलेल्या दरवाजावरती साधनाने डॉक्युमेंटरीचा क्लोसिंग शॉट दिला. इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो. पावनखिंडित पावन होवून, आयुष्यातला असाच एक अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही मुंबईकडे परतू लागलो.
आपल्या रक्षणासाठी झगडलेल्या या किल्ल्यांची आजची अवस्था ढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, नामशेष इमारती, ओहोरलेली टाकी अशी असली तरी ती स्वदेश - स्वधर्म - स्वराज्य यांच्या रक्षणातून निर्माण झालेली आहे. दुर्ग - गड़ - किल्ले यांचा उपयोग मुख्यत: लढण्यासाठी असतो हेच विसरुन गेलेल्या सुंदर किल्ल्यांपेक्षा मला माझ्या महाराष्ट्रामधले ढासळलेले उध्वस्त गड़किल्ले भारुन टाकतात. त्यांचाच मला अभिमान वाटतो.
Sunday 8 March 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझी ही भ्रमंती राहिलीच
ReplyDeletecome .. we will do it this year again ... :)
ReplyDeleteशाळेतील इतिहासाच्या धड्यांची आठवण झाली.
ReplyDeleteपरंतू यात धड्याबाहेरील खूपसे काही आहे.
शालेय मूलांना वर्गात बसून धडे शिकवण्यापेक्षा अश्या ठिकाणी न्यायला हवे.
खरय मीनल... असे प्रयत्न व्हायला हवेत.. :)
ReplyDelete