Wednesday 8 April 2009

भाग १ - ढाक-भैरी ते राजमाची ... !

२००५ च्या ऑगस्टमधला ट्रेक. मी, अभिजित, हर्षद आणि आशिष असे चौघेजण कर्जत येथील वदप गावावरुन पुढे ढाक गावाजवळ असलेल्या ढाक-भैरीला आणि तिकडून पुढे कुंढेश्वरमार्गे राजमाचीला गेलो होतो. २ दिवस आधीच माझ्या उजव्या हाताचे प्लास्टर निघाले होते. त्यात धो-धो पावसाळ्याचे दिवस आणि आम्ही निघालो होतो ढाक-भैरीला. अभिजित आणि आशिष ह्या आधी ढाक-भैरीला जाउन आले होते. गुढ असा ढाक-भैरी ... काय वर्णावे ... कुठल्याही कसलेल्या ट्रेकरला भूरळ पाडणारा असा हा ट्रेक. मुळात कठीण असलेला हा ट्रेक पावसाळ्यात अतिकठीण होऊन बसतो. ह्या ठिकाणी काही अपघात सुद्धा झाले आहेत त्यामुळे नवख्यांनी याठिकाणी अनुभवी मार्गदर्शनाशिवाय जाऊ नये. आम्ही सकाळी-सकाळी पहिल्या कर्जत लोकलने कर्जतला पोचलो. नाश्ता आटोपला आणि तिकडून वदपला पोचलो. वदप गावामागूनच ढाक किल्ल्याकडे जायची वाट आहे. गावात पोचलो की खिंड दिसते. थोडसं उजव्या हाताला एक मस्त पिटूकला धबधबा आहे. खिंडीच्या दिशेने चालायला लागलो. पावसाळी वातावरण होते त्यामुळे मस्त वाटत होते. १५ मिं. मध्ये वर चढून खिंडित पोचलो. आता खरी चाल होती म्हणून थोड़ेफार पोटात ढकलले. मजल दरमजल करत तासाभरात वरच्या टप्याला पोचलो. वरच्या पठारावर पोचायच्या आधी एक झाडीची वाट लागते. पायाखाली लालमातीचा चिखल तुडवत ती वाट पार केली. ही वाट पूर्ण झाली की आपण वरच्या पठारावर येतो आणि समोर विस्तीर्ण पठार आणि त्यावर सगळीकडे शेतीच-शेती दिसते.

त्या शेता-शिवारांमधून आणि बांधांवरुन वाट काढत थोड्याच वेळात आम्ही गावात पोचलो आणि तिथून ढाक किल्ल्याकडे निघालो. वाटेवर सगळीकडे धुके होते. दूरचे काही दिसत नव्हते आणि मळलेली वाट नव्हती. त्यामुळे वाट अंदाजानेचं काढत होतो. आम्हाला ढाक किल्ल्यावर जायचे नव्हते तर त्याला वळसा मारून पुढे भैरीच्या गुहेकडे जायचे होते. उजवीकडे वर चढलो तर ढाक किल्ल्याच्या माथ्यावर जायला होते आणि डावीकडे खाली आपण रस्ता चुकतो. अखेर वाट आम्हाला समोरच्या दरीच्या टोकाला घेउन गेली गेली. समोरचे दृष्य फारच सुंदर होते. डोंगर उतारावर पसरलेल्या फुलांच्या चादरी आणि समोरच्या कडयावरुन कोसाळणारे धबधबे. ते दृष्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. पुढे स्पष्ट वाट नव्हती त्यामुळे जंगलामधून अंदाजानेच वाट काढत-काढत कळकराय सुळक्याच्या दिशेने आमची पावले पडत होती. काही वेळानी अखेर धुक्यामधून पुसटसा कळकराय सुळका दिसायला लागला. आता आमच्या पावलांची गती वाढली. काही वेळातच आम्ही मळलेल्या वाटेच्या चौरस्त्यावर येउन पोचलो. येथून समोरचा रस्ता कुंढेश्वरमार्गे राजमाचीला जातो. त्याच रस्त्याने आम्हाला पुढे जायचे होते. पण त्याआधी उजवीकडे खाली घळीमध्ये उतरून भैरीच्या गुहेकडे जायचे होते. चौरस्त्यावरुन डावीकडे वळल्यास भीमाशंकरला जाता येते. आम्ही आता उजवीकडे उतरून त्या छोट्याश्या घळीमध्ये उतरलो. उतार असलेली घळ संपत आली की ढाकच्या पश्चिम कड्याची भिषणता आणि दुर्गमता लक्ष्यात येते. समोरच्या दरीमध्ये धुके भरले होते त्यामुले खोलीचा अंदाज येत नव्हता. घळीमधून खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी लागते कारण घळ संपता-संपताच लगेच उजवीकडे सरकून खाली उतरावे लागते. तिकडे पायाखाली एक मोठा दगड आहे त्यावर पाय टाकुन उजवी कडे सरकावे लागते. पावसामुळे सगळीकडे निसरडे झाले होते त्यामुळे काळजीपूर्वक आम्ही चौघेजण तिकडे उतरलो. आता आम्ही ढाकच्या काळ्याकभिन्न कडयाखाली उभे होतो. मागच्या बाजूला थोड़ वरती कळकराय सुळका दिसत होता.अंगावर येणारा विस्तीर्ण कडा आणि खालच्या दरीत पसरलेलं धूक असं मस्त वातावरण होतं. त्या कडयाखालून चालत-चालत आम्ही पुढे सरकू लागलो. कडयावरुन अंगावर पाणी ओघळत होते शिवाय पायाखालची वाट निसरडी होती. उजवीकडच्या कडयाचा आधार घेत-घेत, पायाखालच्या ओबड-धोबड दगडांकडे लक्ष्य देत पुढे सरकावे लागत होते. तरीसुद्धा मी आणि हर्षद मजेत गाणी म्हणत, पण लक्ष्य देत पुढे जात होतो. अभि आणि आशीष आम्हाला जरा गप्प बसा सांगत होते. अभि आणि आशीषला मी इतका गंभीर कधी पाहिलं नव्हत. पुढे जात असताना उजव्या बाजूला २-३ खोदलेल्या कपारी दिसतात. गुहा म्हणायला त्या तितक्या मोठ्या सुद्धा नाहीत पण आपले सामान ठेवून किंवा काही वेळ बसायला त्या नक्कीच उपयुक्त आहेत. त्यातल्या एकात आम्ही आमचे सामान ठेवले आणि त्यावर जॅकेट टाकुन झाकून ठेवले. आता खऱ्या चढाईसाठी आम्ही पुढे सरकलो. थोड़ पुढे गेलो की उजव्या बाजूच्या कडयामध्येच वर जाणाऱ्या कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आशीष सर्वात पुढे सरकला. त्या मागे हर्षद. त्या नंतर अभि आणि सर्वात शेवटी मी. एका पायरीवर चढलो की त्यावरच्या पायर्‍या दृष्टीक्षेपात येतात. पायर्‍यांवर पाणी जमले होते त्यामुळे प्रत्येक पायरी वर आधी हात फिरवून मगच घट्ट पकड घ्यावी लागत होती. त्याशिवाय आधीपासून तिकडे काही किडूक-मिडूक प्राणी नाही ह्याची सुद्धा खातरजमा करावी लागत होती. कारण थोडसं दचकून सुद्धा तोल जाण्याची शक्यता असते. मी माझ्या उजव्या हातावर जास्त जोर न टाकता डाव्या बाजूवर जोर टाकून वर चढत होतो. तसा मी डावरा असल्याने मला फार त्रास पडत नव्हता. एक-एक करून त्या १०-१२ पायऱ्या चढून वर गेलो. पायऱ्या संपल्या की उजवीकडे एक मोठी स्टेप घ्यावी लागते. सर्वात वरच्या पायरीवर पाय घट्ट रोवून हाताने अगदी वरती पकड घ्यायची आणि स्वतःला वर खेचून घ्यायचे. दूसरा माणूस उभी रहायची जागा सुद्धा नसल्याने कोणी मदतीला किंवा आधाराला सुद्धा उभे राहणे कठिण होउन बसते. आशीष आणि हर्षद तिकडून पुढे सरकले तसे मी आणि अभि मागून पुढे सरकलो. आमच्या ग्रुप मधला आशिष हा निष्णात प्रस्तरारोहक (Rock Climber). स्वतःचे वजन सांभाळून अतिशय शिफातीने तो पुढे सरकत होता. आम्ही त्याच्या मागून पुढे सरकत होतो. पाउस मध्येच थोडा-थोडा पडत होता. दाट ढूक्यामुळे खाली दरीमधले काही दिसत नव्हते. आता डावीकडे तिरप्या रेषेत वर जाणारी दगडामधली खाच आहे. स्वतःचे वजन पूर्णपणे उजवीकडे ठेवून हळू-हळू वर सरकत आम्ही तो अंदाजे १५ फुटांचा टप्पा पार केला. ह्या ठिकाणी पकडायला कुठेही खाचा नाहीत. आपले हात दगडांवरुन सरकवत-सरकवत पुढे जात रहायचे. वर आलो की मात्र ६-७ जण नीट उभे राहतील इतकी मोकळी जागा आहे. एकडे येउन जरा दोन क्षण निवांत झालो कारण पुढचा टप्पा अजून बिकट होता. आता खाच तिरप्या रेषेत उजवीकडे सरकते. पायाखालची जागा मोजून वितभर आणि धरायला काही नाही अश्या दोलायमान स्थितिमध्ये स्वतःला सरकवत पुढे जायचे. आता स्वतःचे पूर्ण वजन डाव्या बाजूला. कुठेही बसायचे नाही कारण ते शक्यच नसते. ह्या ट्रेकला येणारे भिडू हे पक्के असावे लागतात नाहीतर अश्या मोक्याच्या ठिकाणी कोणी कच खाल्ली तर पुढे सगळेच अवघड होउन बसते. खालच्या खाचेच्या दुप्पट अंतर उजव्या बाजूला पार करून वर सरकून आता आम्ही पोचलो ते गुहेच्या पायथ्याशी. ह्या ठिकाणापासून अंदाजे १५ फुट सरळ वर चढून गेलो की लागते ढाक-भैरीची गुढरम्य गुहा. ह्या ठिकाणी चढायला न आहे शिडी.. न पायऱ्या.. वर चढण्यासाठी एक बदामाच्या झाडाचे खोड जाड दोरखंडाला बांधले आहे. अर्थात तो दोरखंड वरती मोठ्या दगडाला बांधला आहे. सरळ फुटणाऱ्या फांद्यांचा शिडीच्या पायर्‍यांसारखा वापर करून वर चढून जावे लागते. आता ही तर सर्कस होती कारण वरच्या फांद्या पकडून खालच्या एका फांदीवर एक पाय टाकल्या-टाकल्या माझ्या वजनामुळे झाड एका बाजूला स्विंग झाले.


----------------->>>


उजव्याबाजूला वर जाणारी वितभर रुंदीची वाट, दोरखंडाला बांधलेले बदामाच्या झाडाचे खोड आणि सर्वात वरती ढाक-भैरीची गुहा दिसते आहे.पावसाने फांद्या निसरड्या झाल्या होत्या. एक-एक पाउल काळजीपूर्वक उचलत पुढची काही मिनिट्स अशी कसरत करत आम्ही एक-एक करून अखेर वर पोचलो. एकदम भन्नाट वाटत होते. आपला सह्याद्री जितका रांगडा तितकाच राकट. आपल्या साहसी वृत्तीला प्रेरणा देणारा. गेल्या तासाभरामधल्या ह्या अनुभुतीने मन प्रसन्न झाले होते. इतका वेळ हाताचे दुखणे सुद्धा मी विसरलो होतो. गुहेमध्ये भैरी म्हणजेच भैरवनाथाचे स्थान आहे. बाजुलाच २ पाण्याची टाकं आहेत. त्यातल्या पाण्यामध्ये देवाची भांडी आहेत. आपल्याला जेवण बनवायचे असल्यास ही भांडी घेता येतात पण वापरून झाली की ती स्वच्छ धुवून पुन्हा पाण्यात ठेवावी लागतात. इतका वेळ दरीमध्ये पसरलेलं धुकं आता विरु लागलं. खालचे स्पष्ट दिसू लागले. आपण काय दिव्य करून वर आलो आहोत हे समजून आले होते. उतरून जाताना किती काळजी घ्यावी लागणार आहे ह्याची पूर्ण कल्पना आम्हाला आली होती. अभि आणि आशीषला बहुदा ती आधी पासूनच होती म्हणूनच ते मला आणि हर्षदला 'जरा सिरीअस व्हा' अस सांगत होते. आता आम्हाला उतरायला हवे होते कारण पुढे जाउन कुंढेश्वरमार्गे राजमाचीला पोचायचे होते. आता अभि पुढे सरकला. पुन्हा तीच कसरत; मात्र जास्त काळजी घेउन. स्वतःचा तोल सांभाळत हळू-हळू आम्ही खाली उतरायला लागलो. बदामाच्या झाडावरची सर्कस करून खाली आलो आणि वितभर खाचेवरुन खाली सरकू लागलो. समोर खोल दरी दिसत होती. उजवा हात दगडावर सरकवत-सरकवत आम्ही खाली सरकलो. मोकळ्या जागेमध्ये दम घेतला आणि पुन्हा खाली उतरलो. शेवटच्या पायऱ्या उतरताना फारसे प्रयास पडले नाहीत. पूर्ण खाली उतरून आलो तरी कड्याखालचा पॅच बाकी होताच. पण आधी सामानाकड़े गेलो आणि पेटपूजा आटोपली. दुपारचे २ वाजून गेले होते आणि अजून बरेच अंतर बाकी होतं. भराभर पुढे निघालो. कडयाखालचा उरलेला मार्ग संपवला आणि घळीमधून चढून वर आलो. आता लक्ष्य होते कुंढेश्वर..........
(शेवटची ३ छायाचित्रे आमच्या ट्रेकच्या वेळची नसून माझी मैत्रिण 'कस्तूरी शेवाळे' हिच्या संग्रहातील आहेत.)

क्रमशः ...

4 comments:

 1. Excellent as always :)
  aani ho, part 2 udaych post zala pahije :P :)

  ReplyDelete
 2. sahi jamaly..akhsharshaha trek jasachya tasa dolyasamor ubha rahila..ekdam bhari!!!!!

  ReplyDelete
 3. Didn't get to see Panhala-Pawankhind documentary :(

  ReplyDelete