Saturday, 28 February 2009

भाग २ - निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !

८ च्या आसपास आम्ही जेवण उरकले आणि मंदिराबाहेर गप्पा मारत बसलो. स्वच्छ चांदणे पडले होते पण हवी तशी ठंडी मात्र नव्हती. साधारण १० नंतर आम्ही सगळेजण आडवे झालो. पडल्या- पडल्या ऐश्वर्या गुडुप झाली होती तर आदित्य आणि अमृता निवांत पहुडले होते. माझ्या मनात मात्र काही वेळात सुरु होणाऱ्या मजेशीर गोष्टीबद्दल विचार सुरु होते. मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशत मी सुद्धा पहुडलो होतो. रात्री १२ च्या आसपास अचानक घंटीचा आवाज आला... आणि अपेक्षित होते तेच झाले. एक गाय मंदीराच्या पायऱ्या चढून आत मध्ये आली. आम्हाला बघून ती चांगलीच दचकली होती. आम्ही तिच्या घरात होतो. माझ्या अगदी समोर गाय उभी होती आणि अमृता तिला बघून ताड़कन उठली होती. ऐश्वर्याने एक वेळ उठून गाईकड़े पाहिले आणि माझ्या झोपेपेक्षा हे महत्वाचे नाही असे ठरवून ती झोपली, ती सकाळपर्यंत उठली नाही. आदित्य सुद्धा निवांत झोपून होता पण बहुदा त्याला काही नीट झोप येत नव्हती. मला आता झोप यायला लागली होती पण अमृता काही मला झोपू देईना. अखेर मी कधी झोपलो मलाच माहीत नाही. बहुदा अमृता काही रात्रभर झोपलीच नाही. रात्रभर रवंथ करणार्‍या गाईला ती कंपनी देत बसली होती. बिचारी गाय इतकी घाबरली होती की ती रात्रभर बसलीच नाही.
पहाटे मला जाग आली ती तिच्या बाहेर जाण्याच्या आवाजानेच. मंदिराच्या दरवाजातून बाहेर पाहिले तर थेट समोर सूर्यनारायण उगवत होता. अमृता जागीच होती. अक्षरशः घोडे विकून झोपलेल्या ऐश्वर्या आणि आदित्यला जागे केले. फटाफट आवरले आणि किल्ला बघायला निघालो. आज आम्हाला हडसर किल्ला पुर्ण बघून १२वा. पर्यंत शिवनेरी गाठायचा होता. गड़ बघताना मध्यभागी असलेल्या उंचवटयाला प्रदक्षिणा मारावी. शिवमंदिराच्या बाजुलाच एक मोठा पाण्याचा तलाव आहे. तिकडून थोड पुढे गेल की उतारावर जमिनीखाली बांधलेल्या कोरीव गुहा लागतात. गुहेचे तोंड चुकू नये म्हणुन शक्यतो कडेच्या जवळून चालावे. गुहेचे मुख वक्राकार असून आत गेल्यावर समोर, डावीकडे आणि उजवीकडे असे ३ भाग आहेत. प्रत्येक भागात आतल्या बाजूला २०-२० फुट लांब-रुंद आणि १०-१५ फुट खोल अशी २-३ कोठारे आहेत. यात बहुदा धान्य, शस्त्र आणि ग़डावर लागणारे सर्व सामान साठवण्याची सोय असावी. सध्या ह्या गुहा वाइट स्थितीत आहेत. तिथून पुढे गेले की गडाच्या उत्तर टोकावर तूटका बुरुज आहे. बाकी गडावर कुठलेच बांधकाम शिल्लक नाही. वाड्यांचे जोते मात्र तेवढे दिसून येतात. एक गड़फेरी पूर्ण करून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गाला लागलो.हडसरच्या बांधीव पायऱ्या उतरताना मध्येच मी आणि आदित्य धावायला लागलो. आम्ही त्या पायऱ्या अक्षरशः १-२मी. च्या आत उतरलो. आणि मग खाली येउन पाय मोकळे करत बसलो. पाय कसले सॉलिड भरून आले होते. आल्या मार्गानेच हडसर गावात आलो आणि पुन्हा आमच्या बाइक्स घेउन शिवनेरीच्या दिशेने सुटलो. आता शहाजीसागर जलाशयाची भिंत दिसू लागली होती. ती पार करून आम्ही जुन्नरचा शिवाजीचौक गाठला. शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला त्रिवार मुजरा करत शिवनेरीचा दरवाजा गाठला.
किल्ल्याचा पहिला दरवाजा समोर येताच माझ्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहू लागला. किल्ले शिवनेरी - आपल्या शिवबांचे जन्मस्थान. जेँव्हा राजेशहाजी जिजाऊ मासाहेबांना घेउन येथे आले तेंव्हा निजामशाहीचे सरदार, जिजाऊंचे वडिल लखुजी जाधवराव शहाजीराजांच्या मागावर होते. खरे तर शिवनेरी हा निजामशाहीचा किल्ला. पण किल्ल्याचे किल्लेदार विश्वासराव हे शहाजीराजांचे व्याही. थोरल्या संभाजी राजांचे सासरे. किल्ला निजामशाहीचा, त्यामुळे जिजाऊ मासाहेबांना येथल्यापेक्षा सुरक्षित जागा नव्हती. अखेर शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांना शिवनेरीच्या हवाली ठेवून गेले आणि फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी शिवरायांचा जन्म झाला. मनातल्या मनात त्यांना वंदन करत आम्ही शिवनेरीच्या पायऱ्या चढायला लागलो. आता सरकारने संवर्धनाच्या नावाखाली इकडे सगळे बांधकाम नवीन केले आहे. शिवाय रविवार असल्याने खुपच गलका होता. त्यामुळे आम्हाला ना हवा तसा गड बघायला मिळाला ना हवे तसे फोटो काढता आले. ग़डावरील गंगा-जमुना टाकी, धान्यकोठार, राजवाडा, शिवजन्मस्थान, त्या पुढे असलेला कड़ेलोटकडा आणि नविन बांधलेले बाल शिवाजी मंदिर बघून आम्ही साखळीच्या वाटेकडे मोर्चा वळवला.

साखळीची वाट म्हणजे शिवनेरीची चोरवाट. उभ्या कडयामधून पायऱ्या खोदून बनवलेला हा छुपा मार्ग. ह्या वाटेने फारसे कोणी येत जात नाही. गावातली माणसे आणि डोंगरवेडे. मुळात ही चोरवाट फार कोणाला माहीत पण नाही. आम्ही ह्या वाटेने उतरायचे ठरवले. पण आमच्या गाड्या रस्त्याला असल्याने आमची नंतर पंचाइत झाली असती. आम्ही त्यावाटेने खाली उतरून पुन्हा चढून वर यायचे ठरवले. साखळीच्या वाटेवर पायर्‍यांचा पहिला टप्पा सोपा आहे तर दुसरा थोडासा कठीण. पावसाळ्यात ही वाट थोडी निसरडी असते. पण आता उतरून जायला फारसे प्रयास पडले नाहीत. पायर्‍या संपल्या की डावीकडे कोरीव गुहा आहेत. हे आम्हाला माहीतच नव्हते. दुर्लक्षित स्थितीत असलेल्या ह्या गुहा सुंदर आहेत. जुन्नर शहराचे इकडून छान दर्शन होते. शिवनेरीवरच्या गर्दीत जो निवांतपणा मिळाला नव्हता तो येथे येऊन मिळाला. पुन्हा चढून वर आलो आणि बालेकिल्ला बघायला गेलो. वरती तसे फार काही बांधकाम उरलेले नाही. एक तटबंदी सदृश भिंत उत्तम स्थितीत आहे. येथून भोवतालचा अप्रतिम नजारा दिसतो. ४ वाजत आले होते आणि आता आम्हाला परतायला हवे होते. मुख्य मार्गाने आम्ही परतीच्या मार्गाला निघालो. माळशेजघाटमार्गे अंधारपडेपर्यंत आम्हाला किमान मुरबाड गाठायचे होते. गाडी पुन्हा दामटवली. आणि कुठेही न थांबता सुसाट वेगात २ तासात थेट टोकावडेला थांबलो. मस्तपैकी पोटपूजा आटोपली आणि अजुन एका जबरदस्त धमाल ट्रेकची सांगता केली. मी आणि अमृताने ऐश्वर्या - आदित्यला टाटा केला पण त्या आधी पुढच्या ट्रेकचे प्लॅनिंग करायला विसरलो नाही...

7 comments:

 1. @ रोहन,
  मस्त लिहिलय राव! अगदी तुझ्याबरोबर भटकुन आल्यासारखं वाटलं... ! हडसरजवळचा "चावंड" किल्ला ही मस्त आहे.. शिवाय जवळच नाणे-घाट आणि जीवधन - जीवधानी - ही मस्त आहेत.

  ... एक मात्र नक्की... आता परतल्यावर हडसर - आणि कलावंतीण यांचा प्लान करायचा..

  पुढच्या ट्रेकसाठी शुभेच्छा..!

  ReplyDelete
 2. We are onthe same page. I started treks in 1978/79.
  But now this activity is much reduced. Last I had gone 2 yrs back. From Bhambude to Pachapurchi wadi, via Dhangad.

  The region near Tailbaila provides excellent oppurtunities. Before that I have gone to Susale island in Mulshi, gentle walk from again Bhambude. Try it. One of the most wonderfl location, and then the trek i missed is getting down via Andharvan

  ReplyDelete
 3. have you been to veer kotwal smarak, near siddhagad during monsoon ? Waterfall is simlpy terrific

  ReplyDelete
 4. yes i hv been @ siddhagad in mansoon ... planning again to go this yr .. !!! keep suggesting new places ... happy trekking ... !!!

  ReplyDelete
 5. नक्की कोण कोणाला घाबरले? अमृता गाईला की गाय अमृताला? :-)
  साखळीची वाट पण भारी आहे.

  ReplyDelete
 6. गाय अमृताला घाबरली होती. पण अमृता गाईला जास्त घाबरली होती... हेहे ... साखळीची वाट पावसा ळ्यात करायला मज्जा येइल...

  ReplyDelete
 7. अगदी तुझ्याबरोबर भटकुन आल्यासारखं वाटलं... !

  ReplyDelete