Saturday 28 February 2009

भाग १ - निमगिरी - हडसर - शिवनेरी ... !२४-२५ जाने. ला मी, अमृता, ऐश्वर्या आणि आदित्य माणिकडोह - जुन्नर परिसरात भटकंतीसाठी गेलो होतो. उदिष्ट अर्थात होते किल्ले शिवनेरी आणि जवळच असलेले हडसर आणि निमगिरी हे किल्ले. गेल्या सुट्टीमध्ये आम्ही जास्त बाइकनेच फिरलो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत बाइक घेउन जायची, मग पुढे चढाई सुरु. २४ला सकाळी माळशेज घाटाच्या रस्त्याने निघालो. कल्याण ते मुरबाड रस्ता एकदम मस्त आहे. सकाळी फारसे ट्राफिक नसते आणि वातावरण पण एकदम मस्त. आमच्या अत्यंत महत्वाच्या अश्या 'नाश्ता ब्रेक' साठी मुरबाडला थांबलो आणि मग गाड़ी दामटवली. उजव्या हाताला सिद्धगड़ आणि गोरख-मछिन्द्र आमची साथ करत होते. टोकावडे गाव गेल तसा समोर नाणेघाट दिसायला लागला आणि त्यामागे जीवधन साद घालत होता. सकाळी ९ ची वेळ. माळशेजघाट अतिशय सुंदर दिसत होता. भैरवगड़ची डाइक भिंत आता डोक्यावर होती पण ऊन समोरून येत असल्याने काही फारसे फोटो काढला आले नाहीत. माळशेज घाटात लागणारा छोटा बोगदा पर करून आम्ही जरा वेळ थांबलो. अलिकड़े असणार्‍या मंदिरापाशी बोर विकणारी गावातली माणसे, विकत घेणारे आणि माकडे ह्यांचा एकच गलका होता. म्हणून तिकडून लगेच निघालो, ते पण बोर न खाता. हा.. हा.. डावीकडे आजापर्वत, हरिश्‍चंद्रग़डाचा थरारक कोकणकडा दिसत होता. घाट संपला आणि पुढे खिरेश्वर धरण लागले.आम्हाला जायचे होते आधी किल्ले निमगिरी आणि मग तिकडून हडसरला. हवा तसा नीरव शांततेचा आनंद शनिवारी शिवनेरीला मिळणे अशक्य होते. तो मिळणार होता आडवाटेवरच्या ह्या किल्ल्यांवर. निमगिरी गावच्या वाटेला लागलो. मध्ये एका गावातल्या माणसाला रस्ता विचारला. बाइक नीट जाइलना अस नक्की करून घेतल. तो बोलला 'टेंशन घेऊ नका. आख्खा डांबरी रास्ता आहे. बिनधास्त जा.' पुढे रस्ता कसा होत ते सांगायला नकोच. १० की.मी.च्या पुढे गाड़ी न्यायचा प्रयत्न जर मी किंवा आदित्यने केला असता तर, एकतर आमची तरी वाट लागली असती किंवा गाडीची तरी. माझी आणि आदित्यची 'स्लो-बाईकिंग' रेस सुरु होती. त्यारस्त्याने मध्ये लागणारी चढण पार करत पलीकड़े उतरून अखेर निमगिरीच्या पायथ्याला पोचलो. पहिल्याच घरासमोर गाड्या लावल्या. गावातली लोक इतकी अथत्यशील असतात. त्या घरातल्यांनी आम्हाला पाणी दिले, जेवायला आत बसा असे सांगितले. अगदी किल्ल्यावर जाताना आम्ही आमचे सामान सुद्धा तिकडेच ठेवून गेलो.


निमगिरीचा किल्ला हा जोड़किल्ला आहे. गावातून निघाल की शेता-बांधाच्या मधून थेट खिंडीच्या दिशेने जायला लागले की वाट मस्त बाजरीच्या शेतामधून जाते. जोड़किल्ल्यांच्या मधल्या खिंडीमधून उजव्या बाजूने वर जायला स्पष्ट वाट आहे. उजवीकड़े दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. काही मोडल्या आहेत, काहींवर मातीचा घसारा आहे. पण चढून जाऊ शकतो. अगदी वरपर्यंत कोरलेल्या पायऱ्या असल्याने वाट चूकायचा कुठेच प्रश्न नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडले आहे. पण ह्या ठिकाणी आहे किल्ल्याचा 'फोटो स्पॉट'. तिकडे आम्ही थोडी फोटोग्राफी केली आणि थेट वर पोचलो. निमगिरी चढ़ताना पाठीमागे शहाजीसागर जलाशयाचे म्हणजेच माणिकडोहचे विहंगम दृश्य दिसत राहते. त्याच्या प्राश्वभूमीवर किल्ले शिवनेरी आपल्याला खुणावत राहतो. ग़डावर मध्यभागी एक उंचवटा आहे. त्याच्या चारही बाजूने खुप पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. काहींमधले पाणी पिण्यायोग्य आहे. एक पडके मंदिर आहे आणि त्यासमोर थोड़े वरती काही समाधीचे अवशेष विखूरलेले आहेत.


पायऱ्या उतरून पुन्हा खिंडित आलो आणि समोर असलेल्या जोड़किल्ल्यावर गेलो. तेथेसुद्धा पुन्हा कोरीव पायऱ्या आणि शत्रूला चकवा देइल अशी प्रवेश रचना. मी सर्वात पुढे होतो आणि चकणार सुद्धा होतो. पण मला डावीकडे वर जाणाऱ्या पायऱ्या आधी दिसल्या. उजवीकडच्या बाजूने एक थोडी मळलेली वाट पुढे जाते. समोर किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असे वाटते, तसे बुरुजाचे बांधकाम सुद्धा आहे. पण समोर गेलो की काहीच नाही. रस्ता बंद. डावीकडे वर जाणाऱ्या पायर्‍यांनी वरती गेलो, तिकडून परत खाली उतरून आलो आणि पायथ्याच्या मार्गाला लागलो. किल्ला चढून आणि बघून उतरायला साधारण तीन-साडेतीन तास पुरले.


पायथ्याला पोचलो तेंव्हा दुपारचे ३ वाजून गेले होते. आम्ही पुन्हा आमचा एक छोटासा फ़ूड ब्रेक उरकला आणि हडसरच्या दिशेने निघालो. नागमोडी वळणा-वळणाचा रस्ता आता जलाशयाच्या कड़े-कड़ेने जात होता. मध्येच ख़राब तर मध्येच सुसाट गाड़ी पळेल इतका छान. हडसर गावात पोचलो, एके ठिकाणी गाड्या लावल्या आणि फटाफट निघालो. अंधार पड़ायच्या आत आम्हाला वर जाउन पाणी आणि राहती जागा शोधणे आवश्यक होते. गावाच्या मागून वर निघालो आणि वरच्या पठारावर पोचलो. ५ वाजून गेले होते आणि हातात अजून फार तर दीडतास होता. वरती जायचा २ मार्ग आहेत. एक पाण्याची वाट तर दूसरा बांधीव पायर्‍यांचा मार्ग. पाण्याच्या वाटेने तासाभरात वर जाता येते पण खडा चढ आणि थोडा घसारा आहे. तर पायर्‍यांचा रस्ता पाण्याच्या वाटेच्या बरोबर विरूद्ध दिशेने वर जातो. त्यासाठी डावीकडच्या टेकाडाला वळसा मारावा लागतो. आम्ही त्या टेकाडावर तिरप्या रेषेत वर चढत जाउन वळसा मारून पायर्‍यांकड़े पोचलो.


हडसरच्या बांधीव पायऱ्या खुपच सुंदर आहेत. आणि त्या अश्या बांधल्या आहेत की समोर येईपर्यंत काही दिसत नाहीत. साधारण १००-१५० पायऱ्या चढून गेलो की समोर तटबंदीची भिंत लागते. दरवाजा एकसंध व कोरीव आहे आणि वरच्या बाजूला डावीकड़े लपलेला आहे. तिकडून आत गेल की आतली तटबंदी लागते. एकसंध पाषाणामधून कोरुन काढलेल्या ह्या पायऱ्या म्हणजे दुर्गबांधणीमधला एक उत्तम नमूना आहे. गेल्या काही वर्षांपासून मला हडसरला याकारणासाठी यायचे होते. आम्ही ती कारागिरी पाहून पुरते भारावलो होतो. शेवटच्या टप्यातल्या पायऱ्या चढून आम्ही वर पोचलो तेंव्हा सूर्य अस्ताला टेकत होता. अगदी वेळेत आम्ही ग़डावर पोचलो होतो. समोर स्वच्छ पाण्याचे टाके आणि त्याच्या मागे दुरवर सफ़ेद रंगाचे शिवमंदिर उठून दिसत होते. पचिमेकड़े क्षितिजावर कडा लालसर होत जात होती आणि त्याचे प्रतिबिंब माणिकडोहामध्ये चमकत होते. आम्ही आमचा मोर्चा मंदिराकड़े वळवला. आमचा आजचा मुक्काम तिकडेच असणार होता. गडावर गुहा आहेत पण त्या राहण्यायोग्य नाहीत. मंदिरात पोचलो आणि बघतो तर काय ... सगळीकड़े गुरांचे शेणच शेण. उजवीकड़े हनुमान, पवनदेव आणि गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या, तो भाग मात्र स्वच्छ होता. पण आम्ही पूर्ण मंदिर स्वच्छ करून घेतले. आता जागा राहण्यायोग्य झाली होती. सगळीकड़े अंधार पसरत होता. माझ्या मनात एक विचार घर करत होता, जो काही वेळात १०० टक्के ख़रा ठरणार होता.


क्रमशः ...

2 comments:

 1. निमगिरी राहिलाय राव... बाकी जुन्नरजवळचे काही शिल्लक ठेवले नाही.

  ReplyDelete
 2. Thanks for your blog.I read it and it is very well organised and informative. When we were at same temple in 1997, same picture was that time. We also reached evening time and first clean it.We found lots of grass inside.
  One more thing is that Ratangad was my first treck and it was my inspiration for future treck.
  I think after reading your blog and watching your snaps i m remembering my 14 years before golden days in sayhadri.

  Ashok kahirnar
  USA

  ReplyDelete