Wednesday 5 January 2011

अलंग - मंडण - कुलंग ... एक स्वप्नपूर्ती ... भाग ३

मंडणच्या गुहेत झोपलेलो असताना पहाटे कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. टोर्च मारून आसपास पहिले तर काहीच दिसले नाही. अजून उजाडले नव्हते म्हणून दरवाज्यावर बनवून ठेवलेल्या काठ्यांच्या जाळीकडे बघत तसाच पडून राहिलो.पहाटे-पहाटे अलंगच्या मागून सूर्यनारायणाचे दर्शन होवू लागले. उजाडू लागले तसे उठलो आणि आवरून घेतले. चहा टाकला आणि चक्क नाश्त्याचा प्लान रद्द केला. जे तयार खायचे पदार्थ सोबत होते ते खाल्ले. आज लंबी दौड होती. मंडण बघून, उतरून, त्याला पूर्ण वळसा मारून मग कुलंग गाठायचा होता. किमान ८-९ तास हातात हवे असा आमचा अंदाज होता.लिंगी बघायला गेलो. गुहेच्या उजव्या बाजूने वरती गेले की लगेचच आहे. मोजून ५ मिनिटे लागतात. इथे काही मस्त फोटो काढले. आकाशातली नक्षी एकदम मस्त. समोरच कुलंग आणि मंडण-कुलंग मध्ये असलेली भिंत दिसत होती. पुन्हा काही टायमर लावून फोटो वगैरे काढणे झाले.


मंडण वरून दिसणारा कुलंग ...


 ऐश्वर्या अजय देवगण पोजमध्ये... :)

 
८ वाजत आले होते. पुन्हा गुहेकडे आलो आणि सॅक पॅक करून पाठीवर मारल्या. ठरल्याप्रमाणे अभि थेट खाली उतरत रोप सेटअप करायला गेला तर मला माझी सॅक नीट पॅक करायची होती. टाक्यावरून पाणी देखील भरून घ्यायचे होतेच. ऐश्वर्या माझ्याबरोबरच होती. माझे काम होत आले तसे मी वाटेकडे बोट दाखवून ऐश्वर्याला हो पुढे. मी आलोच मागून. असे म्हणालो. मिनिटाभरात मी देखील निघालो. बघतो तर ऐश्वर्या काही दिसेना. मनात म्हटले ही पोरगी इतक्या पटकन उतरून गेली सुद्धा? असेल. असेल. मी पायऱ्या आणि दरवाजा पार करून खाली आलो. तरी ऐश्वर्या दिसेना.

इतक्या लवकर ही खाली कशी उतरू शकेल? मी तिच्यामागून निघायला नेमका किती वेळ घेतला? अंदाज लावत विचार केला. विचार करता करता मी माझा उतरायचा वेग वाढवला. वरच्या टप्यामधल्या सर्व पायऱ्या उतरून खाली आलो तरी ही पोरगी दिसेना. हाक दिली तरी प्रत्युत्तर येईना. मी माझा वेग अजून वाढवत पुढे निघालो. धावतच.. अजून जोरात धावत. पण ऐश्वर्या कुठेच दिसेना. ऐश्वर्या इतक्या लवकर हा संपूर्ण टप्पा पार करून जाईल हे माझ्या मनाला पटत नव्हते.


कुठे गेली मग ही? इतक्या लवकर पोचली? शक्य नाही.. मध्ये कुठे वाट चुकणे तर अजिबात शक्य नाही. मग कुठे गेली? पडली? नाही.. नाही.. पडेल कशी? असे कसे शक्य आहे.... का शक्य नाही? मी हाका मारायला सुरवात केली. पण काही प्रत्युत्तर येत नव्हते. आता मला जरा विचित्र विचार यायला सुरवात झालेली. अभिपर्यंत पोचलो.


मी : ऐश्वर्या कुठाय? इथे पोचली का?

अभि : नाही रे. तुझ्या बरोबर तर होती. तू धावत आलास काय? काय झाले ?
मी : काय झाले ते माहित नाही पण ऐश्वर्या हरवली आहे. मला भीती आहे की ती कुठे पडली आहे की काय.
अभि : तू तिला एकटीला कशाला सोडलेस?
मी : अरे. अवघे मिनिट देखील आधी निघाली नाही ती. असो. मी पुन्हा मागे जाऊन बघतो.

मी ज्यावेगाने अभिपर्यंत पोचलो होतो त्याच्या दुप्पट वेगाने परत फिरलो. पाठीवर आता सॅक नव्हती. पुन्हा एकदा पायऱ्या ... दरवाजा ... हाका..  ऐश्वर्या... एओ... ओये... पण काहीच उत्तर नाही. दरवाजाचढून पुन्हा वरपर्यंत पोचलो. बघतो तर ही महामाया गुहेवरच्या भागातून वाट शोधत खाली येत होती.

मी डाफरलो. कुठे गायब झालीस तू? आणि परत वर कशी आलीस?

ऐश्वर्या : तू कुठे गायब झालास? मी पुढे निघाले. कड्यापर्यंत गेले. पुढे वाटच दिसेना म्हणून जरा डावीकडे वर गेले. तिथेही वाट नाही म्हणून परत आले तर तू गायब. किती हाका मारतेय.
मी : तुला ही समोरची वाट, पायऱ्या दिसल्या नाहीत? २ फुट समोरच्या पायऱ्या. धन्य आहेस तू. सकाळी सकाळी माझा घाम काढलास. ओरडून ओरडून मेलोय.
ऐश्वर्या : हो. मी पण ओरडून ओरडून घसा सुकवून घेतलाय. शेवटी अजून वाट शोधायचा निर्णय घेतला. नाहीच सापडला तर पुन्हा टाक्याजवळ येऊन बसायचे ठरवले होते. मला माहित होते तुम्ही मला शोधत इथेच येणार... आलास की नाही!!!
मी : (कपाळावर हात मारत) धन्य आहेस. चल आता. चांगला अर्धा तास वाया गेलाय.

आम्ही खाली उतरत असताना अभि सुद्धा रोप घेऊन परत येताना दिसला. आम्ही दोघे येताना बघून तो पुन्हा परत फिरला. ९:३० वाजता रॅपलिंग करून ऐश्वर्या खाली उतरून गेली.


त्या मागून मी. सर्वात शेवटी अभि उतरला. अलंग आणि मंडण या दोन्ही ठिकाणाचे रोप आवश्यक असणारे टप्पे पूर्ण झाले होते. आता होता तो फक्त कुलंग ट्रेक. उरलेल्या पायरया उतरून आम्ही खाली आलो. मध्ये तो छोटासा धोकादायक टप्पा मात्र रोप न लावता पार केला. ते सुद्धा सॅक घेऊन.

१०:१५ च्या आसपास. मंडण वरून कुलंगच्या वाटेने निघालो. पण इथेच पाहिली गडबड झाली. वाट सापडेना. सांगातीच्या माहितीप्रमाणे मंडणच्या पायऱ्या सुरू होतात तिथे आसपास कुलंगवरून येणारी वाट आहे. मी जे फोटो पहिले होते त्यात मात्र अलंग-मंडण यांच्यामध्ये जी घळ आहे त्यातून वाट खाली उतरून मंडणला फेरा मारत कुलंगकडे जाते अशी माहिती  होती. आसपासच्या कारवीमुळे वाट सापडेना. रान माजले असेल तरी वाकून किंवा खाली बसून पहिले तरी वाटेचा अंदाज घेता येतो. कारण मळलेली वाट एकदा तयार झाली की तिकडे गवत, झाडे उगवत नाहीत. फारतर वाटेवर झाडे वाकून वाट बंद झाल्यासारखी वाटते. इथे मात्र अर्धातास अथक प्रयत्न करून शोधाशोध करून देखील वाट काही मिलेला. अखेर आम्ही घळीमधून खाली उतरायचे ठरवले. पहिला टप्पा संपला की बाहेर पडायला कुठेतरी वाट असेल असा आमचा अंदाज होता.

अलंग-मंडणच्या मध्ये असलेल्या खिंडीमधून उतरायला सुरवात केली तेंव्हा ११ वाजले होते. इथून कुलंग म्हणजे संध्याकाळ होणार हे नक्की होते. शक्य तितक्या वेगाने आम्ही उतरायला लागलो. मध्ये -मध्ये घसारा होताच. अशाच एका ठिकाणी मी दणदणीत आपटलो. डावीबाजू सणकून दुखायला लागली. मग जरा वेळ तिथेच बसलो. पुन्हा मार्गक्रमण सुरू. संपूर्ण लक्ष्य डाव्याबाजूला काही क्लू मिळतो का ते बघण्यात. आता पाहिला टप्पा संपला होता पण वाट काही सापडेना. ती घळ आम्हाला कुलंग पासून लांब लांब नेत होती. १२:३० झाले तरी डावीकडे सरकायला जागा मिळेना. लंच रद्द. पुन्हा तयार खादाडी फस्त. थोडी चर्चा. दुपारी ३ पर्यंत वाट नाही मिळाली तर आपण कुलंग गाठायच्या ऐवजी गाव गाठायचे.


पुढे निघालो. आता तर मंडण देखील वरच्या बाजूला दिसणार नाही इतक्या खाली येऊन पोचलो. वाट पूर्णपणे चुकलो आहे ह्याची मला खात्री झालेली. कुलंग तर दिसतच नव्हता. पण डावीकडे सरकायला जागा तर मिळायला हवी... :( उजव्या बाजूला दूरवर मात्र अलंग आणि कळसुबाईला जोडणारे डोंगर दिसत होते. एके ठिकाणी छान ओहोळ लागला. उशीर होत असूनही तिथे बसलो. फ्रेश झालो. इतक्यात अभिला डावीकडे जाणारी मळलेली वाट मिळाली. चला... काहीतरी मिळाले.. बघुया..
त्यावाटेने चालत पश्चिमेच्या दिशेने निघालो. घळीत उतरल्यापासून आम्हाला एकही मानवी अस्तित्वाच्या खुणा दिसल्या नव्हत्या. ना कुठे चिकलेट-चॉकलेटचे व्र्यापर, ना गोवा गुटखा ना काही. ह्या घळीतून कोणी गेलेले नाहीच आहे की काय असे वाटावे इतके. २० एक मिनिटे त्या वाटेने पुढे गेल्यावार लाल मातीची वाट मिळाली. ही वाट नक्की कुलंगवाडीला जाणार याची मला खात्री पटली. ह्या वाटेवर लवकरच पुन्हा डावीकडे जाणारी वाट मिळणे गरजेचे होते. आता कुलंग समोर दिसू लागला होता. मंडणला खालून का होईना वळसा पूर्ण झाला होता. दुपारचे ३ वाजत आले होते. पण अजूनही हवीतशी वाट मिळेना.. :(

अखेर आम्ही ठरवले. ह्यावाटेवर जात राहायचे. योग्य वाट मिळाली तर ठीक नाहीतर कुलंग रद्द करून कुलंगवाडीकडे मोर्चा वळवायचा. कारण कुलंगवाडीवरून कुलंग माथा गाठायला तब्बल ५-६ तास लागतात. इथून सुद्धा आम्हाला ४ एक तास सहज लागले असते. आणि तितका वेळ आमच्याकडे नव्हता. अखेर ४ च्या सुमारास आम्ही अगदीच खाली उतरून आलो. रानात एक माणूस भेटला. त्याच्याकडून नीट वाट विचारून घेतली. इथून किमान ४ तास लागतील हे समजल्यावर कुलंगवाडी- आंबेवाडी रस्ता कसा गाठायचा? हा प्रश्न निमुटपणे विचारला.


अर्ध्यातासात डांबरी रस्ता गाठला. गेल्या २ दिवसात अलंग - मंडण फत्ते झाले पण कुलंग राहून गेला. उद्या करणे तो शक्य असले तरी आम्ही काही कारणाने आजच परत जायचा निर्णय घेतला...


कुलंगवाडीला परत येण्याचे सबळ कारण मात्र मिळाले होते.. राहिलेला कुलंग लवकरच फत्ते करायचा होता की...


********************************* समाप्त ************************************

21 comments:

 1. :) मला ते 'कोसला' कादंबरीतलं लेखकाचं आणि त्याच्या मित्राचं डोंगरावर हरवणं आठवलं!
  आणि नशीब, उजेडातच मिळाली ही हरवलेली ऐश्वर्या! :)
  भारीच रोमांचकारी आहे हा हे तुमचं फिरणं!

  ReplyDelete
 2. Agadi Besht Trek hota....
  Vachun Swatach gelyacha feel ala....
  :)

  ReplyDelete
 3. आकाशातली नक्षी आवडली...फ़ोटो खुप मस्त आले आहेत....

  ReplyDelete
 4. लैई लैई भारी... हॅट्स ऑफ

  ReplyDelete
 5. आई गं... कसले सही वर्णन आहे रे... फोटोही मस्त....

  ऐश्वर्या हरवली...ती सापडेपर्यंत वाचणाऱ्यांनाही धाकधूक :)

  ReplyDelete
 6. सेनापती मस्त अनुभव आहे. लिखाण आणि त्याला फोटोंची अप्रतिम साथ. वाचताना एकदम गुंग व्हायला झाले. आम्ही देखील फिरलो पण सगळ्या ओळखीच्या आणि मळखाऊ तांबड्या वाटा तुडवल्या. हा असा थरारक अनुभव एकदा घ्यायलाच हवा. तुम्हा तिघांना सलाम...

  ReplyDelete
 7. भट्कंतीच्या बहूतेक पुस्तकात या त्रिकूटाचे नाव "अलंग-कुलंग-मदन" असेच वाचनात आले आहे.मदनचे "मंडण" हे नामकरण प्रथमच वाचतोय.बाकी ट्रेक तर नेहमीप्रमाणे थरारक आणि अंगातील रग जिरवणाराच झाला आहे.

  ReplyDelete
 8. तुसी ग्रेट हो

  ReplyDelete
 9. मी, हेरंब ओक, शपथ घेतो की स्वदेशी आल्या आल्या किमान दोन ट्रेक सेनापती रोहनअण्णांबरोबर करेनच करेन !!!

  रोहणा, जबरदस्त अनुभव.. मानलं तुम्हाला. ऐश्वर्या आणि वाट सापडेपर्यंत भारी टेन्शन आलं होतं !

  ReplyDelete
 10. रोहना... वेड्ड माणसं आहात तुम्ही. लय भारी... तुम्हा तिघांचा प्रवास खरच भन्नाट होता.

  ReplyDelete
 11. अरे हा!!! फोटो झक्कास आहेत. कुलंग राहिला ह्याची चुटपुट मलापण लागुन राहिली राव. श्या!!! त्या एकदाचा कुलंगला सर करच रे!!!

  ReplyDelete
 12. रोहना, सगळेच फोटो अप्रतिम आलेत. तुमचा हा अनुभव जबरीच झालाय. बापरे! ऐश्वर्या हरवली/ का घसरली की काय या नुसत्या कल्पनेनेही तुमचे काय झाले असेल.. आणि शेवटी त्या वाटेनेही टुकटुकच केलेय. नेक्स्ट टाईम, होऊनच जाईल. :)

  ReplyDelete
 13. मस्तच. फ़ोटो आणि वर्णन दोन्हीही.

  ReplyDelete
 14. धन्यवाद दोस्तांनो.. आता पुढची मोहीम पुढच्या महिन्यात... :)

  सचिन... मी सुद्धा अनेक ठिकाणी मदन असे वाचले आहे.. पण ती पुस्तके १९९६ नंतरची आहेत... 'सांगाती सह्याद्रीचा' मध्ये 'मंडण' असा उल्लेख आहे... (१९९३) हा बदल कधी झाला?

  सौरभ, श्री ताई.. अलंग लवकरच फत्ते केला जाईल... :)

  हेरंब.. तू ये आधी मग बघू... :)

  ReplyDelete
 15. फोटो छान आहेत. सूर्यास्ताचे फोटो तर अप्रतिम आले आहेत.

  ReplyDelete
 16. Kharach khup chaan aahe....

  फोटो अप्रतिम आलेत....

  Best luck for ur Next Treck

  ReplyDelete
 17. खूपच छान वर्णन केले आहेस आणि त्याहून सुंदर फोटोस :)
  भाग ४ ची वाट बघतोय !!

  ReplyDelete
 18. are tuza dusara blog open ka hot nahiy??? blog dlt. asa yetay. kadhalasa ka blog?

  ReplyDelete
 19. सेनापती मस्त झाली तुझी स्वप्नपुर्ती ...फोटोही छान ... लागे रहो... :)

  ReplyDelete
 20. एखादेवेळी तरी तुमच्यासोबत भटकायला यायलाच हवे. :)

  ReplyDelete