Thursday, 4 February 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - 'कविता'च्या मनातून ... !

मला लहानपणापासून डोंगरांची नितांत आवड. त्यांच्याकडे जायची सुप्त इच्छा सतत मनात येत असे. डोंगरात जावे आणि निसर्ग भर-भरून पहावा असे सारखे वाटायचे. त्यामुळे ट्रेकला जाण्याची इच्छा निर्माण झाली. टेंटमध्ये रहायचे, ब्लैंकेट घेउन झोपायचे आणि आकाशात बघत तारे मोजायचे... काय मस्त ना... आयुष्यातले सर्वात सुखद क्षण हे.. नाही का ... !!! अशी संधी मला मिळाली ती 2000 साली. एक असा अनुभव जो मला देऊन गेला आयुष्यभरासाठी थरारक अनुभव, कधी न विसरता येतील अश्या आठवणी आणि मित्र-मैत्रिणीं. माझा भाऊ हिमांशुने मला या ट्रेकबद्दल जेंव्हा सांगितले तेंव्हा मी लगेच तयार झाले. नुकतीच कोंलेजमध्ये गेलेली मी हा नवा अनुभव घ्यायला उत्सुक होते. ट्रेकला जाण्याआधी मात्र एक महत्वाचे काम बाकी होते ते म्हणजे आई-बाबांची परवानगी. नशिबाने हिमांशू सोबत असल्याने फारसे अड़थळे न येता ते पार पडले. कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़ अश्या ५ दिवसांच्या ट्रेकमध्ये मी अनेक अविस्मर्णीय अनुभव घेतले. डोंगरात कसे राहावे, चुल कशी पेटवावी आणि त्यावर जेवण कसे बनवावे, पार्ले-जी पाण्याबरोबर कसे खावे (विचित्र वाटतय?? खाऊन बघा एकदम सही लागते..!!)

जस-जसा ट्रेकचा दिवस जवळ येत होता तशी-तशी माझी उत्सुकता वाढत जात होती. आदल्या रात्री तर मी झोपलीच नाही. क्षणा-क्षणाला मिळणाऱ्या आईच्या सूचनांचे पालन करत सामान भरले. ट्रेकच्या दिवशी दुपारी सर्वजण सी.एस.टी.ला जमले. माझी नजर  सर्वांकडे फिरत होती. वयाने ३-४ वर्षे मोठे असणाऱ्या ह्या ग्रुपमध्ये आपण फिट बसू का? असा प्रश्न मानत यायला लागला होता. सर्वांशी ओळख करून घेतली. आम्ही एकुण १८ ट्रेकर्स. राहुल, शेफाली, सत्यजित, हिमांशु, अभिजित, मनाली, रोहन, दीप्ती बावा, सुमेधा, आशिष पालांडे, कवीश, प्रवीण, सुरेश नागवेकर, प्रशांत आचरेकर, अभिषेक डोळस, संतोष मोरया, विवेक आणि मी कविता. शिवाय काका, राजेश आणि विली होतेच.कल्याण येईपर्यंत आम्हा सर्वांची ओळख झालेली होती. इकडून पुढे मात्र आम्हाला दुसरी गाडी पकडून इगतपुरीला जायचे होते. जेंट्स डब्यात इतके गर्दी होती की मुलींनी सर्व सामान घेउन लेडिज डब्यात जावे असा सल्ला मिळाला. "काय...५ मुली आणि २० ब्यागा.. काय वेडे झाले की काय हे.. म्हणजे आम्ही हे सामान चढवायच आणि इगतपुरीला उतरवायचे सुद्धा???" हिच माझी पहिली प्रतिक्रया होती. अखेर त्या सर्व सॅक्स घेउन आम्ही लेडिज डब्यात चढलो. आमच्या ५ जणींकडे इतके सामान बघून इतर बायका डोळे विस्फारून बघत होत्या. कुठे वरती, कुठे सीट खालती अश्या सर्व सॅक्स बसवल्या. चांगली ४५ मिं. ही कवायत सुरू होती. आधी त्रास वाटणारा हां प्रकार नंतर मात्र एक टीम एक्टीव्हिती झाला होता. निवांत बसतो न बसतो तसे समोरची एक बाई बोलली,"पोरींनो, इतके सामान घेउन इगतपुरीला उतरायचे कश्या तुम्ही. गाडी २ मिं. थांबेल फ़क्त तिकड़." खरच आम्हाला हच प्रश्न पडला होता. मग आम्ही ५ जणी मिळून ठरवू लागलो की हा टास्क कंप्लीट कसा करायचा आहे. प्लानिंगचा पहिला धडा हा असा मिळाला. शेवटी असे ठरले की २ आणि ३ चे दोन ग्रुप करून, वेगवेगळ्या २ दरवाज्यामधून सामान बाहेर काढायचे. ट्रेन इगतपुरीला नेमकी कधी पोचणार ते माहिती करून घेतली आणि मग आम्ही सर्वचजणी ज़रा निवांत झालो. बसायला तशी जागा नव्हती पण "बाय.. सरख की बासुदे पोरीना थोडावेळ, दमल्या असतील" असे म्हणुन आजुबाजुच्या बायकांनी सरकून बसायला जागा दिली. गप्पा मारत २ तास गेले. पुन्हा ती बाई बोलली,"बाय सामान काढाय घ्या. स्टेशन येइल आता." मग पुन्हा एकदा कवायत सुरू झाली. सर्व जणींनी 'जमेल ना तूला' म्हणुन विचारायचे आणि 'न जमायला काय झाले तू काळजी नको करू' असे म्हणून म्हणून सर्व सामान दाराजवळ आणून ठेवले. अखेर ती २ मिनिटे आली. आम्ही त्या सर्व २० बाग्स बाहेर काढल्याच पण आतमध्ये जाउन पुन्हा एकदा काही राहिले नाही ना याची खात्री सुद्धा केली. सर्जन इगतपुरी बसस्टैंडकडे चालू लागलो. आज रात्र तिकडेच काढायची आहे असे मला कळले. बसस्टैंडवर रहायचे??? तिकडे पोचल्यावर काही मिनिटात हिमांशू आणि राजेशने सर्व सामान उचाकले आणि ग्रुप्स पाडून त्या-त्या ग्रुपच्या हवाली केले. सर्व आटपून झाल्यावर आम्ही जरा पडलो तर कोणाला तरी बाकडाखाली उंदीर दिसला. नशीब तो लगेच गायब झाला. सकाळ झाली तसे आम्ही निघालो. काकाने राहुलला माझ्या बैगमध्ये अजून सामान भरायला सांगितले कारण माझी बैग खुपच लहान आणि हलकी होती. मला धक्काच बसला. पण मी ती बैग घेतली.

कळसुबाईला पोचलो तेंव्हा तिकडे सुंदर दृश्य पसरले होते. ढगांची सावली डोंगरावर पडल्याने मनोहारी चित्र निर्माण झाले होते. आम्ही पुढे जाउन एका मंदिरात थांबलो. चुल कशी बनवतात, कशी पेटवतात हे बघण्याचा हा माझा अगदी पहिलाच अनुभव होता. नाश्ता केला आणि पुढे निघालो. चालायला सुरवात केल्यावर मला बैगचे वजन चांगलेच जाणवू लागले होते. पण नंतर नंतर एकत्र चालता-चालता बोलता-बोलता सवय होऊ लागली. मध्ये एके ठिकाणी मात्र मी पाय घसरून अशी पडले की काय विचारू नका... त्या उभ्या चढाची भीती मनात बसली एकदम. पण अभिजितने माझा हात पकड़त मला 'काही होत नाही. पुढे चल' असे म्हणून सोबत नेले. काका माझ्या मागेच होता. तो सुद्धा मला शांत रहा. घाबरू नकोस असेच सांगत होता. अभिजित त्या वेळेला इतका बारीक होता की एक क्षण तो मला खेचायच्या ऐवजी मीच त्याला खाली खेचेन की काय असे मला वाटले होते. काकाने मग तिथल्या तिथे डोंगरात चढताना आणि उतरताना वजन कसे सांभाळावे ह्याचे एक छोटेसे प्रत्याक्षिकाच दाखवले. मला घेउन तो चक्क धावत खाली उतरु लागला आणि एके ठिकाणी त्याने थांबायचे कसे हे सुद्धा दाखवले. माझी भीती आता नाहीशी झाली होती. अखेर खुप वेळाने आम्ही वरती पोचलो. महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरुन दिसणारे ते दृश्य अप्रतिम होते. नजर हटत नव्हती माझी एका क्षणासाठी. तिकडे आम्ही दुपारचे जेवण घेतले आणि मग कुंकवाच्या करंडयाकडे निघालो. डोंगर चढण्यापेक्षा उतरणे सोपे असेल हा समज सुद्धा इकडे दूर झाला. इतक्या वेळा मी पडले की “The whole group came down climbing and Kavita came tumbling after” असे काहीसे मनात आले होते. आम्ही इतरांच्या बरेच मागे पडलो होतो. मी. शेफाली, हिमांशू आणि हर्षद. सोबत काका होता. पण जरासे पुढे असणारे हिमांशू आणि हर्षद रस्ता चुकल्याने काकाच्या नावाने बोंबा मारत होते. अखेर काकाने त्यांना आवाजावरुन शोधले. अखेर त्या ट्रकपाशी जाउन पोचलो. एका दिवसात किती विचित्र घटना घडू शकतात? त्या ट्रकमध्ये आम्ही इकडून तिकडे घरंगळत होतो. एकमेकांच्या अंगावर पडत “एस्सेलवर्ल्डमे रहूंगा मै.. घर नाही जाऊंगा मै.." असे ओरडत होतो. 'ओ भाऊ, जरा हळू चालवा. माझे लग्न नाही झाला आहे अजून." ह्या प्रशांतच्या वाक्यावर आम्ही सर्व फुटलो. शेंडीला पोचलो आणि जेवल्यानंतर गुडुप झालो. रात्रभर कंबर-पाठ दुखत होतीच. दुसऱ्या दिवशी सकाळी नुडल्स बनवण्याचा प्लान फासला आणि आम्ही चहा-बिस्किट्स खाऊन तसेच पुढे निघालो.

भंडारदरा धरण पार करत रतनवाडीला पोचलो आणि उशीर झाल्याने काकाने रतनगड़ला जाणे रद्द केले. आता आम्ही थेट कात्राबईच्या खिंडीकडे निघालो. आणि तिथे पोहचेपर्यंत देखील उशीर झाल्याने आम्ही जंगलात राहायचा निर्णय घेतला. सही ना...!!! अंधार पड़ता पड़ता चुल आणि कैंप फायर पेटवल्या आणि गप्पा मारत बसलो. तिकडे जेवणाची तयारी सुरू होती. सर्वजण बोलत होते पण मी मात्र गप्प होते. अचानक माझे लक्ष्य वरती आकाशाकडे गेले. संपूर्ण आकाशात अनेक तारे लुकलुकत होते. जणू काही एकमेकांशी बोलत होते ते. तो एक क्षण मला सर्वांसोबत जोडून गेला. मग मी सुद्धा बोलायला लागले सर्वांबरोबर. नंतर तर सर्वांच्या मधोमध असुनही माझे लक्ष्य आकाशाकडेच होते. लहानपणापासून जी गोष्ट कराविशी वाटत होती ते आज मला करायला मिळत होते. झोप कधी लागले ते सुद्धा कळले नाही. नंतर मात्र अंगात अशी थंडी भरली की मला बोलवेना. अखेर काकाने मला ईलेक्त्राल दिल्याने अंगातली थंडी गेली.


पुढच्या दिवशी आम्ही जंगलातून पाचनाई मार्गे हरिश्चंद्रगड़ला पोचणार होतो. जंगलात सर्वत्र विविध प्रकारची झाडे दिसत होती. हा अनुभव सुद्धा मला नविनच होता. आम्ही दुपारपर्यंत मंगळगंगेच्या काठाला पोचलो. ३ दिवसांनी मनसोक्तपणे पाण्यात दूंबायला मिळत होते. दुपारनंतर खुप चाल मारत अखेर पाचनाईला पोचलो. इतका उशीर झाला होता की आज आपण इतकेच राहू, सकाळी गडावर जाऊ असे वाटले होते. पण नाही... काकाने रात्रीच गड़ चढण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही सर्व इतक्या दमले होतो की रडू कोसळणे बाकी होते. पण मग एक प्लान ठरला. संतोषने त्या चढ़ाईमध्ये माझी खुप मदत केली. मी इतकी दमले होते की बाकीचे सर्व कोण..कुठे..कसे आहेत ह्याची मला शुद्ध नव्हती. केव्हमध्ये जाउन मी झोपून गेले. अभि आणि शेफालीने मला पार्ले-जी खायला दिले पण २ बिस्किटे खाऊन मी पुडा हातात घेउन झोपी गेले. सकाळी उठले तेंव्हा हात-पाय आहेत का ह्याची सुद्धा शुद्ध नव्हती. पण काकाने बनवलेल्या पोह्याची चव अजून सुद्धा तोंडावर आहे. आम्ही मग गड़ बघायला निघालो. कोकणकडा बघून तर मला उंचीची भीती वाटुन राहिली. मी आणि कडयाच्या इतकी जवळ... परत आलो तर काकाचा मुड बिघडलेला.. कोणीतरी पोहे टाकले म्हणून मग त्याने सर्वांना शिक्षा म्हणून आमचा १ दिवसाचा स्टे वाढवला आणि आम्हाला संपूर्ण गुहा साफ़ करायला लावली. आधी शिक्षा वाटणारे हे काम नंतर मात्र प्रमाणीकपणे आपले वाटू लागले. आपला इतिहासिक ठेवा आपण जपायचा नाही तर कोणी? का लोक येथे येउन कचरा करतात? भिंतीवर नावे लिहितात? अश्या लोकांचा मला खुप राग आहे. जेवणासाठी बनवलेली दालढोकळी कवीश सोडून कोणीच फारशी खाल्ली नाही. मी त्याला दालढोकळी देऊन त्याच्याकडून गुलाबजाम घेतले. भारीच झाला हा सौदा...!!! ह्या ट्रेकमध्ये अजून एक गोष्ट जी मी शिकले ती म्हणजे ताटात असलेले काहीही न टाकता सर्व खाणे. मग ते लसुण असो नाहीतर लोणचे. २६ ऑक्टोबर ट्रेकचा शेवटचा दिवस होता. आज होता प्रशांतचा वाढदिवस. तेंव्हा सर्वांनी त्याला गुलाबजाम भरवले. जरा जास्तच.!!! अखेर आम्ही परतीच्या वाटचालीला लागलो. खाली खिरेश्वरला एका झाडाखाली प्रत्येकाकडे चूरमुरे, चोकलेट्स, पार्ले-जी, पेपरमिंट, व्हेफर्स..जे काही होते ते मिक्स करून स्नाक्स बनवले. एका अविस्मरनीय ट्रेकची सांगता होती. आज सुद्धा जेंव्हा-जेंव्हा आम्ही सर्व भेटतो, तेंव्हा-तेंव्हा त्या सर्व आठवणी जागवतो आणि खुप-खुप हसतो...
.
.

11 comments:

 1. Rohan,
  Tumchya trekche je photo ahet tyala label kelet tar ajun informative hoteel. Chan photo ahet- mazya dongaratlya athwaneenche.

  Bakihi trek chi warne chan ahet

  ReplyDelete
 2. माधुरी . ह्या ट्रेकच्या वेळी फारसे फोटो नव्हते... जिथे आणि जसे फोटो असतात तसे मी पोस्ट सोबत टाकतोच.

  ReplyDelete
 3. कविता,
  तुझे ही लिखाण आवडले. रोहन चे लिखाण नेहमीच आवडते पण तुझेही कौतुक!!! तुझ्या बरोबर मला ही माझा हा ट्रेक आठवला. लिहिण्यासाठी तुम्हा दोस्ताना शुभेश्चा.

  ReplyDelete
 4. You are in "Saptahik Sakal" this week... :-)
  Rohan...ya athavadyachya (21st Feb) Saptahik Sakal "Paryatan Visheshank" aahe ani tyat internet waril paryaTan asa kahitari section/lekh aahe..
  tya lekha madhe tujhya ya blog cha ullekh aahe...ani tyacha snapshot pan takalay tikade...
  nakki paha

  ReplyDelete
 5. कुठे??? लिंक दया की ...!

  ReplyDelete
 6. are online saptahik sakal madhe to particular lekh nahiye...me check kela

  http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html

  so tu kuthun tari to anka wikat ghe :-)
  kiva konalatari gheun thevayala sang

  ReplyDelete
 7. व्वा! साक्षात फ़िरून आल्यासारखं वाटलं. मस्त जमलंय.

  ReplyDelete
 8. वा अतिसुंदर... आणि मला अभिमान वाटतो..कि हरिश्चंद्र गढ माझ्या अकोले तालुक्यात आहे... अजूनही भरपूर ठिकाणे आहेत अकोलेमध्ये जिथे निसर्ग आपले सौंदर्य मुक्तहस्ताने उधळतोय... कधी पावसाळ्यात जाऊन बघा अकोले च्या निसर्गात......!

  ReplyDelete
 9. खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

  ReplyDelete
 10. मी काही क्षण भूतकाळात जाऊन आल्यासारखे वाटले. त्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या आणि पुन्हा वर्तमानात येऊ नये असे वाटले. ह्याबरोबर तुझा पोस्ट सुद्धा वाचला. आपण पुन्हा सर्वानी भेटले पाहिजे.
  Blogs/posts, really are a medium of time machine. They take you back in time. :)

  ReplyDelete