Monday 14 September 2009

भाग २ - गोरखगड ... !

शिवमंदिरापाशी थांबलो होतो तेंव्हा हेडटॉर्चच्या प्रकाशात खादू-पिदू झाले आणि आम्ही सगळे शेवटच्या टप्याच्या चढाईला लागलो. पुन्हा एकवार राजेश सर्वात पुढे आणि मी सर्वात मागे. निघताना शिवपिंडीला नमस्कार केला. मंदिराकडे तोंड करून उभे राहिलात की तुमच्या बरोबर उजव्या बाजूला थेट वरती गोरखगडाचे प्रवेशद्वार आहे. चालायला म्हणजे चढायला सुरुवात केली. १० पावले वर चढलो की लगेच दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या सुरू होतात. इकडे जरा काळजीपूर्वक कारण बऱ्याच पायऱ्या तूटलेल्या आहेत आणि अंधारात त्या काही नीट दिसत नाहीत. उजवे-डावे वळसे मारत पायऱ्यावरुन थोडं वर गेले की एका ठिकाणी जराशी सपाट जागा आहे. पौर्णिमा असेल तर ह्या ठिकाणाहून प्रवेशद्वाराचा छानसा फोटो घेता येतो. आज मात्र पंचमी होती त्यामुळे तसा फारसा चंद्रप्रकाश नव्हता. तिकडे १-२ मिं. थांबलो आणि पुढच्या चढाला लागलो.


आता पायऱ्या लांबीला चांगल्या भल्या मोठ्या आहेत पण रुंदीला तितक्या मोठ्या नाहीत. गोरखगडला पावसाळ्यात गेलात तर इकडे जरा जास्त सांभाळून. रुंदीला तितक्या मोठ्या नसणाऱ्या ह्या पायऱ्या खडया चढाच्या आहेत. ह्या ३० एक पायऱ्या चढून गेलो की लागतो गोरखगडाचा दरवाजा. इकडे पोचून आता जरा मागे वळून तर बघा... कळेल मी खडया चढाच्या पायऱ्या म्हणजे काय म्हणतोय ते. गडाचा दरवाजा उंचीला फारतर ४ फुट आणि रूंदीला ३ फुट. ८ एक फुट लांबीचा पथ्थर खोदून हा दरवाजा बनवला गेला आहे. दरवाजा पार करून दुसऱ्या बाजूला निघालो की आपण असतो गोरखगडाच्या आतमध्ये. आता पुढची संपूर्ण चढाई दगडी आहे. म्हणजे वरती गुहेकडे पोचेपर्यंत छोटे छोटे रॉकपॅच आहेत. मोठी सॅक पाठीवर असेल तर जरा सांभाळून कारण १-२ ठिकाणी ती अडकायचा संभव आहे. इकडे पोहचेपर्यंत आम्हाला काहीच त्रास झाला नव्हता. निवांतपणे रॉकपॅच पार करून आम्ही वर सरकलो. गोरखगडाचा सुळका एकदम जवळ येउन ठेपला होता आणि आम्हाला कधी एकदा वर पोचतोय ही उत्कंठा लागली होती. मधल्या टप्यामध्ये त्या बाकीच्या २ पोरांना घेउन उतरणारे गावातले लोक भेटले. त्यांच्याकडचे सगळे पाणी संपले होते. त्या पोराच्या पायाला कमीत कमी हालचाल व्हावी म्हणुन लाकडाची पट्टी उभी बांधून आणि खांद्याला आधार देत-देत उतरवत होते. त्यांना विचारला 'काही औषध वगैरे आहे का ? नसेल तर हवे का?' सगळ्याला उत्तर "नाही". पाणी तेवढे घेतले बास.
पहाटेचे ३ वाजत आले होते आणि आम्ही सर्वजण गडाच्या सुळक्यापाशी येउन पोचलो. उजव्या बाजूची पायवाट आपल्याला ८-१० पायऱ्या उतरवून गुहेकडे नेते. गुहेबाहेर पाण्याच्या टाक्या आहेत. पण त्यात पाणी कमी आणि कचरा जास्त भरलेला असतो. आम्ही गुहेत पोचलो तेंव्हा गडावर कोणीच नव्हते. गुहा प्रशस्त्र असून किमान ५० जण मावतील इतकी मोठी आहे. गुहेमध्ये डाव्या बाजूला 'नवनाथ पंथीय' देवांची स्थापना केलेली आहे तर उजव्या भागात आपल्याला रहता येते. तसा गुहेचा उजवाच भाग झोपण्यायोग्य आहे कारण जमीन ह्याच भागात तशी सपाट आहे. योग्य जागा शोधून आम्ही थोडावेळ पाठ टेकली. मी, राजेश आणि शेफाली गुहेमध्ये गप्पा टाकत बसलो तर अभि आणि सुमेधा गुहेबाहेर पायऱ्याच्या बाजूला एक मस्त मोठा सपाट प्रस्तर आहे त्यावर गप्पा टाकत बसले होते. रात्री गप्पा मारता-मारता मला झोप कधी लागली ते कळले पण नाही. पहाटे-पहाटे मला जग आली तेंव्हा अभि, शुमेधा आणि राजेश जागे होते. बहुदा ते झोपलेच नव्हते. शेफाली नुकतीच उठली होती. आम्ही सर्वांनी आवरून घेतले आणि गडफेरीला निघायची तयारी केली.
गुहेच्या बरोबर समोर आहे तो 'मछिंद्र सुळका'. त्यावर चढाई करायची म्हणजे प्रस्तरारोहण करावे लागते. अर्थात अर्ध्याअधिक मातीचा घसारा आहे हे खरे. तिकडे जायचा काही प्रश्नचं नव्हता.  गोरखगडाच्या सुळक्यावर चढाई करायला मात्र पायऱ्या खोदलेल्या आहेत. गुहेबाहेर पडलो की डाव्याबाजूला निघायचे. वाट थोडी निमूळती आहे. मध्ये-मध्ये पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. पुढे मात्र सपाट पायवाट आहे. पायवाट जिकडे डावीकडे वळू लागते तिकडे उजव्या हाताला एक प्रस्तर आहे. त्याच्या बरोबर समोरुन आणि पायवाटेच्या डाव्याबाजूने सुळक्यावर जायचा मार्ग आहे.
.
.
.
क्रमश: .....

2 comments:

  1. रोहन,आता एकदातरी तुझ्याबरोबर भ्रमंती करावीच लागणार. खूपच उपयुक्त टिप्सही दिल्या आहेस.वर्णनही मस्त करतोस रे, वाटतेय मीही तुमच्या गृपबरोबरच आहे.:)

    ReplyDelete
  2. ठाण्यात जेंव्हा याल ना तेंव्हा नक्की कळवा मला. आपण भटकंती करायला जाऊ... :)

    ReplyDelete