Wednesday 29 April 2009

भाग २ - दुर्गराज रायगड ... !











मजल-दरमजल करत आम्ही सगळे होळीच्या माळावर पोचलो. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर
तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे. आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??? मनातल्या मनात राजांची क्षमा मागत मुजरा केला आणि मागे वळून चालू लागलो. होळीच्या माळावर उजव्या बाजूला गडाची देवता शिर्काईचे मंदिर आहे. देवीची मूर्ती दशभुजा असून आजही दरवर्षी गडावर देवीचा उत्सव भरतो. अंबारखाना म्हणुन ओळखली जाणारी वास्तु आज पूरातत्वखात्याचे कार्यालय म्हणुन बंद केली गेली आहे.

















पुतळ्या समोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४७ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ' असे म्हटले गेले आहे. त्यात आहेत एकुण ४७ दुकाने. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे. डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र शेषनागाचे दगडी शिल्प आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे. आम्ही मात्र पहिल्याच घरात विसावलो होतो. माहीत नाही ते कोणाचे होते पण सध्या आम्ही कब्जा केला होता. निवांत बसलो आणि नाश्ता उरकला. पहाटेच वर चढून आल्यामुळे नाश्ता करता आला नव्हता. काही वेळाने निघालो आणि नगरपेठ पार करून पुढे गेलो. आता डाव्या बाजूला लागतो गडाचा कडेलोट उर्फ़ टकमक बघायला लावणारा ८०० फुट टकमक कडा. तिकडे जाताना आधी गडावरील 2 दारूकोठारे लागतात. उद्वस्त छप्पर आणि आत माजलेले झाडीचे रान अशी सध्या त्यांची अवस्था आहे. पुढे जाउन थोडसं उतरलं की टकमककड़े जाता येते. सांभाळून जावे आणि कडयावरुन विहंगम दृष्य पाहून परत यावे. आता टकमक वरुन ८०० फुट रॅपेलिंग सुद्धा करता येते. पण आम्ही काही ते आता करणार नव्हतो त्यामुळे पुन्हा मागे येउन नगरपेठेच्या उजव्या बाजूला चालू लागलो. समोर दिसत होता श्री जगादिश्वर मंदिराचा कळस. उजव्या बाजूला खाली दूरवर १२ टाकी आणि वाघ दरवाजाकड़े जायचा मार्ग आहे. वेळ कमी असल्या कारणाने तिकडे जाता येणार नव्हते. पण उदया प्रदक्षिणेमध्ये मात्र वाघदरवाजा खालून दिसणार होता.






श्री जगादिश्वर मंदिराच्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो. या ठिकाणी आहे 'श्री शिवछत्रपतींची समाधी'. मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे?'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.'' ही अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे. १९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले. राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी. त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली. समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो. समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात. बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज (अंदाजे २०००) राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि समाधीवरुन पुन्हा नगरपेठेवरुन होळीच्या माळावर पोचलो.




देशास्तव रायगडी ठेवी देहाला ... देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला ... ! बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ... !














आम्ही आता जाणार होतो राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी. पण त्याआधी डावीकडे खालच्या बाजूला उतरुन कृशावर्त तलावाकडे गेलो. त्याच्या डाव्या बाजूला बरीच पडकी घरे आहेत. दररोज राजदरबार किंवा आसपास ज्यांचे काम असायचे त्यांची घरे ह्या भागात असावीत. अशीच घरे गडाच्या खालच्या दक्षिण भागात सुद्धा आहेत. ते पाहून आम्ही पुन्हा वरती आलो आणि राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून पूर्वी ह्यावरती सुद्धा जाता येत असे. आता मात्र ते बंद केले आहे. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. ह्यातून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक. हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'. राजदरबारामधून प्रवेश करते झालो की एक दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे श्री जगदिश्वराचे मंदिर जे वास्तुशात्राला अनुसरून आहे. राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे. मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान. उजव्या बाजुस आहे देवघर आणि त्या पुढे आहे स्वयंपाकघर. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा खलबतखाना किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ अष्टकोनी स्तंभ. आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे गंगासागर तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे पालखीचा दरवाजा आणि डावीकड़े आहे मेणा दरवाजा. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा' असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. आम्ही पुन्हा मागे येउन स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरुन गंगासागर तलावाकडे गेलो आणि तिकडून पुन्हा पालखीचा दरवाजा चढून वर आलो. मार्गिका पार कडून मेणा दरवाजा उतरून पलीकडच्या बाजूला आलो. ह्या ठिकाणी आता महाराष्ट्र पर्यटनाची निवासस्थाने झाली आहेत. शिवाय त्यांचे कैंटीन सुद्धा आहे. आम्ही तिकडेच जेवणाची ऑर्डर दिली आणि आराम करत बसलो. फिरून सगळेच दमले होते पण तेवढ्या वेळात मी पुन्हा राजवाद्यात जाउन काही फोटो काढून आलो. बराच उशीर झाला होता. आता जेवून खाली सरकणे होते. जाताना मात्र आम्ही रायगड रोपवेने खाली जायचे ठरवले. संध्याकाळ झाली की उदयाच्या प्रदक्षिणेसाठी बाकी मंडळी पाचाडला जमणार होती. रोपवेने खाली उतरून आलो आणि पुन्हा पाचाडला परतलो. दिवसभराच्या भटकंतीनंतर दमलो होतो मात्र रायगड पहिल्याने सगळेच आनंदी होते. मला जमेल तशी आणि जमेल तितकी माहिती सुद्धा मी त्यांना दिली होतीच. पाचाडला पोचलो आणि देशमुखांकडे जेवणाची ऑर्डर दिली. तिकडेच एक खोली घेतली आणि बाकीच्यांची वाट बघत बसलो. संध्याकाळी उशिराने हळू-हळू सगळे आले आणि उद्याचा नेमका प्लान आम्ही ठरवला. सकाळी लवकर निघायचे होते त्यामुळे आम्ही जेवल्यानंतर निवांतपणे झोपी गेलो. आता प्रतीक्षा होती उद्याच्या रायगड प्रदक्षिणेची ...





क्रमश: ...

5 comments:

  1. आपला ब्लॉग मला फारच आवडला. खरोखर त्या त्या ठिकाणी गेल्यासारखे वाटते. लेखनशैली फारच अप्रतिम आहे. मला "रायगडावरील बाजारपेठ" यावर थोडा प्रकाश टाकायचा आहे. आपण असे लिहिले आहे की, "स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत." पण ती नगरपेठ नसून बाजारपेठच आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष खरेदी विक्री न होता फक्त वस्तूंचे सौदे होत असत. म्हणजे आपण ज्याला English मधे trading म्हणतो तेच फक्त होत असत. प्रत्यक्ष माल हा खालील बाजारपेठेतच ठेवला जाई.

    ReplyDelete
  2. विक्रम .. 'खरेदी विक्री न होता फक्त वस्तूंचे सौदे' हा कंसेप्ट मला सुद्धा thoda मान्य आहे ...

    आपण 'आप्पा परब' यांच्याबरोबर रायगड पाहिला आहे का ???

    ReplyDelete
  3. खरं सांगायचं तर मी अजुन रायगड बघितलेला नाही. पण मी श्री. आप्पा परब यांच्याबरोबर पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड हा ट्रेक केला आहे. ट्रेडिंग बद्दल मी नक्की कुठे वाचले आहे ते आठवत नाही. कदाचित शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भाषणात किंवा ग्रंथात वाचले असावे. आपल्याला याबद्दल अधिक माहिती असल्यास मला त्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. माझा ईमेल.........vikartoons@gmail.com

    ReplyDelete
  4. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत I Agree ti bajarpetha asne shakya ch naahi tmchi thing true thing vatate aahe itihasashi susangat vatate aahe.itihasamadhe tumchya vidhanala purava shodhava lagel aani to sapdel

    ReplyDelete
  5. ह्या संदर्भात आज्ञापत्रामध्ये काही उल्लेख आहेत. तसेच 'सप्त प्रकरणात्मक बखर' मध्ये सुद्धा काही उल्लेख आहेत. पण ते स्पष्टपणे ह्यावर प्रकाश टाकत नाहीत. अजून पुरावे शेधायला हवे हे निश्चित.

    ReplyDelete