Saturday, 12 September 2009

भाग १ - गोरखगड ... !

'गोरखगड ... गोरक्षगड' ... 'नाइट ट्रेक' म्हणजेच रात्री चढून जाण्यासाठी हा मस्त किल्ला आहे. अगदी पौर्णिमा असलीच पाहिजे असे काही नाही पण असली तर अजुनच मज्जा. मी गोरखगडला दोनदा जाउन आलो आहे. एकदा २००५ साली तर त्या नंतर २००८ साली भर पावसात. दोन्ही वेळेला भिडू वेगवेगळे. २००५ साली रंगपंचमीच्या दिवशी आलेला शनिवार पकडून मी, सुमेधा, अभिजित, मनाली आणि राजेश असे पाचजण गोरखगड येथे गेलो होतो. तर दुसऱ्या वेळेला ऑगस्ट महिन्यात भर पावसात ऐश्वर्या, हर्षद, सचिन, अनुजा, अभि, आदित्य असे काहीजण गेलो होतो. मार्च महिन्यात जेथे सह्याद्रीचा रांगडेपणा जाणवतो, पावसाळ्यात तेथेच अप्रतिम सौंदर्य विखुरलेले असते. गोरखगड तरी त्याला अपवाद कसा असेल.



मुंबई-ठाण्याहून निघाल्यावर कल्याणमार्गे मुरबाडला पोचले की S.T. स्टैंडच्या पुढच्या हाताला लगेचच उजवी मारली की आपण सिद्धगड़ - गोरखगडच्या रस्त्याला लागतो. आमचे लक्ष्य 'गोरखगड' असल्याने आम्ही मुरबाडवरुन बस पकडून थेट गोरखगडच्या पायथ्याला म्हणजेच 'देहरी' गावात उतरलो. गावात उतरलो की रस्त्याच्या डाव्या हाताला लगेचच 'हमीद पटेल'चे घर आहे. गावात पोचायला उशीर झाला तर इकडे रहायची सोय होऊ शकते. जेवण तर इकडे अप्रतिम मिळते. गोरखगड वर चढाई करायच्या आधी आम्ही इकडे जरावेळ निवांतपणे जेवण केले आणि गप्पा मारत बसलो. गडावरील गुहेमध्ये पोचायला तास पुरतात त्यामुळे रात्री ११ नंतर चढाई सुरू करायची असे सर्वानूमते ठरले. आम्ही बसलेलो असताना बाजूला बसलेला एक मुलगा अचानक मध्येच येउन आम्हाला बोलला,"मला जरा तुमची मदत हवी आहे". पूर्ण माहिती काढल्यावर कळले की सकाळी - जण वर चढून गेले होते त्यातल्या एकाला पायाला लागल्यामुळे उतरता येत नव्हते. त्यातले जण खाली गावात मदत घेण्यासाठी संध्याकाळच्या आत उतरले आणि गावातली लोक घेउन बाकीच्या मुलांना खाली घेउन यायला पुन्हा वरती गेले होते. का कोण जाणे पण त्यातला एकजण खालीच थांबला होता. तोच हा मुलगा.



आम्ही त्याला म्हटले, 'तू झोप आता आरामात. गावातली लोक गेली आहेत ना. आणतील त्याला बरोबर.' आम्ही बरोबर ११:३०ला निघालो. गडाच्या पायथ्याकडे जाण्यासाठी डांबरी रस्त्यावरुन पुन्हा थोडं मागच्या बाजूला चालू लागायचे. लगेचच म्हणजे अवघ्या ५० मीटर मध्ये डाव्या हाताला एक देउळ दिसू लागते. ह्या देवळामागुनच गडाकडे जाण्याचा रस्ता आहे. देवळामागून पायवाट हळू-हळू वर चढायला लागते. दिसायला अनेक असल्या तरी वर जाणारी वाट एकच आहे. त्यामुळे निश्चिंत होउन चढाई करावी. 'ही' वाट घेऊ की 'ती' ... असा प्रश्न पडायची गरज अजून तरी नाही. आमच्यात राजेश आधी येथे येउन गेला होता त्यामुळे तो सर्वात पुढे होता. मध्ये सुमेधा, अभिजित आणि शेफाली तर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सर्वात मागे मी. पायवाट आता डाव्या बाजूला सरकत वर चढत होती तर उजव्या बाजूला उतार जाणवतं होता. २० मिं. मध्ये चढ संपला आणि सपाटी लागली. रात्रीच्या १२ वाजता मस्तपैकी गप्पा मारत त्या सपाटीवरुन आम्ही गडाकडे निघालो होतो.



सपाटी संपली तसा गोरखगड आमच्या डाव्या हाताला होता तर उजव्या बाजुला दुरवर अंधारात सिद्धागडाची छाया दिसत होती आणि आमच्या बरोबर समोर होता 'शिंदोळ्याचा डोंगर'. इकडे बरेच नवखे वाट चुकतात कारण ह्याठिकाणी वाट उजवीकड़े उतरून पुढे जाते आहे असे वाटते पण खरेतर वाट पटकन डावीकडे वळून गोरखगडाच्या मूळ डोंगराच्या आणि ज्या सपाटीवर आपण असतो त्या पाहिल्या टेकडीच्या मधल्या खळग्यात उतरते आणि लगेच वर चढून गोरखगडाच्या मुळ डोंगरावर चढायला लागते. अभ्याने इकडे सुद्धा सिक्स़र मारायचा चान्स सोडला नाही. बोलता-बोलता तो मागे वळणार तितक्यात पाय घसरून पडला. तिकडे पाच मीं. टाइमपास केला आणि आम्ही खऱ्या चढणीला लागलो. साधारण अर्ध्या तासाची खडी चढण पार करून आपण एका झाडापाशी पोचतो. इकडे जरा दम घेतला. आता पुढे पुन्हा सपाटी आहे. पायवाट आता उलट्या 'C' आकारात वळत गोरखगडाच्या मागच्या बाजूला जाते. आता आपण गोरखगड आणि शिंदोळ्याचा डोंगर यांच्या बरोबर मध्ये उभे असतो. इकडे एक पडके शिवमंदिर आहे. आसपास बांधकामाचे विखुरलेले अवशेष आहेत. बहुदा इकडे आधी गडाची चौकी म्हणजेच 'मेट' असावी. मंदिरापाशी पोचलो तेंव्हा साधारण वाजत आले होते. वेळेची काही घाई नव्हती त्यामुळे आम्ही सर्वच आरामात चढत होतो. ह्याठिकाणाहून सुरू होते गडावरची तिसरी आणि शेवटच्या टप्यामधली चढाई...
.
.
.
क्रमश: .....

No comments:

Post a Comment