सुळक्याची चढण सुरू होताना पहिले ६-८ फुट 'फ्री क्लाइम्बिंग' करून चढावे लागते. त्या खालच्या छोट्याश्या प्रस्तरावर उभे राहिले तरी नेमके कसे चढायचे ते समजते. आमच्यामध्ये राजेश हा पक्का गिर्यारोहक. डोंगरामधला त्याचा अनुभवसुद्धा साधारण १५ वर्षे... तितकाच दांडगा. पहिला तोच वर चढून गेला. त्या मागोमाग सुमेधा आणि मग शेफाली. 'फ्री क्लाइम्बिंग' करताना एक गोष्ट नेहमी करावी ती म्हणजे चढणाऱ्याच्या मागे म्हणजेच खाली कोणीतरी आधार द्यायला उभे रहावे. न जाणो पटकन चढणाऱ्याला आधार द्यावा लागल तरं ??? तसेच वरच्या बाजूला सुद्धा कोणीतरी होल्ड्स कुठे आहेत ते सांगायला असले तर अजून उत्तम. २-४ फुटावरुन खाली सरकले तरी बऱ्याचदा पायाला दुखापत होण्याची शक्यता असते. न जाणो कालच्या त्या पोराच्या पायाला असेच काहीसे झाले असेल ???
शेवटी मी आणि अभि तो छोटासा पॅच मारुन वर गेलो आणि मग सुरू झाला प्रवास अंतिम टप्याकड़े. गोरखागडाच्या सुळक्याच्या ह्या पायऱ्या कश्या खोदल्या असतील कोण जाणे. लांबी-रुंदीला अगदीच लहान असणाऱ्या ह्या पायऱ्या एकदम उभ्या चढाच्या आहेत. पायऱ्या आधी डावीकडे सरकत वर चढत जातात आणि प्रत्येक पायरीवर हात धरायला पायरी मध्येच खोब ण्या केलेल्या आहेत. त्यात हात घालताना जरा बघून आणि जपून. एक-एक पायरी चढत आम्ही थोडं वर पोचलो. मग पायऱ्या उजवीकडे वळून पुन्हा डावीकडे वर सरकत जातात. ह्या डाव्या वळणावर जरा जास्त काळजी घ्यावी लागते. कारण ह्या ठिकाणी स्वतःचे वजन पूर्णपणे उजवीकडे ठेवून वर सरकावे लागते. एकदा का हा टप्पा पार झाला की मग पुन्हा आधीसारख्या खोबण्या असलेल्या पायऱ्या अगदी वरपर्यंत आहेत. माथ्यावर पोचायच्या आधी जरासा मातीचा घसरा आहे. पावसा ळ्या त गेलात तर हा घसरा गवताचा होउन जातो आणि मग उतरताना धमाल येते. सुळक्याच्या माथ्यावर एक शिवमंदिर आहे. त्या व्यतिरिक्त तशी फारशी सपाटी वरती नाही. मंदिराच्या मागच्याबाजूने चहुबाजूचे सुंदर दृश्य दिसते. गोरखगडाला लागुन असलेला शिंदोळ्याचा डोंगर आणि त्यामागे असलेला सिद्धगड़ दिसतो. तर उजव्या बाजूला दुरवर नाणेघाट आणि जीवधन किल्ला दिसतो. आकाश निरभ्र असेल तर त्या पुढे थोडं डाव्या बाजूला आजा पर्वत आणि हरीश्चंद्रगडाचा कोकणकडा सुद्धा दिसतो. बरोबर समोर किल्ले माहुली आपल्याला खुणावत असतो.
आम्ही वर पोचलो तेंव्हा ९ वाजत आले होते. काहीवेळ तिकडे घालवला आणि पुन्हा उतरु लागलो. उतरताना अधिक काळजी घेणे गरजेचे होते. पुन्हा त्या सर्व पायऱ्या आणि तो छोटासा टप्पा उतरून खाली आलो. पुन्हा गुहेकडे जायच्या आधी गडाच्या पलिकडच्या बाजूला चक्कर टाकली. तसे तिकडे फारसे काही नाही. नाही म्हणायला २ गुहा आहेत. त्या सुद्धा थोड्यावर कोरल्या आहेत. आतमध्ये डोकवायचे असेल तर १०-१५ फुट चढून जायला लागते. एकामध्ये आम्ही डोकावलो आणि पुन्हा गुहेकडे निघालो. परतीची तशी काही घाई नव्हती. दुपारी २ च्या आसपास खाली गावात पोहचायचे होते. आजचे जेवण कालच हमीदला सांगून आलो होतो. १२ च्या आसपास परतीच्या वाटेवर निघालो. पुन्हा एकदा ते दोन्ही रॉकपॅच आणि गडाचा दरवाजा उतरून खालच्या 'मेटे'पर्यंत उतरलो. तिकडे थोडावेळ टाइमपास केला आणि मग थेट गाव येईपर्यंत थांबलो नाही. मी आणि शेफाली गप्पा मारत मारत इतके हळू-हळू उतरत होतो की बाकी तिघांच्या बरेच मागे पडलो होतो. आम्ही खाली पोचलो तो पर्यंत अभि, राजेश आणि सुमेधा फुरसतमध्ये हमीदच्या घरी जाउन पडले होते. ३ च्या आसपास जेवण आटोपले अजून एका ट्रेकची सांगता करत बस पकडून मुरबाड गाठले आणि तिकडून कल्याण मार्गे ठाणे-मुंबई ...
.
मस्त.कथन आवडले.:)
ReplyDeleteमस्त लिहिलंय, पण माथेरानवरून दिसतो तो सुळका कुठला ते कळलं नाही, आणि गावातले लोक नवख्यांबरोबर येतात का सोबत म्हणून आधी सांगून ठेवलं तर?
ReplyDeleteअरे तूला मी फ़क्त ब्लॉगलिंक दिली होती रे 'चुरया' ... हा तो सुळका नाहीच. ही घे अक्चुअल लिंक.. http://mazisahyabhramanti.blogspot.com/2009/02/blog-post_19.html
ReplyDeleteReally good post ... Nice Info.. i would like to do trek with you.. :) Ananya - thane
ReplyDelete