Tuesday, 4 August 2009

भाग ३ - आजा उर्फ़ आजोबा पर्वत ... !

सुळक्यापर्यंत जायला अजून तासा-दिडतासाची चढाई होती म्हणुन आधी जेवून घ्यायचे ठरवले. आम्ही पोचलो तेंव्हा तिकडून यूथ होस्टेलचा (Y.H.A.I) एक ग्रुप निघत होता. त्यांनी आम्हाला गरमागरम टोमॅटो सूप ऑफर केले. मस्तच बनवले होते. पोचल्यापोचल्या असे काही गरम पोटात पडल्याने सगळा थकवा गेला आणि भूक सुद्धा वाढली. हा.. हा.. आम्ही आता जेवून २ वाजता पुढच्या चढाईसाठी तयार झालो. आश्रमाच्या मागुन सुळक्याकड़े जाण्याचा मार्ग सुरु होतो. पाहिले तर अंतर अगदी जवळ वाटते पण वर जायला अजून किती वेळ लागेल ह्याचा अंदाज येत नव्हता. तरीसुद्धा आम्ही जाउन यायचे ठरवले. उशीर झाला तर झाला. दोन डोंगराच्या मधल्या सोंडेवरुन वर जाणाऱ्या वाटेने निघालो. आता वाट दाट झाडीत शिरली आणि वर चढायला लागली. मी आणि ऐश्वर्याने चढण्याचा वेग वाढवला. सचिन सुद्धा सोबत होताच. पण खडा चढ सुरु झाला तशी निता बरीच मागे पडायला लागली. विवेकने आणला मात्र तिला बरोबर गप्पा मारत मारत. तिने सुद्धा हळू-हळू का होइना पण पूर्ण करणारचं असा निर्धार केला होता. भले शाब्बास... मला कधी एकदा वरती पोचतोय असे झाले होते.





आता वरचा भाग टप्यात येऊ लागला होता. वर चढत जात आम्ही डाव्या बाजुच्या डोंगराच्या कड्याला भिडलो आणि उजवीकडे सरकत सरकत पुढे जायला लागलो. मी सर्वात पुढे होतो. अचानक डाव्याबाजूला थोड़े वरुन काहीतरी वेगाने आपल्याकडे सरकते आहे असे जाणवले. झटकन वळून पाहिले तर काळतोंडया माकडांचे एक टोळके वेगाने पुढे सरकत होते. मला क्षणात येणाऱ्या संकटाची जाणीव झाली. पण ती सुदैवाने खोटी ठरली. कारण आमच्या थोड पुढे उजव्या बाजूला असणाऱ्या लालतोंडी माकडांवर हल्ला करण्याच्या बेतात ते पुढे सरकत होते हे मी लगेच कळून चुकलो. हुस्शश... आम्ही तिकडेच थांबलो आणि त्या सर्व वानर सेनेला आमच्या मार्गातून जाऊ दिले. आता अंतिम चढाई सुरु झाली. उजवीकडे जात-जात उजवीकडच्या डोंगराला भिडलो आणि वरच्या वाटेला लागलो. मध्येच थोडा घसारा तर कधी एखादा बोल्डर पार करत आम्ही पुढे सरकत राहिलो. अखेर दुपारी ३:३० च्या आसपास आम्ही सुळक्यापाशी जाउन पोचलो.






सुळक्यावर चढाई करायची म्हणजे त्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. आम्ही काही ते करणार नव्हतो. मात्र उजव्याबाजूला साधारण १०-१२ फुट वर चढून जायला एक शिडी लावली आहे. अवस्था वाइट असल्याने शिडीवर जास्त भरोसा न ठेवता थेट चढाई केली आणि वर पोचलो.
ह्या ठिकाणी उजव्या बाजूला खोल दरी असून चढाई करताना काळजी घ्यावी लागते. नाहीतर पुढे काय ते सांगायला नकोच. २ वर्षांपूर्वी पावसाळ्यात एका मुलीचा ह्याचं ठिकाणी कुठेतरी अपघाती मृत्यू झाला होता. वास्तवाचे भान ठेवून निसर्गात वागावे हेच बेहत्तर. या ठिकाणी मी ९ वर्षांनंतर येत होतो. जुन्या आठवणी ताज्या केल्या आणि काही वेळातचं परतीच्या मार्गाला लागलो. पूर्ण अंधार पडायच्या आत किमान डांबरी रस्त्याला लागणे महत्वाचे होते. फटाफट उतरत पुन्हा खाली आश्रमाकडे आलो. ५ वाजत आले होते. विवेक आश्रमासमोरून खालच्या बाजूला जाणाऱ्या वाटेवर एक धबधबा आहे. पावसाळ्यात जोरदार पडतो पण मार्च-एप्रिलमध्ये सुद्धा तिकडे पाण्याची संततधार लागून असते. शिवाय आश्रमातील लोकांसाठी हाच एक पाण्याचा स्त्रोत असल्याने त्यांनी पाणी अडवून साठवले आहे.






परतीच्या मार्गाला लागायच्या आधी आश्रमासमोरच्या जागेमध्ये काही भन्नाट फोटो काढले. असाच ज़रा टाइमपास. मज्जा आली. ५ वाजून गेले होते. सुसाट वेगाने परतीच्या वाटेवर निघालो. तासाभरात आम्ही रस्त्याला लागलेलो होतो. गाड्या काढल्या आणि डेणा गाव ओलांडून हायवेला लागलो. शहापुरमार्गे रात्री ९ वाजता ऐश्वर्याला कल्याण फाटयाला सोडले आणि आम्ही पुढे निघालो. बरेच वर्षांपासून करायचा राहिलेला आजा पर्वतचा ट्रेक करून भरून पावलो होतो. त्याच आनंदात पुढचे प्लान्स करत आम्ही घराकडे निघालो.

14 comments:

  1. मस्तच!
    "वास्तवाचे भान ठेवून निसर्गात वागावे हेच बेहत्तर.." - निसर्गाच्या सान्निध्यात जाणार्‍या प्रत्येकाने हे वाक्य आपल्या मनावर कोरलेच पाहिजे!

    ReplyDelete
  2. खरे ट्रेकर्स असतात त्यांना सारख्या (म्हणजे सेम) गोष्टी क्‍लिक होतात.
    भूंगा आणि मला पण एकच वाक्य आवडले. "वास्तवाचे भान ठेवून निसर्गात वागावे हेच बेहत्तर..".असे मधून मधून हौशे-नवशे-गवशे ट्रेकर्सचे कान टोचावेच लागतात. बाकी ट्रेक भारी झालेला दिसतोय. फोटो काढताना पण धमाल केलेली दिसतेय.

    चालू द्या.. आमच्या शुभेच्छा. अशीच कुठेतरी सह्याद्रीच्या कडेकपारीत भेट होईल आपली.

    ReplyDelete
  3. खरे बोलताय दोघे सुद्धा ... बाकी कुठेतरी सह्याद्रीच्या कडेकपारीत भेट कशाला ??? आपण जाऊया की प्लान करून.. मी बोललो आहे 'भुंगा'ला सुद्धा...

    ReplyDelete
  4. नक्की भेटू. कॉफी साठी का होईना पण भेटू कधी तरी. तेव्हाच एखादा भटकंतीचा पण बेट आखू. भुंगा, तू, मी आणि असेच काही वेडे लोक एकदातरी भेटलोच पाहिजे.
    क्या खयाल है?

    ReplyDelete
  5. अरे नक्कीच ... तू रहायला कुठे आहेस ??? मी ठाण्याला राहतो... मला तुझा इमेल पाठव.. संपर्कात राहू...

    ReplyDelete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. हा.. भेटुयात नक्की....! मी पुण्यात राहतो आणि रोहनला मेल दिलाय... तू आला की... ठरवु... कसं?

    ReplyDelete
  8. I haven't been to Aajoba so far. Another very interesting route for Bike ridding is Kasara-Khodala-Suryamal-Wada or KAsara-khodala-Devbagh-Jawar during rains. Have you been there ?

    ReplyDelete
  9. Yes i have been to that area but when i was in school ... so not really on bikes .. :D

    ReplyDelete
  10. रोहन,तुझा जवळजवळ तरंगता फोटो भन्नाट आलाय.:)तुमची आजोबा चढाई छानच झाली. त्याचे तू केलेले वर्णनही तितकेच छान.
    भुंगाचे वाक्य चपखल. उगाच आगाऊपणा करू नये...मग भलतेच प्रसंग ओढावतात.

    ReplyDelete
  11. have you been to Veer Kotwal smarak and thw waterfall nearby ?

    ReplyDelete
  12. yes i have been there ... infact I will write very soon on Siddhagad as well ... :)

    ReplyDelete
  13. मस्तच .... वाचताना मजा आली मग खरोखर ट्रेक करताना किती मजा येत असेल..?..... परत डोंगर द्ऱ्यात फियायला जावे असे वाटू लागलेय... लै भारी हो..

    ReplyDelete
  14. सचिन .. अरे मग वाट कसली बघतो आहेस ??? चल निघ आणि भ्रमंती सुरू कर. सह्याद्री आपल्यासारख्या अनेक भटक्यांची वाट बघतच असतो ... :)

    ReplyDelete