Monday, 1 November 2010

भटकंतीची १० वर्षे ...

बघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी? कशी? काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे.' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.




सह्याद्रीत पहिले पाऊल टाकल्यापासून ते आजतागायत सह्याद्रीने माझ्यावर प्रेमाचा अक्षरशः: वर्षाव केलाय. त्याने कधी पावसाळी अनुभवांनी मला चिंब भिजवलंय, कधी गडावर कडाक्याच्या थंडीत गारठवलय तर कधी उन्हातान्हात रानोमाळ फिरवलंय. तुम्ही म्हणाल हे का प्रेम?. तर मी म्हणीन होय. त्याचे प्रेम असेच असते. आपली रांगडी परीक्षा बघत, आपली झोळी अनुभवांनी भरत आपल्यावर तो स्वतःच्या प्रेमाचा वर्षाव कधी करतो हे आपल्याला देखील समजत नाही. कळत तेंव्हा आपण एखाद्या सह्यशिखरावर कुठेतरी हरवून सभोवतालचा नजारा बघत असतो. मग तो नानाचा अंगठा असो नाहीतर नागफणी, कोकणकडा असो नाहीतर टकमक टोक. राजगडावरचा सूर्योदय असो नाहीतर मग सूर्यास्त. त्याच्या रांगड्या सौंदर्याचे वर्णन करताना शब्दच तोकडे पडू लागतात.


जसा पाउस तप्त जमिन थंड करू लागतो तसा सह्याद्रीसुद्धा आपला रौद्रप्रतापी चेहरा लपवित एक नवे रूप घेऊन आपल्या समोर येतो. ह्या हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीची मजा काही औरच. मग आपण सुद्धा मनमुराद भिजण्यासाठी नवे ट्रेक आखत त्याच्या भेटीला निघतो. पण माथ्यावर त्याला गाठायचे तर आधी परीक्षा ही द्यावीच लागते. मग तो एखादा भरून वाहणारा ओढा असो, दुथडी भरून वाहणारी नदी असो नाहीतर एखादी वर चढणारी पाण्याची वाट असो. त्याला भेटायचे म्हणजे ते पार करणे आलेच. आपली मजा बघत असतो तो पण त्यालाही मनातून आपण तिथवर पोचावे हे मनात असतेच. दोघांमधली ही ओढ अनिवार होते आणि मग आपली पावले वेगाने शिखराकडे पडू लागतात. माथा जसा जवळ येतो तसे आपण 'आता माथ्यावर पोचूनच टेकायचे रे' हे उगाच नाही म्हणत. पावसाळी वातावरणात राना-रानातून गार वारे साद घालत फिरत असतात आणि मनावर एक वेगळीच धुंदी निर्माण करितात. वर्षोनुवर्षे ऑफिसच्या वातानुकीत यंत्राचा वारा घेणाऱ्या लोकांनो, हे गार वारे अंगावर घेतले आहेत कधी? ते वातानुकीत यंत्र झक मारेल ह्यापुढे. खळखळत वाहणारे ओढ्याचे पाणी ओंजळीत भरून प्यायला आहात कधी? एकदा हे करून बघाच. आयुष्यभराची तहान भागेल तुमची.




पाउस जरा परतीच्या मार्गाला लागतो तसा एक सुखद गारवा सह्याद्रीमध्ये पसरू लागतो. आता आपण खास रग जिरवणारे आणि उंची गाठणारे प्रचंडगड, रतनगड, अलंग-मंडण-कुलंग असे ट्रेक प्लान करू लागतो. पाऊस थांबलेला असला तरी धुक्याचे खास खेळ आपल्यासाठी सुरू असतात. सूर्यदेवाने आपली द्वाही चहूकडे फिरवण्याआधी पहाटे पहाटे दऱ्याखोऱ्यात पसरलेले हे धुके खूपच आल्हाददायक असते. अश्या धुक्यातून ट्रेक करायला तर काय अजूनच मजा!!! हवे तेंव्हा निघावे, हवे तिथे विश्रांतीसाठी बसावे. तो असतोच कधी झाड बनून तर कधी दगड बनून आपल्याला टेकायला द्यायला. आपल्याला तहान लागली आहे हे कळते त्याला मग मध्येच एखादा ओहोळ देतो सोडून आपल्या वाटेवर. काळजी घ्यावी ती त्यानेच. गडावर चूल बनवून जेवण बनवावे तर हा.... वारा. मग कधी थोड्यावेळासाठी वाऱ्याचा वेग जरा कमी करेल आणि आपल्याला जेवण बनवू देईल. आपण निवांतपणे जेवून गप्पा मारत टेकलो की हा परत आपला वेगाने सुरू... गडावर रात्र जागवून निवांतपणा अनुभवावा. भले १० जण सोबत असतील पण प्रत्येकाने शांत राहून फक्त आकाश बघावे. सर्व काही नि:शब्द. आवाज यावा तो फक्त वाऱ्याचा आणि झाडांच्या सळसळीचा. अजून काय हवे!!!


नवा ऋतू आणि सह्याद्रीचे नवे रूप न दिसले तरच नवल. पुन्हा एकदा तो आपले रौद्र रूप धारण करू लागतो. पुन्हा एकदा आपली रांगडी परीक्षा पाहण्यासाठी डोंगर-कडे तप्त होऊ लागतात. आपण देखील मग काही जिद्दी ट्रेक प्लान करू लागतो. स्वतःच्या अगणित हातांनी तो आपली झोळी भरत असतो आणि आपण अधाशासारखे फक्त घेत असतो. मला नाही वाटत तो कधी थांबेल आपल्यावर प्रेम करणे.. आणि मलाही नाही वाटत की मी कधी थांबीन त्याच्याकडे जाणे. कुठलेही संकट पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास मला दिलाय तो ह्या सह्यकड्यांनी. मला नाही वाटत हे कुठल्या पुस्तकी शिक्षणातून कधी मिळेल. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला डोंगरातच मिळालेत. आज जगण्याचा अर्थ जो मला कळतोय तो ह्या सह्याद्रीने दाखवलाय मला.




आज फक्त १० वर्षे झालीत. अजून खूप हिंडायचे आहे. रानोमाळ भटकायचे आहे. गड-किल्ल्यावर अभिमानाने शिवरायांचे स्मरण करायचे आहे. इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. ह्या सर्वांनी मी पावन झालो हे नक्की. खूप अनुभव मिळालेत पण अजून खूप घ्यायचे आहेत.


हे सह्याद्री... मी येतोय लवकरच पुन्हा एकदा असेच काही नवे अनुभवायला..तुझ्या भेटीला आसुसलेला... डोंगर यात्री... डोंगर वेडा...


... पक्का भटक्या...

15 comments:

  1. मी आयुष्यात बर्‍याच अनुभवांपासून अजून वंचित आहे हे मला तुझी पोस्ट वाचून जाणवतंय... एकदम दिल से पोस्ट! :)
    बाय द वे...तुझ्या दोन फोटोंमधला सुदृढ फरक पार्ले-जी ते गुलाबजाम हा प्रवास लगेच दर्शवतो.. :D

    ReplyDelete
  2. kharech sahyadrit firnyachi maja kahi aurach.specially pawsalyat.. Maza anubhav 5-7 gadnachach ahe pun kharech dar trek madhye navin shikayla ani khup anubhavayla milte. Ata ekde suddha colorado Utah madhye gelo ki ekhada trek hotoch .....tehi titkech chan ahet

    keep treking and posting

    ReplyDelete
  3. ’निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे’ हे अगदि खर आहे रोहना...
    बाकी सह्याद्रीवर जो प्रेम करतो प्रेमाने त्याला भेट देतो त्यावर तो असा नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत आला आहे.आमच्या दुर्दैवाने आम्ही खुप उशिरा हया डोंगरदरयांच्या प्रेमात पडलो.असो हि ओढ अशीच कायम राहो हि देवाकडॆ प्रार्थना.भटकंतीची दहा वर्षे पुर्ण केल्याबद्दल तुझे अभिनंदन.शेवटचा परिच्छेद खुप इन्स्पायरिंग आहे अगदि मनापासुन आवडला...


    >>बाय द वे...तुझ्या दोन फोटोंमधला सुदृढ फरक पार्ले-जी ते गुलाबजाम हा प्रवास लगेच दर्शवतो.. :D +१

    ReplyDelete
  4. रोहना अरे ललित लिहायला लागलास की तू :)

    सुंदर आणि प्रेरणादायी झालीये पोस्ट... अश्या पोस्टा टाक आणि अंकाईला यायचे (आणि माझ्यासारख्या लिंबू टिंबूला न्यायचे:)) टाळ :)

    >>>>बाय द वे...तुझ्या दोन फोटोंमधला सुदृढ फरक पार्ले-जी ते गुलाबजाम हा प्रवास लगेच दर्शवतो.. :D +१००

    ReplyDelete
  5. लाजवाब!! उगाच नाही तुला सेनापती म्हणत आम्ही !!
    बस्स आता तुझ्याबरोबर अजुन ह्या सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात जगायचंय मित्रा!!
    खूप छान लेख !!

    अभिनंदन !!

    ReplyDelete
  6. जय होS !!!

    सह्याद्रीतल्या समस्त भटक्यांचे तुम्ही जिव्हाळ्याचे उर्जास्त्रोत !! आपली ही भटकंती अशीच चालत राहो आणि आमच्यासारख्या भटक्यांना आपले मार्गदर्शन लाभत राहो हीच शिवचरणी प्रार्थना !!!

    सदा सर्वदा योग तुझा घडावा ...
    तुझे कारणी देह माझा पडावा ...
    जय जय सह्याद्रीय नम:

    ReplyDelete
  7. काय रे मनाला चुटपूट लावून ठेवलीस आता......गेलेले सगळे दिवस व अनुभव परत तुझ्यामुळे , या लिखाणामुळे परत जिवंत व्हायला लागलेत आणी हाक मारायला लागलेत. त्या आवाज त तुझा आवाज मिसळून हाक मार .... `ओ' दिलीच म्हणून समज ..!

    ReplyDelete
  8. सेनापती, खूप सुंदर अगदी 'दिल से' झालीय हा पोस्ट!! मला खूप छान वाटलं हे सर्व वाचून आणि खरोखर खूप हेवा वाटला! असाच फिरत रहा रोहन! खूप खूप शुभेच्छा! :)

    ReplyDelete
  9. क्या बात है रोहनजी...

    "वर्षोनुवर्षे ऑफिसच्या वातानुकीत यंत्राचा वारा घेणाऱ्या लोकांनो, हे गार वारे अंगावर घेतले आहेत कधी? ते वातानुकीत यंत्र झक मारेल ह्यापुढे. खळखळत वाहणारे ओढ्याचे पाणी ओंजळीत भरून प्यायला आहात कधी? एकदा हे करून बघाच. आयुष्यभराची तहान भागेल तुमची."

    असं वाटतं... आजच सॅक भरुन निघावे रे...

    ReplyDelete
  10. सेनापती मुजरा... !!!!

    मानलं तुम्हाला.. अप्रतिम लिहिलं आहात.. खुपच सुरेख.. दशकपूर्तीबद्दल अभिनंदन. तुम्हाला अशा शुभेच्छा देण्याचे प्रसंग आम्हावर वारंवार येवोत.. !!

    ReplyDelete
  11. वाह रे सह्याद्रीच्या पिल्ला... अगदी मनापासून लिहलय्स. अभिनंदन!!! फिरते रहा... :) सह्यपुजा करते रहा.

    ReplyDelete
  12. लय भारी मित्रा ...

    "इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. ह्या सर्वांनी मी पावन झालो हे नक्की"

    आवडले ...

    ReplyDelete
  13. सही..जबरदस्त..
    खूप आवडलं .. या सह्याद्रीच प्रेम तुझ्यातून दिसून येतेय .......

    ReplyDelete
  14. जबरदस्त.खूप खूप आवडलं

    ReplyDelete