Sunday, 24 October 2010

पवनाकाठचा तिकोना ...

गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी तब्बल २५ भटक्यानी पवना धरणाच्या समोर असलेला तिकोनागड सर केला. तारीख २५ आणि भटके देखील २५. (नशीब या महिन्याची २५ तारीख यायच्या आधी मी कसाबसा हा पोस्ट करतोय.) जुलै महिन्यात केलेल्या विसापूर ट्रेकनंतर त्या ट्रेकमध्ये यायला न जमलेल्या आणि 'टांग दिलेल्या' अनेकांनी अजून एखादा ट्रेक व्हायला हवा असे म्हटल्यावर एक गूगल बझ सुरू झाला आणि सर्वांच्या तारखा जमवत अखेर २५ सप्टेंबर रोजी 'तिकोना' येथे जायचे ठरले. २४ तारखेपर्यंत हा आकडा २२ होता मात्र २५ तारखेला सकाळी तो एकदम २५ झाल्याचे लक्ष्यात आले. २२ वरून थेट २५...


२४ तारखेला संध्याकाळी भाग्यश्री ताईला जाऊन भेटलो. तिला इकडे येऊन अवघे ४ दिवस झाले होते. मी आणि शमी पहिल्यांदाच ताईला भेटत होतो. ट्रेकसाठी कायकाय खादाडी न्यायची ते ठरवत इतर बऱ्याच गप्पा झाल्या. इतक्यात महेंद्रदादाचा फोन आला. त्याच्याकडून 'गाडीत एक जागा आहे का रे?' अशी विचारणा झाली. मी नकार देऊन मोकळा झालो. त्यानंतर तास उलटून गेला तरी श्रीताई बरोबर गप्पा सुरूच होत्या. आता मला देवेंद्रचा फोन आला. त्याच्याकडून सुद्धा विचारणा 'गाडीत एक जागा आहे का रे?' मी नकार देत म्हटले,"मगाशीच महेंद्रदादाला सुद्धा एक नकार दिला आहे मी. तू आता अजून कोणाला सोबत आणू नकोस. गाडीत जागाच नाही तर बसवणार कुठे" ७ वाजून गेले तसा ताईकडून निघालो आणि थोडे खायचे सामान घेणार तेवढ्यात पुण्याहून अनिकेतचा फोन. 'खायचे काय करताय. मी सर्वांसाठी खायला चपात्या घेऊन येऊ का?' मी त्याला फक्त ३-४ जणांसाठी आणायचा सल्ला दिला. कारण प्रत्येक जण ट्रेकला थोडे अधिकच खायचे सामान आणतो आणि मग ते संपता संपत नाही. ८:३० च्या आसपास घरी पोचलो. काही वेळात अनुजा सुद्धा घरी येऊन पोचली. जेवलो आणि लवकर उठायचे म्हणून गुडूप झालो.


दुसऱ्या दिवशी पहाटे-पहाटे मी, शमी, अनुजा, अनघा आणि श्री ताई ठाण्याहून निघालो. आपला आनंद आणि त्याचे मित्र स्वल्पेश, अमोल, उदंड उत्साही सागर नेरकर, सचिन उथळे पाटील आणि त्याचा मित्र अक्षर देसाई, सौ. अवनी वैद्य असे काहीजण दुसरया गाडीतून निघाले. तिकडे महेंद्रदादा, उधाणलेला सुहास, देवेंद्र (च्यायला ह्याने दिलेला खो अजून पूर्ण करायचे मला), स्नेहल आणि चैतन्य असे बोरीवलीवरून निघाले होते. तीनही गाड्या सानपाड्याला सकाळी ७:३० च्या आसपास भेटल्या आणि तिकडे ज्योती भेटली. काल मला आलेले दोन्ही फोन हे ज्योती ह्या एकाच व्यक्तीसाठी होते मला तिकडे लक्ष्यात आले. मी दोघांना नाही म्हणून देखील तिचा ट्रेकला यायचा उत्साह बघता तिला देवेंद्र आणि दादा घेऊन आले होते पण ह्या बाबतीत मला काहीच माहिती आधी सांगितली गेली नाही. तिकडून मग पुढे जात पनवेलच्या आधी ओरिगामी एक्स्पर्ट भामूला उचलत आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो. पुण्याहून निघालेले श्री. अनिकेत, अभ्यासू सागर, मनमौजी योगेश, विकास आणि अभिजित असे ५ जण सुद्धा २ बाइक्स वर मार्गस्थ होत कामशेतच्या दिशेने निघाले होते. मला मात्र पुण्याहून फक्त ४ जण येणार अशी माहिती होती.


तासाभरात लोणावळ्याला पोचल्यावर आम्ही नाश्ता आटोपून घेतला. इकडे एक छोटीशी गडबड झाली ती म्हणजे टवेराच्या चालकाचे परवाना पत्र (सोप्या मराठीमध्ये लायसन्स.. :D) हवालदार मामाने काढून घेतले. कारण गाडीमध्ये एकूण ९ जण बसलेले होते. ते मिळवून पुन्हा मार्गस्थ व्हायला थोडा वेळ गेला. नाष्ट्यामागोमाग थोडा वेळ सुद्धा खात आम्ही अखेर कामशेतच्या दिशेने निघालो. ठरवलेल्या वेळेच्या किमान १ तास तरी आम्ही मागे होतो. अखेर १० नंतर सर्वच्या सर्व २५ जण कामशेत फाट्याला भेटलो. आता ३ चारचाकी आणि ३ दुचाकी असा लवाजमा तिकोना पेठ गावाच्या दिशेने निघाला. डाव्या बाजूला बेडसे गाव आणि मग पवना कॉलोनी पार करत धरणाच्या काठाला लागल्यावर समोरचे दृश्य पाहून गाडी न थांबवणे म्हणजे अरीसकपणाचा कळस झाला असता. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि तिकडे पुन्हा एकदा सर्वांची फोटोगिरी सुरू झाली. पवना धरणाच्या भिंतीमागून आता तुंग किल्ला डोकावू लागला होता आणि डावीकडे तिकोना आम्हाला खुणावू लागला होता.








आता अजून वेळ दडवून चालणार नव्हते. शेवटची धाव मारत तिकोना पेठच्या आधीचा खडा चढ पार करत आम्ही पायथ्याला पोचलो. गावातल्या देवळासमोर गाड्या टाकल्या आणि निघण्याआधी एक ओळखसत्र घेतले. मोठा ग्रुप असेल आणि बरेच लोक एकमेकांना ओळखत नसतील तर असे एक छोटेसे सत्र घेणे उत्तम. मी काही मोजक्या सूचना दिल्या.








त्याआधी अनिकेत आणि अवनीचे नेमके कुठ-कुठले सामान सोबत घ्यायचे ह्यावर १-२ मिनिटांचे छोटेसे चर्चासत्र सुद्धा पार पडले... :) मग आम्ही सर्व तो गडाकडे जाणारा लाल मातीचा रस्ता तुडवत निघालो. पाउस तर दूरच पण मळभ सुद्धा नव्हते. उनाचा त्रास होणार म्हणून सर्वांना जास्तीतजास्त पाणी सोबत ठेवायला सांगितले होतेच.




अर्ध्या तासात तो लाल मातीचा धीम्या चालीचा रस्ता संपला आणि आम्ही पहिल्या चढणीला लागलो. चढणीला लागलो तेंव्हा आनंद, त्याचे मित्र, अनघा, अनुजा आणि स्नेहल वगैरे भराभर पुढे जात होते पण श्री ताई, महेंद्रदादा, अनिकेत आणि मी सर्वात शेवटी होतो. कधीही कुठेही मी सर्वात शेवटीच असतो. माझ्याबरोबर ट्रेकला जर अभिजित असेल तरच मी शेवटी नसतो. चढायला सुरवात करताना बरोबर वरचे ढग पसार झाले आणि अगदी प्रखर उन्हात आम्ही वर सरकू लागलो. थोडे वर गेल्यावर मात्र महेंद्रदादाला त्रास व्हायला लागला. इतक्या वर्षांनी ट्रेक म्हणजे त्रास हा अपेक्षित होता पण आधीचे काही दिवस त्याची धावपळ बघता हे प्रकरण अजून कठीण जाणार असे वाटू लागले. आता शमिका, अनुजा आणि श्री ताई सुद्धा पुढे निघून गेल्या. काही मिनिटे आराम करून मी, दादा आणि अनिकेत पुन्हा चढायला लागलो. पण अजून थोडेच वर गेल्यावर दादाला अजून त्रास होऊ लागला. तिथून मग त्याने ट्रेक न करता पुन्हा खाली जायचा निर्णय घेतला. अर्थात त्याचा निर्णय योग्यच होता.


डोंगरात असताना 'मी हे करू शकतो, किंवा जरा स्वतःला खेचले तर होऊन जाईल' असे करण्यापेक्षा सारासार विचार करून निर्णय घ्यायचा असतो आणि तसा योग्य निर्णय त्याने घेतला. पण त्याला एकट्याला खाली जाऊ देणे मला शक्य नव्हते. तेंव्हा मी पुन्हा एकदा खाली उतरून त्याच्यासोबत देवळापर्यंत जायचे ठरवले. माझ्या सोबतीला देवेंद्र आला. मी माझी सॅक अनुजाकडे दिली आणि खालच्या वाटेला लागलो. जसजसे आम्ही खाली उतरत होतो तसे वरवर जाणारे बाकी सर्वजण आम्हाला स्पष्ट दिसत होते. बरोबर २ वाजता दादाला देवळापाशी सोडून मी आणि देवेंद्र पुन्हा एकदा ट्रेक रूटला लागलो. परत येताना आम्ही दादाच्या स्पीडने आलो होतो पण परत जाताना आम्ही आमचा स्पीड डबल केला. ४५ मिनिटात वर पोचायचे असे मी ठरवले होते. एव्हाना सर्वजण वर पोचले असणार ह्याची मला खात्री होती. एक शंका मात्र मनात होती आणि ती माझा न राहून जीव खात होती. ती म्हणजे गडाच्या शेवटच्या टोकाच्या पायऱ्या... पण सर्वांनी खास करून श्री ताईने विनादिक्कत त्या पार केल्या. नशीब पाउस नव्हता नाहीतर कसरतच झाली असती. शिवाय नेमक्या त्यावेळी मी तिकडे नव्हतो. पण आनंद, सुहास आणि अनुजा आहेत हे मला ठावूक होते










पायथ्यापासून वेगाने निघालेलो मी आणि देवेंद्र एकामागून एक टप्पे सर करत अवघ्या ३५ मिनीटामध्ये राम ध्यान मंदिर, मारुतीची मूर्ती आणि गडाचा खालचा दरवाजा पार करत पायऱ्यांना भिडलो. गडाचा दरवाजा शिवकालीन पद्धतीचा असून बुरुज पुढे देऊन मागे लपवलेला आहे. बुरुज साधारण २० मीटर उंचीचा तरी असावा. गडाची उजवी भिंत आणि बांधीव बुरुज ह्या मधून १०० एक खोदीव पायऱ्या आपल्याला गड माथ्यावर घेऊन जातात. पायऱ्यांच्या अर्ध्या वाटेवर उजव्या हाताला एक शुद्ध पाण्याचे टाके आहे. इथून वरच्या काही पायऱ्या थोड्या खराब झालेल्या आहेत. तेंव्हा जरा जपून. पायऱ्या संपल्या की डाव्या हाताला बुरुजावर जाता येते. दरवाज्याच्या बाजूला उजव्या हाताला पाण्याच्या २ टाक्या आहेत. ह्यातले पाणी अतिशय गार आणि शुद्ध असून पिण्यासाठी एकदम योग्य आहे. २००२ साली ह्या टाक्याचे पाणी वापरून शामिकाने अशी काही साबुदाणा खिचडी बनवली होती की ती चव अजून सुद्धा जिभेवर आहे. ते टाके बघताच त्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या.




५ एक मिनिटात पायऱ्या पार करून आम्ही दोघांनी सुद्धा गडाचा माथा गाठला. तो पर्यंत बहुदा बाकीच्या सर्वांचा गड बघून झाला होता. माथ्यावर जाऊन झेंडा लावणे, सभोवतालचा नजरा डोळ्यात साठवणे आणि तेथे फोटोगिरी करणे हे सर्व आटोपून सर्वजण खाली येऊन निवांत बसले होते. बहुदा आमची वाट बघत. आम्ही आलो की लगेच जेवण सुरू करायचे असा प्लान असणार नक्कीच. तेंव्हा गेल्यागेल्या आम्ही जेवून घेतले.






बाकी लोक वर येताना काय काय घडले हे सर्व वर गेल्यावर समजले. काल श्रीताईने ट्रेकवर पोस्ट टाकली आहेच. खादाडी तर जमके झाली. भाकर्‍या काय, अळूवड्या काय (बहुदा योगेशने आणलेल्या), भामूने आणलेली लसणाची चटणी (उरलेली चटणी तर शमी घरी घेऊन आली आणि दररोज खाताना 'जियो भामू' म्हणून बोलायची), शमिने घेतलेले मक्याचे दाणे, बटाट्याची भाजी, ठेपले, आणि श्रीताईने बनवलेले बेसनाचे लाडू (हे मी घरी घेऊन गेलो बरं का) अशी न संपणारी यादी होती. अर्धा तासभर खादाडी महोत्सव साजरा करत मग मी आणि देवेंद्र गड बघायला निघालो. आमच्यासोबत अनुजा, सपा आणि सागर पुन्हा भटकायला आले. एक गडफेरी पूर्ण केली. गडाच्या माथ्यावर शिवशंकराचे मंदिर असून मंदिराच्या खाली पाण्याचे कुंड आहे. २००२ साली मी इकडे आलो होतो तेंव्हा हे पाणी पिण्यायोग्य होते पण आता इकडे बरीच पडझड झाली आहे. मंदिरासमोरचा नंदी बराच झिजला असून एक नवीन छोटा नंदी पिंडी समोर बसवला आहे. आम्ही गड माथ्यावरून सभोवतालचा नजारा बघून तृप्त झालो. पश्चिमेला विस्तीर्ण पवना जलाशय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असणारा तुंग किल्ला एक आगळेच विलोभनीय दृश्य निर्माण करीत होता. हिरवीगार जमीन, निळेशार पाणी आणि पांढरेशुभ्र ढग यांनी एक सुंदर चित्र रेखाटले होते.




हल्लीच जाऊन आलेलो तो विसापूर उत्तरेकडून हाक मारत होता. विचारात होता बहुदा,'काय काही दिवसांपूर्वी इकडे होता विसरला नाही ना?' आणि बाजूचा लोहगड म्हणत होता,'काय राव इकडे कधी येताय? खूप दिस झालं की तुम्हाला भेटून' मनोमन लोहगडाला भेटायचे ठरवून पुन्हा एकदा खाली दरवाज्यापाशी आलो आणि निघायच्या तयारीला लागलो. ४ वाजून गेले होते. आम्ही आता भराभर परतीच्या मार्गाला लागलो. अर्धेजण भराभर उतरत वेगाने खाली निघून गेले मात्र मी-शमिका, अनुजा, सुहास, भामू, सागर असे काही जण निवांतपणे गप्पा-टप्पा करत, मध्येच थांबून खादाडी करत उतरत होतो. श्री ताई, अनिकेत-अवनी आणि बाकी लोक पायथ्याला पोचले तरी आम्ही अर्ध्या वाटेवर देखील उतरलो नव्हतो. मला चढताना काहीच फोटो घेता अले नव्हते तेंव्हा माझी क्लिका-क्लिकी सुरू होती.गड चढताना मारुतीच्या मूर्तीपाशी थांबून फक्त नमस्कार केला होता पण फोटो राहिला होता तो घेतला. खाली २००२ सालचा फोटो दिलाय जेंव्हा मी, शमी आणि अभिजित पहिल्यांदा तिकोनाला आलो होतो.






२००२ साली

आम्ही काहीजण निवांतपणे गप्पा-टप्पा करत, मध्येच थांबून खादाडी करत उतरत होतो. श्रीताई, अनिकेत-अवनी आणि बाकी लोक पायथ्याला पोचले तरी आम्ही अर्ध्या वाटेवर देखील उतरलो नव्हतो. मध्येच एका मोठ्या ढगाने आम्हाला सावलीत घेतले. छान गार वारा सुटला. आम्ही लगेच थांबून बसकण मारली. खाली दूरवर बाकी लोक मातीचा रस्ता तुडवत जाताना दिसत होते पण आम्ही आपले मस्तपैकी खादाडी करत होतो. तिथून चक्क २० एक मिनिटांनी निघालो. पायथ्याला पोचलो तेंव्हा ५ वाजून गेले होते. लाल मातीच्या वाटेवरून वळून पुन्हा एकदा तिकोनाकडे पाहिले. तो म्हणत होता,'सुखरूप जा पोरांनो. आठवणीने आलात बरं वाटले.' गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात असे मला वाटत आले आहे. अर्थात त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी.





देवळापाशी पोचून सर्वजण फोटोसाठी जमलो. एक ग्रुप फोटो घेतला आणि गाड्या काढल्या. बघतो तर काय 'योमू'ची दुचाकी ठुस्सस्सस्स.... चाकात एकदम कमी हवा. मग कसा बसा हळू-हळू तो पवना कॉलनीपर्यंत निघाला. कॉलनीमध्ये एक चहा घेऊ आणि सर्वजण आपापल्या घरी सुटू असे ठरले.





आजचा ट्रेक तिकोना असला तरी संपूर्ण वेळ पवना धरणाने वेढा घातलेला उत्तुंग तुंग आम्हाला खुणावत राहिला. परतीच्या वाटेवर मावळतीच्या सूर्याबरोबर देखील त्याचेच दर्शन झाले... मनात आल्याशिवाय राहिले नाही. मी मनात म्हणालो, 'काळजी करू नकोस. लवकरच येतोय मी तुझ्या भेटीला.'

.......... पक्का भटक्या...  


नोंद : सदर पोस्ट मधील बहुतांशी फोटो शमीने काढलेले आहेत. काही फोटो आनंद आणि श्रीताई कडून साभार...


24 comments:

  1. वाह सेनापती मस्त पोस्ट..आठवणी ताज्या झाल्या सगळ्या...परत भटक्‍या रोहणा बरोबर जावे अशी श्रींची (श्री ताई नव्हे हा :))..

    खूप मज्जा आणि धम्माल आली...थॅंक्स यार...

    ReplyDelete
  2. रोहन शेवटी आली एकदाची पोस्ट म्हंटल विसरलास कि काय ;)
    गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात असे मला वाटत आले आहे. अर्थात त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी. हे अगदी मान्य

    बाकी २००२ साली तुमच्या आणि आमच्या तब्बेतीत जड फरक नव्हता ;) चं झालीय पोस्ट नेहमीसारखीच :)

    ReplyDelete
  3. सही यार!!
    मला पुन्हा वाटतयं मी का मिस्ड केली यार ही ट्रेक???
    एनी वे पोस्ट वाचुन तुमच्याबरोबर जाउन आलो तिकोनावर बरं !!!

    ReplyDelete
  4. छान झालीय पोस्ट. २००२ ते २०१०!!! बराच फरक पडलाय. तिकोन्यात नव्हे. तुझ्या तब्बेतीत... हा हा!!!

    ReplyDelete
  5. जियो रोहन.....मस्त झालीय पोस्ट आणि ट्रेकही....बरं झालं पंचवीसच्या आत पोस्ट लिहिलीस ते....:)
    अरे २००२ चा नक्की तो तुच आहेस नं....की नंतरचा रोहन शमीच्या कारकिर्दीतला म्हणायचा...आणि खादाडी यादी थोडक्यात(??) थांबवल्याबद्द्ल मंडळ आभारी .....फ़िरते आणि लिहिते रहा...) आमची भूमिका सध्यातरी वाचकाचीच आहे..

    ReplyDelete
  6. रोहणा किती दिवसानी आलीये ही पोस्ट, त्यातही तू आणि श्रीताईची एकत्रच ..आम्हाला वर्णन आणि फोटो पर्वणी :)

    मस्त मांडल्यायेस आठवणी एकदम... मजा आली वाचताना!!!

    ReplyDelete
  7. सेनापती, आठवणी सगळ्या जाग्या झाल्या! पोस्ट खूप छान झाली आहे! ह्या मस्त ट्रेक बद्दल तुझे पुन्हा एकदा आभार! :)

    ReplyDelete
  8. आणि फोटो खूप छान आहेत! :)

    ReplyDelete
  9. अप्रतिम रोहन...पहिला आणि शेवटच्या फोटोसमोर नतमस्तक !!!

    ReplyDelete
  10. रोहण्णा, झक्कास एकदम.. !! छोट्या छोट्या उदाहरणांवरून तू आदर्श ट्रेक लीडर कसा असावा हे दाखवून दिलंस. त्याबद्दल तुझं मनःपुर्वक अभिनंदन !!!!

    आपल्याला एक ट्रेक एकत्र करायचाय राव.. लवकर जमवूया :)

    >> गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात असे मला वाटत आले आहे. अर्थात त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी.

    झक्कास !! एकदम सही..

    ReplyDelete
  11. आणि वर्ड व्हेरिफिकेशन अजूनही चालू ठेवल्याबद्दल खराखुरा णीशेढ ;)

    ReplyDelete
  12. वाह रे!!! छानच सविस्तर लिहलं आहेस. तेवढीच माझीपण एक फेरी झाली. :)

    ReplyDelete
  13. अरे हा!!! फोटोतर अप्रतिमच आहेत. जलाशयाने वेढलेला तुंग किल्ला तर खास!!! the group now have really amazing memories :) :) :)

    ReplyDelete
  14. रोहना, ट्रेक मस्त झालाच होता आपला. त्यात भर तुझ्या पोस्टने घातली बघ. :)बाकी गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात फक्त... १००% सहमत आहे.
    [ चक्क तू बेसनाचे लाडू विसरलास??? :(( ]

    ReplyDelete
  15. सुहास .. उर्फ भावी सेनापती.. करू करू.. अजून असे काही ट्रेक करू... :)

    विक्रम... पोस्टसाठी बराच उशीर झाला.. कामात गुंतलो होतो. पण लिहायला बसल्यावर २ दिवसात पूर्ण केली. आपली भेट कधी??? जानेवारीत देवगिरीला जाऊया?

    दीपक.. तू खरच हुकाव्लास हा ट्रेक.. आता पुढच्या वेळी टांग नको देऊ...

    अपर्णा.. मी २००० पासूनच शमीच्या कारकिर्दीत आहे... :) आता आपण एकत्र ट्रेक कधी करतोय ते बघुया... :)

    ReplyDelete
  16. तन्वे... तू काय फक्त वाचूनच मजा घेणार आहेस?? इकडे कधी येतेस??? अजून एक ट्रेक करायचं ना?

    अनघा... तू शेवटी यायचे जमाव्लेस आणि ट्रेक नीट पूर्ण केलास, मला खूप आनंद झाला..

    अनाकलनीय... धन्यवाद... :)

    हेरंब... लवकरच जमवुया??? पण कसे? तू जमवतो आहेस का तुझी वारी?

    ReplyDelete
  17. हेरंब.... तुझा निषेध स्वीकारून वर्ड व्हेरिफिकेशन काढून टाकलंय रे!!!

    सौरभ... तू येच. आपण एखाद्या भन्नाट ट्रेकला जाऊ... ;)

    ताई... असा कसा विसरलो??? :( पण पोस्ट लगेच बदलून पुन्हा टाकली आहे... कशी आहेस तू? मी येतोय लवकरच. भेटूच.

    ReplyDelete
  18. सेनापती लई भारी पोस्ट झाली न राव. पुन्हा एकदा सर्व आठवणी ताज्या झाल्या..
    "गड-किल्ले नेहमीच आपल्याशी बोलतात असे मला वाटत आले आहे. अर्थात त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी."
    एकदम मनाला लागलं हे वाक्य..खरच खूपच छान...
    "उदंड उत्साही सागर नेरकर" पोटात गुदगुल्या झाल्या सारखं वाटलं :)
    भेटू पुन्हा एकदा सह्याद्रीच्या मळलेल्या वाटेवरती...नक्कीच...

    ReplyDelete
  19. आपली भेट कधी??? जानेवारीत देवगिरीला जाऊया?

    Ho Nakki :)

    ReplyDelete
  20. आहे इथेच पण बंद केलंय रे लिहिणं...वाचतेय नियमित तुम्हा सगळ्यांचे ब्लोग्स
    तू का बंद केलास खादाडी ब्लॉग?

    ReplyDelete
  21. अरे! बदललीसही... :) मी मजेत आहे. सप्तश्रुंगीला जातेय.
    तू ये लवकर. भेटूच आणि मस्त दंगाही करू जरा.

    ReplyDelete
  22. रोहना मस्त झालीये रे पोस्ट...परत तो दिवस आठवला...लवकरच पुढच ट्रेक करुयात...खो ची आठवण आहे तर तुला.. ;)

    ReplyDelete
  23. अप्रतीम.. मला नेहमीच तुझ्या ब्लॊगच्या पोस्ट्स आवडतात. सुंदर लेखनशैली आहे तुझी. ग्रेट. ही पोस्ट सुद्धा सही आहे. वाचून लगेच जावंसं वाटतंय तिथे...

    ReplyDelete
  24. अप्रतिम लेख आहे रे... !
    फोटो देखील गजब !!!

    लै भारी

    ReplyDelete