Showing posts with label हरिश्चंद्रगड़. Show all posts
Showing posts with label हरिश्चंद्रगड़. Show all posts

Monday, 1 February 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - अभिजितच्या मनातून ... !

बरेच महीने झाले 'कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़' या भ्रमंतीवर लिखाण करायचे होते. गेल्या महिन्यात लिखाण पूर्ण केल्यावर आख्या ट्रेक ग्रुपमधून मला प्रतिक्रया आल्या. अभिजितने तर छोटेसे लिखाणच करून त्याच्या मनातल्या आठवणी माझ्यासमोर मांडल्या. त्याचे विचार येथेच ब्लॉगवर पोस्ट करावे असे वाटले म्हणून हां पोस्ट...

"18 यात्री... काही अनुभवी तर काही अगदीच नवखे. मी का गेलो? खरच माहीत नाही. पण ट्रेक संपताना मात्र उत्तर सापडले. कल्याण ते इगतपुरीसाठी ट्रेनमधील तोबा गर्दी. त्यात काकाची बोंबाबोंब. धावपळ आणि धमाल. रोहन, सी.एस.टी.ते इगतपुरी प्रवास डोक्यातून डीलिट झालाय. आठवतच नाही.

राजेश माझ्याच ग्रूप मधे होता आणि तिसरा भिडू, दीप्ती बावा... बाबा.......!


रात्रीचे ते धान्य वाटप तर भयानक. हिमांशू किराणा स्टोर कीपर. वाटणारा राहुल आणि गल्ल्यावर शेफाली. सत्या सूपरवाइज़र. हा हा... झोपेत काय दिले आणि कशात भरले, कोणाचा कोणाला पत्ता नव्हता. नशीब मास्टर लिस्ट होती शेफालीकडे.


ट्रेक सुरू झाला तसे सॅकचे वजन जाणवू लागले. मंदिरापर्यंत पोहचतना धाप लागली. अजुन असेच ५ दिवस... बापरे! आणि चूल पाहून तर ओरडलोच. (अजूनही चुलीशी माझे सख्य नाही). दीप्ती बावा आणि टीमने सर्वात आधी समीट केला. आम्ही पोहचलो तेव्हा ती संतोष आणि अभिषेकबरोबर साखळी खेचण्याची पैज लावण्यात मग्न होती. देवाला नमस्कार केला. एवढ्या दुपारी देखील गार वाटत होते. पहिलाच ट्रेक... तोही सह्याद्रीच्या सर्वोच्च शिखरावर. इट वॉज अ ग्रेट फीलिंग.


शेंडीपर्यंत ट्रेकदेखील छान होता. काळोखात आम्ही हरवलो की काय म्हणून प्रशांत जाम घाबरला होता. आणि ट्रक राइड तर एकदम झकास. धिंगाणा घातला अगदी. शाळेत उतरलो तेव्हा दमलो होतो पुरे. कवीश आणि प्रवीण इथेच भेटले. ते सी.डी.एस.ची परीक्षा देऊन आले होते. जेवण राहीले बाजूला. झोपून कधी गेलो कळलेच नाही. “काका मात्र झोपला नव्हता. उद्याची स्क्रिप्ट लिहीत बसला होता बहुतेक.”
सकाळीच हिमांशुने लीडरशिप कविशला हॅण्ड ओवर केली. हक्का नुडल्स आणणारी शेफाली किवा राहुलच असणार. खाता खाता पुरेवाट झाली. पार्ले-जी आणि चहा मात्र बेस्ट कॉंबिनेशन. लॉंचमधला प्रवास तर अजूनही आठवतो. हळू-हळू मागे पडणारे कळसुबाई शिखर आणि जवळ येणार रतनगड. स्वप्नवत दुनियेत असल्यासारखे वाटत होते. पण त्यात विरजण पडले. काकाची बाइनाक्युलर गायब. कशी, कुठे, कुणी... सगळे सी.आइ.डी. फंडे वापरुन झाले. शोध मोहिमेत अपयश आले आणि काका आमच्यावर घसरला. सगळयांचे ब्रेन वॉश झाले. रतनगड स्कीप करायचे ठरले.


कात्राबाईच्या खिंडीत मनाली आणि सुमेधाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. हिमांशू ब्लीस्टर पीडीत होता तर शेफालीची पाठ धरली होती. पण काकाला टेंशन वेगळेच होते. रात्रीचे...! रोहनने छान रंगवली आहे ती रात्र. इतक्या गोष्टी घडल्या त्या रात्री... आठवण आली की शहारे येतात. रोहन, राजेशला विचारू, पुन्हा त्या जागी जाता येईल का...? तोच नेऊ शकेल कदाचित...


जाम बोर वाटत होते. दोन दिवस नुसतीच तंगडतोड. त्यात ती कालची रात्र. रोहनचे नॉनस्टॉप खाल्लेले पार्ले-जी आणि काकाच्या अधून-मधून कान पिचक्या. काय करत होतो काय पत्ताच नव्हता. सर्वांशी आता बऱ्यापैकी ओळख झाली होती. त्यामुळे बडबडीत वेळ भराभर जात होता. अंतर मात्र काही कमी होत नव्हते. जेवण पुराण तर विचारू नका. रोहन आणि टीमला शिक्षा भारी झाली. पण या ५ बिलंदरानी ती मजेमजेत पूर्ण निभावली. मंदिरातल्या चहाची एक गंमत सांगतो. हिमांशू खूप दमला होता. बूट भिजल्यामुळे गार पडला होता. त्याच्यासमोर चहा ठेवला. हातात पार्ले-जी दिले. पण त्याला ते खाताच आले नाही. तो चहात बिस्किट बुडवून खाईपर्यंत ते खाली पडायचे. असे तीन वेळा झाले. शेवटी कोणीतरी त्याला अक्षरष: भरवले. हा हा...


गड चढताना माझ्यापुढे मनाली होती. तर सत्या मागे. पण टॉर्च मात्र एकच. सत्या अर्धवट झोपेत माझ्या पावलावर पाऊल टाकत चालत होता. मी आणि मनाली काही बाही बडबडत स्वतःला जागे ठेवायचा आटोकाट प्रयत्न करत होतो. गडावर जेव्हा पोचलो तेव्हा काहीच दिसत नव्हते. जेवण केले की नाही ठाऊक नाही. गाढ झोपलो हे मात्र खरे.

काकाच्या रागाचा धनी व्हायची आज माझी वेळ होती. त्याचे झाले असे... की गुहेबाहेरच्या दगडावर मी आमच्या कॉलेजची नावे मार्करने लिहिली. काकाने ते पहिले. गडाचे सौंदर्य बिघडवले म्हणून माझी शाळा घेतली आणि मग फर्मान काढले की "जो पर्यंत मी ते लिखाण धुवून साफ करत नाही तो पर्यंत मला गड फेरीला जाता येणार नाही" झाले...! मी लागलो कामाला, स्टीलवूल घेऊन. घासत बसलो एकटाच. बाकी सगळे गेले. प्रवीण आणि आशिष मात्र थांबले माझ्यासाठी. पर्मनॅंट मार्कर असल्यामुळे बराच वेळ गेला. नखातून रक्ता येऊ लागले. पण कोकण कडा बोलावत होता. झाले एकदाचे साफ. काकाचे अप्रूवल घेतले आणि धाव मारली तिघानी कोकणकड्याकडे.

'अप्रतिम' असेच वर्णन करता येईल इतका सुंदर आहे हा कडा. रोहन्या डोळ्यासमोर उभा केलास अगदी तुझ्या ब्लॉगमधून आणि हा ग्रूप फोटो... माझ्या आयुष्यातील "वन ऑफ दि बेस्ट मोमेन्ट" आहे.

परत आल्यानंतर सगळ्यात जास्त वैताग मला आला होता काकाचा नवीन निर्णय ऐकून. एकतर प्रथमच दिवाळीचा पहिला दिवस घरी नसणार होतो. त्यात ती पूर्ण केव धुवून काढायची म्हणजे काय??? पण म्हटले... आलिया भोगासी... पण रागाच्या भरात सामान शिफ्ट करताना ३ वेळा माझे डोके गुहेच्या दारावर आपटले. अजुनच वैतगलो. निषेध करायचा म्हणून गुलाबजामचा त्याग केला. डाळ ढोकळी पण पाण्याबरोबर कशीबशी ढकलली. भयानक दिवस गेला. रात्री मात्र मस्त गप्पा रंगल्या. दिवसभरचा गोंधळ विसरून छान मजा केली.



अभ्यंग स्नान राहीले बाजूला, इथे तर आंघोळ करायचे वांदे होते. सर्वात आधी मी उठलो होतो. काकाने कालच दही भात लावून ठेवला होता सकाळच्या न्याहारीसाठी अणि मलाच दिला चवीसाठी. तो पण अगदी मूठभर. त्याला कोण सांगणार की मला दही मुळीच आवडत नाही. पण पुन्हा... आलिया भोगासी म्हणून खाल्ला. वर सांगून टाकले, छान झालाय. हा हा... बाकीच्यानी मात्र खरेच मेजवानी हाणली.


परतीचा प्रवास. थोडी हूरहुर लागली होती. पण आनंद देखील होत होता. ५ दिवसांच्या सवयीमुळे कोणालाच काही त्रास जाणवत नव्हता. आणि सॅक पण बऱ्यापैकी हलक्या झाल्या होत्या. विहिरीजवळची पॉट पौरी म्हणजे या सगळ्याचा कळस.


"डोंगरात कसल्या सीमा नसतात. मनाला येईल तो वेडेपणा करण्याची मुभा असते."

तिथून निघालो. मनालीशी चांगली मैत्री झाली होती. दोघेच निघालो गप्पा मारत. बराच वेळ बोललो. लंच ते खुबी फाटा. ऑलमोस्ट एक ते दीड तास. खुबी फाट्याला माझा चष्मा गायब. बसमधे कळले, तो मनालीनेच लंपास केला होता. काका एकदम अचंब्यात. त्यात एस.टी.मधे त्याच्या डोक्यावर ठेवलेला स्टोव पडला. तो गार. हा हा... मुरबाड आणि मग कल्याणला पोहचलो. ट्रेनमधे बसल्यानंतर एकदम खिन्न वाटले. ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"

"इथून पुढे काय म्हणतोस... तुझी-माझी दोस्ती आणि आपली सह्यभ्रमंती" ... :)


ही भ्रमंती संपणार असे वाटले..... इथून पुढे काय.....???"
अभ्या... इथून पुढे तर सुरू झाली एक कधीही न संपणारी सह्ययात्रा.... :)

खरच रे रोहन, सह्ययात्रा - मनाला वेड लावणारी, ताप कटकटी पासून मुक्त, आयुष्याचे धडे देणारी... अतिशयोक्ती करत नाही. माझ्या आयुष्याचे धडे मी डोंगरातच गिरवले आहेत. ग्रॅजुयेशन पर्यंतच्या १५ वर्षात जे शिकलो नाही ते या एका ट्रेकने शिकवले. ट्रेकच्या आधीचा अभिजीत आणि ट्रेक नंतरचा अभिजीत यात जमीन असमानाचा फरक आहे. ज्या आत्मविश्वासाने आज मी काम करतो तो आत्मविश्वास या ट्रेकनेच आलेला आहे. नेतृत्व तर अगदी अंगात भिनले. जगण्याला खरा अर्थ मिळाला. योग्य आयोजनाचे महत्व पुरे पूर पटले.
नवीन सवंगडी मिळाले. 

जुने सवंगडी अजुन घट्ट झाले. राजेश तर आमचा राजदा ( राजेश दादा ) बनला. मी आणि रोहन... डोंगर वेडे झालो. शेफाली, मनाली, सुमेधा, कविता, हर्षद, प्रशांत, कवीश याना गिर्यारोहनाची गोडी लागली. आशिष, प्रवीण, राहुल, सुरेश तर आज उत्करूष्ट रॉक क्लाइंबर आहेत.

निसर्गाशी बंधिलकी, आपुलकी इथूनच निर्माण झाली. सह्याद्रीची ओळख झाली. नकळत महाराजांशी जवळीक साधता आली. या गड किल्ल्याना पाहून दुर्दम्य इच्छा शक्ति मिळाली. इतिहास फक्त पुस्तकात न रहता आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला.

काकाने जे काही फंडे तिथे शिकवले आहेत ते पदोपदी उपयोगी पडत आहेत. मी तर म्हणेन मॅनेज्मेंटचा एखादा कोर्स करण्यापेक्षा काका बरोबर ट्रेकला जावे. हा हा... काय रोहन? आजही ते मुंबई यूनिवर्सिटी मधून हे काम अविरत करत आहेत. काकाचे आभार मानीत नाही. कारण आपल्यांचे कसले आभार??? पण तरीदेखील "आइ ओ अ लॉट टू धिस मॅन"

बर्‍याच मोहिमा झाल्या कळसुबाई नंतर... अगदी लेह-लडाख देखील. पण या ट्रेकची मजा काही औरच होती. अवीट अशी. एवरग्रीन...
.
.

Sunday, 17 January 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !

कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़ अश्या एकुण ५ दिवसाच्या माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच मेगा ट्रेकवरची पहिली पोस्ट वाचल्यानंतर पंकजने मला प्रश्न केला. ''बालवाडीमध्ये असतानाच हायस्कूलचा ट्रेक केलास?" ह्याचे उत्तर देखील त्याच्याकडेच होते. आपल्या इतिहासावर - भूगोलावर प्रेम वगैरे सर्व मान्य. पण 'खाज' हे अगदी खरे-खुरे उत्तर. इथला कुठलाही अस्सल ट्रेकर, पक्का भटक्या ह्या सह्याद्रीमध्ये कसा तावून सुलाखून निघलेला असतो. पण त्यासाठी अर्थात तपश्चर्या देखील तितकीच महत्वाची. खाज जितकी जुनी तितका ट्रेक्कर अस्सल, पक्का भटक्या...


गेल्या ५ दिवसात आम्ही तेच काहीसे अनुभवत आलो होतो. एकीकडे सभोवतालचा निसर्ग मुक्तहस्ताने त्याचे ज्ञान वाटत होता. 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या ५ दिवसात. दुसरीकडे काका सलग ५ दिवस नित्यनियमाने आमची 'डोंगरातली शाळा' घेत होता. गरज पडेल तेंव्हा 'बरोबर मारत' सुद्धा होता. त्यात कुठेही खंड पडला नव्हता. ह्या पहिल्याच ट्रेकमध्ये सह्याद्रीच्या आकंठ प्रेमात बुडालोच नाही तर त्याच्या विविध रुपांनी भारावून देखील गेलो. अक्षरश: वेड लागते म्हणतात ना ते काय असते ते ह्या ट्रेकमध्ये अनुभवायला मिळाले. काय काय नाही अनुभवले... 'कळसुबाई' सारख्या शिखरावरची ती वजनी चढ़ाई, रतनवाडीला जाताना केलेला भंडारदरा जलाशयातला प्रवास, कात्राबाईच्या जंगलातली ती रात्र, हरिश्चंद्रगडाची अंधारी चढ़ाई असे एक ना अनेक चाबूक अनुभव ते ही पहिल्याच ट्रेकमध्ये... अर्थात पुढे सुद्धा अनेक भारी अनुभव आले पण ते पेलण्याची संपूर्ण ताकद, आवश्यक आत्मविश्वास आला तो ह्या पहिल्या ट्रेकमध्ये. हा ट्रेक काहीतरी नवीनच देऊन गेला मला. मनातली उर्मी जागवून गेला. स्वावलंबन, प्रसंगावधान, ध्येयाशक्ती, निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला पाडून गेला. सर्वात महत्वाचे म्हणजे 'कुठल्याही आव्हानावर मात करण्याची ईर्षा' प्रेरित करून गेला. 'जगण्याचा एक वेगळाच अर्थ' बहुदा मला लक्ष्यात आला. ह्या ट्रेकमध्ये पाहिलेले एक-एक दृश्य, जगलेला एक-एक क्षण अजून सुद्धा ताजा आहे मनात. जणू काही अगदी काल-परवाचीच गोष्ट आहे. १० वर्षे होउन गेली तरी त्या सर्व घटना सर्रकन डोळ्यासमोरून सरकून जातात. इथल्या रौद्रसौंदर्यात रांगडेपणात एक विलक्षण शक्ती आहे. एकदा का तुम्ही यात शिरलात की हे व्यसन सूटणे कठीण किंबहुना अशक्य. आणि सोडावे तरी का? हा नाद खुळा एक नंबरी आहे. खरच...

"मनुष्य निसर्गापुढे किती खुजा आहे. माणसाकडे आत्मविश्वास असावा. साहसीपणा असावा. पण आततायीपणा नको. निसर्गात भ्रमंती करताना हे भान नेहमीच राहिले पाहिजे. नाहीतर आपली काही धडगत नाही."

हे तत्व मी पहिल्याच ट्रेकमध्ये शिकलो. ह्याचे पूर्ण श्रेय 'काका जोशी'ला सुद्धा जातेच. हा एक अवलिया आम्हाला बरोबर भेटला. त्याने आम्हाला 'डोंगरातले तत्वज्ञान' अतिशय कमी वेळात शिकवले. आता असे झाले आहे की सुट्टीवर तिकडे आल्यानंतर कुठे ट्रेकला गेलो नाही की जीव अस्वस्थ होतो. सह्याद्री आपल्याला बोलावतोय आणि आपण जात नाही म्हणजे काय? मी फार काळ सह्याद्रीपासून दूर राहू शकत नाही. तो मला बोलावतो तेंव्हा मी सहज त्याच्याकडे खेचला जातो.

आज मी जो काही आहे तो ह्या 'सह्याद्री'मुळे याचे पूर्ण भान मला आहे. त्यानेच तर घडवला आहे हा ... सह्यभ्रमंतीला आसुसलेला एक डोंगर यात्री ... डोंगर वेडा ... !
.
.

Saturday, 16 January 2010

परतीचा प्रवास 'तोलारखिंड' मार्गे ... !

पहाटे पहाटे सर्व उठले आणि परत निघायच्या तयारीला लागले. आज ट्रेकचा नक्की शेवटचा दिवस होता. वाढीव असला तरी... चहा नाश्ता झाला. ४ दिवस 'शंभो' झालेले नव्हते तेंव्हा फ़क्त घासून-पुसून स्वच्छ झालो आणि आम्ही तोलारखिंडीकडे निघालो. गुहेमधून बाहेर पडलात की उजव्या हाताची वाट तोलार खिंडीकडे जाते. गेल्या ३-४ दिवसाच्या ट्रेकवर गप्पा टाकत आम्ही चालत होतो. तशी घाई नव्हतीच कारण पुढे अख्खा दिवस पडला होता खिरेश्वरला पोचायला. दिवाळी पहाट तर हुकली होतीच मग आता उगाच धावाधाव करून काय उपयोग होता? हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून तोलारखिंड चांगली ५-६ किमी. लांब आहे. मध्ये अनेक ढोरवाटा येउन मिळतात. त्या पार करत मुख्य वाट न सोडता खिंड गाठायची होती. मध्ये अनेक छोट्या-छोट्या टेकड्या लागतात. वाट संपता संपत नाही. अक्षरश: अंत पाहते. तुम्ही कधी गेलात तर ह्या वाटेवर दुपार टाळा. घसा सुकून जीव जाईल पण वाट संपणार नाही. आम्ही मात्र सकाळी सकाळी निघालो असल्याने तितका त्रास जाणवत नव्हता. शिवाय खायचे सर्व सामान देखील संपले होते. जे उरले होते ते गडावर बाळूला देऊन आलो. आश्चर्य वाटेल पण त्याने ते फुकट घेतले नाही. योग्य ते पैसे आम्हाला देऊ केले.आम्ही त्याच्याकडून मात्र थोड़े कमी पैसे घेतले. उरलेले पार्ले-जी मात्र मी जवळच ठेवले. ते आजच्या दिवसात संपवायचे होते ना मला... ;)

आम्ही निवांत असलो तरी तिकडे आमच्या घरी मात्र पालकांची धावाधाव सुरू होती. का विचारताय? काल संध्याकाळी घरी आम्ही जे घरी पोचायला हवे होतो ते अजून सुद्धा पोचलेले नव्हतो. शिवाय कोणीच घरी संपर्क करू शकले नव्हते. आमच्यापैकी सर्वचजण पहिल्यांदाच असे ट्रेकला सह्याद्रीत आले होते तेंव्हा घरी काळजी वाटणे साहजिक होतेच. सत्याच्या आईने आमचे ट्रेकचे दुसरे सर म्हणजे 'चारूहास जोशी' यांना गाठून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी "अजून काहीही माहिती आलेली नाही. आपण १ दिवस थांबूया. नाहीच काही कळले तर ट्रेकरूटवर उलट्या बाजूने आपण सर्च टीम पाठवू" असे सांगितले. थोडक्यात काय हाच नियम आहे सह्याद्रीमधला. सह्याद्री मध्ये आपण कुठेही अडकले असू तरी १-२ दिवसात कुठल्या ना कुठल्या संपर्क साधनांपर्यंत जाउन पोचतोच. तेंव्हा तितकी वाट बघावीच लागते. मात्र सत्याच्या आईचे काही त्याने समाधान झाले नाही. त्यांनी इतर पालकांना संपर्क साधला. त्यांना माझ्या वडिलांकडून समजले की त्यांनी ह्या संदर्भात आधीच पोलिस कंप्लेंट केलेली आहे. झाले असे की आमच्या पिताश्रींनी कालचा दिवस आणि मग पूर्ण रात्र आमची वाट पाहिल्यावर सकाळी तड़क उठून ठाणे कोपरी पोलिस स्टेशनला जाउन ह्या संदर्भात माहिती पोलिसांना दिली. तिकडून मग सर्व चक्र फिरली आणि पोलिस वेगवेगळ्या कंट्रोल रूमवरुन माहिती मिळवण्याचे काम करू लागले. इगतपुरी, कसारा, कल्याण इकडून काहीच माहिती येत नव्हती. कुठे कुठल्या ट्रेकर ग्रुपला अपघात वगैरे अशी सुद्धा माहिती नव्हती. पोलिसांनी सुद्धा "थोड़े थांबूया. आजच्या दिवसात काही माहिती आली नाही तर सर्च टीम पाठवू" असेच सांगितले.

ह्या सर्व प्रकाराची काहीही माहिती नसलेले आम्ही २१ उड़ाणटप्पू तोलारखिंडीच्या मार्गाने आगेकूच करतच होतो. २ तासात खिंडित पोचलो. तशी छोटीशी आहे खिंड. उतरायला फारतर ५-७ मिनिट लागतात. पण मध्ये-मध्ये खोबण्या धरत-धरत खाली उतरावे लागते. फारसा त्रास जाणवला नाही आम्हाला. खिंड उतरून गेल्यावर पायथ्याला वाटेला २ फाटे फुटतात. डावीकड्ची वाट जाते 'कोथळे'मार्गे 'कोतूळ'कडे. तर उजव्या हाताची वाट खिरेश्वरमार्गे खूबीकडे जाते. ह्याच वाटेने आम्ही पुढे जाणार होतो. या ठिकाणी वाघजाईचे एक छोटेसे मंदिर देखील आहे. इकडून फारतर तासभर उतरून गेले की खिरेश्वर गाव आहे. तेंव्हा एक छोटासा ब्रेक झाला. त्या ट्रेकच्या दुर्मिळ असलेल्या फोटोंपैकी हा एक. बघा मी सापडतो का... :)



तिकडून निघालो आणि वेळेत खिरेश्वरला पोचलो. डाव्या बाजूला खाली गाव आणि उजव्या हाताला वरच्या बाजुला हरिश्चंद्रगडाचे नेढ दिसत होतं. नेढ म्हणजे आरपार असणारे भोक. सुईमध्ये असते ना तसेच पण हे डोंगरामधले. त्या पलीकडून गडावर जायला अजून एक मार्ग आहे. पण सध्या त्या वाटेने फारसे कोणी जात नाही. पूर्वी मात्र तो राजमार्ग होता असे म्हणतात. आम्ही गाव डाव्या हाताला ठेवत रस्त्याला असणाऱ्या एका विहिरीपाशी निवांत पहुडलो. ११ वाजून गेले होते आणि भूका लागायला लागल्या होत्या. तांदुळ - डाळ वगैरे सामान तर आता काही सोबत नव्हते पण 'रेडी टू इट' जे काही होते ते सर्वांनी बाहेर काढले. अक्षरश: खजाना निघाला. चिवडा, चकल्या, शेव, लिमलेटच्या गोळ्या, पॉपिंस, पार्ले-जी आणि मारी बिस्किटे, फरसाण, गाठे असे जे काही म्हणून असेल ते सर्व एका पेपरवर एकत्र केले. मग ते 'स्पेशल मिक्स्चर' विहिरीच्या थंड पाण्यासोबत खाल्ले. सर्व टेस्ट मिक्स झाल्या होत्या. पण एक वेगळीच टेस्ट तयार झाली होती. वा. मज्जा आली ते खायला. पुन्हा कधी तरी असे बनवून खायला हवे. खिरेश्वर वरुन निघालो आणि पुढच्या रस्त्याला लागलो. इकडे आता एक छोटेसे धरण झाले आहे. भिंत मात्र चांगली १०-१५ मीटर रुंद आहे. आम्ही मात्र त्या भिंतीवरुन 'खूबी'कडे न जाता आधी गावाबाहेर उजव्या हाताला नागेश्वर मंदिराकडे वळलो. तेथील कोरीवकाम बघून थक्कच झालो. हे मंदिर यादवकालीन असून सध्या पूर्णपणे दुरावस्थेत आहे. तिकडून थोडेच पुढे एक लेणं आणि बांधीव टाके सुद्धा आहे. हे सर्व बांधकाम पाहून आम्ही पुन्हा धरणाच्या भिंतीवर येउन पोचलो.

आता ऊन डोक्यावर आले होते आणि समोर धरणावरची नागमोडी वाट संपता संपत नव्हती. मी आणि शेफाली गप्पा मारत चाललो होतो.पाहिल्या दिवसापासून अतिउत्साही असणारी कार्टी अजून सुद्धा पुढेच पळत होती. तर आता 'ही चाल कधी संपणार' म्हणत रेंगाळलेली काही पावले मागे राहिली होती. आम्ही दोघ मात्र गप्पा मारत मारत कधी पलिकडे पोचलो कळले सुद्धा नाही. अखेर ५ दिवसांनी आम्ही डांबरी रास्ता बघत होतो. गाड्या दिसत होत्या. आता मात्र घरी जायची ओढ़ एकदम वाढली. आपल्या आई-बापाला काळजीमध्ये टाकुन आपण मात्र इकडे मस्त मज्जा करतोय हे मनाला सारखे लागून राहत होते. एका चहाच्या टापरी शेजारी आम्ही बस्तान मांडले आणि येणाऱ्या S.T. ची वाट बघू लागलो. तेवढ्या वेळात बाजुच्या दुसऱ्या एका टपरीमध्ये वडयाची ऑर्डर दिली. मुरबाडला पोचेपर्यंत काही पोटात नको का. गावातल्या एका पोराकडून विल्याने एक फटाका घेतला आणि स्वतःची दिवाळी मधला फटाका फोड़ण्याची हौस भागवून घेतली. ३ च्या आसपास बऱ्यापैकी रिकामी एक गाडी मिळाली. त्यात घुसलो सर्व आणि मग अखेर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. उजव्या हाताला दुरवर हरिश्चंद्रगड़ आणि विहंगम कोकणकडा दिसत होता. पुढे पुढे जात होतो तसे काका आणि राजेश आम्हाला अजून काही गड़ किल्ले दाखवत होते. "तो बघा तो भैरवगड. हा जीवधन - नाणेघाट. तिकडे दूर दिसतोय ना तो गोरखगड आणि सिद्धगड़." जसजसे एक एक नवीन गड़-किल्ले बघत होतो तशी तिकडे जायची इच्छा अधिक तीव्र होत होती. २ तासाच्या प्रवासानंतर आम्ही मुरबाडला येउन पोचलो. ती गाडी आम्ही तिकडे सोडली आणि सर्वजण 'फोनबूथ'कडे धावले. काही क्षणात सर्व फोनबूथ आम्ही ताब्यात घेतले होते. घरी कळवा-कळवी झाली तसे आम्ही सुद्धा निवांत झालो. थोड्याच वेळात तिकडून निघालो आणि कल्याणमार्गे आपापल्या घरांकडे कूच झालो. आमचा सह्याद्रीमधला ५ दिवसाचा पहिलच ट्रेक सफळ संपूर्ण यशस्वी झाल्याने आम्ही भलतेच खुश होतो... ट्रेक संपला असला तरी एक कधीही न संपणारी 'सह्यभ्रमंती' नुकतीच सुरू झाली होती...
.
.
पुढील भाग - कळसूबाई ते हरिश्चंद्रगड़ - सारांश ... !
.
.

Thursday, 14 January 2010

हरिश्चंद्रगड आणि विहंगम कोकणकडा ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...


सकाळी जाग आली तेंव्हा बाहेर आमच्यापैकीच काही जणांची 'किलबिल' सुरू होती. आळस देत-देत बाहेर आलो आणि समोर बघतो तर काय... सुंदर दृश्य होते समोर... एक सुंदर पुष्करणी आणि त्याच्या बाजुलाच असलेले एक अतिशय महादेवाचे सुरेख मंदिर. काल रात्री अंधारात हे सौंदर्य बघायचे हुकले होते. थोड़े पुढे जाउन बाहेर पाहिले आणि परत मागे आलो. ज्या ठिकाणी राहिलो होतो ती जागा सुद्धा अप्रतिम होती. हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखराच्या पोटात खोदलेली एकुण ८ लेणी आहेत. त्यातल्या सर्वात मोठ्या आणि राहण्याजोग्या असलेल्या दुसऱ्या लेण्यात आम्ही राहिलो होतो. शेजारच्या म्हणजे तिसऱ्या लेण्यात प्रवेश करतानाच चांगली २ मीटर उंचीची एक कोरीव गणेशमूर्ती आहे. त्यामुळे त्याला 'गणेशगुहा' असे ही म्हणतात. कालच्या 'लंबी रेस की दौड़' नंतर सर्वच थकलेले जाणवत होते. पण बसून चालणार नव्हते कारण आज ट्रेकचा शेवटचा दिवस होता. सकाळी गड़ बघून दुपारपर्यंत गड़ सोडून संध्याकाळपर्यंत 'तोलारखिंड - खिरेश्वर मार्गे खूबीफाटा' गाठायचा होता. तिथून पुढे मग माळशेज मार्गे मुरबाड. तेंव्हा आम्ही आवरायला घेतले. चहा बनत आला होता आणि नाश्त्याला काकाने पोहे बनवले होते. इतके मस्त झाले होते की चव अजून सुद्धा जिभेवर आहे. भूक लागली बघा मला लिहितानाच. ते आम्ही सर्वांनी खाल्ले. खाता-खाता काल रात्रीच्या मी हुकवलेल्या काही गोष्टींवर गप्पा सुरू झाल्या. काल रात्री गड़ चढताना कविता इतकी थकली होती की अखेर संतोषने तिची सॅक घेतली होती. पण त्यामुळे संतोषची पाठ दुखून आली होती. शिवाय मी झोपेत असताना कवीशने माझ्या तोंडाला टूथपेस्ट लावल्याचे समजले. (त्याचा बदला राहुलने नंतर घेतलाच... कसा ते पुढे येईलच.)

८ वाजत आले तसे काकाने आम्हा सर्वाना गड़ बघायला हाकलले. गड़ बघून १२:०० वाजता परत गुहेकडे यायचे होते. आम्ही आधी थेट समोर मंदिर आणि पुष्करणी पहायला गेलो. या पुष्करणीचे नाव 'सप्ततीर्थ' असे आहे. त्यात १४ कोनाडे असून आधी त्यात विष्णुमुर्त्या होत्या. खुप वर्षापूर्वी कोणा चोराने त्या पळवून नेल्या. आता असतील कुठल्या तरी श्रीमंत दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात. शेजारीच महादेवाचे प्रशत्र मंदिर आहे. आत प्रवेश केला की मोकळी जागा आहे. आतमध्ये शुद्ध, स्वच्छ आणि अतिशय थंड अश्या पाण्याच्या टाक्या आहेत. एक गणेशमूर्ती देखील आहे. देवळाशेजारून मंगळगंगेचा उगम होतो. अजून थोड़े पुढे 'केदारेश्वर' नावाचे अजून एक लेणं आहे. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यामध्ये बरोबर मध्यभागी असलेला चौथरा आणि त्यावर असलेले भव्य शिवलिंग. हे लेणं ३-४ फुट खोल असून बर्फासारख्या थंड पाण्याने कायम भरलेले असते. आम्ही ते सर्व बघून पुन्हा वरती गुहेबाजुला आलो. इतके बाळूचे घर सुद्धा आहे. तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर त्याला सांगायचे. फ़टाफ़ट पीठल - भाकरी आणि सोबत कांदा-ठेचा लगेच तयार.(काय? भूक लागली ना वाचून? मग इकडे लिहिताना माझे काय होत असेल ते विचारूच नका.. :D)




आम्ही तिथून थेट कोकणकडयाकडे गेलो. गडाच्या पश्चिम भागात म्हणजेच कोकणाकडे तोंड करून उभा असलेला हा कडा म्हणून त्याचे नाव 'कोकणकडा'. आता असा कोणी ट्रेकर नसेल ज्याने कोकणकडा पाहिला नसेल किंवा किमान त्या विषयी ऐकले नसेल. ह्याची महती काय वर्णावी... सह्यादी मधला सर्वात रौद्र आणि भीषण, बघता क्षणीच काळजात थरकाप उडवणारा असा हा अंतर्वक्र आकारात ६००-७०० मीटर लांबीचा आणि ४००० फुटपेक्षा अधिक उंचीचा हा कडा म्हणजे एक विचित्र विलक्षण प्रकार आहे. हिम्मत असेल तर ह्याच्या टोकावर उभे राहून दाखवा. हवेने उडून एक चक्कर नक्की खाल आणि मग पुन्हा येउन जमिनीवर आपटाल इतकी जोरात हवा असते. हेहे.. गंमत करतोय पण फेकलेले दगड सुद्धा बऱ्याचदा हवेने उडून वर येतात इतकी हवा असतेच. अर्थात तसे कृपया कोणी करू नका कारण न जाणे एखादा दगड खाली गेलाच आणि खालून कडयाला भिड़त एखादा प्रस्तरारोहक वर येत असेल तर??? होय .. १९८६ मध्ये हा कडा एका बह्हादराने (मिलिंद पाठक बहुदा) सर केला त्यानंतर अनेक सह्यवेडया प्रस्तरारोहकांनी ह्याची माती भाळी लावली आहे. येथे आता १२०० फुटांचे रेपेल्लिंग अणि व्हयाली क्रोसिंग सुद्धा होते. इथून सूर्यास्त पाहणे सुद्धा एक भन्नाट अनुभव आहे. सूर्यास्त होतो तो आपल्या डोळ्याखाली. म्हणजे 'eye लेवल' खाली. कधी गेलात तर हा अनुभव चुकू नका. पावसाळ्यात गेलात तर फ़क्त इंद्रधनुष्य नव्हे तर इंद्रवज्र सुद्धा दिसू शकते. सूर्य आपल्यावर आणि ढग आपल्याखाली असल्याने आपण बरोबर मध्ये येतो आणि हे असे घडते. मी कुठल्या गडावर नाही मात्र महिन्याभरापूर्वी कामावर जाताना विमानातून पाहिले. सुंदर आणि अवर्णनीय असे. आम्ही गेलो तेंव्हा दुपार झालेली होती तेंव्हा पहिल्यांदा आम्ही हा अनुभव चुकवला हे सांगायला नकोच. पण त्यानंतर मी अजून २ वेळा जाउन आलोय हरिश्चंद्रगड़ला फ़क्त इथून सूर्यास्त पाहण्यासाठी. कोकणकडयाचे दर्शन घेउन तृप्त झालेले आम्ही तसेच उजव्या हाताला सरकत 'तारामती' आणि 'रोहिदास' ह्या गडाच्या २ शिखरांवर गेलो. वर तसे फार काही नाही पण वरुन मंदिर आणि आसपासचा परिसर सुंदर दिसतो. गड़ दर्शन करून परत गुहेकडे जात असताना लक्ष्यात आले की १२ वाजून गेलेले आहेत. तेंव्हा आता आम्ही पुन्हा काकाच्या शिव्या खायला तयार झालो होतो.


पोचल्या पोचल्या काकाने फर्मावले,"सर्वानी समोर फॉल इन करा. एकतर लेट आलाच आहात. पण मला सांगा सकाळी पोहे खायचे सोडून टाकुन कोणी दिले? मला बाजुच्या गुहेत कोपऱ्यात सापडले आहेत." आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलो. पोहे खरे तर इतके मस्त झाले होते की कोणी टाकेल असे वाटत नव्हते. मला तर अजून हवे होते. आणि हा कोण आहे चायला टाकुन देणारा. "इकडे लोकांना खायला मिळत नाही आणि तुम्ही वाया घालवता? हवे तितकेच घ्याना." काका थांबत नव्हता. "जोपर्यंत मला कळत नाही तो/ती कोण आहे तोपर्यंत आपण इकडून हलणार नाही आहोत." आयला.. हलणार नाही म्हणजे? आज तर कुठल्याही परिस्थितिमध्ये घरी पोचायला हवे होते कारण दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाट होती. झाले असे की काकाला गुहेबाहेर अचानक एक धामण दिसली. तिला पकडायला तिच्या मागे-मागे तो त्या गुहेमध्ये शिरला तिकडे त्याला कोपऱ्यात हे पोहे टाकलेले दिसले. बराच वेळ गेला तरी कोणी हात वर करेना आणि काका सुद्धा काही बोलेना. शेवटी काकाने ट्रेकमधला अजून एक बोंम्ब फोडला. "आज आपण घरी जाणार नाही आहोत. इकडेच राहणार आहोत. आणि आता जेवण झाल्यावर आपण आपली राहती केव्ह साफ़ करणार आणि धुणार आहोत." आता आम्हाला काय बोलावे कळत नव्हते. माझ्या डोळ्यात नकळत पाणीच आले होते. मी काकाला जाउन बोललो,"हे बघ. ते पोहे मी टाकले होते. तू काय ती शिक्षा दे. पण आपण आज घरी जाउया. उदया दिवाळीचा दिवस आहे." तो बोलला,"रोहन. मला माहीत आहे पोहे कोणी टाकले आहेत. तेंव्हा तू स्वतःवर ते घेऊ नकोस. आणि आपण आत्ता निघालो तरी संध्याकाळ होईपर्यंत रस्त्यावर पोहचू शकत नाही तेंव्हा आज आपल्याला इकडेच राहणे आहे. कारण मधला रस्ता सेफ नाही. उदया सकाळी-सकाळी आपण इकडून निघू."



आम्ही खिन्न मनाने जेवून घेतले. कोणाचाच मुड नव्हता. कोणीच काही बोलत नव्हते. जेवणानंतर काकाने ती पकड्लेली धामण बाहेर काढली. आम्हा सर्वांना दाखवून मग तिला आम्ही सोडून दिले. दुपारी ३ वाजता मग सुरू झाला धूवाधूवीचा प्रोग्राम. आम्ही ती पूर्ण जागा साफ़ केली. आपण आपले घर साफ़ करतो ना. मग आपले गड़-किल्ले?? ते आपण साफ़ नाही करायचे मग कोणी करायचे? शिक्षा नव्हतीच ती... डोंगरातल्या शाळेचा अजून एक वर्ग होता तो. जवळ-जवळ २ तास ही साफ़ सफाई सुरू होती. मग आम्ही निवांत झालो. हळू-हळू सर्वांचा मुड सुद्धा परत येत होता. संध्याकाळी आम्ही काहीजण गुहेच्यावरती जाउन बसलो. राजेश आम्हाला एक-एक किल्ले आणि डोंगर दाखवत होता. डोंगरांच्या एकामागे एक अश्या ४-५ रांगा दिसत होत्या. त्यात दुरवर कळसुबाई सुद्धा दिसत होते. "इतके दूर आलो आपण चालत? किमान ८०-९० किमी. नक्कीच असेल ना रे." मी राजेशला विचारले. "हो सहज असेल" तो उत्तरला. इतक्यात राहुल चढून वर आला आणि बोलला,"ऐ. कवीश बघ कसा पाय खाजवतोय. हाहा.. खाजखुजली लावून आलो त्याच्या पायाला." काल रात्रीचा बदला अखेर राहुलने घेतला होताच. त्यानंतर बराच वेळ तो खाजवत बसला होता हे सांगायला नकोच. अंधार पडत आला तसे आम्ही अजून सरण आणले. आणि जेवणाची आणि शेकोटीची तयारी केली.

रात्री जेवायला काकाने आणि शेफालीने 'दाल ढोकळी' केली होती. सोबत 'गुलाबजाम' होते. 'दाल ढोकळी'ची वाट लागली होती तर गुलाबजाम मात्र जबरी झाले होते. आता घेतलेले टाकू तर शकत नाही मग त्यासाठी डीलिंग सुरू झाले. "अरे. थोड़ी दाल ढोकळी घे. हवतर २ गुलाबजाम घेतो" इथपर्यंत. मी मात्र गुलाबजाम सोडले नाहीत अजिबात. दिवाळीच्या दिवशी म्हणजे २६ ऑक्टोबरला प्रशांतचा वाढदिवस होता. तेंव्हा रात्री न झोपता गप्पा टाकत बसायचे आणि तो सेलेब्रेट करायचा असा प्लान ठरलेला होताच. चांदण्या रात्रीच्या त्या गप्पा काय होत्या हे काही आता आठवत नाही पण ट्रेक संपता-संपता आमचा एकजीव ग्रुप मात्र बनला होता. ४-५ दिवसांपूर्वी आम्ही सर्व एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो हे कोणाला सांगितले असते तर खरे वाटले नसते. हिच तर किमया आहे निसर्गाची... सह्याद्रीची... त्याच्या मदतीने अजून काही सह्यवेडे तयार करण्यात काका सपशेल जिंकला होता आणि आमच्या नकळत त्याने आम्हाला सुद्धा जिंकवले होते. रात्री बऱ्याच उशिराने आम्ही सर्व झोपी गेलो. प्रशांतला वाढदिवसाच्या आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आम्ही निवांतपणे झोपी गेलो. पण... तिकडे आमच्या सर्वांच्याच घरी काय घडत होते ह्याबाबत आम्ही पूर्णपणे गाफिल होतो. आज रात्रीपर्यंत घरी पोचायचे होते ना आम्हाला.. :) बघुच पुढच्या भागात काय होतय ते. परतीचा प्रवास सुरू झालाय...
.
.
पुढील भाग - परतीचा प्रवास 'तोलरखिंड' मार्गे ... !
.
.

Tuesday, 12 January 2010

मंगळगंगेच्या काठाने हरिश्चंद्रगड़कडे ... !

मागील भागावरुन पुढे सुरू ...

आजच्या दिवसात मधले पूर्ण जंगल पार करत, अग्नीबाण-वाकडी अश्या सुळक्यांखालून 'कुमशेत' गाठायचे होते. तिथून पुढे मग नदी काठाने पुढे जात ४ तासात पाचनई गाठायचे होते. पाचनईवरुन मग वरती चढत हरिश्चंद्रगड़. एकुण अंतर किमान ८-१० तासांचे होते. टप्पा बराच लांबचा होता तेंव्हा उजाड़ता उजाड़ता, ६ वाजता म्हणजे अगदीच भल्या पहाटे आम्ही त्या राहत्या ठिकाणावरुन निघालो होतो. रतनगड़ बराच मागे पडला होता आणि 'अग्नीबाण' सुळका समोर दिसायला लागला होता. त्याच्या उजव्या हाताला आजोबाची प्रचंड प्रस्तर भिंत देखील दिसत होती. रतनगड़ येथील खुट्टा आणि बाण हे सुळके, अग्नीबाण सुळका, आजोबची प्रचंड प्रस्तर भिंत हे सर्व सह्याद्रीमधल्या प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान. आज आमच्यामधले प्रवीण, आशीष, राहुल, सुरेश हे यशस्वी प्रस्तरारोहक आहेत.

चालता चालता आमच्या गप्पा सुरूच होत्या. अग्नीबाण मागे पडला तशी आम्ही डावी मारली आणि अखेरच्या चढाला लागलो. खिंड गाठली आणि पुन्हा डावीकडे उतरु लागलो. खिंडीतून पुढे उतार असल्याने थकवा जाणवत नव्हता तसा. इकडे मध्ये बऱ्याच फसव्या वाटा आहेत. शिवाय लोकवस्ती देखील नाही. एखाद दुसरा लाकुडतोड्या दिसला तरच. तेंव्हा वाटा जपून घ्याव्यात. चुकलात तर अमूल्य असा वेळ वाया जायची १०० टक्के खात्री. सर्वात पुढे राजेश आणि विल्या होतेच. तेंव्हा आम्ही आपले 'जाऊ रे त्यांच्या मागल्या' करत होतो. पण डोंगरातून, जंगलातून ट्रेक करताना वाटेवरच्या खुणा कश्या लक्ष्यात ठेवाव्यात, मार्किंग्स कसे घ्यावेत, थोडक्यात 'रूट'चे नव्हिगेशन कसे करावे याचा अंदाज हळू-हळू येऊ लागला होता. राहत्या जागेपासून निघून ३ तास होत आले होते आणि आम्ही 'वाकडी'च्या पायथ्याला पोचत होतो. मागे दुरवर अजुनही अग्नीबाण दिसत होताच. पण जिकडे जायचे होते तो हरिश्चंद्रगड़ अजून सुद्धा टप्प्यात येत नव्हता. ऊन जसे-जसे वाढायला लागले तशी तहान वाढत गेली. जिकडे राहिलो होतो तिथूनच पाणी भरून घेतले होते ते संपू लागले. वाटेत जिथे कुठे ओहोळ-ओढा लागेल तिथे आम्ही पाणी भरून घ्यायचो आणि पुढे निघायचो. सर्वात पुढे राजेश आणि सर्वात मागे काका असल्याने चुकायची तशी भीती नव्हती. आशिष, संतोष, विवेक, अभिषेक, सुरेश, दीप्ती, प्रवीण ही पहिल्या दिवसापासून पुढे असलेली टोळी पुढेच होती तर मागचे शेफाली, जाड्या, कविता, हिमांशु हे भिडू मागेच होते. मी, अभि, मनाली, सत्या, सुमेधा, प्रशांत, कवीश असे काहीजण आपले मध्य गाठत बरोबर मध्ये होतो.

'वाकडी'हून पुढे मळलेली वाट लागली. उजव्या हाताला कुमशेत दिसू लागले होते. तिकडे पोचायला अजून किमान तास-दिडतास तरी लागणार होताच. एव्हाना ११ वाजून गेले होते. जितका स्पिड असायला हवा होता त्यापेक्षा बऱ्याच कमी स्पिडने आम्ही पुढे सरकत होतो. थकवा जाणवू लागला होता आणि सॅक्स पुन्हा एकदा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. दर काही मिं. नंतर थांबावे लागायचे आणि दम घ्यावा लागायचा. मला तर भूक सुद्धा लागली होती. बहुदा सर्वांनाच. मी माझ्या सॅकमधून पार्ले-जीचे पूड़े काढून कमरेच्या पाउच मध्ये टाकले आणि एक-एक खायला लागलो. शेफाली एव्हाना स्पिड वाढवत आमच्यापर्यंत येउन पोचली आणि आता आम्ही गप्पा मारत पुढे जाऊ लागलो. माझी बिस्किट्स संपली की ती सॅकमधून अजून पार्ले-जीचे पूड़े काढून देई. माझ्या शिवाय मात्र कोणी ती बिस्किट्स खाईना. सर्वांचे मत त्याने तोंड आतून सुकते आणि घसा अजून कोरडा होतो असे होते. तर माझ्या मते त्याने शरीरामधील शुगर आणि ग्लूकोज लेवल नीट राहते आणि थकवा जाणवत नाही असे होते. आजही मी ट्रेकला पार्ले-जी सोबत ठेवतो. आता तर मला आमच्या ग्रुपमध्ये 'पार्ले-जी किंग' हे डोंगरातले नाव देखील मिळाले आहे. नाव ठेवणारा दुसरा तीसरा कोणी नसून माझा सह्यसखा 'अभिजित'च आहे.

आता कुमशेत पर्यंत संपूर्ण उतार होता. डोंगराच्या उजव्याकडेने तर कधी वळसा घालत डाव्याकडेने आम्ही खाली उतरत होतो. लक्ष्य समोर असल्याने वाट चुकायचा प्रश्नच नव्हता. वेळ मात्र चुकली होती. नेहमीप्रमाणे... इतके पोचायला साधारण २ तास उशीर झाला होता. गावात पोचलो. आता इथपर्यंत गाडी रास्ता झाला आहे. 'राजुर'वरुन इथे आणि पाचनईला सुद्धा गाडीने पोचता येते. तेंव्हा रस्ता होता का आठवत नाही पण आम्ही नदीकाठच्या वाटेने पाचनईला पोचणार होतो. कुमशेत गाव थोड़े उजव्या हाताला ठेवत आम्ही नदीकाठाकडे निघालो. नदी पाहिल्यावर वाटले अरे.. 'मंगळगंगा' आली सुद्धा म्हणजे आपण फार दूर नाही आहोत पाचनईहून. पण नंतर कळल की ही आहे 'मुळा नदी'. ( पुण्याजवळची मुळा नदी नव्हे.. ती वेगळी..) अजून पुढे गेलो की मंगळगंगा आणि मुळा एकत्र होतात तिकडून पुढे काही अंतरावर पाचनई आहे. २ वाजत आले होते आणि अजून जेवण बनवायचे होते. काल दुपारी सुद्धा रतनवाडीला पोचायला उशीर झाल्याने दुपारचे जेवण रद्द केले गेले होते. आज मात्र जेवण बनवायचेच होते. पण सर्व इतके दमले होते की आता लाकडे जमवून, चुल पेटवून मग जेवण बनवायचे आणि मग जेवायचे हा प्रकार जीवघेणा वाटत होता. जेवण बनवायची जबाबदारी खुद्द काकाने उचलली होती. सर्वच भिडू चांगलेच दमल्याचे त्याला लक्ष्यात आले होते. राजेश गावातून कुठून तरी कसलीशी गावठी भाजी सुद्धा घेउन आला. मग तो, काका आणि विल्या जेवण बनवायला लागले. अंगात जीव असलेल्या काही जणांनी त्यांना लाकडे जमवून आणि सामान काढून दिले. आम्ही सर्वजण चादरी पसरून निवांत आराम करत होतो. काहीजण नदीमध्ये पोहायला गेले होते. तिकडे जेवण बनत होते पण आम्ही कोणीच काकाला काही मदत करत नव्हतो. तासभर वाट बघून अखेर मी, अभिषेक आणि आशीष दमलो. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. काकाने जेवण तयार झाल्याचे सर्वांना सांगितले. पण ज़रा आधी न राहून मी सॅकमधून तिखट शेवचे एक पाकेट काढले होते आणि खायला लागलो होतो. झाले... काकाने ते पाहिले आणि तो आमच्यावर भलताच डाफरला. "मी इकडे तुमच्यासाठी जेवण बनवतोय आणि तुम्ही काय हे सटर-फटर खाताय. तुम्हाला फुकट बनवून खायला घालायला मी काय आई आहे का तुमची. किमान किम्मत ठेवा ज़रा."

आमचे पुढे काही न ऐकता काकाने कवीशला हाक मारले. "कवीश. यांच्या पाठीवर रात्रीच्या जेवणाचे सुद्धा सामान दे आणि ह्याना पुढे जाऊ दे. नाहीतरी ह्यांना जेवायचे नाही आहे." कवीश सुद्धा काकाची आज्ञा पाळत आमच्या सॅक्स भरताना जास्तीतजास्त सामान कसे भरले जाईल हे बघत होता. त्यात रात्रीच्या जेवणासाठी न लागणारे सामान सुद्धा होतेच. आमच्या तिघांबरोबर म्हणजे मी, आशीष आणि अभिषेक बरोबर विवेक सुद्धा लटकला होता. काकाने आमच्या बरोबर राजेशला पाठवले. लवकर गडावर पोचायचे आणि रात्रीचे जेवण बनवून ठेवायचे अशी आम्हाला शिक्षा होती. माझे टाळके आता पूर्णपणे फिरले होते. सामानाने गच्च भरलेली ती वजनी सॅक उचलताना मी शेवटी न राहून बोलून गेलोच. "हा म्हातारा काय समजतो स्वतःला." काकाने ऐकले की ते माहीत नाही पण ज्यांनी ऐकले ते गार पडले. आता काका तसे म्हातारे नव्हते. ४० च्या आत वय. फ़क्त गिर्यारोहण करून केस जास्त सफ़ेद झाले होते इतकेच. न जेवता भुकेल्या पोटी आम्ही ५ जण सर्वांच्या पुढे निघालो. सर्वांच्या पाठीवर आता अधिक सामान होते. पण आता लवकर पोचायचेच असे आम्ही ठरवले होते.थोड़े पुढे जाउन 'शेव'ची ती पिशवी आशिषने परत बाहेर काढली आणि आमचा छोटासा मिनीलंच चालता-चालता उरकला. राजेश सोबत होता तेंव्हा वाट चुकायचा प्रश्न नव्हताच. शिवाय जेवण बनवायचे सर्व सामान आमच्याकडेच असल्याने ती ही चिंता नव्हती. कुठे आडवाटेवर अडकलो, चुकलो तरी चिंता आता बाकीच्यांना असणार होती.

कुमशेत सोडून पुढे गेलो की उजव्या हाताला अजिबात जायचे नाही. समोरच्या टेकडीला बगल देत डाव्या हाताला वळलो आणि पुढच्या पठारावर पोचलो. आत्ता कुठे तो हरिश्चंद्रगड़ नजरेत येऊ लागला. अंतर बरेच होते. "किमान ५ तास तरी लागतील." - राजेशचा अचूक अंदाज. पुढे पुन्हा एक ओढा लागला. तो पार केला आणि पुढच्या टेकडावर चढलो. वाट मळलेली होती तेंव्हा आम्ही सुद्धा कुरकुर न करता तिच्यासोबत जात होतो. आता वाट नदीच्या काठाकाठानेच पुढे जात राहते. नदी उजवीकडे वळली की वाट सुद्धा उजवीकडे वळते. नदी डावीकडे वळली की वाट सुद्धा डावीकडे वळते. मध्येच कुठेकुठे ओढे लागतात. ते अडसं-दडसं करत पार करायचे. पाठीवरच्या सॅक सांभाळत पाण्यातल्या दगडांवरुन उदया मारत जायला मज्जा येत होती. मध्येच आम्ही थांबायचो, खांदे मोकळे करायचो, काहीतरी खायचो आणि पुढे निघायचो. ३ तास होउन गेले तरी दुरचा तो हरिश्चंद्रगड़ काही जवळ येईना. संध्याकाळ होत आली होती. राजा हरिश्चंद्र म्हणायचे "राज गया... मेरा ताज गया..." त्याप्रमाणे आता आम्हाला बोलावेसे वाटत होते. "पाठ गेली रे माझी.. खांदे पण गेले.. अब बस भूक लगी है." हेहे.. :D जोक्स अपार्ट.. त्या राजाला त्याच्या आयुष्यात बरेच कष्ट पडले होते. तेंव्हा त्याच्या नावावर असलेल्या गडावर जताना आम्हाला सुद्धा काही कष्ट घेणे क्रमप्राप्त होतेच. अंधार पड़ता-पड़ता अखेर 'पायलीची वाडी' आली. इकडून नदी ओलांडून आम्ही पलिकडच्या बाजुला गेलो आणि पाचनईच्या रस्त्याला लागलो. नदी आता डाव्याहाताला मागे मागे राहून गेली. आम्ही एका टेकाडावर चढून पुढे उतरलो तर नदी सुद्धा वळसा मारत तिकडेच आली होती. म्हटले "राजेश काय रे? पुन्हा नदी क्रोंस करायची आहे का?" तो म्हणाला,"नाही. पण एक छोटा ओढा ओलांडायचा आहे. लवकर चला. पूर्ण अंधार झाला तर कुठून पार करायचा ते कळणार नाही आपल्याला." त्यावर आशीष बोलला,"आयला मग ते मागचे सर्व चक्रम कसे पोचणार? आज रात्री काय २१ जणांचे जेवण आपणच बनवून आपणच संपवायचे काय? मी काका आल्याशिवाय जेवण बनवायला सुरवात करणार नाही आहे. बास." आम्ही हसून-हसून आडवे व्हायचे बाकी होतो. खरच इतका वेळ मागचे भिडू कुठे असतील? त्यांना यायला तर पूर्ण अंधार होणार मग ते कसे पोचणार हे प्रश्न आता पडायला लागले होते. "ते लोक दुसरीकडेच राहिले तर त्यांचे जेवणाचे वांदे होतील रे." मी बोललो. त्यावर लगेच अभि उत्तरला. "आपण नेउन देऊ बनवलेले जेवण." पुन्हा एकदा हलके फुल्के जोक्स झाले. गप्पा मारता मारता आम्ही पाचनईच्या दिशेने वाटचाल करताच होतो. ७ वाजून गेले होते. पूर्ण मिट्ट अंधार झाला होता. अचानक बैलाच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आला. गाव एकदम जवळ असल्याची ती पोचपावती होती.

पुढे २ मिं. मध्येच गाव लागले. गावातल्या मारुती मंदिरात आम्ही टेकलो आणि निवांत झालो. सकाळपासून तसे पोटात फारसे काही गेले नव्हते. 'दुपारचा लंच' सुद्धा केलेला नव्हता. मारुतीच्या देवळात बसल्या-बसल्या मला डुलकी लागली. जाग आली तेंव्हा बाहेर गड़बड़ ऐकू येत होती. मागचे सर्व भिडू येउन पोचले होते. राहुल आणि शेफाली हातात कॉफ़ीचा मग घेउन आले. चायला.. जणू काही माझा आमरण उपवास होता आणि मी तो हरिश्चंद्रगड़ला गेल्या शिवाय सोडणार नव्हतो. कॉफी घेतली तशी ज़रा तरतरी आली. माझ्या अंगात ताप भरला होता. सर्वच जण प्रचंड दमलेले दिसत होते शिवाय गडावर चढून जायला खुप उशीर सुद्धा झाला होता  तेंव्हा आज आपण इकडेच राहणार असा आमचा (गैर)समज झाला. काकाने आपल्याला आज रात्री काहीही करून गडावर जायला हवेच असे स्पष्ट केले. आता मात्र थकलेल्या चेहरे पूर्ण पडले होते. मुलीच नाही तर मूले सुद्धा खुपच दमली होती. तरीपण जसे जमेल तसे एकमेकांना मदत करत वरती जायचे नक्की झाले होते. ९ वाजले होते आणि आता आम्ही सर्व गडावर जाणार होतो. गावातून एक वाटाडया सुद्धा घेतला होता. राहुलच्या म्हणण्याप्रमाणे मी माझी सॅक त्याला देऊन वरपर्यंत कमी वजन उचलून जावे असे होते. तर माझे मत स्पष्ट होते. मी ही सॅक घेउन वरपर्यंत जाणार म्हणजे जाणार. रात्रीच्या त्या अंधारात आमची वाटचाल सुरू झाली. पुन्हा एकदा पुढे मी, आशीष, अभिषेक आणि राजेश. अर्थात आमच्याही पुढे तो वाटाडया होताच. मी अर्ध्याअधिक झोपेत चालत होतो. मध्येच धडपडायचो आणि मग त्याला विचारायचो. "अजून किती जायचय रावं?" तो प्रोफेशनल वाटाडया होता बहुतेक. दरवेळी "बास. हे काय हिक्कड़ हाय आता. अजून १० मिंनितं" असे उत्तर देऊन आम्हाला समाधानी करायचा. त्या वाटेवरची एक जागा सुद्धा मला लक्ष्यात नाही आहे. पुन्हा एकदा त्या वाटेवरून ट्रेककरून हरिश्चंद्रगड़ सर करायची खुप इच्छा आहे बरेच वर्ष. बघुया या वर्षी जमते का ते.

गडावर पोचलो तेंव्हा १२ वाजून गेले होते. कुठे काय काही समजत नव्हते. एका देवळाशेजारून पुढे जाउन कुठल्या तरी मोठ्या गुहेत शिरलो इतकेच काय ते समजले. आत जाउन पुन्हा मी आडवा. जेवण कोणी बनवले माहीत नाही. जेवायला राहुलने उठवले तेवढे मात्र कळले. जेवताना तोंडाला टूथपेस्टचा स्मेल येत होता. मी झोपलेलो असताना बहुदा कोणीतरी लावली असावी. जेवलो आणि पुन्हा आडवा झालो. इतका दमलो होतो की बाकी काही करणे शक्य नव्हते. आजवर मी इतका कधीच दमलो नव्हतो. पहाटे ६ ते दुपारी २ आणि परत दुपारी ३ ते रात्री १२ असा जवळ-जवळ १५-१६ तासांचा ट्रेक झाला होता आज एका दिवसात. ट्रेकच्या ३ऱ्या दिवशी अजून अनुभव घेत आम्ही आडवे झालो. सकाळी हरिश्चंद्रगडाचे आणि विहंगम अश्या कोकणकडयाचे दर्शन घेण्यासाठी...
.
.
पुढील भाग - हरिश्चंद्रगड आणि विहंगम असा कोकणकडा ... !
.
.

Friday, 8 January 2010

कळसूबाई ते हरिश्चंद्रगड ...पार्श्वभूमी ... !

दिनांक : २०-८-२००० ... ठिकाण : कोलेजचा कट्टा.

"'आजोबा पर्वत'च्या पहिल्याच ट्रेकला सोलिड मज्जा आली रे. असे अजून काही मस्त ट्रेक्स लवकरच करायला हवेत" मी मित्रांना सांगत होतो. आदल्याच दिवशी केलेल्या आजोबा ट्रेकपासून माझी डोंगरयात्रा नुकतीच सुरू झाली होती. त्या एका दिवसातच सह्याद्रीच्या रांगडया सौंदर्याने इतका भारावलो होतो की आता या सह्ययात्रेमध्ये पुरते विलीन व्हायचे असे मनोमन ठरवले होते. आजोबा ट्रेकवरुन निघतानाच 'पुढचा ट्रेक कधी?' हा प्रश्न विचारून झाला होताच. पुढचा ट्रेक १-२ नाही तर तब्बल ५ दिवसांचा असून दिवाळी दरम्यान आहे असे कळले होते. काही आजोबा ट्रेकमधली टाळकी आणि काही नवीन टाळकी यूनीव्हरसिटीला काका (आमचे ट्रेकिंगचे गुरु) आणि राजेश सोबत भेटून ट्रेकबद्दल पुढे ठरवणार आहेत असे मला अभिजित कडून समजले होते. मी त्यावेळी NCC च्या 1st इयर ला तर अभि 3rd इयर ला म्हणजे माझा सिनिअर होता. पण मी लगेच जायचे ठरवले आणि ट्रेकसाठी नाव नक्की केले.

या ट्रेकसाठी प्लानिंगची जबाबदारी राहुल, शेफाली, सत्यजित आणि हिमांशु यांना दिली गेली होती. ५ दिवसांसाठी लागणाऱ्या जेवणाच्या सामानापासून इतर बारीकसरिक जे काही लागेल त्या सर्व गोष्टींची यादी बनवून ते विकत घेणे, ट्रेक रूट नक्की करणे आणि त्याप्रमाणे वेळेचे गणीत मांडणे अशी बरीच कामे त्यांना करायची होती. ही एक छोटेखानी मोहिमच होती. महत्वाचे म्हणजे ह्यापैकी कोणीही आधी कधीही अशी प्लानिंग केली नव्हती. तेंव्हा राहुल, शेफाली, सत्या आणि हिमांशु यांच्यासाठी ही एक मोठे मिशन होते. कवीश ह्या ट्रेकचा लीडर असणार होता कारण त्याला १-२ ट्रेक्सचा अनुभव होता. पण तो ट्रेकच्या दुसऱ्या दिवसापासून येणार असल्याने पहिला दिवस हिमांशू लीडर असणार होता. मी, अभिजित आणि आशिष पालांडे त्यावेळी अगदीच नवखे होतो. शिवाय आमच्यापैकी बरेच जण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते.

अखेर सर्व नक्की झाले. २१ ते २६ ऑक्टोबर २००० असा दिवाळीच्या तोंडावरचा ट्रेकचा कालावधी ठरला. ठाणे-मुंबई मधल्या कोलेजेस मधील आम्ही एकुण १८ ट्रेकर्स. राहुल, शेफाली, सत्यजित, हिमांशु, अभिजित, मनाली, कविता, दीप्ती बावा, सुमेधा, आशिष पालांडे, कवीश, प्रवीण, सुरेश नागवेकर, प्रशांत आचरेकर, अभिषेक डोळस, संतोष मोरया, विवेक आणि मी. सोबतीला होते ३ अनुभवी मार्गदर्शक ट्रेकर्स ज्यात काका, राजेश आणि विली यांचा समावेश होता. आमच्या १८ जणांमध्ये कोणालाही ट्रेकिंगचा अनुभव नव्हता. तो ही खास करून सह्याद्रित ४-५ दिवस राहण्याचा. ट्रेकचा रूट असणार होता. कळसूबाई - भंडारदरा जलाशय - रतनगड़ - कात्राबाई खिंड - हरिश्चंद्रगड़. ट्रेकनंतर आम्ही थेट माळशेज घाटात उतरणार होतो.

२० ऑक्टोबर पर्यंत सर्व तयारी झाली होती. आम्ही सर्वजण शनिवारी २१ तारखेला दुपारी ४ च्या आसपास ट्रेनने सी.एस.टी. ला पोचलो. आजोबा ट्रेकनंतर राहुल बरोबर ओळख झालेली होती. ट्रेनमध्ये त्याने आमची शेफाली आणि सत्याबरोबर ओळख करून दिली. माझ्यासोबत माझे कोलेज फ्रेंड्स अभिजित,  हर्षद उर्फ़ जाड्या आणि अभिषेक होता. शिवाय NCC सिनिअर्स कवीश आणि प्रवीण दुसऱ्या दिवशी होतेच. सी.एस.टी.ला पोचल्यानंतर इतर सर्वजण भेटले आणि आम्ही इगतपुरीला जायच्या गाडीत बसलो. सोबत प्रचंड सामान होते म्हणुन दादर-ठाणे ऐवजी सर्वांनी सरळ सी.एस.टी.ला बसायचे काकाने ठरवले होते. सर्वांशी तोंडओळख झाली. मनाली, कविता आणि सुमेधा या माझ्या डोंगरातल्या मैत्रिणींना (डोंगरातल्या म्हणजे डोंगरात राहणाऱ्या नव्हे तर डोंगरातल्या भेटलेल्या... हाहा..) आणि प्रशांत, सुरेश, हिमांशू या मित्रांना पहिल्यांदा भेटलो. आशीष, राहुलला तर आजोबाला भेटलो होतोच.

ट्रेनचा प्रवास इगतपुरीच्या दिशेने सुरू झाला आणि आमचा प्रवास महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करण्याकडे... कळसूबाई... आजवर ऐकले होते, वाचले होते; पण आता मी स्वतः त्या शिखरावर पाय रोवायला सज्ज होतो. माझा एक अविस्मरणीय असा सह्यप्रवास सुरू झाला होता ...
.
.
पुढील भाग - कळसूबाईच्या शिखरावरुन ... !
.
.