सकाळी उठलो तेंव्हा ७ वाजून गेले होते आणि चहा-नाश्ता तयार होता. नाश्ता म्हणजे गरमा-गरम कांदेपोहे. झट-झट आवरून घेतले आणि श्रीवर्धन किल्ला बघायला निघालो. तिकडे दूसरीकड़े अभि, संजू आणि अमेय काल बिघडलेल्या बुलेटला रिपेअर करायला निघून गेले. त्यांना २-३ तास तरी नक्की लागणार ह्या अंदाजाने आम्ही गडफेरी पूर्ण करायचे ठरवले. देवळासमोर आहे तो श्रीवर्धन किल्ला. तर मागच्या बाजूला आहे तो मनोरंजन किल्ला. निघालो तेंव्हा ८ वाजून गेले होते आणि दोन्ही गड बघून होतील याची शक्यता वाटत नव्हती. मूळात गड बघणे हा ह्या बाइक ट्रिपचा मुख्य उद्देश नसल्याने तशी चिंता नव्हती. शिवाय ह्याआधी सुद्धा राजमाची २-३ वेळा बघून झाला होताच की. तरी पण काही चांगले फोटो काढावे म्हणुन आम्ही पुढे निघालो.
आभाळ थोड़े भरून आले होते आणि पाउस पडेल की काय असे वाटत होते. पण तो काही शेवटपर्यंत पडलाच नाही. आणि पडला असता ना तर आमची पक्की वाट लागली असती हे नक्की कारण त्या लालमातीच्या रस्तावर असा काही चिखल झाला असता की बाइक चालवणे दुराप्रास्त होउन बसले असते. देवळापासून अवघ्या १५ मिं. मध्ये श्रीवर्धन गडाच्या दरवाज्यापाशी पोचता येते. दुरवर डाव्याबाजूला म्हणजेच पश्चिमेकड़े किल्ल्याचा एक बुरुज दिसतो. मध्ये तटबंदी पडली असल्याने इकडूनच थेट तेथे जता येते. आम्ही मात्र प्रवेशद्वाराची रचना आणि दुर्गबांधणी बघण्यासाठी आधी दरवाज्यावर गेलो. 'रामचन्द्रपंत अमात्य' यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे." या शास्त्राप्रमाणेच पुढे बुरुज देउन त्यामागे किल्ल्याचा दरवाजा लपवला आहे. एकुण बांधकाम १ मजली आहे. आतल्या बांधकामाची उंची आणि लाकडाचे वासे घालायच्या जागांवरुन ते लगेच समजुन येते. उजव्या बाजुच्या पडक्या देवडीच्या पहिल्या मजल्यावरुन थेट तटबंदीवर जायला छोटासा दरवाजा आहे. इथून पुढे वरपर्यंत चढते बांधकाम आहे. ठीकठीकाणी तटबंदीमध्ये जंग्या बांधलेल्या आहेतच. इथून वर चढून गेलो की पण पोचतो गुहेसमोर. छोटेसे प्रवेशद्वार असलेली ही गुहा आतून मात्र प्रचंड मोठी आहे. हयात ३ मुख्य भाग आहेत. मध्ये एक आणि उजवीकड़े डावीकड़े अशी एक-एक. किल्ल्यावरील धान्याचा, शस्त्रांचा आणि इतर सामूग्रीचा साठा येथेच साठवला जात असणार. एकडे काहीवेळ थांबुन आम्ही पुढे बालेकिल्ल्याकडे निघालो. एकडेच उजव्या बाजूने दक्षिणेकडच्या दुहेरी बुरुजाकड़े जायचा मार्ग आहे.
आम्ही मात्र आधी बालेकिल्ल्याकडे निघालो. वर पोचलो की या ठिकाणाहून समोरच्या व्याघ्रदरी मधल्या धबधब्याचे सुंदर दृश्य पहावयास मिळते. पुढे जाउन व्याघ्रदरी मधल्या पाण्याचा उल्हास नदी सोबत संगम होतो. इकडून आता मागच्या बाजुच्या बुरुजावर गेलो की पश्चिमेकड़े दुरवर मांजरझुम्याचा डोंगर आणि ढाक किल्ल्याचे दर्शन होते. श्रीवर्धन गडाच्या माथ्यावर दरवर्षी झेंडावंदन होते. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत. आम्ही गड़फेरी पूर्ण करून परत खाली उतरताना दक्षिणेकडच्या बुरुजाकड़े वळलो. दक्षिणेकडचा बुरुज हा दुहेरी म्हणजेच एका खाली एक असे २ बुरुज आहेत. खालच्या बुरुजात जायला उजव्या हाताने पायऱ्या आहेत. इथे काही वेळ मस्त फोटो काढले आणि मग परतीच्या मार्गाला लागलो. इथून दरवाज्याकडे परत येताना मार्गात एक खोदीव तळे आहे. ह्या ठिकाणी आलो आणि सगळे एकदम फुरसतमध्ये पाण्यात पाय टाकुन बसले. मनोरंजन किल्ला दुरच राहिला, खाली तरी वेळेवर पोहचू की नाही असे मला वाटत होते. इतक्यात अभिचा फोन आला आणि बुलेट नीट झाल्याचे कळले. ते परत येत होते त्यामुळे आम्ही सगळे उतरायला लागलो. काही वेळात पुन्हा देवळापाशी आणि मग तिकडून खाली उधेवाडीत पोचलो. गीताताईला दुपारचे जेवण सांगून ठेवलेच होते ते तयार होत होते. तो पर्यंत येथुनच थोड्या अंतरावर असलेल्या शंभू महादेवाच्या मंदिरा कड़े गेलो. मंदिरासमोर पाण्याचा प्रशत्र तलाव आहे. वर्षभर गडाला पुरेल इतके पाणी ह्यात साठवता येईल इतका मोठा. आजूबाजूला परिसर सुद्धा सुंदर आहे. हे मंदिर सुद्धा खूप रेखीव असून काही वर्षांपूर्वी जमिनीमध्ये दबलेला ह्याचा खालचा अर्धा भाग खोदून मोकळा केला गेला आहे. इकडून आम्ही परत वळलो ...
क्रमश: ...
सुंदर वर्णन, गडाची रचना डोळ्यासमोर उभी राहीली. पुढचा टाक लवकर.
ReplyDeleteपुढचा पोस्ट सुद्धा रेडी आहे.. फोटो सकट.. पण माहीत नाही ब्लोगरला काही प्रॉब्लम आहे की काय... अपलोड नाही होत आहेत म्हणुन अर्धीच पोस्ट टाकली कशीबशी ... :)
ReplyDelete