Sunday, 3 May 2009

भाग १ - सप्त शिवपदस्पर्श ... !

२००२ सालची गोष्ट ... मी आणि हर्षद त्या वेळी कॉलेजला होतो. तर अभिजित नुकताच कॉलेजमधून बाहेर पडला होता. दिवाळीमध्ये एक भन्नाट ट्रेक करायचा असे डोक्यात होते. पहिल्या २ दिवसांसाठी राहूल सुद्धा आमच्या सोबत येणार होता. अखेर ठरले की 'सिंहगड ते रायगड' असा ट्रेक करायचा. शिवाय सासवड जवळ असलेले 'पुरंदर आणि वज्रगड' हे सुद्धा करायचे. आम्हाला वेळेचा काही प्रश्न नव्हता म्हणुन ९ दिवसांचा मोठा प्लान आखला.


पुरंदर ---> वज्रगड ---> सिंहगड ---> राजगड ---> तोरणा ---> लिंगाणा ---> रायगड ... !



हे सातही किल्ले 'शिवपदस्पर्शाने पावन' झालेले असे आहेत. प्रत्येक किल्ल्यावर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आणि राजगड, तोरणा, रायगड सारख्या किल्ल्यांवर रहायचे असे ठरले. सगळी तयारी करून दिवाळी नंतर लगेच आम्ही ठाण्यावरुन रात्रीच्या गाड़ीने पहाटे-पहाटे पुण्याला पोचलो. सकाळी सासवाडला जाणारी S.T. पकडली आणि दिवेघाट मार्गे सासवाडला पोचलो. तिकडून पुढे नारायणपुरला जाणारी S.T. पकडून पुरंदरच्या पायथ्याला असणाऱ्या नारायणपुरला पोचलो. डाव्या हाताला नारायणेश्वराचे अतिशय सुरेख आणि प्रशत्र असे दत्त मंदिर आहे. देवाचे दर्शन घेतले आणि मग तिकडे बाहेर असलेल्या होटेल मध्ये नाश्ता उरकला. पुरंदरच्या अगदी माथ्यापर्यंत गाड़ी रस्ता जातो कारण हा किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. मध्यंतरी येथे National Cadet Corps (N.C.C.) म्हणजेच 'राष्ट्रीय छात्र सेना' यांचे कैंप घेतले जायचे. आपण मात्र डाव्या हाताने कच्या रस्त्याने डोंगर चढणीला लागायचे. थोडी दमछाक होते पण जास्तीतजास्त २ तास पुरतात किल्ल्यावर पोचायला. आपण थेट पोचतो ते गडाच्या दरवाज्याकड़े. आता ह्याला 'मुरारगेट' असे म्हटले जाते. थोडेसे अजून पुढे गेलो की राजाळे आणि पद्मावती असे तलाव आहेत. शिवाय मुरारबाजींचा दोन हातात दोन तलवारी घेतलेला पूर्णाकृति पुतळा सुद्धा आहे. गडाच्या ह्या किल्लेदाराने १६६५ मध्ये हा किल्ला लढवताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती. १६६५ चा इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह आपल्या सर्वांना ठावूक आहेच. जिवाची बाजी लावणाऱ्या ह्या विराला मनापासून मुजरा केला आणि पुढे सरकलो.























एकडून पुढे गेलो की गडाच्या माथ्यावर असलेल्या राजगाड़ी टेकडीकड़े जाता येते. माथ्यावर पुरंदरेश्वराचे मंदिर आहे. ३०-४० मिं. मध्ये आरामात वर पोचता येते. ह्याच ठिकाणी १४ मे १६५७ साली शंभूराजांचा जन्म झाला. आज त्यांची ३५२ वी जयंती. त्यामुळे आजच्या दिवशी हा भाग प्रकाशित करताना विशेष आनंद होत आहे. आसमंतामधला प्रदेश पाहून आम्ही बाजुच्या केदारेश्वर टेकडीकड़े गेलो. तिच्या माथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे. तिकडून पुन्हा खाली उतरून आलो. गडावर सर्वत्र लष्कराने बांधकामे केलेली आहेत. पुरंदर गडाला उत्तरेकड़े 'शेंदरी बुरुज' थोड़े पश्चिमेकड़े 'हत्ती बुरुज', पश्चिमेकड़े म्हणजेच कोकणाच्या दिशेने 'कोकणी बुरुज', आणि दक्षिणेला 'फत्ते बुरुज' आहे. एक गडफेरी करून आम्ही वज्रगडाकड़े निघालो आणि काही वेळातच महादरवाज्यामधून प्रवेश करते झालो. वज्रगड हा पुरंदरचा जोड़किल्ला. १६६५ मध्ये दिलेरखानाने आधी वज्रगड जिंकला तेंव्हा कुठे त्याला पुरंदरचा खालचा भाग घेता आला. वज्रगडावर एक मारुती मंदिर आणि एक पाण्याचा तलाव आहे. त्याशिवाय मोठ्या-मोठ्या दगडांच्या शिळा आहेत. त्यांच्या सावलीमध्ये आम्ही थोड़े विसावलो. दुपार झाली होती. जेवण बनवायला वेळ नव्हता त्यामुळे थोडेसे जवळचे खाल्ले आणि परतीच्या मार्गाला लागलो. संध्याकाळी ५ च्या सुमारास खाली गावात आलो आणि गाड़ी पकडून पुन्हा पुण्याच्या मार्गाला लागलो. आज रात्री आम्हाला निवाऱ्यासाठी सिंहगडाचा पायथा गाठायचा होता. मिळेल ते वाहन पकडून आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या आतकरवाडीला पोचलो. रात्रीचे ७ वाजून गेले होते आणि आता रहायचे कुठे असा प्रश्न होता. पण वाडी किंवा गावामध्ये मारुती मंदिर असतेच त्यामुळे तो प्रश्नही मिटला. देवळासमोरच्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देऊन मोकळे झालो त्यादिवसासाठी पथारी पसरली. उद्या उठून सिंहगड सर करायचा होता. अजुन एक शिवपदस्पर्श अनुभवायचा होता...















क्रमश:

3 comments:

  1. रोहन,
    ही सह्यभ्रमंती २००२सालची आहे. तब्बल सात वर्षांपूर्वीची. पण आजही तितकीच ताजी आणि टवटवीत आहे. तू छान लिहिलं आहेसच पण मला असं वाटतं की ते क्षण तू स्वतः जगत होतास केवळ एक साधी सहल न मानता. पुंलंच्या हरितात्यांप्रमाणे ते क्षण आणि तो काळ तू छान जिवंत केला आहेस.

    ReplyDelete
  2. होय गौरी ... तो प्रत्येक क्षण आम्ही जगलोय ... आज ही तो तितकाच ताजा आहे. ह्या ब्लॉगच्या निमित्ताने ते क्षण पुन्हा जगायचे आहेत मला ... [:)]

    ReplyDelete
  3. रोहन, वाचायला घेतलं...आणि कळतं..झपाटलं गेलं असेल तरच हे करू शकतो...खूप कौतुक वाटतं मला तुमचं. :)

    ReplyDelete