आम्ही सगळे पहाटे पहाटे उठलो आणि निघायच्या तयारीला लागलो. ऊन चढायच्या आत जास्तीत जास्त अंतर पार करायचे असा प्लान होता त्यामुळे लवकर निघालो. श्वेताची तब्येत थोडी ख़राब होती त्यामुळे हर्षद आणि ती पाचाडलाच थांबले. सकाळी देशमुखांकड़े नाश्ता उरकला आणि थोड़े दुपारसाठी खायचे बांधून घेतले. पुन्हा चित्तदरवाजापाशी जमलो आणि शिवछत्रपतींच्या जयजयकाराने प्रदक्षिणेला सुरवात केली. चित्तदरवाजापासून रायगडवाडीकड़े जाणाऱ्या डांबरी रस्त्याला लागलो. रायगड प्रदक्षिणेला एकुण ८ तास लागतात. काही जण मात्र अगदी ६ तासात सुद्धा सहज पूर्ण करतात. प्रदक्षिणेचे एकुण अंतर १६ किलोमीटर इतके आहे. एका वळणानंतर झाडीमध्ये शिरणारी वाट दिसते. तिकडे आत शिरलो आणि त्या मळलेल्या वाटेवरुन चालू लागलो. उजवीकड़े वरच्या बाजूला टकमकटोक दिसत होते. खालच्या बाजूने त्याची उंची अधिकच जाणवत होती. काही वेळानी झाडीचा मार्ग संपला आणि शेतांमधून मार्ग क्रमत आम्ही रायनाक स्मारकापाशी पोचलो. किरणने रायनाक स्मारकाबद्दल छोटीशी माहिती सांगीतली आणि तिकडे काही वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. ऊन अंगावर यायच्या आधी आम्हाला खिंडी खालच्या जंगलात घुसायचे होते. मध्येच विविध प्रकारची झाडे आणि त्यावरील पक्षी लक्ष्य वेधून घेत होते. थोड्याथोड्या वेळानी आमच्यामध्ये इतिहासावर चर्चा सुरूच होत्या. रायगडाचा सुरक्षा घेरा असो नाहीतर १६८९ चा रायगडाचा वेढा असो. इतिहासात रायगडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. रायगड आधी बरेचवेळा केलेला असला तरी प्रदक्षिणा मी पहिल्यांदाच करत होतो. त्यामुळे बाहेरील बाजूने रायगड चांगला न्याहाळता येत होता. जमेल तसे आणि जमेल तितके फोटो सुद्धा घेत होतो. पण मुळात प्रदक्षिणा का करावी किंवा कोणी व कशासाठी सुरु केली हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. रायगडाचे आधीचे नाव रायरी. हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. (सन १६५६) २ महिन्यांनंतर अखेर मोरेला मारून राजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पहिल्यांदा ते गडावर आले आणि राजधानीसाठी रायरीची निवड पक्की केली. त्याचे रायगड असे नामकरण केले. त्यावेळी राजांनी म्हटले आहे की, 'गड गाव-दिडगाव उंच असून गडाचा दगड ताशीव आहे. इतका पाउस पडून सुद्धा एक काडी गवत उगवत नाही.' राजांनी स्वतः चारही बाजूने फिरून हा किल्ला पहिला असावा अश्या कल्पनेमधून स्वातंत्राची मंदिरे असलेल्या ह्या किल्ल्यांच्या प्रदक्षिणेची कल्पना पुढे आली असावी. आता रायगड, राजगड आणि अशा अनेक गडांना दुर्गप्रेमी प्रदक्षिणा मारत असतात.
इतिहासावर चर्चा करत करत आम्ही बरेच पुढे पोचलो होतो. इकडे मध्ये धनगरपाडा लागतो. खालच्या बाजूला छोटी गावे दिसत होती. या ठिकाणी थोडावेळ विश्रांती घेतली. उजव्या बाजूला टकमकटोक आता मागे पडले होते आणि डाव्या बाजूला आता कावळ्या-बावळ्याची खिंड दिसु लागली होती. रायगडाच्या घेऱ्यामधले हे उत्तरेकडचे २ किल्ले. ते पार केल्याशिवाय रायगडाजवळ येता येत नाही. १६८९ मध्ये त्याबाजूने येणाऱ्या शत्रुसैन्याला अवघ्या १० मावळ्यांनी ह्या खिंडीमध्ये झुंज दिली होती. अर्थात ते १० ही वीर वीरगतीस प्राप्त झाले. त्या अज्ञात विरांच्या समाध्या खालच्या गावामध्ये आजही पहायला मिळतात. त्या अज्ञात विरांना मनातल्या मनात मुजरा करत आम्ही वाघोली खिंडीकड़े निघालो. आता उजवीकड़े वरती भवानी कडा दिसू लागला होता. अजिंक्य देवचा 'सर्जा' नावाचा मराठी चित्रपट लक्ष्यात आहे का? त्यात तो भवानी कडा चढून जातो आणि राजांनी लावलेलं बक्षिस जिंकतो. राजे त्याचा मान करून सरदार बनवतात. ती कथा काल्पनिक असली तरी भवानीकडा पाहताना अंगावर शहारा येतोच. जितका सूंदर तितकाच नैसर्गिक दृष्टया भक्कम सुद्धा. तो पाहता-पाहताच डावीकड़े नजर वळवाल तर तुम्हाला दिसेल अजून एक सुंदर दृश्य. दुरवर दिसतो रायगडाचा पूर्वेकडच्या घेऱ्यामधला किल्ले लिंगाणा. त्यामागे दिसते ते आहे रायलिंगाचे पठार. ह्याच बाजूला मागे राजगड आणि तोरणा हे किल्ले आहेत. येथून बोराटयाच्या नाळेमधून कोकणात उतरायला वाट आहे. मात्र हा मार्ग कठिण आहे. अधिक सोपा मार्ग हवा असेल तर शिंगापुरची नाळ सुद्धा घेता येते. येथून खाली उतरून पाने गावामार्गे रायगडाकड़े येता येते. मागच्या वेळी आम्ही याच रस्त्याने रायगडावर आलो होतो.
आता आम्ही सगळे वाघोली खिंड चढू लागलो होतो. जवळचे पाणी संपत चालले होते आणि ऊन अंगावर येऊ लागले होते. रस्त्यामध्ये कुठेच पाणी नसल्याने पूर्ण १६ किलोमीटरसाठी पाणी सुरवातीपासून घेउनच निघावे लागते. पाण्याअभावी कोणाची तब्येत ढासळली तर गडबड होऊ नये म्हणुन खबरदारी घेतलेली बरी. अगदीच पाणी संपले तर मागे वळून धनगरपाडयाला जाता येईल. आम्ही मात्र हळू-हळू पुढे खिंडीकड़े सरकत होतो. ऊन डोक्यावर तळपत होते. मात्र झाडी मुळे आम्ही वाचत होतो. सुट्या मातीमुळे घसारा झाला होता त्यामुळे आम्ही कधी झाडाला तर कधी जमीनीमधून वर आलेली मुळे पकडून वर सरकत होतो. मध्येच कोणी घसरला की त्याला हात द्यायचा आणि मग परत पुढे सरकायचे असे चालू होते. अखेर आम्ही सगळेजण खिंडीमध्ये पोचलो. आता पुढचा मार्ग बऱ्यापैकी सुकर होता. उतार असल्याने वजन सांभाळत उतरलो. आम्हाला पुढे जाउन अजून जेवायचे होते पण सोबतचे पाणी जास्तीत जास्त वेळ टिकावे म्हणून आम्ही उशिराने जेवणार होतो. वाघोली खिंड उतरून खाली आलो तसा समोर पोटल्याचा डोंगर दिसू लागला. थोड्याच वेळात पाचाडहून वाघोली गावाकड़े जाणारा रस्ता लागला. थोडावेळ त्यावरुन चाललो. आता उजव्या बाजूला अगदी बारिकसा वाघदरवाजा दिसू लागला. जाड्याने सोबत दुर्बिण आणली होती त्यामुळे तो नीट पाहता आला. अर्थात अजून पुढे आल्यावर तो अजून मोठा दिसू लागला होता. प्रदक्षिणा संपत आली होती. जसे जसे अजून पुढे येऊ लागलो तसे रोपवे दिसू लागला. त्यापुढे हिरकणी बूरुज दिसत होता. अखेर चालत-चालत डांबरी रस्त्याला लागलो. या ठिकाणी रायगडाची प्रदक्षिणा संपते. एक अत्यंत आनंददायी आणि पवित्र अनुभूतिने भरलेला प्रवास संपवून आम्ही पाचाडकड़े निघालो.
हर्षद आणि श्वेता आमची वाट बघत होते. काल पहाटे-पहाटे पाचाडला पोचलो तेंव्हा गावाबाहेरचा कोट पाहता आला नव्हता. किरण आणि बाकीच्यांनी आमचा निरोप घेतला आणि आम्ही बाकी सगळे कोट बघायला निघालो. ह्याठिकाणी मासाहेबांचे २ वर्षे वास्तव्य होते. रायगडावरील हवा मानवत नाही म्हणुन राजांनी खास त्यांच्यासाठी याठिकाणी कोट बांधला होता. हा नुसता वाडा नसुन भुईकोट किल्ला आहे. त्याला २ बुरुजी दरवाजा आहे. आम्ही सगळे हा कोट पाहण्यासाठी पोचलो. चौकोनी आकाराच्या ह्या भुईकोट किल्ल्याला चारही बाजूला चांगले १ मजली बुरुज आहेत. प्रवेश केल्या-केल्या डाव्या उजव्या बाजूला देवडया आहेत. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला जायला प्रस्तर मार्गिका आहे. समोरचा चौथरा बहुदा मुख्य सुरक्षाचौकी असावी. डाव्या बाजूला राहत्या घरांची बरीच पडकी जोते आहेत. उजव्या बाजूला गेलो की एक एकमेव भिंत उभी आहे. हि मासाहेब जिजामातांच्या राहत्या दालनाची आहे. किल्ल्यामध्ये २ विहिरी असून एक छोटा खोदीव तलावसुद्धा आहे. मागच्या बाजूला काही मोठे कोनाडे आहेत पण त्यांचे प्रयोजन कळले नाही. आम्ही तासभर हा किल्ला पाहिला आणि काही फोटो घेतले. ह्या ठिकाणाहून रायगडाचे सुंदर दर्शन घडते. बाहेर रस्त्याच्या बाजूला काही दगडी शिल्प आहेत. आता सूर्यास्त होत आला होता. आम्हास आता परतायला हवे होते. इच्छा तर नव्हती पण पण निघावे तर लागणारच होते. मावळत्या सूर्याबरोबर रायगडाला पुन्हा एक मुजरा केला आणि आज्ञा घेउन आम्ही परतीच्या मार्गावर निघालो...
No comments:
Post a Comment