Sunday 26 April 2009

भाग १ - दुर्गराज रायगड ... !


किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ... त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले रायगड ...




मी रायगडावर किती वेळा गेलो आहे आठवत नाही. देवळामध्ये आपण किती वेळा जातो हे थोडीच मोजतो नाही का. पण रायगड प्रदक्षिणा मात्र मी आजपर्यंत एकदाच केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मला माझा मित्र किरण शेलारचा निरोप आला की आम्ही काहीजण रायगड प्रदक्षिणा करणार आहोत. मग मी, शमिका, अमोल, दीपाली, हर्षद, श्वेता, हर्षद(जाड्या) आणि मंदार असे ८ जण पाचाडला पोचलो. आम्ही १ दिवस आधीच निघालो कारण आमच्यापैकी काही जणांनी रायगड ह्याआधी पाहिला नव्हता. शनिवारी दिवसभर रायगड पाहुन रविवारच्या प्रदक्षिणेसाठी खाली पाचाडला येउन राहायचे असे ठरले आणि आम्ही शुक्रवारी रात्री उशिराने मुंबईवरुन निघालो. किरण आणि बाकी सगळे शनिवारी संध्याकाळी पाचाडमध्ये जमणार होते. रात्रभर प्रवास करून आम्ही पहाटे ५ च्या आसपास पाचाडला पोचलो. इतक्या लवकर पाचाडचा कोट पाहणे शक्य नव्हते त्यामुळे थेट मासाहेब जिजामातांच्या समाधीपाशी पोचलो. उजाड़ता-उजाड़ता दर्शन घेतले आणि रायगडाच्या चित्त दरवाजाकड़े निघालो. पूर्व क्षितिजावर लालसर कडा दिसू लागली तसे टकमक टोक दिसू लागले. ते पहातच चित्तदरवाजा पासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली. रायगडा संबंधित खूप इतिहास जडलेला आहे पण तो सर्व इकडे मांडणे शक्य नाही. मात्र रायगड चढ़ताना भौगोलिक आणि लष्करीदृष्टया त्याचे स्थान लक्ष्यात येते. चित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो खूबलढा बुरुज. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळा पर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात. त्या २ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे."


कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक' अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला महादरवाजा असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच. हूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही.



हे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरशहा: दम निघतो. महत् प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन महादरवाजाचे सुंदर दृश्य दिसते. सर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो हत्ती तलाव आणि त्या मागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते. गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ. ते पाहत पायर्‍यांच्या शेवटाला गेले की लागतो होळीचा माळ आणि त्यावर असलेला छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा.




क्रमशः ...

2 comments: