Friday, 20 February 2009

भाग १ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !



५ फेब. ला मी, अभिजित, अमृता आणि ऐश्वर्या पनवेल जवळ असणाऱ्या प्रबळगड़ - कलावंतीण सूळका येथे गेलो होतो. सवयीप्रमाणे बाइक्स काढल्या आणि सकाळी ६ला ठाण्यावरुन निघालो. तस ऐश्वर्याला ५च्याही आधी निघावा लागल होत. ही पोरगी ग्रेट आहे. कसला तो उत्साह आणि आवड. खाण्याच नाही बोलत आहे इथे; ट्रेकबद्दल बोलतोय. हा.. हा.. खाण्याच नंतर बोलूयात. आता त्याच लाइनला अमृता सुद्धा येउन पोचली आहे. त्याच लाइनला म्हणजे ट्रेकच्या. मी आणि अभिजितने २००० पासून एकत्रच भ्रमंती सुरु केली. अभि आणि मी एकदम 'बेस्ट ट्रेक बड़ी'.


पनवेल नंतर पळस्पे फाटयाला नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपला आणि सुसाट निघालो ते थेट शेडुंग फाटयाला डावीकड़े वळालो, कर्जत - पनवेल रेलवेचा बोगदा लागला त्यापलीकडे प्रबळगड़ दिसत होता. पायथ्याला ठाकुरवाडीला पोचलो. ठाकुरवाडीच्या डाव्या हाताला असलेल्या टेकाडावरुन कलावंतीण सुळक्याकड़े रस्ता वर जातो. त्या टेकाडाच्या पायथ्याला गाडया लावून निघालो. माथ्यावर जाउन झेंडा लावणे आमचे उदिष्ट कधीच नसते. त्यामुळे आम्ही एकदम सावकाश ट्रेक करतो, अर्थात किमान वेळेचे गणित मांडून. प्रत्येक डोंग़रावर एक फोटोस्पॉट असतो. तसा एक मस्त फोटोस्पॉट आम्हाला लगेच मिळाला. तिकडे थोडी फोटोग्राफी झाली आणि आम्ही पुढे निघालो. प्रबळगड़माची लागली. साधारण ९ वाजत आले होते. चढ़ सुरु झाला आणि पाणी संपायला लागल. प्रबळगड़ला जाताना नेहमी जास्त पाणी घेउन जावे, एकदा का माची सोडली की कुठे पाणी नाही. गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेला नाही.


प्रबळगड़ आणि कलावंतीण सूळक्या मधल्या 'V' आकाराच्या खिंडी मध्ये पोचलो तेंव्हा जवळजवळ ११वाजून गेले होते. तिकडे एक मस्त फ़ूड ब्रेक घेतला आणि मग कलावंतीण सुळक्याच्या त्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या चढायला लागलो. ज्या अपेक्षेने गेलो होतो त्यापेक्षा सोप्या निघाल्या त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ३०मी. मध्ये कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर होतो. तिकडून माथेरान, इर्शाळगड़ आणि धुरकट मलंगगड़ दिसत होता. पावसाळ्यात मात्र एकडे यायला जास्त मज्जा येइल. पुन्हा येऊ अस ठरल आणि आम्ही उतरायला सुरवात केली. माझी तब्येत २ दिवस आधीपासून थोडी ख़राब होती आणि ट्रेक सुरु केल्यापासून जास्तच बिघडत चालली होती. कोणी आठवण काढत होत का माहीत नाही पण उचक्या काही थांबत नव्हत्या.
(मी, अभिजीत, अमृता आणि ऐश्वर्या - कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर)



खिंडीमध्ये परत आलो तेंव्हा १ वाजत आला होता आणि आम्ही उन्हाने करपत होतो. पाणी धडाधड संपत होत आणि अजून आख्खा प्रबळगड़ करायचा राहिला होता. खिंडीमध्ये पायथ्याला एक मस्त गुहा आहे. जो कोणी प्रबळगड़ - कलावंतीणला जाइल त्याने ही गुहा चुकवू नये. ५०फुट सरकत सरकत आत जावे. शेवटपर्यंत पुढचा रस्ता कळत नाही. शेवटी डावीकड़े जायला वाट दिसते. डावीकड़े वळून ७-८ फुट गेले की परत उजवीकडे वाट वळते. पुन्हा २-४ फुट आत गेला की एक प्रशस्त गुहा लागते. चांगली १०-१५ फुट लांब आणि १५-२० फुट रुंद. ज्यांना श्वास घायला त्रास होतो अश्यांनी आत जाणे टाळावे. एक वेळेला ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी आत जाऊ नये. टॉर्च न्यायला विसरु नका बरे. नाहीतर आत दिसणार काय आणि तुम्ही बघणार काय...



क्रमशः ...

4 comments:

  1. प्रबळगडाचं वर्णन अनेकदा वाचलं होतं त्याविषयी उत्सुकता तर होतीच. पण हा लेख वाच्लयावर आणि कलावंतीण सुळक्याचं फोटो वाचल्यावर हेवा वाटला. नक्की जायलाच हवं.

    ReplyDelete
  2. मी कालावंतीणीवर भर तुफानी पावसात गेलो होतो. सगळ्या पायर्‍या शेवाळलेल्या, आणि सोसाट्याचा वारा. हालत खराब होती. पण सोडतो की काय... सर केलाच.

    ReplyDelete
  3. मस्त! मीही गोरखंगडावर जाऊन आलो ...नोव्हें मध्ये ...गोराखनाथांचा पदस्पर्शाने पावन झालेली भूमी...अप्रतिम लेखन !!!

    ReplyDelete