Wednesday, 27 May 2009

भाग १० - सप्त शिवपदस्पर्श ... !


सारांश - आमचे अनुभव (शेवटचा भाग) ... !

'सप्त शिवपदस्पर्श' हे नाव खरंतरं ह्या ट्रेकवर ब्लॉगपोस्ट लिहायला घेतली तेंव्हा सुचले. ९ दिवस.. ७ किल्ले.. पुरंदर, वज्रगड, सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड. प्रत्येक किल्ला 'श्री शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला'. म्हणुन नाव ठेवले 'सप्त शिवपदस्पर्श'. गेल्या ४ महिन्यापासून मी वेगवेगळ्या ट्रेकवर ब्लॉगपोस्ट लिहितोय पण आज ह्या ट्रेकनंतर पहिल्यांदाच थोडा सारांश लिहितोय. त्याचे कारण असे की हा ट्रेक माझ्या आत्तापर्यंतच्या डोंगरयात्रेमधला सर्वात आवडता ट्रेक आहे. ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये अनेक अनुभव आले. मी खुप काही शिकलोय ह्या ९ दिवसात. खुप काही अनुभवलय. ह्या ट्रेकनंतर मी स्वतःला अधिक ओळखु लागलो. काय करायला हवे ते उमगले मला. आज ते थोडक्यात इकडे मांडायचा हा अल्पसा प्रयत्न.


ही सह्यभ्रमंती २००२ सालची आहे. तब्बल सात वर्षांपूर्वीची. पण आजही तितकीच ताजी आणि टवटवीत आहे. कारण तो प्रत्येक क्षण आम्ही जगलोय. आज ही तो तितकाच ताजा आहे. ह्या ब्लॉगच्या निमित्ताने ते क्षण पुन्हा जगायचे होते मला. पहिल्या १-२ वर्षात केलेली भ्रमंती हे नुसतेच डोंगर चढणे होते असे मला ह्या ट्रेकनंतर जाणवू लागले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकर म्हणुन गेले ते पूर्णपणे अनुभवलं ह्या ट्रेकमध्ये. "हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवण आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"



डोंगरात जाताना, किल्ले बघताना तिकडे नेमके कुठला दृष्टीकोन ठेवायचा हे मला ह्या ट्रेकमध्ये समजले. आप्पा म्हणुन गेलेचं आहेत,"गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! धावता पळता त्याला नुसतं शिउन जाणं म्हणजे त्याचाही अपमान, आपलाही. "



९ दिवसात फ़क्त ७ किल्लेच नाही तर त्या आसपासची अनेक गावेसुद्धा पाहिली. निरनिराळ्या स्वभावाची माणसे भेटली, त्यांचे ग्रामजीवन आणि राहणी, त्यांच्या वागा- चालायच्या पद्धती अश्या बऱ्याच गोष्टी कळल्या. आम्हाला ह्या ट्रेकमध्ये प्रत्येक ठिकाणी योग्यवेळी हवी तशी मदत मिळत गेली. मग तो सिंहगडच्या पायथ्याचा मामा असो नाहीतर सिंहगड-राजगड मधल्या धारेवर अचानकपणे हाक देणारा शेतकरी असो. विंझर गावाबाहेरच्या शेतामधला रस्ता दाखवणारा मनुष्य असो नाहीतर तोरण्यावरुन कोलंबीला जाताना बसमध्ये भेटलेला मुलगा असो. जणू काही कोणी तरी अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करत आहे असे आम्हाला सारखे वाटत होते. तसे मी, अभिजित आणि हर्षदने एकमेकांना बोलून सुद्धा दाखवले होते. आम्हाला भेटलेला वाघ्या कुत्रा हा त्यातलाच अजून एक भाग. तिसऱ्या दिवशी राजगडच्या पायथ्याला भेटलेल्या ह्याने आमची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. अखेर आम्हालाच त्याला सोडून परत यावे लागले. तो सल अजून मनात आहे आमच्या. एका प्राण्याच्या बाबतीत इतका हळवं का व्हायच अस म्हणताय. कारण तेच. तो प्रत्येक क्षण आम्ही जगलोय. ह्या ट्रेकनंतर इतिहास मला अधिकच खुणवू लागला. आधी फ़क्त कादंबरी आणि वरचेवर वाचन असणारा मी आता इतिहासाच्या खोलात शिरलो. छत्रपति शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास आता अधिक जोमाने अभ्यासू लागलो. आजच्या आणि येणाऱ्या काळातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शिवचरित्रामध्ये आहे ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्या दृष्टीने माझा शिवचरित्राचा अभ्यास गेली ७ वर्ष सुरु आहे.

इथल्या मातीत उमटली आहेत शिवरायांची पावले. इथल्या वाऱ्यामध्ये आहे त्यांचा श्वास. इथल्या कणाकणात आहे त्यांच्या शौर्याची गाथा. त्या सप्तपदांनी मी पावन झालो हे नक्की.

त्या दिवसापासून सुरु झालेली माझी वाटचाल अजून सुरूच आहे. ती कधी संपणार नाही. संपेल तर माझ्या बरोबरच. सह्याद्री हा माझा श्वास आहे अस म्हणा हवतर. मी जेंव्हा-जेंव्हा माझ्या श्वासात मिसळतो तेंव्हा-तेंव्हा हाच प्रश्न असतो माझा ...

डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?
तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला... !
कुणी फिरस्ता हिंडता वनी... वदला ऐसी आर्तवाणी... !
ऐकून त्याची आर्तयाचना... आली येथल्या जडा चेतना... !
मला विचारा मीच सांगतो... आधी या माझ्या कड़े... !
सरसावत एकेक पुढे... हात उभारुनी घुमू लागले... !
डोंगर किल्ले बुरुज कड़े... डोंगर किल्ले बुरुज कड़े... !

भेटुयात लवकरच ... आणखी काही रोमांचक किस्से घेऊन ... !

Monday, 25 May 2009

भाग ९ - सप्त शिवपदस्पर्श ... !

दिवस नववा ... 'मराठा राजा छत्रपती जाहला' ... !

आज पहाटे-पहाटे वाघ्याच्या भूंकण्याने जाग आली. पहाटेचे ६ सुद्धा वाजले नव्हते. पण त्याने आम्हाला शेवटी उठवलेच. का भुंकत होता ते काही शेवटपर्यंत कळले नाही. आम्ही उठून आवरून घेतले आणि सूर्योदय बघायला होळीच्या माळावर पोचलो. आजचा सूर्योदय आम्ही राजांच्या साक्षीने बघत होतो. गडावर थोडीफार गर्दी होती. आज आमच्या ट्रेकचा शेवटचा दिवस होता. गेल्या ९ दिवसांची भटकंती आज संपणार होती. कसले फटाफाट दिवस गेले. ही भ्रमंती संपूच नये असे वाटत होते. आम्ही झट-झट आवरून घेतले आणि उर्वरित गड बघायला निघालो. आम्ही आता जाणार होतो राजदरबार आणि राजनिवासस्थान पाहण्यासाठी. पण त्याआधी डावीकडे खालच्या बाजूला उतरुन कृशावर्त तलावाकडे गेलो. त्याच्या डाव्या बाजूला बरीच पडकी घरे आहेत. दररोज राजदरबार किंवा आसपास ज्यांचे काम असायचे त्यांची घरे ह्या भागात असावीत. अशीच घरे गडाच्या खालच्या दक्षिण भागात सुद्धा आहेत. ते पाहून आम्ही पुन्हा वरती आलो आणि राजदरबाराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करते झालो. ह्या वास्तुला 'नगारखाना' असे म्हटले जाते. ही वास्तु २ मजली उंच असून ह्यावरती सुद्धा जाता येते. गडावरील ही सर्वात उंच जागा आहे. आम्ही डाव्याबाजूला असणाऱ्या पायऱ्या चढून वर गेलो. संपूर्ण गडाचे इकडून सुंदर दृश्य दिसते. ते बघून पुन्हा खाली उतरून आलो. नगारखान्यामधून प्रवेश करताना समोर जे दिसते तो आहे आपला सन्मान.. आपला अभिमान.. अष्टकोन असलेली मेघडवरी सिंहसनाच्या ठिकाणी विराजमान आहे. ह्याच ठिकाणी ६ जून १६७४ रोजी घडला राजांचा राजाभिषेक. हा सोहळा त्याआधी बरेच दिवस सुरू होता. अनेक रिती आणि संस्कार मे महिन्यापासून ह्या ठिकाणी सुरू होत्या. अखेर ६ जून रोजी राजे चक्रवर्ती सम्राट झाले. 'मराठा राजा छत्रपती जाहला'. राजदरबारामधून प्रवेश करते झालो की एक दगड मध्येच आहे. हा खरेतर सहज काढता आला असता मात्र तो तसाच ठेवला आहे. ह्याचे नेमके प्रयोजन कळत नाही मात्र राजे पहिल्यांदा गडावर आले (मे १६५६) तेंव्हा त्यांनी ह्या ठिकाणाहून गड न्याहाळला आणि राजधानीसाठी जागा नक्की केली असे म्हणतात. शिवाय ह्या जागेपासून इशान्य दिशेला आहे श्री जगदिश्वराचे मंदिर जे वास्तुशात्राला अनुसरून आहे. राजदरबारामध्ये उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्यासाठी बरीच जागा आहे. मागच्या बाजुस जाण्यासाठी डावी कडून मार्ग आहे. मागच्या भागात गेलो की ३ भले मोठे चौथरे दिसतात. ह्यातील पहिला आहे कामकाजाचा आणि मसलतीचा. दूसरा आणि तिसरा आहे राजांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे निवासस्थान. उजव्या बाजुस आहे देवघर आणि त्या पुढे आहे स्वयंपाकघर. येथे मध्येच एक गुप्त खोली आहे. ८-१० पायऱ्या उतरून गेलो की एक २० x २० फुट असे तळघर आहे. हा खलबतखाना किंवा मोठी तिजोरी असावी. त्या पलिकडे खालच्या बाजूला आहेत एकुण ३ अष्टकोनी स्तंभ. आधी किती मजली होते ते माहीत नाही पण सध्या ते २ मजली उरले आहेत. एक तर पुर्णपणे नष्ट होत आला आहे. प्रत्येक स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. ज्या बाहेरच्या बाजूस म्हणजे गंगासागर तलावाकड़े निघतात. ह्या तलावामध्ये राजाभिषेकाच्या वेळी सर्व महत्वाच्या नद्यांचे पाणी आणून मिसळले गेले होते. राजांच्या निवासस्थानाच्या उजव्या बाजुस त्यांचे न्हाणीघर आहे. पलीकडच्या बाजूला निघालो की एक सलग मार्गिका आहे. जिच्या उजव्या बाजूला आहे पालखीचा दरवाजा आणि डावीकड़े आहे मेणा दरवाजा. ह्या मर्गिकेपलिकडे आहेत ६ मोठ्या खोल्या. ह्यातील ४ एकमेकांशी जोड़लेल्या आहेत. तर इतर २ एकमेकांशी. ह्याला 'राणीवसा' असे म्हटले जाते. पण ते संयुक्तिक वाटत नाही कारण मधली मार्गिका. राजे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये पहारे आणि इतर लोकांचे राहणे हवे कशाला? शिवाय ह्यातील प्रत्येक खोलीला फ़क्त शौचकूप आहे. न्हाणीघर नाही. काही मध्ये तर ४-६ शौचकूप आहेत. आम्ही पुन्हा मागे येउन स्तंभाकडून खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरुन गंगासागर तलावाकडे गेलो आणि तिकडून पुन्हा पालखीचा दरवाजा चढून वर आलो. मार्गिका पार कडून मेणा दरवाजा उतरून पलीकडच्या बाजूला आलो. ह्या ठिकाणी आता महाराष्ट्र पर्यटनाची निवासस्थाने झाली आहेत.





राजदरबार आणि राजनिवासस्थान बघून आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. दुपारचे जेवण बनवून आता गड सोडायचा होता. परतीची तयारी करू लागलो. भांडी लख्ख घासली. बॅग्स व्यवस्थित पॅक केल्या आणि पाठीवर मारल्या. १ वाजत आला होता. आता वेगाने गड उतरु लागलो. आल्या मार्गाने महादरवाजा पार केला आणि दणादण उतरत थेट चित्त दरवाजा गाठला. वाघ्या आमच्या मागे होताच. आता आमचे लक्ष्य होते पाचाडला असणारी मासाहेब जिजामातांची समाधी. खाली उतरलो आणि डांबरी रस्त्याने चालत २ की. मी. दूर असणाऱ्या समाधीपाशी पोचलो. समाधीचे दर्शन घेतले आणि मागे फिरून पुन्हा पाचाडला आलो. आता आम्हाला महाड गाठायचे होते. गाड़ीची वाट बघत आम्ही उभे होतो. इतक्यात अभिने प्रश्न केला,"अरे वाघ्याच काय?" हर्षद बोलला,"त्याच काय?" "अरे गेले ७ दिवस हा आपल्या बरोबर आहे. रस्ते काय शोधून दिले आहेत. जीव गुंतलाय ह्याच्यात माझा. ह्याला असे कसे सोडून जायचे?" अभि बोलला. मी म्हणालो,"अरे पण त्याला घेउन कसे जाणार आपण ट्रेन मधून?" हे सगळ बोलणे होत असताना वाघ्या आमच्या बाजूलाच उभा होता. आमच्याकड़े टकमक बघत होता. इतक्यात एक गाड़ी आली. आम्ही आमच्या बॅग्स वरती टाकल्या आणि गाडीत बसलो. अभ्या बोलला,"घेऊ का रे ह्याला बरोबर?" मी म्हटले,"अभि चल. त्याला दुसरे ट्रेकर्स भेटतील, तो जाईल दुसऱ्या वाटेने परत. त्याची काळजी नको करूस." अभि गाड़ीमध्ये बसला. गाड़ी सुरु झाली आणि महाडच्या दिशेने निघाली. वाघ्या तिथल्यातिथे दूर जाणाऱ्या गाड़ीकड़े बघत उभा होता. त्याची भाषा कळत नसली तरी त्याचे डोळे आम्हाला सगळ काही सांगून गेले. आम्ही त्याला टाकुन परतीच्या वाटेवर निघालो ह्याबद्दल आम्हाला खुपच अपराधीपणाची भावना येत होती. तितकी ती आजही आहे. आमची गाडी दिशेनासी होईपर्यंत तो जागचा हलला नाही. त्याची ती स्तब्ध मूर्ति आम्हाला आजही तितकीच लक्ष्यात आहे. गाडीने महाडला आणि तिकडून माणगावला पोचलो. आता ट्रेनने परतीचा प्रवास सुरु झाला. एक अविस्मरणीय अशी दुर्गभ्रमंती पूर्ण करून आम्ही कृतकृत्य झालो होतो.


'सप्त शिवपदस्पर्श' ह्या ९ दिवसांच्या ट्रेकमध्ये अनेक अनुभव आले. त्याबद्दल मी दहाव्या म्हणजेच शेवटच्या भागात लिहणार आहे.

क्रमश:

Sunday, 24 May 2009

भाग ८ - सप्त शिवपदस्पर्श ... !

दिवस आठवा ... रायगडावर हर्ष दाटला ...

कालरात्री खरतर रायगड गाठायचा होता. मात्र बोराटयाच्या नाळेबाहेर पडेपर्यंत खुच उशीर झाल्याने पाने गावत मुक्काम करावा लागला होता. आज मात्र सकाळी-सकाळीचं चहा-नाश्ता घेउन आम्ही आमचा मुक्काम हलवला आणि आमच्या मोहिमेचा शेवटचा शिवपदस्पर्श अनुभवण्यासाठी रायगडाकड़े कूच केले. गावामधून बाहेर पडलो. थोडसं मोकळ माळरान आणि डाव्याबाजूला नदीकाठी सगळी शेती होती. काळ नदी पाने गावाला वळसा मारत रायगडाकड़े सरकते. काल गावात यायला जशी नदी पार करावी लागली होती तशी आता पुन्हा पार करून रायगडाजवळ सरकायचे होते. नदीला पाणी तसे कमीच होते. आरामात पार करून गेलो. समोर रायगडाचा अखंड भवानी कडा दिसत होता. उजव्या हाताला दूरवर टकमक टोक दिसू लागले होते. त्यामुळे आता वाट चूकायचा प्रश्न नव्हता. गावापासून निघून तास होउन गेला होता आणि उजव्या बाजूला थोड खाली छत्री निजामपुर गाव दिसू लागले होते. डाव्या बाजूला पूर्ण जंगल होते. त्यात शिरून वाट शोधत-शोधत जाण्यापेक्षा आम्ही थोड लांबून वाट काढत-काढत जात होतो. या ठिकाणी आता एक धरण होत आहे. काळ नदीचे पात्र आता रुंद होइल आणि ह्या मार्गाने रायगड पुन्हा गाठता येइल का प्रश्नच आहे. आसपासच्या भागातल्या लोकांसाठी ही चांगली गोष्ट असली तरी ट्रेकर्सना आता वेगळा मार्ग शोधावा लागेल हे नक्की. मजल-दरमजल करत आम्ही आता रायगडवाडीला पोचलो होतो. मागे दुरवर लिंगाणा आणि रायलिंगाचे पठार अजूनही दिसत होते. रायगडवाडी मध्ये पोचलो तेंव्हा ११ वाजत आले होते. जरा दम घेतला आणि थेट चित्त दरवाजा गाठला. चित्तदरवाजापासून आम्ही रायगड चढायला सुरवात केली.



किल्ले रायगड ... स्वराज्याची दूसरी राजधानी ... अनेक आनंदाचे आणि वाईट प्रसंग ज्याने पाहिले असा मात्तबर गड ... त्याने पाहिला भव्य राजाभिषेक सोहळा आपल्या शिवाजी राजाला छत्रपति होतानाचा ... पाहिले शंभूराजांना युवराज होताना ... मासाहेब जिजाऊँचे दू:खद निधन सुद्धा पाहिले ... शिवरायांचा दक्षिण दिग्विजय पाहिला ... रामराजांचे लग्न पाहिले ... शिवरायांच्या अकाली निधनाचा कडवट घास सुद्धा पचवला त्याने ... त्याने पाहिले शंभूराजांचे वेडे धावत येणे ... अश्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले रायगड ...



चित्तदरवाजावरुन वर चढून गेलो की लगेच लागतो तो खूबलढा बुरुज. आता इकडून वाट चढायची थांबते आणि कड्याखालून डाव्या बाजूने पुढे जात राहते. पहिल्या चढावर लागलेला दम इकडे २ क्षण थांबून घालवावा. आता वाट डावीकड़े वळत पुढे जात राहते. ह्याच्या अगदी बरोबर वरती आहे हिरकणी बुरुज. पुढच्या चढाच्या पायऱ्या सुरु व्हायच्या आधी उजव्या हाताला झाडाखाली एक पाण्याचा झरा आहे. थोड़े पुढे सरकले की ज्या पायऱ्या सुरु होतात त्या गडावरच्या होळीच्या माळा पर्यंत संपत नाहीत. पायऱ्या चढत अजून थोड़े वर सरकलो की आपल्याला वरच्या बाजूला २ महाकाय बुरुज दिसू लागतात. त्या २ बुरुजांमध्ये लपलेला गडाचा दरवाजा मात्र अगदी शेवटपर्यंत कुठूनसुद्धा दिसत नाही अशी गोमुखी प्रवेशरचना केलेली आहे. रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात किल्ल्यांच्या रचनेवर लिहिल आहे, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे." कधी उजवीकड़े तर कधी डावीकड़े वळणाऱ्या पायऱ्या चढत-चढत आपण महादरवाजाच्या अगदी खालच्या टप्यामध्ये पोचतो. गडाचे 'श्रीगोंदे टोक' ते 'टक-मक टोक' अशी पूर्ण तटबंदी आणि त्या मधोमध २ तगडया बुरुजांच्या मागे लपलेला महादरवाजा असे दृश्य आपल्याला दिसत असते. आता कधी एकदा आपण स्वतःला त्या दृश्यामध्ये विलीन करतोय असे आपल्याला वाटत राहते. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे एक वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराशी येणारी वाट. ती नेहमी डोंगर उजवीकड़े ठेवून वर चढ़ते. कारण द्वाराशी होणारी हातघाईची लढाई ढाल-तलवार व फारतर धनुष्य-बाण याने होत असे; त्यात जास्त प्रमाणात उजवे असलेल्या लोकांच्या डाव्या हातात ढाल असे व उजव्या हातात फ़क्त तलवार घेउन उजव्या बाजूने होणारा मारा टाळण्यासाठी अधिक प्रयास करावा लागे. म्हणजेच वाट नियोजनपूर्व आखली तर शत्रूला अधिक त्रासदायक ठरू शकते. पुढे दोन बुरुजांच्या कवेने चिंचोळ्या वाटेने आत गेले की दरवाजा समोर येत असे. ह्या ठिकाणी लढाईला फार जागा नसे व शत्रुवर वरुन चारही बाजूने तूटून पड़ता येत असे. जरी कोणी यातूनही आत शिरलाच, तरी पुढचा मार्ग सुकर नसे कारण महादरवाज्यातून आत शिरले की वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळत असते. तिथून वाचून पुढे जाणे अगदीच अशक्य. शिवाय किल्ल्याचे १/३ चढण चढणे बाकी असते ते वेगळेच. हूश्श्श् करत आपण अखेर २ बुरुजांमध्ये पोचतो आणि समोरचा महादरवाजा बघून थक्क होतो. दरवाजा भले नक्षिदार नसेल पण आहे जबरदस्त भक्कम. बांधकाम बघून असे वाटते की आत्ताच काही दिवसांपूर्वी बनवलेला आहे की काय. अगदी बरोबर दरवाजामध्ये थंड वाऱ्याचे झुळुक येत राहतात. शिवरायांनी निर्मिलेल्या किल्ल्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रायगड़, प्रतापगड़, राजगड़ यांचे महादरवाजे किल्ल्यांच्या एकुण उंचीच्या २/३ उंचीवर आहेत. दरवाजा पडला तरी पुढच्या चढाईवर किल्ला लढवायला पुरेशी जागा उपलब्ध होई. सिंहगड़, पन्हाळा या त्या आधीच्या किल्ल्यांमध्ये तशी रचना नाही. हे दुर्गबांधणीचे शास्त्र बघत महादरवाजामधून प्रवेश केला की उजव्या बाजूला देवडया दिसतात. देवडया म्हणजे द्वाररक्षकांना बसण्यासाठी कायम स्वरूपी बांधलेली जागा. पुढे गेलो की पुढची वाट ९० ते १८० अंशात डावीकड़े वळते. अजून थोड़े पुढे गेलो की लगेच डावीकड़े महादरवाजाच्या वर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. तिकडून खालचे अप्रतिम दृश्य दिसते. आता पुन्हा मागे खाली येउन पुढची वाट धरली की पुन्हा वळणा-वळणाचा चढता रस्ता लागतो. वाट पुढे जाउन परत उजवीकड़े आणि परत डावीकड़े वळते. त्या मध्ये पुन्हा बुरुज आहेत. त्याच्यावरचे बांधकाम पडले असले तरी त्याच्या पायावरुन सहज अंदाज बांधता येतो. येथून पुढे काही अंतर वाट सपाट आहे आणि मग तिसरा आणि शेवटचा चढ. तो पार करताना अक्षरशहा: दम निघतो. महत् प्रयासाने महादरवाजा जिंकल्यानंतर शत्रूला चढताना अधिक बिकट व्हावे अशी ही बांधणी आहे. ह्या चढत्या मार्गावरुन महादरवाजाचे सुंदर दृश्य दिसते. सर्व पायऱ्या चढून गेलो की लागतो हत्ती तलाव आणि त्या मागे जे दिसते ते मन मुग्ध करणारे असते. गंगासागर जलाशयाच्या पार्श्वभूमीवर असलेली राजवाडयाची प्रशत्र भिंत आणि अष्टकोनी स्तंभ. ती पाहत आम्ही जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेत पोचलो. आजचा मुक्काम इकडेच होता. सरपण जमा केले आणि जेवणाच्या तयारीला लागलो. तितक्यात कळले की सुरेश वाडकर गडावर आहेत. (गायक नव्हे बर का.. 'रायगड किले अभ्यासक सुरेश वाडकर' ज्यांनी रायगड त्यावेळी ५०० पेक्षा जास्त वेळा पाहिला होता. आता बहुदा १००० पूर्ण केले असतील त्यांनी.) जेवण आवरून गड बघायला निघालो.




आधी आम्ही होळीच्या माळावर पोचलो. छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर १९७४ साली राजाभिषेकाची ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथे बसवला गेला. खर तर तो बसवायचा होता सिंहासनाच्या जागीच, पण पूरातत्वखात्याचे काही नियम आडवे आणले गेले. आप्पा उर्फ़ गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा' पुस्तकामध्ये त्याबद्दल मस्त माहिती दिली आहे. आज दुर्दैव असे की ऊन-वारा-पावसामध्ये हा पुतळा उघड्यावर आहे. या भारतभूमीला ४०० वर्षांनंतर सिंहासन देणारा हा छत्रपति आज स्वता:च्या राजधानीमध्ये छत्राशिवाय गेली ३५ वर्षे बसला आहे. हा आपला करंटेपणा की उदासीनता ??? मनातल्या मनात राजांची क्षमा मागत मुजरा केला आणि मागे वळून चालू लागलो. होळीच्या माळावर उजव्या बाजूला गडाची देवता शिर्काईचे मंदिर आहे. देवीची मूर्ती दशभुजा असून आजही दरवर्षी गडावर देवीचा उत्सव भरतो. अंबारखाना म्हणुन ओळखली जाणारी वास्तु आज पूरातत्वखात्याचे कार्यालय म्हणुन बंद केली गेली आहे. पुतळ्या समोरून एक प्रशस्त्र रस्ता गडाच्या दुसर्‍या बाजूस जातो. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ओळीत एकामेकांना जोडून एकुण ४७ बांधकामे आहेत. एका बाजूला २३ तर दुसऱ्या बाजूला २४. ह्याला आत्तापर्यंत 'रायगडावरील बाजारपेठ'से म्हटले गेले आहे. त्यात आहेत एकुण ४७ दुकाने. जुन्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की, 'घोडयावरुन उतरायला लागू नये म्हणून दुकानांची जोते उंच ठेवले गेले आहेत.' पण ते संयुक्तिक वाटत नाही. कारण राजधानीच्या गडावर हवी कशाला धान्य आणि सामान्य बाजारपेठ ??? खाली पाचाडला आहे की बाजारपेठ. त्यासाठी खास गडावर श्रम करून यायची काय गरज आहे? शिवाय गडावर येणाऱ्या माणसांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार तो वेगळाच. ही सलग असलेली ४७ बांधकामे 'नगरपेठ' म्हणता येतील. स्वराज्याचे सुभेदार, तेथील महत्त्वाचे अधिकारी, लष्करी अधिकारी, सरनौबत - सरदार, वकील, इतर राजांचे दूत आणि असे इतर विशिष्ट व्यक्तिं ज्यांचे गडावर तात्पुरते वास्तव्य असते अश्या व्यक्तिंसाठी राखीव घरे त्यावेळी बांधली गेली असावीत. प्रत्येक घर ३ भागात विभागले आहे. पायऱ्या चढून गेले की छोटी ओसरी, मग मधला बैठकीचा भाग, आणि मागे विश्रांतीची खोली. दोन्ही बाजुस १५ व्या घरानंतर पाण्याच्या निचऱ्यासाठी मोकळी जागा सोडली आहे. गडावर पडणाऱ्या पावसाचा पूर्ण अंदाज घेउनच हे बांधकाम केले असल्याने जोत्यांच्या उंचीचा संबंध घोडयावरुन खरेदी असा लावला गेला आहे. डाव्या बाजुच्या ९व्या आणि १०व्या घराच्या मधल्या भिंतीवर मात्र शेषनागाचे दगडी शिल्प आहे. ह्या बाबतीत १-२ ऐतिहासिक घटना आहेत. पण नेमक प्रयोजन अजून सुद्धा कळत नाही आहे. आता आम्ही नगरपेठेच्या उजव्या बाजूला चालू लागलो. समोर दिसत होता श्री जगादिश्वर मंदिराचा कळस. उजव्या बाजूला खाली दूरवर १२ टाकी आणि वाघ दरवाजाकड़े जायचा मार्ग आहे. वेळ कमी असल्या कारणाने तिकडे जाता येणार नव्हते.



श्री जगादिश्वर मंदिराच्या दरवाजामधून प्रवेश करते झालो. मंदिराचे प्रांगण प्रशत्र आहे. डाव्या-उजव्या बाजूला थोडी वर सपाटी असून बसायला जागा बनवली आहे. मुख्यप्रवेशद्वार अर्थात उजव्या दिशेने आहे. दारासमोर सुबक कोरीव नंदी असून आतमध्ये एक हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर आतूनसुद्धा प्रशत्र आहे. आम्ही सर्वजण काही वेळ आतमध्ये विसावलो आणि मंदिर समोरील पूर्वेकडच्या बाजूला असणाऱ्या भागाकडे निघालो. या ठिकाणी आहे 'श्री शिवछत्रपतींची समाधी'. मंदिरामधून समाधीकड़े जाताना एक पायरी उतरून आपण खाली उतरतो त्या पायरीवर लिहिले आहे. 'सेवेचे ठाई तत्पर.. हीरोजी इंदळकर..' ज्याने बांधला रायगड तो हा हीरोजी. खासा गड बघून राजे खुश झाले तेंव्हा त्यांनी हिरोजीला विचारले,''बोल तूला काय इनाम हवे?'' हीरोजी म्हणाले, ''काही नको स्वामी. मंदिरामधून तुमचा उजवा पाय बाहेर पडेल त्या पायरीवर माझे नाव लिहावे.'' ही अष्टकोनी समाधी १९२४-२५ साली बांधली गेली आहे. १९७४ मध्ये छत्रपति शिवरायांचा सिंहासनाधिष्टित पुतळा रायगडावर बसवला तेंव्हा समाधीवर जलाभिषेकाचा कार्यक्रम केला गेला. अनेक शिवप्रेमी आणि दुर्ग प्रेमींनी ३०० वेगवेगळ्या किल्ल्यांमधून पाणी आणून समाधीवर आणि सिंहासनाच्या जागी पुन्हा अभिषेक केला होता. त्याची सुद्धा गोष्ट 'दुर्गभ्रमणगाथा' मध्ये आवर्जुन वाचावी अशी आहे. आम्ही राजांच्या समाधीला मनोमन वंदन केले. राजे म्हणजे खरेखुरे दुर्गस्वामी. त्यांचा जन्म दुर्गावर झाला. आयुष्यामधील ७/८ आयुष्य त्यांनी दुर्गांवर व्यतीत केले आणि अखेर त्यांची जीवनयात्रा दुर्गावरतीच समाप्त झाली. समाधी परिसर अत्यंत पवित्र आणि प्रसन्न आहे. उजव्या बाजुच्या भिंतीवर हीरोजी इंदळकर यांचा शिलालेख आहे. त्यात त्यांनी रायगडावर कोणकोणते बांधकाम राजांच्या सांगण्यावरुन केले ते लिहिले आहे. त्यासमोर प्रशत्र देवडया आहेत. आम्ही काहीवेळ तेथे विसावलो. समाधी समोरून पायऱ्या इतरून पुढे गेलो की डाव्या बाजूला घोड़पागेच्या खुणा दिसतात. बरेच ठिकाणी राहत्या वाड्यांचे जोते दिसतात. ह्या ठिकाणी गडावरील राखीव फौज आणि राजांची खाजगीची फौज (अंदाजे २०००) राहती असायची. अजून पुढे गेलो की ह्या भागामधील 'काळा हौद' नावाचा तलाव आहे. इतरस्त्र सपाटी असल्याने बरीच विखुरलेली बांधकामे या भागात आहेत. टोकाला गेलो की लागतो 'भवानी कडा' आणि त्याखाली असलेली गुहा. राजे ह्या ठिकाणी येउन चिंतन करायचे असे म्हटले जाते. आम्ही आता पुन्हा मागे फिरलो आणि सूर्यास्त पाहण्यासाठी गडाचा कडेलोट उर्फ़ टकमक बघायला लावणारा ८०० फुट टकमक कडा बघायला गेलो. तिकडे जाताना आधी गडावरील 2 दारूकोठारे लागतात. उद्वस्त छप्पर आणि आत माजलेले झाडीचे रान अशी सध्या त्यांची अवस्था आहे. पुढे जाउन थोडसं उतरलं की टकमककड़े जाता येते. सांभाळून जावे आणि कडयावरुन विहंगम दृष्य पाहून परत यावे. आता टकमक वरुन ८०० फुट रॅपेलिंग सुद्धा करता येते. पण आम्ही काही ते आता करणार नव्हतो. सूर्यास्त होत आला होता. आणि आज आम्ही अर्धा गड पाहिला होता. 'आता बाकी उदया रे' अस म्हणुन आम्ही परत धर्मशाळेत पोचलो. संध्याकाळचे जेवण बनवताना सुरेश वाडकरांबरोबर इतिहासावर गप्पा मारल्या आणि त्यांचे रायगडाचे अतिशय सुंदर असे फोटो पाहिले. सकाळी सूर्योदय बघायला पुन्हा होळीच्या माळावर जायचे होते त्यामुळे लवकरच आडवे झालो. गप्पा मारता-मारता झोप कधी लागली काही कळले नाही...


क्रमश: ...

Saturday, 23 May 2009

भाग ७ - सप्त शिवपदस्पर्श ... !


दिवस सातवा ... घाट आणि कोकण जोडणारी बोराटयाची नाळ ...

पहाटे-पहाटे चांगलीच लवकर जाग आली कारण समोरच्या विट्ठल मंदीरामध्ये भजन सुरु झाले. नंतर काही झोप लागेना म्हणुन लवकरचं आवरून घेतले आणि उजाड़ल्या-उजाड़ल्या निघायची तयारी केली. आम्ही निघायच्या आधी पुन्हा त्या मुलाच्या घरी गेलो. त्याला धन्यवाद दिले. गावामधून बाहेर पडलो आणि नदी काठाला लागलो. लाल मातीची वाट आणि दोन्ही बाजूला हिरवेगार लूसलुशीत गवत; थोड खाली खळखळ वाहणारी नदी आणि आसपास छोटे-छोटे डोंगर. अजून काय वर्णन करू. काय मस्त वाटत होते. आम्ही अगदी रमत-गमत पुढे जात होतो. मध्येच थांबायचो आणि खाउगिरी करायचो. मजल दरमजल करत आम्ही पुढे जात होतो. "वाघ्या आता कुठे असेल रे?" अभिने मध्येच प्रश्न टाकला. काल बुधला माचीकडे जाताना आमच्या बरोबर न येता वाघ्या मंदिरापाशीच थांबला होता. आम्ही परत आलो तेंव्हा काही तो आम्हाला दिसला नाही. कुठे गेला कोणास ठावुक... आता आसपास चरणारी गुरं आणि मध्येच येणारी हाकाटी ह्यावरुन आसपास कुठेतरी गाव किंवा वाडी आहे हे समजलो. थोड्यावेळाने उजव्या हाताला जवळच मोहरी गाव दिसू लागले. मोहरी गावाकडून येणारी वाट आमच्या वाटे बरोबर मिसळली. आता आम्ही रायलिंग पठारावर होतो. समोर दूरवर रायगड दिसू लागल होता. पण लिंगाणा पठाराला लागून थोडा खाली असल्याने अजून दिसत नव्हता. जसे-जसे पुढे जात होतो तशी वाट एका डोंगरावर चढू लागली. १०-१५ मिं चढून वर गेलो तसे लक्ष्यात आले की आपण वाट चुकलो आहोत. तसेच डावीकड़े सरकलो आणि पुन्हा खाली पठारावर आलो. अर्धा तास झाला तरी बोराटयाच्या नाळेचे मुख काही सापडेना. अभि उजवीकड़े तर हर्षद डावीकड़े गेला. मी मध्ये दोघांनाही दिसेन अश्या एका जागी नकाशा बघत उभा राहिलो. इतक्यात मागुन 'श्री शिवप्रतिष्टान' वाल्यांचे आवाज येऊ लागले. बघतो तर काय सर्वात पुढे वाघ्या कुत्रा. बहुदा त्याला कळले असावे की आम्ही बसने येणार पुढे म्हणुन हा पठ्या ह्या लोकांबरोबर इथपर्यंत आला. त्याला बघून आम्ही मात्र खुश झालो. मी अभि आणि हर्षदला आता त्यांच्या बरोबर निघालो. दुपार होत आली होती. जेवण बनवणे तर दूरचं राहिले होते. खूप झाडी असल्याने बोराटयाच्या नाळेचे मुख काही दिसत नव्हते. 'श्री शिवप्रतिष्टान' मधल्या काही जणांनी पावसाळ्याआधी येउन मार्ग बघितला होता त्यामुळे त्यांना रस्ता सापडायला त्रास पडला नाही. प्रथम दर्शनीच बोराटयाच्या नाळेचे ते प्रचंड रूप बघतच बसलो. उजव्या-डाव्या बाजूला रायलिंग पठाराचा अखंड प्रस्तर आणि त्या मधून थेट खाली दिसणारे कोकणतळ. नाळेमध्ये प्रवेश केला. आता खालपर्यंत मोठ्या दगडांमधून उतरायचे होते. कधी सरळ उतरत तर कधी डावी-उजवी कडे वजन सरकवत. कधी २ मोठ्या दगडांमधून घुसून पुढे सरकावे लागे तर कधी एखाद्या मोठ्या दगडावरुन खाली उतरावे लागे. आमची पूर्ण वेळ सर्कस सुरू होती. पाठीवरची बॅग सांभाळत आम्ही व्यवस्थित उतरत होतो. सर्वात पुढे अभि, मध्ये हर्षद आणि शेवटी मी. आमच्या पुढे मागे बाकीचे लोक होतेच. आम्हाला आश्चर्य वाटत होते ह्या 'श्री शिवप्रतिष्टान' वाल्यांचे. का विचारताय... त्यांच्या पायामध्ये चपला-बूट काही-काही नव्हते. अनवाणी पायाने ते ह्या दुर्गयात्रेला निघाले होते. वेग कमी असता तरी कठिण खाच-खळग्याँमधून त्यांचे पाय शिफातिने पावले टाकत पुढे सरकत होते. वाघ्या सुद्धा आमच्या मागुन जसा जमेल तसा खाली उतरत होता. ट्रेक्सला आपण गेलो की गावातले कुत्रे आपल्या बरोबर येत असतात पण हा तर राजगड पासून आमच्या बरोबर होता. नाळेमध्ये प्रवेश करून २ तास झाले होते. उतार काही संपायचे नाव घेत नव्हता. मध्ये एके ठिकाणी मोठी झाडे होती. तिकडे जरा बसलो. चांगलीच भूक लागली होती. जवळ असलेल खायला काढले. खाउन आणि पाणी पिउन जरा फ्रेश झालो. बाकी सगळे आमच्या पुढे निघून गेले होते. आता आम्ही पुन्हा वेगात उतरायला लागलो. घळ मोठी होत जात होती. (नाळ / घळ - पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे डोंगरातून निघालेला तीव्र उताराचा मार्ग.) आधी असलेला तीव्र उतार आता कमी तीव्र झाला होता. थोड खालच्या बाजूला पुढे गेलेले लोक दिसू लागले. जसे त्यांच्या जवळ पोचु लागलो तसे कळले की ते एक-एक करून बोराटयाच्या नाळेबाहेर पडत आहेत. रायलिंगाचे पठार संपले होते आणि आता उजव्या हाताला किल्ले लिंगाणा दिसू लागला होता.




रायलिंगाचे पठार आणि किल्ले लिंगाणा यांच्यामध्ये असलेल्या जागेमधून बोराटयाच्या नाळेबाहेर पडायचा मार्ग आहे. हा १०-१५ फुटांचा पॅच रिस्की आहे. उजवीकडे रायलिंगच्या पठाराचा उभा कडा आणि डावीकड़े कोकणात पडणारी खोल दरी यांच्यामध्ये असलेल्या वीतभर वाटेवरुन पाय सरकवत-सरकवत पुढे जायचे. हाताने पकड़ घेता यावी म्हणुन काही ठिकाणी खोबण्या केलेल्या आहेत. आमच्या तिघांकड़े सुद्धा पाठीवर जड बैग होत्या. त्यामुळे सगळे वजन दरीच्या बाजूला पडत होते आणि हातावर जास्तच भर येत होता. बैग काढता सुद्धा येणार नव्हती. एक-एक पाउल काळजीपूर्वक टाकत आम्ही लिंगाण्याच्या बाजूला पोचलो. आता रायलिंगाचे पठार आणि किल्ले लिंगाणा यांच्यामध्ये असलेल्या घळीमधून खाली उतरु लागलो. ५ एक मिं. मध्ये डाव्याहाताला लिंगाणा संपला की ती घळ सोडून डावीकडे वळायचे होते. पण झाडी इतकी वाढली होती की वाट काही सापडेनाच. ह्या सगळ्यात जवळ-जवळ तास गेला. अखेर वाट सापडली. तरीपण झाडी इतकी होती की अगदी हळू-हळू पुढे सरकत होतो. दुपारचे ४ वाजत होते. आणि आज रायगडला कुठल्याही परिस्थितीमध्ये पोचणे शक्य नव्हते. वाट उतरत-उतरत लिंगाण्याला वळसा घालत लिंगाणा माचीकडे पोचली. माचीवरच्या गावामध्ये फारसे कोणी नव्हते. तिकडे अजिबात न थांबता आम्ही पुढे निघालो. अंधार पडायच्या आधी रायगड नाही तर किमान काळ नदीकाठचे 'पाने गाव' गाठायचे होते. झटाझट उतरु लागलो. ५ वाजून गेले होते. दूरवर रायगडाच्या मागे सूर्य लपू लागल होता. अवघ्या ४०-४५ मिं मध्ये आम्ही नदीकाठी होतो. पलिकडे पाने गाव दिसत होते. अंधार पडायला अजून थोडावेळ होता म्हणुन नदीत मस्तपैकी भिजून घेतले. मी आणि हर्षद काही बाहेर यायचे नाव घेत नव्हतो. जसा अंधार पडायला लागला तसा अभि बोंबा मारायला लागला. आता आम्ही नदी पार करून गावाकडे निघालो. नदीपार होताना एक धम्माल आली. त्या बाकीच्या लोकांमध्ये एकजण कारवार साइडचा होता. "मी ह्या रस्त्याने चाललो की हो." "मी खातोय. तुम्ही खाणार काय हो?" "थकलोय जरा बसतो की हो" अशी भाषा बोलायचा. नदी पार करताना त्याचा तोल गेला आणि आख्खा पाण्यात भिजला. अगदी बैग सकट. उठून उभा राहिला आणि बोलतो कसा,"आयला. पडलो की हो." हा.. हा.. आम्हाला इतक हसायला येत होत. हसत-हसतच गावात एंट्री मारली. राहण्यासाठी देऊळ शोधले. देवळासमोरच हात पंप होता. देवळामध्ये सामान टाकले आणि गावात कुठे दूध आणि सरपण मिळेल का ते बघायला मी आणि अभि निघालो. हर्षद बाकीची तयारी करायला लागला. गावात एक लहान मुलगा भेटला. त्याला विचारले तर तो बोलला आमच्याकडे चला देतो तुम्हाला. तो आम्हाला त्याच्या घरी घेउन गेला. "थांबा हं एकडे" अस म्हणुन आत गेला. अवघ्या काही सेकंदामध्ये त्याची आई त्याला धरुन मारत-बदडत बाहेर घेउन आली. आम्हाला वाटले आपल्यामुळे त्याला उगाच फटके पडले. पण त्याची आई एकदम येउन आम्हाला बोलली. "माफ़ कर रे भाऊ. हा जाम खोड्या काढतो." मी म्हटले,"अहो पण आम्हाला फ़क्त ४-६ सुकी लाकड आणि थोडसं दूध हवे होते बास." त्यावर ती म्हणाली,"अस काय. मला वाटले ह्याने तुमची काही खोडी काढली की काय." आता माझ्या डोक्यात पूर्ण प्रकाश पडला. त्याचा झाला अस की हा गेला आत आणि आईला सांगितले की बाहेर २ माणसे आली आहेत. आईला वाटले पोराने केला दंगा परत. कारण हा त्या गावामधला चिखलू निघाला. पक-पक-पकाक पिक्चर आठवतोय न. हा... हा... म्हणुन तर ती त्याला धरुन मारत-बदडत बाहेर घेउन आली. आम्ही आपले हसतोय पण तो पोरगा बिचारा रडायला लागला. त्याला म्हटले 'चल तूला गोळ्या देतो'. तेंव्हा कुठे त्याचा चेहरा हसला. आता आम्ही देवळामध्ये परत आलो आणि जेवण बनवले. झोपायच्या तयारीला लागलो. घरून निघून आठवड़ा झाला होता आणि ह्या ७ दिवसात आम्ही कोणीच घरी फ़ोन केला नव्हता. तरीसुद्धा आम्हाला कसलीच भ्रांत नव्हती. ह्या भटकंतीमध्ये आम्ही पूर्णपणे बुडून गेलो होतो. उदया होता दिवस आठवा आणि लक्ष्य होते स्वराज्याची सार्वभौम राजधानी. दुर्गराज रायगड ...
क्रमश:
*** ह्या भागातील छायाचित्रे आमच्या ट्रेकच्या वेळची नसून माझा मित्र 'किरण शेलार' ह्याच्या संग्रहातील आहेत.

Thursday, 21 May 2009

भाग ६ - सप्त शिवपदस्पर्श ... !


६ व्या दिवशी सकाळी तोरण्यावरील गडफेरीला निघालो. तोरण्याला २ माच्या आहेत. झुंझार माची आणि बुधला माची. आम्ही आधी झुंझार माचीकड़े निघालो. मंदिरापासून डाव्याबाजूला काही अंतर गेलो की तटबंदी आणि टोकाला बुरुज लागतो. ह्या बुरुजावरुन खालच्या माचीवर उतरायची वाट मोडली आहे. त्या ऐवजी थोड़े मागे डाव्याहाताला खाली उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी लावली होती. त्यावरून खाली उतरलो आणि माचीकड़े वळालो. माचीची लांबी तशी फार नाही पण तिला भक्कम तटबंदी आहे. टोकाला एक मजबूत असा बुरुज आहे. तिकडून परत आलो आणि शिडी चढून पुन्हा मंदिरात परतलो. आता सामान बांधले आणि बुधला माचीकड़े निघालो. कारण त्याच बाजूने गडाच्या दुसऱ्या दरवाज्याने आम्ही गड सोडणार होतो. मंदिरापासून आता पुढे निघालो आणि उजव्या वाटेने बुधला माचीकड़े कूच केले. झुंझार माचीवर सुद्धा आमच्या बरोबर आलेला वाघ्या ह्यावेळी मात्र आमच्या बरोबर बोलवून सुद्धा आला नाही. वाट आता निमुळती होत गेली आणि मध्ये-मध्ये तर मोठ्या-मोठ्या दगडांवरुन जात होती. गडाचा हा भाग एकदमच निमुळता आहे. थोड पुढे गेल्यावर अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या लागल्या. आता समोर बुधला दिसत होता. पण तिकडे जाण्याआधी डाव्याबाजूला खाली असणाऱ्या बुरुजाकडे सरकलो. राजगडाच्या आळू दरवाजावरुन येणारी वाट इकडून तोरणा गडावर येते. खालच्या गावामधून एक म्हातारी डोक्यावर दही आणि ताकाचा हंडा घेउन गडावर आली होती. सकाळी-सकाळी तिने बहुदा ३०-४० जणांना गडावर येताना पाहिले असावे. आम्हाला पाहताच बोलली,"भवानी कर की रे भाऊ." मी आणि हर्षदने एक-एक ग्लास घेतला. छान होत की ताक. आम्ही तिला बोललो 'मंदिराकडे जा लवकर. तिकडे बरेच जण आहेत पण ते गड सोडणार आहेत आत्ता. लवकर गेलीस तर कमाई होइल तुझी.' आता ती बाई मंदिराकडे निघाली. आम्ही आता उतरून बुरुजाकडे निघालो. मी सर्वात पुढे होतो. अभि मध्ये तर हर्षद मागे होता. वाटेवर बरच गवत होते. तितक्यात त्या बाईचा आवाज आला. "आरं.. आरं.. पोरगा पडला की." मला काही कळेना. मी मागे वळून पाहील तर हर्षद गवतात लोळत बोंब ठोकुन हसत होता. आणि अभि त्याच्याकडे बघत उभा होता. हर्षद आता जरा शांत झाला आणि मला नेमक काय घडल ते सांगितले. त्या गवतावरुन अभि सरकून असा काही पडला की त्याने ह्या ट्रेकमधले सर्वात जास्त रन केले. म्हणजे डायरेक्ट होमरन मारली असच म्हणान. आता मला मागे टाकुन लीड वर अभि होता. हा.. हा.. पण हे इतक्या वेगात घडल की मी मागे वळून बघेपर्यंत तो उठून उभा सुद्धा होता. आम्ही खालच्या बुरुजापर्यंत गेलो आणि काहीवेळात चढून वर आलो. आता मोर्चा वळवला बुधला माचीकडे. ह्या बाजूला अस काही रान माजले होते की नेमकी वाट सापडेना. जसे आणि जितके जमेल तितके पुढे जात होतो. बुधल्यावरती चढता येते का ते माहीत नव्हते त्यामुळे जेंव्हा वाट सापडेनाच तेंव्हा मागे फिरलो आणि दरवाजाकडे निघालो. दरवाज्यामागच्या उंचवटयावरुन खालची बरीच वाट दिसत होती. पण पुढे मातीचा घसारा आणि वाट मोडल्यासारखी वाटत होती. हर्षद खाली जाउन बघून आला आणि बोलला की बहुदा आल्या मार्गाने आपल्याला परत जावे लागणार. आम्ही पुन्हा मंदिराकडे निघालो. आता वेळेचे गणित पूर्णपणे विस्कटणार होते.




आल्या मार्गाने परत फिरलो आणि मंदिरामध्ये पोचलो. 'श्री शिवप्रतिष्टान' च्या लोकांनी गड सोडला होता. ती ताकवाली म्हातारी बाई भेटली मध्ये. आता आम्ही आल्यावाटेने गड उतरु लागलो. बिनीचा दरवाजा उतरून खाली आलो आणि कडयाखालचा टप्पा पार करून डोंगर रांगेवरुन उतरायला लागलो. चढ़ताना जितका दम निघाला होता तितका आता उतरताना पायावर जोर पडत होता. आमचा उतरायचा वेग भलताच वाढला होता. कुठेही न थांबता आम्ही खालच्या टप्यावर येउन पोचलो. दुरवर खाली वेल्हा दिसत होते. झपाझप एकामागुन एक टप्पे पार करत खाली उतरत वेल्हा गाठले. आज काहीही करून बोराटयाच्या नाळेच्या जास्तीत-जास्त जवळ सरकायचे होते. गावात पोचलो तेंव्हा ३ वाजत आले होते. आता इकडून नदीच्या मार्गाने हरपुडला कसे जायचे ते एका माणसाला विचारले. तो बोलला,"आत्ता गेलात तर जाम उशीर होइल. त्यापेक्षा ४ वाजताची कोलंबीला जाणारी S.T. पकडा आणि मग तिकडून पुढे जा." आम्हाला हा पर्याय पटला. आम्ही अजून १-२ लोकांकडून S.T. ची खात्री करून घेतली आणि मग तासभर तिकडेच एका देवळामध्ये थांबलो. ४ वाजताची S.T. आली. ही गाड़ी निवासी S.T. असून पुण्याहून वेल्हामार्गे कोलंबीला जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा वेल्हामार्गे पुण्याला परतते असे कळले. त्या गाडीत आम्हाला एक मुलगा भेटला. नाव आठवत नाही आता त्या पोराचे. तो कोलंबीला म्हणजेच त्याच्या गावाला जात होता. कामाला होता तो नवीमुंबईच्या APMC बाजारात. तास-दिडतासाच्या त्या प्रवासात त्याच्याशी मस्त गप्पा झाल्या. शेतीची महत्त्वाची कामे झाली की आसपासच्या गावामधले लोक अधिक उत्पन्न मिळावे म्हणुन इतर कामासाठी पुणे, सातारा आणि अगदी मुंबई - नवी मुंबईपर्यंत जातात हे त्याच्या कडून कळले. संध्याकाळी ६ च्या आसपास गावात पोचलो.





मागे एकदम दूरवर तोरणा आणि त्याची बुधला माची दिसत होती. मुंबईचा कोणी आपल्या गावात आला आहे म्हणुन तो भलताच खुश होता. कारण ह्या वाकड्या मार्गाने कोणी ट्रेकर जात नाही. 'तुम्ही आज आमच्याघरीच राहायचे, आमच्याकडेच जेवायचे' असे आम्हाला सांगुन तो मोकळा झाला होता. आम्ही म्हटले "बाबा रे, कशाला तुम्हाला त्रास. आमच्याकड़े जेवणाचे सगळे सामान आहे. तू बास आम्हाला गावामधले देउळ दाखव आणि पाणी कुठे मिळेल ते सांग." तरीपण आम्हाला घेउन आधी तो स्वतःच्या घरी गेला. आईशी ओळख करून दिली. मी पहिल्या क्षणामध्येच त्याचे घर न्याहाळले. बाहेर छोटीशी पडवी. आत गेल्या-गेल्या डाव्या बाजूला गुरांचा गोठा होता. त्यात २ बैल, एक गाय आणि तिच्याजवळ तिच वासरू होत. समोर घरामध्ये आई काहीस काम करत बसली होती. योगायोगाने त्याच्या घरासमोर आणि उजव्याबाजूला अशी २ मंदिरे होती. मी लगेच त्याला म्हटले,"हे बघ. आम्ही इकडे समोरच राहतो. अगदी काही लागल तर घेऊ की मागुन." तो ठीक आहे म्हणुन आत घरात गेला आणि आम्ही आमचा मोर्चा मंदिराकड़े वळवला. आमचे सामान टाकुन बसणार तितक्यात तो एक मोठा पाण्याचा हंडा आणि काही सरपण घेउन आला आणि बोलला,"जेवणाचे सामान आहे बोलताय. पण जेवण कशावर बनवणार?? हे घ्या सरपण" आम्ही सगळेच हसलो. काहीवेळाने जरा फ्रेश झालो आणि निवांतपणे बसलो. ७ वाजून गेले तसे मी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागलो तितक्यात तो मुलगा चहा घेउन परत आला आणि आमच्याशी गप्पा मारायला लागला. इकडून उदया आम्ही कुठे जाणार आहोत ते त्याला सांगितले. माझ्या मनात विचार येत होते. 'असेल पैशाची गरीबी थोडी पण मनाची श्रीमंती आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे.' गेल्या इतक्या वर्षात मी गावातल्या लोकांचा पाहूणचार पहिला आहे, अनुभवला आहे आणि भरून पावलो आहे. आम्ही आमचे रात्रीचे जेवण आटोपले आणि इतिहासावर गप्पा मारत बसलो. वेळ कसा गेला कळलेच नाही. बऱ्याच उशिरा झोपी गेलो.
क्रमश:

Wednesday, 20 May 2009

भाग ५ - सप्त शिवपदस्पर्श ... !


किल्ले तोरणा ... एक भन्नाट अनुभव ... !

आज होता ट्रेकचा पाचवा दिवस. गेल्या ४ दिवसात ४ किल्ले सर करत आता आम्ही निघालो होतो 'किल्ले तोरणा' कड़े. सकाळी झटपट आवरून निघालो. संजीवनी माचीवरच्या आळू दरवाजामधून निघून थेट तोरणा गाठता येतो पण आम्हाला राजगडाच्या राजमार्गाने उतरायचे होते. त्यामुळे आम्ही पाली दरवाजा गाठला. शिवराय निर्मित दुर्गरचनेप्रमाणे ह्या महादरवाज्यामध्ये बाहेरच्या बाजूने प्रवेश केल्या-केल्या वाट पूर्ण डावीकड़े वळते. आता आम्ही आतून बाहेर जात होतो त्यामुळे वाट उजवीकड़े वळली. इकडे समोर देवडया आहेत. तर अलिकड़े उजव्या हाताला महादरवाजावर असणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे इकडे खालचा आणि वरचा असे २ मुख्य दरवाजे आहेत. वरच्या दरवाज्याच्या बुरुजावरुन खालचा दरवाजा आणि त्यापुढचा मार्ग पूर्णपणे टप्यात येइल अशी दुर्गरचना येथे आहे. आम्ही वरच्या दरवाजामधून बाहेर पडलो. हा राजमार्ग असल्याने ३ मि. म्हणजेच पालखी येइल इतका रुंद आहे. ५० एक पायऱ्या उतरलो की मार्ग आता उजवीकड़े वळतो आणि पुढे जाउन डावीकड़े वळसा घेउन अजून खाली उतरतो. आता इकडे आहे खालचा दरवाजा. ह्यावरचा बुरुज मात्र ढासळला आहे. ह्या दरवाजामधून बाहेर पडलो की आपण राजगडाच्या तटबंदीच्या बाहेर असतो. आता वाट उजवी-डावी करत-करत खाली उतरु लागते. नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे हा पूर्ण मार्ग खालच्या दरवाजाच्यावर असणाऱ्या बुरुजाच्या टप्यात आहे. शिवाय बाले किल्ल्यावर असणाऱ्या उत्तरेकडच्या बुरुजावरुन सुद्धा ह्या मार्गावर थेट मारा करता येइल अशी ही वाट आहे. हा गडावर यायचा सर्वात सोपा मार्ग असल्याने ह्याला दुहेरी संरक्षण दिले गेले आहे. आम्ही तासाभरात खालच्या माळरानावर होतो. इकडे थोडी सपाटी आहे. बहुदा आता इथपर्यंत गाड़ी रस्ता होतो आहे. इकडून आपण थेट खाली उतरलो की 'वाजेघर' गाव आहे. संस्कृतमध्ये वाजिन म्हणजे घोड़ा (याशिवाय 'वाजिन' चे अजून काही समानअर्थी शब्द म्हणजे - शुर, धाडसी, योद्धा) शिवरायांचे घोडदळ ज्याठिकाणी असायचे तो भाग म्हणजे 'वाजिनघर' उर्फ़ 'वाजेघर'. आम्ही गावात न शिरता समोर दिसणाऱ्या ब्राह्मणखिंडीकड़े निघालो. वाटेमध्ये छोटे-छोटे पाडे आणि वाड्या लागत होत्या. त्यांच्याआधी आणि नंतर शेतीच शेती होती. मार्ग सपाट असल्याने भरभर पावले उचलत आम्ही खिंडीकड़े निघालो होतो. त्यात सुद्धा आमच्या गप्पा सुरूच होत्या. खास करून त्यात काल रात्रीचा जेवणाचा किस्सा अजूनसुद्धा चघळला जात होता. १० वाजून गेले होते. मध्येच खिंडी अलीकडे एके ठिकाणी काहीवेळ विश्रांतीकरता थांबलो. मागे वळून राजगडाकडे पाहिले तर डावीकडे पद्मावती माची, मध्ये बालेकिल्ला तर उजवीकड़े संजीवनी माची से राजगडाचे सुंदर दृश्य दिसत होते. आता लक्ष्य होते तोरणा किल्ल्याचा पायथा, म्हणजेच वेल्हा. निघालो तसे काही वेळातच खिंड लागली. २० मिं. खिंडीमध्ये पोचलो. इकडे परत जरा दम घेतला. वेल्हा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ह्या वाटेवर तशी वर्दळ असते. त्यामुळे वाट चूकायचा सुद्धा काही फारसा प्रश्न नसतो. शिवाय आपण कुठे डोंगराच्या कोपऱ्यात नसून बऱ्यापैकी सपाटीला असतो. थोडावेळ विश्रांती घेउन आम्ही पुढे निघालो आणि खिंड उतरून तासाभरात वेल्ह्याला पोचलो. दुपारचे १ वाजत आले होते आणि गावात बरीच वर्दळ होती. आज लंच बनवायचा नव्हता म्हणुन आम्ही 'होटेल तोरणा विहार' मध्ये गेलो आणि जेवणाची आर्डर दिली. जेवण झाले तेंव्हा दुपारचे २ होउन गेले होते आणि आम्ही आता दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये किल्ले तोरणा चढणार होतो.




हॉटेलच्या समोर आणि उजव्या हाताला मामलेदार कचेरी आणि इतर सरकारी कार्यालये आहेत. तिकडेच उजव्या हाताने गावाबाहेर पडायचे आणि तोरण्याकड़े निघायचे. काहीवेळ वाट सपाटीवरुन जाते आणि मग डोंगर चढणीला लागते. एकामागुन एक टप्याटप्याने चढत जाणाऱ्या डोंगररांगा बघून कळते की ह्याला राजांनी 'प्रचंडगड' नाव का ठेवले असेल ते. खरचं कसला प्रचंड आहे हा किल्ला. आम्ही आता पहिल्या टप्याच्या चढणीला लागलो. ह्या टप्यामध्ये एक अशी सलग वाट नाही कारण एकतर ह्याभागात प्रचंड झाडे तोडली गेली आहेत. दुसरे असे की वरुन वाहून येणाऱ्या पाण्यामुळे नविन मार्ग बनले आहेत. शिवाय गुरांमुळे बनलेल्या वाटा वेगळ्याच. इकडे वाट शोधत वर जाण्यात बराच वेळ लागला. वरच्या सपाटीला पोचलो आणि कारवीच रान सुरु झाल. गावापासून निघून तास होउन गेला होता. आता सपाटी संपली आणि दुसऱ्या टप्याचा चढ सुरु झाला. ह्या चढावर पुरता दम निघाला. ३०-४० मिं. नंतर जेंव्हा चढ संपला तेंव्हा पाय पूर्ण भरून आले होते. घसा सुकला होता आणि ह्रुदयाचे ठोके गळ्याखाली जाणवत होते. खांदयावरची बैग उतरवली आणि तसाच खाली बसलो. अभि आणि हर्षदची काही वेगळी अवस्था नव्हती. आता मी ह्रुदयाचे ठोके मोजले तर ते १०० च्या आसपास भरले. म्हणजे अजून जरा वाढले असते तर तोरण्यावर पोचायच्या ऐवजी डायरेक्ट वरतीच पोचलो असतो. आमच्यापैकी कोणीच काही बोलत नव्हतो. १५ मिं. तिकडेच बसून होतो. पाणी प्यालो आणि ताजे-तवाने झालो. ४:३० होउन गेले होते. अजून दिड-दोन तासामध्ये वर पोचून राहायची जागा, पिण्याचे पाणी आणि सरपण म्हणजे सुकी लाकडे जमवायची होती. आता वेळ दडवण्यात अर्थ नव्हता. झटझट पुढे निघालो. तिसऱ्या टप्याचा चढ सुरु झाला. आता हा पार करेपर्यंत थांबायचे नाही असे ठरवुनच निघालो होतो. ५:३० च्या दरम्यान अगदी वरच्या सपाटीला लागलो. हूश्श्श्श... एक मोठा दम टाकला. आता ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत समोर अखंड तोरणा पसरला होता. पश्चिमेकड़े सूर्य मावळतीला सरकला होता आणि अजून सुद्धा गडाच्या दरवाजाचा पत्ता नव्हता. तोरण्याचा बिनीचा दरवाजा असा बांधला आहे की शेवटपर्यंत काही दिसत नाही. दिसतोय कसला अंदाज सुद्धा करता येत नाही की तो कुठे असेल. २-५ मिं. दम घेतला आणि सुसाट उजव्या बाजूने निघालो. आता वाट कडयाखालून पुढे सरकत होती. उजव्या हाताला खोल दरी तर डाव्या बाजूला उभा प्रस्तर. मध्येच एखादा झाडीचा टप्पा लागायचा. आमच सगळ लक्ष्य कडयाकडे होत. कधी तो दरवाजा दिसतोय अस झाल होत. अखेर काही वेळाने वाट डावीकडे वर सरकली आणि वरच्या टोकाला गडाचा दरवाजा दिसू लागला. ६ वाजून गेले होते आणि आम्ही कसेबसे गडामध्ये प्रवेश करत होतो. उभ्या खोदीव पायर्‍यांचा टप्पा पार केला आणि दरवाजामध्ये पोचलो. मी जाउन सर्वात वरच्या पायरीवर बसलो आणि सूर्यास्त बघायला लागलो. मागून अभी आणि हर्षद आले. काहीवेळाने आमच्या तिघांच्याही लक्ष्यात आल की अंधार पडत आला आहे. सूर्यास्त बघण्यात आम्ही इतके हरवून गेलो की आत जाउन राहायची जागा शोधायची आहे, पाणी शोधायचे आहे हे विसरूनच गेलो. उठलो आणि आतमध्ये शिरलो. आतमध्ये सर्वत्र रान मजले होते. उजव्या-डाव्या बाजूला तटबंदी दिसत होती. थोड पुढे डाव्या हाताला गडाची देवता तोरणजाईचे मंदिर दिसले. मंदिराची अवस्था बिकट होती. ह्याच ठिकाणी राजांना गुप्तधनाचा लाभ झाल्याचे जाणकार मानतात. ह्याच धनामधून राजांनी साकारला राजगड. लगेच पुढे थोडा चढ असून वर गेल्यावर मेंगजाईचे मंदिर आहे. मंदिरामध्ये पोहचेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. राहायची जागा तर लगेच सापडली होती. बघतो तर काय आतमध्ये डाव्याबाजूला खुप सारे सरपण पडले होते. आधी जे कोणी येथे राहून गेले असतील त्यांनी जमवून ठेवले असेल. त्यांना मनातल्या मनात धन्यवाद दिले. आता राहिला प्रश्न पाण्याचा. अभिने जवळचा नकाशा काढला आणि गडावर टाक्या कुठे-कुठे आहेत ते बघायला सुरवात केली. तोपर्यंत मी दोर आणि मोठ्या तोंडाची एक बाटली घेतली. आता आम्ही नकाशावर जवळच्या २ जागा नक्की केल्या आणि पाणी शोढायला निघालो. मंदिरापासून थोड़े पुढे गेलो की एक वाट उजवीकड़े वळते जी पुढे बुधला माचीकड़े जाते. इकडे डाव्या बाजूला पाण्याची २ टाकं आहेत. बघतो तर त्यावर एक झाड़ पूर्ण वाकले होते. टॉर्च मारून पाहिले तर पाणी थोड़े खाली होते. मी बाटली घेउन पूर्ण आत वाकलो आणि पाण्यापर्यंत पोचलो. आता आम्ही सगळ्या बाटल्या भरून घेतल्या. जेवण बनवायला आणि प्यायला पुरेस पाणी मिळाल्याने सकाळपर्यंत काही चिंता नव्हती. आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि जेवणाच्या तयारीला लागलो. कालचा हर्षदचा अनुभव बघता अभि त्याला बोलला,"थांब. आज मी बनवतो जेवण." हा.. हा.. जेवण बनवून खाल्ले आणि आवरून घेतले. राजगडाच्या पायथ्यापासून आमच्या सोबत असणारा वाघ्या कुत्रा फारतर वाजेघरनंतर आम्हाला सोडून परत जाइल असे वाटले होते पण हा पठ्या आमच्यासोबत तोरणापर्यंत सुद्धा आला.




तोरणा किल्ल्याबद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. त्यात सर्वात महत्वाचा म्हणजे 'स्वराज्याचे तोरण हा किल्ला जिंकून लावले म्हणुन याचे नाव तोरणा आहे' हा गैरसमज. शिवाय हा किल्ला लढाई करून जिंकला असाही. पण सध्या जो समज तोरण्याबाबतीत ट्रेकर्समध्ये आहे तो म्हणजे येथे चकवा मारतो किंवा गडावर किल्लेदाराचे भूत दिसते. ह्यामुळे गडावर कोणी फारसे रहत नाही. गडावरील एकमेव राहण्याची जागा असलेल्या मेंगजाईच्या मंदिराचे छप्पर अर्धे उडून गेले आहे.(हल्लीच ते नीट केले आहे असे ऐकले आहे.) देवीच्या मूर्तीवरती छप्पर आहे तर पुढच्या भागावर नाही. त्यामुळे रात्रभर पत्रे वाजत होते. मंदिराला २ दरवाजे असून एक समोर तर एक डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूचा दरवाजा आतून बंद होता तर समोरचा दरवाजा आम्ही आतून बंद करून घेतला होता. वाघ्या मंदिरामध्ये एका कोपऱ्यात झोपला होता. त्यारात्री आम्ही झोपी गेलो तेंव्हा आम्हाला सुद्धा एक अनुभव आला.

(पुढे तुम्ही जे वाचणार आहात त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्हीच ठरवावे.) रात्री मध्येच अभिजित णि हर्षद दोघांना सुद्धा एकसारखे स्वप्न पडले. दोघांनाही स्वप्नामध्ये मंदिरामध्ये आमच्या भोवती सगळीकड़े सापच साप फिरत आहेत असे दिसत होते. आत साप आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा सगळीकड़े सापच साप. छप्पराचे पत्रे प्रचंड जोरात वाजत होते. आता दोघांनाही कोणीतरी दार वाजवतय असे वाटले. त्या आवाजाने दोघांनाही जाग आली. अभि दरवाजा उघडून बघतो तर काय बाहेर कोणीच नाही. किर्र्र्रररर अंधारामध्ये काय दिसणार होते. तितक्यात हर्षदने उजेड पडावा म्हणुन तेलाचा टेंभा मोठा केला होता. दोघांनाही पडलेले स्वप्न एकच होते असे जेंव्हा त्यांना कळले तेंव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. इतका वेळ मी मात्र गाढ झोपेत होतो. दोघांनी मला उठवायचे कष्ट घेतले नाहीत. अभिने पूर्ण देवळामध्ये टॉर्च मारून साप वगैरे नाही ना अशी खात्री करून घेतली. कोपऱ्यात झोपलेला वाघ्या मात्र आता जागेवर नव्हता. नेमका काय सुरु आहे तेच त्या दोघांना कळेना. दोघेपण चुपचाप झोपून गेले. (अर्थात हे सगळ मला सकाळी उठल्यावर कळले.) आता माझी पाळी होती. काही वेळाने मला सुद्धा हेच स्वप्न पडले आणि ह्यापुढे जाउन तर एक सापाने माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दंश केला असे स्वप्नामध्ये दिसले. अंगठ्यावर दंश बसल्याच्या खऱ्याखुऱ्या जाणिवेने मी खाडकन जागा झालो. उशी खालची टॉर्च घेतली आणि पायावर लाइट मारला. सर्पदंशाचे २ दात कुठे दिसतात का ते बघायला लागलो. पूर्ण पाय तपासला. अगदी डावापाय सुद्धा तपासला. कुठेच काही नाही. आता मी मंदिरामध्ये टॉर्च फिरवली. बघतो तर काय माझ्यासमोरच्या भिंतीला एक पांधऱ्या रंगाची एक कुत्री बसली होती आणि ती माझ्याकडेच बघत होती. मी टॉर्च मारल्या-मारल्या तिचे डोळे असे काही चमकले की मी टॉर्च लगेच बंद केली. त्या कुट्ट अंधारामध्ये सुद्धा तिचा पांढरा रंग सपशेल उठून दिसत होता. मी अभि आणि हर्षदला उठवायच्या फंदात पडलो नाही. मी सुद्धा चुपचाप झोपी गेलो. सकाळी जेंव्हा आम्ही उठलो तेंव्हा माझी स्टोरी ऐकून हर्षद आणि अभिजित एकमेकांकड़े तोंड आ वासून बघत होते. आता त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली. आता तोंड आ वासायची वेळ माझी होती. मी सुद्धा त्यांच्याकड़े बघतच बसलो. सूर्योंदय कधीच झाला होता. आम्ही उठून बाहेर आलो आणि बघतो तर काय वाघ्या आणि त्याच्या बाजूला ती पांढरी कुत्री ऊन खात पडले होते. हा वाघ्या रात्रभर कुठे गेला होता काय माहीत. आम्ही आता नाश्त्याच्या तयारीला लागलो. कारण फटाफट किल्ला बघून आम्हाला गड सोडायचा होता. नाश्ता बनवून, खाउन मी भांडी घासायला गेलो तर समोरून ते 'श्री शिवप्रतिष्ठान' वाले येत होते. त्यांना नमस्कार केला आणि काल राहिलात कुठे असे विचारले. कळले की राजगड आणि तोरणाला जोड़णाऱ्या डोंगर रांगेवर एका वाडीत त्यांनी मुक्काम केला होता. जेंव्हा मी त्याला आम्ही इकडेच देवळामध्ये राहिलो असे सांगीतले तेंव्हा तो ओरडलाच. "काय्य्य... इकडे राहिलात??? काही दिसल का तुम्हाला???" मी त्याला आमची रात्रीची स्टोरी सांगीतली. आता आ वासायची पाळी त्यांची होती. आम्हाला आलेला अनुभव हा भन्नाट, विचित्र आणि मती गुंग करणारा होता. (तुम्हाला कोणाला असा काही अनुभव असेल तर तो जरूर कळवावा.) असो... त्यावर जास्त उहापोह करत न बसता आम्ही आवरून गडफेरीला निघालो. आज तोरण्यावरील शिवपदस्पर्श अनुभवायचा होता ...






क्रमश:

Monday, 18 May 2009

भाग ४ - सप्त शिवपदस्पर्श ... !


राजगड - दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार ...

आज चौथ्या दिवशी आम्हाला निघायची काही घाई नव्हती. आज दिवसभर राजगड बघायचा होता. पण राजगडावरील सूर्योदय पहायचा होता म्हणुन लवकरच उठलो आणि सदरेवर गेलो. खरंतर बालेकिल्ल्याच्या दरवाजामध्ये जायचे होते पण उशीर झाला. सूर्योदय बघून परत आलो आणि मग सकाळच्या आवरा-आवरीला लागलो. नाश्ता बनवला आणि तयार होउन ८ वाजता बालेकिल्ला बघायला निघालो. राजसदनावरुन पुढे गेलो की वाट जराशी वर चढते. इथे उजव्या हाताला ढालकाठीचे निशाण आहे. अजून पुढे गेलो की २ वाट लागतात. उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघते. तर डावीकडची वाट बालेकिल्ला आणि पुढे जाउन सुवेळा माचीकड़े जाते. सकाळी बालेकिल्ला आणि सुवेळा माची बघायचा प्लान असल्याने आम्ही डाव्याबाजूने निघालो. जसे बालेकिल्ल्याच्या कड्याखाली आलो तशी लगेच पद्मावती माची आणि सुवेळा माची यांच्यामध्ये असलेली आडवी तटबंदी लागली. येथील प्रवेशद्वार मात्र पडले आहे. उजव्या हाताला एक झाड़ आहे त्या पासून वर ७०-८० फूट प्रस्तरारोहण करत गेले की एक गुहा आहे. आम्ही मात्र तिकडे काही चढलो नाही. प्रवेशद्वारावरुन पुढे गेलो की परत २ वाटा लागतात. उजवीकडची वाट वर चढत बालेकिल्ल्याकड़े जाते. तर डावीकडची वाट गुंजवणे दरवाज्यावरुन पुढे सुवेळा माचीकड़े जाते. आम्ही आमचा मोर्चा आधी गुंजवणे दरवाज्याकड़े वळवला. येथील बरेच बांधकाम पडले आहे तर काही ढासळत्या अवस्थेत आहे. त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते. पायऱ्या उतरुन खाली गेलो की दरवाजा आहे. दरवाजावरच्या बुरुजावर जाण्यासाठी डाव्या बाजूने वाट आहे. पण शक्यतो जाऊ नये कारण बांधकाम ढासळत्या अवस्थेत आहे. आम्ही दरवाज्या मधून पुढे गेलो. ह्या वाटेने कोणीच खाली उतरत नाही किंवा चढून येत नाही कारण पुढची वाट मोडली आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ही वाट वापरत होती हे आप्पा उर्फ़ गो.नी. दांडेकरांच्या 'दुर्ग भ्रमणगाथा' ह्या पुस्तकातून कळते. जमेल तितके पुढे जाउन आम्ही परत आलो. पायऱ्या चढून मागे आलो आणि बालेकिल्ल्याकड़े निघालो. ५ मिं. मध्ये बालेकिल्ल्याच्या पायर्‍यांखाली होतो. इकडे आल्यावर कळले की राजगडचा बालेकिल्ला का अभेद्य आहे ते. आधी पूर्ण उभ्या चढाच्या आणि मग उजवीकड़े वळून वर महादरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या अप्रतिमरित्या खोद्ल्या आहेत. त्या चढायला सोप्या नाहीत. हाताला आधार म्हणुन काही ठिकाणी लोखंडी शिगा रोवल्या आहेत. अखेर पायऱ्या चढून दरवाज्यापाशी पोचलो. उजव्या-डाव्या बाजूला २ भक्कम बुरुज आहेत. राजगडचा बालेकिल्ला हा अखंड प्रस्तर असून पूर्व बाजुस योग्य ठिकाणी उतार शोधून मार्ग बनवला गेला आहे. काय म्हणावे ह्या दुर्गबांधणीला... निव्वळ अप्रतिम ... !!! महादरवाजासमोर देवीचे मंदिर असून हल्लीच त्या मंदिराचे नुतनीकरण झाले आहे. असे म्हणतात की महादरवाजाच्या डाव्या बाजुच्या कोनाडयामध्ये अफझलखानाचे डोके पुरले गेले आहे. खरे की खोटे ते नाही माहीत. आता पुढे रस्ता उजवीकड़े वर चढतो आणि बालेकिल्ल्याच्या माथ्यावर जातो. इकडे उजव्या हाताने गेलो तर ब्रम्हर्षीचे मंदिर आहे. त्याशेजारी अतिशय स्वच्छ अशी पाण्याची २-३ टाकं आहेत. राजगडाचे मुळ नाव 'मुरुमदेवाचा डोंगर'. खरंतर ब्रम्हदेव ... बरुमदेव (गावठी भाषेत) ... आणि मग मुरुमदेव असे नाव अपभ्रंशित होत गेले असावे. राजगड हे नाव ठेवल शिवाजीराजांनी. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीचे मंदिर आणि त्याची पत्नी पद्मावती हिचे खाली माचीवर मंदिर हे संयुक्तिक वाटते. आम्ही आता उजव्या हाताने बालेकिल्ल्याला फेरी मारायला सुरवात केली. ब्रम्हर्षीच्या मंदिरासमोर कड्याला लागून जमीनीखाली एक खोली आहे. टाक आहे की गुहा ते काही आम्हाला कळले नाही. तिकडून दक्षिणेकड़े पुढे गेलो की उतार लागतो आणि मग शेवटी आहे बुरुज. त्यावरुन पद्मावती माचीचे सुंदर दृश्य दिसते. ह्या बुरुजाच्या डाव्या कोपऱ्यातून बाहेर पड़ायला एक चोर दरवाजा आहे. ती वाट बहुदा खालपर्यंत जाते पण तितकी स्पष्ट नसल्याने आम्ही फार पुढे सरकलो नाही. आता आम्ही डावीकड़े सरकलो आणि बालेकिल्ल्याच्या पश्चिम टोकाला पोचलो. आता समोर दूरवर पसरली होती संजीवनी माची आणि त्या मागे दिसत होता प्रचंड 'जेसाजी कंक जलाशय'.


ह्या बुरुजापासून बालेकिल्ल्याच्या माथ्यावर यायला पुन्हा थोड़े वर चढावे लागते. ह्या मार्गावर आपल्याला दारूकोठार आणि अजून काही पाण्याची टाकं लागतात. एकडून वर चढून आलो की वाड्याचे बांधकाम आहे. हा गडाचा सर्वोच्च बिंदू. ह्याठिकाणी सुद्धा राहते वाड्यांचे जोते असून उजव्या कोपऱ्यामध्ये भिंती असलेले बांधकाम शिल्लक आहे. उत्तरेकडच्या भागात तटबंदीच्या काही कमानी शिल्लक असून तेथून सुवेळा माची आणि डूब्याचे सुंदर दृश्य दिसते. एव्हाना १० वाजत आले होते. आल्या वाटेने आम्ही बालेकिल्ला उतरलो आणि सुवेळा माचीकड़े निघालो. इकडे मध्ये एक मारुतीची मूर्ति आहे. आता आपण पोचतो सुवेळा माचीच्या सपाटीवर. ह्याठिकाणी सुद्धा काही वाड्यांचे जोते असून ही स्वराज्याच्या लष्करी अधिकार्‍यांची घरे होती. तर प्रशासकीय अधिकार्‍यांची घरे पद्मावती माचीवर होती. पुढे निघालो तशी वाट निमुळती होत गेली आणि मग समोर जी टेकडी उभी असते तिला 'डूबा' म्हणतात. इकडे उजव्या बाजूला खाली 'काळकाईचा बुरुज' आहे. आम्ही त्या बाजुस न जाता पुढे निघालो. डूब्याला वळसा घालून झुंझार बुरुजापाशी पोचलो. अप्रतिम बांधणीचा हा बुरुज सुवेळा माचीला २ भागांमध्ये विभागतो. बुरुजाच्या उजव्या बाजूने माचीच्या दुसऱ्या टप्यामध्ये जाण्यासाठी वाट आहे. म्हणजेच माचीचा टोकाचा भाग पडला तरी हा दरवाजा बंद करून झुंझार बुरुजावरुन शत्रुशी परत २ हात करता येतील अशी दुर्गरचना येथे केली आहे. थोड पुढे उजव्या हाताला तटबंदीमध्ये एक गणेशमूर्ति आहे. ह्या जागी आधी 'संताजी शिळीमकर' यांचा वीरगळ होता असे म्हणतात. गडाच्या ह्या किल्लेदाराने मुघल फौजेवर असा काही मारा केला होता की मुघल फौजेची दाणादण उडालेली बघून खुद्द औरंगजेब हतबल झाला होता. त्या लढाईमध्ये एक तोफगोळा वर्मी लागुन संताजींचे निधन झाले. ज्या प्रस्तरावर झुंझार बुरुज बांधला आहे त्यास 'हत्ती प्रस्तर' असे म्हटले जाते कारण समोरून पाहिल्यास त्याचा आकार हत्ती सारखा दिसतो. ह्याच ठिकाणी आहे राजगडावरील नैसर्गिक नेढ़ (आरपार दगडामध्ये पडलेले भोक) उर्फ़ 'वाघाचा डोळा'. आम्ही तिकडे चढणार त्याआधी आमच्या सोबत असलेला वाघ्या तिकडे जाउन पोचला सुद्धा. ह्याठिकाणी कड्याच्या बाजूला मधाची पोळी आहेत त्यामुळे जास्त आरडा-ओरडा करू नये. काही वेळ एकडे थांबून आम्ही माचीच्या टोकाला गेलो. माचीचा हा भाग दुहेरी तटबंदी आणि शेवटी चिलखती बुरुज असलेला आहे. भक्कम तटबंदीच्या बुरुजावरुन सभोवताली पाहिले. उजव्या हाताला दुरवर 'बाजी पासलकर जलाशय' दिसतो. आता आम्ही परत फिरलो आणि आमचा मोर्चा काळकाई बुरुजाकड़े वळवला. ह्याठिकाणी उतरताना काही पाण्याची टाक आणि त्या शेजारी मुर्त्या लागतात. अगदी टोकाला बुरुज आहे आणि तिकडून खालचे गर्द रान दिसते. उजव्या बाजूला जरा मान वळवून पाहिले तर संजीवनी माचीची लांबी लक्ष्यात येते. आता आम्ही उजवीकडे सरकत संजीवनी माचीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण मातीचा आणि गवताचा घसारा इतका होता की प्रयत्न सोडून आम्ही पुन्हा आल्या मार्गी मंदिरामध्ये पोचलो. बघतो तर मंदिरामध्ये बरीच गर्दी होती. कळले की साताऱ्यावरुन 'श्री शिवप्रतिष्टान' चे ३०-४० कार्यकर्ते 'राजगड - तोरणा - रायगड' असा ट्रेक करण्यासाठी जमली होती. त्यांच्याशी जरा गप्पा मारल्या. 'भेटूच पुढचे ३ दिवस' असे बोलून आमच्या तयारीला लागलो. जेवण बनवले, खाउन सगळे आवरून घेतले आणि 'संजीवनी माची' बघायला निघालो.



राजसदनावरुन पुढे जाउन उजव्या बाजूच्या वाटेने बालेकिल्ल्याच्या कड्याखालून संजीवनी माचीकड़े निघलो. सुवेळा माची आणि संजीवनी माचीमधली तटबंदी लागली. त्यातले प्रवेशद्वार पार करून पुढे निघालो. आता वाट एकदम दाट झाडीमधून जाते आणि बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस निघते. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. मध्ये-मध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात तर उजव्या आणि डाव्या बाजूला उतारावर अनेक ठिकाणी जसे आणि जितके जमेल तितके पाणी जमवण्यासाठी टाक खोदलेली आढळतात. आता पुढे गेलो की एक बुरुज लागतो आणि त्या पुढे जायला उजव्या कोपऱ्यामधून दरवाजा आहे. गंमत म्हणजे ह्या बुरुजाच्या मागे लागुन एक खोली आहे. म्हणजे वरुन उघडी पण चारही बाजूने बंद अशी. आता नेमक प्रयोजन माहीत नाही पण बहुदा पाण्याचे टाके असावे. तोपची (तोफा डागणारे) तोफा डागल्यानंतर त्यात उड्या घेत असतील म्हणुन बुरुजाच्या इतके जवळ ते बांधले गेले असावे. असो.. आम्ही उजव्या हाताच्या दरवाजाने पुढे निघालो. माचीची पूर्ण उतरती तटबंदी आता आपल्या दोन्ही बाजुस असते. उजवीकडच्या जंग्यामध्ये लक्ष्यपूर्वक बघावे. (जंग्या - शत्रुवर नजर ठेवता यावी, तसेच निशाणा साधता यावा म्हणुन तटबंदीमध्ये असलेली भोके) एका जंग्यामधून खाली थेट दिसतो पुढच्या टप्याचा चोरदरवाजा. म्हणजेच पुढचा भाग जर शत्रुने ताब्यात घेतला तरी बारकूश्या चोरदरवाजा मधून शिरणाऱ्या शत्रुचे जास्तीत-जास्त सैनिक टिपता यावेत अशी दुर्गरचना येथे आहे. आम्ही तिघे आता अजून पुढे निघालो. दोन्ही बाजूला उतरती तटबंदी होती. काही वेळातच दुसऱ्या टप्याच्या बुरुजापाशी पोचलो. ह्याला 'व्याघ्रमुख' म्हणतात. येथे सुद्धा पहिल्या टप्यासारखीच दुर्गरचना. फरक इतकाच की तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्यामध्ये जाणारा दरवाजा हा डाव्या बाजूने आहे. ह्या दरवाजापासून लगेच पुढे डाव्या बाजूला आहे संजीवनी माचीचा 'आळू दरवाजा'. इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार असणाऱ्या तटबंदीमुळे आळू दरवाज्याचा बाहेरचा दरवाजा आतून दिसत नाही तर बाहेरून आतला दरवाजा सुद्धा दिसत नाही. सकाळपासून दुर्गबांधणी मधले एक-एक अविष्कार पाहून आम्ही पुरते भारावलो होतो. आमच्या कडून भन्नाट रे ... सहीच.. मानला रे... अश्या कॉमेंट्स येत होत्या. पण आम्हाला ठाउक कुठे होते की ह्यापुढे अजून जबरदस्त अशी दुर्गरचना आपल्याला बघायला मिळणार आहे. संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले.. ना कोणी करू शकेल.. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. मूळात गडाचा हा भाग तसा शत्रूला चढून यायला सर्वात सोपा म्हणुनच या ठिकाणची दुर्गबांधणी अतिशय चपखलपणे केली गेली आहे. दुहेरी तटबंदीमधली आतली तटबंदी मीटरभर जाड आहे. मध्ये एक माणूस उभा आत जाइल इतकी किंवा त्यापेक्षा थोडी मोठी जागा सोडली की बाहेरची तटबंदी आहे. बाहेरची तटबंदी सुद्धा मीटरभर जाड आहे. तिसऱ्या टप्यामधली ही दुहेरी तटबंदी शेवटपर्यंत इंग्रजी 'S' आकाराप्रमाणे वक्राकार आहे. ह्यात टप्याटप्यावर खाली उतरणारे दुहेरी बुरुज आहेत. म्हणजे दुहेरी तटबंदीवर एक बुरुज आणि त्याखालच्या दरवाजा मधून तीव्र उताराच्या २०-२५ पायऱ्या उतरून गेल की खालचा बुरुज. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायर्‍यांसाठी दरवाजामधून प्रवेश केला की डाव्या-उजव्या बाजूला बघावे. दुहेरी तटबंदी मधल्या वक्राकर मोकळ्या जागेमध्ये येथून प्रवेश करता येतो. इतकी वर्ष साफ-सफाई न झाल्यामुळे आता आतमध्ये रान माजले आहे. खालच्या बुरुजामध्ये उतरणाऱ्या पायऱ्या अक्षरशः सरळसोट खाली उतरतात. आता झाडी वाढल्यामुळे आत अंधार असतो त्यामुळे आत घुसायचे तर टॉर्च घेउन जावे. आम्ही तिघेपण थोडा उजेड बघून अश्याच एका बुरुजामध्ये खालपर्यंत उतरलो. उतरताना लक्ष्यात आले की पायऱ्या सरळ रेषेत नाही आहेत. त्यासुद्धा वक्राकर. जेंव्हा पूर्ण खाली उतरून गेलो तेंव्हा खालच्या बुरुजाकड़े बाहेर निघणारा दरवाजा दिसला. तो जेमतेम फुट-दिडफुट उंचीचा होता. म्हणजे बाहेर निघायचे तर पूर्णपणे झोपून घसपटत-घसपटत जावे लागत होते. हूश्श्श... एकदाचे तिकडून बाहेर पडलो आणि खालच्या बुरुजावर निघालो. आता आम्ही दुहेरी तटबंदीच्या सुद्धा बाहेर होतो. कसली भन्नाट दुर्गरचना आहे ही. शत्रुने जर हल्ला करून खालचा बुरुज जिंकला तरी आत घुसताना शत्रूला झोपून घसपटत-घसपटत आत यावे लागणार. त्यात ते काय शस्त्र चालवणार आणि काय लढणार. अगदी आत आलेच तरी लगेच पुढे वक्राकर आणि सरळसोट वर चढणाऱ्या पायऱ्या. बरे तिकडून सुद्धा शत्रु पुढे आलाच तर दुहेरी तटबंदीमधल्या आतल्या तटबंदीचा दरवाजा बंद करून घेतला की शत्रु सैन्याला पर्याय राहतो तो फ़क्त उजवीकड़े किंवा डावीकड़े जाण्याचा म्हणजेच दुहेरी तटबंदीमधल्या मोकळ्या वक्राकर जागेमध्ये शिरायचा. आता ह्यात शिरणे म्हणजे जिवंत सुटणे नाही. कारण एकतर वर चढून येणे शक्य नाही आणि वरुन आपण गरम तेल, पाणी, बाण, भाले अश्या कशाने सुद्धा शत्रूला लक्ष्य करू शकतो. ह्या संपूर्ण मालिकेतून शत्रूला विजय मिळणे शक्य नाही. मिळेल तर तो मृत्युच. आम्ही पुन्हा पायऱ्याचढून आतमध्ये आलो आणि शेवटच्या बुरुजाकड़े निघालो. अध्ये-मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत. अखेर पूर्ण माचीबघून आम्ही टोकाला चिलखती बुरुजाकड़े पोचलो. ६ वाजत आले होते. डाव्या बाजूस अथांग येसाजी कंक जलाशय होता. तर उजव्या हाताला दुरवर तोरणा उभा होता. त्यास मनातच म्हटले... 'उदया येतोय रे तुझ्याकड़े'. काहीवेळ तिकडेच बसलो. मागे दूरवर बालेकिल्ला आणि पद्मावती माची दिसत होती. आज राजगड बघून आम्ही भरून पावलो होतो. खरच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी राजगडला यावे आणि असे भरभरून बघावे. सूर्य अस्तात जात होता. आम्ही आमची पावले पुन्हा एकदा देवळाकड़े वळवली. भराभर पावले टाकत आळू दरवाजा पार केला आणि मग वरच्या टप्यावर येत बालेकिल्ल्याला भिडलो. कडयाखाउन येतायेताच पूर्ण अंधार पडला होता. आम्ही देवळाकड़े पोचलो तेंव्हा ७ वाजत आले होते. मंदिराच्या पायरीवर येउन बसलो. आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. मस्तपैकी पुलाव आणि खीर असा बेत केला होता. पण जेवण बनवताना हर्षदकडून पुलावमध्ये चुकून रॉकेल पडले. हा हा ... त्याचे झाले असे की हा आपला बघतोय झाकण उचलून की भात शिजला आहे की नाही ते आणि बघताना उजेड हवा म्हणुन रॉकेलचा दिवा ठेवलाय झाकणावर. मग काय पडला ना तो आतमध्ये. आधी आम्हाला काही बोललाच नाही तो आम्हाला. पण नंतर सांगतो कसा,"जरा गडबड झाली आहे. भात परत बनवावा लागेल." मग आम्हाला सगळी स्टोरी सांगितली. आता भात परत लावला. खीर बनवली आणि मस्तपैकी जेवलो. जेवताना आणि त्यानंतर पण अभि हर्षदला सुनवतच होता की 'बघ तुझ्याकड़े एक रिसोर्स कमी असल्याने हे असे घडले'. हर्षद त्यावर त्याची बाजु मांडत होता आणि मी मध्येच माझी टिप्पणी देत होतो. दूसरीकड़े टाकुन दिलेला भात वाघ्याने कधीच खाल्ला होता. नशीब त्याला काही झाले नाही. चर्चा, वाद-संवाद, भांडण तुम्ही काय म्हणाल ते करत आम्ही चौथ्या दिवशी झोपी गेलो. अत्यंत महत्वाचा असा शिवपदस्पर्श आज अनुभवला होता. आता उदया लक्ष्य होते किल्ले तोरणा उर्फ़ प्रचंडगड ...




क्रमश:
नोंद : काही छायाचित्रे (हिरवीगार) आमच्या वेळच्या ट्रेकची असून काही मात्र माझ्या नंतरच्या ट्रेकच्या वेळची आहेत.

Friday, 15 May 2009

भाग ३ - सप्त शिवपदस्पर्श ... !


आज होता ट्रेकचा तिसरा दिवस... आज अगदी लवकरच उठलो आणि पोहे आणि चहा असा नाश्ता बनवला. खाउन सगळे आटोपले आणि राजगडाकड़े कूच करायला तयार झालो. गावाबाहेर पडलो तशी शेती लागली. सगळीकड़े भात शेती दिसत होती. बांधा-बांधावरुन वाट काढत आम्ही नदीच्या दिशेने सरकत होतो. एके ठिकाणी झाडावर ५०-६० सुगरणीचे खोपे दिसले. अगदी हाताला लागतील इतके खाली. आख्खे झाड़ खोप्यांनी लगडलेले होते. ते बघत-बघत पुढे सरकतोय तोच माझा डावा पाय एका बांधावरुन सरकला आणि मी डाव्या बाजूवर जोरात पडलो. लागले काहीच नाही पण आख्खी डावी बाजू चिखलाने माखून निघाली. ह्या ट्रेकला आम्ही कोण किती सरकते - कोण किती पड़ते ते मोजायचे ठरवले होते त्यामुळे मी आता लीडिंग रन स्कोरर होतो. हा.. हा.. काही वेळातच आम्ही नदीकिनारी येउन पोचलो. नदीला कमरेच्या थोड़े खालपर्यंत पाणी होते. काही मिनिट्स मध्ये आम्ही नदीच्या त्यापार होतो. आता आम्ही विंझर गावामध्ये पोचलो होतो. गावत दुकाने आहेत. कोणाला काही सामान घ्यायचे असल्यास हे ठिकाण उत्तम आहे. तिथून डांबरी रस्त्यावरुन राजगडाच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणे गावाकड़े निघालो. ९ वाजत आले होते. गुंजवणे गावापासून राजगड चढायला सुरवात केली. लक्ष्य होते पद्मावती माचीवर निघणारा चोर दरवाजा. डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ आणि झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसत होते. आम्ही राजगडला पहिल्यांदाच येत होतो त्यामुळे ते दृश्य पाहून मी पुरता भारावलो होतो. आता आम्ही गावापासून चढायला सुरवात केली. काही वेळामध्ये एके ठिकाणी दम घेण्यासाठी बसलो. तितक्यात कुठूनसा एक कुत्रा आला आणि आमच्याभोवती घोटाळायला लागला. जसे आम्ही पुढे निघालो तसा तो पण आमच्यासोबत निघाला. काही वेळामध्ये पहिला चढ चढून गेलो की काहीवेळ सपाटी लागते. ह्या सपाटीवरुन समोरचा पूर्ण चढ आणि वरपर्यंतची वाट दिसते. आता इथून चढ सुरु झाला की वळणा-वळणाची खड्या चढणीची वाट आहे. कुठेही सपाटी नाही. एक लक्ष्यात घ्यायला हवे की हा राजगडचा राजमार्ग नसून चोरवाट आहे त्यामुळे वेळ कमी लागत असेल तरी पुरता दम काढते. अगदी सावकाश गेलो तरी तास- दिड तासामध्ये आपण कड्याखाली असतो. इकडून वाट आता गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याठिकाणी एक छोटेसे पाण्याचे टाक आहे. येथपासून ६० फुट वरती तटबंदीमध्ये चोरदरवाजा बांधला आहे. वर जाईपर्यंत सर्व कोरीव पायऱ्या आहेत. हा टप्पा तसा सोपा आहे त्यामुळे कसलेल्या ट्रेकरला काहीच प्रश्न यायला नको. नवशिके आणि इतर लोकांना चढायला सोपे पडावे म्हणुन उजव्या हाताला रेलिंग बांढलेली आहे. ५ मिं. मध्ये हा टप्पा पार करून ३-४ फुट उंचीच्या आणि तितक्याच रुंद अश्या छोट्याश्या दिंडीमधून गडामध्ये प्रवेश करते झालो. आत गेल्या-गेल्या वाट ९० अंशात डावीकड़े वळते आणि लगेच १०-१५ पायऱ्या चढून वर जाते. आपण वर येतो ते थेट पद्मावती तलावासमोर. तलावाच्या डाव्याबाजूला काही पडके बांधकाम आहे. आधी ही बहूदा राहती घरे असावीत. अजून थोड़े वर चढून गेलो की हल्लीच बांधलेले विश्रामगृह लागते. ह्यामध्ये ३० जण सहज राहू शकतात. आम्ही मात्र पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये राहणार होतो. ह्या देवळामध्ये सुद्धा ५० एकजण सहज राहू शकतात. आम्ही वर पोहचेपर्यंत १२ वाजत आले होते. बॅग्स देवळामध्ये ठेवल्या आणि देवीचे दर्शन घेतले. आता आज आणि उद्यापण निवांतपणा होता. राजगडाच्या तिनही माच्या आणि बालेकिल्ला आरामात बघून मगच आम्ही गड सोडणार होतो. आज फ़क्त पद्मावती माचीचा विस्तार बघायचा होता. त्याआधी मात्र आम्ही देवळाबाहेर चुल मांडली, २ दिवस पुरतील इतकी सुकी लाकडे गोळा केली आणि दुपारचे जेवण बनवायला घेतले. देवळाच्या डाव्या बाजूला २ पाण्याची टाकं आहेत. त्यामधले पाणी पिण्यायोग्य आहे. दुपारी जेवण झाल्यावर मात्र आम्ही पद्मावती माची बघायला निघालो.






राजगड म्हणजे स्वराज्याची पाहिली राजधानी. खुद्द मासाहेब जिजामाता, शिवाजीराजे आणि त्यांचे कुटुंब यांचे गडावर कायम वास्तव्य. त्यामुळे लश्करीदृष्टया तो अभेद्य असावा अश्या पद्धतीने त्याची बांधणी केली गेली आहे. गडाच्या तिन्ही माच्या स्वतंत्रपणे लढवता येतील अशी तटबंदी प्रत्येक २ माच्यांच्या मध्ये आहे. प्रत्येक माचीला स्वतंत्र मुख्य दरवाजा आहे. पद्मावती माचीला 'पाली दरवाजा', जो राजगडचा राजमार्ग देखील आहे. संजीवनी माचीला 'अळू दरवाजा' तर सुवेळा माचीला गुंजवणे दरवाजा, जो सध्या बंद स्थितिमध्ये आहे. शिवाय प्रत्येक माचीला स्वतंत्र चोर दरवाजे आहेत. पद्मावती माचीच्या चोर दरवाजामधून तर आम्ही गडावर चढून आलो होतो. संजीवनी माची आणि सुवेळा माचीकड़े आम्ही उदया जाणार होतो. आम्ही आता पद्मावती माची बघायला निघालो. पद्मावती माचीचा विस्तार हा इतर दोन्ही माच्यांच्या मानाने कमी लांबीचा पण जास्त रुंद आहे. माची ३ छोट्या टप्यात उतरत असली तरी गडावरील जास्तीतजास्त सपाटी ह्याच माचीवर आहे. सर्वात खालच्या टप्यामध्ये पद्मावती तलाव आणि चोर दरवाजा आहे. मधल्या टप्यामध्ये विश्रामगृह, शंकर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. शिवाय देवळासमोर एक तोफ आणि एक समाधी आहे (ही समाधी राजांची थोरली पत्नी 'महाराणी सईबाई' यांची आहे असे म्हटले जाते. ५ सप्टेंबर १६५९ रोजी त्यांचा राजगडावर किंवा पायथ्याला मृत्यू झाला होता.) देवळासमोरच्या मोकळ्या जागेमध्ये एक स्तंभ आहे. विश्रामगृहापासून डावीकडे म्हणजेच माचीच्या पूर्व भागात गेल्यास अधिक सपाटी आहे. टोकाला तटबंदी असून एक भक्कम बुरुज आहे. येथून पूर्वेला सुवेळामाचीचे तर पश्चिमेला गुंजवणे गावापासून येणाऱ्या वाटेचे सुंदर दर्शन होते. माचीवर सर्वात वरच्या टप्प्यामध्ये राजसदन, राजदरबार, सदर, दारूकोठार, पाण्याचा एक तलाव अशी बांधकामे आहेत. ज्याठिकाणी आता सदर आहे त्याखाली काही वर्षांपूर्वी एक गुप्त खोली सापडली. आधी ते पाण्याचे टाके असावे असे वाटले होते पण तो खलबतखाना निघाला. ७-८ अति महत्वाच्या व्यक्ति आत बसून खलबत करू शकतील इतका तो मोठा आहे. त्या मागे असलेल्या राजसदनामध्ये राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये... त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटी सारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणुन तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे. इतका वेळ इतिहासावर गप्पा मारत आम्ही तिघेजण राजसदनाच्या मागे तटबंदीवर बसलो होतो. सूर्यास्त होत आला होता. आम्ही परत फिरून देवळाकड़े निघालो. जेवणाची तयारी करत-करत परत गप्पा मारू लागलो. पायथ्यापासून आमच्या सोबत आलेला कुत्रा अजून सुद्धा आमच्या सोबत होता. एव्हाना अभिने त्याला 'वाघ्या' असे नाव सुद्धा ठेवले होते. आम्ही जेवण झाल्यावर त्याला सुद्धा थोड़े खायला दिले. रात्री देवळामध्ये झोपायच्या ऐवजी देवळाबाहेर झोपायचे आम्ही ठरवले. आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही राजगडावरील निरव रात्र अनुभवणार होतो. दिवसभराच्या भटकंतीनंतर शांत झोप लागली. आता उदया सकाळी लवकर उठून राजगडावरील सूर्योदय पहायचा होता...


क्रमश: